ओढ (अंतिम भाग)

Submitted by Abuva on 10 December, 2024 - 07:11
MS Designer generated image of broken string of pearls

(भाग २ - https://www.maayboli.com/node/86070)

रस्ता पार करून गल्लीच्या तोंडावर मी उभी होते, सुभाषकाकाचा मागोवा घेत. काका एका ओट्यावर चढला आणि त्यानं खोलीचं कुलूप उघडलं.
भाजीवाली माझ्याकडे बघत होती.
"काय, भाजी पायजे का बाई?" तिनं प्रश्न केला.
मी तंद्रीतून बाहेर आले. मान नकारार्थी हलवली.
भाजीवालीच्या शब्दांत कुतुहल होतं. "इथं कोनाकडं आलावता?" तिलाही ती विसंगती जाणवत होती.
माझ्या नजरेचा अंदाज घेत तिनं विचारलं, "कोन पायजे व्हतं?"

मी विचारांत होते - 'इथपर्यंत आले आहे, आता सुभाषकाकाला भेटायचं का?’
'कशाला? का? का?’
'का नको? पुन्हा कधी होणारे भेट?’
'कशाला हवी आहे ही असली भेट? ज्यानं तुझ्या आईवडिलांना देशोधडीला लावलं, पुन्हा वळून‌ कधी चौकशी केली नाही, का काळजी नाही, त्या इसमाचा संबंध कशाला हवाय?’
'मला उत्तरं हवी आहेत, उत्तरं...’
माझं काळीज आक्रोश करत होतं.

मी भाजीवालीला विचारलं, "ते गृहस्थ कोण आहेत?"
"कोन ते?"
"ज्यांनी आत्ता केळी.. ज्यांना तुम्ही केळी दिलीत ते?"
"ते? तो माजा नवराय. तुमी कोन?"
मला धक्काच बसला. हातातली केस पडायचीच, पण सावरून मी ती खाली ठेवली.

'या भाजीवालीचा नवरा?’
'अगं कोणा भलत्यालाच सुभाषकाका समजलीस की काय?’
'नाही, शक्य नाही! तो सुभाषकाकाच आहे.’

