फर्ग्युसनच्या ग्राऊंडवर पुस्तक महोत्सव सुरूय, १४ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२४ पर्यंत. फार म्हणजे फार म्हणजे फारच मोठं प्रकरण आहे. पुस्तकांचं मायाजाल वगैरे. एकदा आत शिरल्यावर माणूस चार-पाच तास शांतपणे हरवून जाईल, एवढं मोठं. तीन दालनं, त्यात सातशे स्टॉल्स. एका फेरीत एक दालनही नीट कव्हर होत नाही. पहिली धाड झाली, अजून दोन तीन वेळा तरी जावं लागेलसं दिसतंय. वर्षभराची लूट एकदमच करावी म्हणतो. विशेषतः राजकमल, राजपाल, हिन्द युग्म, वाणी, नॅशनल बुक ट्रस्ट वगैरेची गंगा वर्षातून एकदाच दाराशी येते, तर हात धुवून घ्यावेत. हे miss करणं सरळसरळ पापच होईल म्हणजे.
फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण काहीतरी स्पेसिफिक दोन चार गोष्टी शोधत असतो. किंवा शोधायला तिथं गेलेलो असतो. पण फिरत फिरत असेच एखाद्या स्टॉलमध्ये शिरतो आणि मग तिथे घुसूनच बसतो. किंवा मग चालता चालता काही ओळखीचे चेहरे दिसतात. ड्रग ॲडिक्ट लोकांना कसं शहरात नवीन माल आलाय याची कानोकान खबर लागते. तशी काही व्यसनी पुस्तकी किड्यांना खबर लागून ते हमखास तिथं प्रकट झालेले असतात. "अरेच्चा! मला वाटलंच होतं तू इथं भेटणार वगैरे!" मग कुठे चांगला माल आहे याची खबरबात, रिकंमडेशन्सचं आदानप्रदान वगैरे. आणि मग शोधायच्या यादीत आणखी भर.
आणि या मधल्या काळात आपण मघाशी कुठला स्टॉल, कुठली प्रकाशनं, कुठले लेखक शोधत होतो, ते विसरून गेलेलो असतो. आणि फिरत फिरत दहाव्यांदा वाट हरवून पुन्हा त्याच लेनमध्ये परत आलेलो दिसतो. हे असं करत करत संध्याकाळपर्यंत पाय पार कामातून जातात. तर पुढच्या वर्षी व्हील चेअर्सची वगैरे सोय केली तर बरं! किंवा पालखी वगैरे! ॲटलीस्ट ते चाकांचे शूज तरी!
बाकी हा पहिला राऊंड :
संप्रति
संप्रति
वा ! मस्त !
योग्य धागा काढलात .
तुम्ही म्हणत आहात ते अगदी खरं आहे . भलं मोठं प्रकरण आहे . पाहण्यासारखं , अनुभवण्यासारखं .
वेळ पुरत नाही .
आज मी गेलो होतो . काही पाहता आलं नाही .
कारण वेगळंच होतं -
आज मला दोन मुलाखती घेण्याची संधी मिळाली . दोन्ही दिग्गज होते . हे माझ्यासाठी विशेष .
प्रा अरविंद गुप्ता
आणि श्री भारत सासणे
अरे वा! सासणे माझे आवडते लेखक
अरे वा! सासणे माझे आवडते लेखक आहेत.
संप्रति , भारी!
संप्रति , भारी!
भरपूर हिंदी वाचता की तुम्ही!
कौतुक वाटलं.
सहमत. खूप पुस्तके असतात आणि
सहमत. खूप पुस्तके असतात आणि चाळता चाळता बराच वेळ जातो. मग भूक लागते. शेगाव कचोरी शोधतो.
नॅशनल बुक ट्रस्ट काही जुनी पुस्तके पुन्हा छापत नाहीत.
