माझ्या ‘वानखेडे’च्या खास आठवणी

Submitted by गुरुदिनि on 12 February, 2025 - 02:53

या वर्षी १२ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’द्वारा वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. त्यानिमित्ताने, ‘सीसीआय’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ यांच्या वादातून आणि विजय मर्चंट यांनी बॅ. शेषराव वानखेडे यांना डिवचल्यामुळे वानखेडे स्टेडियमची स्थापना कशी युद्धपातळीवर झाली याची रंजक कहाणी एव्हाना क्रिकेटरसिकांना मुखोद्गत झाली आहे. वानखेडेवरील पहिला कसोटी सामना २३ ते २८ जानेवारी १९७५ दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला. हा सामना वेस्ट इंडीजने २०१ धावांनी जिंकला. क्लाईव्ह लॉइडचे नाबाद द्विशतक (२४२) आणि एका घटनेवरून प्रेक्षकांनी स्टँडमध्ये केलेली जाळपोळ यामुळे हा सामना गाजला.

अर्थात हा सामना काही माझ्या आठवणीत नाही कारण त्यावेळी मी फक्त सव्वा वर्षांचा होतो. वानखेडे वरील सामन्याची माझी पहिली आठवण म्हणजे १९८१ सालचा इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना. त्यावेळी आमच्या घरी नुकताच टीव्ही आला होता. त्यावर हा सामना पाहिल्याचे अंधुकसे मला आठवते. या सामन्यात (आणि त्या जोरावर मालिकेतही) भारताचा विजय झाला होता. तो इंग्लंडचा संघ बऱ्यापैकी ताकदवान होता कारण त्या संघात बॉयकॉट, गूच, गॉवर, बोथम, विलीस, बॉब टेलर, अंडरवूड असे नावाजलेले खेळाडू होते.

त्यानंतर आठवतो तो १९८४ सालचा इंग्लंडविरुद्धचाच कसोटी सामना. भारताने तो सामना जिंकला त्यात लेगस्पिनर शिवरामकृष्णनचा सिंहाचा वाटा होता. १८ वर्षीय लेगी ‘शिवा’ने दोन्ही डावात प्रत्येकी सहा बळी घेऊन इंग्लंडला फिरकीच्या जाळ्यात अडकवत नामोहरम केले होते.

पुढचा सामना म्हणजे १९८७ च्या वन-डे वर्ल्डकपमधला भारताचा उपांत्य सामना. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान विजयासाठी फेवरेट होते. पण आदल्याच दिवशी नवख्या ऑस्ट्रेलियाने बलाढ्य पाकिस्तानचा लाहोरमध्ये आश्चर्यकारक पराभव केला होता. दुसऱ्या दिवशी वानखेडेवर इंग्लंडने भारताचा अनपेक्षितरित्या पराभव केला. यामध्ये गूच आणि गॅटिंगने भरपूर स्वीप मारून भारतीय फिरकी गोलंदाजांना नामोहरम केले. त्यामुळे आधीच निवृत्ती जाहीर केलेल्या सुनिल गावस्करांचा हा शेवटचा सामना ठरला.

मग पुढच्या वर्षी १९८८ साली न्यूझीलंडने या मैदानावर कसोटीत भारताला अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात महान वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडलीने अतिशय उच्च दर्जाच्या मध्यमगती स्विंग गोलंदाजीचे प्रदर्शन करीत १० बळी मिळवले आणि ऑफ स्पिनर ब्रेसवेलने ८ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली.

