तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो

Submitted by मार्गी on 14 January, 2025 - 04:30

✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास
✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे
✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू"
✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक
✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात
✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल"
✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर
✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता

सर्वांना नमस्कार. काल १३ जानेवारीला तर्पण फाउंडेशन, मुंबई ह्यांचा युवा गौरव पुरस्कार कार्यक्रम होता. मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठात झालेल्या ह्या कार्यक्रमामध्ये समाजात खूप वेगळं काम करणार्‍या युवांना गौरवण्यात आलं. श्रीकांतजी भारतीय आणि श्रेयाताई भारतीय ह्यांचं तर्पण फाउंडेशन. पुण्यात कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये शिकताना श्रेयाताई माझ्या ज्युनिअर होत्या. पण वयाने व कर्तृत्वाने खूप सिनियर. आणि विशेष म्हणजे आज इतकं मोठं काम करताना आणि इतका मोठा पसारा संभाळतानाही मनाने त्या तितक्याच विनम्र अर्थात् डाऊन टू अर्थ आहेत. त्या दोघांबद्दल इतकं सांगितलं तरी पुरे की, गेली ३० वर्षं- त्यांच्या लग्नाच्या आधीपासूनच ती दोघं अनाथ मुलांच्या प्रश्नांवर काम करत आहेत आणि आज अनेक लेकरांचे आई- बाबा झाले आहेत.

हा लेख इंग्रजीत वाचण्यासाठी माझा ब्लॉग.

श्रेयाताईंची बॅचमेट व माझी ज्युनिअर आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या स्मिता मंडपमाळवी ह्या माझ्या मैत्रिणीने मला कार्यक्रमाची माहिती दिली. जेव्हा असे पुरस्कार दिले जात आहेत हे कळालं तेव्हा त्यात अशोकजी देशमानेंचं नाव बघून आनंद झाला. अशोकजी देशमाने हे परभणीचे. म्हणजे माझे गाववाले. त्यांच्याबद्दलही खूप ऐकून होतो. ह्या सोहळ्यात त्यांनाही भेटण्याचा योग आला. अतिशय खडतर परिस्थितीतून जिद्दीने त्यांनी शिक्षण घेतलं. गॅरेजमध्ये काम करत करत शिकले. कंप्यूटर सायन्समध्ये उच्च शिक्षण घेऊन आय.टी. क्षेत्रात त्यांनी काम सुरू केलं. पण गावाकडच्या शेतकरी आत्महत्या बघून ते अस्वस्थ झाले. राजमार्ग सोडून त्यांनी ही आडवाट पत्करली. अनाथ झालेल्या मुलांचं पालकत्व पत्करलं, तेसुद्धा ऐन तरूण वयात. खूप संघर्षाची ही वाट होती. पण अनेक वर्षांचे त्यांचे कष्ट, जिद्द आणि संघर्षानंतर आता आडवाटेचं त्यांनी महामार्गात रुपांतर केलं आहे व ह्या मार्गावरून त्यांची लेकरं आता पुढे जात आहेत.

अनेक दिग्गजांची व मंत्री महोदयांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाची सुरूवात श्रीकांतजींच्या मनोगतातून झाली. त्यांनी सांगितलं की, अनाथ मुलांसाठी १८ वर्षांपर्यंत सुविधा दिल्या जात होत्या. परंतु १८ वर्षं झाल्यानंतर त्यांना वस्तीगृहातून बाहेर जावं लागायचं. आणि खरं तर अगदी संवेदनशील असं हे वय! पण नेमक्या त्या वयामध्ये त्यांना परत एकदा अनाथ व्हावं लागत होतं. यंत्रणेमधली ही त्रुटी लक्षात घेऊन "सेतू: सृजन हेतू" सूत्र असलेल्या तर्पण फाउंडेशनने काम सुरू केलं. त्यातून पुढे अनाथांसाठी १% आरक्षण, १८ नंतरच्या वाटचालीसाठी सहाय्य असे बदल घडत गेले. १८ नंतर मुलांच्या शिक्षणासाठी, नोकरी व पुढील विकासासाठी व स्थिरतेसाठी प्रयत्न केले गेले व १८ नंतरसुद्धा पंखास नवे बळ देऊन त्यांना झेप घेण्यासाठी नवीन आकाश दे‌ण्याची सुरूवात केली गेली. तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ म्हणून वाढलेल्या मुलांनी उच्च शिक्षण व स्पर्धा- परीक्षांमध्ये यश मिळवलं. ह्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी युवा गौरव पुरस्कारही सुरू केले गेले. हे ह्या पुरस्कारांचं चौथं वर्ष आहे. पुढेही ते असे प्रकल्प करणार आहेत. त्यातला एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे माहेरवाशीण सदन! अनाथ मुलांची लग्न तर लावून दिली जातात, पण त्यांना हक्काचं माहेर नसतं! ही उणीव दूर करण्यासाठीचा हा प्रयत्न असेल.

