दर चार वर्षांनी भरणारा खेळाडूंचा 'कुंभमेळा' म्हणजे उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा ह्या वर्षी फ्रान्समधल्या पॅरीसमध्ये आयोजित केल्या गेल्या आणि मला अगदी अनपेक्षितपणे.. म्हणजे फार प्लॅनिंग, ठरवाठरवी न करता तिथे जाऊन ऑलिंपिक गेम्स प्रत्यक्ष बघायची संधी मिळाली. 'प्रत्यक्षापेक्षा प्रतिमा उत्कट' असं म्हणतात त्याच्या अगदी उलट अनुभव आला. म्हणजे प्रतिमेत किंवा टिव्हीवर दिसणारे हे खेळ उत्कट/भारी वगैरे असतातच पण तिथे जाऊन अनुभवता आलेला ऑलिंपि़कचं उत्सवी वातावरण, उत्साह, जोष, अतिशय तीव्र स्पर्धा हे सगळं खरोखरच शब्दांच्या पलिकडचं होतं. काही सेंकद ते काही मिनीटे इतक्या कमी कालावधीत पदकांचा निर्णय होत असतो पण त्यासाठी अनेक खेळाडू अनेक वर्ष अथक प्रयत्न आणि कष्ट करतात आणि त्यापैकी बहुतांश खेळाडूंच्या पदरी अखेरी निराशाच येते. तसेच यजमान शहरातली संयोजक समिती सुमारे आठ ते दहा वर्ष स्पर्धेची तयारी करत असते. ह्या सगळ्यांचं झपाटलेपण प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळाली, त्याचा हा वृत्तांत.
ऑलिंपिकसाठी पॅरिसला जावं का असा विचार गेल्या वर्षाखेरीस आणि ह्या वर्षीच्या सुरूवातीला केला होता पण त्यावेळी इथून पॅरिसपर्यंतची विमानाची तिकीटं खूप महाग होती. इतकी की तेव्हड्या किंमतीत पुण्याची तिकीटं काढता आली असती. मग तो विचार मागेच पडला. दरम्यान वसंत ऋतूचे महिने खूप गडबडीत गेले. बघता बघता उन्हाळा आला आणि ऑलिंपिकचे पडघम वाजायला लागले. विविध खेळांच्या आणि देशांच्या क्वालिफायर्सचे निकाल, ऑलिंपीकची टॉर्च रॅली, देशोदेशीच्या ध्वजधारकांच्या घोषणा आणि पॅरिसमधल्या तयारीच्या बातम्या वर्तमानपत्र तसेच सोशल मिडीया फिडमध्ये दिसायला लागल्या. मी जवळजवळ दिडवर्ष मोठी सुट्टी न घेतल्याने ऑफिसमधूनही सुट्टी घेण्याबद्दल आठवण करणारे इमेल यायला लागले. दरम्यान माझ्या आईचा लंडनजवळ रहाणार्या चुलत बहिणीकडे जायचा बेत ठरला. ती म्हणाली तू पण ये, तुला इथून ऑलिंपीकला जाता येईल! झालं.. ऑलिंपिकला जाण्याच्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली. तिकीटं महागच होती पण लक्षात आलं की क्रेडीट कार्डवरचे पॉईंट वापरून बर्याच कमी म्हणजे जवळजवळ फुकटातच विमानाची तिकीटं मिळू शकतात. आश्चर्य म्हणजे पॅरिसमध्ये रहाण्याची हॉटेल फार महाग नव्हती. कारण तिथल्या बर्याच लोकांनी आपली रहाती घर एअर बीअँडबी वर भाड्याने टाकून ते स्वतः बाहेर गावी निघून गेले होते. नेहमी जे खेळ बघितले जातात असे खेळ म्हणजे टेनिस, फुटबॉल ह्या खेळांचे सामने मला बघायचे नव्हते. बाकी खेळांपैकी बॅडमिंटन, हॉकी, वेटलिफ्टींग मध्ये भारतीय खेळाडू बघायची संधी होती पण एखाद्या दिवशी आपले खेळाडू असतील की नाही हे आधीच्या निकालांवर अवलंबून होतं. त्यामुळे त्यात फार न पडता स्वस्त मिळतील त्या खेळांची तिकीटं घ्यायची हे ठरवलं. कारण मुळात सामने बघण्याबरोबर किंवा त्यापेक्षा जास्त तिथलं वातावरण अनुभवणं, एव्हड्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणार खेळाडू कसे वावरतात हे बघणं आणि एकंदरीत एव्हड्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन कसं करतात, काय गोष्टींचा बारकाईने विचार करतात, व्यवस्था कशी लावतात हे ही बघायचं होतं. भारतीय किंवा इतर माहिती असलेल्या खेळाडूंचे सामने आणि मेडल सेरेमोनी बघायला मिळाल्या तर तो बोनसच असणार होता. एकंदरीत सगळं जमू शकेल असं लक्षात आल्यावर येता-जाता लंडनचं आणि लंडनहून पॅरिसच तिकीट काढून टाकलं.
