सून बाई सून ! - भाग १

Submitted by अविनाश जोशी on 15 February, 2025 - 05:30

सून बाई सून ! - भाग १
त्याच असं झालं!
अरे हो !
तुम्हाला जरा थोडस प्रास्ताविक सांगितलंच पाहिजे. मी २०९२ साली सरकारी नोकरीतून निवृत्त झालो. केंद्रीय सरकारच्या एका मोठ्या खात्याच्या जॉईंट सेक्टरेटरी पदावरून निवृत्त झाल्यामुळे मला प्रोविडेंड फंड आणि इतर बरेच लाभ मिळाले होते. नोकरीत असतानाच मी शहराजवळच्याच एका छोट्या गावात चाणक्य सोसायटीत एक एक्कर जाग्यावर प्रशस्त दुमजली बंगला बांधला होता. नोकरीत मिळत असलेले एक्सटेंशन मी नाकारून या बंगला सोसायटीत मी राहायला आलो होतो. ही सोसायटी दीडशे दोनशे बंगल्यांची होती.
माझं नाव माधव साने. अर्थात या नावाची परिचयानुसार असंख्य रूपे व्हायची. दिल्लीत सहकारी मला माधवजी म्हणायचे तर कनिष्ठ लोकांकरिता मी साने सर होतो, घरच्यांकरिता मी मधू होतो, तर जवळच्या मित्रांकरिता मी मध्या होतो.
माझी बायकोही मला मधुचं म्हणायची. तीच नाव इंद्रायणी. अर्थातच सगळेच तिला इंदू म्हणायचे. तीस पस्तीस वर्षालीतील परदेशातील असंख्य पोस्टिंग मुळे आणि शेवटची काही वर्षे दिल्लीतील धावपळीनंतर ही शांतता मला फारच प्रिय होती. बंगल्याचा एक मोठा भाग हा मी माझ्या स्टडीकरिता आणि लेखनाकरिता राखून ठेवला होता. घराभोवती मोठी बाग होती. आलटून पालटून काम करणारे पाच - सहा स्त्री-पुरुष नोकर म्हणून होते. बंगल्याच्या गॅरेजमध्ये दोन आलिशान कार होत्या.
माझा दिनक्रम साधा होता. सकाळी सहाला उठून घरातील स्विमिन्ग पूलवर आणि जिम मध्ये जाऊन व्यायाम करायचा, अंघोळ आटपून साडेसातच्या सुमारास इंदू बरोबर ब्रेकफास्ट घ्यायचा. त्यावेळी तिच्याबरोबरील दिवसातील कार्यक्रमाचा आढावा घ्यायचा, नंतर मात्र सकाळी साडेआठ ते दुपारी बारा या वेळेत माझ्या अभ्यासिकेत बसून माझ्या सहायकाबरोबर माझे लेखन ani vichar vinimay चाले. एक वाजेपर्यंत मी सहाय्यकाला पुढील कामासंबंधी सूचना देत असे. एक ते दोन परत इंदू बरोबर जेवण आणि नंतर दोन - तीन तास विश्रांती. पाच नंतर हवामानानुसार आम्ही पायीच फिरायला जात असे. बाहेर जाणे शक्य नसल्यास घरातच टेबल-टेनिस अथवा बॅडमिंटन खेळात असे. काही वेळेस मी माळ्याच्या हाताखाली बागेत काम पण करत असे. आपण लावलेले रोपटे वाढू लागले कि आपल्यालाच अतिशय आनंद होतो. शेवटी आपले नाते मातीशीच असते . येथे आल्यावर मला येथील वेगवेगळे क्लब जॉईन करण्याविषयी भरपूर आग्रह झाला होता. पण मला अशा कशातही अडकायचे नव्हते. त्यामुळे मी सर्वानाच, अधून मधून पाहुणा म्हणून येत जाईन असे आश्वासन देऊन टाकले. रात्री नऊ ते अकरा माझे चिंतन आणि संशोधन चालूच असे.
