आठवणी

Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 1 January, 2025 - 08:29

आठवणींचा शाप

उत्कृष्ट स्मरणशक्ती एक अनोखी देणगी आहे.
आपल्या देशात एक पाठी, दिपाठी, त्रिपाठी व्यक्तींचा सन्मान केला जात असे.
अष्टावधानी माणसे पण एकच वेळी अनेक गोष्टींना बघून लक्षात ठेवून त्यांचा वापर करत असतात.
विस्मरण हे पण गरजेचेच नव्हे काय? नको त्या गोष्टींचा विसर पडणे तितकेच गरजेचे असते.
अगदी अचूक सगळेच्या सगळे आठवणे वरदान म्हणावे की शाप? अगदी जुने आठवणे किती त्रासदायक ठरू शकते ना!
काहीसे ह्याच स्थितीचे चे वर्णन करणारी ही माझी कविता सुमंदारमाला ह्या गोड वृत्तात.

कितीदा नव्याने पुन्हा जिंकले मी जुने हारणे का वृथा बोचते
कितीदा नव्याने पुसू आरश्याला जुने बिंब बंबाळ आक्रंदते
उन्हाळे हिवाळे पुन्हा पावसाळे उमाळे उसासे अती तुंबती
उफाळून येते नको तेच जे जे कसे काय जाणे पुन्हा मागुती

दटावून मागे खुळी आतली भावना काळ कोंडूनिया गाडतो
धुमारा तिचा होउनी लांब भाला जिव्हारी फिरूनी रुतू लागतो
किती एक वेळा उगाळून लावू मना भाजल्या लेप मी चंदनी
तरी अंतरीची जुनी गंध वेणा दुखावून जाते उरा जाळुनी

कृपा ईश्वराची म्हणावे स्मृतींना परी त्या कट्यारी चरे पाडती
दुधारी स्मृतींचा वृथा भार चित्ती जिवाला विखारी खुणा झोंबती
कशाला स्मृतींची गुलामी करू मी नको ईश्वरा ही नकोशी सल
झडू देत सारी पुटे आठवांची दिसू दे मला विस्मृती सोज्वळ

:- डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान