
(भाग १: https://www.maayboli.com/node/86064)
जर्मनीहून परत आल्याआल्या सुभाषकाकाचं लग्न झालं. बांधल्यापासून कधी रंग दिला नव्हता घराला, तो या वेळी दिला. रहाणारी मंडळी वाढणार म्हणून नवी, मोठी पाण्याची टाकी बांधली. रस्त्याबाजूनं भिंत बांधली. साऱ्या बंगल्यानं जणू कात टाकली. सुभाषकाका खरंच आईबाबांसाठी मुलासारखाच होता. दोघंही खूप खूष होते.
पण नाती ही शेवटी नातीच असतात! ती बदलत नाहीत...
लग्न करून गोरीपान, फुलासारखी छान विनीताकाकू घरी आली. माझ्यापेक्षा दोनतीन वर्षं तर मोठी होती ती. खरं तर मला मैत्रिणच मिळाली असं वाटलं. उगाचच.. ती मात्र मैत्रिणीसारखी कधी वागलीच नाही. ती वागली ती आईच्या जावेसारखी. इतके वर्षं घर आणि लायब्ररी दोन्ही ओढणारी आई, जाऊ आली म्हणून थोडी रिलॅक्स झाली. घराची काळजी आता धाकटी जाऊ बघेल असा विचार केला असेल. झालं उलटंच. घरात रोज खटके उडू लागले. लग्न होणार म्हणून बाजूच्या घरातला भाडेकरू काढून काका तिथे रहायला लागला होताच. काही दिवसांत स्वयंपाकघरही वेगळं झालं.
...ताणलं गेलं, पण तुटलं नाही.
---
पुढची बस आली, सुभाषकाका चढायला लागला. मी घुटमळले. काय करावं?
'अगं, करणार काय आहेस त्याच्यामागे धावून?’
...
काय वाटलं ठावूक नाही, मी पण घाईघाईने सगळ्यात शेवटी बसमध्ये चढले. व्हायोलिनची केस घेऊन भर गर्दीत बसमध्ये चढण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. तसंही गेल्या दहा वर्षांत दहा वेळा तरी बसमध्ये बसले असेन का प्रश्नच आहे! मग आजूबाजूच्या लोकांनी चढायला मदत केली. कंडक्टरनं मला पुढे हाकललं. त्यानंच कोणावर तरी ओरडून अपंगांची सीट सुभाषकाकासाठी रिकामी करून दिली. मी त्या अनोळखी गर्दीत परत अवघडून उभी होते. पण आता काकाचा जवळून दिसत होता. मूळचा गोरा रंग रापला होता. डाव्या भुवईच्यावर कपाळावर मोठी खोक पडल्याचे चिन्ह होतं. गाल ओघळले होते. मला आठवत होती ती गोबरी गालफडं अगदीच खप्पड झाली होती. डोळे निस्तेज होते. डावं अंग लकव्यानं सुकलं-वाकुडलं होतं. हाच का तो सुभाषकाका?
---
माझं लग्न आणि काकूचं बाळंतपण एकदमच आलं. परत एकदा लग्नाची सगळी जबाबदारी आईवर पडली. पण सुभाषकाका जातीनं खपला. काही म्हणून कमी पडू दिलं नाही. माझं लग्न झाल्यावर आईचं दुखणं उद्भवले. ही कसोटीची वेळ होती. नाईलाजानं लायब्ररी बंद करावी लागली. बाबांच्या नोकरीची शाश्वती नव्हती. नव्या तंत्रज्ञानामुळे ड्राफ्ट्समनची व्याख्याच बदलली होती! शानूच्या शिक्षणाची महत्त्वाची वर्षं होती. खर्च वाढलेले आणि चालू उत्पन्न बंद पडलेलं. पण या वेळी विनीताकाकूनं खूप मदत केली. खरं तर तान्हा अजय तिच्या कुशीत होता. पण तिनं नेटानं सगळं घर सांभाळलं. सुभाषकाकानं पैशाला कमी पडू दिलं नाही. जुना दुरावा जाऊन एक उबदार आपलेपणा निर्माण झाला होता. पुन्हा एकदा सूर जुळू लागले होते. पण म्हणतात ना, सुखाला दृष्ट लागते...
