स्पर्श: एका चौकातले

Submitted by Abuva on 21 December, 2024 - 23:12
MS Designer created photo of an elderly couple crossing street

तोच रोजचा रस्ता. तोच गर्दीचा चौक. तिकडेच दुचाकी पिळत चाललो होतो. माझ्यासारखीच सकाळी कामावर निघालेली मंडळी. कुणी ऑफिसला,‌ कुणी कॉलेजला. कुणी पॅथॉलॉजी लॅबची भली मोठी बॅग पाठीला अडकवून, कुणाच्या कुरियरवाला भली मोठी बॅग पायात घेऊन. कुणी हेल्मेट घालून, कुणी टोपी घातलेलं. कुणाचे केस वाऱ्यावर लहरताहेत, तर कुणी तोंड, डोकं सगळं बांधून चाललंय. कुणी कामाच्या युनिफॉर्ममधे, कुणी फॅशनेबल फाटक्या जीन्स मध्ये. कुणाला मी ओव्हरटेक करतोय, कुणी मला डावी घालून पुढे निघतोय. बहुतेक एकटेच, पण काही दुकटे.

समोर एक सायकलवर जोडपं होतं. मागे कॅरिअरवर एका बाजूला पाय घेऊन बसलेली बायको, सायकल हापसणारा नवरा. सायकलच्या हॅंडलला त्याच्या जेवणाचा डबा. बायकोच्या काखोटीला तिची पिशवी. आजकाल अशी कष्टकरी कुटुंबं फारशी दिसत नाहीत. तीव्र उतारावर, उबडखाबड रस्त्यावर बाईंनी एक हातानं नवऱ्याचा खांदा घट्ट पकडलेला. स्पर्श आधारासाठी.

पलिकडून जाणाऱ्या मोटारसायकलवर एक मध्यमवयीन जोडपं. मोसा हाकणाऱ्या नवऱ्याच्या पोटावर पाठीची बॅग अडकवलेली. मागे बसलेली पंजाबी ड्रेस घातलेली बायको. एक हात मुडपून नवऱ्याच्या खांद्यावर. स्पर्श हक्काचा.

कालच्या पावसानंतर मागे राहिलेली पाण्याची थारोळी चुकवत जाणारे आम्ही. अपवाद एकच: एका फक्त तरुणाईसाठी बनवलेल्या मोटारसायकलवरून फर्रकन पाणी उडवत जाणारं कॉलेजवयीन युगुल. मागे बसलेली तरुणी एखाद्या वेलीनं झाडाला वेढावं तशी मोसावाल्या तरुणाला लगटलेली. स्पर्श असोशीचा.

त्याच रस्त्याने एक निर्मळ आनंद वाहात होता. एका सायकलवर दोन शालेय सवंगडी डबल सीट चालले होते. डबलसीट कसे? तर सीटवर बसलेला गडी पाय खाली मोकळे सोडून, पायडल मारणाऱ्या सवंगड्याच्या खांद्यांना पकडून बसला होता. आणि पायडलवाला? तो बसलाच नव्हता!! तो हॅंडल पकडून उभ्यानेच पायडल हापसत होता. स्पर्श निःशंक भरवश्याचा!

चौकात पोहोचलो. सिग्नल लागला. थांबले सगळे.

चौक पार करणारे आजी-आजोबा. पाठीत थोड्या वाकलेल्या आजी, एक हात ट्रॅफिक थांबवायला पुढे धरून तर दुसऱ्या हातानं कमरेतून वाकलेल्या, हातात काठी घेऊन हळूहळू चालणाऱ्या आजोबांचा दंड पकडून. स्पर्श सहजीवनाचा.

दोन-तीन वर्षांची शाळेचा गणवेश घातलेली मुलगी. नर्सरीत असेल. मोसावर पेट्रोलच्या टाकीवर बसवलेली. तिच्या मागे बसलेला मोसा चालवणारा बाप तिच्याशी गप्पा मारतोय. वाकून कान तिच्या तोंडाजवळ आणून. तिचे बोबडे बोल ऐकून हसून त्यानं तिच्या केसांतून फिरवलेला हात. स्पर्श मायेचा, कौतुकाचा.

समोरून येणाऱ्या वाहनांमध्ये एक मोटारसायकलवाला. मागच्या सीटवर कृश, वृद्ध, नववारी घातलेली, डोक्यावरून पदर घेतलेली आई, दोन्ही बाजूला पाय टाकून बसलेली. दोन्ही हातांनी मुलाचे खांदे घट्ट पकडलेले. मुलानं हलकेच एका हातानं त्यांच्या मांडीवर थोपटलं. स्पर्श आश्वस्त करणारा.

शेजारच्या फुटपाथवरून गळ्यात हात घालून मस्ती करत चाललेली शाळकरी पोरं. स्पर्श निर्व्याज मैत्रीचा.

माझ्या शेजारी थांबलेल्या आईच्या पोटाला घट्ट आवळून स्कूटरवर मागे बसलेली अशीच पाच सहा वर्षांची मुलगी. सिग्नल सुटायच्या आधी, कधी वाहनांच्या मधून, कुठे रस्त्याच्या कडेकडेने वाट काढत काढत पुढे सरकणारा एक इसम. तोल सावरता सावरता, त्या आईच्या पायाला लागलेला त्याचा पाय. स्पर्श अपघाती, अभावित.
गर्रकन फिरलेली तिची मान, चेहेऱ्यावरचा राग, आणि क्षणार्धात, तितक्याच वेगाने त्यानं तिच्या खांद्याला हात लावून केलेला नमस्कार. स्पर्श परंपरेचा, आदराचा, पश्चात्तापाचा. (या स्पर्शाला तिची ना नव्हती!)

सिग्नल सुटला.

चौकात कडेला रस्ता पार करण्यासाठी थांबलेली आठवी-दहावीतली शाळकरी मुलगी. मागून वेगात, वेडीवाकडी स्कूटर चालवत आलेली एक उद्दाम पोरांची तिकडी. मुद्दामहून तिला घासटून गेले. आणि मग हिडीस खिदळणं. स्पर्श घृणास्पद.

---

स्पर्श, एक महत्त्वाची भाषा. आईचा स्पर्श ओळखून तत्क्षणी शांत होणारं तान्हं बाळ, ते दहाव्याच्या पिंडाला 'स्पर्श' करणारा कावळा, इथपर्यंत त्याचा आवाका. अशाच स्पर्शांचं हे अभावितपणे झालेलं, एका चौकातलं, एखाद-दोन मिनिटांत झालेलं दर्शन. काही खास, काही आम, काही मनस्वी, काही बीभत्स. मानवी संबंधांचे निदर्शक.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहे. विषय आवडला.
स्पर्श कळतात, प्रत्येक स्पर्शामागचा हेतू जाणवतो, असे म्हणतात.
पण मन पूर्वग्रहदूषित असेल तर ते देखील होत नाही.

छान लिहिलं आहे.
भरत Lol
मोसा हे मला आधी गाडीच्या मॉडेलचं नाव वाटलं होतं. दुसऱ्यांदा परत आलं तेव्हा लक्षात आलं की मोटरसायकलचा शॉर्ट फॉर्म आहे.

रेव्यु,
छान लिहिले आहे! स्पर्शाच्या विविध छटा म्हणजे एक अनंतरंगी इंद्रधनुष्यच आहे... त्या विषयी सम्यकतेने लिहिणे हे कठीण‌ काम..
FWIW, आजच्या युगात स्पर्शच काय पण कुठल्याही मानवी भावनेचं प्रकटन कुंठत चाललंय..

छान!

मोसा हे मला आधी गाडीच्या मॉडेलचं नाव वाटलं होतं.
>>>>> +१ ...ते तरूण तरूणीच वर्णन आहे तेव्हा.
Lol

Nice

>>>>>>>>>>>स्पर्श, एक महत्त्वाची भाषा.
+१०१
किती सुंदर लिहीलय.
---------------
https://www.youtube.com/watch?v=uVf940pO5ME
And sometimes when we touch
The honesty's too much
And I have to close my eyes and hide
I wanna hold you 'til I die

'Til we both break down and cry
I wanna hold you 'til the fear in me subsides

लेख, ललित, साहित्य यात शॉर्टफॉर्म्स वापरू नयेत असं भरत यांचं म्हणणं असेल तर अनुमोदन.
प्रतिसाद,गप्पा यात ते ठीक आहे.

मोसा ऐवजी बाईक लिहिले असते तरी थोडक्यात काम झाले असते.
फटफटी लिहिले असते तर अजून भिडले असते.

बाकी मलाही मॉसा लक्षात आले नव्हते.
भरत यांचा प्रतिसाद सुद्धा असा का ते कळले नव्हते.
फक्त पुन्हा वर जाऊन धागा ललित लेखनातच आहे याची खात्री करून घेतली होती.

छान लिहले आहे.
शॉर्टफॉर्म्स वापरू नयेत याबाबत सहमत. सुंदर असे ओघावते लेखन वाचताना त्या 'मोसा' मुळे रसभंग होत होता.

फक्त पुन्हा वर जाऊन धागा ललित लेखनातच आहे याची खात्री करून घेतली होती. >> ललित वरून टोमणे द्यायचे ठरवले आहेत का ? भरत यांनी जे सांगितलं ते चुकीचं वाटलं नाही. पाचरीवर शेपूट ठेवून तोडून घेणार्‍या माकडांना सल्ला देणार्‍या चिमणीच्या गोष्टीची आठवण झाली.

आणखी एका ठिकाणी प्रतिसाद ललित मधे हलवा असे सांगितले होते. इतकं मनाला लागत असेल तर सतत मी कसा खटकलेलं सोडून देतो, मी असा,मी तसा हा भोपू वाजवायची काय गरज आहे ? साधा माणूस,ब्लॅक रॉबीन, एक्स मॅन आणि अन्य दोन तीन आयड्यांद्वारे अक्षरश: शिवीगाळ कोण करतं हे ठाऊकच आहे. अर्थात आपला तो बाब्या म्हणून काही काही मैलामंडळांना ते गोड लागतं. तुझ्यामुळं पोरगं बिघडलं बाई असं का म्हणतात हे कळतंय आता. Proud

धागालेखक - अवांतरासाठी क्षमा करावी.