गाणं पडद्यावरचं आणि पडद्यामागचं

Submitted by रानभुली on 7 February, 2025 - 23:57

पडद्यावरचा अभिनेता / त्री आणि गायक - गायिका यांची भट्टी जमल्याची कैक उदाहरणे आहेत. मुकेश गेले तेव्हां राज कपूरने माझा आवाज गेला असं म्हटलं होतं. (मुकेश आणि राज कपूर यांची गायकी सुद्धा मिळती जुळती आहे). अनेक गाणी (विशेषत: मोहम्मद रफी) ऐकताना सुद्धा अभिनेता डोळ्यासमोर उभा राहतो. गायक त्या आभिनेत्याचा आवाज कॉपी करत नसत, तर त्याचं व्यक्तीमत्व जसं आहे त्याला अनुसरून आवाज देत.

अलिकडच्या काळात पार्श्वगायनाची ही अट मोडीत निघालेली दिसते. हिरो कुठलाही असो, त्याला अरिजीतचाच आवाज असतो.
मधुबाला , हेलन, रेखा, काजोल = आशा भोसले,
नूतन/नर्गिस/शर्मिला/हेमा - लता मंगेशकर,
दिलीप /देव / शम्मी/ ऋषी कपूर - मोहम्मद रफी.
राज कपूर - मुकेश, देव आनंद = तलत, किशोर,
राजेश खन्ना,/ अमिताभ. ऋषी कपूर - किशोर अशा ऑनलाईन केमिस्ट्रीच्या जोड्या आपल्याला माहिती आहेत,

नंतरच्या काळात आमीर - उदीत नारायण, सलमान - एसपीबी , शाहरूख - अभिजीत भट्टाचार्य अशा जोड्या जमल्या. पण कुमार सानू आणि उदीत नारायण यांच्या आवाजात गाणी असावीत असा आग्रह हे अभिनेते धरत. शाहरूख खानला त्यातही उदीत नारायण चा आवाज फिट बसला. एक जण म्हणायचा कि शाहरूखने आमीरचा आवाज चोरला. पण शाहरूख खानने सोनू निगमचा आवाजही वापरला.

सोनू निगम या पिढीतला सर्वात टॅलंटेड गायक असावा. पण काही गाणी अशी आहेत कि जिथे गायकाचा चेहरा डोळ्यापुढे न येता सोनूच डोळ्यापुढे येतो. सोनूची गायकी भुरळ घालते आणि अभिनेत्याला त्याचा आवाज फिट बसलेला नाही असे वाटते.

ओम शांती ओम मधलं मै अगर कहूं हे सोनूने हळुवार म्हटलेले आहे. खर्जातले काही उच्चार जीवघेणे आहेत. ते गाणं कुठेच शाहरूखचं वाटत नाही. ते सोनूचंच वाटतं. असंच "अभी मुझ मे कही" हे सुद्धा. जरी पडद्यावर ऋत्विक ते गात नसला तरी पूर्वीच्या सवयीने ते त्याला सूट होईल अशा आवाजात असावं अशी अपेक्षा असायची. म्हणजे रफीचा आवाज गोड असतानाही तो जॉनी वॉकरसाठी आवाजात जे काही मॉड्युलेशन करायचा त्या आवाजात कधीच कुणी गाणी देऊ केली नसती. पण सोनूचं अभी मुझ मे कही हे पार्श्वगायन न ठरता सोनूचा कॉन्सर्ट चालू आहे असं वाटत राहतं. शाहरूख ला सोनूने अनेक गाणी अगदी चपखलपणे त्याची वाटावीत अशी दिलेली आहेत म्हणून या गाण्यांचा उल्लेख. नाहीतर सुहाना सफर सारखं अजरामर गाणं पडद्यावर दिलीप कुमारला बिल्कुल शोभलेलं नाही. तेच किशोर कुमार दिलीपकुमारचा आवाज नसतानाही "साला मै तो साहब बन गया" हे गाणं चपखल झालेलं आहे.

आमीरचा परंपरागत आवाज सोनू नसतानाही तनहाई त्याला फिट बसलेलं आहे. तनहाई वर सोनूची अमिट छाप आहेच आहे. तरी अभिनेत्याची बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स यामुळे ते पडद्यावर विश्वसनीय वाटत असेल.

