सून बाई सून ! - भाग २

Submitted by अविनाश जोशी on 15 February, 2025 - 05:35

सून बाई सून ! - भाग २
बाईसाहेबांचे इतर मुली पाहण्याचे काम अर्थातच वाया गेले. आता त्यांना तीन चार वर्षे ट्रेनिंग मध्ये असलेल्या मुळीच चालणार होत्या. त्यानंतर इंदूचे दौरे सुरु झाले. चंद्रतळासाठी ट्रैनिंग देणाऱ्या अठरा संस्था भारतात होत्या. प्रत्येक केंद्रामध्ये जाऊन इंदूने उपवर मुलींची चौकशी सुरु केली. बहुतेक ठिकाणी त्यांना असा अनुभव आला कि मुले-मुली येथूनच लग्न ठरवून जातात.
महत्वाचे कारण म्हणजे, सहा वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये ही मुले कोठेही जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना भेटायलाही कोणी येऊ शकत नाही. प्रत्येक केंद्रात जवळ जवळ पंधराशे मुली- मुले असतात. जोड्या जुळवता याव्या म्हणून हे प्रमाण १:१ ठेवले जाते. अशा ट्रैनिंग स्कूल मधून इंदू फिरली पण तिला एकही मुलगी मनासारखी मिळाली नाही. जयंताला शोभण्यासारख्या मुली होत्या त्या अगोदरच बुक झाल्या होती. ज्या मिळाल्या असत्या त्या अगदीच सुमार होत्या. अर्थात सर्वच मुलींचे बुध्यांक, शरीरयष्टी प्रमाणबद्ध असायचे कारण सहा वर्ष ट्रैनिंगमध्ये घालवल्यावर आणि ट्रैनिंगसाठी लाखो डॉलर खर्च केल्यावर रिजेक्शन होणे म्हणजे अतिशय भयाण स्वप्न होते. अशा स्थितीत अशा मुलांना अजून एक वर्ष घालवून पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागे. चंद्रकुमारींच्या मागे लागून इंदूचे चार-पाच महिने उत्तम गेले. तिला फिरण्याचा शौक होता आणि माझ्या पदामुळे सर्व ठिकाणी तिचे आदरातिथ्य छान होत होते. माझेही काही महिने छान गेले कारण मी काही महीने अगदी एकटा आणि स्वतंत्र होतो. ती परत आल्यावर अजूनच वैतागलेली दिसली.
एक दिवशी सकाळी मी तिला शोध मोहिमेबद्दल विचारले. तर उसासे टाकून ती म्हणाली. काय ह्या सध्याच्या पोरी चंद्रतळावर एकदा प्रवेश मिळाला कि या सगळ्याच पोरी एकदम बिनधास्थ होतात कारण तळावर गेल्यावर तिथे असलेल्या शिक्षणापासून ते साहसापर्यंत सर्व गोष्टी हात जोडून उभ्या असतात.
एकदा तू जयंताबरोबर बोलून तर बघ. तळावरील चांगल्या मुली एकतर जोडीदार निवडून बसलेल्या आहेत तर काहीजण जयंताला अनुरूप अशा नव्हत्या.
मी इंदूला सांगितले कि अशी मुलगी मिळाली कि तिच्यावर सासूगिरी करायला तीला एकदिवसही मिळणार नाही. अर्थात महत्प्रयासाने मी आपल्या वेळेप्रमाणे संद्याकाळी सात ते आठ या वेळेचे बुकिंग जयंताशी बोलण्यासाठी केले. आम्ही दोघे आणि जयंत त्याची बायको गप्पा मारायला सुरवात केली. जयंतची तिन्ही मुले आजूबाजूला दंगा करताना दिसत होती. पाच दहा मिनिटांनी जयंत ने विचारले इतका प्रमाण वेळ बुक करून तुम्ही कॉल बुक केला म्हणजे महत्त्वाचेच कारण असणार.
होय बाबा! तुझ्या आईने दुसऱ्या लग्नाचा ध्यास घेतला आहे.
'म्हणजे आई तुम्ही दुसरा लग्न करणार ' सारा
'आई हे काय वय आहे दुसरा लग्न करण्याचे' जयंत
आणि बाबा तुम्ही पण ना ' जयंत
तुमचा गैरसमज झाला आहे ती स्वतःच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलत नाही तर ती जयंताच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करत आहे.