या सगळ्या कार्यक्रमाला अपवाद म्हणजे इंदू बरोबर समारंभाला जाणे. बाहेर गावाला जाणे असा होता. माझी प्रायोरिटी इंदू बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्यातच होती. कित्येक वेळा ती सुद्धा माझ्या अभ्यासिकेत येऊन होलोग्राफीक ट्रान्समिशन्स पाहत बसे. अर्थातच अत्तापर्यंत अभ्यासिकेत पुस्तके, वही, पेन या सर्वाला विराम मिळाला होता. आभासी सत्यामुळे पुस्तके, रेफेरेंन्सस आभासी असायचे. त्यातून अनेक तर्हेचे आभासी सहायक असायचे. एक सांगायचेच राहिले कि माझे काम पाहणारा अभ्यासिकेतील सहायक हा सायबोर्ग होता त्यामुळे तो चोवीसतास काम करू शकत असे. तसेच तो जगभरच्या इतकेच नव्हे तर चंद्र, मंगळ, गुरु ग्रहांच्या तळांवरूनही माहिती गोळा करू शकत होता. मी निवृत्त होताना असलेल्या पदामुळे मला बऱ्याच वरच्या दर्जाची सिक्युरिटी मिळाली होती. मी काय करतो यावर कोणी तरी नजर ठेवायचे हे सांगणे नकोच.
आमचा एकुलता एक मुलगा जयंत दहा वर्षांपूर्वीच चंद्रावरील तळावरच्या वसाहतीत स्थायीक झाला होता. त्याची बायको तिथलीच होती. म्हणजे पृथ्वी ग्रहावरून तेथे स्थायीक झाली होती. तिथे असलेल्या नियमांप्रमाणे त्याला पुढील वीस वर्षे तरी परत येणे शक्य नव्हते.
अशा रीतीने आम्हाला दोघांनाही कशाचीही कमतरता नव्हती किंवा पडणार नव्हती. माझ्या पदामुळे दर महीना मेड रोबो येऊन आम्हा दोघांचीही तपासणी करून योग्य ते उपचार करत होता. एकंदरीत सर्व छान चालले होते.
आमच्या सहा नोकरांपैकी पाच सायबोर्ग होते. त्यातील दोन ड्रायव्हर्स कम सुरक्षारक्षक, एक माळी काम करणारा, एक माझा सहायक आणि एक हाऊसकीपर होता. आमच्या सुरक्षारक्षकांची नावे आंम्ही ढवळ्या पवळ्या अशी ठेवली होती तर सदू हा माळी होता. माझ्या सहाय्यकाचे नाव झेन होते तर हाऊसकीपर सखू होती. हे पाचही सायबोर्ग सरकारी खर्चानेच माझ्या बरोबर होते. सहावी मंगला मात्र आमच्या बरोबर आलेली मानव होती. पाच सायबोर्गच्या दुपटीने एकट्या मंगलाचा खर्च होत होता पण इंदूच्या हट्टामुळे मला मंगलाला ठेवणे भाग होते. इंदूचे म्हणणे असे होते कि एवढ्या मोठ्या घरात तिला एकतरी माणूस हवा होता. मलाही ती बहुतेक सायबोर्गच समजत असावी.
एका दृष्टीने तिचे म्हणणे खरे होते. सायबोर्ग कितीही तत्पर व कुशल असले तरी असिमोमच्या तीन नियमांप्रमाणे त्यांना वागणे भाग होते. हे नियम सर्वश्रुतच आहेत.
पहिला नियम म्हणजे, सायबोर्ग स्वतःच्या कारणामुळे किंवा त्याच्या निष्क्रियतेमुळे मानवाला कुठलाही अपाय होणार नाही याची दक्षता घेईल.
दुसरा नियम म्हणजे पहिला नियम पाळून तो मालकाच्या आज्ञेचे पालन करेल.
तिसरा नियम म्हणजे पहिल्या दोन नियमांचे पालन करून तो स्वतःचे रक्षण करेल.
अतिशय प्रगत असलेले सध्याचे सायबोर्ग ६०-७० वर्षपूर्वीच्या रोबो पेक्षा फारच पुढारलेले होते. परंतु वरील तीन नियमांमुळे त्याच्यावर मर्यादा येणे स्वाभाविक होते.
