‘नोव्हेंबर’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘क्रीडाशौकीन, निरोगी, विश्वासू, देखण्या व शिस्तप्रिय’ मानल्या जातात. चालू ‘नोव्हेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
व्ही.व्ही.एस.लक्ष्मण (०१-११-१९७४) – अतिशय उच्च दर्जाचा, कलात्मक, नेत्रसुखद हैद्राबादी फलंदाज ‘लक्ष्मण’ सातत्याच्या अभावामुळे महान होता होता राहिला. डॉक्टर माता-पित्यांच्या या हुशार मुलाने क्रिकेटमधील करियरसाठी बारावीनंतर संधी असूनही वैद्यकीय शिक्षणाची वाट सोडून दिली. अनेक संस्मरणीय खेळ्या करून त्याने भारताला विजयपथावर नेण्याबरोबरच नजाकतभऱ्या खेळाने क्रिडाप्रेमींची मने जिंकली, ज्यामुळे त्याच्या नावातील आद्याक्षरांच्या सहाय्याने (VVS) त्याला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ असे संबोधले जाते. सर्वात अजरामर आहे ती २००१ सालची कलकत्ता कसोटीतील ऑस्ट्रेलिया-विरुद्धची पराभावाच्या छायेतील २८१ धावांची खेळी आणि द्रविडबरोबरची ३७६ धावांची भागीदारी ज्याने भारताला अतर्क्य असा सामनाविजय आणि पुढे मालिकाविजय मिळवून दिला. २००० साली अशीच एक अविश्वसनीय खेळी करताना त्याने सिडनी येथे भारत सर्वबाद २६१ होत असताना एकट्याने १६७ धावा चोपून काढल्या. एकूण १३४ कसोटीत त्याने ८,७८१ धावा तर ८६ वन-डेमध्ये २,३३८ धावा काढल्या. निवृत्तीनंतर आता तो प्रशिक्षणाच्या क्षेत्रात ठसा उमटवत आहे.
सुरेश रैना (२७-११-१९८६) – स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारा रैना मूळ काश्मिरी पंडित आहे. मधल्या फळीतील आक्रमक डावखुरा फलंदाज आणि अतिशय चपळ क्षेत्ररक्षक असणाऱ्या रैनाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी केली. त्याने २२६ वन-डेमध्ये ९४ च्या स्ट्राइक रेटने ५,६१५ धावा केल्या तर ७८ टी-२० सामन्यांत १३५ च्या स्ट्राइक रेटने १,६०५ धावा केल्या. टी-२० मध्ये शतक करणारा तो पहिला भारतीय होता. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघातही त्याचा समावेश होता. पदार्पणाच्या कसोटीत शतक करून धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या रैनाची पुढे कामगिरी ढेपाळल्याने केवळ १८ कसोटी खेळला. २०१८ साली अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यावर २०२२ साली त्याने काहीशी अकाली निवृत्ती पत्करली.
विराट कोहली** (०५-११-१९८८) – भारताच्या गावस्कर, तेंडुलकर या महान फलंदाजांची परंपरा पुढे चालवणारा सध्याचा खेळाडू म्हणजे ‘विराट’. फलंदाजीतील कौशल्याबरोबरच अत्युच्च तंदुरुस्ती, महत्त्वाकांक्षा, जिद्द, आक्रमकता, मनोनिग्रह यांसाठी विराट एक मापदंड बनला आहे. अतुलनीय क्रीडाकौशल्य आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व यांमुळे तो युवापिढीसाठी ‘युथ आयकॉन’ ठरला आहे. किंग, रन-मशीन अश्या अनेक उपाध्या त्याला मिळाल्या आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी रणजी सामना खेळत असताना वडिलांचे निधन झाल्यावर त्यांचे क्रियाकर्म करून लगेच दुसऱ्या दिवशी तो संघासाठी मैदानात उतरला तेव्हाच ‘हे काही वेगळेच पाणी आहे’ हे अनेकांनी ताडले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि विशेषत: धावांचा पाठलाग करताना तो खरोखरच ‘किंग’ असतो. भारताला त्याने किती वन-डे आणि