हे खरंच भलतं अवघड असतं
मला अनेक वर्षांपूर्वीची आठवण आहे.... थोरली मुलगी नुकतीच 12वी ची परिक्षा संपवून पुण्याला निघाली होती. आमचे वास्तव्य तेव्हा कुमाऊंमधील हल्द्वानी या चिमुकल्या, निसर्गसंपन्न गाव- म्हणजेच खेडेवजा जागी होते. कोणे एके काळी नारायण दत्त तिवारी अविभाजित उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असताना जपानी कंपनी होंडा आणि श्रीराम समूहाचे कोलॅबरेशन झाले आणि उत्तर प्रदेश आणि आताच्या उत्तरांचल प्रदेशात रुद्रपूरला होंडाच्या जनरेटर सेटचा कारखाना स्थापन झाला आणि मी तिथे महासंचालक म्हणून रुजू झालो.
मुलीचं बारावीपर्यंत शिक्षण काठगोदाम.. म्हणजे हल्द्वानी जवळच्या शाळेत झालं.
माझी इच्छा महाराष्ट्रात पुढील शिक्षण व्हावे अशी होती आणि म्हणून तिची पुण्याला फर्ग्युसनला ॲडमिशन झाली अन ती पुण्याला गेली. पहिल्यांदाच घराबाहेर पडत होती आणि त्यात अख्खं आयुष्य उत्तरेत गेल्याने ती ’कुडी पंजाबन किंवा पहाडन’ सर्वार्थाने होती- किंबहुना दोन्ही मुली कुड्या पंजाबन अन पहाडन होत्या.
असो... खूप विषयांतर झाले... तिला काठगोदाम स्टेशन वरून दिल्ली मार्गे पुण्याला जायचे होते... लहान गाव... बहुभाषिक स्नेह्यांत खूप प्रेम अन एकमेकांच्या कुटुंबांचा घनिष्ठ परिचय यामुळे मोठ्ठा मेळावा स्टेशनवर निरोप द्यायला जमला होता... प्रत्येकाच्या मुलांच्या आणि आईवडिलांच्या जीवनातला हा सामान्य प्रसंग असला तरीही तो व्यक्तिश: असामान्यच अन हुरहुर लावणारा असतो.
साश्रू डोळ्यांनी तिला बाय बाय केले अन घरी परतलो.
सहा एक महिन्यांनी दिवाळीला ती घरी आली. ते 10 15 दिवस कसे गेले कळले नाही. मी पुन्हा तिला परत सोडायला नवी दिल्ली पर्यंत गेलो. गोवा एक्स्प्रेस होती अन उत्तरेतील खूप मुलं तेव्हा सुध्दा--- 1999 मध्ये पुण्याला शिकायला होती. त्या मुळे ट्रेन मध्ये पुण्याला जाणारी खूप मुलं होती. तरीही मला भरून आले होते. या भावना शब्दांत व्यक्त करणं खरोखरच कठीण आहे. माझे डोळे भरून आले होते- हो आजही तो क्षण आठवतोय.... मी मुलीची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होतो अन एवढ्यात माझ्या पाठीवर कोणातरी बुजुर्ग- वडीलधार्या व्यक्तीचा हात जाणवला. वळून पाहिलं तर ती साधारण साठीतली एक रुबाबदार व्यक्ती होती. हळूवार आवाजात ते मला हिंदीत म्हणाले, “ भाईसाहब! शायद कालेज जॉइन करने के बाद पहिली दफा छोडने आये हो इसलिए बहुत बुरा लग रहा है... आदत हो जाएगी!”
मी कसानुसा हसलो, गाडी हलली, पुन्हा एकदा कन्येचा हात हातात घेतला अन म्हणालो काळजी घे... मेच्या सुट्टीत भेट होईलच.”
अशा प्रकारे तिच्या एम ए पर्यंत येणे जाणे चालू राहिले. तदनंतर आम्ही नाशिकला स्थलांतरित झालो. ती पुण्यात अन नंतर दिल्लीत नोकरीला होती.
काही वर्षांनी तिचे लग्न झाले आणि ती अमेरिकेला गेली. भेटीतील कालावधी वाढत चाललाय.
परवाच पाच आठवड्यांसाठी आली होती. येणार आहे म्हणून कळलं तेव्हा पाSSSSSSSSSSSSSSSSSSSच आठवडे वाटत होते ते भुर्रकन उडून गेले. काय करू काय नको अशी अवस्था होती. खूप पत्ते खेळलो, हिंडलो, मायलेकींच्या हितगुजाला तर पारावार नव्हता... मी देखील बायस्टॅन्डर असूनही खूप आनंदात होतो...आमचीही वयं झाली आहेत अन त्या मुळे त्या भेटीच्या आठवणी, ’ अशी पाखरे येती, स्मृती सोडूनी जाती” याची प्रचिती देतात.
माझा हा अनुभव जगावेगळा नक्कीच नाही पण तो माझाच नाही का?
आणि म्हणूनच दिल्ली स्टेशन वरील ते शब्द अजूनही आठवतात... “भाईसाहब आदत हो जाएगी” पण “आदत’ होत नाही हो ... अन होऊ देखील नाही,.....
नाही का???
आदत हो जाएगी...!!!!!!........ स्वगत
Submitted by रेव्यु on 10 January, 2025 - 06:35
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख लिहिले आहे
सुरेख लिहिले आहे
Pages