दुर्मिळ आजारांचा प्रादेशिक उद्रेक ( १. GBS)

Submitted by कुमार१ on 24 January, 2025 - 06:26

शेवटचे अद्यतन : १०/२/ २०२५
. . .
गेल्या चार वर्षात (भारतासहित) जगभरात अनेक संसर्गजन्य रोगांच्या साथी येऊन गेल्या. त्या अनुषंगाने संबंधित जिवाणू अथवा विषाणूजन्य आजारांवर स्वतंत्र लेखांतून चर्चा झालेली आहे. प्रस्तुत धागा काढण्याचा उद्देश मात्र वेगळा आहे.
आयुष्यात असंख्य प्रकारच्या आजारांचा सामना आपल्याला व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर करावा लागतो. जे आजार मोठ्या प्रमाणात आढळतात त्यांच्यासंबंधी विविध माध्यमांतून जनजागृती वारंवार होतच असते. परंतु जे आजार मुळात दुर्मिळ किंवा अतिदुर्मिळ असतात त्यांच्याबद्दल जनसामान्यांना एरवी माहिती नसते.

कधीतरी अचानक जगाच्या एखाद्या मर्यादित प्रदेशात (गाव, शहराचा भाग) काही आजारांचा अचानक प्रादुर्भाव होतो आणि त्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. असे झाले की संबंधित भागातील आरोग्य यंत्रणाना खडबडून जागे व्हावे लागते तसेच नागरिकांनाही सतर्क राहावे लागते. या प्रकारच्या दुर्मिळ आजारांचा जेव्हा केव्हा जगात कुठेही उद्रेक होईल त्यासंबंधी टिपणी करण्यासाठी हा धागा उघडून ठेवत आहे. इथे प्रसंगानुरूप प्रतिसादांमधून कोणीही भर घालू शकता.

या निमित्ताने अलीकडेच पुण्यामध्ये अचानक उद्रेक झालेल्या Guillain-Barré syndrome (GBS) या आजाराची थोडक्यात माहिती लिहून ठेवतो.
आजाराची ठळक वैशिष्ट्ये :

१. हा ऑटो इम्युन प्रकारातील आजार असून त्यामध्ये बाधिताच्या चेतासंस्थेवर परिणाम होतो.

२. साधारणपणे दरवर्षी एक लाख लोकसंख्येमागे एखादा रुग्ण असे या आजाराचे सरासरी प्रमाण अत्यल्प आहे.

३. तो अधिकतर पन्नाशी ओलांडलेल्या लोकांमध्ये आढळतो.

४. त्याचे नक्की कारण अद्याप अज्ञात आहे परंतु आतापर्यंत समजलेली कारणमीमांसा पुढील मुद्द्यामध्ये येईल.

५. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट जिवाणू अथवा विषाणूंचा संसर्ग होतो. त्यातून पचनसंस्था किंवा श्वसनसंस्थेत बिघाड होतो. हा बिघाड त्या संस्थांपुरता मर्यादित न राहता त्यातून ऑटोइम्युन प्रकारची हानिकारक प्रक्रिया होते. त्यातूनच चेतासंस्थेच्या विशिष्ट भागाला (peripheral nervous system) इजा होते.

६. अशा प्रकारे या आजारास कारणीभूत ठरणारे रोगजंतू या प्रकारचे आहेत :
Campylobacter jejuni, Norovirus, COVID-19 विषाणू , Zika, cytomegalovirus, or Epstein-Barr virus.

७. काही वेळेस रुग्णावरील शस्त्रक्रिया किंवा काही लसीकरणानंतर हा आजार झालेला आढळला आहे.