पहिले पाच -सहा महिने इंदूचा वेळ मजेत गेला होता, आजूबाजूच्या लोकांच्या ओळखी करून घेणे, त्यांची चौकशी करणे आणि गावात कुठे काय आहे हे पाहणे असा तिचा दिनक्रम होता. तिची लवकरच खात्री पटली की गाव अतिशय छोटे आहे आणि सोसायटीच्या बाहेर फारसे नाविन्यपूर्ण किंवा इंटरेस्टिंग असे काही नाही. म्हणजे तिच्या दृष्टीने काही इंटरेस्टिंग नाही.
आमचे गाव लहान असूनही आधुनिक शहरांच्या सर्व सोयी-सुविधा होत्या. लोकसंख्या लाखाच्या आत बाहेर असावी. लायन्स क्लब, रोटरी क्लब, सिटी क्लब ह्यांच्याशिवाय ऍस्ट्रोडॅम क्लब होता. या शेवटच्या क्लब मध्ये ज्यांची मुले - मुली दुसऱ्या ग्रहांच्या तळावर आहेत अशांनाच प्रवेश होता. या क्लब मधून सर्वजण त्यांच्या मुलांशी होलोग्राफीक सपंर्क साधू शकत होते. फोर्स तंत्रज्ञानामुळे संभाषण रिअल टाईममध्येच होत होते. आत्तापर्यंत या ग्रहांमध्ये फोर्स संदेशनाकरिता टाईम अँड स्पेस वॉरपींग हे तंत्रज्ञानही वापरले होते. नाहीतर पूर्वी मंगळाकरिता बावीस मिनिट डीले असे तर गुरु करिता हा वेळ दोन तासाहून अधिक होता. थोडक्यात प्रत्यक्ष संबंध दुर्मिळच होते. अर्थातच या क्लब मध्ये कुठल्याही पाहुण्यांना प्रवेश नव्हता. इतर तिन्ही क्लब मध्ये मी पाहुणा म्हणूनच जायचो. दिल्लीतील वास्तव्यामुळे व माझा जनसपंर्क पुष्कळ असल्यामुळे आम्ही दिल्लीच्या कुठल्यातरी क्लब मध्ये अथवा समारंभात आठवड्याला दोन - तीन दिवस तरी जात असू. मला अर्थातच ऍस्ट्रोडॅम क्लब मध्ये जायचेही कारण नव्हते कारण तिथल्या सर्व सुख सोयी माझ्या घरात होत्या. अशामुळे इंदूचा वेळ मात्र जात नव्हता. तिला लोकांच्यात मिसळायला फारच आवडायचे. माझ्या सवयी नेमक्या उलट्या होत्या. मला एकट्यानेच किंवा फारतर इंदूबरोबर भटकायला आवडायचे किंवा माझ्या विविध विषयांवरील संशोधनात मी गढून जायचो. नोकर सायबोर्ग असल्यामुळे तिला वेळेचं काय करायचं असा प्रश्न पडायचा. तिने ठेवलेल्या कामवालीच्या आणि इंदूच्या बौद्धिक पातळीत फारच फरक असल्यामुळे त्यांच्या गप्पा जरा जुजबीच असायच्या.
हळू हळू इंदूच्या ओळखी वाढत गेल्या तशा आम्हाला चाणक्य मधून किंवा शहरातून लग्नाची, वाढदिवसाची किंवा इतर समारंभाची बोलावणी येण्यास सुरवात झाली. इंदुकडे मोकळा वेळ भरपूर होता. दिमतीला शोफरसकट गाडी होती त्यामुळे ती सर्व ठिकाणी जात असे. यातूनच तिच्या ओळखी वाढत गेल्या. हळू हळू शहरात इंदू साने हे नाव परिचित झाले. माझीही ओळख इंदूचा नवरा अशी होऊ लागली.
अर्थात या लोकांच्यातही कनिष्ठ, वरिष्ठ, अतिवरिष्ठ असा भेदभाव होताच. हा भेदभाव मुख्यतः कोणाकडे किती सायबोर्ग नोकर आहेत याच्यावर गणला जायचा. कोणताच सायबोर्ग नसलेले कुटुंब अति सामान्य गणले जायचे आणि त्यांना क्वचितच निमंत्रण असायची. एक-दोन सायबोर्ग असलेली कुटुंबे सामान्य दर्जात मोडायची. अशां लोकांनकडे क्वचितच स्वतःचे वाहन असायचे. तीन आणि चार सायबोर्ग असलेली कुटुंबे उच्च वर्गात मोडायची त्यांच्यापैकी बहुतेकांकडे स्वयंचलित वाहन असायचे. त्याकरिता निदान एक तरी ड्राइवर असायचा. पाच सायबोर्ग असणारी कुटुंबे अति महत्वाचे मानले जायचे. प्रत्येक कुटूंबातील कोणीतरी परग्रहांवर असायचेच. अशा कुटूंबातील व्यक्तींना समाजात महत्वाचे स्थान मिळायचे. आत्तापर्यंत जुनी सरकारी व्यवस्था किंवा लोकशाही पद्धत पूर्णतः नामशेष झाली होती.
इंदूच्या ओळखी जसजशा वाढत गेल्या , तसे बहुसंख्य कुटुंबाना आमच्याकडे पाच सायबोर्ग आहेत असे कळल्यामुळे इंदूचा समाजातील स्थान फारच वर गेले. त्यातच आमच्याकडे एक मानवी कामवाली आहे हे केल्यावर तर शहरातील पाच सहा अतिउच्च कुटुंबात तिची गणना होऊ लागली. बघता बघता तिचा खर्च दस पटीने वाढला. आमच्या घरातील एक कॉम चॅनेल सतत तिच्यामुळे बिझी राहू लागला. तिचा बारसचा वेळ बाहेर जात असल्यामुळे हा कॉम चॅनेल तिच्या कार मध्ये वापरण्याची सुविधा तिने करून घेतली. तिच्या स्थानात अजून दोन गोष्टींमुळे भर पडली. पहिले म्हणजे आमचा मुलगा गेली दहा वर्ष चंद्रतळावर आहे. आणि तिथेच त्याचे एका चंद्रिकेशी लग्न झाले आहे. दुसरी म्हणजे आमच्या घरात चक्क कामवाली मानव आहे. सर्व स्त्री वर्गाला अशा कामवाली बद्दल फारच कौतुक वाटायचं. अर्थात तिला मिरवायची संधी इंदूला फारच कमी वेळा मिळत असे. गोपनीयतेमुळे माझ्या घरातील प्रवेश रिस्ट्रिक्टड होता. त्यामुळे बहुतेकांना बंगल्याच्या गार्डन मध्ये अथवा बाहेर असणाऱ्या मोठ्या पेशो पर्यंतच येता येई. इंदूचेही लोकप्रियता वाढायला अजूनही एक महत्वाचे कारण होते. कुठेही गेल्यावर बहुतेक सगळ्याच ग्रुपचा खर्च ती सढळ हाताने करत असे. तिला जसे मानाचे आणि आदराचे स्थान निर्माण झाले होते तसेच तिच्याबद्दल खुन्नस असणारा वर्गही वाढू लागला. पण कुठल्याच बाजूने इंदू कमी पडत नव्हती. तिने भाग घेतलेल्या प्रत्येक समारंभात तिचा उत्साह प्रमाणाबाहेर असायचा. कोणालाही ती कमी लेखायची नाही आणि तिचे बोलणे मृदू असायचे. ती उत्तम संघटकही होती. तिने हाती घेतलेल्या कुठल्याही कार्यक्रमाचे तिचे नियोजन अतिशय सुंदर असायचे. त्यातून तिचे व्यक्तिमत्व भारदस्त होते. तिला एकोणतीस वर्षाचा मुलगा आहे हे सांगूनसुद्द्धा खरे वाटायचे नाही. थोडक्यात म्हणजे तिला नावे ठेवायला कुठेच वाव नव्हता.