जयंत - सारा एकमेकांकडे बघून खिदळायला लागले. त्याची तीन मुले मात्र आपल्या आई - बाबांना काय झाले आहे हे न कळल्यामुळे एकदम गप्प झाली. थोडेसे हसणे आणि विनोद संपल्यावर मी तिच्या हकीकतीला सुरवात केली. चाणक्य मधील विशाल महिला मंडळ, इंदूची अध्यक्षपदी निवड आणि गेल्या दीड दोन वर्षातील तिने केलेले बरेच आयोजन, असे सर्व विषय मी थोडक्यात सांगितले. या संगळ्यांचा आणि सुनेचा काय सबंध आहे हे त्या दोघांनाही कळले नाही. त्यानंतर मी त्यांना मंडळाच्या बायकांनी दिलेले दुय्यम स्थान आणि दुर्लक्ष करायची वागणूक यामुळे इंदूच्या मनामध्ये एक कॉम्प्लेक्स दिसू लागला. म्हणून तिने जयंता करिता वधू संशोधन सुरु केले. सर्वच्या सर्व अठरा शिक्षणतळ आणि तिथल्या सोळा हजाराहून जास्त मुली तिने बघितल्या अर्थातच तिला जयंता योग्य कोणीच सापडले नाही. जयंता ने सारा कडे बघून मिश्किल हास्य केले. तो म्हणाला ‘येथे मला कितीही मुलींशी लग्न करायची परवानगी आहे, तळावरील लोकसंख्या वाढवायच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. प्रत्येक लग्नातून चार तरी मुले झालीच पाहिजेत असा येथील नियम आहे. आमच्या इथे काही फॅमिलीत आठ बायकांना साठ मुले सुद्धा आहेत.’ जयंता
बघा मी म्हणत नव्हते तो तयार होईल म्हणून.
इंदू जयंताला काही बोलायचे होते तू त्याला मध्येच अडवले. हा जयंता सांग बघू ' मी
आई एक मोठी अडचण आहे तू जर आता नवीन मुलगी बघशील तर तिचे वय बाराच्या आसपास असेल ज्यावेळी ती चंद्रावर येईल तेव्हा ती अठरा वर्षाची असेल आणि मी छत्तीस वर्षाचा असेल. नवीन नियमाप्रमाणे वर आणि वधूचा वयाचा फरक तीन वर्षाचा ठेऊ शकतो. आता सांग पाहू चंद्र शिक्षण पूर्ण झालेली आणि सत्तावीस वर्षाची मुलगी मला मिळू शकेल का ?
'म्हणजे थोडक्यात ती मुलगी तुझ्या हाताखाली एक दिवस राहणार नाही . तळावरचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना लगेच तळावर पाठवले जाते.
दुसरा पर्याय म्हणजे चंद्रावरचीच मुलगी करणे पण त्याचा तुलाच काही उपयोग होणार नाही कारण तुला तिला पृथ्वीवर मिरवताही येणार नाही आणि ती काही तुझ्या हाताखाली काही करू पण शकणार नाही.
बराचवेळ असा फोन झाल्यावर इंदूला शेवटी कळून चुकले की आता जयंत चे दुसरे लग्न करता येणार नाही.
दिवस मागून दिवस जात होते आणि तिचा मूड जास्त खराब होत होता. थोडक्यात मंगल चे प्रत्येक काम तिला चुकीचे आणि घाणेरडे वाटायला लागले. जेवताना अशी वाक्य ऐकू येऊ लागली की डोसा केलास का भाकरी केलीय. ती कुमोदची सून बघ किती सुंदर डोसे करते. डाळ वांग खावं तर श्रेयाच्या हातच.
असे काही दिवस गेल्यानंतर मंगल ही काही दिवसांनी कंटाळली. तिने सरळ नोकरीची नोटिस देऊन टाकली. ती सोडून जाताच घरात इंदूचा प्रचंड गोंधळ सुरु झाला.