हो. मागच्या दोन वर्षांपासून
ललिता-प्रीती,
हो. मागच्या दोन वर्षांपासून हिंदी पुस्तकं वाचतोय. त्याआधी वीसेक वर्षांपासून मराठी वाचत आलोय तर आता मराठी साहित्याची रेंज, खोली, उंची याचा वाचनानुभव घेऊन झालाय बऱ्यापैकी. कोण काय कसं लिहिणार याचा अंदाज आलाय.
हिंदी भाषिक आपल्यापेक्षा पाचपट जास्त आहेत. त्यामुळे चांगले हिंदी लेखकही आपल्याहून चार पाच पट अधिक सापडतात. मिलेनियल जनरेशनचे हिंदी लेखक फार चांगल्या कादंबऱ्या लिहितायत. प्रत्येकाचा आपापला युनिक वर्ल्ड व्ह्यू. वेगवेगळ्या राज्यांत बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या हिंदीची मज्जाही वेगळीच. हिंदी पुस्तकांमार्फत हिंदी पट्ट्यातल्या संस्कृतीत उतरता, वावरता येतं बसल्या बसल्या. आणि सध्यातरी मराठीपेक्षा हिंदी लेखक जास्त कसलेले आहेत, हे अत्यंत दुःखी मनानं स्वतःशीच कबूल करून टाकलंय.
मिलेनियल जनरेशनचे हिंदी लेखक
मिलेनियल जनरेशनचे हिंदी लेखक फार चांगल्या कादंबऱ्या लिहितायत. >>>> त्या जनरेशन चे लेखकांची नावे किंवा अजून पुस्तके सुचवू शकता का .मला एका हिंदीभाषकाला चांगले पुस्तक भेट द्यायचे आहे त्याकरिता.
छान लिहिले आहे . आजच भेट दिली
छान लिहिले आहे . आजच भेट दिली . अक्षरशः हरवायला होते पुस्तकात . तुमच्या इतकी नाही पण थोडी खरेदी केली मी . बहुतेक ठिकाणी छान डिस्काउंट आहेत . इच्छुकांनी संधीचा जरूर लाभ घ्या .
त्या जनरेशन चे लेखकांची नावे
त्या जनरेशन चे लेखकांची नावे किंवा अजून पुस्तके सुचवू शकता का .मला एका हिंदीभाषकाला चांगले पुस्तक भेट द्यायचे आहे त्याकरिता.>>
कल्की,
खालची काही आहेत. चांगली आहेत. त्यातलं एखादं देऊ शकता.
नये शेखर की जीवनी - अविनाश मिश्रा
कहीं कुछ नहीं - शशिभूषण द्विवेदी
लोहे का बक्सा और बन्दूक -- मिथिलेश प्रियदर्शी
लपूझन्ना - अशोक पाण्डे
सावंत आंटी की लडकियॉं- गीत चतुर्वेदी
पटना का सुपरहिरो - निहाल पराशर
चॉंदपूर की चंदा- अतुल कुमार राय
ठीक तुम्हारे पीछे - मानव कौल
धन्यवाद.हल्लीची पिढी
धन्यवाद.हल्लीची पिढी पुस्तकामध्ये काय लिहिते काय वाचते काहीच कल्पना नाही. तुमचं लेखन मात्र युनिक आहे पुस्तकांची चॉईस ही . पुलेशु.
दिलेल्या पुस्तकांचे विषय
दिलेल्या पुस्तकांचे विषय कोणते आणि साहित्य प्रकार कोणता हे जाणून घ्यायचे आहे.
आपण प्रेमचंदचे उदाहरण घेऊ. काही कथा आणि काही कादंबऱ्या आहेत. विषय सामाजिक परिस्थिती आणि गरीबी आणि समाजातील अन्याय , जातीयवाद इत्यादी.
मराठीतले श्रींना पेंडसे - कादंबरी - तत्कालीन समाज, कौटुंबिक वातावरण, समाजाचे चित्रण.
