होम

Submitted by meghdhara on 10 February, 2025 - 23:49

Home

मागे कुंबलंगी नाईट्स सिनेमा बघितल्यापासून दाक्षिणात्य सिनेमाबद्दल आवड आणि कुतूहल दोन्ही मुळे नवे नवे दाक्षिणात्य सिनेमा शोधायचा आणि पहायचा जणू एक नियम झाला होता. दोन वर्षांपूर्वी या सिनेमाबद्दल कळलं. तेव्हा पहिलाच आणि इतक्यात पुन्हा पाहिला.

सिनेमा सुरु होतो आणि आपल्याला आपल्यातल्याच चार चौघांसारखं घर दिसतं. घरातली पात्र एक एक करत समोर येतात. सिनेमा हळूहळू उलगडत जातो आणि अगदी आपलं लक्ष पूर्णपणे काबीज करतो. सिनेमा पुढे सरकत जातो तसे जणू आपण त्या घराचा आणखीन एक सदस्य होऊन जातो. घरापासून लांब रहाणारा मोठा मुलगा अँटनी त्याचं महत्वाचं काम पूर्ण करायला घरी येतो आणि कथा सुरु होते. कथा , संवाद , प्रसंग आणि सिनेमा देत असलेला संदेश कुठेही कृत्रिम होऊ न देता सिनेमा एखाद्या खऱ्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिग बघावे तसा समोर घडत जातो.

सिनेमातलं घर घरातल्या प्रत्येक सदस्याची कथा आपल्याला सांगतं. कथा सुरु होताना ती एका तरुण यशस्वी दिग्दर्शकाच्या अँथनीच्या कामाच्या पुढच्या प्रवासाची आहे असं वाटतं. तर पुढे त्या अँथनीच्या वडिलांची ऑलिव्हर ट्विस्ट ची कथा आहे असं वाटतं. त्यांचं ऑलिव्हर ट्विस्ट हे नाव असणं या मागची कथाही रोचक आहे. घरातली कुटीअम्मा दोन मुलगे असलेल्या कुठल्याही घरातल्या आईसारखी दिसते, बोलते, कधी वैतागलेली असते. घरातले म्हातारे आजोबा दिसत रहातात. त्यांच्या वयामुळे आलेल्या आरोग्याच्या अडचणी, विस्मृती प्रेक्षकाला लक्षात रहावे इतक्या वरचेवर समोर येत रहातात. या सगळ्यात अँटनीची प्रेम कथा , त्याची मैत्रीण सगळे आपले अस्तित्व ठळकपणे जाणवून देतात. त्या गर्लफ्रेंडच्या घरच्या आणि अँटनी च्या घरातील वातावरणातला फरक, शिकले सवरलेले आणि रूढार्थाने यशस्वी आणि श्रीमंत असलेले अँटनीचे होणारे सासरे यामुळे ऑलिव्हर यांना जाणवणारी असुरक्षितता, काहीसा कमीपणा या सगळ्या सशक्त घटकांनी कथेची वीण अगदी पक्की झाली आहे.

अँटनी च्या भावी सासऱ्यांच्या प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचं नाव ' It’s all about me’ फार सूचक आणि श्लेष असणारं आहे.

आयुष्य जगताना येणाऱ्या संघर्षात, महत्वाकांक्षा पार पाडताना, स्वतःला प्रूव्ह करताना बरेचदा आपलेच असतात म्हणून आपल्या आई बाबांना आपण गृहीत धरतो. वेगाने धावणाऱ्या जगण्यात ते ज्या बाबतीत मागे पडलेत किंवा (सॉफ्टवेअर अपडेट केल्यासारखे ) जे आई वडील स्वतःचे जगणे, विचार अपडेट करू शकले नाहीत अशा आईबाबांवर गमतीने हसणे , त्यांच्यावर विनोद करणे ही सुद्धा बरीच कॉमन गोष्ट झालेली आहे. यात कधी आईवडील हर्ट होत असतील हे मुलांच्या लक्षात येत नाही. या अचूक जागी लेखक आणि दिग्दर्शक रॉजीन थॉमस प्रेक्षकांचं लक्ष नुसतं वेधतच नाही तर या प्रश्नाच्या गांभीर्याकडे बघायला लावतो. स्वतःत डोकावायला लावतो .

