बिटकॉइन, क्रिप्टो, ब्लॉकचेन.. वगैरे वगैरे म्हणजे रे काय भाऊ ... ?

Submitted by छन्दिफन्दि on 20 January, 2025 - 22:20

चार डिसेम्बरला जगभरातील क्रिप्टोचाहत्यांमध्ये उत्साहाची मोठी लाट उसळली, त्याला कारणही खासच होतं, गेले काही वर्ष क्रिप्टोतज्ञ जे भाकीत करत होते ते प्रत्यक्षात उतरलं, पहिल्यांदाच एका बिटकॉइनची किंमत शंभर हजार (एक लाख) अमेरिकन डॉलर्सच्यावर गेली होती. कदाचित म्हणूनही बिटकॉइनला डिजिटल सोनं म्हणत असावेत का ? गेल्या दशकभरातला “बिटकॉईन म्हणजे एक निव्वळ बुडबुडा आहे.. “ इथपासून ते “ हे तर डिजिटल सोनंच.. ” हा प्रवास अक्षरश: खाचखळगे, शिखरे, दऱ्या, ह्यातून गेलेला आहे.

२००८ मध्ये साटोशी नाकामोटो ह्यांनी ‘ब्लॉकचेन’ ही संकल्पना आणि ‘बिटकॉईन’ हे जगातील पहिले डिजिटल चलन जगासमोर आणले. हे चलन वापरून जो पहिला व्यवहार झाला तो म्हणजे, १०,००० बिटकॉईन्स देऊन २ पिझ्झा विकत घेतले गेले. २०१० मध्ये एका बिटकॉइनची किंमत ०.०१ डॉलर्स इतकी होती. म्हणजे आतापर्यंत किती गुणे वाढली ह्याचं गणित मी तुमच्यावर सोडून देते :).
हळूहळू बिटकॉईनला औद्योगिक, आर्थिक क्षेत्रात मान्यता मिळू लागली. तसतशी मूळ बिटकॉईन ब्लॉकचेनवर आधारित अनेकानेक अल्टकॉइन्स ( अल्टरनेटीव्ह कॉईन्स) विकसित होऊ लागली.
२०१४ मध्ये व्हुटालिक बुटरींन (Vitalik Buterin) नामक युवकाने एथिरियम (Etherium), ही सध्या द्वितीय क्रमांकावर असलेली ब्लॉकचेन विकसित केली. त्यातील ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ ह्या विवक्षित सुविधेमुळे ब्लॉकचेन फक्त डिजिटल चलन म्हणून स्तिमित राहिले नाही तर शासकीय, सामाजिक, तांत्रिक अशा अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य त्यात आलं.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे असे डिजिटल चलन जे कोणी एखाद सरकार किंवा बँक नियंत्रित करत नाही.
तर ते पूर्णपणे विकेंद्रित ( Decentralized, केंद्रित नसलेले ), अपरिवर्तनीय (immutable, बदलता येणार नाही असे ), संमतीप्राप्त (consensus) असते. ह्या चलनाद्वारे केलेल्या व्यवहारांची (किंवा खात्यांची माहिती) नोंदणी जिथे केली जाते ते म्हणजे ‘ब्लॉक’. एक ब्लॉक भरला की त्याला नवीन ब्लॉक तयार करून जोडला जातो, त्यात नवीन व्यवहार नोंदवले जातात आणि हे अविरत चालू रहाते. ही ब्लॉकची साखळी तयार होते ती म्हणजे ब्लॉकचेन. हे सगळे व्यवहार वेळ आणि तारखेसह नोंदवले असतात, त्यांना ठराविक संख्येपेक्षा जास्त सदस्यांची मान्यता / विश्वासार्हता मिळालेली असते, तसेच एकदा तो ब्लॉक तयार होऊन मूळ साखळीला जोडला गेला’ की त्यात कोणताही बदल करता येत नाही किंवा तो व्यवहार खोडता येत नाही. ह्या सारख्या वैशिष्ट्यांमुळे त्यात पारदर्शकता साध्य करता येते. ही माहिती, व्यवहार हे कोणा एका विशिष्ट संगणकावर किंवा केंद्रावर साठवले जात नसून ते जगातील हजारो लाखो संगणकांवर साठवलेले असतात किंवा उपलब्ध असतात.
बँकिंगसारखे, क्रिप्टोकरन्सी मध्ये कोणीही मध्यवर्ती कार्यरत नसल्यामुळे एकंदरच पायाभूत सुविधांचा, प्रशासनाचा खर्च टाळता येऊ शकतो तसेच विकेंद्रीकरण झाल्यामुळे आर्थिक घोटाळ्यांनाही आळा बसू शकतो. त्याबरोबरच क्रिप्टोकरन्सीच्या रूपात एक वैश्विक चलन उपलब्ध होऊ शकते. आजच्या घडीला अडीचशेहून अधिक कंपन्या आपली उत्पादने क्रिप्टोकरन्सी चलनात विकायल सज्ज आहेत. भारतातील सद्यस्थिती म्हणजे तुम्ही कायद्याने ही कॉइन्स खरेदी किंवा विकू शकता. सरकारने २०२२ मध्ये Digital Rupee (e₹) हे भारतीय रुपयाशी सलग्न डिजिटल चलन आणले. तसेच ब्लॉकचेन डेव्हलपमेंट करता एक स्वतंत्र केंद्र प्रस्थापित केले आहे.

इथेरियमच्या उदयाबरोबरच जे ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ आले त्याने तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांचे आयुष्यही काहीसे अधिक सोपे होऊ शकते. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे खर तर एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम, त्यात दोन्ही बाजूच्या अटी, त्याचे परिणाम त्यात लिहिलेले असतात आणि जेव्हा एखादी अट पाळली जात नाही त्या वेळी त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरल्याप्रमाणे बाकी गोष्टी आपोआप सुरळीत होतात. उदाहरणार्थ, तुम्ही विमानाचे तिकीट काढताना विमा घेतलात. तुम्ही आणि विमान त्या विमा कंपनीने स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट केले, त्यात जर तुमचे विमान अर्धा तास उशिरा निघाले तर तुम्हाला ठराविक रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळेल असे कलम आहे. जर तुमचे विमान खरोखरच जरी ३० मिनिट किंवा त्याहून जास्त उशिरा सुटले तर आपसूकच बॅकग्राउंडला ते स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट सक्रिय होऊन, तुमच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल. म्हणजे फोनाफोनी, ताटकाळण काही काही नाही. अर्थात हे खूपच साधंसं उदाहरण झालं.
पण भविष्यात शासकीय ओळखपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, वैद्यकीय माहिती, औषधांची प्रमाणपत्रे, घरांची कागदपत्रे, व्यवहार यांसाठी ब्लॉकचेनचा वापर करून भ्रष्टाचाराला निर्बंध घालता येईल, विलंब टाळता येईल, कामकाज अधिक सुरळीत आणि नियमित व्हायला मदत होऊ शकेल, डिजिटल साहित्य, कला, नाटक, कला निर्माण करणार्यांचे हक्क जपण्यास मदत होईल.

अर्थात ही काही जादूची छडी नाही की जी फिरवली आणि सगळं छान झालं. हे तंत्रज्ञान अजून विकसित होत आहे, कदाचित त्यात काही त्रुटीही आहेत. पण जगभरातील क्रिप्टोप्रेमी समूह, क्रिप्टोतज्ञ त्यावर काम करत आहेत आणि हा समुदाय दिवसोंदिवस वाढतोच आहे.

मूळ लेख इकडे यत्र तत्र तंत्र

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.maayboli.com/node/84599
मागे ह्या लेखात मी मराठीत तांत्रिक माहिती लिहिण्याविषयी काही प्रश्न विचारले होते. त्यावेळी माबो वाचक, मानव पृथ्वीकर, आणि शर्मिला ह्यांनी प्रोत्साहन प्रतिसाद दिले. तुम्हा तिघांचे मनापासून आभार..