एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं. काही दिवसांनी समजलं की, वऱ्हाडी मंडळीही माझ्याच गाडीनंच जात आहेत, पण ते वातानुकुलित श्रेणीनं जाणार होते.
दुपारी बरोबर सव्वातीनला सकरणी सिमेंटच्या जाहिरातीनं रंगलेल्या अजनीच्या WAP-7 कार्यअश्वाच्या साथीनं पुणे-अजनी एक्सप्रेसनं आपला प्रवास सुरू केला. ही गाडी अजनीपर्यंत असली तरी डिसेंबरपर्यंत तिला नागपूरपर्यंत वाढवण्यात आलं होतं. पुण्यातून बाहेर पडत असतानाच कोल्हापूरहून आलेली कोयना वाटेतच थांबलेली दिसली. तिला बहुधा पाचनंबरवर घेतलं जाणार होतं. म्हणून मधल्या सिग्नलला ती आमची गाडी पुढं जाईपर्यंत वाट पाहत उभी होती. हळुहळू घोरपडी यार्ड पार करत गाडी हडपसरच्या बाहेर येऊन थांबली. तिथं सिग्नलची वाट बघण्यात सहा मिनिटं गेली. पुन्हा हडपसरमध्ये आत गेल्यावर तिथं अर्धा मिनिटभर थांबली. त्यावेळी हडपसरमध्ये नव्या टर्मिनलचं काम संथगतीनं सुरू असलेलं दिसलं. मांजरीच्या बाहेरही पाच मिनिटं आम्ही थांबून राहिलो. मांजरी सोडताच कंटेनरवाली मालगाडी WDG-4 आणि WDG-4D अशा डिझेलवर चालणाऱ्या दोन शक्तिशाली कार्यअश्वांबरोबर पुण्याकडे गेली. लोणीमध्ये येत असताना रेल्वेची क्रेन पुण्याकडे गेली. त्याचवेळी नव्याकोऱ्या WDG-4G इंजिनांची जोडी मात्र दुसरीकडे विश्रांती घेत होती. इथं दौंडकडं जात असलेल्या कंटेनरवाल्या गाडीला आम्ही ओलांडून पुढं गेलो. आता आमच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला होता. पुन्हा पुढं पाटसमध्ये एक मालगाडी मुख्य मार्गावर उभी असल्यामुळं आम्हाला लूपवरून पुढं सरकावं लागलं. काही मिनिटांनी सोलापूर-पुणे इंटरसिटी क्रॉस झाली आणि अखेर 16.53 ला म्हणजेच 40 मिनिटं उशिरानं आम्ही दौंड कॉर्ड लाईन स्टेशनवर पोहचलो. मी दौंडची ही बाजू पहिल्यांदाच पाहत होतो.
अगदी दोनच मिनिटांमध्ये इथला थांबा आटपून आमची गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. मोठं वळण घेत गाडी भीमा नदीवरच्या पुलाकडे जात होती. त्याचवेळी दौंडमध्ये चढलेले पाच प्रवासी आमच्या इथं त्यांच्या सीट शोधत आले. मग इथं त्यांच्या आरक्षित सीट्सवर बसलेल्यांना ते उठायला सांगू लागले. त्यांच्यापैकी काही जण उठले, पण काही जण त्यांनाच उलट प्रश्न विचारू लागले होते.
मधल्या काळात आणखी एखादी जागा मोकळी होणार आहे का, याचा अंदाज घ्यायला त्या मुलीच्या आईनं सुरुवात केली होती. मलाही तिनं विचारलं, “तुम्ही कुठं जाणार आहात?” मी सांगितलं की, नागपूर. आमची गाडी संध्याकाळी 7.27 ला कोपरगावला पोहचली, तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या गोरखपूर-पुणे एक्सप्रेसमधील गर्दी पाहून माझ्या शेजारी आलेला नवा प्रवासी म्हणाला, “ती गाडी कशी जॅम पॅक्ड झाली आहे बघा!” मी त्याला म्हटलं की, बिहार, उत्तर प्रदेशकडून येणाऱ्या गाड्या कायमच अशा भरलेल्या असतात.
