एक मिशन असेही.-१

Submitted by केशवकूल on 10 December, 2024 - 13:05

त्याने प्रियाला कडेवर घेतले. क्वारंटाईन मध्ये जाण्यापूर्वी त्याने एकदा प्रियाला जवळ घेतले.
“बाबा, परत केव्हा येणार?”
“प्रिया, जाणाऱ्याला केव्हा येणार असं नाही विचारायचं”. कौमुदी म्हणजे प्रियाची आई आणि राबर्टोची पत्नी. हो ती अगदी मराठी होती.
“बरं प्रिया, सांग तुला काय आणू?”
“मी मागितलं तर आणाल? तर मग चाँदवा, मुठभर चांदणे घेऊन या. गिव मी माय मूनशाईन.”
“डन!.”
तो मिशन वरून परत आला तेव्हा त्याला हे सगळे आठवत होते.
“प्रिया आहा. बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे.”
प्रिया दुडू दुडू धावत आली.
त्याने मुठ उघडली.
हजारो सूर्यांपेक्षांही तेजस्वी प्रकाशाने आसमंत झाळाळले.
Brighter than thousand Suns!
एका प्रचंड स्फोटाने दाही दिशा थरथरल्या.
आणि नंतर मिट्ट काळोख.

मिशनवर जायच्या आधी सात दिवस क्वारंटाईनमध्ये जावे लागते. हेतू हा कि कोणताही अवकाश यात्री ऐनवेळी आजारी पडल्यामुळे मिशन पुढे ढकलायला लागू नये. एकूण तिघे जण होते. केके, राबर्टो, आणि शर्ली.. राबर्टोची अवकाशातली ही दुसरी भरारी होती. शर्लीची पहिली. केके मात्र अनुभवी होता. म्हणूनच तो मिशन कमांडर होता.
मिशनचे उद्दिष्ट हे होते कि ह्या यानाची चाचणी घेणे. ह्या यानाची एक यशस्वी चाचणी तर आधी झाली होतीच, पण त्या चाचणीच्या वेळी कोणी अवकाश यात्री नव्हता. म्हणजे अनमॅन्ड. ह्या चाचणीत तीन अवकाश यात्री प्रवास करणार होते. ह्या चाचण्या का केल्या जात होत्या? एक म्हणजे ह्या यानाची बांधणी नवीन प्रकारची होती. म्हणजे सामान वाहून नेण्याची क्षमता जास्त होती. हेच यान दोन वर्षांनंतर चंद्रावर चढाई करण्यासाठी वापरायचे होते.
अक्च्युअलि चंद्रावर मानवी वसाहत बांधण्याचा एक भव्य दिव्य प्रोग्रॅम होता, तेव्हा पुढच्या यात्रेच्या वेळी पाच अवकाशयात्री आणि बेस कॅंप उभारण्याचे सामान इतके पे लोड घेऊन चंद्रावर उतरावयाचे होते. त्यासाठी सारा खटाटोप.
तिघांनी आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन क्वारंटाईनमध्ये प्रवेश केला. तिघांच्याही वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या.
क्वारंटाईनमध्ये अवकाशयात्री आपल्या पत्नीशी अथवा पतीशी भेटू शकतो. अर्थात मिशनच्या मेडिकल टीमची सहमती असेल तरच. पण लहान मुले? नो नो. अजिबात नाही.
सात दिवसांच्या क्वारंटाईन पिरिअडमध्ये पहिले पाच दिवस मिशनच्या नियमात बसेल तेच जेवण खावे लागते. शेवटचे दोन दिवस मात्र तुमच्या आवडीचे खाणे मिळते. कारण एकदा अवकाशात गेलात कि मग चमचमीत खाणे बंद. केकेला खाण्या पिण्यात काही रस नव्हता. राबर्टोने चिकन, तर शर्लीने पिझ्झा मागवला होता! जैसे जिसकी सोच!
आता थोडे अवकाशयात्रींच्या बॅकग्राउंड बद्दल. केके हा ४५ वर्षाचा, एअर फोर्स मधला, सुपरसॉनिक फायटर प्लेनचा पायलट होता. त्यानंतर तो शत्रूच्या प्रदेशात रेको करणारा पायलट झाला. MACH ३.४+ वेग आणि ३०,००० मीटरवर उड्डाण करणारा. नंतर तो XXX मध्ये दाखल झाला होता राबर्टो हा यानाच्या आतल्या सिस्टीमचा तंत्रज्ञ होता तर शर्ली शास्त्रज्ञ. डॉक्टर शर्ली असे म्हणायला पाहिजे खरतर पण एकदा तुम्ही मिशन मध्ये सामील झालात कि हे सर्व विसरायला होते.
