मी एक खादाड प्राणी भाग – 7
अतीपूर्वेकडील अंडा पराठा.
कणिक ७५ टक्के आणि मैदा २५ टक्के या प्रमाणात घ्या. आवश्यक वाटल्यास थोडे तेल घालून चांगले मळून घ्या. त्यानंतर दोन मोठ्या आकाराच्या पोळ्या लाटा.
एक पोळीवर फेटलेले अंडे पसरा , त्यावर दुसरी पोळी ठेवा. वरच्या पोळीवरही फेटलेले अंडे पसारा. त्यानंतर घडीच्या पोळीसारख्या दोन घड्या घाला किंवा चारही बाजू आत घेऊन त्याचा छोटा घडीचा चौकोन तयार करा. या घडीची मोठी पोळी लाटा. परत फेटलेले अंडे पसरून घडी करा. असे परत परत ५-६ वेळा तरी करा. फेटलेल्या अंड्याचा पातळ थरच द्यावा. अंडे बाहेर येत आहे असे वाटल्यास, त्यावर थोडी पिठी पसरावी. मंद आचेवर हा परोठा परतावा. परततांना शक्यतो तेल किंवा मार्गारीन वापरावे. भरपूर पापुद्रे असलेला हा परोठा अतिशय रुचकर लागतो आणि खुसखुशीतही होतो.
मी असंख्य प्रकारचे देशी ,विदेशी स्वयंपाक करत असलो तरी मला पोळी लाटणे हे न जमलेले काम आहे. त्यामुळे मी सांगूनच हा प्रकार करून घेतला आहे.
पोर्चड एग
पाश्चिमात्य देशात नाश्त्यासाठी पोर्चड एग हा प्रकार फारच लोकप्रीय आहे. उकडलेल्या अंड्याला, अंड्यातील वायूंमुळे एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. पोर्चड एग हा प्रकार वासरहीत असतो. करताना कुठलेही तेल न वापरल्यामुळे आणि ९० ते १०० डिग्री सेन्टिग्रेड इतक्या तापमानाला केल्यामुळे त्यात सर्व प्रकारची प्रोटिन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स शाबूत असतात. यामुळेच हा प्रकार अतिशय पौष्टिक असतो.
एक उभट भांड्यात पाणी घ्या. पाण्याला कढ आला की गॅस मंद आचेवर ठेवा.
पाण्यात दोन चमचे व्हिनेगर घाला.
अंडे फोडून छोट्या बाउल मध्ये घ्या.
पाण्याला स्लॉट असलेल्या चमच्याने किंवा फोर्क ने ढवळून पाण्यात भोवरा तयार करा.
फोडलेले अंडे भोवऱ्याच्या मध्यभागी ओता. दोन ते तीन मिनिटामध्ये स्पॉन्जसारखे पांढरा बलक तयार होईल त्यावेळेस आतील पिवळा बलक तसाच राहील.
जास्त वेळ गरम पाण्यात ठेवल्यास पिवळा बलक घट्ट होतो.
पोर्चड एग हे अतिशय लहान मुलांनां देण्यातही सोयीस्कर असते.
चहातले अंडे
चीन आणि जपान मध्ये लोकप्रिय असलेला आणि अत्यंत देखणे दिसणारे असे हे चहातले अंडे.
आपल्या आवडीचा ग्रीन टी तयार करा.
चहाचे दोनशेहून जास्त प्रकार मिळू शकतात. माझ्या स्वतःच्या आवडीचे फ्लेवर्स म्हणजे मोगरा, कमळ, केवडा, गुलाब आणि संत्रे असे आहे.
या चहात साखर, दालचिनी, जायफळ, वेलदोडा यांची चवीप्रमाणे पूड मिसळून चहा ढवळा.
चहा गार झाल्यावर, या चहात सालासकट हार्ड बॉइल्ड अंडी ठेवा.
अंडी पूर्णपणे बुडतील याची दक्षता घ्या.
पॉट ला घट्ट झाकण बसावा आणि रात्रभर ठेऊन द्या. निदान तीन -चार तास तरी ठेवणे आवश्यक आहे.
अंडी बाहेर काढून स्वच्छ धुऊन आणि कोरडी करून घ्या . अंडी सोला. आतील अंड्यावर विविध प्रकारची मार्बलसारखी किंवा मोझॅक सारखी नक्षी दिसेल. एग बाऊलमध्ये हे अंडी फारच सुरेख दिसतात. खाण्यासही रुचकर असतात.
>>>>एग बाऊलमध्ये हे अंडी फारच
>>>>एग बाऊलमध्ये हे अंडी फारच सुरेख दिसतात. खाण्यासही रुचकर असतात.
जालावर इमेजेस शोधून पाहील्या. आहे खरी नक्षी.