टी-२० सामने जिंकून दिले याची गणतीच नाही. २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो प्रमुख घटक होता. कर्णधार म्हणूनही तो भरपूर यशस्वी ठरला, त्याच्या आक्रमकतेने संघाला एक वेगळी दिशा दिली आणि भारताला विदेशातही जिंकण्याची सवय लावली. आत्तापर्यन्त – एका वन-डे मालिकेत सर्वाधिक ७६५ धावा (२०२३ विश्वचषक), वन-डेत सर्वात जलद १३,००० धावा, टी-२० मध्ये सर्वाधिक मालिकावीराचा बहुमान, टी-२० मध्ये सर्वात जास्त अर्धशतके, ८१ आंतरराष्ट्रीय शतके असे अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत आणि, आणखी किती विक्रम तो मोडणार व तेंडुलकरला मागे टाकणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हर्बर्ट सटक्लिफ (इंग्लंड : २४-११-१८९४) – दोन विश्वयुद्धांच्या दरम्यान कारकीर्द घडलेल्या ‘सटक्लिफ’ यांची सर्वकालीन महान फलंदाजांमध्ये गणना होते. यॉर्कशायरचे सटक्लिफ हे सलामीवीर होते, जे त्यांच्या उच्च दर्जाबरोबरच तंत्रशुद्धता, एकाग्रता, कलात्मकता या गुणांसाठी ओळखले जात. जॅक हॉब्स आणि लेन हटन या आणखी दोन महान फलंदाजांबरोबर त्यांची जोडी चांगली जमे. त्यांनी ५४ कसोटीत ६०.७३ च्या सरासरीने ४,५५५ धावा केल्या. शिवाय ७५४ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये १५१ शतकांसह ५०,६७० धावा करण्याची अचाट कामगिरी केली.
हेराल्ड लारवूड (इंग्लंड : १४-११-१९०४) – मध्यम उंचीचा लारवूड अतिशय वेगवान गोलंदाजी टाकत असे, शिवाय आखूड टप्प्याची गोलंदाजी करून फलंदाजांना घाबरवत असे. १९३२-३३ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इंग्लिश कप्तान डग्लस जार्डीनने त्याचा उपयोग तेव्हा रन-मशीन बनलेल्या डॉन ब्रॅडमन यांना व बलवान ऑस्ट्रेलिया संघाला अटकाव घालण्यासाठी करायचे ठरवले. संपूर्ण दौऱ्यात लारवूडने व्होसच्या साथीने आखूड टप्प्याची, शरीरवेधी वेगवान गोलंदाजी करत, बाऊन्सर्स व बीमर्स यांचा मारा करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना शेकवून काढले. परिणामी इंग्लंडने ती मालिका ४-१ ने जिंकली, शिवाय ब्रॅडमन यांची सरासरी ५६ इतकी मर्यादित राहिली. मात्र जार्डीन व लारवूडच्या या वादग्रस्त योजनेमुळे नंतर दोन देशांतील संबंध बिघडले आणि ऑस्ट्रेलियाच्या राजकीय दबावामुळे लारवूडने माफीपत्र लिहून द्यावे अशी मागणी पुढे येऊ लागली. मात्र कप्तान जार्डीनला यात मोकळे सोडल्याने लारवूडने क्षमापत्र लिहिण्यास नकार दिला. यामुळे लारवूडची कारकीर्द तेथेच संपुष्टात आली. त्याने २१ कसोटीत ७८ बळी मिळवले. पण विशेष म्हणजे हाच लारवूड पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला आणि तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला.
किथ मिलर (ऑस्ट्रेलिया : २८-११-१९१९) – दुसऱ्या महायुद्धानंतरच्या दशकातला ‘मिलर’ हा उत्कृष्ट ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू होता. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज या दुहेरी नात्याने त्याने हा काळ गाजवला. त्याने ५५ कसोटीत २३ च्या सरासरीने १७० बळी मिळवले आणि ७ शतकांसह जवळपास तीन हजार धावा केल्या. आकर्षक व्यक्तिमत्वाचा मिलर काही जाहिरातींमधूनही झळकला. क्रिकेटर बनण्याआधी त्याने दुसऱ्या महायुद्धात लढाऊ वैमानिक म्हणूनही कामगिरी बजावली होती.