अंकाई स्टेशन जवळ आल्यावर अंधारातही बाहेर डोंगर दिसत होता. अंकाई किल्ल्याच्या स्थानकात लूप लाईनवर डिझेल इंजिनांसह उभ्या असलेल्या मालगाडीला ओलांडून आमची गाडी मनमाडकडे गेली. रात्री 8.24 ला गाडी मनमाडला पोहचली. गाडी थांबत असतानाच शेजारच्या तीन नंबरवरून कोळशाची मालगाडी आकाशी रंगाच्या 2 WAG-7 कार्यअश्वांसह मुंबईच्या दिशेनं धडाडत गेली. त्यावेळी होत असलेला खडखडाट नेहमीप्रमाणंच खूप रोमांचक वाटत होता. त्यानंतर थोड्याच वेळात 8.31 ला आमच्या गाडीनं मनमाड सोडलं.
आता मनमाडहून तिहेरी मार्ग सुरू झाला होता आणि गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली होती. मनमाडनंतर पाचच मिनिटांनी पुढच्या पाणेवाडी स्टेशनमध्ये पनवेल-गोरखपूर एक्सप्रेसला ओव्हरटेक केलं आणि त्याचवेळी शेजारून कोल्हापूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस मनमाडकडे गेली. पुढच्या हिसवाल स्टेशनमध्ये परत एका मालगाडीला आम्ही ओव्हरटेक केलं.
रात्री 10.11 ला ऐतिहासिक हावडा-मुंबई मेल क्रॉस झाली, तेव्हा आमची गाडी जरा हळू धावू लागली होती. त्यानंतर 22.16 ला जळगाव जंक्शन ओलांडत असताना शेजारच्या प्लॅटफॉर्मवर उभी असलेली नागपूरहून मुंबईकडे निघालेली सेवाग्राम एक्सप्रेस दृष्टीस पडली. शेवटी 22.42 ला आमची गाडी भुसावळमध्ये पोहचली. इथं आमचा जवळजवळ निम्मा प्रवास संपला होता. बाहेर आमच्या डब्यासमोरच उभ्या असलेल्या वेफर्सवाल्याकडून आमच्यापैकी बऱ्याच जणांनी भरपूर पुडे खरेदी केले होते. भुसावळच्या एका फलाटाकडे मला लांबूनच स्थानकाच्या जुन्या इमारतीचा भागही दिसत होता. अलीकडेच त्यावर वेगवेगळ्या रंगात रेखाटनं केलेलं दिसत होतं.
आठ मिनिटांनंतर भुसावळचा थांबा आटपून आमची गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. आता डब्यात प्रवाशांची हळुहळू निद्रेची तयारी सुरू झाली होती. दौंडमध्ये आलेल्यांचीही आता झोपण्याची तयारी सुरू झाली होती.
भुसावळला माझ्या समोरच्या सीटवर आलेल्या दोन तरुणांची समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणावर चर्चा रंगत चालली होती. त्याचदरम्यान मध्यरात्री बारा वाजून तीन मिनिटांनी नांदुराचा थांबा आवरून आमची गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. 00.13 ला जालंब जंक्शनही वेगात ओलांडत असताना पलिकडच्या फलाटावर आमच्यासाठी सेवाग्राम एक्सप्रेसला रोखून धरण्यात आलेलं होतं.
