विमसं२०२५ मध्ये पुस्तक आदान-प्रदान

Submitted by Abuva on 2 February, 2025 - 07:01

विश्व मराठी संमेलन २०२५ फर्ग्युसन कॉलेजच्या क्रीडांगणावर चालू आहे. आज रवि २ फेब्रुवारी रोजी इथल्या पुस्तक प्रदर्शनाअंतर्गत पै लायब्ररी डोंबिवली आयोजित पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमास भेट देऊन आलो.
कल्पना चांगली वाटली. एक पुस्तक द्या, एक पुस्तक घ्या. वर दहा रुपये प्रती पुस्तक हे नाममात्र शुल्क.
कालच कुठली पुस्तकं द्यावीत यावर थोडा विचार केला होता.

नवाला घर सोडले. साडेनवाला कॉलेजमध्ये धडकलो. गर्दी मामुली होती. म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या तुलनेत किरकोळच! कदाचित सकाळी लवकरची वेळ होती म्हणून असेल. रच्याकने, अभंगवाणी कार्यक्रमाचीही जाहिरात वाचली होती. तोही पदरात पाडावा ही इच्छा होती.

पुस्तक प्रदर्शनात शिरलो. अंदाजाप्रमाणे तंबूच्या दुसऱ्या टोकाला हा पुस्तक देणे-घेणे सोहोळा होता.

प्रदान अशी‌ पाटी वाचून तिकडे वळलो. प्रदान म्हणजे देणे, नाही का? नाही हो, पण तुम्ही पुस्तक देणार, म्हणजे आम्ही पुस्तक घेणार म्हणून आदान... बरं, तसं! आदानाच्या दिशेला गेलो!
तिथे पुस्तकं घेतली गेली. एक पावती फाडली गेली. झटकन काम झालं.

५०,००० पुस्तकांची जाहिरात होती. नसावीत, असा आपला माझा अंदाज. तशी होती बरीच. बरी होती.
म्हणजे बहुतांश ठीकच होती. देणाऱ्यांनी पुणेरी बाण्याला जागून जरा हातचं राखून पुस्तकं दिली असावीत! सर्वसाधारणपणे अध्यात्म, पौराणिक अशा विषयांवरची लय पुस्तकं लोकांनी दिली होती.
अनेकांना स्वतःचे जीवन‌ पुस्तक स्वरूपात मांडायला आवडते हे जाणवले. अर्थात त्याची पत्रास लोकं फार काळ बाळगत नाहीत हेही जाणवलं.
अनेक हौशी कवींची हौस तिथे विराजमान होती.
मानसशास्त्र हा असाच लोकप्रिय तरीही टाकाऊ विषय वाटला.
पहिल्या श्रेणीच्या लेखकांच्या पुस्तकांची वानवा जाणवली. फारश्या कादंबऱ्या दिसल्या नाहीत. कथासंग्रहही नव्हते.
वेगळं म्हणजे, कुणी तरी महाभारताचे सगळे भाग आणून दिले होते. एक चित्र डोळ्यासमोर नको म्हटलं तरी आलं: एका पिढीनं हौसेनं विकत घेतलेली पुस्तकं, पुढच्या पिढीनं रद्दीत काढली असावीत!
थोडक्यात नको असलेली‌ पुस्तकं तिथे होती. यांना आपलं म्हणा!

कौतुकाची गोष्ट म्हणजे मी दिलेली पुस्तकं साधारणतः दहा मिनिटात टेबलांवर मांडली गेली होती!

खरं हा उपक्रम चांगला आहे. त्याला फेकाऊ, टाकावू, नाकारलेली पुस्तकं असा टिळा लागू नये असं मला मनापासून वाटतं. तर उपयुक्तता संपलेली पुस्तकं असावीत. मी तरी हाच विचार करून, माझ्याकडे डुप्लिकेट झालेली, पण चांगल्या लेखकांची, म्हणजे जी.ए., सदानंद देशमुख, रॉय किणीकर अशा लेखकांची पुस्तकं दिली. एक पुस्तक माझ्या कोकणातल्या प्रदेशाच्या मुशाफिरीवरती होतं, ज्याच्या मी मुद्दाम जादा प्रती विकत घेतल्या होत्या, ते दिलं.

मात्र जर मी तिथून उचललेल्या पुस्तकांची यादी बघाल तर अगदीच गयं-गुजरं कलेक्शन नव्हतं हे तुमच्याही लक्षात येईल. तिथून घेतलेल्या पुस्तकांत कमल देसाई, चिंतामणराव कोल्हटकर, प्रकाश नारायण संत असे लेखक आहेत.

तोपर्यंत शेजारच्या मांडवातून अभंगवाणीचे स्वर खुणावायला लागले होते!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults