पडक्या बंगल्यातील रात्र

Submitted by निमिष_सोनार on 16 January, 2025 - 10:16

विराज आणि त्याचे चार मित्र – अजय, रोहित, राजेश आणि तन्वी – एका लांब पावसाळी ट्रिपवर कारने निघाले होते. त्यांच्या प्रवासादरम्यान, रात्री अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. रस्ता पूर्णतः अंधारात आणि पावसात बुडाला होता. ते दुपारी जवळच्या शहरातून निघाले होते आणि रात्री दहा साडेदहा वाजेपर्यंत आपण सहज हील स्टेशनवर पोहोचू असे त्यांना वाटत होते, परंतु अनपेक्षितपणे आलेल्या त्या पावसाने त्यांचे अंदाज चुकीचे ठरवले आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले. त्यांची कार झटके देऊन एका आडमार्गावर बंद पडली. या मार्गावरून यापूर्वी ते कधी गेले नव्हते, परंतु या वेळेस शॉर्टकट म्हणून ते या छोट्या रस्त्याने निघाले होते. तशातच जोराचे वादळ सुरू झाले.

विराज आणि रोहित यांना गाडीच्या इंजिनची थोडीफार कल्पना होती त्यामुळे त्यांनी गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी दुरुस्त झाली नाही. शेवटी गाडीचे दरवाजे बंद करून आपापल्या सॅक घेऊन ते चालू लागले. चालत जाऊन पुढे त्यांना एक पडका बंगला दिसला. पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी त्या बंगल्यात रात्रभर थांबायचे ठरवले. विशेष म्हणजे एकाच्याही मोबाईलला सिग्नल येत नव्हता. सकाळपर्यंत बंगल्यात थांबून मग काहीतरी करता येणार होते.

पावसात गाडीचे सर्व दार बंद करून गाडीमध्ये झोपून राहणे हे सुद्धा तसे धोक्याचेच होते. कारण आजूबाजूला मोठमोठी झाडे होती. एखादे झाड गाडीवर पडले तर ते नुकसानकारक ठरणार होते. शेजारी पाजारी चौकशी करावी असे काही नव्हते कारण आजूबाजूला काही पडक्या झोपड्या दिसत होत्या परंतु तिथे कुणी राहत असेल याची शक्यता वाटत नव्हती.

बंगल्याकडे बघून खूप भकास वाटत होते. त्यातच मुसळीएवढ्या जाड थेंबांनी बनलेला तो जोराजोरात पडणारा पाऊस ते वातावरण आणखी गूढ करत होता. त्या बंगल्याच्या बाहेरच्या भागातील कोसळलेल्या भिंती, आणि झाडांनी गच्च झाकलेले छप्पर हे बघून त्या सर्वांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहिला नाही. बंगल्याच्या खिडक्यांचे दरवाजे वाऱ्यामुळे ताड ताड आपटत होते. दोघांनी आपल्या जवळची टॉर्च ऑन केली आणि अर्धवट उघड्या मुख्य भक्कम दरवाज्यातून बंगल्यात पाऊल टाकले. आतून थंडगार वाऱ्याची झुळूक आली.

आत शिरताच त्यांनी एक मोठा हॉल पाहिला, ज्याच्या भिंतींवर काळसर डाग आणि अस्पष्ट चित्रे होती. ती चित्रे बघून सर्वांच्या अंगावर काटा आला कारण त्या चित्रांच्या कॅनव्हासवर जणू भीतीचा अंध:कार उतरलेला होता. तिथे एकूण चार चित्रे लावलेली होती.

पहिल्या चित्रात बाईचा चेहरा होता, जिचे डोळे प्रचंड मोठे आणि पोकळ होते, जणू काळ्या खोल विहिरीसारखे. तिच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक स्मित होते आणि तिच्या डोक्यावरच्या गडद रंगाच्या केसांमध्ये हातांचा आकार दिसत होता, जणू कोणीतरी तिला ओढून नेत आहे.

त्यांना ते बघवले जात नव्हते परंतु त्यांची नजर जणू काही त्या चित्रांवरच आपोआप खिळली होती. ते सर्वजण त्या चित्रांवरून नजर बाजूला हटवूच शकत नव्हते!