पॅरिस (किंवा फ्रान्स) म्हंटलं की मोर्चे आणि निदर्शनं आलीच. त्यामुळे ऑलिंपिकच्या आधीही तिथे ह्या दोन्ही गोष्टी सुरु झाल्या. ऑलिंपिकमधल्या
लांबपल्ल्याच्या पोहोण्याच्या स्पर्धा पॅरिसमधून जाणार्या 'सीन' नदीत होणार होत्या. ती नदी फार काही स्वच्छ नाहीये, त्यामुळे तिथल्या महापौरांनी सर्वात आधी सीन नदी स्वच्छता मोहीम उघडली आणि ते काम पूर्ण झाल्यावर स्पर्धेच्या आधी अध्यक्ष मॅक्रॉन ह्यांच्याबरोबर स्वत: नदीपात्रात पोहोण्याचा मानस व्यक्त केला. पुढे काम पूर्ण झालं आणि त्यांनी ह्या पोहोण्याच्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली. तिथल्या काही विघ्नसंतोषी लोकांनी ह्या पोहोण्याच्या कार्यक्रमाला खोडा घालण्यासाठी नदीत मलमुत्र विसर्जन मोहीम उघडली आणि त्याचा जोरदार प्रचार केला. अखेरीस महपौरांना पोहोण्याचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आणि पुढे पोलिस बंदोबस्त वाढवून नदीची स्वच्छता पूर्ण करावी लागली. उद्धाटन सोहोळ्यातली देशोदेशींच्या खेळाडूंची परेडही नदीवर बोटींमधून होणार आहे असं नंतर जाहिर झालं. मागे आम्ही पॅरिसला फिरायला गेलो होतो तेव्हा आम्हांला ती नदी आणि त्यातली क्रुझ टूर फार आवडली नव्हती. एकतर न्युयॉर्क आणि लंडन इथल्या हडसन आणि थेम्स नद्यांपेक्षा पात्र लहान आहे आणि ही दोन शहरं आणि शिकागो ही शहरं तिथल्या क्रुझवरून फार सुंदर दिसतात. विशेषतः संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी! इथे मात्र आयफेल टॉवर आणि फार जवळ नसलेलं नॉत्र दॅम सोडून फार काही छान दिसलं नाही. म्हंटलं ऑलिंपिकमुळे नदी सुशोभिकरण होणार असेल तर चांगलच आहे!