केन बॅरिंग्टन (इंग्लंड : २४-११-१९३०) – मधल्या फळीतील महान फलंदाज ‘बॅरिंग्टन’ याची कारकीर्द ३७ व्या वर्षी हृदयविकाराच्या आजाराने अकस्मात संपुष्टात आली. सुरुवातीला आक्रमक फलंदाज असणाऱ्या ‘बॅरिंग्टन’ने संघातून वगळले गेल्यावर शैलीत आमूलाग्र बदल केला आणि नंतर संघात पुनरागमन केल्यावर निवृत्तीपर्यन्त संथ, चिवट फलंदाजीसाठी कुप्रसिद्ध झाला. त्याने एकूण ८२ कसोटीत ५८.६७ च्या सरासरीने ६,८०६ धावा केल्या. सहा हजारपेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये केवळ ब्रॅडमन यांचीच सरासरी यापेक्षा जास्त आहे, यावरून ‘बॅरिंग्टन’ची महती कळावी. १९८१ साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर सहाय्यक व्यवस्थापकाच्या भूमिकेत असताना त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने ५० व्या वर्षी अकाली मृत्यू झाला.
इम्रान खान (पाकिस्तान : २५-११-१९५२) – १९७० आणि १९८० च्या दशकांत क्रिकेटविश्व गाजवणाऱ्या अष्टपैलू चौकडीतील प्रमुख सरदार म्हणजे देखणा, ऑक्सफर्डचा पदवीधारक, अप्रतिम वेगवान गोलंदाज, आक्रमक फलंदाज आणि मातब्बर कर्णधार ‘इम्रान खान’. पाकिस्तानी क्रिकेट संघ, बोर्ड, व्यवस्थापन यामध्ये त्याचा अफाट असा दबदबा होता ज्याच्या जोरावर बहुतेक बाबतीत त्याचा शब्द अखेरचा असे. अनेक काळ त्याने पाकिस्तानचे नेतृत्व केले आणि कसोटी व वन-डे अश्या दोन्ही प्रकारात संघाला चांगले यश मिळवून दिले. १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा तोच कर्णधार होता. एकूण ८८ कसोटीत त्याने ३८ च्या सरासरीने ३,८०७ धावा केल्या आणि केवळ २३ च्या सरासरीने ३६२ बळी मिळवले. शिवाय १७५ वन-डे सामन्यात ३,७०९ धावा करतानाच १८२ बळी मिळवले. याच इम्रानने पुढे राजकारणात प्रवेश केला, स्वत:चा पक्ष स्थापन केला आणि पाकिस्तानचे पंतप्रधानपदही भूषवले.
इयान बोथम (इंग्लंड : २४-११-१९५५) – १९७७ ते १९९२ या काळात आपल्या अष्टपैलू खेळाने क्रिकेटजगात ठसा उमटवणारा गुणवान बोथम बहुचर्चित अष्टपैलू चौकडीतील इतर तिघांप्रमाणे शिस्तबद्ध मात्र नव्हता. तडाखेबंद फलंदाज, उत्कृष्ट वेगवान स्विंग गोलंदाज आणि चपळ स्लिप क्षेत्ररक्षक असणारा बोथम बेधुंद जीवनशैली, व्यसनाधीनता, बेशिस्तपणा, तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष इत्यादि दुर्गुणांमुळे आपल्या गुणवत्तेनुसार अधिक यशोशिखरे गाठू शकला नाही. तरीही त्याने १०२ कसोटीत १४ शतकांसह ५,२०० धावा केल्या, ३८३ बळी मिळवले आणि १२० झेल घेतले. शिवाय ११६ वन-डे सामन्यांत २,११३ धावा करतानाच १४५ बळी मिळवले. १९८० साली भारताविरुद्ध मुंबई येथे एकाच कसोटीत शतक आणि १० पेक्षा अधिक (१३) बळी अशी किमया साधणारा तो दुसराच खेळाडू बनला.