दुसऱ्या चित्रात एका जुन्या खोलीचे दृश्य होते, ज्यात एक पलंग आहे, आणि त्या पलंगावर एक लहान मुलगी बसलेली आहे. ती फक्त पाठमोरी दिसते, पण तिच्या पाठीवर रक्ताचे हातांचे ठसे आहेत. आणि खोलीच्या एका कोपऱ्यात अस्पष्ट आणि विचित्र आकाराची धूसर छाया दिसते, जी हळूहळू तिच्या जवळ सरकत आहे असे दिसते.

तिसरे चित्र होते एका विशाल झाडाचे, ज्या झाडाला मानवी हात आणि चेहऱ्यांचा आकार आहे. झाडाच्या फांद्या जणू जिवंत असल्यासारख्या खाली वाकलेल्या आहेत, आणि त्या एका माणसाला पकडून गुदमरवत मारत आहेत. झाडाच्या खोडावर कोरलेले असंख्य डोळे पाहणाऱ्याला सतत नजरबंद करत असल्याची भावना देत होते.

पुढचे चित्र एका समुद्राचे होते, जो लालसर दिसत होता आणि त्या समुद्रातून हजारो हात उभे राहिले होते, जणू काही प्राण वाचवण्यासाठी ते हाक मारत आहेत. आकाश काळसर होते, आणि त्यात फक्त एकच काळा पक्षी दिसतो, जो खाली त्या समुद्रात बुडणाऱ्या हातांकडे एकटक बघतो आहे.

हॉलमधील प्रत्येक चित्र पाहणाऱ्याला ते जिवंत आहे असे वाटत होते. त्या चित्रांच्या भोवतीच एक थंड वारा फिरला, आणि काही वेळाने वाटू लागले की, त्या चित्रांतून काहीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.

"कोणी तरी एकेकाळी इथे राहिले असेल, बहुतेक एक दु:खी चित्रकार?", तन्वीने चित्राकडे बघत म्हटले.

त्या क्षणी एक भयंकर गोष्ट घडली – हॉलमधला टांगलेला झुंबर अचानक हालू लागला, जणू कुणीतरी अदृश्य हातांनी त्याला स्पर्श केला होता. सगळे एकमेकांकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होते. एक दोन वेळा तो झुंबर अग्नीच्या ज्वाळांनी पेटल्यासारखा दिसला आणि विझला.

"आपण इथे राहणं धोकादायक आहे," अजय घाबरलेल्या स्वरात म्हणाला. पण गडगडणाऱ्या विजेच्या आवाजात कुणी बाहेर पडण्याचं धाडस करू शकत नव्हतं.

तेवढ्यात रोहितला एका कोपऱ्यात जुना फुटलेल्या आरशाचा तुकडा दिसला. त्याने तो उचलला, पण त्याच क्षणी आरशात त्याला आपल्याशिवाय आणखी एक स्त्रीचा चेहरा दिसला – पांढऱ्या केसांची, रागाने लाल झालेल्या डोळ्यांची स्त्री! त्याने किंचाळून आरसा फेकून दिला. तो फुटला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. पण आश्चर्य म्हणजे खाली पडलेले तुकडे आपोआप फुटत होते आणि त्याच्या आणखी बारीक तुकडे तयार होत होते. पूर्ण चुरा होईपर्यंत ते तुकडे होतच होते.

सर्वजण तिथून पुढे निघाले आणि एका खोलीत आले. तिथे जुनाट फर्निचर होते. त्या सर्वांच्या येण्यामुळे ते फर्निचर जणू बिथरले आणि करर कर्र आवाज करत इकडे तिकडे सरकू लागले. समोरच्या आराम खुर्चीवर विराजला खिडकीतून आलेल्या विजेच्या प्रकाशात पांढऱ्या साडीत एक स्त्री बसलेली दिसली. तिचे डोळे खोल विहिरीसारखे गूढ होते. तसेच छतावर एक आकृती चिकटलेली होती जीच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते.

"आपण इथे थांबलो, तर मरू, चला बाहेर सर्वजण!" तो जोरात ओरडला आणि ते पुन्हा हॉल मध्ये आले, पण बंगल्याचा मुख्य दरवाजा आतून बंद झाला होता. बंगल्यातून बाहेर गेले तरी फारसा उपयोग होणार नव्हता. कारण बाहेर वादळ, वारे आणि पाऊस सुरू होता. बाहेर पडून ते कुठे जाणार होते?

