३१ डिसेंबर...

Submitted by छन्दिफन्दि on 31 December, 2024 - 22:40

322616277_669589831308107_8790003171767943660_n.jpg

"काय मग ह्या वेळी ३१st चा काय प्लॅन ?"
मला वाटत हा डिसेंबर मधला सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न असावा. आणि त्याची शेकडो उत्तरे असली तरी "काही नाही जेवून दहा वाजतात गुडूप होऊ " हे उत्तर ०. ०००१ % सुद्धा नसेल हे नक्की. खर ना ?
सध्या सगळ्यांचे ३१ डिसेंबर च्या पार्टीचे प्लॅन्स चालू असतील. सरत्या वर्षाची उजळणी करत नवीन वर्षाच्या स्वागताला सगळी दुनिया सज्ज असते. श्रीमंतांच्या क्रूझ पार्ट्या किंवा सामान्यांच्या सोसायटीच्या गच्चीवर वर केलेल्या पार्ट्या सगळ्यांचा भाव तोच!
गेल्या काही वर्षात California ला रहात असल्यामुळे जगात(?) सगळ्यात शेवटी आमचं नवीन वर्ष सुरू होत असावं. गेट वे ऑफ इंडियाची, मुंबईची रोषणाई , ईस्ट coast(NYC) चा बॉल ड्रॉप करत करत सरते शेवटी आमचे (एकदाचे) ३१डि चे बारा वाजतात.
तर असो!
लहानपणापासून ३१डि फार उत्साहात साजरा करायचो त्याच्या मजेशीर आठवणी आहेत. ८० च्या दशकातल्या मुलांचे सेलेब्रेशन थोडयाफार फरकाने असेच असेल.
बिल्डिंगमध्ये सगळे मिळून ३१ डिसेंबर ची पार्टी करायचो. पार्टी म्हणजे काय तर कोणाच्या तरी घरी जमायचं, दंगा मस्ती करायची, पत्ते झोडायचे, भेंड्या खेळायच्या. जिच्या घरी जमलोय तिची आई मस्त काहीतरी खाऊ करायची . रात्री बारा वाजता happy new year चा जल्लोष करायचा. झाली साजरी ३१डिसेंबरची पार्टी. एकदा एक काकूंनी रात्री बारा वाजता उठून सगळ्यांसाठी गरमागरम केलेले चविष्ट साबुदाणे वडे मात्र चांगलेच लक्षात राहिलेत.
कधी मधी मोठी मुलं गच्चीत छान पार्टी आयोजित करायची. वर्गणी असे ५रु. मग थोडी फार सजावट म्हणजे रीबिनी, फुगे वगैरे, लाईट घेणे, पाणी(तेव्हा बिसलेरी नव्हत्या) , सतरंज्या, सगळी तयारी करायची. ह्या पार्टीत दमशेरा, भेंड्या, गाणी, थोडे पार्टी गेम्स खेळायचो. रात्री बारा वाजता गच्चीवरून कुठे फटाके फोडत असतील तर बघायचे. खाऊ खायचा - मोस्टली वेफर्स, वडा समोसा, रसना तत्सम काही असे. Happy new year Cha जल्लोष करायचा आणि आपापल्या घरी जायचं… झाली पार्टी!
शिंग फुटायला लागल्यावर मग ३१डि ला तलाव पाळीच्या ( ठाण्यातल्या लोकांचं सेंटर ऑफ ग्राविटीच होत ते तेव्हा ) सेलिब्रेशनची ओढ वाटे. एक वर्ष ठरवून गेलोच रात्री, सागरकडे पावभाजी चापली. मग तिकडून तलावपाळीचं, नौकाविहराचं, गडकरी रंगायतनचं लायटिंग बघुया म्हणून बाहेर पडलो. तर कसचं काय तळ्यावर ही भयंकर गर्दी. एक दोन पिऊन टाईट झालेल्या तळीरामांशी टक्कर झाल्यावर मात्र भंबेरी उडाली आणि आमचे तिकडेच बारा वाजले. गुपचूप घर गाठलं. त्यानंतर मात्र पाहिले पाढे पंचावन्न. घरातली ३१डि पार्टी रुजू झाली.