पण हे आयुष्य काही दिवसातच तिला कंटाळवाणे वाटू लागले त्यातून कशातही माझा सहभाग मर्यादित असायचा. माझ्या पाचव्या श्रेणीमुळे अत्यंत कमी लोकं आणि त्यांचे कुटुंबीय माझ्या घरी येण्याचे धाडस करीत. त्यामुळे इंदूचे सर्कल अथवा मित्रमंडळी मर्यादित राहायची. आणि तिला हे ही कळले होते कि आत्ता तिला सर्व ठिकाणी जो मान मिळत आहे तो माझ्या पदामुळे किंवा ती सढळ हाताने खर्च करत असल्यामुळे तिला या सर्वातून बाहेर पडावेसे वाटत होते
आणि शेवटी काही महिन्यांनी स्फोट झालाच. स्फोटाची सुरवात अगदी सहजपणाने झाली. त्या घटनेचे रूपांतर पुढे एवढे नाट्यमय ठरेल याची मलाही कल्पना नव्हती. सोसायटीत एक विशाल महिला मंडळ होते. विशाल हे विशेषण हे महिलांना नसून, मंडळाला होते. महिला मंडळ चाणक्य मधील स्त्रियांना आणि बाहेरील काही स्त्रियांना बाय इन्व्हिटेशन उपलब्ध होते. मंडळाचा प्रशस्त हॉल होता. उत्तम केटरिंगची सोय होती. काही इनडोअर आणि आऊटडोअर गेम्सकरिता जागा होती. अशा महिला मंडळाच्या दीडशे-दोनशे सदस्य होत्या. एकत्र जमून चकाट्या पिटण्याशिवाय महिला मंडळ काही उपक्रमही आयोजित करत असे. उदाहरणार्थ शहरातील वाहतूक पोलिसांना मदत करत असताना फोटो सेशन करणे, शहरातील रस्ते साफ करताना हातात झाडू घेऊन पोझ देणे. अशा महिला मंडळाचे एक प्रतिनिधी मंडळ एका रविवारी इंदूला भेटायला आले. मिटिंग अर्थातच बागेतल्या शेडखाली झाली. अतिशय उत्कृष्ट ऑर्किडची विविध रंग पाहून प्रतिनिधी अवाकच झाल्या. त्यातून इंदूने मुद्धामच नाश्ता मानवी कामवालीच्या हातून दिला. त्यांना बोलायचे सुचेनाच. शेवटी न राहून इंदूनेच विचारले
'माझ्याकडे काय काम होते का ?'
'आम्ही विशाल महिला मंडळाच्या प्रतिनिधी आहोत आणि आपल्यालाच भेटायला आलो आहोत. मंडळातर्फे आम्ही विविध सामाजिक उपक्रम करतो तसेच आमच्या नियमित बैठकही होत असतात.'
'हो मी ऐकले आहे तुमच्या मंडळाबद्दल, मंडळाला काही मदत हवी आहे का? '
'नाही नाही अजिबात नाही. मंडळाकडे वर्गणीतूनच दरवर्षी बरीच शिल्लक पडते. '
'मग मी आपली काय मदत करू शकते ?'
आमचे अध्यक्षपद सध्या माया सेगल यांच्याकडे आहे त्या लवकरच देशाबाहेर सेटल होत असल्याने ती जागा रिकामी होणार आहे.'
'बर मग ?'
' ही कुमुद छुगानी व शर्मिला केळकर अशा दोघी उपाध्यक्ष आहोत. तर हि लक्ष्मी गणेशन कार्यवाह आहे. आपण पुढील पाच वर्षाकरिता अध्यक्ष पदाचा स्वीकार करावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहोत '
'नाही हो मला कसे जमायचे ते. तुमचे मंडळ मोठे आहे. त्यातून तुमच्या म्हणण्याप्रमाणे असंख्य उपक्रम चालावता मला हे कसे जमणार?'
'त्याची काळजी करू नका. आम्ही सगळ्याच तुमच्या मदतीला आहोत आणि त्यातून मंडळातील प्रत्येक सदस्य सहकार्य करण्यास नेहमीच तत्पर असतो. '
शेवटी हो, नाही करता करता इंदूने मंडळाला घसघशीत देणगी देऊन महिला मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. थोड्याच दिवसात मावळत्या अध्यक्षाच्या जागी इंदूने स्थानापन्न होऊन अध्यक्षपदाचा अधिभार स्वीकारला.