त्यांना जाणवले की, हा बंगला एका रहस्यमय शक्तीने ग्रासलेला आहे. एका कोपऱ्यात एक जुनी डायरी पडलेली होती. ती हवेने फडफडत होती. तन्वीने ती उचलली आणि टॉर्चच्या उजेडात वाचायला सुरुवात केली. त्यातील प्रत्येक पानावर लाल अक्षराने लिहिलेले होते, "या बंगल्यात एकदा प्रवेश केलेला कुणीही बंगल्याबाहेर जिवंत जाऊ शकत नाही. जो इथे येतो, तो माझा होतो."

त्यांच्या आजूबाजूला सर्व बाजूंनी अचानक जोरजोरात पावलांच्या चालण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आवाज जवळ येत होता. सगळ्यांनी एकत्र बंगल्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही. दरवाजा बंद होता, तो उघडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. गडबडीत दोन्ही टॉर्च हातातून खाली पडल्या. काळा अंधार पसरला. बंगल्यात एक भयानक आरडाओरडा झाला आणि अंधारात एकेक जण गायब होत गेला. आता तिथे फक्त अंधार उरला होता. एखादी वीज चमकली आणि त्याचा प्रकाश खिडकीतून आत आला तेव्हा तिथे फक्त झुंबर हलताना दिसत होते.

काही दिवसानंतर त्याच मार्गाने जाणाऱ्या एका कुटुंबाला गाडी नादुरुस्त झाल्याने त्या बंगल्यात आश्रय घ्यावा लागला, तेव्हा त्या कुटुंबातील तरुण मुलगा, हॉलमधल्या काळपट भिंतीवर लावलेली चारही चित्रे बघितल्यावर, पाचव्या नवीन चित्राकडे वळला. त्या चित्रात झुंबराच्या खाली पाच मित्र दिसत होते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीदायक किंकाळी होती आणि त्यांना एकत्र दोरखंडाने खुर्चीला बांधून ठेवलेले होते आणि त्यांच्या समोर एका खुर्चीवर एक मानवी आकृती बसली होती.

टॉर्चच्या प्रकाशात त्याकडे बघत तो तरुण मुलगा त्याच्या आईला म्हणाला, "एकेकाळी कोणी तरी दुःखी व्यक्ती या बंगल्यात राहिली असेल, कदाचित एक चित्रकार?"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टोरी मस्त आहे. चित्रांची वर्णनं पण आवडली. त्या अनुषंगानी कथा अजून फुलवता आली असती असं वाटलं. प्रत्येक चित्रात पोटेन्शिअल आहे टॉर्चरचं.

अजून एक विचार पडला म्हणजे - दारं खिडक्या तुटलेली होती तर ही पाचजणं बाहेर का नाही पडू शकली. मुख्य दरवाजा बंद झाला तरीही कुठूनतरी निसटता आलं असतं.

खिडक्या दरवाजांच्या काही काचा वगैरे तुटल्या असतील. बाहेरच्या फाटकाचा दरवाजा तुटला असेल.. कुंपण उखडले असेल... किती मन लाऊन वाचता रमड Happy

Happy अर्थात! हॉरर्स खूप आवडतात मला. आठवड्याला किमान एक हॉरर मूव्ही पाहते मी. माबोवर लिहीत नाही फक्त त्याबद्दल. इथे बहुतांश लोकांना त्यात फारसा इंटरेस्ट नाही असं वाटतं.

हायला.. आठवड्याला एक हॉरर.. धागाच येऊ द्या मग..
आमच्याकडे सुद्धा आवड आहे हॉररची.. घाबरतात तरीही बघतात.. बघायचाच असतो.. परवाच उर्मिला आणि मनोजचा कौन झाला.. येऊ द्या धागा

Happy माझी वरची पोस्ट पुन्हा वाच बरं. इथे फारश्या लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. उगाच धागा काढून माझा आणि त्यांचा वेळ वाया कशाला घालवायचा?

बायदवे, 'कौन' हा काही हॉरर पिक्चर नाही. थ्रिलर म्हणूया फारतर.

सुरुवातीला तिला जे अमानवीय भास होतात त्याने हॉरर मूवीचा टोन सेट होतो.
लहानपणी आमच्यात चर्चा सुद्धा चालायची की ती सायको होती की भूत होती यावर?

