आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का?
"चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का?
१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का?
आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले?
चपाती आंदोलनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला माहित नाहीत. अनेकांनी ह्या आंदोलनाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला परंतु एखाद्या गुप्त चळवळीचा भाग असल्यासारखी पुरेशी आणि ठोस माहिती उपलब्ध नाही. ह्या चपातीने तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीची आणि पर्यायाने इंग्रजांची झोप उडवली होती असे दिसते.
हे वर्ष आहे १८५७. त्या वेळेसचा भारत खूप वेगळा होता. १७५७ ची प्लासीची लढाई जिंकल्यानंतर कठपुतळी नवाबाला गादीवर बसवून आणि दिवाणी हक्क (the right to collect revenue) मिळवून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू होऊन १०० वर्षे झाली होती परंतु कोणीही सुखी नव्हते. राजे, महाराजे, सरदार, नवाब कंपनी सरकारचे मांडलिक झाले होते. शेतकऱ्यांचे शोषण होत होते आणि भारतीय समाजात अस्वस्थता होती. तेव्हा मेरठमधील सैनिकांनी बंड करण्याचा निर्णय घेतला त्या सर्वांना कोर्ट मार्शल करून कंपनी सरकारने तुरुंगात टाकले. पुढचा भारताच्या पाहिल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. इंग्रजांनी ह्या लढ्याला त्यांच्या इतिहासात १८५७ चा मोठा विद्रोह असे म्हटले आहे. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी खरोखरच घाबरली होती. त्यांना वाटले आता त्यांचा खेळ संपला परंतु स्वातंत्र्य लढ्याच्या आधी, काही महिन्यांपूर्वी त्यांना आणखी एका रहस्यमय गोष्टीची मोठी भीती वाटली होती, ती म्हणजे “चपाती आंदोलन” !
फ्लॅशबॅक
हे आहे फेब्रुवारी १८५७. स्वातंत्र्य संग्राम अजून काही महिने दूर आहे पण मथुरा येथे तैनात असलेल्या मार्क थॉर्नहील (Mark Thornhill) नावाच्या एका इंग्रज मॅजिस्ट्रेटला एक आश्चर्यजनक भेट मिळाली. एके दिवशी त्याला त्याच्या टेबलावर विचित्र दृश्य दिसले. काय होते ते? ते होते चार चपातीचे तुकडे. त्याला चपाती म्हणजे काय माहित असेल कि नाही शंकाच आहे. त्याने चौकशी केली तेव्हा कळले शेजारच्या गावातून एक माणूस आला आणि त्याने चपात्या गाव प्रमुखाकडे सुपूर्त केल्या व नवीन चपात्या करून पुढील गावी देण्यास सांगितले आहे. आजकालच्या जमान्यातील MLM (Multi Level Marketing) साखळी सारखे हे चपाती MLM होते का? हा एखाद्या गुप्त चळवळीचा भाग होता का? आणि जर कंपनी सरकारच्या विरोधात एखादी गुप्त चळवळ होती तर त्या मॅजिस्ट्रेटच्या टेबलवर चपात्या ठेवून त्याला माहिती देण्याची काय गरज होती? कि भारतीयांच्या राजद्रोह किंवा देशद्रोहाच्या अवगुणांप्रमाणे एखाद्याने कंपनी सरकारला हि गुप्त माहिती देऊन काही वैयक्तिक लाभ उठवण्याचा प्रयत्न केला होता? सगळेच गूढ आहे.
मार्क थॉर्नहीलने ह्या चपाती मागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्याला हा कंपनी सरकारच्या विरोधात एखाद्या कटकारस्थानाचा भाग वाटला असावा. त्याने ह्या घटनेची सखोल चौकशी करण्याचा आदेश दिला. आणि त्याला काय सापडले याचा अंदाज लावा. ह्या चपात्या केवळ मथुराच नव्हे तर दक्षिणेकडील नर्मदा नदीपासून नेपाळपर्यंत सर्वत्र जात होत्या. केवळ लहान सहान गावातूनच नव्हे तर इंदोर, ग्वाल्हेर, अलाहाबाद, दिल्ली येथून देखील अक्षरशः हजारो चपात्या वितरित केल्या जात होत्या. आणि प्रत्येक रात्री जवळजवळ 300 किलोमीटर वेगाने पुढे वाटल्या जात होत्या. या गतीची ईस्ट इंडिया कंपनीला काळजी वाटली कारण त्यांचा टपालही तितका वेगवान नव्हता. परंतु ह्या माहिती बद्दल शंका घेण्यास वाव आहे कारण एका रात्रीत एव्हढे अंतर कापणे शक्य होते का हे प्रश्न आहे. चपाती आंदोलन नक्की कोठून सुरू झाले हे अद्याप माहित नाही परंतु अज्ञात लोकं आणि कित्येकदा इंग्रजांच्या चौकीचे चौकीदार देखील कमळ किंवा बकरीचे मांस बरोबर घेऊन गावोगावी चपात्या घेऊन जात असत. कमळाचे फुल किंवा बकरीच्या मांसाचे काय प्रोयोजन होते न कळे, हे देखील एक गूढच आहे.
आता कल्पना करा की तुम्ही १८५७ च्या भारतातील इंग्रज अधिकारी आहात. तुम्हाला अशा गूढ चपात्या सर्वत्र फिरताना दिसत आहेत, तुम्ही घाबरून जाण्याची शक्यता आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की हा एका षडयंत्राचा भाग आहे. तत्कालीन मूठभर इंग्रजांविरुद्ध जर सगळे भारतीय एकत्रित उभे राहिले तर काही खैर नाही ह्याची इंग्रजांना जाणीव होती म्हणून त्यांनी ह्या चपाती आंदोलनाच्या मुळाशी जायचे ठरवले. त्यांनी गुप्त कोड, निरोप किंवा पत्रांसाठी चपात्यांची तपासणी केली, या साध्या चपात्या होत्या. लोकांकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही हाती लागले नाही. जणू सारा देशच या गूढतेत अडकला होता. त्याकाळी धोरणी इंग्रजांचे गुप्तहेर नक्कीच असावेत परंतु त्यांच्या हाती देखील काहीही माहिती लागली नाही असे दिसते त्यामुळे इंग्रज अधिकारी गोंधळलेले आणि भयभीत झालेले होते.
ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी करणारे लष्करी सर्जन, डॉ. गिल्बर्ट हॅडो (Dr. Gilbert Haddow), ह्यांनी मार्च १८५७ मध्ये ब्रिटनमधील आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात ह्या चपाती आंदोलनाच्या विचित्र चळवळीचे वर्णन वाचायला मिळते.
“There is a most mysterious affair going on throughout the whole of India at present. No one seems to know the meaning of it. It is not known where it originated, by whom or for what purpose, whether it is supposed to be connected to any religious ceremony or whether it has to do with some secret society. The Indian papers are full of surmises as to what it means. It is called the chapati movement.”
चपाती चळवळ समजून घेण्यासाठी १८५७ मधील भारताची अवस्था समजून घेणे आवश्यक आहे. तेव्हा ब्रिटीश-व्याप्त भारतातील तणाव सर्वकालीन उच्च पातळीवर होता. भारतीयांचा कंपनी सरकारवर विश्वास नव्हता, सर्वत्र भीतीचे वातावरण होते, कंपनी सरकारचा जुलूम चालू होता. असंतुष्ट भारतीय शोषक ब्रिटीश राजवटीला कंटाळलेले होते. त्यामुळे अफवा चपातींपेक्षा वेगाने पसरत होत्या. एक अफवा अशी होती की प्लासीच्या लढाईनंतर १०० वर्षांनी भारतातील परकीय राजवट संपेल आणि प्लासीच्या लढाईला १०० वर्षे पूर्ण झाली होती त्यामुळे भारतीयांना काहीतरी घडण्याची अपेक्षा असावी. दुसरी शक्यता अशी आहे कि इंग्रज हे भारतीयांच्या धर्म श्रद्धा (हिंदू आणि मुस्लिम) बदलण्याच्या प्रयत्नात होते आणि हे अंशतः खरे आहे. इंग्रज मिशनऱ्यांनी धर्म प्रसार करण्याचे काम हाती घेतले होते. त्यात नवीन आलेल्या बंदुकीच्या गोळ्यांना (ज्याचे cartridges दाताने उघडावे लागत असे) गाईची आणि डुकराची चरबी लावल्याची वदंता होती त्यामुळे सैनिकांमध्ये असंतोष होता. तिसरी शक्यता कॉलराविषयी आहे. आजूबाजूला कॉलराचा मोठा उद्रेक झाला होता. तत्कालीन समजुतीप्रमाणे कॉलरावर मात करण्यासाठी चपाती अन्न वाटप करण्याचा तोडगा कोणी सुचवला असेल आणि हे आंदोलन त्याचा परिपाक असेल काय? म्हणजे त्यात काहीही कटकारस्थान नसून केवळ एक मानवतावादी मिशन असेल काय? आणखी एका शक्यतेनुसार चपाती सारखी साधी गोष्ट वापरून गूढ वातावरण तयार करून भारतीय इंग्रजांचे मानसिक खच्चीकरण (Psychological warfare) करत होते काय? राजकीय संदेश पसरवण्यासाठी अशिक्षित बंडखोरांना लिखित माहिती देण्याऐवजी केवळ चपात्या वापरण्यात आल्या अशी इंग्रजांची धारणा असावी. परंतु त्यांनी जंग जंग पछाडून देखील ह्या मागचे गूढ उकलले नाही. पुढच्या स्वातंत्र्य लढ्याच्या पूर्वतयारीची हि सूचना तर नव्हती कारण वेल्लोरच्या बंडाच्या वेळी देखील असेच चपाती आंदोलन झाल्याचे समजते.
एकूणच, चपाती आंदोलनाने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडले होते हे खरे. चपातीवर एकही शब्द लिहिलेला नसल्यामुळे किंवा कोणतीही सांकेतिक खूण नसल्याने, चपाती आंदोलन चालवणाऱ्यांना थांबवण्याचे किंवा अटक करण्याचे कारण न मिळाल्याने इंग्रज संतापले होते. चपाती वितरित करणारे अनेकदा स्वतः पोलीस चौकीदार होते आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे, चपाती वितरित करणारे ह्या कृतीच्या उद्देशाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. चपात्या खऱ्या होत्या पण त्या कशासाठी आहेत हे कोणालाही, अगदी त्या घेऊन धावणाऱ्यालाही माहीत नव्हते हे अतिशय आश्चर्यजनक आहे.
पुढे अनेक वर्षांनंतर, Life During the Indian Mutiny या पुस्तकात, लेखक जे डब्ल्यू शेरर (J W Sherer) यांनी कबूल केले की जर ह्या रणनीतीमागील उद्देश रहस्यमय आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण करणे हा असेल, तर हा प्रयोग खूप यशस्वी झाला होता. गूढ, रहस्यमय चपाती आंदोलनाने इंग्रजांना गोंधळात टाकले होते आणि हे आंदोलन वसाहतवादी राजवटीविरुद्ध मानसिक युद्धाचे प्रभावी शस्त्र ठरले. १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम शमल्यावर इंग्रजांनी चपाती आंदोलन हि एक अर्थहीन चळवळ होती असे सांगून त्यावर पडदा टाकला मात्र चपातीने इंग्रजांना घाम फोडला होता हे नक्की. त्यानंतर इस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात येऊन ब्रिटनने भारतीय उपखंडाचा वसाहत म्हणून अधिकृतरीत्या ताबा घेतला.
सध्याच्या जमान्यातील इंग्रजांना एकेकाळी त्यांना चपाती सारख्या निरुद्रवी खाद्य पदार्थाची भीती वाटली होती हे माहित देखील नसेल. त्यांनी त्यांच्या मेन्यू मध्ये चिकन टिक्का मसाला बरोबरीने "चपाती-ब्रेड" चा स्वीकार केला आहे परंतु हि द्विरुक्ती आहे ("चाय-टी" - अजून एक उदाहरण) हे कोणीतरी त्यांना सांगायला हवे आहे.
तुम्हाला ह्या रहस्यमय आंदोलनासंदर्भात आणखी काही माहिती असेल तर जरूर सांगा.
माहितीदायकत्वास होकार लागू !!
वा ! हे रहस्यमय आंदोलन
वा ! हे रहस्यमय आंदोलन भलतेच रोचक असून आवडले !
वा ! हे रहस्यमय आंदोलन भलतेच
वा ! हे रहस्यमय आंदोलन भलतेच रोचक असून आवडले...... +१.
आधीही वाचलंय याबद्दल. रोचक
आधीही वाचलंय याबद्दल. रोचक आहे खरे पण नेमके काय तेच कळत नाही.
इंटरेस्टिंग!
इंटरेस्टिंग!
एका नाटकात की चित्रपटात याचा
एका नाटकात की चित्रपटात याचा उल्लेख होता. मला नक्की आठवत नाही, पण व्ही शांताराम यांच्या इया मराठीचिये नगरी या चित्रपटातली नायिका नाट्य अभिनेत्री असते आणि चित्रपट शेवटाकडे जात असताना तिची कंपनी झाशीच्या राणीच्या कथेवर आधारित एक नाटक करते, त्यात हे पाहिलं असेल का असं वाटतंय.
इंटरेस्टिंग! +१
इंटरेस्टिंग! +१
कुमार१, देवकी, ललिता-प्रीति,
कुमार१, देवकी, ललिता-प्रीति, तोमीन -
आवर्जून दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
अजिंक्यराव पाटील - >>>> पण नेमके काय तेच कळत नाही. >>> म्हणूनच हे आंदोलन रहस्यमय वाटते.