गॅरी कर्स्टन (दक्षिण आफ्रिका : २३-११-१९६७) – आफ्रिकेचा डावखुरा सलामीवीर कर्स्टन शैलिदार खेळापेक्षा चिवट व परिणामकारक खेळासाठी ओळखला जाई. १९९६ च्या एकदिवसीय विश्वचषकात यु.ए.ई. विरुद्ध १८८* च्या विक्रमी खेळीने तो प्रकाशझोतात आला. १९९९ साली त्याने इंग्लंडविरुद्ध केलेली ८७८ मिनिटांत २७५ धावांची खेळी इतिहासात मिनिटांच्या हिशोबात दुसरी सर्वात संथ खेळी आहे. त्याने १०१ कसोटीत ७,२८९ तर १८५ वन-डेत ६,७९८ धावा केल्या. निवृत्तीनंतर तो प्रशिक्षक झाला आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली भारताने २०११ चा वन-डे विश्वचषक जिंकला. पुढे तोच कोच असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला.
अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया : १४-११-१९७१) – डावखुरा धडाकेबाज फलंदाज आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक गिलख्रिस्ट हा २००० नंतरच्या जगजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा प्रमुख अंग होता. त्याची फलंदाजी अगदी ‘तोडफोड’ पद्धतीची होती आणि त्याने गोलंदाज अगदी नामोहरम होऊन जात. ‘हिली’सारखा दर्जेदार यष्टीरक्षक आधीच संघात असल्याने त्याला कसोटीत बऱ्याच उशिरा संधी मिळाली. पण १९९९, २००३ आणि २००७ अश्या तीन वन-डे विश्वचषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याने २८७ वन-डे मध्ये ९७ च्या स्ट्राइक रेटने ९,६१९ धावा कुटल्या आणि यष्टीमागे तब्बल ४७२ बळी टिपले. त्याचबरोबर ९६ कसोटीत ४८ च्या सरासरीने ५,५७० धावा ठोकल्या आणि यष्टीमागे विक्रमी ४१६ बळी टिपले. काही सामन्यात त्याला नेतृत्वाचीही संधी मिळाली आणि २००४-०५ च्या दौऱ्यात तोच कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने भारताला भारतात नमवण्याची किमया साधली.
वकार युनूस (पाकिस्तान : १६-११-१९७१) – १९८९ साली भारताविरुद्ध सचिनच्या साथीने कसोटी पदार्पण करणारा वकारने दीड दशक आपल्या उच्च दर्जाच्या वेगवान गोलंदाजीने क्रिकेटजगत गाजवले आणि पाकिस्तानला अनेक विजय मिळवून दिले. सुरवातीला अति-वेगवान गोलंदाजी आणि अचूक यॉर्कर यांच्या जोरावर त्याने फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आणि अनेक फलंदाजांची पाऊले व टाचा चेचून टाकली. कालांतराने वेग काहीसा कमी झाल्यावर स्विंग व रिव्हर्स स्विंग यांच्या जोरावर खोऱ्याने बळी मिळवले. त्याने ८७ कसोटीत ३७३ बळी मिळवले ज्यात डावात ५ बळी २२ वेळा तर सामन्यात १० बळी ५ वेळा होते. त्याशिवाय २६२ वन-डेत तब्बल ४१६ बळी घेतले.
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया : ०८-११-१९७६) – आधुनिक काळातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून शोएब अख्तर बरोबर ‘ली’चे नाव घेतले जाते. १६० किमी प्रती तास या वेगाने गोलंदाजी करू शकणारा ‘ली’ वेग, यॉर्कर, बाऊन्सर्स या आयुधांनी फलंदाजांचे जगणे अवघड करून टाकत असे. वन-डेमध्ये सर्वात जलद ३५० बळी घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. २००३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग राहिला. सततच्या दुखापतींनी त्याच्या सामन्यांवर व बळींवर मर्यादा आली. तरीपण ७६ कसोटीत ३१० बळी आणि २२१ वन-डेत ३८० बळी अशी त्याची नेत्रदीपक कामगिरी राहिली.