अशी काही निरीक्षणं असतील तर नक्की शेअर करा. वाचायला आवडतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमिरला उदित, शाहरुखला अभिजीत जसा सुट होतो तसा सोनू ह्रतिकचा आवाज नाही हे खरंय. पण अभी मुझ मे कहीचा अपवाद. ह्रतिकवर चित्रीत केलेलं असलं तरी तरी पडद्यावर ते पार्श्वसंगीत म्हणून वाजतं. त्यामुळे सोनूचा आवाज या गाण्यात परफेक्ट वाटतो मला तरी. तसंच ब्रदर्समधलं सपना जहां दस्तक न दे.

आवाज + अभिनेता हे परफेक्ट कॉंबिनेशन असलेली मला आवडती गाणी म्हणजे

परदेसमधल्या ये दिल दिवानातला सोनू + शाहरूख

रॉकस्टारमधला रणबीर + मोहित चौहान

नटरंगमधल्या खेळ मांडलाचा अतुल कुलकर्णी + अजय

तेरे हवालेमधली करीना + शिल्पा राव

पीएस २ मधल्या रुआं रुआंमधली तृषा + शिल्पा राव

जॉनी वॉकर - रफी हे समीकरण जबरी आहे. रफी नाही तर जॉनीच गात आहे असं वाटतं.

मधुमती मधलं जंगलमे मोर नाचा
नया दौर मधलं मै बम्बई का बाबू
प्यासा मधलं सर जो तेरा चकराये
दूरकी आवाज मधलं हमभी अगर बच्चे होते
मिस्टर अन्ड मिसेस ५५ मधलं जाने कहा मेरा जिगर गया जी

रफीचा आवाज चपखल बसलेला आहे. काय जबरदस्त रेंज आहे! कोण दुसरा गायक एकाच सिनेमात सर जो तेरा चकराये आणि ये दुनिया अगर मिलभी जाये तो क्या है ही दोन टोकाची गाणी सादर करेल?

कल हो ना हो आवडीचे.
बघताना ते शाहरुखचे वाटते.
ऐकताना ते सोनूचे वाटते.
आणि स्वतः गाताना आपला आवाज सोनूसारखा आणि स्टाईल शाहरूखसारखी आहे असे आपले उगाचच वाटते

मागे एकदा सोनू निगम एका शोमध्ये म्हणाला होता की जेव्हा माझे निधन होईल तेव्हा त्याची बातमी देताना बॅकग्राऊंडला हे गाणे वाजत असेल.
मला हेच तेव्हा शाहरूखबाबत सुद्धा वाटले.
देव दोघांना उदंड आयुष्य देओ Happy

सुदेश भोसले तर अमिताभ सारखाच गायचा..
चुम्मा चुम्मा दे दे तर अशक्य!
आपण गाताना सुद्धा त्याच आणि त्याच आवाजात गायचा प्रयत्न करतो.

हृतिक रोशन कोई मिल गया मध्ये इटुकला पिटुकला दाखवला होता त्यात उदीत नारायणचा आवाज त्याला छान सूट झालेला. इधर चला में उधर चला..

आणि त्याच उदित नारायणने शाहरूख असताना वीर झारा मध्ये ही कमाल केलेली.. स्पेशली खालच्या लाईन.. डोळे मिटले तरी समोर शाहरूख येतो.

तुम छुपा ना सकोगे मै वो राज हू
तुम भुला ना सकोगे वो अंदाज हू...
जानम देख लो मिट गयी दूरिया
मै यहाँ हू यहाँ हू यहाँ हू यहा....

आज पुन्हा वीर झारा अल्बम ऐकावा लागणार.. पर्याय नाही Happy

रफी आणि आशा या जोडीची दोन गाणी आणि दोन्ही गाण्यात नायक देवानंदच आहे.

