
थंडीचे दिवस होते. विराज आणि त्याचे 3 मित्र ट्रेकिंगसाठी एका घनदाट जंगलात गेले होते. दिवसभराच्या प्रवासानंतर जंगलाजवळ एका उंच डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले आणि त्यांनी तिथेच तंबू ठोकण्याचा निर्णय घेतला. चंद्राच्या शीतल प्रकाशात झाडांची सावली एकमेकांत मिसळून अजब आकृत्यांसारखी दिसत होती. पक्ष्यांचे आवाजही बंद झाले होते, फक्त झाडांच्या पानांवर वाऱ्याची सळसळ ऐकू येत होती.
रात्रीचे अकरा वाजले असतील. रात्री जेवण झाल्यावर शेकोटी पेटवून सगळे जण गप्पा मारत बसले. तेवढ्यात जंगलाच्या आत कुठेतरी एक विचित्र किंकाळी ऐकू आली. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. "कोण असेल?" रोहन भीतीने कुजबुजला. कुणालाही उत्तर देता आलं नाही. त्याच वेळी समोरच्या झाडामागे एक हलकीशी हालचाल दिसली. विराजने टॉर्च त्या दिशेने मारली, पण काहीही स्पष्ट दिसत नव्हते.
तेवढ्यात त्यांच्या तंबूच्या मागून डोंगरावरून कुणीतरी वजनदार प्राणी धप धप पायाचा आवाज करत उतरत असल्यासारखा आवाज आला. आता मात्र सगळे सुन्न झाले होते. कुणीतरी मोठ्या आकाराचा प्राणी त्यांच्या दिशेने येत होता. तो कोणता प्राणी होता हे समजण्याआधीच त्याच्या घोगऱ्या गुरगुराटाने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
"पळा!" विराज जोरात ओरडला, आणि सगळे जण वेगाने एका दिशेने धावत सुटले. सगळीकडे जंगलच होतं. मागे वळून पाहण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. जंगलात धावताना काटेरी झुडुपं अंगावर ओरखडे उमटवत होती, पण जीव वाचवायचा होता. काही मिनिटांनंतर एका मोठ्या खडकामागे लपून त्यांनी श्वास रोखला. आता फक्त निशब्द काळोख आणि त्यांच्या जोरजोराने धडधडणाऱ्या हृदयाचे आवाज ऐकू येत होते.
सगळे घाबरलेले, थकलेले आणि गोंधळलेले होते. त्या घनदाट जंगलात कुठे जाऊन लपायचं, काहीच सुचत नव्हतं. खडकामागे बसून ते एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. रात्रीचा काळोख अधिकच गडद होत चालला होता. झाडांमधून फक्त गूढ वाऱ्याचा आवाज येत होता, पण त्या आवाजातही एक विचित्र कंप जाणवत होता. असे भासत होते की जणू काही कुणीतरी विविध झाडांमागून त्यांच्याकडेच बघत आहे.
काही वेळ शांततेत गेल्यावर कुणीतरी हळूच मागे पाहिले. तो भयानक आकृतीसारखा दिसणारा जीव आता दिसत नव्हता. सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पण तो प्राणी नेमका कोण होता? तो तिथून गेला की अजूनही जवळच कुठेतरी होता? ही रात्र कधी संपणार होती?
अचानक, रोहनने डोळे मोठे करून समोर पाहिलं आणि तो पुतळ्यासारखा स्तब्ध झाला. "तिथे… तिथे कोणीतरी उभं आहे!" त्याच्या कडवट स्वराने सगळ्यांच्या हाडात भीती भरली. सगळ्यांनी त्या दिशेने पाहिलं. समोरच एका झाडाच्या फांद्यांच्या आडून एक उंच, काळसर आकृती दिसत होती. तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती. ती काही क्षण तिथेच स्तब्ध उभी होती आणि मग अचानक नाहीशी झाली.
"हे नक्की काय घडत आहे?" विराज घाबरून कुजबुजला.
तेवढ्यातच एक कुजबुज ऐकू आली—एकदम जवळून, जणू त्यांच्या मागेच कुणीतरी दबक्या आवाजात काहीतरी पुटपुटत होतं. सगळ्यांनी घाबरून मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं.
अचानक कुणालच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. तो दचकून मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. "माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवलाय!" तो किंचाळला. त्या शब्दांनी सगळे स्तब्ध झाले. लगेचच थंड वाऱ्याचा एक झोत त्यांच्या मध्येच फिरला. पण हा वारा सामान्य नव्हता—त्यात एक विचित्र, कुजक्या गंधासारखा वास होता.