>> मराठीपेक्षा हिंदी लेखक जास्त कसलेले आहेत >>> महाराष्ट्रात काही विषय संपले आहेत आणि लेखकांसाठी नाविन्य उरले नाही. असेही म्हणता येईल. ज्या जाती जमातींना समाजात हे टाळले गेले, दुर्लक्षिले गेले त्या समाजातली परिस्थिती नोंद करणारी आत्मकथनं येऊन गेली. उचल्या , माझा बाप आणि मी, सांगत्ये ऐका, रामनगरी वगैरे. कोसला का गाजलं? मोठ्या शहरात शिक्षणासाठी गावभागातून आलेल्या तरुण विद्यार्थ्याचे अनुभव.
तर समाजातले दुर्गुण संपले किंवा त्यावर लिहून झाले की साहित्य झोपते. बंगाल आणि कर्नाटकात शरत्चंद्र किंवा भैरप्पांना अजून काम मिळत असेल.
बिहार, उप्रदेशातही तसे काम शिल्लक असेल.
हिंदी भाषा मला फार आवडते. काय
हिंदी भाषा मला फार आवडते. काय बावनकशी शब्द आहेत. वाचताना श्रीमंत झाल्यासारखे वाटते. बाकी 'नीलकंठी ब्रज' व 'छिन्नमस्ता नंतर' हिंदीसमयवरती अन्य कादंबरी वाचलीच नाही. आय बेटर टेक अप दॅट टास्क.
छान लिहीलं आहे. चित्रदर्शी
छान लिहीलं आहे. चित्रदर्शी वर्णन.
मिलेनियल जनरेशनचे हिंदी लेखक
मिलेनियल जनरेशनचे हिंदी लेखक फार चांगल्या कादंबऱ्या लिहितायत. प्रत्येकाचा आपापला युनिक वर्ल्ड व्ह्यू. वेगवेगळ्या राज्यांत बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या हिंदीची मज्जाही वेगळीच. हिंदी पुस्तकांमार्फत हिंदी पट्ट्यातल्या संस्कृतीत उतरता, वावरता येतं बसल्या बसल्या. आणि सध्यातरी मराठीपेक्षा हिंदी लेखक जास्त कसलेले आहेत, हे अत्यंत दुःखी मनानं स्वतःशीच कबूल करून टाकलंय.
>>> हे निरीक्षण इंटरेस्टिंग आहे.
याबद्दल आणखी लिहा असं आग्रहाने म्हणते. पुस्तक परिचयपर लेख किंवा इतर काही. वाचायला आवडेल.
अरे वा! उद्या जाणार आहे इथे.
अरे वा! उद्या जाणार आहे इथे. गेल्या वर्षी दोन फेऱ्या मारल्या होत्या. यावर्षी एकच जमेल. हिंदी पुस्तकं नक्की चाळून बघणार आहे.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
पुस्तक प्रदर्शन म्हणजे वीक पॉइंट.
काहीतरी घेतल जातच.
पुयात असल्याने जायला मिळणार नसल्याची खंत.
जे जाणार आहेत त्यांनी त्यांचे अनुभव आणि काय काय खरेदी केली ते लिहा नक्की.
हे बूक फेस्ट एकदम भारी वाटतं
हे बूक फेस्ट एकदम भारी वाटतं आहे. बर्याच जणांचे फेसबूकवर फोटो बघितले. खूप स्टॉल्स आहेत आणि विक्री पण बरीच सुरू आहे. शिवाय हवा चांगली असल्याने एकदम भारी वातावरण आहे असं ऐकलं.
सध्यातरी मराठीपेक्षा हिंदी लेखक जास्त कसलेले आहेत, हे अत्यंत दुःखी मनानं स्वतःशीच कबूल करून टाकलंय. >>>> आपल्यापेक्षा पाचपट जास्त भाषिक असलेल्या भाषेत लेखक आणि चांगले लेखक दोन्ही जास्त असणार ना? त्यामुळे फार दु:खी वगैरे होऊ नका
हिंदी पुस्तक किंवा कुठलही लिखाण कधीही वाचलेलं नाही. कधीतरी एखादं सोपं पुस्तक वाचून बघायला आवडेल.