ईतर काही प्रमुख खेळाडू ::
[अ] परदेशी खेळाडू :--
व्हिक्टर ट्रंपर (ऑस्ट्रेलिया : ०२-११-१८७७) – पहिल्या महायुद्धापूर्वीचा महान व आकर्षक फलंदाज. सलामी बरोबरच मधल्या फळीतही खेळत असे. ४८ कसोटीत ३१६३ धावा.
बर्ट सटक्लिफ (न्यूझीलंड : १७-११-१९२३) – डावखुरा सलामीवीर व मधल्या फळीतील फलंदाज. ४२ कसोटीत २७२७ धावा.
फ्रेड टिटमस (इंग्लंड : २४-११-१९३२) – ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज. ५३ कसोटी (१५३ बळी, १४४९ धावा).
रॉय फ्रेड्रिक्स (वेस्ट इंडिज : ११-११-१९४२) – डावखुरा सलामी फलंदाज. ५९ कसोटी (४३३४ धावा).
मुश्ताक महम्मद (पाकिस्तान : २२-११-१९४३) – मधल्या फळीतील फलंदाज, लेगब्रेक गोलंदाज. ५७ कसोटी (३६४३ धावा, ७९ बळी). रिव्हर्स स्वीप फटक्याचा जनक मानला जातो.
रॉडनी मार्श (ऑस्ट्रेलिया : ०४-११-१९४७) – महान यष्टीरक्षक-फलंदाज. ९६ कसोटी (यष्टीमागे ३५५ बळी, ३६३३ धावा), ९२ वन-डे (यष्टीमागे १२४ बळी, १२२५ धावा).
ग्रॅमी वूड (ऑस्ट्रेलिया : ०६-११-१९५६) – डावखुरा सलामी फलंदाज. ५९ कसोटी (३३७४ धावा), ८३ वन-डे (२२१९ धावा).
मर्व्ह ह्युजेस (ऑस्ट्रेलिया : २३-११-१९६१) – महाकाय देहाचा, भरघोस मिशांचा वेगवान गोलंदाज. ५३ कसोटी (२१२ बळी), ३३ वन-डे.
रीडले जेकब्स (वेस्ट इंडिज : २६-११-१९६७) – यष्टीरक्षक. ६५ कसोटी (यष्टीमागे २१९ बळी, २५७७ धावा), १४७ वन-डे (यष्टीमागे १८९ बळी, १८६५ धावा). कसोटीत एका डावात यष्टीमागे ७ तर एका वन-डेमध्ये ६ बळी घेण्याचा विक्रम.
अँड्रू कॅडीक (इंग्लंड : २१-११-१९६८) – वेगवान गोलंदाज. ६२ कसोटी (२३४ बळी), ५४ वन-डे (६९ बळी).
रोमेश कालूविथराणा (श्रीलंका : २४-११-१९६९) – यष्टीरक्षक-फलंदाज. ४९ कसोटी (१९३३ धावा, यष्टीमागे ११९ बळी). १८९ वन-डे (३७११ धावा, यष्टीमागे २०७ बळी). १९९६ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा हिरो.
जस्टिन लॅंगर (ऑस्ट्रेलिया : २१-११-१९७०) – डावखुरा सलामीवीर व मधल्या फळीतील फलंदाज. १०५ कसोटी (७६९६ धावा).
मार्वान अट्टापट्टू (श्रीलंका : २२-११-१९७२) - सलामी व मधल्या फळीतील फलंदाज, कर्णधार. पहिल्या ६ कसोटी डावांत ५ भोपळ्यांसह १ धाव अशी कारकिर्दीला भयानक सुरुवात झालेल्या ह्या आकर्षक फलंदाजाने नंतर ६ द्विशतकांसह संघासाठी भरपूर धावा केल्या. ९० कसोटी (५५०२ धावा), २६८ वन-डे (८५२९ धावा).
नील मॅकेन्झी (दक्षिण आफ्रिका : २४-११-१९७५) – सलामी व मधल्या फळीतील फलंदाज. ५८ कसोटी (३२५३ धावा), ६४ वन-डे (१६८८ धावा). ग्रॅमी स्मिथबरोबर बांगलादेशविरुद्ध सलामीसाठी ४१५ धावांची जागतिक विक्रमी भागीदारी.