तेवढ्यात एक विचित्र, घोगरं हसू ऐकू आलं. ते मानवी नव्हतं—काहीतरी वेगळंच होतं. आवाज वरच्या झाडांमधून येत होता, जणू काही तिथे कुणीतरी बसून त्यांना पाहत होतं. सगळ्यांची तोंडं पांढरीफटक पडली.
घाबरलेल्या अवस्थेत ते एकमेकांच्या जवळ बसून होते.
एका क्षणी विराजने सागरला आवाज दिला, "सागर, तुझ्या हातातली बॅटरी दे…"
पण सागर काहीच बोलला नाही.
विराजने त्याच्याकडे पाहिलं, आणि… सागर तिथे नव्हताच!
"सागर कुठे गेला?" रोहन किंचाळला. सगळे घाबरून उठले. त्यांचा मित्र काही क्षणांपूर्वी त्यांच्यासोबत होता, पण आता कुठेच नव्हता. आता मात्र त्यांच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती.
काही मिनिटांतच समोरच्या झाडांमधून सागर पुन्हा दिसला. त्याच्या चालण्यात काहीतरी विचित्रपणा होता, आणि त्याच्या डोळ्यांत एक वेगळाच भाव होता.
"सागर, तू कुठे होतास?" विराजने विचारलं.
सागर काहीच न बोलता हसला—तेच भेसूर हसू, जे त्यांनी काही क्षणांपूर्वी ऐकलं होतं. त्या वेळी सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.
सागर समोर उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगळेच होते. त्याचा तो भेसूर हसू पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. "सागर, तू कुठे होतास?" विराजने धडधडत्या आवाजात विचारलं.
सागर काहीच न बोलता त्यांच्याकडे बघत राहिला. त्याचे डोळे खोलवर काळसर दिसत होते, आणि त्याच्या श्वासात एक विचित्र थंडावा जाणवत होता. काही क्षण शांततेत गेले. अचानक, तो अगदी वेगाने बुलेट ट्रेन सारखा पुढे आला आणि विराजच्या खांद्यावर घट्ट पकड घेतली आणि खांदे जोराने दाबू लागला.
"सोड ना, काय करतोयस?" विराजने धडपडत म्हटलं. पण सागर काहीच बोलत नव्हता. त्याच्या पकडीचा जोर वाढत गेला.
"सागर, हे तू काय करतोयस? आम्ही घाबरतोय ना ! प्लीज, गंमत करण्याची ही वेळ नाही !" कुणाल ओरडला.
तेवढ्यात सागरच्या चेहऱ्यावर एक विचित्र वेदनादायक भाव उमटला. जणू काही तो स्वतःशीच झगडत होता. तो जोरात किंचाळला आणि एका झटक्यात आपोआप मागे पडला. सगळे धावत त्याच्या जवळ गेले.
त्याचा श्वास जड झाला होता.
"माझ्या आत काहीतरी घुसलं होतं. माझ्यावर कब्जा घेत होतं. पण ते आता गेलं" तो थरथरत म्हणाला.
तेवढ्यात आसपासच्या झाडांमधून काहीतरी कुजबुज ऐकू आली. तो आवाज एकाच जागी न राहता वेगवेगळ्या दिशांनी फिरत होता. कधी तो त्यांच्या मागून, कधी डावीकडून, कधी उजवीकडून, वरून येत होता. आवाजात स्पष्ट शब्द नव्हते, पण तो ऐकून हृदयात धडकी भरावी असाच होता.
"आपण इथून निघायलाच हवं," रोहन घाबरून म्हणाला. सगळेच घाबरले होते, पण ज्या दिशेने जंगलाच्या बाहेर जाण्याचा रस्ता होता, तिथेच हा आवाज अधिक वाढत होता.
त्या कुजबुजीनेच त्यांना पुरतं हादरवलेलं असतानाच, जमिनीखालून काहीतरी सरपटण्याचा आवाज आला. काही झाडांची मुळे हलत होती, आणि जमिनीखाली फुगवटा तयार होवून जणू काही कुणीतरी मोठा प्राणी जमिनीखालून वर येण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांच्या पायाखालील माती हळूहळू खाली जात होती. जमीन हलत होती. तिरपी तारपी होत होती. त्यांना नीट उभे राहणे मुश्किल झाले.
"पळा!" विराज जोरात ओरडला.
