विसंगती सदा घडो : How to with John Wilson

Submitted by रॉय on 15 January, 2025 - 17:22

१. मला वैचित्र्य आवडते. विसंगती, idiosyncrasies आवडतात.
२. विसंगती आयुष्यातल्या वैयर्थाची धार कमी करतात. अनेक लोकांना अनेक विचित्र गोष्टींची आवड असते. खाज हा त्याला एक उत्तम शब्द आहे, कलेचे छंद तर बऱ्याच जणांना असतात पण छंद असायला कलाच हवी असे काही नसते.
३. अनेक लोकांना आजूबाजूच्या विसंगती, idiosyncrasies टिपण्याची आणि त्या महत्त्वाचे म्हणजे एंजॉय करण्याची चाह असते. मी कायम अशा विचित्र गोष्टींकडे लक्ष देतो. मला त्यांतला comic relief नको असतो. म्हणजे तसा relief मिळतोच पण तेच ध्येय नसते.
४. एखाद्या विवक्षित विचित्र गोष्टीमागे आयुष्यभर passionately लागणारी सगळी साधी सुधी माणसे मला आवडतात. एकतर त्यांच्या या आयुष्याकडून फारश्या काही भन्नाट अपेक्षा नसतात. त्यांना कुणाला इम्प्रेस वगैरे करायचे नसते. त्यांची एखादी गोष्ट त्यांना मिळाली, तिच्या अवतीभोवती रमता आले की अशी मंडळी खूश होतात.
५. अशी मंडळी आपल्या समान आवडी निवडी असलेल्या मंडळीचे एखादे संमेलन भरवतात, एखादा क्लब काढतात, त्यांचे सगळे rituals करतात. एकमेकांना धरून राहतात. बाकी जग खड्ड्यात गेले तरी त्यांना फारसा फरक पडत नाहीत. म्हणजे ते असंवेदनशील असतात असे नव्हे.
६. जॉन विल्सन नावाचा एक अवलिया माणूस आहे. तो वाट्टेल ते शूट करतो. मुख्यत्वे त्याचे आवडीचे शहर न्यू यॉर्क. सगळ्या बारीक सारीक गोष्टी. नंतर एखाद्या विषयाला धरून एखादे छान सुसंगत या व्हीडिओंचे कोलाज तयार करतो. हे वीडियोचे तुकडे एकत्र करताना, विषयाला धरून आणि विषयाला विसंगत अश्या व्हिडिओना बरोबर एकामागे एक जोडून अत्यंत सटल असा विनोद तयार करतो.
७. नंतर त्याच विषयाच्या मागे त्याचा माग काढत काढत भलतीकडेच पोचतो. या प्रवासात त्याला वेगवेगळ्या idiosyncrasies जपणारी अतरंगी माणसं भेटत राहतात. मग तो त्या माणसांच्या मागे त्यांच्या आयुष्याचे तुकडे या वीडियोंच्या कोलाजात मिसळतो.
८. एकतर अमेरिका म्हणजे अशा चित्रविचित्र माणसांची खाण आहे. individualsm टोकाचा असल्याने आपल्या आवडी निवडी passionately जपणारी खूप मंडळी असतात. जॉन विल्सन अशा जागा, अशी माणसे शोधून त्यांच्या मागोमाग जातो. वाटेत पुन्हा असंख्य लहानसहान सुसंगती आणि विसंगती वेचत.
९. आणि मग तयार होतो सूक्ष्म, विचित्र, नर्मविनोदाचा शिडकावा असलेला, हटके असा एक एपिसोड आणि त्यांची तयार होते एक सुंदर वेबसिरीज.
१०. उदा. विषय आहे : How to watch a game.