ललिता- प्रीति,
ललिता- प्रीति,
जी पुस्तकं आणलीयेत, त्यातलं एकही खराब लागणार नाही याची दक्षता घेऊन नीट पारखून आणलीयेत. सो जसजसं वाचून होईल तसतसं त्याबद्दल लिहावंच लागेल. 
हो. परिचय लिहिन.
वावे,
)
राजकमल ( स्टॉल नं. D31), राजपाल (स्टॉल नं. B30), वाणी, हिन्दयुग्म, हे चार स्टॉल्स चांगलेयत हिंदी साठी. शिवाय 'सस्ता साहित्य मंडल प्रकाशन'चा एक स्टॉल आहे, जिथं स्वस्त मिळतात. मला आज तिथं बरंचसं गांधी साहित्य मिळालं. आणि खरिदो बेचो म्हणून एक (स्टॉल नं A33) आहे, जिथं सेकंड हॅंड हिंदी-इंग्रजी पुस्तकं आहेत.
(हिंदीमध्ये अज्ञेय जे आहेत, ते आपल्याकडच्या जीएंसारखे आहेत. निर्मल वर्मा एकदम एकांतप्रिय. काशीनाथ सिंह काशीच्या आसपासचं सगळं लोकजीवन घेऊनच उतरतात. कमलेश्वर यांचं 'कितने पाकिस्तान' जरूर उलटून पहा, बौद्धिक मेजवानी आहे!
ज्ञान चतुर्वेदी आहेत, ते म्हणजे उपहासाची तल्ख धार! ('एक तानाशाह की प्रेमकथा' आहे त्यांचं लेटेस्ट. त्यात आपल्याकडच्या एका हुकुमशहावर ते अशा ताकदीनं घसरलेत की हसून हसून मुरडा यायला लागला पोटात.
हे वरचे लेखक ज्ञानपीठ, पद्मश्र्या किंवा चार दोन साहित्य अकादम्या खिशात घालून बसलेल्यांपैकी आहेत.
शिवाय अविनाश मिश्र म्हणून एक आहे. हा बाबा तर वयाच्या तिशीतच 'नए शेखर की जीवनी' आणि 'बर्फावास' या दोन महान कादंबऱ्या लिहून बसलाय.
शिवाय सुजाता यांची 'एक बटा दो'! ही एक भारी कादंबरी आहे. ! ती वाचल्यावर मला आपल्याकडच्या लेखिकांचा ऑलरेडीच जो कंटाळा आलेला तो अजूनच तीव्र झाला.
थांबतो. हिंदी बद्दल बोलायला माझ्याकडे बऱ्यापैकी साठलेलंय पण शेवटी किती टाईप करायचं यालाही मर्यादा आहेच.
बाकी, राजहंस, साधना, लोकवाङ्मय गृह, रोहन, मॅजेस्टिक, रसिक, भावार्थ हे नेहमीचे आहेतच. भावार्थ च्या स्टॉल मध्ये पपायरस ची पुस्तकं छानेत.
वाहत्या धाग्यावर लिहिलेलं
वाहत्या धाग्यावर लिहिलेलं एकत्र करून इथे चिकटवत आहे.
पुणे पुस्तक महोत्सव-
काल जवळजवळ दिवसभर इथे घालवला. पाय दुखायला लागले तरी बाहेर पडावंसं वाटत नव्हतं.
भरपूर स्टॉल्स आहेत, भरपूर प्रकारची पुस्तकं आहेत. बहुसंख्य मराठी असली तरी इंग्रजी आणि हिंदीदेखील बरीच आहेत. बहुतेक एक ऊर्दू पुस्तकांचा स्टॉल आहे आणि तसाच एक संस्कृत पुस्तकांचाही आहे.