रुग्णाची प्रमुख लक्षणे :

  • खूप अशक्तपणा येणे, चालताना किंवा जिने चढताना पाय अडखळणे,
  • विचित्र प्रकारच्या संवेदनांचे भास होणे - जसे काही त्वचेखाली किडे वळवळणे, स्नायूदुखी.
  • आजाराचे स्वरूप तीव्र झाल्यास डोळ्याच्या स्नायूवरही परिणाम होतो तसेच चघळणे, गिळणे आणि बोलणे या क्रियाही बिघडू शकतात. काही रुग्णांमध्ये नाडीचे ठोके आणि रक्तदाब बिघडतात. तर अन्य काहींमध्ये आजार तीव्र होऊन श्वसन दौर्बल्य आणि पॅरालिसीस सुद्धा होऊ शकते.
    बहुतेक रुग्ण उपचार घेतल्यानंतर कमीअधिक कालावधीनंतर पूर्ववत होतात.

रोगनिदान हे विशिष्ट तज्ञांकडून केले जाते. त्यासाठी चेतासंस्थेच्या शारीरिक तपासणी बरोबरच काही विशिष्ट चेताचाचण्या, पाठीच्या मणक्यातील द्रव तपासणे आणि एमआरआय इत्यादींचा गरजेनुसार वापर केला जातो.

उपचार : सध्या तरी या आजाराला बरा करणारा रामबाण उपाय सापडलेला नाही. जे उपाय उपलब्ध आहेत त्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते आणि रुग्णाची रिकवरी लवकर होऊ शकते. अशा उपचारांमध्ये प्रामुख्याने यांचा समावेश आहे :

  1. Plasma exchange : यामध्ये शरीरातील दूषित रक्त काही प्रमाणात काढून टाकून त्या जागी थोडा निरोगी रक्तद्रव भरला जातो.
  2. इंजेक्शनद्वारा immunoglobulinचे उपचार

पुण्यातील सद्यपरिस्थिती ( २७/१ )

  • आतापर्यंत ११० जणांना बाधा. त्यातील बहुतेक जण पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील आहेत
  • . 73 पुरुष व 37 स्त्रिया. त्यापैकी 13 जणांना व्हेंटिलेटरचे उपचार

  • त्यापैकी काहींना Norovirus तर काहींना Campylobacter jejuni ची बाधा झालेली होती. या जंतूंचा प्रसार दूषित अन्न अथवा पाण्यामार्फत होतो.
  • संबंधित रुग्णांवर योग्य ते उपचार चालू आहेत. सर्वसामान्यांनी वृत्तपत्र/ माध्यमांतील ठळक/भडक बातम्या पाहून घाबरायचे काहीच कारण नाही असे पुण्याच्या न्यूरोलॉजिकल सोसायटीने जाहीर केले आहे. फक्त दूषित अन्न अथवा पाण्याचा संपर्क न येण्याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे.

* या आजारावरील उपचार महाग असल्यामुळे पुणे महापालिकेने ‘शहरी गरीब योजने’अंतर्गत रुग्णांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
* राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन लवकरच मार्गदर्शक सूचना तयार करीत आहे- इति राज्य आरोग्यमंत्री

*************************************************************************************************************
संदर्भ :
१. https://www.ninds.nih.gov/health-information/disorders/guillain-barre-sy...

२. https://www.indiatoday.in/health/story/norovirus-campylobacter-bacteria-...

३. वैद्यकीय पाठ्यपुस्तके
* * * * * * *
3/2/2025
पुण्यातील रुग्णांच्या बाबतीत जिवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर प्रतिकारशक्तीमध्ये कोणता बदल झाला असावा की ज्यामुळे जीबीएस उद्भवला, याचा आता शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी 63 रुग्णांचे नमुने काही विशिष्ट अँटीबॉडीज तपासण्यासाठी बंगळुरू येथील NIMHANS कडे पाठवलेत.
पुणे अद्यतन :
खात्रीशीर निदान झालेले रुग्ण 127; त्यापैकी 27 अतिदक्षता विभागात तर 16 व्हेंटिलेटरवर.
27 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
. . .
१०/२/ २०२५
* पुण्यातील ५५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष.
* साथरोग नियंत्रण कायदा प्रभावी होण्यासाठी येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विधेयक मांडणार.
......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर.
एखाद्या नेहमी आढळणाऱ्या संसर्गजन्य (किंवा अन्य) आजाराच्या बाबतीत 67 हा आकडा मोठा नाही परंतु जीबी सिंड्रोम आढळण्याचे जागतिक सरासरी प्रमाण दर एक लाख लोकसंख्येमागे दरवर्षी एक ते दोन रुग्ण असे आहे. त्यामुळे एका शहरातील एका भागात एकदम एवढी संख्या झाल्याने तो लक्ष्यवेधी विषय ठरला आहे.