कार्यक्रमामध्ये राज्यातील अनेक बाल गृहांमधील मुलं- मुली व अनेक सामाजिक संस्थांमधील कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. स्नेहवनचे संस्थापक असलेल्या व आपल्या सहधर्मचारिणीसोबत पुण्याजवळ कोयाळी येथे वस्तीगृह चालवणार्‍या अशोकजी देशमानेंना गौरवण्यात आलं. दुसरा पुरस्कार एका वेगळ्या व संवेदनशील योद्धेला दिला गेला. आपल्या समाजात मुलगी असणं ही एक लढाई! तीच मुलगी जर अनाथ असेल तर अधिक बिकट स्थिती. आणि जर अनाथ मुलगी बौद्धिक अक्षम असेल तर किती भीषण स्थिती असेल. पण अनाथ आणि बौद्धिक अक्षम मुलींसाठी दोन आघाड्यांचं युद्ध लढणार्‍या जळगांवच्या मंगलताई वाघ ह्यांना हा पुरस्कार दिला गेला. अशा मुलींचं प्रयोगशील वस्तीगृह त्या अनेक वर्षं चालवत आहेत. त्यांचं काम वाढत गेलं आणि समाजाची साथ मिळत गेली. बौद्धिक अक्षम मुलींना योग्य संस्कार देऊन व कौशल्य प्रशिक्षण देऊन त्या स्वावलंबी करत आहेत. दिव्यांगांच्या प्रश्नांबद्दल समाजाचं प्रबोधन करत आहेत. सरकारी योजनांचे लाभ त्यांना मिळण्यासाठी कार्यरत आहेत.

सनाथ वेलफेअर फाउंडेशनच्या गायत्री पाठक ह्यांनाही पुरस्कार दिला गेला. त्यांची कहाणीही खूप विलक्षण. त्याही वाढल्या त्या अनाथ म्हणून (हा शब्द खरं तर खूप चुकीचा, पण वापरावा लागतो). पुढे शिकून पत्रकार झालेल्या गायत्रीताईंच्या समोर एकदा एक मोठं होर्डिंग ऑटोरिक्षावर कोसळलं. त्यामध्ये ऑटो रिक्षाचालकांचा मृत्यु झाला. आणखी विपरित म्हणजे त्याच्या पत्नीचं नुकतंच निधन झालं होतं. त्यांची मुलं एका रात्रीत अनाथ झाली! पण अनाथांना सनाथ करण्याचा गायत्रीताईंनी प्रयत्न सुरू केला व त्यातून ही संस्था उभी राहिली. १८ + वयानंतर शिक्षण, रोजगार, कौटुंबिक स्थिरता अशा विविध विषयांवर त्या काम करत आहेत. कार्यक्रमामध्येच त्यांनी पुरस्कारामध्ये मिळालेले पैसे एका संस्थेला व तर्पणच्या उपक्रमासाठी दान केले. अशा अनाथांच्या नाथांना बघून हाच विचार मनात येतो- अनाथांच्या नाथा तुज नमो!

कार्यक्रमामध्ये ह्याच विषयावर काम करणार्‍या मंत्री अदिती तटकरेंनी मुद्देसूद मनोगत व्यक्त केलं. राजकारण- पक्ष ह्यापुढे जाऊन विषयाला हात घालण्याची इच्छा व अभ्यास त्यांच्या मनोगतात जाणवला. तर्पणच्या कामात मुक्त हस्ताने देणगी देणार्‍या मान्यवरांना गौरवण्यात आलं. अशा मान्यवरांपैकी एक असलेले इस्कॉनचे प्रवते श्री नित्यानंद चरण दास ह्यांनी खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं. आपण जे कर्म करतो ते आपल्याकडेच परत फिरतं. असं आपल्याला कधी कधी वाटतं की, आपण इतके प्रयत्न केले किंवा इतकं चांगलं वागलो तरी आपल्याला काही मिळत नाही. पण कर्म सिद्धांत सांगतो की, आपण जे काही चांगलं किंवा वाईट वागतो ते फिरून परत आपल्याकडे येतं. ते त्याच मार्गाने किंवा त्याच वेळी येईल असं मात्र नसतं.

असा हा सोहळा पार पडला. मुलं व माय- बाप आणि मोठ्या कुटुंबाची भेट, असंच त्याचं स्वरूप वाटलं. असं म्हणतात की, आपण तिथेच जातो जे आपल्याला आपलं भविष्य वाटत असतं. ह्या सोहळ्याला एखाद्या चित्रपटाहून जास्त गर्दी झालेली होती. समाजात योगदान देणार्‍या मंडळींना मिळालेलं मानाचं स्थान व त्याबद्दल युवा पिढीची ओढ बघून समाधान वाटलं आणि त्याबरोबर हा विश्वासही वाटला की, जर इतके लोक इतका मोठा प्रयत्न करत असतील, इतकं रचनात्मक काम करत असतील, तर कोणत्याही समस्या मोठ्या ठरणार नाहीत!

कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता
जरा एक पत्थर तो तबियत से उछालो यारो

(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत लेख शेअर करू शकता. माझ्या वरच्या ब्लॉगवर सामाजिक उपक्रम, फिटनेस, ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन इ. बद्दलचे लेख वाचता येतील. निरंजन वेलणकर ०९४२२१०८३७६. लेख लिहील्याचा दिनांक १४ जानेवारी २०२५.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_