आठदहा पुस्तकं घेतली. बरीचशी मराठी, एक अनुवादित हिंदी आणि दोनतीन इंग्रजी.
मी पाहिलेल्या स्टॉल्सपैकी मला आवडलेले काही स्टॉल्स म्हणजे समकालीन, राजकमल, श्री बुक सेंटर.
समकालीनची खूप पुस्तकं आवडली. त्यापैकी आशिष महाबळांचं 'घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा', डॉ. शंतनू अभ्यंकरांचं 'आधुनिक वैद्यकीची शोधगाथा', विविध लेखकांचं मनोगत असलेलं 'गोष्ट खास पुस्तकाची' ही पुस्तकं घेतली. याशिवाय 'वॉकिंग ऑन द एज' हे, प्रसाद निक्ते यांचं, एकट्याने सलग ७५ दिवस डोंगरदऱ्यांमधून भटकंती करण्याच्या अनुभवावरचं पुस्तक , खरेखुरे आयडॉल्स या पुस्तकाचा दुसरा आणि तिसरा भाग, तशाच धर्तीवरचं, पण भारतातल्या चांगलं काम करणाऱ्या विविध संस्थांवरचं एक पुस्तक (नाव विसरले) अशी अजून अनेक चांगली पुस्तकं होती पण मी मोह आवरला!
हिंदी कादंबरी विकत घेऊन वाचण्याचा मला धीर होत नाही. एक अनुवादित हिंदी पुस्तक घेतलं.
दुपारी चार ते पाच या वेळात तिथे मूर्तीशास्त्रातले तज्ज्ञ गो. बं. देगलूरकर यांची मुलाखत होती, ती ऐकण्याची संधी मिळाली. त्यांचं वय ९३ आहे, हे सांगूनही खरं वाटत नाही. मुलाखत चांगली झाली. अनेक इंटरेस्टिंग गोष्टी त्यांनी अगदी सहजतेने सांगितल्या. मूर्तीशास्त्रात अनेक बारकावे असतात, ते माहिती झाले की आपण अधिक डोळसपणे मूर्तीकडे बघू शकतो, बघायला पाहिजे. हे कुठल्याही क्षेत्रात खरं आहे. आकाशात तारे छानच दिसतात, पण नक्षत्रं ओळखता यायला लागली, अजून काही गोष्टी समजल्या की मजा वाढते. गाणं ऐकायला गोड वाटतं, पण त्यातलं शास्त्र कळत असलं तर गोडवा वाढतो, तसंच हेही.
प्रदर्शनात भारत इतिहास संशोधक मंडळाचाही स्टॉल आहे. तिथे पुस्तकं आहेतच, पण बऱ्याच जुन्या चित्रांच्या प्रतीही विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. चित्रांची जरा सविस्तर माहिती हवी होती असं वाटलं.
प्रदर्शनात प्रवेश करण्यापूर्वी एक श्रमिक पत्रकार संघाचं फोटोंचं प्रदर्शन आहे. तिथेही हीच उणीव जाणवली. फोटो चांगले आहेत, पण संदर्भ/माहिती काहीही लिहिलेली नाही!
एकंदरीत पुस्तकप्रेमींसाठी मेजवानी आहे. अधेमध्ये भूक लागलीच तर खाद्यपदार्थांचेही अनेक स्टॉल्स आहेत.
भारतातल्या चांगलं काम
भारतातल्या चांगलं काम करणाऱ्या विविध संस्थांवरचं एक पुस्तक >>> बदल पेरणारी माणसं ?
नाही.
नाही.
त्यात अमूल, लिज्जत वगैरे संस्थांवर लिहिलं आहे. ज्या संस्था वर्षानुवर्षे चांगलं काम करून भारताला बळकटी आणतायत अशा संस्था ( organizations)
जायचंय जायचंय.
जायचंय जायचंय.
उद्या मुलीचा पेपर असल्याने तिला सोडून यायचय. दुपारी मुंबईला जाणे रद्द झाले तर संध्याकाळी नक्की जाणार आहे.