भरत. - हा लेख लिहिण्यासाठी
भरत. - हा लेख लिहिण्यासाठी माहिती गोळा करत असताना तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई ह्यांचा संदर्भ मिळाला होता आणि त्यांचा ह्या आंदोलनात सहभाग होता असे समजले. ह्या दोघांपैकी एक किंवा दोघांनी मिळून हे आंदोलन चालू केले असेल काय?
गॉड क्नोज् !
इंटरेस्टिंग.
इंटरेस्टिंग.
रोचक...
रोचक...
पण चपाती हात बदलत असेल तेव्हा देणारा पुढच्याला का देतोय हे सांगत नव्हता?
पण चपाती हात बदलत असेल तेव्हा
पण चपाती हात बदलत असेल तेव्हा देणारा पुढच्याला का देतोय हे सांगत नव्हता? >>>>
इंग्रजांनी कसून चौकशी केली असणार हे नक्की परंतु त्यांना कोणताही क्ल्यू मिळाला नाही म्हणे.
उगीच गंमत म्हणून गप्पीष्ट
उगीच गंमत म्हणून गप्पीष्ट-गणपतीला (Chat-GPT) चपाती आंदोलनावर कविता कर अशी आज्ञा केली तर त्याने लगेच एक कविता प्रसवली.
थोड्या व्याकरणाच्या चुका सुधारून -
चपाती आंदोलनाचे गूढ
चपाती फिरत होती गावोगावी,
गूढ तिचं होतं, कथा अनोखी दावी।
कधी कुणी नेली, कधी कुणी दिली,
शब्दांशिवाय संदेशाची तीच शैली।
साध्या कणकेच्या त्या गरम पोळ्या,
झाल्या उठावाचे मूक शस्त्र ज्या।
नाही राजा, नाही सेनापती,
जनतेच्या मनात पेटल्या ज्योती नव्या।
घरोघरी फिरली ती अद्भुत कहाणी,
ओळख पटेना, का चालली ही चालेवाणी।
द्रोणासारखी पसरली ती जाळं,
ब्रिटिशांचे मन हरवले, झाले बेजार।
कधी ती असहकार, कधी ती बंड,
चपातीचं गूढ राहिलं अनंत।
भारतीयांची एकता, एक लढाईची आस,
त्या चपातीने बांधली साऱ्यांना एकत्र खास।
आजही विचारतो इतिहास,
कोण होतं ते सूत्रधार खास?
चपाती आंदोलनाचं गूढ अजूनही उलगडलं नाही,
पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याचं स्थान कमी नाही।
धन्य ती पोळी, धन्य ती भावना,
जनतेच्या मनात उठली जळून जाणारी ज्वाला।
चपाती आंदोलनाचा हा इतिहास,
राहील सदा प्रेरणादायी, भारतीय श्वास।
कुठे, कुठे यमक जुळत नाही पण
कुठे, कुठे यमक जुळत नाही पण चालेल.
भावना पकडली गेलीय बरोबर..
मी वचलेल्या कुठल्या तरी
मी वाचलेल्या कुठल्या तरी पुस्तकात, असा निष्कर्श काढलेला की, "भिती" हा ह्या मागचा उद्देश होता आणि त्याबरोबर शोध घ्यायला लागणारा "रीसोर्स" वापर करायला लावून, मूळ स्वातंत्र लढाचे काम चालू ठेवणे. बेसिकली, ह्या शोध कामात गोर्यांना गाफिल ठेवून स्वातंत्र्यवीर आपले कार्य करणे.
आता, ते नक्की तसे करण्यात सफल झाले का? ह्याचा तपशील नाही.
एकंदर असे बरेच प्रकल्प केले.. गणेशोत्सव हाच एक सफल झाल्याचा प्रकार ज्यास्त एकीवात आहे.
या पोळ्या गावातून पुढे
या पोळ्या गावातून पुढे जायच्या हे ठीक, पण पुढे कोणाच्या तरी पोटात जायच्या की नाही? ते कोण असे? त्याबाबत काही माहिती आहे का?
Chat GPT ने आश्चर्यकारक
Chat GPT ने आश्चर्यकारक रित्या इथल्या काही सन्माननीय कविंपेक्षा चांगली कविता केली आहे.
अरे मजेशीर आहे हे..
अरे मजेशीर आहे हे..
पण कधी ऐकले नाही याबद्दल फार..
आंदोलन सुद्धा असू शकेल किंवा अंधश्रद्धा. सुद्धा असू शकेल.
आणि कधी ऐकले नाही म्हणजे कदाचित फार मोठ्या प्रमाणात हे झाले नसेल. एकाने दुसऱ्याला वाढवून चढवून सांगितले असे झाले असेल..