त्यानंतर तिचे आणि माझे पुढचे तीन चार महिने अतिशय आनंदात गेले. तिला मंडळाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले होते. माझा तिला कुठे ठेवायचा प्रश्न सुटला होता. आम्ही दोघे गप्पा मारत असताना सुद्धा तिच्या गप्पांचा सतत ओघ मंडळ, त्यांचे उपक्रम, मंडळाचे सदस्य आणि काही विशेष सदस्य असाच असायचा. तिच्या बहुतेक कार्यक्रमाचे नियोजन अतिशय प्रमाणबद्ध असे. त्यातून शहरातील काही प्रमुख व्यक्तींमध्ये माझी गणना होत असल्यामुळे, तिचे महत्व सर्व क्षेत्रात वाढले होते. त्यामुळे कार्यक्रमकच्या अध्यक्षपदी प्रमुख पाहुणे म्हणून बड्या धेंडांची उपस्थितही असायची. साहजिकच दुसऱ्यादिवशी स्थानिक, तालुका किंवा जिल्हा वर्तमानपत्रेसुद्धा समारंभाच्या बातम्या छापायची. थोडक्यात काय तिचे दिवस मजेत चालले होते. आणि तिच्या मागे भरपूर व्याप लागल्यामुळे माझे संशोधनही उत्तम चालले होते.
एका वर्षात सभासदनपैकी पंधरा वीस जणांच्या मुलांची किंवा मुलीची लग्ने ठरली. साहजिकच अध्यक्षीन बाईना आग्रहाचे निमंत्रण असायचे. लग्नानंतर सहाजिकच सभासद वर्ग आपल्या सुनांचे कौतुक करण्यात मग्न असायचा, त्यातून एखादी सभासद हजर नसली तर तिच्या सुनेविषयी गप्पा मारण्यात सहज दोन तीन तास निघून जायचे.
दिवसामागून दिवस जात होते अशा सून कौतुकात इंदुताईंना वैषम्य वाटत असे. आपली सून चंद्रावर आहे आणि इतर कोणाच्या नाहीत यामुळे त्यांना गर्व वाटत असे. पण त्यांच्या मागे बाकीच्या बायका त्यांना हिणवत असत. 'ही इंदू काय भाव मिरवते चंद्रावर सून आहे म्हणून, पाहिलं आहे का तीन तिला?. हो ना असली कसली सून लग्न नाही समारंभ नाही आणि हे म्हणे सून'
'चंद्रावर स्थयिक झालेली माणसं परत पृथ्वीवर येतच नाहीत. आता या वयात कुठल्याही वृद्ध माणसाला इरत तळावर जायची परवानगी नसते'. 'इंदूला काय कळणार सुनेचे कौतुक. आता बघ ना त्या विमल ताईंची सून दिसायला अशीतशीच असली तरी तिचे उत्पन्न काही कोटींच्या घरात आहे आणि ती घरकामही उत्तम करू शकते. 'रूपा पेक्षा तिचा बँक बॅलन्स पाहून मकरंदने तिच्याशी लग्न केलं. 'आणि ती देशपांड्याची सून श्रीमंत बापाची एकुलती एक लेक आहे. ती आपल्या सासूला नोकरासारखीच वागवते.' या अशा तर्हेच्या गप्पा चालू असायच्या. याची वित्तम बातमी अर्थातच इंदू ताईंच्या चमच्या त्यांच्यापर्यंत पोहचवायच्या. श्रावणातील मंगळागौर क्लब तर्फे साजरा करण्याचे ठरले आणि महिला मंडळात उत्साहाचे वातावरण संचारले.
सत्तर -ऐंशी वर्षांपूर्वी जसे सण साजरे व्हायचे तसे आत्ताही होत असत फक्त त्याचे स्वरूप बदलले असे. महिला मंडळातर्फे मंगळागौरीचा सण साजरा करण्याचे ठरले होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन इंदुताईनी केले पण आयत्यावेळी त्यांच्या चमच्याने येऊन सांगितले कि निमंत्रितांच्या यादीतून त्यांना वगळण्यात आले आहे. एक जण म्हणाली इंदुताईचे आता वय झाले आहे त्यामुळे त्यां पूर्वीसारख्या शारीरिक खेळात भाग घेऊ शकणार नाहीत. दुसरी म्हणाली 'हो ना त्यांना आभासी जगामध्येही इंटरेस्ट नाही. त्यामुळे त्यांना जंगलातील थरार, शनी ग्रहावरचे विलक्षण अनुभव अथवा गुरु ग्रहावरून पृथ्वीवर येण्याची शर्यत अशा खेळातही भाग घेऊ शकणार नाहीत. ' तिसरी म्हणाली 'हो ना . त्यातून त्यांना मुली किंवा सुना नाहीत' उगीच त्यांची आपल्या लेकी सुनानां दृष्ट लागायची.