आणि तसेही मला अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे हॉरर नाही आवडत फार. मुलांनी सुद्धा असे काही बघू नये वाटते. जसे की तो मध्यंतरी आलेला शैतान..
. जिथे फार काही अमानवीय नसून देखील जे घाबरवतात ते जास्त आवडतात.

आवडली कथा.
पण rmd म्हणतेय तसं अजून फुलवता आली असती.
माबोवर लिहीत नाही फक्त त्याबद्दल. >>>>>> हे बरोबर नाही.

रमड ती माझी वैयक्तिक आवड आहे. मायबोलीकरांना आवडतात भुताखेतांच्या गोष्टी. आमानवीय धागा येथे तुफान चालायचा..
माझा देवावरून आणि भूतांवरून विश्वास उठला आहे म्हणून मजा येत नाही..

माझा देवावरून आणि भूतांवरून विश्वास उठला आहे म्हणून मजा येत नाही.. >>>> माझे मात्र असे होत नाही . जादूगारीवर विश्वास नसूनही हॅरी पॉटर ची मजा कमी झाली असे वाटत नाही. किंबहुना ते सगळे खोटे आहे हे माहित असल्यामुळे निर्धोक मजा घेता येते . जर एखाद्याचा भूतांवर विश्वास असेल तर सिनेमात भुते माणसांना मारतात ते पाहून चिंता व भीती वाटेल. मग सिनेमाची मजा कशी घेणार? Happy

बंगल्यातून बाहेर गेले तरी फारसा उपयोग होणार नव्हता. कारण बाहेर वादळ, वारे आणि पाऊस सुरू होता. बाहेर पडून ते कुठे जाणार होते?

पण rmd म्हणतेय तसं अजून फुलवता आली असती.
माबोवर लिहीत नाही फक्त त्याबद्दल. >>>>>> हे बरोबर नाही. >>>+1

प्रतिसाद देताना गेस्ट्स आले, कथेबद्दल लिहायचंच राहीलं.

तुमच्या बऱ्याच कथा मी वाचते. खूप प्रगती आहे. पूर्वीच्या काही कथा या Abstract वाटतात. आता प्रत्येकाला समजेल अशा आहेत.

चित्राची कल्पना अफलातून आहे. घाईघाईत लिहिली आहे का?
थोडी फुलवता आली तर बघा.

पुलेशु

शेवटाला पाचव्या फ्रेम मधील चित्राचे जसे वर्णन केले आहे त्यानुसार चौथ्या फ्रेम मधल्या चित्राचा कोणती घटना त्या बंगल्यात घडली असेल यासंदर्भात अर्थ लागत नाही आहे....बंगल्यात समुद्र कुठून येणार आणि हजारो हात म्हणजे निदान ५०० माणसे त्या बंगल्यात मरायला कुठून मावणार?? विसंगती जाणवते आहे.

शेवटाला पाचव्या फ्रेम मधील चित्राचे जसे वर्णन केले आहे त्यानुसार चौथ्या फ्रेम मधल्या चित्राचा कोणती घटना त्या बंगल्यात घडली असेल यासंदर्भात अर्थ लागत नाही आहे....बंगल्यात समुद्र कुठून येणार आणि हजारो हात म्हणजे निदान ५०० माणसे त्या बंगल्यात मरायला कुठून मावणार?? विसंगती जाणवते आहे.

रच्याकने कथेचा ट्विस्ट ' अहल्या' या शाॉर्ट फिल्म वरुन प्रेरीत आहे का?? ज्यात राधिका आपटे ने काम केले आहे?

बंगल्यातून बाहेर गेले तरी फारसा उपयोग होणार नव्हता. कारण बाहेर वादळ, वारे आणि पाऊस सुरू होता. बाहेर पडून ते कुठे जाणार होते? >> ये बात हजम नहि हुयी. तुम्ही तोपर्यंत झक्कास वातावरण निर्मिती केली आहे. प्रेडीक्टेबल असली तरी वर्णन जमलेले आहे. पण काहीतरी वेगळाच प्रकार दिसतो आहे असे म्हणणारे लोक झुबर, आरसा वगैरे झाल्यावर अजून आतल्या खोलीत जातील हे अजिबातच झेपत नाही. बाहेर वादळ, वारे असले तरी झाडाखाली उभे राहण्याचा चान्स घेतील ना ? पडक्या झोपड्यांचा उल्लेख आहे त्याच्या आडोशाला थांबतील वगैरे.