आता सुभाषकाकाला नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायची स्वप्नं दिसत होती. फॅक्टरी टाकायची असं म्हणू लागला. त्याला भांडवल लागणार होतं. ते कुठून उभं करायचं?
---
बसमध्ये गर्दी होतीच. कशीबशी अंग चोरून पर्स सांभाळत, व्हायोलिन सावरत मी मध्यातच उभी होते. डावीकडे दरवाज्यात सगळ्या मुली बायका होत्या आणि उजवीकडे बहुतेक पुरूष मंडळी. अचानक उजवीकडचे दरवाजे उघडले आणि लोकं बाहेर पडू लागली. समोरच्या महिलांसाठी राखीव सीटवरच्या बाईने उठता उठता मला ओढूनच बसवलं, "बस बाई हितं." तिला माझ्या नवखेपणाची जाणीव झाली असावी. आता मी सुभाषकाकाच्या मागेच बसले होते. कंडक्टर आला, "कोणै टिकटाचं पुढे?" त्यानं पुकारा केला. आता पंचाईत आली. काका कुठे उतरणार आहे? विचार केला, जाऊं दे, शेवटच्या स्टॉपचं तिकीट घ्यावं. "डेपो", मी सांगितलं. पर्समधे हात घालून वीसाची नोट दिली. तिकीट झालं.
"तिकीट, तिकीट..."
सुभाषकाका मागे वळला, अन् त्यानं खिशातून कुठलंस कार्ड का पास काढला. कंडक्टरनं बघितल्यासारखं केलं, गेला.
मागे वळलेल्या काकानं वळता वळता एक नजर माझ्याकडे टाकली. मी आक्रसले. पण त्याच्या नजरेत निव्वळ कुतुहलाखेरीज कुठलीच ओळख उमटली नाही. बरं झालं! पण का? का नाही ओळखलं? मी त्याला इतक्या लांबून ओळखू शकले, अन् हा एका फूटभरावरून ओळखत नाही? अं... मनात शंकेची पाल चुकचुकली.
---
आई आजारपणातून उभी रहातच होती. सुभाषकाकानं प्रपोजल आणलं. आख्खा बंगला गहाण ठेवला तर त्याला पुरेसं कर्ज मिळणार होतं. बाबा तयार होतेच. त्यांच्यासाठी सुभाष म्हणजे जीव की प्राण. आई मात्र विचारात पडली.
"अहो, हे काय आहे, एकदा विचारून तर घ्या म्हणते मी"
"सुभाष म्हणतोय नां? मग आता आणखी काय विचारायचं? त्याच्यापेक्षा कोणाला जास्त कळतै?" बाबांच्या चेहेऱ्यावर त्रासिक भाव उमटला.
"असं नाही हो! पण हे घर सोडलं तर आपल्याकडे काय आहे? राणीच्या लग्नात तुम्ही फंडावर कर्ज काढलंय. शानूचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. लायब्ररी तर बंदच झालीये. माझी तब्येत ही अशी. आणि तुमचा दमा काय हटणार आहे का? ती जन्मभराची खोड"
"मला कळत नै या गोष्टी असं समजतेस का?" त्यांचा आवाज जरा चढला. सुभाषला विरोध त्यांना विचारातसुद्धा नकोसा वाटत होता.
"म्हणतात वाढलेलं ताट द्यावं पण बसायचा पाट देऊ नये"
बाबा जरा नरमले. "सुभाषनं आजपर्यंत असं काय केलंय की आपण त्याच्यावर विश्वास नै ठेवायचा? शाळेत, कॉलेजात कायम पैला. मोठ्या कंपनीत नोकरी. मोठा पगार. परदेशात, जर्मनीत जाऊन आलाय तो. मग आता आपण त्याचे पाय खेचायचे? आजपर्यंत तो कधी हरलेला नैये. मग आता आपण नाही त्या शंका काढून अपशकुन करायचा का?"