भेटूयात.
ओळखायची खूण - लालभडक कपडे केलेली, लाल म्हणजे इतका लाल कि याहून लाल जगात काहीच नसेल, कृष्णा अभिषेक किंवा विनय आनंद सारखी दिसत नसलेली व्यक्ती दिसली कि पाठीत जोरदार बुक्की मारा.
एक दुर्मिळ पुस्तक मिळाले तर मजाच मजा.
@ ती पुन्हा गाईल
@ ती पुन्हा गाईल
कसलं भारी पुस्तक तुम्ही सांगितलं इथे. सगळे वानगीदाखलचे मंत्र वाचून काढले. लेखक आणि प्रकाशकांचे डिस्क्लेमर आहे. पण तुम्ही लिंक देताना दिले नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्माची फळे (किंवा दुसर्यांच्या गैरवापराची फळे ) भोगायला लागणार आता. मुस्लीम मंडळी हिंदूच्या रामायणातल्या रावणाला उर्दूमधे मंत्र म्हणून आवाहन करतात, आणि त्या रावणाला उर्दू समजते हा शोध नव्याने लागला. म्हणजे वाल्मिकिंनाही उर्दू भाषा येत होती ही माहिती , हा शोध सगळ्यात पहिल्यांदा इथे मायबोलीवर लागला आहे हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.
पण दुर्मीळ वाटत नाही . अॅमेझॉनवर फक्त २५० र. सहज उपलब्ध आहे.
जाता जाता -
१) इथे अमेरिकेत सेलम नावाच्या गावाजवळ राहतो ते जगातले सगळ्यात भारी जादूटोण्याचे गाव आहे. फक्त ४५ हजार लोकवस्ती असलेल्या गावात दरवर्षी आक्टोबर मधे ४० लाख लोक भेट देतात.
२) या गावात इंग्रजीत लिहीलेले एक पुस्तक पाहिले होते. त्यात "पाण्यावर चालण्याचा मंत्र", "माणूस अद्रूष्य करण्याचा मंत्र " वाचला होता. याच पुस्तकात प्रत्येक शापाला बाय डीफॉल्ट ३ महिन्यांची एक्स्पायरी डेट असते असे वाचले . तेंव्हापासून कुणालाही शाप देतांना वाटणारी माझी अपराधी भावना संपली. त्यामुळे एखाद्याकडे पाहून आपण स्मीतहास्य करतो तितक्या सहजतेने मी आजकाल शाप देत हिंडत असतो.
३ महिने एक्सपायरी असली म्हणून
३ महिने एक्सपायरी असली म्हणून काय झालं. जपुन रहा लोकहो! रात्र वैर्याची आहे.
हॅपी हॉलिडेज! नो मोअर जोक्स
अजय
अजय

सेलमला सगळ्या वाक्चतुर स्त्रियांना चेटकीण म्हणायचे म्हणे. ते ऐकून मी दोन दिवस गप बसले होते.
आजकाल शाप देत हिंडत असतो >>>
आजकाल शाप देत हिंडत असतो >>> बापरे! बरं झालं तुझ्या पुणे गटगला मी आले नव्हते
शापाला बाय डीफॉल्ट ३
शापाला बाय डीफॉल्ट ३ महिन्यांची एक्स्पायरी डेट असते असे वाचले .>>>>यावरून आठवलं माबोलाही तीन महिने लॉग इन केलं नाही तर आयडी एक्स्पायर होतो ही कल्पना तिथूनच सुचली का तुम्हाला
होत नसावा कारण तसही एकदा माबोवर आलो की लॉग इन केल्याशिवाय राहाता येत नाही.अफवाच असावी.शेवटी माबोवर आयडी आता अपनी मर्जी से मगर जाता वेबमास्तर की मर्जी से .
अजयजी, तुमचा प्रतिसाद वाचतोय.