माझा चेहेरा उतरला असावा. कारण बाईच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले होते. कसंबसं सावरून मी तिला विचारलं, "नाव, नाव काय त्यांचं?"
"का पन, तुम्ही कोन का विचारताय?" भाजीवालीचा स्वर संशयी झाला. एक पट्टी वर चढला.
मला अचानक भरून आलं, आवाज थरथरला. "सुभाष ना? काका आहे तो माझा"
"व्हय सुभाषच नाव हाय त्यांचं”, तिनं अचंबित होऊन म्हटलं. मी माझ्या नकळत रोखलेला मोठ्ठा श्वास सोडला. मनावरचं मणभर ओझं उतरलं जणु काही!
"तुमचा काका? तो तं म्हने कुनी नाही त्याचं?" तिची चढलेली पट्टी खाली आली होती. आणि स्वतःशीच बोलावं, त्या स्वरात ती बोलली.
"हं... मी पण तीस-पस्तीस वर्षांनी पहातेय त्याला."
"मागं मागं आलात जनु?" तिनं समजुतीच्या आवाजात विचारलं त्यात एक ओलावा होता. का मलाच जाणवला..
"हो. का? कोण जाणे.." एक निःश्वास सोडत मी म्हटलं. कदाचित आम्ही दोघीही या अनपेक्षित संभाषणानं विचारांच्या आवर्तात सापडलो होतो.
"आपल्या माणसांची वोढ आस्ते..." एक क्षण थांबून तिनं अचानक विचारलं, "तुमी रानी का?"
आता आश्चर्य वाटण्याची पाळी परत माझी होती. कुठल्याशा अनिर्वचनीय भावनेनं डोळे ओलावले. घशात आवंढा अडकला. मी फक्त मान डोलावू शकले. तिनं टपरीतली खुर्ची उचलली, आणि मला दिली. "बसा वाईच.”
पर्समधून रुमाल काढताना मला पाण्याची बाटली दिसली. दोन घोट घेतले.
"म्हायतीये मला. त्यांच्या थोरल्या भावाचा सौंसार त्यांनी मातीत घातलाय. सांगितलया मला. तुमच्याबी खूप आटवनी सांगितल्यात..."
"काय करतो तो आता?"
"काय बी नायी. काय करनार, वारं गेलंय. कधीमधी‌ मी दुपारच्याला लवंडले की अस्तो इथं राखणीला. पन आदुगर आमी दोघं चालवायचो हे समदं"
"..." विषय खुंटला होता, काय विचारणार.
एका अंतरायानंतर माझ्याकडे रोखून बघत ती म्हणाली, "त्यांचा पैल्या बायकोचा पोरगा तिकडं हाय, जर्मेनीला."
"आणि विनीताकाकू, म्हंजे ती बायको?" मी अभावितपणे विचारलं.
"गेली म्हणे तिकडंच, कॅन्सरनं"
"कॅन्सरनं? कधी गेली?”
"कुना ठावं? पन ती गेली अन मंग ह्ये इकडं आले”
"तुमचं..?"
"झालंय लग्न. धा वर्षं झालीत. ते वस्तीला आले इथं, अन् माजी ही टपरी व्हती. आता हडळीला नव्ता नवरा अन् म्हसोबाला न्हव्ती बाईल. मी पन काडीमोड घेऊनशान आल्ते. पन तशी र्‍हानार नाय म्हनलं मी. केलं लगीन आळंदीला जावून. अशी कथा जाली."
"एक विचारू? काका इथे का आला राह्यला?" असं काय घडलं की त्याला अशा जागी रहावं लागतंय? ही तर म्हणतेय मुलगा जर्मनीत आहे. आणि या, या बाईशी लग्न? भोवंडून टाकणारे प्रश्न होते. म्हणजे मी उत्तरं शोधत आले, अन् प्रश्नांचीच यादी वाढत होती...
बाईने माझ्याकडे पाहीलं. एकदा मान वळवून गल्लीत नजर टाकली.
"फौजदारी झालीवती त्यांच्यावर. पैसं बुडवून पळून गेलं म्हनून.”
माणूस परागंदा होईलही, पण त्याची कर्मं त्याची पाठ सोडत नाहीत! या विचारानं मी जरा सुखावले का?
"जेलात रावून आलेला मानूस कुनाचा नस्तो, बाई. ते जेलात्नं भायेर आलं तवा त्यांच्याशी काईबी नव्तं. पोरानं दिकिल संबंद तोडलेवते, मंजे बघा. मंग हितं यूवून हा भाजीचा धंदा सुरू केलान. पैल्यान समोर पाटी लावायचे. मंग आमी लगिन केलं."
मला डाचत होता तो प्रश्न मी विचारला, "काका जर्मनीहून परत का आला? कधी बोलला का काही?”
"बाई, त्यांना लई वंगाळ वाटलंवतं भावाला, तुमाला, आपल्या मान्सांना फशिवल्याचं. जवा बायकू गेली तशी परत आले हिकडे. पन मंग घर ईकलं गेलेलं, मान्सं कुटे गेली पत्या नाय. मग ब्यान्केत गेलं तर त्यांनी पोलिसांना बलावलं. मंग फौजदारीच जाली. तं मंग समदाच इस्कोट जाला.”
"आणि हे कधी झालं?" माझा निर्देश पक्षाघाताकडे होता हे तिच्या लक्षात आलं.
"झाली तीन-चार वर्षं. ते दिस लय वाईट गेले, बाई! रातभर बेसुध व्हते, लई रगत गेलं. ससून्ला आत घ्यालाबी लई टाईम लाव्ला. वाटलं, मानूस वाचतो का नाय... पर निगले देवा त्यातून. ते हे आसं. समदं ईसरले व्हते, सोताचं नावबी आठवे ना.”
समदं? सगळं विसरला... कसं शक्य आहे?
"आता जरा बरं दिसतंय?"
"मंग बरंय मनायचं न् काय"
"आणि अजयचा, त्या जर्मनीतल्या मुलाचा काही...”
"यानं काही ठेवलंच नाही बगा... तुमाला पत्या हाय काय?”
मी नाही म्हणेस्तवर माझा फोन खणखणला. मनोज होता. तो नाट्यगृहावर पोहोचला होता. त्याला मी कुठे आहे सांगितलं. तो बिथरलाच. "अगं, बरी आहेस ना‌? तिथे कुठे गेली आहेस? आणि आता शोधू कुठे तुला?"
"मी तुला लोकेशन पाठवते. लगेच ये." माझ्या आवाजातला कंप त्याला जाणवला.
"पण तिथे काय करते आहेस? ठीक‌ आहे ना सगळं?"
"सगळं ठीक आहे. तू ये, मग मी सांगते."

तेवढ्यात भाजीवालीनं एक गिर्‍हाईक आटोपलं.
"तुमचं चांगलं चाललेलं दिसतया.."
"हो, बरंय"
"आई वडील?"
"आता नाहीत. आई पाच वर्षांपूर्वी गेली, बाबा जाऊन आता पंधरा वर्षं तरी झाली असतील"
"आनी भाऊ?"
"त्याचाही संसार आहे, चाललंय"
"देवाची कृपा, मंग काय"
".."
"आमचं बगताय तुमी. हाय तिते सुकी हौत. तुमच्या काकाची काळजी घेतेय मी."
"..."
"पर तुमचा काका सुभाष तो न्हाई आता. अंगावरून वारं गेलं तेंवाच समद विसरलेत ते. मलाबी ओळखत नवते. मंग आता बरंच सुदारलेत.‌ पन पाठचं समदं पुसलं गेलंय."
म्हणूनच त्यानं मला ओळखलं नाही! कारण मी जर त्याला इतक्या वर्षांनी बघून ओळखलं तर त्यालाही ओळखायला हरकत नव्हती.
बाईनं जणू माझे विचारच ऐकले. "काई उपेघ नाई. तो वळखायचा नाई. तुमाला वाईट वाटंल. पन काका भेटलाच नाय असं मना, की जालं"

संध्याकाळ दाटून आली होती. दिवेलागण झाली होती. वायलचं पातळ घातलेली, मध्यमवयीन, कृश, मोठं कुंकू लावलेली, डोईवर पदर घेतलेली ती भाजीवाली माझ्याशी बोलत होती. ज्या अनावर भावनेनं मला इथे खेचत आणलं होतं त्या पलिकडचा व्यवहार तिच्या शब्दांत होता. छोटीमोठी गिर्‍हाईकं येत होती.

आमची गाडी समोरून आली. मी मनोजला हात केला. त्याला मी हातानेच गाडी वळवून आण असं खुणावलं. आता जाण्याची वेळ झाली होती.
मी भाजीवालीला विचारलं, "बाई, तुमचं नाव काय?"
तिनं सांगितलं, "सुनिता"
"सुनिताकाकू", मी हळुवारपणे म्हणाले.
बाई हलली. तिच्या डोळ्यांत पाणी‌ तरळलं असा मला भास झाला.
"नाय बाई, मी काकू नाय. अन् त्यो आता काका नाय..."
तिनं बाजूच्या पाटीतून एक नारळ उचलला. मागे टपरीत देवीचा फोटो होता. त्या समोरच्या कुंकवाच्या करंड्यात तिनं बोटं माखली, नारळाला चढवली. तो नारळ, चार केळी तिनं माझ्या हातात ठेवली. मी अभावितच वाकून तिच्या पाया पडले.
"सुखी राहा! खरं ते सांगते, आम्हाला तुमचं काय नको, नं तुमाला आमचं. पोटच्या वोढीनं आलीस बाई, पुन्यांदा नको यऊस. हितं तुज्यासाटी काय नाय."
तो नारळ, केळी, व्हायोलिनची केस मागे टाकली अन् मी गाडीत बसले. मनोज बघत होता. त्याच्या चेहेऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं. मी भरल्या‌ डोळ्यानं त्याला मानेनेच खूण केली, चल.

आठवणीत आहेत तेव्हापासून अंतर्मनी सलणाऱ्या प्रश्नांना आता उत्तरं कधीच मिळणार नाहीत? आईबाबा तसेच गेले. त्यांच्या आयुष्याला छेद देणारा तिढा, त्यांच्यासाठी कधीच तो सुटला नाही. आपल्या वडिलांची अमानत आपण गमावली याचं अपार दुःख उरी घेऊन बाबा गेले. आणि आपलं काय चुकलं या विचारात, नशिबाला बोल लावत, आई. आता माझ्यासाठी तरी तो कुठे सुटणार होता? कोणतीच आशा उरली नव्हती.

खरं सांगू? मी एकदा गेले होते तिकडे. एकदाच मी आमच्या जुन्या घरापाशी जाऊन आले होते. झाली पाच-सात वर्षं. खूप वर्षं तिकडे जायची इच्छाच नव्हती, मनात विचार आला तरी कससंच व्हायचं. स्वतःच्या घरातून सामानासकट बाहेर काढलं गेल्याची, फेकलं गेल्याची बेईज्जती... ती आठवणही सहन व्हायची नाही. पण एकदा का कुणास ठावूक, जायची उर्मी आली. त्या हुक्कीत जाऊन आले. कुणा उदम्याचा, व्यापाऱ्याचा टोलेजंग तीन मजली बंगला तिथे उभा आहे आता. खाली नव्या, मोठ्या तीन-चार चार-चाकी गाड्या उभ्या होत्या. दाराबाहेर दारवान खुर्ची टाकून बसला होता. पैश्याची सूज त्या... नाही, नाही, समृद्धीचा वरदहस्त त्या घरावर दिसत होता. ना ओळख ना देख, का म्हणून त्यांच्या भाग्याला नख लावा?
त्या जागच्या आमच्या जुन्या बैठ्या एकमजली घराचं दृष्य डोळ्यांसमोर तरळलं होतं. सुभाषकाकाच्या लग्नाच्या वेळी सजलेल्या आमच्या बंगल्याची आठवण झाली. अभावितच शानूचं आजचं तीन खोल्यांचं बिऱ्हाड आठवलं. जाईपर्यंत कोपऱ्यातल्या एका पलंगावर मुटकुळं करून पडलेली, अंथरूणाला खिळलेली आई आठवली. बाबांचा दमेकरी श्वास कानी वाजला. जीव तुटला हो, अगदी तीळ तीळ तुटला. आमचं भूत-भविष्य पायव्यात गाडून उभ्या राहिलेल्या त्या इमारतीला नजर लागू नये म्हणून कोपऱ्यात उलटी टांगलेली काळी बाहुली, ती जणू आमच्या दुर्दैवाला वाकुल्या दाखवत होती.