पुण्यात ब-याच ठिकाणी टॅंकरणे पाणीपुरवठा आहे. पिण्याचे पाणी महानगरपालिकेचे पण इतर वापरासाठी टॅंकर. त्याच पाण्यात , तोंड धुणे, आंघोळ, धुणीभांडी आणि हेच समस्येचं मुळ असावं.
अलीकडेच एका ठिकाणी हे पाणी वापरण्यासाठी योग्य नाही म्हणून सप्लायरला पकडले.

चांगला धागा.
नुकतेच महाराष्ट्रातील एका गावात लोकांचे केस अचानक गळून टक्कल पडायला लागले होते.

केस अचानक गळून टक्कल पडायला लागले होते.>> साधारण दोन आठवड्यापूर्वी बुलढाणा जिल्यातली ती बातमी होती.

डॉ. तात्याराव लहाने ह्यांनी तेथे भेट पण दिली होती.

ताज्या बातमीनुसार पुण्यातील जीबीएस रुग्णांचा आकडा 73 ( चार दिवसात तिप्पट झाला आहे).
यामध्ये एक वर्ष वयाच्या आतील एका बालकाचाही समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाचे पथक स्थानिक डॉक्टरांच्या मदतीसाठी येणार आहे :
https://economictimes.indiatimes.com/news/india/pune-73-cases-of-guillai...

छान माहिती. याची बातमी ऐकली नव्हती.
वर प्रतिसादात आलेली टक्कल पडणाऱ्या गावाची बातमी वाचली होती. पण त्यावर लोकं हसत होते. त्यामुळे खरे खोटे कळायला मार्ग नव्हता.

* टक्कल पडणाऱ्या गावाची बातमी >> होय, तीच वाचत होतो Happy
टक्कलवाली बातमी खरी असून त्याचा ICMR and AIIMSतर्फे अधिक अभ्यास चालू आहे.
https://www.thehindu.com/news/national/maharashtra/icmr-and-aiims-collec....

टक्कल पडणाऱ्या आजाराचे नाव : anagen effluvium

शास्त्रीय माहिती : https://dermnetnz.org/topics/anagen-effluvium#:~:text=What%20is%20anagen...?

महत्त्वाची कारणे :

  • जंतुसंसर्ग
  • औषधांचा दुष्परिणाम व विविध टॉक्सिन्सचा परिणाम. यात केमोथेरपी सुद्धा आली.
  • रेडिओथेरपी
  • ऑटोइम्युन प्रक्रिया

माहितीपूर्ण आणि सावध करणारा लेख.
ह्या अवकाळी टक्कलाजाराचा वयोपरत्वे पडणाऱ्या टाकलाशी काही संबंध असतो का?

सर्वांना धन्यवाद !
. . .
* अवकाळी टक्कलाजाराचा वयोपरत्वे पडणाऱ्या टकलाशी काही संबंध >>> नाही.
नाही. दोन्हींची कारणे भिन्न आहेत.
अवकाळी प्रकारात केसमुळाला कुठल्यातरी घातक द्रव्यामुळे झालेली इजा कारणीभूत आहे.

तर वयोपरत्वे पडणारे टक्कल शरीरधर्माशी संबंधित आहे. वयोपरत्वे केसमुळे ( follicles) ‘वाढ’ या प्रक्रियेपासून दूर जाऊन ‘विश्रांती’/स्थित प्रक्रियेकडे जातात त्याचा तो परिणाम असतो. त्याचबरोबर स्त्री-पुरुष हार्मोन भेद, जनुकीय घटक आणि अन्य अनेक घटकांचाही त्यावर परिणाम होत असतो.

