‘डिसेंबर’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
‘डिसेंबर’मध्ये जन्मलेल्या व्यक्ती ह्या “दृढनिश्चयी, समजूतदार, महत्त्वाकांक्षी व शिस्तप्रिय” मानल्या जातात. चालू ‘डिसेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
सय्यद मुश्ताक अली (१७-१२-१९१४) – इंदूरचे ‘मुश्ताक’ आक्रमक सलामी फलंदाज होते. त्या काळात सलामीवीरासाठी दुर्मिळ असलेल्या आक्रमकतेने ते खेळत ज्यामुळे निवड समितीला त्यांच्यावर फारसा भरवसा वाटत नसे. त्यामुळेच बहुधा त्यांच्या वाटेला फक्त ११ कसोटी आल्या ज्यात त्यांनी २ शतकांसह ६१२ धावा केल्या. मात्र त्यांच्या या धडाकेबाज खेळामुळे प्रेक्षक मात्र त्यांच्यावर खूश असत व मैदानावर त्यांचा खेळ पाहायला गर्दी लोटत असे. परदेशात कसोटी शतक करणारे ते पहिले भारतीय होते. त्यांच्याच नावे भारतातील राष्ट्रीय टी-२० स्पर्धा आयोजित केली जाते.
सुभाष गुप्ते (११-१२-१९२९) – मुंबईकर ‘गुप्ते’ अतिशय उच्च दर्जाचे लेग ब्रेक फिरकी गोलंदाज होते. फसव्या गुगलीचे प्रभावी अस्त्र बाळगणाऱ्या गुप्तेनी ३६ कसोटीत १४९ बळी घेतले. शिवाय ११५ प्रथमश्रेणी सामन्यात तब्बल ५३० बळी मिळवले. कसोटीच्या एका डावात ९ बळी तर प्रथमश्रेणी सामन्याच्या एका डावात १० बळी घेण्याची किमया त्यांनी साधली. वेस्ट इंडियन ‘कॅरोल' हिच्याशी विवाह केल्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले आणि २००२ साली त्रिनीदाद येथे निधन पावले.
अजित आगरकर (०४-१२-१९७७) – मुंबईचा ‘आगरकर’ भारतासाठी २६ कसोटी आणि १९१ एकदिवसीय सामने खेळला. ५८ कसोटी बळी घेणाऱ्या अजितने २००४ च्या अॅडलेड कसोटीत ८ बळी घेऊन भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवून दिला, तसेच २००२ च्या लॉर्डस कसोटीत अप्रतिम शतक ठोकले. १९१ वन-डे सामन्यात त्याने २८८ बळी मिळवताना १२६९ वेगवान धावा फटकावल्या. भारतासाठी वेगवान एकदिवसीय अर्धशतक आणि जलद ५० बळी घेणे हे विक्रमही त्याच्या नावावर आहेत. सध्या तो राष्ट्रीय निवड समितीचा अध्यक्ष आहे.
युवराज सिंग (१२-१२-१९८१) – योगराज सिंग या कसोटीपटूचा हा मुलगा आपल्या अतिशय शैलिदार डावखुऱ्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेटचा आणि रसिकांचा लाडका ‘युवराज’ बनला. चंदीगडच्या हा पंजाबी युवक उपयुक्त डावरा फिरकी गोलंदाज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षक देखील होता. २००७ च्या टी-२० विश्वचषकात वेगवान गोलंदाज ब्रॉडला एका षटकात ६ षटकार मारून त्याने एकच खळबळ उडवून दिली. पुढे २०११ चा वन-डे विश्वचषक भारताला मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे या स्पर्धेदरम्यानच त्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते पण त्याच्यावर यशस्वी मात करत त्याने आपली लढाऊ वृत्ती दाखवून दिली. वन-डेमध्ये तो अधिक यशस्वी झाला, ज्यामध्ये त्याने ३०४ सामन्यात ८७०१ धावा केल्या आणि १११ बळी मिळवले. बरोबरीनेच त्याने ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामन्यातही चमक दाखवली.
रविंद्र जाडेजा** (०६-१२-१९८८) – सौराष्ट्र, गुजरातचा ‘जाडेजा’ खराखुरा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. डावरा फिरकी गोलंदाज, मधल्या फळीतील फलंदाज आणि जगातला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जाडेजाने भारताला सर्वच फॉरमॅटस्-मध्ये अनेक सामने जिंकून दिले आहेत. भारतातल्या फिरकी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांवर अश्विनच्या साथीने तो धुमाकूळ घालतो आणि परदेशी फलंदाजांना जीव नकोसा होऊन जातो. आत्तापर्यंत त्याने ७७ कसोटीत ३१९ बळी घेऊन ३२३५ धावा केल्या आहेत, तर १९७ वन-डेमध्ये २२० बळी घेत २७५६ धावा केल्या आहेत. शिवाय ७४ टी-२० सामन्यातील कामगिरी आहेच. विशेष म्हणजे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन त्रिशतके आहेत.
जसप्रित बुमराह** (०६-१२-१९९३) – अहमदाबादला एका साधारण पंजाबी कुटुंबात जन्मलेला जसप्रित आज जगातला सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज गणला जातो. गोलंदाजीची विचित्र शैली, चांगला वेग, चेंडूच्या गतीमधील चतुर बदल, यॉर्कर, बाऊन्सर, स्विंग, कट अशी गोलंदाजीमधील विविध अस्त्रे आत्मसात केल्याने क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये आज तो शिर्षस्थ गोलंदाज आहे. त्याला सामोरे जाताना जगभरातल्या भल्या भल्या फलंदाजांची तारांबळ उडते. अनेकदा संघाची फलंदाजी ढेपाळूनही केवळ त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने गेल्या काही वर्षात अनेक सामने जिंकले आहेत. आत्तापर्यंत त्याने १८५ कसोटी, १४९ वन-डे आणि ८९ टी-२० बळी मिळवले आहेत.
जॅक हॉब्स (इंग्लंड : १६-१२-१८८२) – दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या सर्वात महान फलंदाजांपैकी एक म्हणून ‘हॉब्स’ यांचे नाव घेतले जाते. सलामीवीर हॉब्सनी २२ वर्षांच्या कारकिर्दीत ६१ कसोटीत ५७ च्या सरासरीने ५४१० धावा केल्या. ४६ व्या वर्षी शतक करून, शतक करणारा अधिक वयाचा खेळाडू म्हणून त्यांचा जागतिक विक्रम अजूनही कायम आहे. २९ वर्षे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत त्यांनी ८३४ सामन्यांत १९९ शतकांसह ६१,७६० धावा केल्या. हा प्रथमश्रेणी धावांचा व शतकांचा जागतिक विक्रम असून भविष्यात तो मोडला जाण्याची शक्यता फारच कमी आहे.
कॉलिन काउड्रे (इंग्लंड : २४-१२-१९३२) – वडील भारतातील चहाबागायतदार असल्याने ‘काउड्रे’चा जन्म तामिळनाडूतील ‘उटी’ येथे झाला. तो काही सामन्यात सलामीला खेळला असला तरी मुख्यत: मधल्या फळीतला फलंदाज होता. १०० कसोटी खेळणारा तो पहिला खेळाडू होता आणि १०० व्या कसोटीत शतक करण्याची किमया त्याने केली. २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने एकूण ११४ कसोटीत २२ शतकांसह ७६२४ धावा केल्या.
हनिफ मोहम्मद (पाकिस्तान : २१-१२-१९३४) – सलामीचा फलंदाज ‘हनिफ’ हा पाकिस्तानचा पहिला तारांकित खेळाडू ‘लिटल मास्टर’ म्हणून ओळखला जाई. त्याची वेस्ट इंडिजविरुद्ध १९५८ साली ९७० मिनिटांत केलेली ३३७ धावांची खेळी इतिहासातली सर्वात लांब खेळी आहे. त्याने ५५ कसोटीत १२ शतकांसह ३९१५ धावा केल्या.
रोहन कन्हाय (वेस्ट इंडिज : २६-१२-१९३५) – या भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूने कसोटीत यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळवले तरी पुढे मधल्या फळीतील शैलिदार व आक्रमक फलंदाज म्हणून क्रिकेटविश्व गाजवले. कन्हायने ७९ कसोटीत ६२२७ धावा केल्या ज्यात १५ शतके होती. आपली सर्वोच्च २५६ ही धावसंख्या त्याने भारतविरुद्ध नोंदवली. त्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण फटका म्हणजे अनेकदा वेगवान गोलंदाजांना हूक मारताना तो खेळपट्टीवर पाठीवर पडून लोळण घेत असे. गावसकर व बॉब हॉलंड यांनी कन्हायबद्दलच्या प्रेमापोटी आपापल्या मुलांचे नाव ‘रोहन’ असे ठेवले आहे.
अर्जुना रणतुंगा (श्रीलंका : ०१-१२-१९६३) – समकालीन संघांमध्ये सर्वात दुबळा संघ असणाऱ्या श्रीलंकेला ‘रणतुंगा’ने कप्तानीची धुरा स्विकारल्यावर प्रेरणास्थान बनत नव्या उंचीवर नेले. याचाच परिणाम म्हणून १९९६ मध्ये श्रीलंकेने एकदिवसीय विश्वचषक जिंकला तेव्हा तोच कर्णधार होता. मुरलीधरनच्या कठीण काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत ICC बरोबर लढा देत त्याची कारकीर्द यशस्वी करण्यात ‘अर्जुना’चा मोलाचा हातभार होता. देशाच्या पहिल्या कसोटीत खेळताना तो सर्वात तरुण अर्धशतकवीर बनला. त्याने ९३ कसोटीत ५१०५ धावा केल्या तसेच २६९ वन-डेत ७४५६ धावा केल्या व संथ मध्यमगती गोलंदाजीने ७९ बळीही घेतले.
कार्ल हूपर (वेस्ट इंडिज : १५-१२-१९६६) – आक्रमक शैलिदार फलंदाज, मध्यमगती व ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि कुशल कप्तान असणाऱ्या ‘हूपर’ने आपल्या अफाट गुणवत्तेला न्याय दिला नाही असेच मानले जाते. बराच काळ संघाच्या आत-बाहेर होऊनही त्याने १०२ कसोटीत ५७६२ धावा केल्या, ११४ बळी घेतले आणि ११५ झेल टिपले. तसेच २२७ वन-डेत ५७६१ धावा करतानाच १९३ बळी आणि १२० झेल टिपले. कसोटी आणि वन-डे दोन्हीमध्ये प्रत्येकी ५००० धावा करून १०० बळी आणि १०० झेल घेणारा तो पहिला क्रिकेटपटू होता.
रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया : १९-१२-१९७४) – ‘नमुनेदार ऑस्ट्रेलियन’ असणारा ‘रिकी’ आक्रमक फलंदाज, यशस्वी कर्णधार आणि चपळ क्षेत्ररक्षक होता. २००३ व २००७ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा तो कर्णधार होता. त्याने १६८ कसोटीत ४१ शतकांसह ५२ च्या सरासरीने १३,३७८ धावा केल्या आणि १९६ झेल घेतले. तसेच ३७५ वन-डेमध्ये ३० शतकांसह ४२ च्या सरासरीने १३,७०४ धावा ठोकल्या आणि १६० झेल घेतले.
अँड्रू फ्लिनटॉफ (इंग्लंड : ०६-१२-१९७७) – भावी ‘बोथम’ म्हणून संबोधला गेलेला अष्टपैलू ‘फ्लिनटॉफ’ तेवढी ऊंची गाठू शकला नसला तरी त्याने नवीन शतकाचे पहिले दशक बॅट व बॉलने इंग्लंडसाठी गाजवले. त्याने ७९ कसोटीत ३८४५ धावा करतानाच २२६ बळी घेतले. शिवाय १४१ वन-डेमध्ये ३३९४ धावा करत १६९ बळी घेतले. बऱ्याच वर्षानी देशासाठी २००५ ची अॅशेस मालिका जिंकण्यात त्याचा प्रमुख हातभार होता.
अलिस्टर कुक (इंग्लंड : २५-१२-१९८४) – डावखुरा सलामीवीर ‘कुक’ फार आकर्षक फलंदाज नसला तरी प्रभावी होता. आपल्या पहिल्याच आणि शेवटच्या कसोटीत (दोन्ही वेळा भारताविरुद्ध) शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. शिवाय सलग १५९ कसोटी खेळण्याचा जागतिक विक्रम त्याने केला आहे. एकूण १६१ कसोटीत ३३ शतकांसह १२,४७२ धावा कुकने केल्या आहेत. शिवाय ९२ एकदिवसीय सामन्यात ३२०४ धावा कुकने केल्या. अनेक सामन्यांत इंग्लंडचे त्याने नेतृत्वही केले.
जो रूट** (इंग्लंड : ३०-१२-१९९०) – आधुनिक ‘फॅब फोर’ पैकी एक असणारा ‘रूट’ कसोटीमध्ये सध्या इतर तिघांपेक्षा फार पुढे निघून गेला आहे. मधल्या फळीतील या महान फलंदाजाने आत्तापर्यंत १५१ कसोटीत ३६ शतकांसह ५१ च्या सरासरीने १२,८८६ धावा केल्या आहेत. सलग १२ कसोटीत ५० पेक्षा जास्त धावा करणे, १० व्या गड्यासाठी १९८ धावांची भागीदारी असे काही खास विक्रम त्याच्या नावावर आहेत. शिवाय १७१ वन-डे सामन्यांत ४८ च्या सरासरीने रूटने ६५२२ धावा ठोकल्या आहेत. अनेक सामन्यांत इंग्लंडचे कर्णधारपद त्याने यशस्वीपणे सांभाळले.
ईतर काही प्रमुख खेळाडू ::
[अ] परदेशी खेळाडू --
क्लॅरी ग्रिमेट (ऑस्ट्रेलिया : २५-१२-१८९१) – महान लेग स्पिनर. पदार्पणाच्या कसोटीत ११ बळी घेण्याचा विक्रम. ३७ कसोटीत २१६ बळी.
लेस्ली एम्स (इंग्लंड : ०३-१२-१९०५) – दुसऱ्या विश्वयुद्धापूर्वीचा महान यष्टीरक्षक-फलंदाज. ४७ कसोटीत यष्टीमागे ९७ बळी, तसेच ८ शतकांसह २४३४ धावा.
बिल ओरेली (ऑस्ट्रेलिया : २०-१२-१९०५) – महान लेग स्पिनर. दुसऱ्या महायुद्धामुळे उमेदीची वर्षे वाया. २७ कसोटीत १४४ बळी.
ट्रेव्हर बेली (इंग्लंड : ०३-१२-१९२३) – मध्यमगती गोलंदाज व चिवट फलंदाज. संथ फलंदाजीसाठी कुप्रसिद्ध. ६१ कसोटीत १३२ बळी आणि २२९० धावा.
पीटर मे (इंग्लंड : ३१-१२-१९२९) – आकर्षक फलंदाज, यशस्वी कप्तान. पहिल्याच कसोटीत शतक. ६६ कसोटीत ४५३७ धावा.
चार्ली ग्रीफीथ (वेस्ट इंडिज : १४-१२-१९३८) – वेगवान गोलंदाज, नरी कॉन्ट्रॅक्टरचे डोके फोडल्याने कुप्रसिद्ध झाला. २८ कसोटी (९४ बळी).
इंतिखाब आलम (पाकिस्तान : २८-१२-१९४१) – डावरा फिरकी गोलंदाज, उपयुक्त फलंदाज व कप्तान. ४७ कसोटी (१२५ बळी, १४९३ धावा).
डग वॉल्टर्स (ऑस्ट्रेलिया : २१-१२-१९४५) – मधल्या फळीतील फलंदाज, मध्यमगती गोलंदाज. पहिल्या दोन कसोटीत शतके. ७४ कसोटीत ५३५७ धावा, ४९ बळी.
सर्फराझ नवाझ (पाकिस्तान : ०१-१२-१९४८) – वेगवान गोलंदाज, रिव्हर्स स्विंगचा जनक मानला जातो. ५५ कसोटी (१७७ बळी), ४५ वन-डे (६३ बळी).
क्रिस ओल्ड (इंग्लंड : २२-१२-१९४८) – वेगवान स्विंग गोलंदाज. ४६ कसोटी (१४३ बळी), ३२ वन-डे (४५ बळी).
जोएल गार्नर (वेस्ट इंडिज : १६-१२-१९५२) – वेस्ट इंडिजच्या सुवर्णकाळाचा एक शिलेदार. ६’८” उंचीचा वेगवान गोलंदाज जोएल ‘बिग बर्ड’ टोपणनावाने ओळखला जाई. ५८ कसोटी (२५९ बळी), ९८ वन-डे (१४६ बळी).
जेफ लॉसन (ऑस्ट्रेलिया : ०७-१२-१९५७) – वेगवान गोलंदाज. ४६ कसोटी (१८० बळी), ७९ वन-डे (८८ बळी).