माझी वानखेडेवरील सामन्याची कधीही विसरली न जाणारी आठवण म्हणजे १९९१ सालचा मुंबई आणि हरियाणा यांच्यामधला रणजी करंडकाचा अंतिम सामना. स्टार खेळाडूंनी भरलेला मुंबईचा संघ हा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. कारण या संघात वेंगसरकर, मांजरेकर, तेंडुलकर, लालू राजपूत, चंदू पंडित, राजू कुलकर्णी आणि सलील अंकोला असे ७ कसोटीपटू होते. शिवाय विनोद कांबळी आणि अॅबे कुरूविल्ला हे देखील लवकरच भारतासाठी खेळले. त्या तुलनेत हरियाणाकडे मात्र फक्त कपिल देव आणि चेतन शर्मा हेच दोन कसोटीपटू होते. पण उलटफेर होत हरियाणाने पहिले चार दिवस सामन्यावर वर्चस्व राखले. पण पाचव्या दिवशी मात्र मुंबईने जबरदस्त प्रतिकार करत सामन्यात रंगत आणली. शेवटच्या दिवशी उपहारानंतर मुंबईला विजयासाठी ६८ षटकांत ३५४ धावा करायच्या होत्या. वेंगसरकर यांचे अविस्मरणीय नाबाद शतक, सचिनच्या ९६ आणि कांबळीच्या ४५ धावा यामुळे मुंबईने जवळपास विजयश्री खेचून आणली होती. परंतु दबावाखाली मुंबईचे तळाचे तीन खेळाडू धावबाद झाले आणि हरियाणाने फक्त २ धावांनी हा सामना जिंकला. त्यानंतर हरयाणाने प्रथमच रणजी चषक जिंकल्याने आनंदातिशयाने अश्रू ढाळणारा कप्तान कपिलदेव आणि एक महान शतक झळकावूनही सामना हरावा लागल्याने अश्रूपात करणारा वेंगसरकर, यांच्यामुळे हा सामना पाहणारा कोणताही सच्चा क्रिकेटप्रेमी हा सामना आणि ती भावुक दृश्ये कधीही विसरू शकणार नाही.

पुढची आठवण म्हणजे १९९३ सालचा इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना. यामध्ये आमचा लाडका विनोद कांबळीने अफलातून द्विशतक (२२४ धावा) ठोकत भारताला डावाचा विजय मिळवून दिला. या सामन्यात सचिन व आमरे या इतर दोन मुंबईकरांनीही सुंदर अर्धशतकी खेळया केल्या.

२००२ साली इंग्लंडविरुद्ध इथे एक चुरशीचा वन-डे सामना झाला. या मालिकेत भारत ३-२ असा पुढे होता. परंतु हा सामना अवघ्या ५ धावांनी जिंकत इंग्लंडने मालिका बरोबरीत राखली. शेवटचा बळी घेणाऱ्या आणि सामन्यात उत्तम अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या फ्लिंटॉफने विजयानंतर शर्ट काढत सर्व मैदानाला फेरी मारली. ते दृश्य ‘न भूतो’ असे विलक्षण होते. परंतु नंतर त्याच वर्षी जूनमध्ये लॉर्ड्सवर भारताने असाच एक अप्रतिम चुरशीचा अंतिम सामना जिंकल्यावर कर्णधार सौरभ गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून गरागरा फिरवला आणि फ्लिंटॉफ व इंग्लंडचा जणू सूडच घेतला.

दोन वर्षांनी २००४ साली इथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना झाला. एका आखाडा खेळपट्टीवरचा हा सामना जवळपास दोन दिवसातच संपला. ऑस्ट्रेलियाचा अप्रतिम फलंदाज मायकल क्लार्कने दुसऱ्या डावात कामचलाऊ डावखुरी फिरकी गोलंदाजी टाकताना अवघ्या ९ धावांत ६ बळी घेतले, म्हणजे खेळपट्टीची कल्पना यावी. पहिल्या डावात ९९ धावांनी मागे पडूनही दुसऱ्या डावात लक्ष्मण व सचिनने केलेल्या अप्रतिम अर्धशतकांच्या व फिरकीपटूंच्या जोरावर भारताने हा सामना अवघ्या १३ धावांनी जिंकला.

मग येतो तो २०११ सालचा वन-डे विश्वचषकाचा अंतिम सामना. या सामन्यात श्रीलंकेला अंतिम फेरीत नमवत भारताने २८ वर्षांचा वन-डे विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. धोनीने मारलेला शेवटचा षटकार, सचिनला उचलून घेत सर्व सहकाऱ्यांनी मैदानाला मारलेली फेरी, विजेतेपदानंतरचा जल्लोष हे सारे काही अजूनही डोळ्यासमोर तरळते.