अजयजी, तुमचा प्रतिसाद वाचतोय. बेहद्द आवडला आहे प्रतिसाद. आता पुप्र वरून आल्यावर इतक्या मस्त प्रतिसादाला उत्तर नक्कीच देईन.
पण आधी आलेल्या गहीवराबाबत लिहीतो. माझ्या प्रतिसादाला कुणी प्रतिसाद देणार नाही ही खात्री असल्याने धागा पुन्हा चेक केलाच नव्हता. आता पुप्र ला निघालो म्हणून बघितलं तर ... चक्क प्रतिसादाची नोंद घेतलेली, त्यावर प्रतिसाद आणि तो ही मालकांनी.
नाहीतर आयडीनिर्दालन विधी प्रमाणे आधी बहीष्कार मग आयडी उडवाची विनंती इग्नोरणे आणि मग उकसवणारे आयडीज अवतरणे आणि क्लिकबेट धाग्यावर प्रतिसाद दिल्यावर अपमानास्पद प्रतिसादाला उत्तर देताना शहीद होणे हे सगळं पुढे दिसू लागलेलं
मी काल परत गेलो होतो. फायनली
मी काल परत गेलो होतो. फायनली सगळे स्टॅाल बघून झाले.
काही हिंदी, उर्दू लेखकांची पुस्तके घेतली. मराठीतली जी आधी वाचली होती व संग्रही असावी असे वाटत होते ती पण घेतली.
सहा सव्वा सहा च्या सुमारास बिपिन सांगळे मनोविकासच्या स्टॅालवर काही लेखकांसोबत बसलेले दिसले. बिझी होते त्यामुळे त्यांना डिस्टर्ब न करता निघालो…
आज दुपारी पोहोचलो.
आज दुपारी पोहोचलो.
कुठलीही गोष्ट मुबलक स्वरूपात समोर आली कि माझा गोंधळ उडतो. यापूर्वी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्स, सागर आर्केड, बुक फेस्टिवल, पुस्तक मेळा, अनेक फूटपाथ अशा कैक ठिकाणी पुस्तकं घेताना कधीच इतका गोंधळ उडाला नाही.
पुस्तकांच्या स्टॉल्सचे विभाग केले असते तर बरं झालं असतं. काही पुस्तके बऱ्याच स्टॉल्सवर उपलब्ध होती. त्यामुळे तंगडतोड करून झाल्यावर पुन्हा तेच पुस्तक पाहून हिरमोड होत होता.
खरी गोष्ट अशी आहे की या महिन्यात बजेट टाईट आहे आणि सर्वात खरी गोष्ट हे प्रदर्शन रोज थोडं थोडं पाहण्याचं आहे. एका दिवसात शक्य नाही. तरी उद्या चक्कर मारणार आहे.
क्षणचित्रे
क्षणचित्रे
एकच वर्ष फर्गसनला होतो. पण आठवणीं ताज्या होत्या. त्यामुळे अॅम्फीथिएटर आणि कॅण्टीनच्या मधे झाडाजवळून वर चढून ग्राउंडवर जायचा रस्ता आहे त्या रस्त्याने आलो. मधे नाला आहे. त्यावरून उडी मारणे काही जमले नाही. अर्धांग सोबत होते. तिने अॅम्फीथिएटरला वळसा घालून राजमार्गाने येणे पसंत केले. आमचा खुष्कीचा मार्ग तिला आवडला नाही.
प्रदर्शन ह्युज म्हणजे प्रचंडच आहे. प्रगती मैदान (दिल्ली) ला एकदा पाहिलेलं. ते खूप विस्तीर्ण प्रदेशात होतं.
इथे वाचलं त्याप्रमाणे खाऊगल्ली सापडली नाही.
अॅम्फीथिएटरमधे कालपासून कार्यक्रमांची रेलचैल असल्याने मैदानात उभारलेल्या तात्पुरत्या व्यासपीठावर कार्यक्रम झाले नाहीत.