जेफ मार्श (ऑस्ट्रेलिया : ३१-१२-१९५८) – सलामी फलंदाज व यशस्वी प्रशिक्षक. ५० कसोटी (२८५४ धावा), ११७ वन-डे (४३५७ धावा). शॉन व मिचेल हे दोन मुलगेही यशस्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू.
डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया : २९-१२-१९६०) – सलामीवीर व मधल्या फळीतील फलंदाज. जाडजूड देहयष्टी व मोठ्या मिश्या यांमुळे लक्ष वेधून घेई. १०७ कसोटी (७४२२ धावा), १८१ वन-डे (५९६४ धावा).
मार्क ग्रेटबॅच (न्यूझीलंड : ११-१२-१९६३) – डावखुरा सलामीवीर. ४१ कसोटी (२०२१ धावा), ८४ वन-डे (२२०६ धावा). कसोटी पदार्पणात शतक व १९९२ चा वन-डे विश्वचषक गाजवला.
ब्रायन मॅकमिलन (दक्षिण आफ्रिका : २२-१२-१९६३) – महाकाय अष्टपैलू खेळाडू. वेगवान गोलंदाज, आक्रमक फलंदाज व जबरदस्त क्षेत्ररक्षक. ३८ कसोटी (१९६८ धावा, ७५ बळी), ७८ वन-डे (८४१ धावा, ७० बळी).
ग्रँट फ्लॉवर (झिंबाब्वे : २०-१२-१९७०) – फलंदाज व उपयुक्त डावरा फिरकी गोलंदाज. ६७ कसोटी (३४५७ धावा), २२१ वन-डे (६५७१ धावा, १०४ बळी). कसोटीत दोन्ही डावांत शतके व सलामीला येऊन डाव संपेपर्यंत नाबाद राहण्याचा विक्रम.
क्रिस मार्टिन (न्यूझीलंड : १०-१२-१९७४) – वेगवान गोलंदाज. ७१ कसोटी (२३३ बळी), २० वन-डे. खराब फलंदाजी क्षमतेमुळे नावावर विक्रमी भोपळ्यांची नोंद. कसोटीत एकूण धावांपेक्षा अधिक बळी नावावर.
मार्कस ट्रेस्कोथिक (इंग्लंड : २५-१२-१९७५) – डावखुरा आक्रमक सलामीवीर फलंदाज. ७६ कसोटी (५८२५ धावा), १२३ वन-डे (४३३५ धावा).
मार्क बाऊचर (दक्षिण आफ्रिका : ०३-१२-१९७६) – महान यष्टीरक्षक फलंदाज. १४७ कसोटी (यष्टीमागे ५५५ बळी, ५५१५ धावा), २९५ वन-डे (यष्टीमागे ४२५ बळी, ४६८६ धावा), २५ टी-२०. कसोटीमध्ये यष्टीमागे सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नावावर.
मॅथ्यू होगार्ड (इंग्लंड : ३१-१२-१९७६) – वेगवान गोलंदाज. ६७ कसोटी (२४८ बळी), २६ वन-डे.
अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान : ०२-१२-१९७९) – उपयुक्त अष्टपैलू – मध्यमगती गोलंदाज व चांगला फलंदाज. ४६ कसोटी (१९४६ धावा, १०० बळी), २६५ वन-डे (५०८० धावा, २६९ बळी), ३२ टी-२०.
दानिश कनेरिया (पाकिस्तान : १६-१२-१९८०) – हिंदूधर्मीय लेग-स्पिनर. ६१ कसोटी (२६१ बळी), १८ वन-डे. पाकिस्तानसाठी सर्वात जास्त कसोटी बळी घेणारा फिरकी गोलंदाज.
डॅरेन सॅमी (वेस्ट इंडिज : २०-१२-१९८३) – मध्यमगती गोलंदाज, उपयुक्त आक्रमक फलंदाज व यशस्वी कर्णधार. सेंट लुशिया बेटावरचा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि कर्णधार. २०१२ आणि २०१६ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या विंडीज संघाचा कर्णधार. ३८ कसोटी (१३२३ धावा, ८४ बळी), १२६ वन-डे (१८७१ धावा, ८१ बळी), ६८ टी-२० (५८७ धावा, ४४ बळी).