पहिलं अर्थात मधुबालाबरोबरचं - 'अच्छा जी मै हारी' . सुरुवातच मधुबालाच्या स्वर्गीय हसण्याने होते आणि मग १% माफी मागणे आणि ९९% खट्याळपणा दाखवत झुकलेल्या पापण्यांनी ती गाणं सुरू करते. कळत नाही की आशाने तिच्या रुपातला खट्याळपणा आपल्या आवाजात पकडला आहे की मधुबालाने आशाच्या आवाजातला अवखळपणावर अदाकारी केली आहे. दोघी इतक्या एकरुप झाल्या आहेत त्या गाण्यात. आणि मग रफीच्या तिखट आवाजातला राग देवानंद चेहर्‍यावर मूर्तीमंत दाखवतो. रुठे तो हुजूर थे मेरी क्या खता म्हणताना देवानंद जास्त हँडसम दिसतो (त्याला बुजगावणं म्हणणार्‍याने हे कबूल करणं यात सर्व आलं) की रफीचा आवाज जास्त काळजात घुसतो हे कळत नाही. शेवटच्या कडव्यातलं "जिने के मजे' वरचं रफीच मॉड्यूलेशन आणि देवानंदचं ओठ काढणं, पहिल्या कडव्याच्या नंतरच्या धृवपदावर दोन्ही गायकांनी केलेली मॉड्युलेशन्स आणि ती पडद्यावर दाखवणारे ते दोघे - अफाट सुंदर आहे गाणे !

https://www.youtube.com/watch?v=cwBdFom1X30

दुसरं साधनाबरोबरचं "अभी ना जाओ" यात देवानंदच्या चालण्यात त्याचा बुजगावणेपणा डोकावतो अधेमधे पण रफीला जे सांगायचय त्याच्या आवाजातून ते तो चेहर्‍यावर बरोबर दाखवतो - हट्टी, समाजाची पर्वा न करणारा प्रियकर. 'सितारे झिलमिला उठे' च्या वेळेस चाल थोडी बदलते आणि त्याला अनुसरून साधनाच्या चेहर्‍यावर काळजी उमटते पण मागे उभा असलेला देवानंद न गाता सांगून जातो "मग काय झालं? संध्याकाळ सरतेय तर तारे उगवणारच आणि दिवेलागण होणारच. पण तू का जात्येस?" कसलं भारी दाखवलंय ते देवानंदने.

https://www.youtube.com/watch?v=mfEQgoVi7P4

दिलीपकुमारला तलत चा आवाजही चपखल बसायचा (यह हवाँ, यह रात, यह चांदनी, शाम-ए - ग़म किं कसम, ए दिल मुझे़ ऐसी जगह ले चल …. कितीतरी).

देव आनंदला नंतरच्या काळात किशोरकुमारचा आवाजही सूट झाला.

कभी कभी मधे स्वप्नाळू, ध्येयवादी शायराच्या ‘मैं पल दो पल का शायर हूं‘ म्हणणार्या अमिताभ बच्चन ला मुकेश चा आवाज एकदम छान वाटला होता.

पार्श्वगायनाची प्रथा मोडीत निघाली >> हे खरं आहे हल्ली खूप वर्सिटायल गायक गाणी गातात पूर्वीच्या जमान्यातले रफी किशोर मुकेश यांचे आवाज त्या नायकाची आयडेंटीटी होते आता तसं नाही हेही ठीकच आहे उलट मला ही गोष्ट आवडते की गाण्याप्रमाणे गायक निवडला जातो जसं की सोनू सॉफ्ट गाण्यासाठी सुखविंदर लाऊड गाण्यासाठी मोहित चौहान ची तर वेगळीच पण सुंदर असतात गाणी.त्यामुळे सगळ्या गायकांना चान्स मिळतो गायनाचा .
अर्जित चाच आवाज सगळ्या गायकांना सूट होतोय त्यामुळे त्याचीच गाणी जास्त येतायत हे खरंय पण तरीही एखादा जुबिन नौटीयल किंवा दर्शन रावल चं गाणं ही येतच.

लेख वाचला प्रतिसादही वाचतोय. मला याविषयी माहिती फार कमी आहे. काही जोड्या माहिती आहेत. बाकी गाणी बरीच ऐकली आहेत, पडद्यावर तुलनेत फार कमी पाहिली आहेत. पण आवड असल्याने वाचवतोय, छान माहिती मिळाली.

प्रतिसादात चिकू आणि माधव यांनी दिलेली उदाहरणे पाहिली आणि एकदम पटले.

किशोर कुमारचा आवाज सर्वात जास्त सूट झाला तो राजेश खन्नाला!! त्यानंतर अमिताभ साठी ही त्याचा आवाज अतिशय जुळला.
लतादीदी आणि आशाताईंची ही खासियत म्हणावी लागेल की सर्व तर्हेच्या मूडसाठी आणि जवळजवळ सर्व नट्यांसाठी त्यांचा आवाज हा योग्यच वाटत राहिला !

