बिटकॉइन, क्रिप्टो, ब्लॉकचेन.. वगैरे वगैरे म्हणजे रे काय भाऊ ... ?

Submitted by छन्दिफन्दि on 21 January, 2025 - 15:07

चार डिसेम्बरला जगभरातील क्रिप्टोचाहत्यांमध्ये उत्साहाची मोठी लाट उसळली, त्याला कारणही खासच होतं, गेले काही वर्ष क्रिप्टोतज्ञ जे भाकीत करत होते ते प्रत्यक्षात झालं होतं, पहिल्यांदाच एका बिटकॉइनची किंमत शंभर हजार (एक लाख) अमेरिकन डॉलर्सच्यावर गेली होती. कदाचित म्हणूनही बिटकॉइनला डिजिटल सोनं म्हणत असावेत का ? गेल्या दशकभरातला “बिटकॉईन म्हणजे एक निव्वळ बुडबुडा आहे.. “ इथपासून ते “ हे तर डिजिटल सोनंच.. ” हा प्रवास अक्षरश: खाचखळगे, शिखरे, दऱ्या, ह्यातून गेलेला आहे.

२००८ मध्ये साटोशी नाकामोटो ह्यांनी ‘ब्लॉकचेन’ ही संकल्पना आणि ‘बिटकॉईन’ हे जगातील पहिले डिजिटल चलन जगासमोर आणले.
हे चलन वापरून जो पहिला व्यवहार झाला तो म्हणजे, १०,००० बिटकॉईन्स देऊन २ पिझ्झा विकत घेतले गेले. २०१० मध्ये एका बिटकॉइनची किंमत ०.०१ डॉलर्स इतकी होती. म्हणजे आतापर्यंत किती गुणे वाढली ह्याचं गणित मी तुमच्यावर सोडून देते :).

त्यानंतर हळूहळू बिटकॉईनला औद्योगिक, आर्थिक क्षेत्रात मान्यता मिळू लागली. तसतशी मूळ बिटकॉईन ब्लॉकचेनवर आधारित अनेकानेक अल्टकॉइन्स ( अल्टरनेटीव्ह कॉईन्स) विकसित होऊ लागली.

२०१४ मध्ये व्हुटालिक बुटरींन (Vitalik Buterin) नामक युवकाने इथिरियम (Etherium), ही सध्या द्वितीय क्रमांकावर असलेली ब्लॉकचेन विकसित केली. त्यातील ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ ह्या विवक्षित सुविधेमुळे ब्लॉकचेन फक्त डिजिटल चलन / क्रिप्टोकरन्सी म्हणून स्तिमित राहिले नाही तर शासकीय, सामाजिक, तांत्रिक अशा अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य त्यात आलं.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे असे डिजिटल चलन जे कोणी एखाद सरकार किंवा बँक नियंत्रित करत नाही, तर ते पूर्णपणे विकेंद्रित ( Decentralized, केंद्रित नसलेले ), अपरिवर्तनीय (immutable, बदलता येणार नाही असे ), संमतीप्राप्त (consensus) असते. ह्या चलनाद्वारे केलेल्या व्यवहारांची (किंवा खात्यांची माहिती) नोंदणी जिथे केली जाते ते म्हणजे ‘ब्लॉक’.
एक ब्लॉक व्यवहार नोंदणी करून भरला की त्याला नवीन ब्लॉक तयार करून जोडला जातो, त्यात नवीन व्यवहार नोंदवले जातात आणि हे अविरत चालू रहाते.
ही ब्लॉकची साखळी तयार होते ती म्हणजे ब्लॉकचेन.
हे सगळे व्यवहार वेळ आणि तारखेसह नोंदवले असतात, त्यांना ठराविक संख्येपेक्षा जास्त सदस्यांची मान्यता / विश्वासार्हता मिळालेली असते, तसेच एकदा तो ब्लॉक तयार होऊन मूळ साखळीला जोडला गेला’ की त्यात कोणताही बदल करता येत नाही किंवा तो व्यवहार खोडता येत नाही.

#####
उदाहरणार्थ:

तुम्ही जे व्यवहार करताय ते एका वहीत लिहिले जातायत , प्रत्येक व्यवहार हा फक्त शेवटाला जोडता येतो ( append only - म्हणजे आधीचा एकही व्यवहार खोडता किंवा बदलता येत नाही, दोन व्यवहारांच्या मध्येच तिसरा व्यवहार लिहिता येत नाही)

ही भरली की दुसऱ्या वहीत व्यवहार नोंदविणे सुरू होते, त्याला दुसरी वही भरली की ती पहिल्या वहिला जोडली जातेय... हे असच चालू राहते

ह्या वहीतले सर्व व्यवहार एका संमत चलनात होतायत ( जसं Bitcoin )