टीम पेन (ऑस्ट्रेलिया : ०८-१२-१९८४) – यष्टीरक्षक-फलंदाज, कप्तान. स्मिथ व वॉर्नर यांच्यावर बंदी आल्यावर ऑस्ट्रेलियाचे कठीण काळात नेतृत्व केले. ३५ कसोटी (यष्टीमागे १५७ बळी, १५३४ धावा), ३५ वन-डे, १२ टी-२०.
उस्मान ख्वाजा** (ऑस्ट्रेलिया : १८-१२-१९८६) – डावखुरा सलामीवीर. पाकिस्तानात जन्मलेला ख्वाजा ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा पहिला मुस्लिमधर्मीय खेळाडू ठरला. आतापर्यंत, ७५ कसोटीत ५४८५ धावा तर ४० वन-डेत १५५४ धावा.
मॅथ्यू वेड** (ऑस्ट्रेलिया : २६-१२-१९८७) – यष्टीरक्षक, डावखुरा फलंदाज. १६ व्या वर्षी झालेल्या कर्करोगावर मात करीत पुढे यशस्वी कारकीर्द घडवली. २०२१ च्या विश्वचषकविजेत्या टी-२० संघाचा प्रमुख घटक. आत्तापर्यन्त, ३६ कसोटी (यष्टीमागे ८५ बळी, १६१३ धावा), ९७ वन-डे (यष्टीमागे ११७ बळी, १८६७ धावा), ९२ टी-२० (यष्टीमागे ६४ बळी, १२०२ धावा).
टीम साऊदी** (न्यूझीलंड : ११-१२-१९८८) – उत्कृष्ट वेगवान स्विंग गोलंदाज. आत्तापर्यंत, १०६ कसोटी (३८९ बळी), १६१ वन-डे (२२१ बळी), १२६ टी-२० (१६४ बळी).
मॅट हेन्री** (न्यूझीलंड : १४-१२-१९९१) – वेगवान गोलंदाज. आत्तापर्यन्त, २९ कसोटी (११४ बळी), ८२ वन-डे (१४१ बळी), १८ टी-२०.
क्रेग ब्रॅथवेट** (वेस्ट इंडिज : ०१-१२-१९९२) – सलामी फलंदाज, कर्णधार. आत्तापर्यंत, ९६ कसोटीत ५८५१ धावा.
क्वींटन डी’कॉक** (दक्षिण आफ्रिका : १७-१२-१९९२) – यष्टीरक्षक, डावखुरा फलंदाज. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आफ्रिकेचा महान खेळाडू. आत्तापर्यन्त, ५४ कसोटी (३३०० धावा, यष्टीमागे २३२ बळी), १५५ वन-डे (६७७० धावा, यष्टीमागे २२६ बळी), ९२ टी-२० (२५८४ धावा, यष्टीमागे १०२ बळी).
ट्रेव्हीस हेड** (ऑस्ट्रेलिया : २९-१२-१९९३) – डावखुरा आक्रमक फलंदाज. आत्तापर्यंत, ५१ कसोटी (३४१३ धावा), ६९ वन-डे (२६४५ धावा), ३८ टी-२० (१०९३ धावा).
[ब] भारतीय खेळाडू --
जनार्दन नवले (०७-१२-१९०२) – महाराष्ट्रात फुलगाव येथे जन्मलेले ‘नवले’ यष्टीरक्षक फलंदाज होते. भारताच्या १९३२ च्या पहिल्यावाहिल्या कसोटीत ते भारताचे यष्टीरक्षक होते. इतकेच नव्हे तर सलामीला फलंदाजीला येऊन भारतीय इतिहासातला पहिला चेंडू खेळण्याचे भाग्य त्यांना मिळाले.
दत्तू फडकर (१२-१२-१९२५) – कोल्हापूरचा उंच दणकट बांध्याचा हा रांगडा गडी मधल्या फळीत येवून टोलेबाजी करे व चांगल्या गतीने स्विन्ग गोलंदाजी करे. १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी पदार्पण केले आणि जगातल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांसामोर केलेल्या धाडसी, सातत्यपूर्ण फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. ३१ कसोटीत त्यांनी २ शतकांसह १२२९ धावा केल्या आणि ६२ बळी घेतले. प्रामुख्याने मुंबईकडून प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळताना त्यांनी ८ शतकांसह ५३७७ धावा काढल्या आणि २२.०४ च्या सरासरीने ४६६ बळी घेतले.
सलीम दुर्राणी (११-१२-१९३४) – अफगाणिस्तानातील काबूल येथे जन्मलेले ‘सलीम’ नंतर जामनगर येथे स्थायिक झाले. डावखुरे अष्टपैलू सलीम मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज आणि फिरकी गोलंदाज होते. प्रेक्षकांनी मागणी करताच षटकार मारणारे खेळाडू म्हणून त्यांची ख्याती होती. एकदा त्यांना संघातून वगळल्यावर “नो दुर्राणी नो टेस्ट” म्हणून बोर्ड लागले होते, एवढी त्यांची लोकप्रियता होती. त्यांनी २९ कसोटीत ७५ बळी घेतले आणि १२०२ धावा केल्या. अर्जुन पारितोषिक मिळवणारे ते पहिले क्रिकेटपटू होते. परवीन बाबी या लोकप्रिय अभिनेत्रीचे नायक म्हणून ते एका हिंदी चित्रपटात चमकले.
हेमंत कानिटकर (०८-१२-१९४२) – अमरावतीत जन्मलेले ‘कानिटकर’ महाराष्ट्राकडून रणजी खेळताना नियमित यष्टीरक्षक म्हणून खेळत असले तरी वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी खेळताना ते निव्वळ फलंदाज म्हणून खेळले. ८७ प्रथमश्रेणी सामन्यात त्यांनी ५००६ धावा केल्या आणि यष्टीमागे ९० बळी टिपले.
दिलीप दोशी (२२-१२-१९४७) – राजकोटमध्ये जन्मलेला चष्मिस डावखुरा फिरकी गोलंदाज ‘दोशी’ बंगालकडून खेळत असे. भारताकडून संधी मिळण्याआधीच तो इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळू लागला होता. ३२ व्या वर्षी कसोटी पदार्पण करणाऱ्या दोशीने ३३ कसोटीत ११४ बळी घेतले.
सय्यद किरमाणी (२९-१२-१९४९) – चेन्नईमध्ये जन्मलेला यष्टीरक्षक ‘किरमाणी’ कर्नाटककडून खेळत असे. १९८३ च्या विश्वचषकविजेत्या एकदिवसीय संघाचा तो यष्टीरक्षक होता. त्याने ८८ कसोटीत १९८ बळी टिपले आणि २७५९ धावा केल्या. शिवाय ४९ वन-डे तो खेळला. काही भारतीय चित्रपटांमध्ये त्याने अभिनयही आजमावून बघितला.
कृष्णम्मचारी श्रीकांत (२१-१२-१९५९) – तामिळनाडूच्या श्रीकांतमध्ये सहसा सलामीवीरात न आढळून येणारी बेदरकार आक्रमकता होती. पण गावसकरबरोबर साधारण ५ वर्षे त्याची चांगली जोडी जमली. १९८३ च्या विश्वचषकविजेत्या एकदिवसीय संघाचा तो सलामीवीर होता. त्याने ४३ कसोटीत २०६२ तर १४६ वन-डेत ४०९१ धावा केल्या. काही सामन्यांत त्याने भारताचे नेतृत्वही केले.
लालचंद राजपूत (१८-१२-१९६१) – मुंबईसाठी अनेक वर्षे खोऱ्याने धावा करणारा सलामीवीर राजपूत भारतासाठी २ कसोटी आणि ४ वन-डे खेळला. नंतर प्रशिक्षक म्हणून तो जास्त यशस्वी ठरला. २००७ च्या टी-२० विश्वचषकविजेत्या भारतीय संघाचा व्यवस्थापक होता. तसेच अफगाणिस्तान, झिंबाब्वे, युएई अश्या संघांना त्याने प्रशिक्षण दिले आहे.
नयन मोंगिया (१९-१२-१९६९) – बडोद्याचा ‘नयन’ उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि सलामीपासून कुठेही खेळू शकणारा फलंदाज होता. फिरकी गोलंदाजीवर फलंदाज फसल्यास यष्टींच्या पाठीमागून येणाऱ्या नयनच्या “आई ग" या आरोळीने तो प्रसिद्ध झाला. यष्टीमागे त्याने ४४ कसोटीत १०७ तर १४० वन-डेत १५४ बळी टिपले.