आत्ता पर्यंत महिला मंडळात तिच्या सुनेच्या शोधावर बरीच चर्चा चालत असे. शेवटी कंटाळून तिने मंडळात जायचे सोडून दिले. आता तर तिला घरातल्याकरिता भरपूर वेळ मिळू लागला व माझी डोकेदुखी सुरु झाली. तिला सामोरा समोर काही बोलणे शक्यच नव्हते. तिने हा सुनेचा विचार सोडून द्यावा आणि पूर्ववत सर्व कार्यक्रम सुरु ठेवावे. अर्थातच ही कल्पना इंदूला मान्य होणारी नव्हतीच. तिचे वाचन फारसे दांडगे नव्हतेच. पण कधीकाळी तिने होलोग्राफच्या लेटेस्ट न्यूज वाचायला घेतल्या. ह्या नवीन अंकात एका अति प्रगल्भ सायबोर्गची जाहिरात होती. हा सायबोर्ग जरी असिमोनचे तीन नियम पाळणारा असला तरी सुद्धा तो भावना प्रधान होता. जगाचे आणि शास्त्राचे भरपूर ज्ञान त्यात साठवले होते. त्याशिवाय त्याला हवी असलेली माहिती दोन मिनिटात त्याच्या मेंदूत साठवली जाई. मुख्य म्हणजे या सायबोर्गला स्वतःचे व्यक्तिमत्व होते. इंदूने या तंत्रज्ञानाचा जमेल तेवढा अभ्यास केला. तीन दिवसात मला तिने या प्रश्नावर बरेच छळले.
एकेदिवशी संद्याकाळी जेवण झाल्यावर तिने विषयाला वाचा फोडली. मधू आपण एक XM - ८६८ या मॉडेलचा लेटेस्ट सायबोर्ग करून घ्यावा.
'अग पण ! आपल्याकडे पाच सायबोर्ग आहेत. त्यात सहावा सायबोर्ग घ्यायला सरकार कधीच परवानगी देणार नाही' मी
'इंदू हा प्रचंड गुंतागुंतीचा विषय आहे. मला माझ्या नोकरीमुळे पाच यंत्रमानवाची परवानगी आहे. त्यात मला सहावा भर घालता येणार नाही. मी प्रयत्न करून पाहीन पण काही सोल्युशन निघेल असे वाटत नाही'
या शहरात सर्व प्रकारच्या सुख सोयी होत्या. अगदी खरोखर सुनामी आली किंवा २०० के एम पी एच घोंगावणारे वारे आले किंवा अगदी भूकंप झाला तरी सुद्धा हे रोबोट त्यांचे काम करण्यात सज्ज असतात.
शेवटी असे ठरले कि ढवळ्या - पवळ्या पैकी एक किंवा माझ्या PA ला कमी करावे.
पीए ला कमी करणे शक्यच नव्हते आणि ढवळ्या व पवळ्या हे सुरक्षारक्षक सल्याने सरकारने त्यांना कमी केले नसते. शेवटी पाळी आली बिचाऱ्या माळ्यावर. घरकाम करणाऱ्या रोबोने कमलच्या मदतीने माळीकाम करावे असा फतवा निघाला. त्या करिता घरकाम करणाऱ्या सायबोर्ग मध्ये आवश्यक ते बदल करून घेण्यात आल्यावर तिचे संशोधन जोरात सुरु झाले. पहिल्यापासूनच मी या विषयापासून अलिप्त होतो. माझा पीए आणि ड्राइवर कम सुरक्षारक्षक असल्यामुळे मला बाकीच्या कामाची चिंता नव्हती. इंदूने वाचलेल्या तंत्रज्ञानावर आधारलेले सायबोर्ग दोन वर्षांपूर्वीच मार्केट मध्ये आले होते. तिला त्या तंत्रज्ञानावर आधारित सायबोर्ग सून हवी होती. गेल्या दोन वर्षातल्या बऱ्याच जाहिराती पाहूनही तिला तिच्या मनासारखा सायबोर्ग सापडत नव्हता. तिच्या काही अटी खालीलप्रमाणे होत्या.
१. सायबोर्गची उंची ५ फूट सहा इंच , शिडशिडीत बांधा, गोरीपान, लांबसडक केस, निळसर घारे डोळे आणि अतिशय सुंदर असावी. सायबोर्ग कस्टम मेड असल्यावर अशी मागणी पुरी होणे फारसे अवघड नव्हते.