काकावर विनर असा शिक्काच बसला होता. तीच त्याची ओळख होती. त्यामुळे बाबांच्या या प्रश्नाला आईकडे उत्तर नव्हते. तरीही ती अस्वस्थ होती. "आजतागायत आपण कोटी ही रक्कम ऐकलीही नाहीये हो. त्याची काळजी वाटते. बरं, त्याला तरी धंदा करायचा अनुभव कुठेय? आपण लायब्ररी चालवली. महिना हजार-दोन हजारांचा हिशेब जमविताना किती त्रास व्हायचा?"
आईनं कच्चा दुवा बरोबर हेरला होता. पण बाबा म्हणाले, "बरोबरै तुझं. पण आपल्याला लाख कळले नैत तर आपण कोटींची काळजी काय करणार?"
"म्हणूनच म्हण्ते, तुमच्या फॅक्टरीतल्या कोणाला विचारा. ते शालनच्या ह्यांना, ते झालेत ना मॅनेजर, त्यांना विचारा तर..."
हो, नाही करता बाबा तयार झाले. बाबांबरोबरच नोकरीला लागलेले कुलकर्णीकाका चढत चढत आता फायनान्स डायरेक्टर झाले होते. पूर्वी आमचं रोजचं जाणंयेणं होतं. इथेच तर रहायचे. मग गेले तिकडे मॉडेल कॉलनीत.
आणि इथे ठिणगी पडली. सुभाषकाकाला हे पटलं नाही. पण बाबांनी लावून धरलं. त्यात कुलकर्णीकाका अगदी जवळचेच. त्यामुळे त्याला नाही म्हणताही आलं नाही. झालं असं की कुलकर्णीकाकांनी विचारलेल्या प्रश्नांना, मांडलेल्या गणितांना काकाजवळ उत्तरं नव्हती. त्यांनी स्पष्ट सांगितलं, "तुम्ही घराची वाटणी करा, आणि त्याच्या हक्काचं त्याला तोडून द्या. मग त्यानं काहीही करावं."
हा घाव सुभाषकाकाच्या जिव्हारी बसला. त्याला नाही ऐकायची सवय नव्हती. मग त्यानं हट्टाला पेटून विनीताकाकूच्या कुणा नातलगाची साक्ष काढली. पुन्हा एकदा दोन तट पडले. रोजची वादावादी, रोजची भांडणं.
ते दिवस फार कठीण गेले. त्याच वेळी नेमकं शानूचं वर्ष राहिलं. आई आपल्या संसारासाठी, बाबांच्या उपचारांसाठी, मुलाच्या भवितव्यासाठी आकांतानं झगडत होती. विनीताकाकूनं तर आईशी बोलणंच टाकलं. वितंडवाद खूपच वाढला.
शेवटी बाबांनी ठरवलं, "माझा भाऊ आहे, त्याचा हक्कै, मी देणार. त्याची स्वप्नं ती माझी स्वप्नं. मी आज त्याच्या पाठी उभा राहिलो, तर तोही माझ्यासाठी, माझ्या मुलांपाठी उभा राहील". आईचं काही चाललं नाही.
...या सगळ्यात आता तुटेपर्यंत ताणलं गेलं होतं.
---
बसनं वळण घेतलं होतं. वस्ती बदलली. बंगले आणि अपार्टमेंट जाऊन आता चाळी आणि बैठी घरं दिसत होती. मागे झोपड्या दिसत होत्या. सुभाषकाका सीटवरून धडपडत उठला.
'मी उतरू त्याच्या पाठोपाठ?’
'आता आलीच आहेस इथपर्यंत... आलीच आहेस तर...’