प्रत्येक स्पर्धेच्यावेळी यजमान शहर उद्घाटन सोहोळ्यासाठी काही ना काही नाविन्यपूर्ण कल्पना लढवत असते. अटलांटाला अध्यक्ष बिल क्लिंटन ह्यांनी मुहंमद अली ह्यांची मागितलेली माफी आणि त्यांना पुन्हा प्रदान केलेलं सुवर्णपदक, सिडनीला कॅथी फ्रिमनने स्वतः उभ्या असलेल्या स्तंभाला आग लावून केलेलं ज्योत प्रज्वलन, अॅथेन्सला स्टेडीयममध्ये साकारलेलं तळं, त्यावर वल्हवणारी बोट आणि काही सेकंदांमध्ये ते पाणी वाहून जाऊन तयार झालेलं ग्राऊंड, बिजिंगमधली नेत्रदिपक आतिषबाजी आणि नंतर टिव्ही/ मिडीयामध्ये दाखवलेलं फुटेज खोटं, एडीट केलेलं असल्याचं कळल्यावर झालेला भ्रमनिरास, लंडनला राणीने पॅराशुटमधून थेट स्टेडीयममध्ये मारलेली (व्हर्चुअल) उडी, रिओची विस्कळीत परेड आणि टोक्योला प्रेक्षकांशिवाय झालेला उद्घाटन सोहळा. ह्या सगळ्या आठवणींमुळे पॅरिसचा स्टेडियममध्ये नसलेला, बोटींमधून परेड होणारा उद्घाटन सोहळा बघायची उत्सुकता होती पण नेमका त्याच दिवशी आमचा कॅम्पिंगचा कार्यक्रम ठरल्याने उद्घाटन सोहळा बघताच आला नाही!
स्पर्धेच्या उद्घाटनाच्या काहीच दिवस आधी आणखी काही विघ्नसंतोषी लोकांनी लोकांनी तिथल्या मेट्रोच्या सिग्नल यंत्रणेची मोडतोड केली आणि गोंघळ निर्माण करायचा प्रयत्न केला. स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर दुरूस्ती केली आणि दरम्यान बस सेवा उपलब्ध करून दिली.
दरम्यान आम्ही अॅथलेटिक्स, डाईव्हिंग, कनुईंग आणि वेटलिफ्टींग अश्या चार खेळांच्या सामन्यांची तिकीटं काढली. स्विमिंगच्या सगळ्या शर्यती आधीच्या आठवड्यात संपत होत्या. अॅक्वेटीक सेंटरमध्ये जायची संधी डाईव्हिंग निमित्त मिळणार होती. बॅडमिंटनचे महिला आणि पुरूष एकेरीचे पदकांचे सामने आम्ही जायच्या आदल्या दिवशी होते. त्यात सिंधू आणि लक्ष सेन असायची खूप जास्त शक्यता होती पण त्याची तिकीटं फार महाग होती नाहीतर मग विमानाच्या तिकीटांची बदला बदली शक्य आहे का ते बघितलं असतं. अॅथलेटिक्सचा तो पहिला - दुसराच दिवस होता. त्यामुळे पदकांच्या शर्यती नव्हत्या पण भारतीय खेळाडू बघायला मिळायची शक्यता होती. आयोजकांतर्फे तिकीट रि-सेलींगसाठी अतिशय चांगली वेबसाईट तयार केलेली होती. त्यावर आपल्याकडे असलेली तिकीटं विकण्याची आणि आपल्या हवी असलेली तिकीट उपलब्ध असतील तर ऐनवेळी घेण्याची सोय होती. त्याच्यावरही नरज ठेवायला सुरूवात केली.
युके/लंडनमध्ये बहिणीच्या घरी चार पाच दिवस मजा करून झाल्यावर, काही जुन्या गोष्टी परत बघून झाल्यावर, काही नव्या गोष्टी पहिल्यांदा बघून झाल्यावर आणि काही गोष्टी ह्याही ट्रीपमध्ये बघायच्या राहून गेल्यावर पॅरिसला जायचा दिवस उजाडला. त्या दिवशीपर्यंत भारताला दोन ब्रांझ पदकं मिळाली होती, सिंधू आणि लक्ष सेनची पदकं थोडक्यात हुकली होती, विनेश फोगट प्रकरण जोरात सुरू होतं. सनजलेल्या दोन महत्त्वाच्या बातम्या म्हणजे आमच्याकडे तिकीटं होती त्या दिवशीच्या अॅथेलेटीक सेशनमध्ये नीरज कुमारची प्राथमिक फेरी असणार होती आणि त्याच दिवशी संध्याकाळी भारत जर्मनी उपात्यंफेरीचा हॉकी सामना पॅरिसमध्येच होणार होता! ह्या सामन्याची तिकीटं आमच्याकडे नव्हती पण तो सामना आमच्या नशिबात होता. झालं काय की मी भल्या पहाटे गजर वाजल्यावर तो बंद करून किलकिल्या डोळ्यांनी फोन बघत होतो, तर त्यात ते रि-सेलिंग प्लॅटफॉर्मवरचं पान उघडलं आणि भारत जर्मनी मॅचची तिकीटं उपलब्ध आहेत असा पॉप-अप आला. ह्या दोन टीमचे फॅन नसण्यार्या कोणीतरी ऐनवेळी तिकीटं विकायला काढली असावी. तो पॉप-अप बघून माझे डोळे एकदम गारफिल्डच्या डोळ्यांसारखे मोठे झाले आणि मी ताडकन उठून बसतो. सिट्स एकदम चांगल्या होत्या, वेळा सोईच्या होत्या पण तिकीटं आमच्या बजेट पेक्षा जरा महाग होती! आम्ही निघणार म्हणून आई उठलेलीच होती. मग मी शहाण्या मुलासारखं ही जरा महागाची तिकीटं काढू का खरच? असं आईला आणि त्याचबरोबर होममिनिस्टरना विचारलं. आई हसायलाच लागली. होममिनिस्टर म्हणे आता ऑलिंपीकसाठी एव्हड्या लांब आला आहेस तर कुठे विचार करत बसतोस? टाक काढून! मग पडत्या फळाची आज्ञा मानून लगेच तिकीटं काढून टाकली आणि पॅरिसला जायला तयार झालो. खरतर मला इंग्लिश खाडी खालून जाण्यार्या युरोस्टार रेल्वेने लंडन ते पॅरिस हा प्रवास करायचा होता पण त्याची तिकीटं फारच महाग होती. बहिणीच्या घरापासून जवळ असलेल्या एअरपोर्टवरून लो-कॉस्ट एअर लाईनचं चांगलं डील मिळालं आणि सकाळी ६ वाजता पॅरिससाठी उड्डाण केलं.
पॅरिस एअरपोर्टवर लँड झाल्यापासूनच ऑलिंपिकचं वातावरण सुरू झालं. तिथे उभ्या असलेल्या काही विमानांवर रिंग रंगवलेल्या दिसल्या. गेटवरून आतमध्येही गेल्यावरही सजावटीवर ऑलिंपिकचा लोगो आणि 'पॅरिस २०२४'च्या पाट्या होत्या. मला ह्यावेळचा लोगो आवडला. द्वयर्थी शब्द असतात तसं द्वयर्थी चित्र होतं आणि ते ही पॅरिस शहराच्या प्रतिमेला साजेसं! आम्ही दोन दिवसांसाठीच आलेलो असल्याने आमच्याबरोबर फक्त बॅकपॅक होत्या. त्यामुळे आत्ता लगेच हॉटेलवर जाऊन त्या ठेवायची गरज नव्हती. तसच सामान नसल्याने आम्ही सगळीकडे मेट्रो आणि बसनेच फिरायचं असं ठरवलेलं होतं. मुख्य टर्मिनलपासून मेट्रो ट्रेन स्टेशनकडे जाणारा मार्ग दाखवण्यासाठी दिशादर्शक बाणांऐवजी जमिनीवर पावलं दाखवली होती. ऑलिंपिकसाठी म्हणून २० युरोचा दिवसभराचा पास मिळत होता तो आम्ही घेऊन टाकला. तिकीटं काढणे, माहिती बघणे ह्या सगळ्याकरता माहिती देणारे स्क्रीन होते पण बरोबर बहुभाषिक मदतनीसही होते.
मेट्रो स्टेशनवरून आम्ही आमच्या पहिल्या ठिकाणाकडे प्रवास सुरू केला ते म्हणजे Stade De France च्या दिशेने. हे फ्रान्स मधलं सगळ्यात मोठं स्टेडीयम आहे. ह्यात एकावेळी ८०००० पेक्षा जास्त माणसं बसून खेळाचा आस्वाद घेऊ शकतात. १९९८च्या फुटबॉल वर्ल्डकपची फायनल, २०२३च्या रग्बी वर्ल्डकपची फायनल ह्याच स्टेडीयमवर पार पडल्या. ह्या स्पर्धांमध्ये अॅथलेटीक्स आणि रग्बी असे दोन खेळ ह्या स्टेडीयममध्ये आयोजित केले होते. मेट्रोतून उतरल्यावर सगळी मंडळी स्टेडीयमच्याच दिशेने चालली होती, त्यामुळे कुठे दिशा शोधण्याची गरज पडली नाही. आम्ही स्टेडीयममध्ये पोचलो तेव्हा ते सत्र नुकतच सुरू झालं होतं. प्रचंड मोठ्या स्टेडीयममध्ये आमच्या सिट शोधून आम्ही स्थानापन्न झालो आणि तेव्हा पाहिल्यांदाच ऊन आणि तहानेची जाणिव झाली. आधी सगळ्या उत्साहात काही जाणवलच नाही. जरा स्थिरस्थावर होऊन इकडे तिकडे बघितलं तेव्हा लक्षात आलं की अॅथलेटीक्स म्हणजे एकदम जेवणाचा बुफे आहे! आम्ही बसलो होतो त्याच्या बरोबर समोर भालाफेक आणि गोळाफेकच्या प्राथमिक फेर्या सुरू होणार होत्या. डाव्या बाजूला लांब उडीची तयारी सुरू होती. तर उजवीकडे अडथळ्याच्या शर्यतींसाठी अडथळे मांडण्याचे काम सुरू होते. २००, ४०० मिटरच्या रनिंग रेसपण ट्रॅकवर होणार होत्या.
*
*
काही वेळातच भालाफेकीची प्राथमिक फेरी सुरू झाली. पहिल्या गटात भारताचा जेना किशोर होता. त्याला आधी पदक मिळालं नसलं तरी तो ही कायम पहिल्या दहात तरी असतोच. पण ह्या स्पर्धेत मात्र त्याची कामगिरी खूप चांगली झाली नाही आणि तो गटात सातव्या स्थानावर राहिला. बाकीच्या देशांचे चाहते एकत्र बर्यापैकी एकत्र बसले होते पण भारतीय चाहते कमी होते आणि विखुरलेले होते. यजमान फ्रान्सची मंडळीतर सर्वत्र होती आणि त्यांच्या झेड्यांनी सगळं वातावरण लाल-निळं झालं होतं. आमच्या शेजारी एक जर्मन दांपत्य बसलं होतं. पहिल्या गटात जर्मनीचा खेळाडू पहिला आल्याने ते भारी उत्साहात होते. आधी फार बोलत नव्हते, पण नंतर बोलायला लागले. त्यांना म्हंटलं आम्हाला जर्मनी ट्रीप करायची आहे तर बघायलाच पाहिजे अश्या जागा कोणत्या? असं विचारल्यावर मी तरी आत्तापर्यंत बर्लिन, बॉन, म्युनिक अशी उत्तरं ऐकली आहेत. पण हे म्हणाले हॅम्बुर्गला जा नक्की! अजिबात चुकवू नका. आता मला हॅम्बुर्ग म्हंटलं की मोनिका सेलेसवर झालेला चाकू हल्लाच आठवतो. त्यामुळे मी पुढे काय फार विचारलं नाही. मग त्यांनीच विचारलं की तुम्ही भारतीय आहात का? तुमचा प्लेयर गेल्यावेळचा गोल्डमेडलिस्ट आहे ना? मस्त आहे तो! मग मी त्यांना जरा 'बेनेफिट ऑफ डाऊट' दिला. दरम्यान महिला आणि पुरूषांच्या अडथळ्यांच्या शर्यती झाल्या. महिलांच्या तर अगदी आमच्या समोर झाल्या.
*
मला त्या शर्यतींबरोबरच ते अडथळे मांडणं आणि आवरणं हे ही बघायला फार आवडलं. अगदी शिस्तबद्ध कवायती सारखं, एकदम आर्मी परेड सारखं. एकतर त्यांना त्यात फार वेळ घावलायचा नव्हता आणि दुसरं म्हणजे सगळी मांडणी अगदी काटेकोर आणि बिनचूक व्हायला हवी होती जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही. थोड्यावेळाने भालाफेकीच्या ग्रुप बी प्राथमिक फेरीला सुरूवात झाली. ह्यात नीरज कुमार आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीम दोघांचाही समावेश होता. नीरज कुमार कुठलाही तामझाम न करता अगदी साधा टीशर्ट आणि त्यावर पिनांनी लावलेला नाव/नंबर टॅग अश्या वेशात आला. वॉर्मअप करून एक-दोन प्रॅक्टीस थ्रो टाकून पुन्हा आत गेला. त्यावेळी त्याच्याकडे बघून ह्याच्या बाहुंमध्ये एव्हडी ताकद असेल असं अजिबात वाटत नव्हतं! तीन प्रयत्नांमध्ये ८४ मिटर किंवा लांब भाला फेकणारे टॉप १२ स्पर्धक अंतिम फेरीत जाणार होते. तुलनेने नवख्या स्पर्धकांच्या फेर्या आधी सुरू झाल्या. अखेरीस नीरजचं नाव पुकारलं गेलं. तेव्हा मात्र भारतीय प्रेक्षकांनी आणि आम्हीही जोरदार चिअरींग केलं. म्हणतात तसं तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला! थोडं पुढे येऊन रेषेचा अंदाज घेतला. एकदोन वेळा हात ताणले आणि अगदी सहज, नजाकतीत भाला फेकला तो पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८९.३४ मिटर लांब. तो अंतिम फेरीत गेल्याचं लगेचच जाहीर झालं आणि त्यामुळे आता तो पुढचे टर्न घेणार नाही हे ही. त्याने फेकलेला भाला अगदी आमच्या पुढ्यातच पडला असं वाटलं. त्यानंतर दोन खेळाडूंनंतर अर्थद नदीमचा नंबर होता. आधी तो वॉर्मअप करत होता त्यावेळी त्याने जॅकेट घातलेलं होतं पण आता तो त्याच्या खेळायच्या वेस्टमध्ये आला तेव्हा जाणवलं की हा नीरजपेक्षा अंगापिंडाने चांगलाच मजबूत आहे. मात्र नव्वदीच्या दशकातल्या (किंवा आत्ताचाही काही तुरळक) पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या चेहेर्यावर जसा माज असायचा तसा ह्याच्या चेहेर्यावर दिसला नाही. एकदम सोबर वाटला. त्यामुळे मग आम्ही त्याच्यासाठीही टाळ्या वाजवल्या. त्यानेही नीरज प्रमाणेच पहिल्याच प्रयत्नात ८६ मिटर भालाफेक करून अंतिम फेरीत स्थान मिळवलं. नंतर नीरजच्या आणि त्याच्या शैलींबद्दल एक लेख वाचला. नीरज फक्त 'मसल पॉवर'चा वापर न करता भाला फेकायच्या अॅक्शनच्या अचुकतेवर जास्त भर देतो. भाला फेकताना त्याचा कोन किती हवा, शरीराची पोझिशन कशी हवी वगैरे बाबी घोटून घोटून जास्तीत जास्त योग्य पध्दतीने करण्यावर त्याच्या सरावाचा भर असतो. मात्र नदीमचा भर त्याच्या मसल पॉवरवर जास्त असतो आणि ते त्याच्या शरीरयष्टीवरून जाणवतं. क्रिकेटचं उदाहरण द्यायचं तर बॉलिंग करताना तुलनेने खूप छोटा रनअप असूनही खांद्या-दंडामधल्या ताकदीवर वसिम अक्रम आग ओकत असे तसच काहीसं. ह्या दोन्ही पद्धतींमधे चूक किंवा बरोबर असं काही नाही, शिवाय तुम्ही कुठल्याही पद्धतीवर भर द्या दुसरी गोष्ट किमान प्रमाणात करावीच लागते म्हणजे ताकद आणि अचुकता दोन्हीही हवच. पण नीरजची पद्धत जास्त 'कन्सिस्टंट' आहे. म्हणजे त्याने ह्या स्पर्धेत टाकलेले बरेचसे थ्रो ८८-८९ मिटर गेले. तर नदीमच्या पद्धतीत योग्य प्रकारे ताकद लावली तरच जास्तीत जास्त लांब भाला जाऊ शकतो. म्हणजे टोला बसला तर ग्राऊंडच्या बाहेर षटकार नाहीतर कॅच आऊट. नदीमने पुढे अंतिम फेरीत ९२ मिटर लांब भाला फेकून सुवर्णपदक पटकावलं पण त्याची रेंज ८६ मिटर ते ९२ मिटर इतकी राहीली. एकूण नीरजची भालाफेक प्रत्यक्ष बघणं हा अनुभव अत्यंत भारी होता! अजून एक गंंमत म्हणजे खेळाडूंनी फेकलेले भाले परत मागे घेऊन जाण्यासाठी रिमोट कंट्रोलवर चालणार्या स्वयंचलित गाड्या (खेळण्यातल्या असतात तश्या) होत्या. म्हणजे अंतर मोजून झालं की तिथला एक माणूस तो भाला उचलून त्या गाडीवर अडकवत असे आणि मग ऑपरेटर ती गाडी मागे वळवत असे. मला तंत्रज्ञानाचा हा वापर फार आवडला!
एकीकडे महिलांच्या लांब उडीच्या स्पर्धा सुरू होत्या. खेळाडू कुठल्याही देशाच्या असल्या तरी बर्याचश्या खेळाडू आफ्रिकन वंशीय होत्या. एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे कुठल्यातरी आखाती देशाची खेळाडू चेहेरा सोडून बाकी सर्वांग झाकेल असा इस्लामी पोषाख (हिजाब, अबाया वगैरे जे काही असतं ते) घालून लांब उडी मारत होती. बाकी काही खेळाडूंनी फक्त लज्जारक्षणार्थ घातलेले पोषाख हे एक टोक आणि हा पायघोळ पोषाख हे दुसरं टोक. ती खेळाडू जवळजवळ शेवटच्या स्थानावर राहिली पण इथपर्यंत येण्यासाठी तिच्या देशातल्या, समाजातल्या व्यवस्थेशी तिला भरपूर झगडा करावा लागला असणार आणि त्याबद्दल तिला सलाम! दरम्यान महिलांच्या चारशे मिटर आणि पुरुषांच्या दोनशे मिटर धावण्याच्या "हिट्स" ही झाल्या. ह्यात एक भारतीय स्पर्धक होती पण ती अंतिम फेरीत पोचू शकली नाही. एका हिटमध्ये फ्रान्सचा खेळाडू पहिला आला, तेव्हा एकच जल्लोष झाला.