सकलेन मुश्ताक (पाकिस्तान : २७-११-१९७६) – जादुई ‘दुसरा’ चेंडू टाकणारा ऑफ-स्पिनर. ४९ कसोटी (२०८ बळी), १६९ वन-डे (२८८ बळी). कसोटीत सलग दोनदा सामन्यात १० बळी, वन-डेमध्ये १९९७ साली वर्षात सर्वाधिक ६९ बळी मिळवण्याचा विक्रम, वन-डेमध्ये सर्वात जलद २५० बळी मिळवण्याचा विक्रम.
युनिस खान (पाकिस्तान : २९-११-१९७७) – मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज, कप्तान. ११८ कसोटी (१०,०९९ धावा, ३४ शतके, १३९ झेल), २६५ वन-डे (७२४९ धावा, १३५ झेल), २५ टी-२०. कसोटी पदार्पणात शतक व श्रीलंकेविरुद्ध त्रिशतक.
जेम्स फ्रॅंकलिन (न्यूझीलंड : ०७-११-१९८०) - डावखुरा मध्यमगती गोलंदाज, उपयुक्त फलंदाज. ३१ कसोटी (८२ बळी), ११० वन-डे (८१ बळी, १२७० धावा), ३८ टी-२०.
मिचेल जॉन्सन (ऑस्ट्रेलिया : ०२-११-१९८१) – डावखुरा वेगवान गोलंदाज. ७३ कसोटी (३१३ बळी, २०६५ धावा), १५३ वन-डे (२३९ बळी), ३० टी-२०.
पीटर सिडल (ऑस्ट्रेलिया : २५-११-१९८४) – वेगवान गोलंदाज. ६७ कसोटी (२२१ बळी), २० वन-डे. २६ व्या वाढदिवशी इंग्लंडविरुद्ध टेस्ट हॅटट्रिक घेतली.
देवेंद्र बिशू (वेस्ट इंडिज : ०६-११-१९८५) – भारतीय वंशाचा लेग स्पिनर. ३६ कसोटी (११७ बळी), ४२ वन-डे (३८ बळी).
नाथन लायन** (ऑस्ट्रेलिया : २०-११-१९८७) –ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज. या अत्यंत यशस्वी व दर्जेदार गोलंदाजाने आतापर्यंत १२९ कसोटीत ५३० बळी मिळवलेत.
फिल ह्युजेस (ऑस्ट्रेलिया : ३०-११-१९८८) – गुणवान डावखुरा सलामीवीर. २०१४ साली अवघ्या २६ व्या वर्षी स्थानिक सामन्यात डोक्याला चेंडू लागल्याने दुर्दैवी मृत्यू. २६ कसोटी, २५ वन-डे. दुसऱ्याच कसोटीत दोन्ही डावात शतके आणि पदार्पणाच्या वन-डेत शतक.
दिनेश चंडीमल** (श्रीलंका : १८-११-१९८९) – यष्टीरक्षक-फलंदाज, कप्तान. आतापर्यंत ८४ कसोटी (५८६३ धावा, १०२ झेल+यष्टीचीत), १५७ वन-डे (३८५४ धावा, ७० झेल+यष्टीचीत), ६८ टी-२०.
जेसन होल्डर** (वेस्ट इंडिज : ०५-११-१९९१) – मध्यमगती गोलंदाज, उपयुक्त फलंदाज, कप्तान. आतापर्यंत ६९ कसोटी (१६२ बळी, ३०७३ धावा), १३८ वन-डे (१५९ बळी, २२३७ धावा), ६३ टी-२०.
हेन्री निकल्स** (न्यूझीलंड : १५-११-१९९१) – मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज. आतापर्यंत ५६ कसोटी (२९७३ धावा), ७८ वन-डे (२११६ धावा).
शाय होप** (वेस्ट इंडिज : १०-११-१९९३) – यष्टीरक्षक-फलंदाज. आतापर्यंत ३८ कसोटी, १३० वन-डे (५३३७ धावा, १४८ झेल+यष्टीचीत), ३९ टी-२०.
अल्झारी जोसेफ** (वेस्ट इंडिज : २०-११-१९९६) – वेगवान गोलंदाज. आतापर्यंत ३५ कसोटी (१०२ बळी), ७३ वन-डे (११९ बळी) व ३५ टी-२० (५२ बळी).