वह्याची नोंदणी फक्त एका केंद्रात नसून ती अनेक लोकांकडे आहे आणि ते सर्व व्यवहार त्या साखळीतील सर्व लोकांना मंजूर आणि मान्यताप्राप्त आहेत.
#####

ह्या सारख्या वैशिष्ट्यांमुळे त्यात पारदर्शकता साध्य करता येते. ही माहिती, व्यवहार हे कोणा एका विशिष्ट संगणकावर किंवा केंद्रावर साठवले जात नसून ते जगातील हजारो लाखो संगणकांवर साठवलेले असतात किंवा उपलब्ध असतात.
बँकिंगसारखे, क्रिप्टोकरन्सी मध्ये कोणीही मध्यवर्ती कार्यरत नसल्यामुळे एकंदरच पायाभूत सुविधांचा, प्रशासनाचा खर्च टाळता येऊ शकतो तसेच विकेंद्रीकरण झाल्यामुळे आर्थिक घोटाळ्यांनाही आळा बसू शकतो. त्याबरोबरच क्रिप्टोकरन्सीच्या रूपात एक वैश्विक चलन उपलब्ध होऊ शकते. आजच्या घडीला अडीचशेहून अधिक कंपन्या आपली उत्पादने क्रिप्टोकरन्सी चलनात विकायल सज्ज आहेत. भारतातील सद्यस्थिती म्हणजे तुम्ही कायद्याने ही कॉइन्स खरेदी किंवा विकू शकता. सरकारने २०२२ मध्ये Digital Rupee (e₹) हे भारतीय रुपयाशी सलग्न डिजिटल चलन आणले. तसेच ब्लॉकचेन डेव्हलपमेंट करता एक स्वतंत्र केंद्र प्रस्थापित केले आहे.

इथेरियमच्या उदयाबरोबरच जे ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ आले त्याने तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांचे आयुष्यही काहीसे अधिक सोपे होऊ शकते. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे खर तर एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम, त्यात दोन्ही बाजूच्या अटी, त्याचे परिणाम त्यात लिहिलेले असतात आणि जेव्हा एखादी अट पाळली जात नाही त्या वेळी त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरल्याप्रमाणे बाकी गोष्टी आपोआप सुरळीत होतात.
उदाहरणार्थ, तुम्ही विमानाचे तिकीट काढताना विमा घेतलात. तुम्ही आणि त्या विमान विमा कंपनीने स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट केले आहे, त्यात जर तुमचे विमान अर्धा तास उशिरा निघाले तर तुम्हाला ठराविक रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळेल असे कलम आहे. जर तुमचे विमान खरोखरच जरी ३० मिनिट किंवा त्याहून जास्त उशिरा सुटले तर आपसूकच बॅकग्राउंडला ते स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट सक्रिय होऊन, तुमच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल. म्हणजे फोनाफोनी, ताटकाळण काही काही नाही. अर्थात हे खूपच साधंसं उदाहरण झालं.

पण भविष्यात शासकीय ओळखपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, वैद्यकीय माहिती, औषधांची प्रमाणपत्रे, घरांची कागदपत्रे, व्यवहार यांसाठी ब्लॉकचेनचा वापर करून भ्रष्टाचाराला निर्बंध घालता येईल, विलंब टाळता येईल, कामकाज अधिक सुरळीत आणि नियमित व्हायला मदत होऊ शकेल, डिजिटल साहित्य, कला, नाटक, कला निर्माण करणार्यांचे हक्क जपण्यास मदत होईल.

अर्थात ही काही जादूची छडी नाही की जी फिरवली आणि सगळं छान झालं. हे तंत्रज्ञान अजून विकसित होत आहे, कदाचित त्यात काही त्रुटीही आहेत. पण जगभरातील क्रिप्टोप्रेमी समूह, क्रिप्टोतज्ञ त्यावर काम करत आहेत आणि हा समुदाय दिवसोंदिवस वाढतोच आहे.

मूळ लेख इकडे यत्र तत्र तंत्र

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.maayboli.com/node/84599
मागे ह्या लेखात मी मराठीत तांत्रिक माहिती लिहहीण्याविषयी काही प्रश्न विचारले होते. त्यावेळी माबो वाचक, मानव पृथ्वीकर, आणि शर्मिला ह्यांनी प्रोत्साहन प्रतिसाद दिले होते. तुम्हा तिघांचे मनापासून आभार..

माहिती पूर्ण लेख.
परंतु बिटकॉइनची किंमत कमी जास्त नक्की कशामुळे होते?
सप्लाय-डिमांड मुळे असे वाचनात आले. पण ते क्रिप्टो करन्सीला कसे लागु होते ते कळले नाही.