जॉनी वॉकर प्रमाणे रफी - मेहमूद जोडीची अजरामर गाणी आहेत. अगदी लगेच आठवणारी म्हणजे, हम काले हैं तो क्या हुवा दिल वाले हैं, वो दिन याद करो, गोरी चलो ना हंस की चाल जमाना दुश्मन हैं, अजहू ना आये बालमा सावन बीता जाय..
मेहमूद - मन्ना डे जोडी म्हटली की पडोसन मधील सगळी गाणी डोळ्यासमोर येतात.
सोनू निगम ने सलमान खान, गोविंदा साठी सुद्धा गाणी गायली आणि ती बऱ्यापैकी गाजली सुद्धा.
देव आनंदने बहुदा जेव्हा ज्या गायकाची चलती होती त्या त्या वेळी त्यांना प्राधान्य दिलं. रफी, हेमंत कुमार, किशोर कुमार सगळ्यांनी देव आनंद ला आवाज दिला आणि गाणी सुद्धा गाजली.

अर्जित चाच आवाज सगळ्या गायकांना सूट होतोय त्यामुळे >>> काल ले जाए कहा ये हवांये.. गाणे ऐकत होतो.. त्यात शाहरूख ओठ हलवत गाताना ते इतके फनी वाटत होते.. बिलकुल सूट होत नव्हते.. तेव्हा हाच धागा आठवला होता. निदान बॅकग्राऊंड ला वाजता ना तरी दाखवायचे होते असा विचार मनात आला

अर्जित चाच आवाज सगळ्या गायकांना सूट होतोय >>> आशिकी२ सोडल्यास हे कुठेच नाही वाटलं. उलट अरिजितमुळे अश्या एकसुरी गायकांची आणि गाण्यांची लाट आली असं वाटतं. सगळ्यांचे आवाज सेम ऐकू यायला लागतात. व्हरायटी संपल्यासारखी वाटते. अशात क्वचित एखाद-दुसरं वेगळं गाणं आलं की बरं वाटतं. उदा: भुलभुलैया ३ मधलं 'होक्कुशपोक्कुश' आणि सोनूचं 'मेरे ढोलना'. होक्कुशपोक्कुश तर कार्तिक आर्यनला सूट पण झालं आहे व्यवस्थित.

छान धागा…

हल्लीचे गायक वगैरे माहिती नाहीत आणि बहुतेक गाणी बॅकग्राऊंडला वाजतात.

पुर्वी एक फॉर्मुला असायचा. हिरो हिरोइन इन्ट्रोडुस झाली की त्यांच्या तोंडी एक गाणं.. मग दोघांच्या नटखट छेडाछेडीचं,प्रेमाचं, दुराव्याचं … गाणीच गाणी जी पडद्यावर गायली जात. आता विषय बदलले, जुने फोर्मुले मोडीत निघाले.

रफीबद्दल लिहिलेय ते अचुक आहे. एकाच चित्रपटात कॉमेडियनलाही तोच आवाज व नायकालाही तोच पण दोन्ही आवाज किती वेगळे.. खरेच ग्रेट आर्टिस्ट होता रफी.

सोनूचं 'मेरे ढोलना'. होक्कुशपोक्कुश तर कार्तिक आर्यनला सूट पण झालं आहे व्यवस्थित.>>>गंमत म्हणजे कार्तिक आर्यांनच्याच भुलभुलैया 2 मध्ये मेरे ढोलना अर्जित ने गायलंय आणि चित्रपटात कार्तिक ला तेही सूट झालंय शेवटी ती त्या गाण्याची जादू आहे असच म्हणावं लागेल.

आवडीचा विषय Happy
'तनहाई' पार्श्वभूमीवर वाजतं, आमिर खान ते पडद्यावर गात नाही, त्यामुळे ऑड वाटत नसावं.
होक्कुश पोक्कुश हे गाणं माहिती नव्हतं. ही आभा हन्जुराच्या हुक्कुस बुक्कुसची कॉपी आहे ना? Uhoh क्रेडिट्समधे तिचं नाव का नाही ?

भुलभुलैया ३ मधलं 'होक्कुशपोक्कुश' >> हे असं गाणं आहे?
आमीर खान ला बऱ्याच गाजलेल्या रोमँटिक गाण्यांसाठी उदित नारायण, सोनू निगम यांचे आवाज आहेत, पण विशेष म्हणणे त्याची कुमार सानू च्या आवाजातली गाणी पण गाजली आहेत.