'सेफ असेल ना, का...?’
'हा हा, आता का?’
काका पाठोपाठ दोनतीन मुलं-बायका उठल्या. मग मी उभी राहीले. पुन्हा ते सगळं सांभाळणं, सावरणं आलं. एका हातानं वरचा बार धरला, दुसऱ्या हातानं व्हायोलिन. गचका खाऊन बस थांबली. पाय ओढत काका उतरला. पाठोपाठ बाकीचे. ड्रायव्हरला घाई झाली होती. माझ्या उतरण्याची वाट पहात तो घुर्र घुर्र करायला लागला होता. पण काका कुठे वळतोय हे पाहून मला उतरायचं होतं. मी उतरले अन त्याच्या उलट्या दिशेला वळले. बस गेली.
काका हळूहळू रस्ता पार करून गेला. मी दोन पावलं मागे सरून एका बंद दुकानाच्या कनातीखाली उभी राहिले. काका जाताना कोपऱ्यावरच्या भाजीवाली जवळ थांबला. हातातली पिशवी त्यानं त्या भाजीवालीला दिली. ते दोघं बोलत होते. अगदी घरच्यासारखे...
---
कर्जाच्या कागदपत्रांवर सह्या झाल्या आणि महिन्याभरातच सुभाषकाकानं घर सोडायचं ठरवलं. महर्षीनगरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये जायचं, आणि ही जागा भाड्याने द्यायची. बाबांना हे अजिबात आवडलं नाही. हजार रुपये महिना वाचवण्यासाठी स्वतःच राहतं घर काकानं सोडायचं ही कल्पनाच त्यांना पचनी पडली नाही. पण विनीताकाकू आता इथे रहायला तयार नव्हती.
...ताणलेले तुटलं होतं.
---
सुभाषकाका शेजारच्या गल्लीत जायला लागला. त्याला हाक मारून भाजीवालीनं दोन केळी दिली. तो परत वळला, पाय खेचत चालायला लागला. मला काकाची खासियत आठवली. घरी परत येताना तो हमखास काही तरी विकत आणायचा. कधी भेळ, कधी वडे, कधी भाजी, कधी फळं. केळी तर ठरलेली...
'मग का वागला तो असा? मला विचारायचंय त्याला! का तोडले त्यानं संबंध?’
'उत्तर मिळेल असं वाटतंय?’
'काय मिळवलं आपल्या भावाला फसवून, बुडवून?’
'प्रश्न, प्रश्न, आणखी प्रश्न.. अन् काय होणार आहे गं उत्तर मिळून?’
'माहित नाही. खरंच माहिती नाही. पण...’
---
बॅंकेची फायनल नोटिस आली. घरावर जप्ती आली होती! हे घडणार असं आधीच कळलं होतं हो. पण तेंव्हा काकानं हस्ते-परहस्ते निरोप पाठवून काही थातुरमातूर कारणं सांगितली होती.. बाबांचा त्याच्यावर विश्वास बसला. आई मात्र खंतावली, आणि काळजीनं खंगली. पण कसं थांबवावं ते कळत नव्हतं. कारण काकानं तसे काही संबंधच ठेवले नव्हते. शेवटची ती नोटिस घेऊन बाबा त्याच्या घरी गेले. तर तो तेही घर सोडून परागंदा झाला होता. कुठे गेला ते शेजारी पाजारी कुणीच सांगू शकले नाहीत. विनीताकाकूच्या माहेरी आई गेली. तर आम्हाला माहित नाही असं सांगून तिची बोळवण केली गेली. मग शानू फॅक्टरीवर जाऊन भलं मोठं टाळं बघून आला. बाबा बॅंकेत गेले. तिथे कळलं की, सुभाषकाकाचा धंदा सुरू होण्यापूर्वीच बुडाला होता. फॅक्टरी उभारण्यातच एवढे पैसै गेले होते की धंदा करायला काहीच शिल्लक नव्हते. तरीही काकानं उधार उसनवारी करून दीड-दोन वर्षं प्रयत्न केला होता. पण कर्जाचा बोजा भयंकर वाढला होता. शेवटी तो जर्मनीला एक नोकरी मिळवून निघून गेला होता. चक्क पळून गेला होता!