आपल्या व्याह्यांसारखे आपण स्मार्ट नाही , techno-savvy नाही यामुळे, साधेपणामुळे काहीशा ओशाळलेल्या ऑलिव्हरना मुलाच्या अँटनीच्या कर्तृत्वाचा अभिमान असतो पण त्या सोबत अँटनीच्या लेखी आपलीही प्रतिमा उजळावी ही धडपड प्रेक्षकाला अंतर्मुख करते.

सिनेमातले प्रसंग एका विशिष्ट कालांतरात प्रत्येक महत्वाचा मुद्दा सांगणाऱ्या कथेचा , प्रसंगाचा क्लायमॅक्स गाठतात आणि त्यानंतर एखाद्या मोठ्या शांत जलाशयासारखे कधी शांतता तर कधी विचित्र कानकोंडी झालेली दाखवतात. अपघाताने होणारे घरातल्या प्रसंगाचे फेसबुक लाईव्ह आणि त्यातून अनावधानाने आणि रागाच्या भरात अँटोनीने एका प्रसिद्ध कलाकाराबद्दल अद्वातद्वा बोलणे आणि त्यातून सोशल मीडियावर अँटनीची झालेली नामुष्की दाखवणारा प्रसंग अगदी नैसर्गिक कुठेही घडू शकतो असा समोर घडत जातो.

व्याही मंडळी घरी आलेली असताना आकाशात जमू लागलेले काळे ढग .. कोसळणारा पाऊस , चमकणाऱ्या विजा आणि घरात अप्रिय संवाद होतात. इथे कुटीअम्माचा तोल सुटून बाहेरच्या लोकांसमोर घरातल्या लोकांमधला तणाव , काहीसं नैराश्य उघडं पडतं. छान जेवण झाल्यानंतर तोंड कडू झाल्यासारखी विचित्र शांतता आणि awkward परिस्थिती निर्माण होते.

त्यातून प्रेक्षकाला अगदी चटकन बाहेर काढत सिनेमा शेवटच्या भागाकडे वळतो. पुस्तक प्रकाशन सुरु असतं. बाप लेकाची नजरानजर, नंतर गाडीत शांत बसणं, घरी आल्यावर अँटनीचे वडिलांच्या खांद्यावर हात टाकून बसणं .. हे स्वैपाकघरातून बघून सुखावलेली आई आणि भाऊ आणि दोन्ही भावांचं आईवडील झोपलेल्या पलंगावर उद्ड्या मारून झोपणं आपल्याला ही सुखावून जातं. यानंतर पुढे देव या संकल्पनेवर सुद्धा लेखक दिग्दर्शक रॉजीन थॉमस एक हलकासा प्रकाश टाकून जातात. एक चांगला सिनेमा म्हणजे जितकं त्यात दाखवलं जातंय त्याहून कितीतरी जास्त प्रेक्षकाच्या मनात घडणारं मंथन हे हा सिनेमा पटवून देतो.

एक साधासा विषय; घर ! मग त्या घरातली माणसं , त्यांच्या छोट्या छोट्या कथा , त्यांचं एकमेकांशी नातं, काही असुरक्षितता , महत्वाकांक्षा , एकमेकांना गृहीत धरणं, या सगळ्यात मोबाईलचा, टेक्नॉलॉजी वाढता वावर, लुडबुड आणि प्रभाव आणि याच्या अगदी गाभ्यात असलेली माणुसकीची छोटीशी कथा .. या सगळयांना सोबत घेऊन बनवलेलं सुंदर रसायन म्हणजे मल्याळम सिनेमा 'होम '!

- मेघा देशपांडे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय होमबद्दल.
सुंदर सिनेमा आहे होम त्यातल्या वडिलांची टेक्नॉलॉजी शिकायची धडपड मुलाशी असलेलं नातं त्यासाठी सासऱ्याशी बरोबरी करायची धडपड खूप गोष्टी पूर्वीची आणि आत्ताचीही पिढी रिलेट करेल.

छान लिहिलंय होमबद्दल. >>> परत एकदा पहायचाय.
खूप गोष्टी पूर्वीची आणि आत्ताचीही पिढी रिलेट करेल.>>>> दर पिढीत हे कुठल्या न कुठल्या रूपात घडतच असतं
पियु, नक्की पहा .