एका कोपर्यात एका पुस्तकाचे प्रदर्शन झाले. सायंकाळी पुन्हा दुसर्या पुस्तकाचे.
काही मित्र लेखक झाले आहेत. त्यांच्या पुस्तकांचे स्टॉल्स होते. ते सापडायला जादाची पायपीट झाली तर साहेब अँफीथिएअटरमधे गेलेले.
लोक पुस्तकं घेत होते. आपणही त्यांच्या प्रमाणे पुस्तकप्रेमी दिसायला पाहीजे म्हणून उगीचच दोन चार पुस्तकं उचलली. तर प्रकाशक स्वतः आले.
त्यांना इम्प्रेस करायला बोललो "वाचनाला शिस्त पाहीजे. दिसेल ते पुस्तक घेऊन चालत नाही " ते खूष होऊन हसले. " शिस्त म्हणजे नेमकं काय?"
"म्हणजे, आपला फोकस , कार्यक्षेत्र, अभ्यास याच्याशी संबंधित पुस्तके, आवडणार्या विषयांची पुस्तके हीच एका टप्प्यानंतर जास्तीत जास्त संख्येने घेतली पाहीजेत. प्रत्येक विषयातले पुस्तक वाचलेच पाहीजे हा हट्ट नको "
त्यांनी प्रेमभराने हात हातात घेतला.
" कुठली पुस्तके पाहताय ?"
" अघोर विद्या, वशीकरण, कामसूत्र, कोकशास्त्र "
त्यांचा चेहरा कसानुसा झाला आणि ऐकूच येत नसल्याप्रमाणे ते निघून गेले. लोकांना उच्च अभिरूच्याच्या पुढचे काही झेपत नाही हेच खरे.
लाखो लोक असल्याने इंटरनेट चालत नव्हते. बरेच ठिकाणी कार्डही चालले नाही. एका ठिकाणी होती तेव्हडी कॅश देऊन सुटका करून घेतली.
दिलीपराज प्रकाशनाच्या स्टॉल वर वेशीपलिकडे वाचलंय कि नाही हे ध्यानात नसल्याने घेतलं. त्यांनी पेमेंट साठी हॉटस्पॉट दिला. त्यांना इंटरनेट कसं काय मिळत होतं हा प्रश्न बाहेर आल्यावर पडला.
अशा ठिकाणी तुफान गर्दी असणार याचा अंदाज घेऊन शक्यतो चारचाकी वाहने नेऊ नयेत. लोक मोठ मोट्या एसयुव्हीज घेऊन येतात. या गाड्या पुण्यासारख्या छोट्या रस्त्यावरून फिरवायच्या लायकीच्या नाहीत. प्रशस्त पार्किंग असूनही रस्ता एकच असल्याने तो या लोकांनी जाम करून टाकला.
एक चेहरा मायबोलीकराचा असावा असे वाटले. दोन मुलींना सांभाळत जवळून गेला. फोटो पाहिल्याचे लक्षात आले. कदाचित अन्य ठिकाणी पाहिला असेल. काळ्या टी शर्ट वर तीन आकडा होता.
मोदी़जींची मोठ मोठी होर्डिंग्ज ठिकठिकाणी होती. कदाचित त्यांनी स्वतः ही सर्व पुस्तके वाचून मगच प्रदर्शनात ठेवायची परवानगी दिलेली असणार.
ई पुस्तकालयाचा स्टॉल बघा. अॅप वर फ्री पुस्तके मिळणार आहेत. स्कॅन करून इन्स्टॉल करता येईल.
पद्यगंधाच्या स्टॉलवर प्रकाशक भेटले. हवं असलेलं पुस्तक त्यांनी आणलेलं नव्हतं.
पुणे मराठी ग्रंथालयाचा दुर्मिळ पुस्तकांचा विभाग आवडला.
मूळ संविधानाची प्रत ठेवलेल्या स्टॉलला लोकांचा प्रतिसाद सर्वाधिक होता. लोक फोटो काढून घेत होते.
Pages