त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इथे कसोटी सामना झाला. एखादा अनिर्णित सामना याहून चित्तथरारक होऊ शकेल की नाही याबद्दल शंका वाटते. कारण शेवटच्या डावात भारताला जिंकण्यासाठी २४३ धावा हव्या होत्या. शेवटच्या चेंडू बाकी असताना आठ गडी बाद झाले होते आणि विजयासाठी २ धावा हव्या होत्या. तेव्हा दुसरी धाव घेताना अश्विन धावबाद झाला आणि सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात रवी अश्विनने अष्टपैलू चमक दाखवत सामन्यात नऊ बळी घेतले आणि शतकही केले.

पुढची आठवण २०१३ सालची. त्यावर्षी नोव्हेंबरला वेस्टइंडीजविरुद्ध भारताचा कसोटी सामना झाला. भारतरत्न लाडक्या सचिनचा हा शेवटचा सामना होता. अपेक्षेप्रमाणे भारताने विंडीजला सहज पराभूत केले. पण तो सामना लक्षात राहील तो सचिनचा निरोपाचा सामना म्हणून आणि त्याने सामन्यानंतर केलेले मनोज्ञ भाषण यांसाठी.

२०१६ साली इथे टी-ट्वेंटी विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला. यात मजबूत भारतीय संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार होता. तेव्हा सर्वोच्च फॉर्मात असलेल्या विराट कोहलीमुळे भारताने चांगली धावसंख्या उभारली होती. परंतु लेंडल सीमन्स आणि आंद्रे रसेल यांच्या फटकेबाजीमुळे भारताला ७ गड्यांनी अनपेक्षितरित्या नमवत वेस्ट इंडीज अंतिम फेरीत पोहोचले आणि पुढे जेतेपदही पटकावले.

नंतर आठवतो तो इथला २०२१ चा न्युझीलंडविरुद्धचा कसोटी सामना. या सामन्यात भारताने ३७२ धावांचा मोठा आणि सहज विजय मिळवला. पण त्यात लक्षात राहते ती गोष्ट म्हणजे न्यूझीलंडचा मुंबईकर डावखुरा फिरकी गोलंदाज अजाज पटेल याने पहिल्या डावात घेतलेले सर्व १० बळी आणि एकूण सामन्यात घेतलेले १४ बळी. एका डावात १० बळी ही कामगिरी करणारा ‘अजाज’ हा जिम लेकर आणि कुंबळे यांच्यानंतचा तिसराच गोलंदाज ठरला. भारतासारख्या संघासमोर एका फिरकीपटुने ही कामगिरी करणे अद्भुतच होते.

आतापर्यंतची इथली रोमहर्षक सामन्याची शेवटची आठवण म्हणजे २०२३ सालचा वन-डे विश्वचषकातला अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना. या सामन्यात अफगाणिस्थानने प्रथम फलंदाजी करत २९१ धावांचे मोठे लक्ष ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया ७ बाद ९१ अशी अडचणीत सापडली होती. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार पॅट कमिन्स यांची जोडी जमली. मॅक्सवेलला सुदैवाने दोन जीवदानेही लाभली. अफगाणी फिरकी गोलंदाजी दर्जेदार होत होती. अर्धशतकानंतर मॅक्सवेलचा पाय चांगलाच दुखावला व त्याला धावता येत नव्हते. इतकेच नव्हे तर चालताही येईना. पण अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने आजवरच्या वन-डे क्रिकेट इतिहासातली एक अद्भुत महान अशी खेळी केली. मॅक्सवेलने अवघ्या १२८ चेंडूत २१ चौकार आणि १० षटकार यांची आतषबाजी करत नाबाद २०१ धावा केल्या, त्याही एका पायावरच म्हणता येतील अश्या. त्याला कमिन्सने ६८ चेंडूत फक्त १२ धावांची चिवट खेळी करत, एक बाजू लावून धरत अप्रतिम साथ दिली. या जोडीने आठव्या गड्यासाठी २०२ धावांची भागीदारी केली आणि हा सामना जिंकला. पुढे ऑस्ट्रेलिया संघाने या खेळीने प्रेरित होत विश्वचषक देखील जिंकला.

माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमीला माझ्या जन्मभूमीतल्या एका मैदानावर इतके अविस्मरणीय सामने आणि क्षण अनुभवायला देणाऱ्या वानखेडे स्टेडियमला आणि त्यासाठी कारणीभूत होणाऱ्या बॅ. शेषरावांना दंडवत.

- गुरुप्रसाद दि पणदूरकर,
(मुंबई)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users