२. सर्व प्रकारच्या स्वयंपाकात तज्ञ असावी. या मागणीतही तसे फारसे अवघड नव्हते. वेगवेगळ्याप्रकारचे प्रोग्रामिंग अँड डेटा बँक अकॅसिस सहजपणे सायबोर्गला देता आला असता. इथे एक गोष्ट मला स्पष्ट करावीशी वाटते , गेली दहा वर्षात सायबोर्गच्या तंत्रन्यानात फारच बदल झाले होते. त्याच्या स्वतःच्या मेमरीशिवाय बऱ्याच प्रकारचे ज्ञान हवे असेल तेव्हा सेंट्रल कॉम्पुटर मधून डाउनलोड करता यायचे. यामुळे सायबोर्गची क्षमता कितीतरी पटीने वाढली होती.
३. सून आज्ञाधारक असावी अर्थात रोबोटिकचा पहिल्या नियमाप्रमाणे सायबोर्गमध्ये ही मागणी ठसवलेलीच असते.
४. चारचौघात तिने सायबोर्ग असल्याचे उघड करू नये. ती मानवच आहे अशा तर्हेने तिने चारचौघात वागावे. तिचे बोलणे चालणे एखाद्या आदर्श मानवी सुनेप्रमाणे असावे.

असंख्य जाहिराती पाहूनही तिला हवा तास सायबोर्ग सापडेना शेवटी तिने त्यातल्या तीन मोठ्या कंपनांशी संपर्क साधला आणि आपली मागणी कळवली.
तिन्ही मोठया कंपन्यांनी आपली असमर्थता दर्शविली. अशा प्रकारची सायबोर्ग तयार करण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. दुसऱ्या एका कंपनीने अशी सून करू शकण्याची मान्य केले पण त्यांची किंमत फारच अवाढव्य होती. या प्रकारच्या सायबोर्गची मागणी नसल्याने याचे कोणीच फारसे उत्पादन न केल्याचे स्पष्ट झाले.
अखेर पुण्यातील एका छोट्या कंपनीने एक दीड वर्षांपूर्वी अशा प्रकारचा सायबोर्ग केल्याचे स्पष्ट झाले. त्या कंपनीशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तर ती कंपनी गेल्या काहीदिवस बंद पडल्याचे कळले. शेवटी माझ्या पीए त्या कंपनीचा शोध घेण्याचा आणि पुण्यात जाऊन त्या मालकाशी संपर्क करण्याचे काम दिले. तिसऱ्या दिवशी श्री गोपाळ महाशब्दे या गृहस्थाशी त्याचा संपर्क झाला. माझ्या पीए जवळ असणाऱ्या अतिप्रगत संपर्क व्यवस्थेमुळे महाशब्दे यांच्याशी मी होलो कॉन्टॅक्ट प्रस्थापित करू शकलो अर्थातच माझ्या बाजूला इंदूही होतीच.
'नमस्कार मी मधुकर साने आणि हे माझी पत्नी इंदू साने'
'नमस्कार, मी महाशब्दे . आपले माझ्याकडे काय काम आहे ?' आपल्या पीए वरून तर आपण पाचव्या किंवा सहाव्या श्रेणीतील उच्चपदस्थ दिसता'
'बरोबर आहे पण माझ्या पत्नीला एक सायबोर्ग सून हवी आहे. तुमचे त्यातील ज्ञान भरपूर प्रगत आहे. एवढेच नव्हे तर तुम्ही असा एक सायबोर्ग काही महिन्यापूर्वी दिला आहे. '
'साने साहेब आपण म्हणता ते बरोबर आहे पण तो सायबोर्ग सात आठ महिन्यातच माझ्याकडे परत आला आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलो आहे.'

'महाशब्दे, आपल्या स्पष्टवक्ते वृत्तीचे मला कौतुक वाटते पण परत येण्याचे कारण काय ?'
'नेहमीचेच, सासू सुनेचे पटत नाही. 'पण सायबोर्ग सून तर रोबोटिकचे तिन्ही नियम पळतच असणार मग भांडण व्हायचे कारण काय ?'
ते काही मला माहित नाही. मला वाटते तुम्ही या फंदात पडू नये. हे ऐकून इंदू म्हणाली आम्हाला तुम्ही अशाच तर्हेचा सायबोर्ग देऊ शकाल काय ? आणि तिने तिच्या सर्व मागण्या सांगितल्या.