रचिन रविंद्र** (न्यूझीलंड : १८-११-१९९९) – भारतीय वंशाचा डावखुरा फलंदाज व फिरकी गोलंदाज. त्याचे बंगळुरूस्थित वडील हे सचिन (तेंडुलकर) व राहुल (द्रविड) यांचे चाहते असल्याने त्या दोघांच्या नावांच्या मिश्रणाने मुलाचे नाव ठेवले. क्रिकेटमधील भविष्यकालीन सुपरस्टार म्हणून ओळख. आतापर्यंत १२ कसोटी, २५ वन-डे व २३ टी-२० खेळलाय.
[ब] भारतीय खेळाडू :--
रुसी मोदी (११-११-१९२४) – मधल्या फळीतील मुंबईकर पारशी फलंदाज ‘रुसी मोदी’ यांनी १० कसोटी खेळताना ७३६ धावा केल्या. १९४६ साली इंग्लंडविरुद्ध लॉर्डस् येथे ते पहिला तर १९५२ साली पाकिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळले. १९४४-४५ सालच्या रणजी स्पर्धेच्या हंगामात १००० धावा करण्याचा तसेच सलग ५ सामन्यांत शतक ठोकण्याचा विक्रम त्यांनी केला. क्रिकेटबरोबरच ते उत्कृष्ट टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस खेळाडू होते.
जसु पटेल (२६-११-१९२४) – अहमदाबादचे ‘जसु’ ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज होते, ज्यांनी ७ कसोटीत २९ बळी मिळवले. पण ते विशेष लक्षात राहिले ते १९५९ च्या कानपूर कसोटीसाठी, ज्यात त्यांनी एका डावात ९ तर सामन्यात १४ बळी घेतले आणि भारताने ऑस्ट्रेलियावर पहिला कसोटी विजय मिळवला.
चंदू पाटणकर (२४-११-१९३०) – पेणला जन्मलेले यष्टीरक्षक ‘पाटणकर’ भारतासाठी एक कसोटी खेळले. त्यात ३ झेल आणि १ यष्टीचीत करून त्यांनी आपली चुणूक दाखवली. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चंदूना नरेन ताम्हाणे व नाना जोशी या प्रस्थापित यष्टीरक्षकांमुळे फार संधी मिळत नसे.
हृषीकेश कानिटकर (१४-११-१९७४) – पुणेकर ‘हृषिकेश’ने (माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचा मुलगा) २ कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामने खेळले. हृषिकेश मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज आणि ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज होता. १९९८ च्या इंडिपेंडन्स चषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध ३१५ धावांचे लक्ष्य गाठताना हृषिकेशने सकलेनला चौकार ठोकून भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला आणि तो देशभरात हिरो झाला. १९९४ ते २०१३ असा प्रदीर्घ काळ प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळताना त्याने १०,४०० धावा केल्या आणि ७४ बळी मिळवले. २०११ साली राजस्थानचे नेतृत्व करताना त्याने राजस्थानसाठी रणजी करंडक जिंकला.
पृथ्वी शॉ** (०९-११-१९९९) – शालेय क्रिकेटपासून विक्रमवीर ‘वंडरबॉय’ म्हणून नावारूपास आलेल्या ‘विरार का छोरा’ पृथ्वीने रणजी, दुलीप आणि कसोटी पदार्पणात शतक झळकावले. १९-वर्षांखालील विश्वचषकविजेत्या संघाचा तो कर्णधारही होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येदेखील तो मोठा पराक्रम गाजवणार असे वाटत होते परंतु सातत्याचा अभाव, बेशिस्त, तंदुरूस्ती नसणे अश्या विविध कारणांनी त्याची कारकीर्द अद्याप स्थिरावू शकलेली नाही. आतापर्यंत त्याने ५ कसोटी, ६ वन-डे व १ टी-२० खेळले आहेत.
( ** खेळाडू म्हणून अजून कारकीर्द चालू )
( * फलंदाज नाबाद )
( ++ सारी आकडेवारी ३१-१०-२०२४ पर्यंतची )