वरील रुग्णाच्या मृत्यूच्या कारणाबाबत खातरजमा होणे आवश्यक वाटते.

पुण्यातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 101

https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/guillain-ba...
...
सात जणांचे केंद्रीय आरोग्य पथक पुण्यात दाखल.

पुण्यातले जीबीएस चे 80 टक्के रुग्ण सिंहगड रस्ता, किरकटवाडी आणि नांदेड सिटी परिसरातील आहेत. त्यातील बहुतांश जणांना दूषित पाण्यामुळे त्रास झाला आणि तीन जणांना पाणीपुरीच्या पाण्यामुळे त्रास झाल्याचा खुलासा महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने केलेला आहे.

या ठिकाणांचे पाण्याचे नमुने तपासले जात आहेत.

AIMS Neurologist on instagram....
Stop eating outside food. Do not eat long stading food such as panneer because, chances of developing bacteria is high in such food items... थोडक्यात ताजं, गरमागरम घरचं खा.

* ताजं, गरमागरम खा. >>> +११
. . .

पुण्यातील बदलत्या परिस्थितीनुसार धागा-अद्यतन करीत आहे.

ताजे खाणे विषयी एक शंका -
रेडी टू इट , प्रोसेस्ड किंवा कॅन केलेलं अन्न ( एक्सपायरी डेटच्या आधी ) खाणं आणि पनीर सारखे प्रॉडक्ट्स डी मार्ट किंवा जवळच्या डेअरीमधून आणलेले नीट शिजवून खाणे ह्यात फरक पडतो का की एकच नियम लागू होईल ? म्हणजे पनीर कच्चे खाल्ल्याने एखादी बाधा होऊ शकते ते नीट तापमानाला शिजवलेले पनीर विविध रेसिपी द्वारे जसे की कबाब, टिक्का किंवा पालक पनीर , पनीर भुर्जी स्वरूपात खाल्ले तर ताजे खाल्ल्यासारखे असेल ?

वरील प्रश्नासाठी मायबोलीकर निवांत पाटील, जे यातले अभ्यासक आहेत त्यांच्याशी संपर्क केला आहे.
ते उद्या शास्त्रशुद्ध उत्तर देतील.

म्हणजे पनीर कच्चे खाल्ल्याने एखादी बाधा होऊ शकते ते नीट तापमानाला शिजवलेले पनीर विविध रेसिपी द्वारे जसे की कबाब, टिक्का किंवा पालक पनीर , पनीर भुर्जी स्वरूपात खाल्ले तर ताजे खाल्ल्यासारखे असेल ?>>>>