सगळे जोरजोराने धावू लागले. पण जितके ते पळत होते, तितकाच तो जमिनीखालचा सरपटण्याचा आवाज आणि फुगवटा त्यांच्या मागे मागे पाठलाग करत येत होता. धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतल्याप्रमाणे ते जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यांनी धावण्याची दिशा मधूनच अचानक बदलली. तो जमिनीखालचा फुगवटा सरळ पुढे निघून गेला.
पाच-दहा मिनिटं धावल्यानंतर, ते जंगलाच्या एका टोकाला पोहोचले. समोर खुलं मोकळं मैदान होतं. पण तिथेच, समोर एका मोठ्या प्रचंड आकाराच्या झाडाखाली, एक उंच काळसर आकृती उभी होती.
ती आकृती काही माणूस नव्हती. तिच्या डोळ्यांत गडद लालसर प्रकाश होता, आणि तिच्या शरीराला काही हिरव्या आणि तपकिरी वेलींनी वेढलेलं होतं. ती खूप भीतीदायक होती.
आता जंगलात अचानक जोराचा वारा वाहू लागला. झाडांच्या फांद्यांमध्ये घर्षण होऊन विचित्र आवाज निघू लागला. कुठून तरी एक स्वयंभू आगीचा लोळ उडत आला आणि काही क्षणांतच जंगलाच्या एका भागात आगीचा लालसर प्रकाश दिसू लागला. जंगलाला आग लागली. वणवा पसरला. बघता बघता वणव्याने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा उंच झाडांपर्यंत पोहोचत होत्या, आणि जळणाऱ्या लाकडांचा खटक-खटक आवाज सर्वत्र घुमू लागला.
तेवढ्यात त्या आगीच्या प्रकाशात झाडांवर काही विचित्र सावल्या हलताना दिसू लागल्या. त्या फक्त हालचाल करत नव्हत्या, तर नाचत होत्या, एकमेकींच्या भोवती फिरत होत्या. काही सावल्यांच्या आकृती मानवी होत्या, पण त्यांची हालचाल नैसर्गिक वाटत नव्हती. काही जळत्या सावल्या झाडांच्या बुंध्याभोवती वेटोळे घालून गरगर फिरत होत्या.
विराज आणि त्याचे मित्र अजूनही धडपडत जंगलाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते, पण आता त्यांच्या समोरच ती भयंकर दृश्यं उभी होती. अचानक त्यांच्याच शेजारच्या झाडामागून एका खोल, घोगऱ्या आवाजात किंकाळी ऐकू आली. तशीच किंकाळी जी अगदी पहिल्यांदा त्यांना ऐकू आली होती. तो आवाज ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
सागरने घाबरून मागे पाहिलं आणि त्याच्या अंगातून एकदम थंड लहर गेली—एका झाडाच्या खोडावर एक लांबट काळसर चेहरा उमटला होता! त्या चेहऱ्याच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती, आणि तो झाडासहित त्यांच्याकडे सरकत होता.
"इथून लगेच पळायला हवं!" कुणाल ओरडला.
त्यांनी धावत जंगलाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण आता आग आणि त्या सावल्या यांच्यामध्ये ते अडकले होते. झाडांच्या सावल्या आता अधिक गडद होत चालल्या होत्या.
अचानक, एका मोठ्या झाडाच्या सावलीतून एक लांब सुळसुळीत हात पुढे आला आणि रोहनच्या हाताला स्पर्श केला. तो जोरात किंचाळला आणि खाली कोसळला. त्याच्या हातावर जळल्यासारख्या व्रण उठले होते, जणू काही सावलीने त्याचं मांसच भस्म केलं होतं. सर्वांनी त्याला हात देऊन जमिनीवरून उठवलं.
तेवढ्यात वाऱ्यासोबत एक वेगळाच आवाज येऊ लागला—एखाद्या जुन्या जाणत्या साधूच्या मंत्रासारखा! तो आवाज कोण काढत होतं, हे समजत नव्हतं. पण जशी ती मंत्रमुग्ध कुजबुज वाढत गेली, तसतसा वणवा मंदावत गेला. झाडांवर धुमाकूळ घालणाऱ्या सावल्याही आता जणू वेदनांनी ओरडत हवेत विरत होत्या. गिरकी घेणाऱ्या ज्वालाग्राही सावल्या एकमेकांत मिसळून एकत्रित मोठा आगीचा लोळ तयार झाला. एका क्षणी प्रचंड लखलखता प्रकाश तयार झाला, ज्यामुळे त्यांचे डोळे दिपून गेले. झाडे प्रचंड वेगाने हलू लागली. एकमेकांवर थाड थाड आपटू लागलीं. झाडांचे फांद्या एकमेकांत गुंफल्या जाऊन वेणी सारखे आकार तयार होऊ लागले. समोर नेमके काय चालले होते हे ते चौघांच्या आकलनापलीकडचे होते.
काही झाडांच्या फांद्या एकमेकांना ओढू लागल्या, जणू काही त्यांच्यात जुगलबंदी सुरू झाली. हे सर्व त्या मंत्र शक्तीमुळे होत होतें. काही झाडांच्या फांद्या एकमेकांशी पंजा लढवू लागल्या. हे सर्व अभद्र आणि अद्भुत अग्नितांडव त्या मंत्रांमुळे संपणार होते म्हणून की काय, ते जास्त प्रखर होत होतें. दिवा विझतांना पूर्ण विझण्याआधी जास्त प्रखर होऊन फडफडतो आणि मग विझतो, त्याप्रमाणे!
अखेरीस, काही क्षणांतच सर्व शांत झालं. वणव्याने जळून निघालेली झाडं अजूनही उभी होती, पण त्या सावल्यांचा मागमूसही नव्हता. सगळे काही पूर्वीप्रमाणे जिथल्या तिथे झाले. शांत. सहज. नैसर्गिक!
विराज आणि त्याच्या मित्रांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि एकमेकांकडे पाहिलं. सगळ्यांचे चेहरे घामाने डबडबले होते, आणि मनात एकच विचार घोंगावत होता—त्या सावल्या कोणत्या होत्या? त्या मंत्राचा आवाज कुठून आला होता? आणि त्या जंगलात काय गूढ दडलेलं होतं?
एवढ्यात एक प्रचंड मोठी दिव्य साधूच्या आकाराची सावली काही क्षण त्यांना समोर दिसली. त्या सावलीचे दर्शन सुखावणारे होते. मग ती सावली हवेतच हळूहळू विरली आणि नाहीशी झाली.
कदाचित, त्या जंगलाच्या इतिहासातच या सगळ्या घटनेचं उत्तर दडलेलं असावं. पण आता एक गोष्ट मात्र नक्की होती— त्याचं रक्षण कोणत्यातरी चांगल्या शक्तीने केलं होतं. पण चौघांनी निश्चय केला की यापुढे या जंगलात पुन्हा परत यायचे नाहीं. ते आपला मार्ग चालू लागले.
बराच वेळ चालल्यानंतर आता समोर जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला आणि समोर अंधूक का होईना सूर्याच्या येण्याची चिन्हे दिसू लागली.
भयानक! कमाल झालीये कथा
भयानक!
कमाल झालीये कथा
अपूर्ण आहे का
अपूर्ण आहे का
कथा अपूर्ण नाही
कथा अपूर्ण नाही
चार मित्र जंगलात गेले,
चार मित्र जंगलात गेले, त्यांनी काहीतरी अमानवीय अनुभवलं, त्यांच्यावर अमानवीय काहीतरी कडून हल्ला झाला आणि अन्य काहीतरी अमानवीय शक्तीने त्यांना वाचवलं. एवढाच पट आहे का कथेचा? की मी काहीतरी मिस केलं?
हो. तोच प्लॉट आहे
हो. तोच प्लॉट आहे
सैतान विरुद्ध भगवान
श्रद्धेचा भाग आहे
वर्णन आवडले.. स्पेशली ते झाडाखालून मुळे सरपटण्याचे..
मी फक्त नेहेमी त्याच त्याच
मी फक्त नेहेमी त्याच त्याच धाटणीच्या फक्त हॉरर कथा लिहितो असे नाही.
मी नुकतीच लिहिलेली गुप्तहेर कथा जरूर वाचावी ही विनंती:
https://www.maayboli.com/node/85395
मी फक्त नेहेमी त्याच त्याच
मी फक्त नेहेमी त्याच त्याच धाटणीच्या फक्त हॉरर कथा लिहितो असे नाही.
कृपया मी नुकतीच लिहिलेली एक् प्रेमकथा "नियतीची सावली" जरूर वाचावी ही विनंती:
https://www.maayboli.com/node/86306
वेगळ्या विष्यावरची भयकथा
वेगळ्या विष्यावरची भयकथा नसलेली "इंटरव्ह्यू गेला पाण्यात" ही कथा वाचून बघा:
https://www.maayboli.com/node/85448