पुन्हा इकडे फिरकायचं नाही या निश्चयानं, तो आलीशान महाल, ते चित्र हद्दपार केलं होतं मनातून, बेदखल केलं होतं. पण आज, आत्ता ती खोलवर दाबून ठेवलेली आठवण पुन्हा उफाळून आली. माझ्या उद्ध्वस्त माहेराची दशा दाहवून गेली. हुंदक्यासरशी ओघळलेले आंसू उष्ण होते - रागाचे, संतापाचे, तळतळाटाचे, हतबलतेचे.. कातरवेळी जिवाची काहिली होत होती.

मनोजनं अजूनही काही विचारलं नव्हतं. मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही हे जाणून त्यानं हातानंच निःशब्द थोपटलं. एक ओळखीचा, आपलेपणाचा, आश्वासक स्पर्श. त्या स्पर्शासरशी मी शांत झाले, होत गेले. संध्याकाळभर मृगजळामागे धावणारा माझा जीव सावरला.

ज्यानं ही वेळ आणली, तो सुभाषकाका जिवंत असूनही नसल्यातच जमा होता, नाही का? त्याचे भोग त्यानं भोगले होते, भोगतोय. कोण कुठली भाजीवाली, कपाळीच्या टिळ्याखातर काकाची काळजी घेत होती. पण रक्तानात्याची मी.. त्यानं तरी ते नातं कुठे सांभाळलं होतं तर मी आता सांभाळावं? आता तर संपलंच होतं ते सारं.. संपलं होतं..
अन् अचानक जाणवलं, जी असोशी, जी अस्वस्थता मला सुभाषकाकाच्यामागे खेचत घेऊन आली होती, ती आता शमली होती! आतड्याची ओढ म्हणाली नं ती बाई, तो पीळ सुटला होता...

(समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा जशी आहे तशीच आवडली.

आयुष्यात प्रत्येक "का" चं उत्तर मिळत नाही. नात्यातले गुंते तर नवनवीन "का" ना जन्म देऊन जातात आणि उत्तरं शोधणार्‍यांच्या मनस्वास्थ्याची आहुती पडते. वर्षं उलटतात तरी काही दारं साधी किलकिलीही होत नाहीत आणि आपण मात्र बसतो धडका मारत, दार सैलावायची वाट बघत. आणि मग अर्धं आयुष्य खर्ची पडलंय हे समजलं की जी आहे ती वस्तुस्थिती नाईलाजाने स्वीकारतो. दरवेळी कोर्टकचेरीही गरजेची नसते, साधेसाधे मानपान/ गैरसमज आणि ते उराशी कवटाळून ठेवायचा स्वभावही पुरेसा असतो गाठी पक्क्या बसवायला!
सॉरी अबुवा, मी विषयांतर केलं.

सुंदर कथा..
मी ताऊनसुलाखून निघालोय. आपल्यांनी दिलेले चटके भयानक कोंडमारा करणारे असतात.

काय जबरदस्त कथा आहे! बर्‍याच दिवसांपासून लिस्ट मधे होती. आज तिन्ही भाग एकदम वाचले. शेवट आनंदी म्हणतात तसा नसला तरी वाचणार्‍याला क्लोजर (closure) देणारा आहे.

लेखनाची स्टाइल, अनेक ठिकाणची चपखल शब्दरचना आणि अतिशय समृद्ध भाषा! फार आवडले वाचायला. शेवटच्या वर्णनात "सूज" ऐवजी "समृद्धीचा वरदहस्त" हा केलेला बदल हा हाय पॉइण्ट आहे, कथेशी थेट संबंधित नसला तरी.

तिन्ही भाग सलग वाचून काढले. खरंतर पहिल्या भागानंतर चं क्रमशः बघून मन खट्टू झालं. पण नंतर दिसलं कि झाले आहेत तिन्ही भाग Happy . आधाशासारखे वाचले. खूपच आवडली गोष्ट.

Pages