- जॉन विल्सन आधी एखादा खेळ सर्वसामान्य लोक का आणि कसा एंजॉय करतात त्याची विसंग-सुसंगत व्हीडिओंचे ठिपके जोडून थोडी मीमांसा करतो
- मग तो त्याच पद्धतीने स्टेडीयम मध्ये एखादा खेळ उदा. बेसबॉल. जाऊन अनुभवायचा आणि त्याची मजा लुटायची असे ठरवून कॅमेरा घेऊन निघतोच.
- त्याचा कॅमेरा जमेल तितकं वैचित्र्य शोषतच असतो. पुढे तो सामनाच पावसाने रद्द झाल्याने त्याचा प्लान फिस्कटतो. असे एखादि गोष्ट फिस्कटणे नेहमी त्याच्या पथ्यावरच पडत असते.
- मग फॅन लोक कसे वेगवेगळे rituals करत असतात आणि fandom काय असतो याची एक झलक तो दाखवतो. सगळ्या अंगावर LED डिस्पले लावलेला एखादा विक्षिप्त भासेल असा निरुपद्रवी (थोडा क्रॅक म्हंटले तरी चालेल असा) फॅन वाटेत त्याला भेटतो. मग हा त्याच्या मागोमाग त्याच्या घरी जुन्या मॅचेस पाहायला जातो. याचे घर म्हणजे सगळ्या फॅन collectibles ने भरलेले न्यू यॉर्क मधले एखादे गरीब अपार्टमेंट. जिथे हा साठीतला माणूस आपल्या वृद्ध बापाची काळजी घेत राहत असतो. बाप आपल्या मुलावर सहज नैसर्गिक प्रेम करणारा साधा सरळमार्गी गोड म्हातारा असा. मुलगा साठीतला लहान मुलांसारखा कडक फॅनबाजी करणारा पण बापाची काळजी घेणारा असा. अमेरिकन मूल्यांत फारसे न बसणारे बाप मुलाचे नाते विल्सन थोड्या नर्मविनोदाने, थोड्या चेष्टेने आणि थोड्या तटस्थतेने टिपतो.
- मग त्याला आठवण येते की आपण तर बाबा कधी या पारंपरिक मोठ्या खेळांच्या नादाला लागलो नाही. तर का आता आटपिता करा. त्यापेक्षा लोकांना घरी बोलवून पिझ्झा वगैरे खायला घालू आणि आपल्या एकाकी आयुष्यात काहीतरी कम्युनल रंग भरू.
- त्यासाठी घाण झालेले घर साफ वगैरे करायला पाहिजे. मग विल्सन वॅक्यूम करायला घेतो. मात्र त्याचा वॅक्यूम क्लीनर बिघडतो.
- बिघडलेला वॅक्यूम क्लीनर एखाद्या शॉप मधे दुरुस्तीला तो घेऊन जातो. तिथे त्या शॉपवाल्याशी मस्त गप्पा छाटतो. तो त्याला वॅक्युम क्लीनर हे एक वेगळेच स्वतंत्र विश्व आहे हे पटवून देतो. तिथे त्याला एका वॅक्युम क्लीनर प्रेमी लोकांच्या क्लब ची माहिती मिळते. योगायोगाने त्यांचे एखादे समलेन भरणारच असते.
- तर आयुष्यात वॅक्युम क्लीनर चा अक्षरश: ध्यास घेतलेले अनेक हौशी लोक त्यांचे त्यांचे वेगवेगळे वॅक्यूम क्लिनर घेऊन कन्वेंशनला आलेले असतात. तिथे चक्क वॅक्युम ने कचरा साफ करण्याची छोटी स्पर्धा आणि गेम सुद्धा खेळतात आणि तेही प्रचंड गांभीर्याने आणि शिस्तीने. तिथे लहान थोर मंडळी अगदी जीवापाड जपलेल्या आपल्या छंदाबद्दल अनेक विध गोष्टी करतात, विचारविनिमय चर्चा करतात मजा करतात. लोल.
- एका वॅक्युम क्लीनर प्रेमी तशाच साठीतल्या माणसाच्या घरी हा क्लब पिझ्झा खाणार असतो तिकडे हा जातो. तिथे त्या व्यक्तीचे आणि त्याच्या वॅक्यूम क्लीनरचे नाते त्याची छोटीशी मुलाखत घेत उलगडतो. या व्यक्तीने वयाच्या पन्नाशी पर्यंत लोक लाजेस्तव हा छंद क्लोसेटेड राहून जपलेला असतो. शेवटी माझिया जातीचे मग भेटो कोणी असे झाल्यावर ही व्यक्ती आपल्या छंदाला जाहीर उघड माथ्याने जोपासते. मात्र इतके दिवस या व्यकीचे वडील मात्र आपल्या लाडक्या मुलाच्या छंदाला कायमच स्वीकृती आणि पाठिंबा देत असतात. (असे विचित्र छंद जपणरी मुले मिसफिट असतात, नाजूक असतात आणि म्हणून आईवडील अशा मुलांना जास्त जपत असतात हे वैश्विक सत्य विल्सन मस्त उलगडत नेतो) आपल्या आठवड्याभरपूर्वी निवर्तलेल्या बापाविषयी बोलताना या व्यक्तीला अनावर होते.
- शेवटी स्वतः च्या आजीची आठवण जॉन ला होते. तिचा वॅक्युम क्लीनर देखील आठवतो. ती जिवंत असताना तिच्यासोबत आपण अजिबात वेळ घालवला नाही याचा पश्चाताप त्याला होतो.
- गेम्स भोवती नाती विणलेली असतात विशेषत: बाप आपल्या खेळाच्या आवडी निवडी आपल्या मुलांशी कनेक्ट करायला वापरत असतात. मग त्या गेम्स पारंपरिक असोत किंवा वॅक्यूम क्लीनर कलेक्ट करून त्यांच्या भरणाऱ्या स्पर्धा असोत. हे कुठेही कसलाही प्रचारकीपणा ना होता अलगद मनावर ठसते. तेही सगळ्या विसंगती टिपत. आपल्या गालावर बारीक ताण असतो आणि आपण पोट धरून हसत नसलो तरी एक अत्यंत उच्च दर्जाचा वेगळा विचित्र विनोद अनुभवतो.

१०. ही वेबसिरीज आवर्जून पाहा. काहीतरी वेगळी सिच्युएशनल पण खरी खुरी, लहान सहान वैचित्र्याने भरलेली, न्यू यॉर्कच्या अतरंगीपणाला स्पर्शणारी, चकलवर्दी मस्त सिरीज आहे. HBO ची आहे त्यामुळे पाहा कुठे कुठे पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>HBO ची आहे त्यामुळे पाहा कुठे कुठे पाहता येईल.
पहाते. सुचविल्याबद्दल, खूप आभार. न्यु यॉर्कवरती प्रेम बसले आहे. ही सिरीज बघायला खूप आवडेल.

५ भाग बघितले. न्यूयॉर्क मधील गलिच्छ scaffolding बद्दलचा भाग पटला. फर्निचरला झबल्या-टोपड्यासारखे प्लॅस्टिकचे कव्हर घालणारी फॅमिली बहुधा भारतीय आहे, असे वाटले. डेड बॉडी बाहेर आणताना घसरून पडते, ते बघून कसेसेच झाले. काही भाग रटाळ वाटले तरी एकंदर सिरीज ठीकठाक वाटली, एकदा बघायला नक्कीच हरकत नाही, चांगली आहे. Humans of New York ची आठवण झाली.