उड्डाण स्थानीय वेळ 17:00 ला होणार होते. ह्या मिशनमध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला(ISS)जायचे होते. तिथे पे लोड डंप करायचे आणि शर्लीला काही नवीन प्रयोग सेटअप करायचे होते आणि काही जुने प्रयोग रीकॅलीब्रेट करायचे होते. अवकाशात चालावे लागेल कि नाही ह्याची कल्पना नव्हती. ते तिथे गेल्यावरच समजणार होते.
क्वारंटाईन पिरिअडमधले पहिले चार दिवस तुम्हाला तुमच्या झोपेचे वेळापत्रक जमवण्यात जातात. उड्डाण (म्हणजे लॉच आणि टेक-ऑफ), ISS बरोबर जोडणी(DOCKING), अवकाशातील चहल पहल आणि परत पृथ्वीवर हे मिशनचे महत्वाचे टप्पे. त्यावेळी सर्व क्रूने टकटकीत जागे रहायला पाहिजे. ह्या साठी थोडी प्रॅक्टिस करावी लागते. जास्त नाही पण चार दिवसात जमून जाते.
उड्डाण YYY अवकाश स्थानकावरून(Spaceport) होणार होते.
स्थानिक वेळ 14:33. म्हणजे T-2 तास 30 MINUTES. (T म्हणजे LAUNCH TIME)
राबर्टो जमिनी पासून ५० मीटर उंचीवर यानाच्या वरच्या टोकापाशी उभा होता. काय विचार करत असेल तो.
नेमका हाच प्रश्न शर्लीने त्याला विचारला.
“कसला विचार करतो आहेस? प्रियाचा न?”
शर्ली तीन चार वेळा घरी आली होती. तिची आणि प्रियाची चांगली गट्टी जमली होती.
“शर्ली, कधी कधी असे वाटतं कि आपण आपल्या मुलांच्या आशा आकांक्षा पुऱ्या करू शकू कि नाही? आपल्या मुलांच्यासाठी आपण काय ठेवा सोडून जाणार आहोत? अशा वेळी खूप अस्वस्थ व्हायला होतं बघ. ही जीवघेणी अनिश्चितता.”
“जेव्हा आपण तेथे जाऊ तेव्हा आपोआप सगळ्या कोड्यांचा उलगडा होईल. तुला श्रोडिंगरच्या मांजरीचा पॅराडॉक्स माहित आहे ना? जेव्हा वेळ येते तेव्हा नशिबाचा पेटारा उघडतो तेव्हा आपले दान काय आहे ते समजणार. आतापासून कशाला डोक्याला त्रास रे. मी बघ किती लकी आहे. पुढे कोण नाही मागे कोण नाही.”
शर्लीची कथा...
आता कोण लकी आहे हे कोण ठरवणार? बंध असणे चांगले की वाईट? ही शर्ली वरून दाखवते आहे ती आतून पण तशीच आहे का?
केकेची तिसरीच तऱ्हा. इतका वेळ मज्जा करणारा, गप्पिष्ट, अचकट विचकट बोलणारा, पेगवर पेग रिता करणारा गणेशन एकदा मिशनचा काऊंट डाऊन सुरु झाला कि एकदम शांत होत असे. प्रशांत महासागारा सारखा. कुठल्याही इमर्जन्सीत शांत राहणारा. तो बाजूला असला कि अर्धे टेन्शन खतम होत असे.
अशा तिघांची सांगड दैवाने का बरं घालावी?
राबर्टोने असले फिलॉसॉफिकल विचार झटकून टाकले.
मिशन वरून परत आल्यावर मिशनच्या मनोवैज्ञानिकाला भेटायला पाहिजे.
दूर क्षितिजावर कुठेतरी काळे ढग दाटून आले होते. वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे अजून दोन तासांची स्लॉट उघडी होती म्हणजे वादळ इथपर्यंत पोहोचायला निदान दोन तासांचा –जास्तच पण कमी नाही-अवधी होता. विजांच्या वादळात उड्डाण करायचे कि नाही? केके म्हणाला कि एक तातडीची मीटिंग झाली होती आणि एक मतानुसार गो अहेड चा निर्णय झाला होता.
यान विजेच्या वादळापासून पूर्ण सुरक्षित होते.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त सुरुवात!

केकेचे नाव गणेशन आहे का? >>> मलाहि हाच प्रश्न पडला, म्हणून वरच्या पॅरात जाऊन पुन्हा बघितलं!