अजून मोठं झाल्यावर, ट्रेनचा रोजचा प्रवास सुरू झाल्यावर मात्र ३१डिसेंबर साठी गेट वे ऑफ इंडियाचं आकर्षण वाटू लागलं. पण योग काही कधी आला नाही. एका वर्षी ३१डी ला ऑफिस मधला एक सहकारी सकाळी आला तोच मुळी, "आज जल्दी जानेका है! तीन बजेही निकलने वाला हू! गेट वे जा रहे हैं हम फ्रेंड्स!" आमच्या सगळ्यांच्या ( सगळे वय वर्ष २२-२४ मधले) कौतुक आणि थोड्या असूयेने भरलेल्या नजरा झेलत हसतच त्याने कॉम्प्युटर चालू केला.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तो आल्या आल्या सगळ्यांनी सरबत्ती सुरू केली.
" कैसा था?", "लायटिंग देखा?", "फटाके कितने थे?" बाकी आमच्यातलं कोणीच आजपर्यंत ३१डी ला गेट वे ला गेलं नव्हतं.
"इतनी भीड थी, पूछ मत." (मुंबईतलं कोणी "खूप गर्दी होती" अशी कंप्लेंट करत असेल तर समजा मुंगी शिरायलाही जागा नव्हती).
"हमने देखा सब लोक एक ही डिरेक्शन मे जा रहे थे. तो हम लोग भी वोही डिरेक्शन मे चलने लगे. चलने को भी नहीं जम रहा था पीछे से लोग ढकल रहे थे.( मुंबई लोकल मध्ये असच न चालता तुम्ही आपसूकच गाडीतून स्टेशनवर उतरता). हम आगे गये तो थोडे बहुत लोग वापस आ रहे थे, वो बोले कूछ नाही है उधर वापस जाओ. उनकी कोन सूनेगा. सोचा कुछ तो रहेगाही इतने लोग जो जा रहे है. ऐसा थोडा और चलने के बाद हमने देखा की बहुत सारी पोलिस खडी थी, वो भी हात मे दंडुके लिये. जैसे ही लोग वहा पहूचते पोलिस दंडे मार मार के सबको वापस भेज रही थी."
"तुझे कितने दंडुके पडे?" ह्या आमच्या कुचक्या प्रश्नाला सहजपणे टाळून "तो हम भी वापस आ गये" म्हणत त्याने ३१डी ची गेट वें ची कहाणी आटोपती घेतली.
आम्हीही ३१डी ला गेट वे ला न जावून आपण काही गमावलेले नाही म्हणून निःश्वास टाकला.
मग संसारपर्व सुरू झाल्यावर मात्र ३१ डिसेंबर, टीव्ही वरील विशेष(रटाळ) कार्यक्रम, फॅमिली डिनर्स किंवा सोसायटीची ३१डी ची पार्टी ह्यात साजरे होऊ लागले.
अशा निरागस, बाळबोध ३१डी सेलिब्रेशन ची मालिकाच आज आठवली. त्यानिमित्ताने ते सर्व मित्र मैत्रिणी, सहकारी, बिल्डिंग मधल्या ( छान छान पदार्थ खाऊ घालणार्या सगळ्या ) काकू सगळे आठवले.
गेल्या दोन तीन वर्षांमध्ये (कोविड दरम्यान) पूर्ण जग उलट पालट झालं, celebrations आणि पार्टीचे निकष आणि नियम बदलत राहिले. तरी त्यातून मार्ग काढत उत्साही लोक ३१डी त्यांच्या त्यांच्या रीतीने साजरा करतच राहिले.
अर्थात ह्या वर्षीही तो दणक्यात साजरा होईल ह्यात अजिबात शंका नाही.
Happy New Year !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy New Year !!!

मी त्या ०. ०००१ % मध्ये.