'मिसेस साने अशा प्रकारचा सायबोर्ग नवीन करायचा झाल्यास मला बरेच काम करावे लागेल आणि त्यात दोन तीन वर्षे तरी जातील आणि ते करण्यासाठी आज तरी माझ्याकडे वेळ आणि पैसा नाही. 'इंदू फारच खिन्न झाली आणि म्हणाली 'महाशब्दे तुमच्याकडे परत आलेल्या सायबोर्गमध्ये सुधारणा करून देऊ शकणार नाही का ?'
'तसे करता येईल आणि तसे काम दोन तीन महिन्यातच संपेल आणि मी ही माझ्या अडचणीतून बाहेर येऊ शकेन' मी मध्येच तोंड घातले , महाशब्दे याला किती वेळ लागेल आणि किती खर्च येईल ?
'मी तीन महिन्यात तुम्हाला डिलिव्हरी देऊ शकेन. बाह्य रूपातील बदल करावे लागतील बाकी आपल्या मागणीप्रमाणे बरीच सर्किट्स आहेतच.' त्याशिवाय सेंट्रल कॉम्पुटरशी देवाण घेवाण सर्किट्सही इन्स्टॉल करावी लागतील.' त्याची काय जरुर आहे ऍडिशनल खर्च कशाला करायचा ' मी.
'आत्ताच्या सायबोर्ग कायद्याप्रमाणे अशी जोडणी ठेवावीच लागते. आणि त्यामुळे अत्यंत अडचणीच्या वेळी सेंट्रल कॉम्पुटर सायबोर्गला ओव्हररुल किंवा निकामी करू शकतो.' 'ठीक आहे महाशब्दे कितीला खड्डा पडेल ?' मी
साधारणतः युसी सत्तर लाख (२०७२ पासून सर्व जगात आणि अंतराळ स्थानकावरही एकच युनिवर्सल करन्सी अतित्वात आली आणि जगातील सर्व व्यवहार याच करन्सी मध्ये होत) आणि काही चेंजेस हवे असतील तर दर वेळेला चेन्ज प्रमाणे पैसे पडतील. किंमत नेहमीपेक्षा जास्तच वाटत होती पण मला पाच सायबोर्ग प्रत्येकी ९० लाखापर्यंत घेता येत होते. तरी मी म्हणालो ' महाशब्दे किंमत जरा जास्तच होत आहे. ' 'मिस्टर साने किंमत अत्यंत वाजवी आहे किंवा कमीच आहे. किंमत कमी देण्याचे कारण म्हणजे विकताना माझी एक अट असेल'
'कुठल्याही परिस्थिती सायबोर्ग परत घेतला जाणार नाही अगदी फुकट दिला तरीसुद्धा. ' मी इंदुकडे चमकून पहिले. कधीतरी सून मिळणार या कल्पनेने ती सुखावली होती. त्यामुळे तिने या अटीचा स्वीकार लगेच केला मी मात्र जरा साशंकच होतो. इंदूच्या आग्रहापुढे काही चालेना.
महाशब्दे म्हणाले ' खरे म्हणजे त्याची किंमत युसी एक कोटी दहा लाखावर जाते परंतु परत न घेण्याच्या बोलीवर मी हा तुम्हाला सत्तर लाखाला ऑफर करत आहे. मी म्हणालो 'महाशब्दे कुठल्याही कारणाने हा परत द्यायचा झाला तर नियमाप्रमाणे किंमत कमी न करता अगदी मामुली किमतीला म्हणजे दहा लाखाला परत देईन. एक सायबोर्ग परत दिल्याशिवाय किंवा घेऊन दहा वर्ष झाल्याशिवाय मला नवीन सायबोर्ग घेता येत नाही. महाशब्देनी ते मान्य केले आणि आम्ही सायबोर्गची ऑर्डर नोंदवली. इंदू एकदम खुशीत आली होती. गेल्या कित्येक महिन्यात चाललेल्या खटाटोपाचा तिला उत्तर सापडले होते. महाशब्दे म्हणाले 'इंदुताई तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की, या मॉडेल्स ना स्वतःचे व्यक्तिमत्व असते आणि ते स्वतंत्रपणे विचारही करू शकतात. आमच्या या मॉडेलचे व्यक्तिमत्व एकदम सदाशिवपेठी पुणेरी आहे. आणि त्यामध्ये बदल करणे शक्य नाही. आम्ही हा नवीन सायबोर्ग करताना तुम्हाला हवे तसे बाह्यरूप करून देऊ.
महाशब्देनी आम्हाला आठ आठ्वड्यानी ट्रायलसाठी आणि मुलाखतीसाठी बोलावले. त्यांनी सांगितले कि तुम्ही दोघेही तुमची फॅमिली हिस्टरी आणि सर्वांबद्दल सर्व प्रकारची माहिती गोळा करून आणा. याशिवाय तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या आवडीनिवडी आणि इतर किरकोळ बाबी लिहून आणा. त्याच बरोबर तुम्हाला सुनेमधे काय काय गुणधर्म पाहिजेत त्याचीही यादी करून आणा. आम्ही आमची ऑर्डर नोंदवून परत घरी आलो.
मी माझ्या कामात गढून गेलो आणि इंदूचे सर्व कार्यक्रम पूर्वीच्याच उत्साहाने सुरु झाले. लवकरच तिच्या हाताखाली सून येणार असल्याची बातमी पसरवण्यास तिची सुरवात झाली.
आठ आठवड्यानंतर ठरलेल्या दिवशी आम्ही महाशब्दयांकडे गेलो. महाशब्दे त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते आणि त्यांच्या समोरच एक सुंदर आणि चुणचुणीत मुलगी बसली होती. महाशब्दयांनी दाखवलेल्या खुर्च्यांवर आम्ही बसलो. महाशब्दयांकडे त्या तरुणीचे काय काम असावे हा विचार करत असतानाच महाशब्दे म्हणाले मिस्टर अँड मिसेस साने बसा मी तुमची ओळख करून देतो. तुमच्या समोर बसलेली तरुणी ही तुमची नवीन सून आहे. तुम्ही तिच्याशी बोला आणि तुमच्या तिघांच्या संभाषणातून मला काही धागे दोरे मिळतील आणि पुढील पाच - सहा आठवड्यात त्या सगळ्यांचे इम्प्लिमेंट होईल. पहिले म्हणजे तिचे नाव ठरविणे. 'मुलगी अतिशय सुंदरच आहे आणि ती स्कर्ट मध्ये असल्याने तिचे वय पण चटकन सांगता येत नाही. आपण तिला 'सविता' म्हणूया ' इंदू म्हणाली.
' इइSSS ' अंगावर झुरळ पडल्यासारखे आमची भावी सून किंचाळली. 'हे कसले नाव? आता आपण बाविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत आणि हे अठराव्या शतकातील नाव कशाला हवे. नाव कसे सुटसुटीत आणि चमकदार असावे.' 'आणि हो माझे नाव ठरवण्यापूर्वी माझ्या सासरच्या लोकांची नावे काय आहेत ते तरी कळू देत' मुलगी
'हे बघ मुली, मी मधुकर साने तुझा भावी सासरा आणि ही तुझी भावी सासू इंदू ' मी संघर्ष टाळण्याकरिता बोललो.
'तुमचे नाव ठीक आहे पण मोठे आहे. मी तुम्हाला मॅक म्हणत जाईन फारतर मॅकपा म्हणत जाईन. इंदू हे नाव फारच जुनाट आहे अशा नावाच्या सासूबरोबर मला राहणे अवघडच आहे.' मुलगी
'अग इंदू हे शॉर्टफॉर्म आहे तिचे मूळ नाव इंद्रायणी आहे' मी
‘अरे बापरे हे नाव तर फारच मोठे आहे’. मुलगी
'माझ्या जन्माच्या वेळी माझे वडील इंद्रायणी नदीत स्नान करत होते त्यामुळे मला अतिशय सुंदर असे इंद्रायणी नाव ठेवले. मला तर ते फार प्रिय आहे ' इंदू
नागाने फणा उभारलाच आणि ठिणगी पडलीच
'बरे झाले तुमचे वडील घोडनदीत स्नान नव्हते करत' मुलगी
मी आणि महाशब्दे खाली बघून हसायचं प्रयत्न करत होतो. इंदू रागाने लाल झाली होती.