परंतु बिटकॉइनची किंमत कमी जास्त नक्की कशामुळे होते?
सप्लाय-डिमांड मुळे असे वाचनात आले.>>>हो ते एक कारण आहे,
महत्वाच्या घटना जसे रशिया युक्रेन युद्ध, किंवा नुकतीच घडलेली घटना की ट्रम्प ने जिंकल्यावर CRYPTO ला बळ देण्याची केलेली घोषणा यासारख्या घटना किमतीत खूप मोठे चढ इतर निर्माण करतात..

तसेच त्या Blockchain वर काही विशिष्ट घटना जसे एखादे merge / split होणार असेल तर त्याचाही किमतीवर परिणाम होतो.

शिवाय Bitcoins ची संख्या मर्यादित आहे ( डिजिटल गोल्ड ) .

MEME coins जसे शिबा इनु, डॉज - Elon musk Chua एखाद्या ट्विट वरही मोठे हेलकावे घेताना दिसून अलियेत.

त्याच्या volatility मुळेच त्याला अतिशय रिस्की ( अती जोखमीची) गुंतवणूक म्हणुंवघितले जाते.

हो त्याचा व्हिडिओ बघितला, ५ वर्षांपूर्वीचा ...त्यावेळी तो ९५ वर्षांचा होता.
वॉरेन बफे पण Bitcoin च्या विरोधात होते.

२०१७ -१८ किंवा त्या दरम्यान अनेक बँका , अर्थतज्ञ किंवा गर्भ श्रीमंत व्यक्ती ( billionaires) ह्याच्या विरोधात किंवा काहीतरी फॅड आहे अशा
विचारात/ समजुतीत होते.

२०००० - ४० ०००- ७०००० - १०० ००० ह्या एकेका किमतीवर जेव्हा Bitcoin पोहोचले तेव्हा तेव्हा एकेक विरोध बाजून जायला लागल्याचे दिसले आहे.

लोकसत्तेत एक वर्षभर ब्लॉकचेन तंत्राबद्दल माहिती देणारी एक लेखमाला आली होती. लेखक गौरव सोमवंशी. तुमचा लेख वाचून त्या मालिकेची उजळणी झाली. चांगले लिहिले आहे.

आत्ताच्या घडीला $१०१,६६३.७३ ला आहे १ बिटकॉईन. पण जाणकारांच्या मते, एका बिटकॉईनची किंमत अजून वर जाण्याचे चान्सेस आहेत.

याला कोणच रेग्युलेटर नसल्याने मी अजूनही साशंक आहे.>>> विकेंद्रीकरण हा गाभा असल्यामुळे त्याला लोकभावना( ते विशिष्ट crypto holders ) महत्वाची भूमिका बजावते.

तुझा लेख उत्तम ओळख आहे. आता जर काही शंका आल्या तर गुगल करते.
उदा -
>>>>>ही वह्याची नोंदणी फक्त एका केंद्रात नसून ती अनेक लोकांकडे आहे आणि ते सर्व व्यवहार त्या साखळीतील सर्व लोकांना मंजूर आणि मान्यताप्राप्त आहेत.
हे लोक कधी रिव्ह्यु करतात व मंजुरी देतात? वगैरे Happy

सामो,
ह्या लेखात तुला पुढची उत्तरे मिळतील..
अर्थात chatgpt किंवा गुगल आहेच.

पुढे जे लेख येतील त्यात अजून तपशील देण्याचा मानस आहे.

वाचते थँक्स.
मस्त गं मिडिअम वर लिहीतेस तू? Happy

परंतु बिटकॉइनची किंमत कमी जास्त नक्की कशामुळे होते? >>

निव्वळ speculation मुळे. अगदी ताजे उदाहरण. ट्रम्पच्या cryptocurrency ची किंमत २ आठवड्यापूर्वी $७ होती आणि मग $७३ झाली, आता $३४ झाली आहे. सगळी मजामजा.

What gets us into trouble is not what we don't know. It's what we know for sure that just ain't so. - Mark Twain

ट्रम्पच्या cryptocurrency ची किंमत २ आठवड्यापूर्वी $७ होती आणि मग $७३ झाली, आता $३४ झाली आहे. सगळी मजामजा>>>> ही ट्रम्प ची दुसऱ्या term ची नांदी आहे, असं म्हणता येईल..

Major holder २ कंपनी आहेत... एक ट्रम्प उद्योगाशी संबंधित आहे दुसरी चा मालक unknown आहे. Happy

पण मुद्दा खरा आहे की कोणीही उठून स्वतः चे चलन बनवू शकते ... पण तुमच्या coin ला तेव्हढा सपोर्ट हवा...

चलन हा एक उपयोग / ॲप्लिकेशन आहे Blockchain च...

####

मस्त गं मिडिअम वर लिहीतेस तू?>>> Happy _/\_