प्रितम आन मिलो

Submitted by meghdhara on 17 February, 2025 - 21:48

प्रितम आन मिलो

.. बहाद्दूरचं एक मन सांगतं ' नको , तुला माहितेय त्यात काय आहे .. ' दुसरं , 'एकच एकच ' म्हणत असतं . शेवटी पहिलं मन .. ' जा आणि मर !' म्हणत दुसर्या मनाचा नाद सोडुन देतं . म्युजिक सुरु होतं .

रात्रीचा एक दीडचा सुमार. मिट्ट काळोख झालाय. त्या काळोखाच्या पडद्यावर एकाच एक्सिलेटरवर पाऊस पडतोय .. दूरदर्शनवरच्या ८० सालच्या मुंग्यांसारखा. लाईट गेलेत ..( होय लाईट जातात ) बॅटरीतलं पाणी संपुन .. एक कर्कश 'खिंss' करून इन्व्हर्टर, 'जा तडफड आता' म्हणतंय. आणि स्ट्रीम झालेल्या अंगूर मधला बहाद्दूर २ , जिन्याच्या पहिल्या पायरीशी येऊन गूढ गाणं म्हणतोय ..' प्रितम आन मिलो ..' सोबत रातकिड्यांचा किर्रर्र आवाज येतोय .. त्या गूढतेला आणखीन गडद करण्यासाठी एक बॉल टप्पे खात त्या जिन्यावरून खालून वर चाललाय .. बहाद्दुर २ वर बघतोय .. वर कोणीतरी आहे ! आणि झटक्यात मेमरीचे फ्लॅश लाईट्स डोक्यात सटासट झगमगुन सगळा उलगडा होतोय ..
.... बरेच वर्षांपूर्वी कसं काय ते टीव्ही वर हे गाणं बघताना आपण घाबरलो होतो .. जेव्हा देवेन वर्मा म्हणतो .. ' रात अकेले डर लगता है जंगल जैसा घर लगता है ..' वाटलं होतं ' बिचारा कुठल्यातरी निर्जन जागेवर असलेल्या या बंगल्यात घरी एकटा रहातोय.. हे भीती वाटणारे लोकं बंगल्यातच का राहातात नेहमी !?! ' असा प्रश्नही पडलेला लख्ख आठवतो .. हॉल मध्ये बसलेले सगळे त्यात घाबरलेली मी, हसणारी ताई .. माझ्या घाबरण्याला सगळेच हसत तेव्हा सुद्धा .. त्यामुळे दुर्लक्ष करायची सवय असलेली मी ते भुताचं गाणं लक्ष देऊन बघत रहाते .. बंगाल्यातले पडदे फडफडत असतात .. वाऱ्याचा आवाज येत असतो .. तर तेव्हा कोणीतरी सांगतं ( नक्कीच ताईच्या, शेजारच्या मित्र मैत्रिणींच्या गॅंग मधलं कोणीतरी .. 'अगं पाहू नकोस .. भुताचा पिक्चर आहे ..' तेव्हा भाबडी आणि मोठ्यांचं सोयीप्रमाणे ऐकणारी मी टीव्ही समोरून उठुन आत जाते. बाहेर गाणं सुरूच असतं .. सगळे जण हसत असतात .. मला आत त्यांनी हसल्याचा रागही आलेला असतो .. पण खिडकीच्या गजांतून बाहेरचा अंधार पहाणारा देवेन वर्मा आठवतो आणि पुढचं काही बघायचं टाळण्यासाठी ..' हे लोक काय एवढे हसतायत या कडे साफ दुर्लक्ष करून मी आत बसून रहाते. ' मागच्या गॅलरीचा दरवाजा बंद असल्याची खात्री करते. पक्कं ठरवते अंगूर कधीच बघायचा नाही. उगाच !
तेवढ्यात आत्ताचे लाईट्स येतात .. इन्व्हर्टर पुन्हा एकदा खिं ss आवाज करत आपलं काम बजावतो .. बहाद्दूर २ पुढे म्हणतो .. ' चलती है जब तेज हवाएं लहाराता हंटर लगता है .. कितने हंटर खांउ ! ' मी भानावर येते .. मोठ्ठयाने हसते ..

मौसमी चा गोड गोड , अरुणा ईराणी चा चटपटीत पद्मा चव्हाणचा फ्लेवर असलेला , देवेन वर्मा आणि आवडत्या संजीवकुमारच्या विनोदाचा साधा खुशखुशीतपण असलेला अंगूर मनापासून एन्जॉय करते .

- मेघा देशपांडे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

+१