'मी यांना इना म्हणेन कशी सुटसुटीत आणि झकास नावे आहेत. आणि 'हो माझ्या नवऱ्याचे नाव काय आणि तो का नाही आला?' मुलगी
'त्याचे नाव जयंत आहे आणि तो चंद्र तळावर वास्तव्यास असतो त्यामुळे तू नवऱ्याशिवाय सून असशील.
ठीक आहे त्याला मी डियर जॉय म्हणेन. ' मुलगी
'आणि हो त्याची तू दुसरी बायको असशील त्याची पहिली बायको चंद्र तळावर आहे आणि तो अजून वीस वर्ष तरी पृथ्वीवर येऊ शकणार नाही. त्याच्या पहिल्या बायकोचे नाव सारा आहे.' मी
'कसे गोड नाव आहे, छोटे आणि सुटसुटीत. मला वाटते तिला शोभेल असे माझं नाव असायला हरकत नाही. माझे नाव मायरा ठेवा. बघा कसे सुटसुटीत नाव आहे. सारा आणि मायरा ही जोडीही छान जमेल. आणि हो ना करत अखेर आमच्या दुसऱ्या सुनेचे मायरा नाव निश्चित झाले.

मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होत कि व्यक्तिमत्व अस्सल पुणेरी आणि सदाशिव पेठी आहे. आता मला तुमच्या सुनेमध्ये काय काय गुण पाहिजेत किंवा तिला काय काय यायला पाहिजे हे सांगा.
'विवीध तर्हेचा स्वयंपाक तिने करावा. बाहेरील सर्व खरेदीची जबाबदारी' इंदू
स्वयंपाकाचं सोपं आहे, नेहमी लागणारे महाराष्ट्रीयन, दाक्षिणात्य, गुजराथी, पंजाबी, चायनीज आणि कॉंटिनेंटल रेसिपी आणि त्याचे प्रसिद्ध शेफ चे अनुभव आपण मायरा मध्ये टाकू शकतो.
'एक लक्षात ठेवा मुलगी अत्यंत हुशार आहे आणि आगाऊ पण आहे. माणसांच्या तुलनेत बघायचे म्हंटले उदाहरणार्थ; तुम्ही तिला नुसतेच कपडे धु अशी मागणी केलीत तर हा रोबो दिसतील तेवढे सर्व कपडे धुवायला लागेल.
तिने समाजात योग्य तर्हेने वागले पाहिजे. तेथे अतिशहाणपणा किंवा फटकळपणा करू नये.
सुनेचे नाव मायरा, सासूचे नाव इना आणि माझं नाव मॅक असे कुटुंबातील नावांचे पुनर्निर्माण झाले. आम्ही मायाराचे बारकाईने निरीक्षण केले मुखतः कुठल्या कामांचे ज्ञान तिला दिले गेले आहे हे पण बघितले. आत्तापर्यंत तिला घरकाम करणाऱ्या रोबोचे सर्व ज्ञान दिले गेले होते. एखाद्या एक्स्पर्ट कूक चे म्हणजे साधारणतः महाराष्ट्रीयन, पंजाबी , दाक्षिणात्य पदार्थ तसेच बेंगॉली पदार्थंची ही ज्ञान प्रणाली दिल्या गेल्या होत्या. बाहेरच्या पदार्थात चायनीज, कॉंटिनेंटल, ब्रिटिश आणि मेक्सिकन पदार्थाच्या ज्ञान प्रणालीही तिच्या मेंदूत भरल्या गेल्या होत्या त्याशिवाय एखादी प्रणाली नसली तर ती प्रणाली सेंट्रल कॉम्पुटरकडून ती मिळू शकत होती. आणि अर्थातच रोबोटिक्सचे तीन नियम तिच्यात ठासून भरले गेले होते. मायाराचे बाह्यरुपही अतिशय देखणे होते. आमच्या महिलामंडळामध्ये कुठलीही सून इतकी सुंदर दिसत नव्हती. ती सायबोर्ग आहे याचा कुठेही मागमूस लक्षात येत नव्हता.