मग हळू हळू अशी प्रथाच पडू लागली की आयोजन इंदुताईंकडे पण काही ना काही कारण काढून इंदुताईंना आमंत्रण चुकायची. बहुतेक स्त्रियांना साने कुटुंबीयांविषयी काही माहित नव्हते किंवा माहिती होती ती विकृत स्वरूपात होती. एका समारंभातील भाषणात इंदुताईनी जाहीर केले की त्यांना सून आहे तिचे नाव सारा आहे. मुलगा व सून हे दोघेही चन्द्राच्या ग्रहतळावर आहेत. मग त्यांनी पुढे गुणवर्णन करताना सांगितले की कुठल्याही ग्रह तळावर पर्मनंट वास्तव्य करायचे असले तर तीन वर्ष त्या ग्रहाचे विविध अभ्यासक्रम चालू असतात त्यानंतर तीन साडेतीन वर्ष त्या ग्रहावर वापरण्यात येणाऱ्या महत्वाच्या यंत्रांची आणि सायबोर्गचे सर्वाधिक ज्ञान दिले जाते. शेवटची दोन वर्ष म्हणजे पाच ते सहा वर्ष त्या ग्रहावर असणाऱ्या गरुत्वाकर्षण, पाऊस, हुमिडिटी आणि इतर परिस्थितीचा अभ्यास करावा लागतो. हळू हळू इंदुताईच्या भाषणाने सर्व स्त्रिया थक्क झाल्या. इंदुताई पुढे सांगू लागल्या आणि एंट्रन्स एक्झाम हे फार कडक असते. फिजिकल कॅन्डिशन तर उत्तम लागतेच पण मानसिक बुध्यांक एकशेचाळीसच्या वर असावा लागतो. उत्तम प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्याला अठराव्या एकोणिसाव्या वर्षी परग्रहावर पाठवले जाते. आणि ही मुलं कमीत कमी पंचवीस वर्ष तरी परत येऊ शकत नाही. ह्या व्यक्तव्यानंतर इंदुताईंबद्दलची असूया आणि आदर वाढीस लागले. शेवटी तो तात्कालिक उपायच ठरला. परत महिला मंडळाचे इंदुताईंना न बोलावणे, सुने वरून टोमणे मारणे असे सर्व प्रकार सुरु झाले.
नवरा पैसे मिळवतो आणि इंदुताई अफाट उडवतात. त्यात चांद्रवसीय मुलगा भलताच पैसे पाठवत असणार.
खरंच की .....
याप्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विरोधाने इंदुताई संतप्त झाल्या आणि घरात त्यांचा रणरागिणीचा अवतार दिसायला लागला. वर वर दिसताना त्या जरी शांत दिसत असल्या तरी अंतर्गत त्यांचा राग खदखदत होता. सर्व सायबोर्ग नोकर त्यांचं म्हणणं मुकाट्याने ऐकून घेत. मात्र घरची मोलकरीण त्यांचे अजिबात ऐकत नसे.
एक दिवस कधी न येणारी इंदू अभ्यासिकेत टपकली. तिचा चेहरा अतिशय संतप्त दिसत होता. आल्या आल्या बददकन खुर्चीत बसून म्हणाली.
‘मला दुसरं लग्न करायचं आहे’
‘कर मग’
‘तुमचे माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नाही. तुमचं हॉलो आधी बंद करा.’
‘तुमचे माझ्याकडे मुळीच लक्ष नाही.’
अच्छा! ‘म्हणून तू दुसरे लग्न करायचे ठरवलेस. करून टाक. पण नवरा कोण आणि कुठला आहे ?’
‘डोंबल तुमची. माझ्याकडे तुमचे अजिबात लक्ष नाही.’