कच्चे पनीर खाणे : यात निर्जंतुक करून पॅक केलेले आणि उघड्यावर ठेवलेले असे २ मुख्य प्रकार म्हणता येतील. जे पनीर तयार करताना कुठेही जिवाणूंचा संपर्क येणार नाही अशीही खबरदारी घेतलेली असते , आणि तयार झालेले पनीर आपल्या हातात येई पर्यंत पॅकिंग मध्ये असते असे पनीर कच्चे खाल्ले तरी चालते. पण बाजारात , शक्यतो डेअरी मध्ये कापून दिले गेलेले पनीर, किंवा असे लूज पनीर जे सध्या पॅकिंग मध्ये विकले जाते असे पनीर , शिजवून खाल्लेले सुरक्षित असेल.
आपल्याकडे जे पनीर लूज मिळते त्याचे अर्थशास्त्र खूपच वेगळे आहे. कोणतेही पनीर तयार करताना दूध हे गरम करून घेतले जाते, त्यामुळे तेथे जिवाणू अथवा जंतू संसर्ग नसतो. पण जेंव्हा हे दूध फाडले जाते त्यानंतर एका कपड्यात ठेऊन त्यावर वजन ठेवले जाते, हे कपडे जर निर्जंतुक केलेले नसतील तर त्या कपड्यावर जिवाणूंचा कुंभ मेळा भरलेला असतो. या स्टेज ला जर जिवाणूंचे संक्रम झाले नाही , तर याच्या पुढची स्टेप म्हणजे हे पन्नेर चे गट्ठे ४ C च्या पाण्यात कुरिंग ला ठेवले जातात, यात तापमान कमी असल्यामुळे जिवाणूंची वाढ कमी होत असते, पण स्वस्त मिळणार बर्फ यात डायरेक्ट टाकला असेल तर येथे पनीर मध्ये जिवाणू संसर्ग होतो. यानंतर पनीर प्लास्टिक च्या बॅग मध्ये पॅक होऊन ट्रांस्पोर्ट साठी निघते, लूज मिळणारे पनीर हे कोल्ड बॉक्स मध्ये थोडा बर्फ घालून ट्रान्सपोर्ट ला टाकले जाते आणि १०-१२ तास प्रवास करून डिस्ट्रिब्युटर कडे आणि नंतर रिटेल विकणाऱ्याकडे पोहोच होते. या दरम्यान कोल्ड चेन ब्रेक झाली तर जिवाणूंची संख्या खूप वाढते. आणि त्यामुळे हे कच्चे खाल्ले तर घशाचे / पोटाचे इन्फेक्शन नक्की होते.
पनीर शक्यतो ग्रेव्ही बनली कि वरून टाकले जाते, त्यात ते आतून बाहेरून पूर्ण शिजत नाही / निर्जंतुक होत नाही. जेंव्हा आपण त्याचे कबाब / तंदूर करतो तेंव्हाही ते पूर्ण पणे शिजेल याची गॅरंटी नसते, अश्या वेळी ब्रान्डेन कंपनीचे पनीर वापरणे शहाणपणाचे ठरेल. काही लोकांचे नाक बऱ्यापैकी असे संसर्ग फक्त वास घेऊन ओळखू शकते. Happy

हीच गोष्ट श्रीखंडालाही लागू होते, घराच्या घरी दही बांधून ठेवलेल्या फडक्याचा दुसऱ्या दिवशी कसा वास येतो , आणि त्याला निर्जंतुक केले ( कुकर मध्ये किंवा हायपो च्या द्रावणामध्ये ) तर तो वास कसा जातो , याचे प्रात्यक्षिक करून बघता येईल.

लॉन्ग स्टोरी शॉर्ट : आपल्या पोटात जे जाणार आहे त्याचा प्रवास कसा झाला असेल, त्याचा विचार करून काय खावे आणि काय नको हे ठरवता येते. पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप्स या काही वेळा अगदी गटारातून गेलेल्या असतात, अश्या पाईप जेंव्हा फुटतात, तेंव्हा पाणी पुरवठा बंद असताना घाण पाणी या पाईप मध्ये जाते आणि पाणीपुरवठा सुरु झाला कि त्यात मिसळून पुढे जाते. काही लोकांच्या फ्रिज मध्ये वेगवेगळ्या प्रकारांच्या जिवाणूंची जत्रा कायम भरलेली असते, भले तापमान कमी असल्यामुळे त्यांची संख्या वाढायचा वेग कमी असतो, पण जेंव्हा संधी मिळते तेंव्हा ते बेसुमार वाढतात आणि आजारपणाला कारणीभूत ठरतात.

नि पा
उत्तम स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद !

रेडी टू इट , प्रोसेस्ड किंवा कॅन केलेलं अन्न ( एक्सपायरी डेटच्या आधी ) खाणं >>> हे सगळे पदार्थ निर्जंतुक करून पॅक केलेले असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम येता कामा नये, पण कधीतरी चॉकलेट मध्ये अळ्या, कोल्ड्रिंक मध्ये पाल , झुरळ असल्या बातम्या बघून FDA / FSSAI या सगळ्या अंधश्रद्धा वाटू लागतात आणि आपण आपल्या पोटात चुकीचे काही जाऊ नये याची फक्त प्रार्थना करू शकतो Sad

Pages