त्या अनुषंगानी कथा अजून फुलवता आली असती असं वाटलं. प्रत्येक चित्रात पोटेन्शिअल आहे टॉर्चरचं. >> रमड ला ह्याबाबाब्त अनुमोदन !

बाहेर वादळ, वारे असले तरी झाडाखाली उभे राहण्याचा चान्स घेतील ना ? पडक्या झोपड्यांचा उल्लेख आहे त्याच्या आडोशाला थांबतील वगैरे >>> एक्झॅक्टली!

ते पाहून चिंता व भीती वाटेल. मग सिनेमाची मजा कशी घेणार?
>>>>>
चिंता आणि भीती वाटली तरच आपण चित्रपटाशी एकरूप होऊन मजा घेऊ शकतो.
चित्रपट घाबारवायला बनवला आहे आणि आपण घाबरलोच नाही तर मजा काय..
हे सुद्धा असेच आहे जसे चित्रपट हसवायला बनवला आहे पण आपल्याला हसू आलेच नाही..
तुम्ही वर जे जादू बाबत लिहिले आहे त्यात सुद्धा हा फंडा काम करतो. लहान मुलांचा जादूवर विश्वास असतो म्हणून ते जादूचे पिक्चर जास्त एन्जॉय करतात. आणि मोठ्यांनी केले तर त्याची कारणे वेगळी असतात.
मला शाहरुख आणि त्याचे चित्रपट आवडतात यामागे सुद्धा हेच कारण आहे की माझे मन रोमँटिक आहे आणि प्रेमावर अफाट विश्वास आहे.

एकूणच वेगळ्या धाग्याचा विषय आहे..

सकाळच्या पारी काय पीर पीर पीर पीर पीर पीर पीर पीर पीर लावलीय रं ?
तुला हागायला कसं येतं, मुतायला कसं येतं ते बी सांग. आता तेवडंच राहिलंय. तेच्यायला तेच्या या भुसनळ्याच्या !

+१

प्रत्येक चित्रामधल्या घटना बंगल्यातच आणि जशाच्या तशाच घडल्या असे आवश्यक नाही. चित्रकार त्यात थोडी रचनात्मकता / क्रिएटीव्हीटी वापरून चित्र बदलवू शकतो. बंगल्याच्या बाजूला दूर समुद्र किनारा आहे त्यात बंगल्यातील सर्व बळींचे जणू आत्मे आहेत आणि त्याचे प्रतीक म्हणून चित्रकाराने (त्याच्या आत्म्याने) तसे चित्र काढले असावे. आता नव्याने तिथे आलेल्या कुटुंबाला कदाचित ते पाच मित्र दिसू शकतात. तसेच मी "अहल्या" ही शॉर्ट फिल्म बघितली आहे, पण माझी कथा कोणत्याच फिल्मवर आधारित नाही आणि कथा लिहिताना मला इतर कोणतीही फिल्म आठवत सुद्धा नव्हती. "शेवट काय करायचा?" असा विचार करत असतानाच मग मला ही पाचव्या चित्राची कल्पना सुचली कारण "सर्व मित्र बंगल्यात येऊन गायब झाले" एवढीच स्टोरी लाईन असती तर त्यात जरी भय एलीमेंट होता, तरी फारसे रहस्य नव्हते म्हणून मी शेवटी ठरवले की आधीच्या चित्रांशी संबंध जोडून कथेचा शेवट करायचा, पण पूर्ण रहस्य उलगडायचे नाही, तर कथा थोडी ओपन एंड ठेऊन वाचकाला गूढ चित्रकाराबद्दल विविध थियरी मनात तयार करू द्यायच्या, असा उद्देश्य! अन्यथा आजपर्यंत या बंगल्यात काय काय झाले हे टाकले असते तर खूप मोठी कथा (कदाचित) कादंबरी झाली असती. तेवढं कथेचा स्कोप नव्हता.

मी फक्त नेहेमी त्याच त्याच धाटणीच्या फक्त हॉरर कथा लिहितो असे नाही.
कृपया मी नुकतीच लिहिलेली एल प्रेमकथा जरूर वाचावी ही विनंती:
https://www.maayboli.com/node/86306