आता मात्र मी हॉलो बंद करून तिच्याकडे पहिले
‘बघा नीट बघून घ्या तुमचीच बायको आहे ना’
‘हं बोल काय म्हणत होतीस?’
‘तुमचे माझ्याकडे अजिबात लक्ष नसते’
आणि म्हणून तू दुसरं लग्न करणार आहे आणि तो तरी तुझ्याकडे लक्ष देणार आहे याची काय गॅरंटी. त्यातून तुला दुसरं लग्न करायचं असेल तर कर दुसरं लग्न. कर दुसरं लग्न माझी पूर्ण परवानगी आहे.
आता मात्र ती फारच संतापली. माझ्या डोक्यात एखादी काठी मारावी असे हिंस्र विचार तिच्या मनात येऊन गेले.
मला लग्न करायला सांगताना तुम्हाला काय लाज लज्जा वाटते का तरी?
हो वाटते ना कुणाला स्वतःची बायको दुसऱ्यासोबत लग्न करावे असे वाटेल.
आता मात्र हद्द झाली हे काय माझं लग्न करायचं वय आहे का?.
हे बघ इंदू प्रेमात असल्यावर वय वगैरे काही बघायचं नसत
गणितात रँग्लर असणाऱ्या मुलीने दूध वाल्याचा हिशोब चुकवल्यावर कसे वाटेल?.
नंतर त्याने त्यांचा पर्सनल अकाउंट उघडला. मग तुला पैसे हवेत का लग्न करायला ?
तुम्ही अगोदर माझ्या म्हणण्याकडे नीट लक्ष द्या मला दुसरे लग्न करायचे नाही ते तुम्ही एक आहात तेवढे पुरे आहे.
त्यातून तुझ्या सारखी एक्सट्रा स्मार्ट, त्यातून तुझ्या विसरभोळापणामुळे कित्येकवेळा प्रोब्लेमही होतात. मग बोल तु दुसरं लग्न केव्हा करतेयस.
अहो मी आपल्या जयंताच्या लग्नाविषयी बोलते आहे.
अग पण त्याच लग्न झालेलं आहे.
हो पण परग्रहावरच्या मुलांना कितीही लग्न करण्याची परवानगी कायद्याने दिली आहे.
बरोबर आहे. पण मुलांसकट त्याच्या बायका त्याच ग्रहावर राहायला हव्या असाही नियम आहे. त्यातून जयंता तिशीच्या घरात आलेला आहे. आणि आत्ता तू त्यातून मुलीची निवड केलीस तर प्रशिक्षण संपेपर्यंत मुलगी अठरा वर्षाची आणि जयंत छत्तीस वर्षाचा झाला असेल. त्या सुनेचा तुला काहीच उपयोग होणार नाही.
जयंताच्या लग्नाचं त्यालाच विचार मला विचारून काय फायदा. आणि हो तुला सुनेची काय जरूर आहे? सर्व काम करायला पाच सायबोर्ग आणि एक मानव आहे. तू घरातच इतक्या कमी वेळ असतेस कि एखाद्यावेळी तू घरात दिसलीस तर मला नवलच वाटते.
आपल्याला चर्चा माझ्याविषयी नाही तर जयंताच्या लग्नाविषयी करायची आहे.
माझ्या लक्षात आले हे सगळी तिच्या महिला मंडळाची करामत असावी.
इंदू हा प्रश्न तू जयंताला विचार. तुझ्या मनात काहीही असले तरी जयंताची संमती आवश्यक आहे. पण त्याच्या अगोदर कोणी तयार आहे का हे तरी विचार.
पुढचे तीन चार आठवडे ती अगदी बिझी होती. चंद्रावरील मुलगा असला तरी संमती आवश्यक आहे. मुली पाहणे, त्यांचे पालक आमच्या घरी येणे असे सर्व सोपस्कार होत होते. त्याच्या नंतर लग्नाविषयीचा एक नवीनच नियम अंमलात आणला गेला. त्या नियमानुसार परग्रहावरील माणूस कितीही लग्ने करू शकत असला परंतु नवरा बायकोच्यात तीन वर्षाहून जास्त अंतर चालत नव्हते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users