आम्हाला याची काहीच, काहीच कल्पना नव्हती. आणि खरं सांगायचं तर आईबाबांना ते समजून घ्यायचंच नव्हतं..
बाबांनी आकांडतांडव केलं. पण हे त्यांच्याच बंधुप्रेमाचं, आंधळ्या विश्वासाचं, अव्यवहारीपणाचं फलित होतं. त्यांच्या रागाचं रूपांतर बुद्धिभ्रंशात झालं म्हणा ना. त्यांनी मनोमन ठरवलं, ही जमीन, ही जागा, हा बंगला हे सगळं माझं आहे. माझ्या वडिलांची कमाई आहे, त्यांची आठवण आहे, त्यांनी दिलेला ठेवा आहे. त्यांचा वारसा आहे मला शानूसाठी जपून ठेवायचाय. तो सोडून मी इथून बाहेर जाणार नाही. तुम्हाला मला इथून फरफटवत बाहेर काढावं लागेल.
कालौघात त्यांच्यापाठी आईलाही फरपटावं लागलं, दैना झाली...
कोर्ट कचेऱ्या झाल्या पण केस उभीच राहू शकली नाही. अनेक वेळा बॅंकेची लोकं येऊन गेली, त्यांना समजावून गेली. एका सज्जन माणसाला घराबाहेर काढायला त्यांनाही अवघड वाटत होतं. बाबा तर कोणाचंही काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. आईनं विषय काढला की त्यांचा दमा बळावायचा. मग शानूनं एक भाड्याचं घर बघितलं. त्यानं छोटा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय मांडला होता. तो होता सिंहगड रोडला. तिथंच त्यानं स्वस्तातलं घर बघितलं. थोडं थोडं सामान जमेल तसं हलवलं. पण बाबा आपल्या भूमिकेवर ठाम होते.
शेवटी तो दिवस आलाच. पोलिसांच्या ताफ्यासह बॅंकेचे वसुली अधिकारी आले, आणि घरातलं उरलंसुरलं सामान रस्त्यावर आलं. बाबा अविचल, हाताची घडी घालून शांत उभे होते, उतरत्या उन्हात, आपल्या ध्वस्त आयुष्याची लक्तरं बघत.
आम्ही होतो. शेजारी-पाजारी सगळे मदतीला आले. सामान सुरक्षित ठेवायला, हलवायला मदत केली. बॅंकेचे अधिकारी खरं तर निर्ढावलेले असतात, पण जाताना त्यांनीही बाबांना दंडवत घातला.
(क्रमशः)
छान लिहिताय
छान लिहिताय
बँकेच्या जप्तीचं वाचून फार वाईट वाटलं
वाचत आहे
वाचत आहे
छान लिहिताय
छान लिहिताय
बँकेच्या जप्तीचं वाचून फार वाईट वाटलं+१११
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
तुमची शैली एकदम चित्रदर्शी
तुमची शैली एकदम चित्रदर्शी आहे. सगळी पात्रं आणि प्रसंग अगदी डोळ्यापुढे उभे रहातात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
दोन्ही भाग लागोपाठ वाचले.
दोन्ही भाग लागोपाठ वाचले. मस्त! पुढच्या भागाबद्दल उत्सुकता आहे.
बँकेच्या जप्तीचं वाचून फार
बँकेच्या जप्तीचं वाचून फार वाईट वाटलं+१११
पुढील भाग लवकर येऊ द्या.
वाह! काय रंगवलीये कथा.
वाह! काय रंगवलीये कथा.
हा भाग सुद्धा छान झालाय.
हा भाग सुद्धा छान झालाय. चित्रदर्शी.