अकोल्यानंतर आमच्या गाडीनं पुन्हा वेग धरला. गाडीत आता बरेच जण गाढ निद्रेत होते. स्टेशनमागून स्टेशन पार करत आमची गाडी सुसाट निघाली होती. शेजारून अकोला/भुसावळच्या दिशेनंही गाड्या सुसाट जात होत्या. मध्यरात्री 1.15 ला मुर्तिजापूर जंक्शनही वेगातच ओलांडलं. त्यानंतर पाचएक मिनिटांनी अचानक गाडीत कोणी तरी चेन ओढल्यासारखा ब्रेक प्रेशरचा आवाज झाला. माझ्या मनात आलं की, अकोला जाऊन बराच वेळ झाला आहे, मग आत्ता चेन कोणी आणि कशासाठी ओढली असेल. जवळजवळ 120 च्या वेगानं पळत असलेली गाडी अचानक थांबू लागली होती. वेग खूप असल्यामुळं ती मुर्तिजापूरच्या पुढच्या माना स्टेशनच्या बाहेर जाऊन थांबली. काय झालं असेल, अशा विचारानं मी खिडकीतून डोकावून बाहेर बघत होतो, तेव्हा पुढं बारीकबारीक लाईट दिसत होते आणि तिथं काही लोकं काहीतरी शोधत आहेत असं वाटत होतं. त्यानंतर तीन तास 20 मिनिटं गाडी थांबून होती. शेवटी सगळं ओके आहे लक्षात आल्यावर गाडी निघाली आणि तिनं लगेचच पुन्हा पहिल्यासारखा वेग घेतला.
वर्ध्यापासून उगवत्या सूर्याच्या साक्षीनं प्रवास सुरू झाला होता. सेवाग्रामपासून चौपदरी मार्ग सुरू झाला होता. काही ठिकाणी त्याचं काम पूर्ण व्हायचं होतं. डब्यामधले बरेच जण आता उठले होते. मध्यरात्री झालेल्या प्रकाराची काहींना कल्पना होती, तर काहींना त्याचा पत्ताही नव्हता. दौंडपासून बसलेल्यांमधल्या बाईंनी बरच्या बाजूला झोपलेल्या त्यांच्या भावाला सांगितलं की, गाडी रात्री दीड तास एकाच जागी थांबून होती. तो म्हणाला की, त्याला झोप लागली असल्यामुळं समजलं नाही. गारेगार थंडीत खिडकीतून येत असलेलं कोवळं ऊन अंगावर घेत आणि संपूर्ण परिसर 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच न्याहाळत माझा प्रवास सुरू होता. शेवटी आमची गाडी सकाळी 7.53 ला गाडी नागपूर जंक्शनच्या 4 नंबरच्या फलाटावर दाखल झाली. एकूणच असं वाटत होतं की, गाडी घसरवण्याच्या उद्देशानं कोणी तरी हे केलेलं तर नसेल. कारण सध्या असे प्रकार होताना दिसत आहेत.
https://avateebhavatee.blogspot.com/2024/11/1.html
https://avateebhavatee.blogspot.com/2024/12/2.html
बापरे, मुद्दाम रुळांवर
बापरे, मुद्दाम रुळांवर काहीतरी टाकुन गाडी घसरवतात? हे तुमच्या गाडीला कसे कळले?
न घडलेला अपघात हा दहाव्या
न घडलेला अपघाता संबंधित माहिती दहाव्या परिच्छेदात ( शेवटून दुसरा ) आहे.
प्रवास डोळ्यासमोर आला.
प्रवास डोळ्यासमोर आला. रेल्वे बद्दल तुमची माहिती कौतुकास्पद आहे.
बापरे अवघड आहे हे. अपघात झाला
बापरे अवघड आहे हे. अपघात झाला नाही हे खूप चांगले आहे. प्रवासाचे वर्णन आवडले.
रुळांवर काही अडथळे टाकून
रुळांवर काही अडथळे टाकून गाड्या घसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या अनेक घटना 2024 मध्ये समोर आल्या आहेत.
खरंच अवघड आहे.
खरंच अवघड आहे.
अपघात झाला नाही हे खूप चांगले आहे. >> +१
नागपूरला ऑगस्ट २४ मधे जाणं झालं होतं. पुढच्या वेळी हेच आठवेल
तुमच्या ब्लॉग वर तुम्ही
तुमच्या ब्लॉग वर तुम्ही व्यवस्थित काय झालं लिहिलं आहे आणि इथे एका ओळीत ३ तास २० मिनिटांनी गाडी सुटली लिहिलंय. अनवधानाने निसटले आहे का?