आता प्रश्न महिलामंडळातील बायकांना लग्नाचे निमंत्रण न देता लग्नाचा देखावा करायचा होता. मी माझ्या सहाय्यकाला कुठे लग्नाचे नाटक करता येतेका असे विचारले. शेवटी माझ्या साह्यकाने दिल्लीतील एका कंपनीचा पत्ता मिळवला. ही कंपनी कुठल्याही तर्हेचे लग्न नवरा बायकोला आणि इतर जवळच्या नातेवाईकाला त्यांच्या लायब्रेरीतील एखाद्या लग्नात मूळच्या वक्ती ऐवजी तुम्ही म्हणाल त्या व्यक्ती वापरून ते करू शकत होते. त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केल्यावर मला अशी माहिती मिळाली. यूसी १० लाख वैदिक लग्न तीन तासात. यूसी एक लाख एक्सट्रा कुठल्याही दुसऱ्या श्रेणीतील माणूस दाखवण्याकरिता. यूसी पाच लाख एक्सट्रा एखादा प्रसिद्ध माणूस लग्नात दाखवण्याकरिता. यूसी एक कोटी जैन अथवा मारवाडी अथवा वैदिक लग्न तीन दीवस विवाहाकरिता. यूसी दोन लाख रजिस्टर मॅरेज करिता. या सर्व प्रकारच्या लग्नात तुमची पंचवीस माणसे बदलात मिळत होती. कुठल्याही न वापरलेल्या लग्नाकरिता यूसी दहा लाख एक्सट्रा फी होती. स्थळ निवडीकरिता दहा टक्के जास्त चार्ज होता. एखादा होलोग्राफीक माणूस इन्सर्ट करण्याकरिता यूसी दोन लाख एक्सट्रा चार्ज होता. वाचता वाचता मला घाम फुटला. आभासी लग्न एवढे महाग असेल असे मला कधीच वाटले नव्हते. आभासी लग्नात अक्चुअल प्रेजेंट पण येणार नव्हती. सगळ्या अटी सांभाळून हे लग्न ३० लाख यूसी च्या पुढे जात होते. अखेर आम्ही एकदाच वापरले जाणारे केदारनाथ जवळील एका खेड्यातील लग्न पसंत केले. दोन दिवस आधी कळले तरी आमच्या येथून कोणीही लग्नाला येऊ नये असा यात हेतू होता. सर्व तर्हेच्या अरेंजमेंट होऊन तीन महिन्यानंतरची एक तारीख पक्की झाली. तोपर्यंत मायरा पण पूर्णपणे तयार होणार होती. आम्ही त्या लग्न कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट पण केले त्याची किंमत यूसी ३४ लाखापर्यंत गेली. त्याशिवाय आमच्याकडून लग्नातला उपस्थित असणाऱ्या लोकांचे असंख्य दिशांनी फोटो काढून त्यांची वर्चुअल व्यक्तिमत्व लग्न कंपनीने तयार केली. या नंतर आमच्या गावात आणि महिलामंडळात आंम्ही लग्नाच्या पुड्या सोडायला सुरवात केली. मुलीचे नाव मायरा असून तिचा बाप कर्नल आहे आणि सध्या त्याचे पोस्टिंग अंबालाच्या पुढच्या बॉर्डरवर आहे आणि लग्न बहुतेक पतियाळाला होईल असे आम्ही लोकांना सांगत होतो.
ठरलेल्या तारखेच्या तीन दिवस अगोदर आम्ही सर्वाना सांगितले उत्तरांचल मधील एका चायनीज बॉर्डरवर एका ठिकाणी कर्नल ची बदली झाली आहे आणि त्यामुळे लग्न शक्यतो केदारनाथला होईल अर्थातच या कारणामुळे आमच्या गावाचे कोणी लग्नाला येणे शक्यच नव्हते. आम्हीही तारखेपूर्वी आठ दिवस अगोदर आमच्या गावातून कुमाऊ मध्ये सहलीला गेलो. ठरलेल्या तारखेला हे आभासी लग्न दिल्लीतील स्टुडिओ मध्ये आणि त्यात स्टुडिओत दोन तीन सुधारणा करत लग्न ठरलेल्या दिवशी तयार झाले. पत्रिकेवर मायरा चे नाव डॉक्टर मायरा सोनटक्के वडील कर्नल भरत सोनटक्के यांची मुलगी असे लिहले होते. हे आभासी लग्न अगदी ओळखू न येण्याइतपत खरे वाटत होते. अर्थातच आम्ही सगळ्यांना सांगून मुलगा आभासीरित्या भाग घेणार आहे असे सांगितले होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users