मोहम्मद कैफ (०१-१२-१९८०) – उत्तर प्रदेशचा ‘कैफ’ मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज आणि अफलातून क्षेत्ररक्षक होता. १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कैफ २००२ सालात इंग्लंडमध्ये नॅट वेस्ट ट्रॉफी जिंकून दिल्याने लोकप्रिय झाला. तो एकूण १३ कसोटी आणि १२५ वन-डे खेळला.
शिखर धवन (०५-१२-१९८५) – दिल्लीचा धडाकेबाज डावखुरा सलामीवीर त्याच्या स्टाइलमुळे ‘गब्बर’ म्हणून ओळखला जाई. आपल्या पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८७ धावांची मोठी शतकी खेळी करून तो प्रकाशझोतात आला. त्याने १६७ वन-डेत ६७९३ धावा केल्या शिवाय ३४ कसोटी आणि ६८ टी-२० त्याच्या नावावर आहेत.
धवल कुळकर्णी (१०-१२-१९८८) – मुंबईकर मध्यमगती गोलंदाज ‘धवल’ भारतासाठी १२ वन-डे आणि २ टी-२० खेळला. यंदा आपल्या शेवटच्या प्रथमश्रेणी सामन्यात मुंबईला रणजी विजेतेपद जिंकून देत तो निवृत्त झाला.
पियुष चावला** (२४-१२-१९८८) – उत्तर प्रदेशचा लेग स्पिनर ‘पियुष’ने १७ व्या वर्षी भारतीय कसोटी संघात स्थान मिळवून मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या. परंतु पुढे त्याच्याकडून अपेक्षापूर्ती झाली नाही. तो केवळ ३ कसोटी, २५ वन-डे आणि ७ टी-२० खेळू शकला आहे. मात्र २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकविजेत्या भारतीय संघाचा भाग असण्याचे भाग्य त्याला लाभले.
करुण नायर** (०६-१२-१९९१) – सेहवागशिवाय भारताचा एकमेव कसोटी त्रिशतकवीर असणारा ‘करुण’ तसा दुर्दैवीच ठरला आहे. राजस्थानात जन्मलेला पण कर्नाटकात वाढलेला हा मधल्या फळीतील फलंदाज आत्तापर्यंत फक्त ६ कसोटी आणि २ वन-डे खेळू शकला आहे.
श्रेयस अय्यर** (०६-१२-१९९४) – मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज मुंबईकर ‘श्रेयस’ हा मर्यादित षटकांच्या सामन्यांत भारताचा प्रमुख खेळाडू आहे. असे असले तरी आपल्या पहिल्याच कसोटीत शतक करून त्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आतापर्यंत तो १४ कसोटी, ६२ वन-डे व ५१ टी-२० सामने खेळला आहे.
कुलदीप यादव** (१४-१२-१९९४) – कानपूरचा डावखुरा चायनामन फिरकी गोलंदाज ‘कुलदीप’ आपल्या गोलंदाजीतील कौशल्याने जगभरच्या फलंदाजांना गोंधळात टाकत असतो. पण सातत्याने संधी न मिळाल्याने त्याच्या बळींची व सामन्यांची संख्या पाहिजे तेवढी दिसत नाही. आतापर्यंत तो १३ कसोटी व ४० टी-२० खेळला असून १०६ वन-डेमध्ये १७२ बळी मिळवले आहेत.
यशस्वी जयस्वाल** (२८-१२-२००१) – उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या पण मुंबईकडून खेळणाऱ्या अवघ्या २३ वर्षांच्या ‘यशस्वी’कडे भावी विक्रमवीर, सुपरस्टार म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. पदार्पणाच्या कसोटीत १७१ धावांची शतकी खेळी करणाऱ्या यशस्वीने एका मालिकेत २ द्विशतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. आतापर्यंत तो १६ कसोटी व २३ टी-२० खेळला आहे.
( ** खेळाडू म्हणून अजून कारकीर्द चालू )
( * फलंदाज नाबाद )
( ++ सारी आकडेवारी ३०-११-२०२४ पर्यंतची )
मित्रहो, ‘डिसेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आपल्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर जरूर कळवा तसेच हा लेख आपल्या क्रिकेटप्रेमी मित्रपरिवाराला अग्रेषित करायला विसरू नका.
धन्यवाद !
- गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)