पळणारे खेळाडू जसजसे पुढे जात होते तसतसे त्या भागातले प्रेक्षक जोरात ओरडायला लागायचे. त्यामुळे आपोआपच 'मेक्सिकन वेव' होत होत्या. आयोजनातली अजून एक चांगली बाब म्हणजे प्रत्येक हीट ट्रॅकवरच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होत होती, जेणेकरून स्टेडीयममधल्या सगळ्या भागात बसलेल्या प्रेक्षकांना जवळून रेस बघितल्याचा अनुभव मिळेल. सगळ्या स्पर्धा संपल्यावर लोकांचं फोटो सेशन सुरू असताना, हळूहळू भारतीय प्रेक्षक एकत्र जमा झाले. कोणीतरी झेंडाही आणला होता मग सगळ्या रँडम लोकांनी एकत्र फोटो काढले. नीरजच्या नावाने खूप चिअरींग केलं. कोणीतरी सांगितलं की नीरज आणि बाकी खेळाडू एका विशिष्ट दाराने बाहेर जाणार आहेत म्हणून मग सगळे तिकडेही धावलो पण तोपर्यंत भालाफेकीचे खेळाडू निघून गेले होते. पण नंतर आम्हांला २०० मिटर पळण्याच्या शर्यतीत भाग घेतलेला झेक रिपब्लिकचा एडवर्ड कुबेलिज नावाचा खेळाडू भेटला. लोकांनी केलेल्या अभिनंदन आणि कौतूकामुळे तो आधी जरा बुजत होता पण नंतर छान बोलला आणि फोटोही काढू दिले. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूला प्रत्यक्ष भेटण्याची ही पहिलीच वेळ त्यामुळे मस्त वाटलं. एकंदरीत अॅथलेटीक्सचा अनुभव जबरी होता! आमच्या ट्रीपची सुरुवात तर एकदम दणक्यात झाली होती.
आता इथून जायचं होतं ते अॅक्वेटीक सेंटरला महिलांच्या डायव्हिंगची अंतिम फेरी बघण्यासाठी! चांगली गोष्ट अशी की अॅथलेटिक्स स्टेडीयमपासून अॅक्वेटीक सेंटर चालत जाण्याच्या अंतरावर होतं. ह्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी हे अॅक्वेटीक सेंटर आणि क्लाईंबिंग वॉल अश्या दोनच गोष्टी नवीन बांधल्या आहेत. बाकी सगळ्या स्टेडीयमचं फक्त आधुनिकीकरण केलं होतं किंवा वापरून झाल्यावर ती पाडून टाकण्यात येणार होती. गेल्या दोन तीन स्पर्धांपासून हा विषय दरवेळी चर्चिला जातो. नव्यानी बांधलेली प्रचंड मोठी मोठी स्टेडीयम नंतर वापराविना पांढरे हत्ती होऊन पोसत बसावे लागतात. त्यामुळे हल्ली बर्याच ठिकाणी कमीत कमी पक्क्या बांधकामात काय करता येईल हे बघितलं जातं. नुकत्याच कतारला झालेल्या वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेसाठी तर सगळीच स्टेडीयम तात्पुरती बांधलेली होती. कारण कतारच्या हवामानात एव्हड्या मोठ्या प्रमाणावर खेळ खेळले जाऊच शकत नाहीत. तर अॅक्वेटीक सेंटर. अॅथलेटीक्स स्टेडीयमहून बाहेर पडताना चांगलीच गर्दी झाली. जवळजवळ ५० एक हजार लोकांना बाहेर काढून मार्गी लावणं म्हणजे सोपं नाही पण सगळी व्यवस्था एकदम छान होती. दिशादर्शक फलक, मदतीला तत्पर मदतनीस, ठिकठिकाणी पोलिसांच्या गाड्या आणि मुख्य म्हणजे लोकांमधली स्वयंशिस्त ह्यामुळे कुठलीही गडबड, ढकलाढकली नव्हती. कुठल्यातरी संस्थेतर्फे कॉफी, लेमनेड वाटप सुरू होतं. टळटळीत उन्हात गार लेमनोड प्यायला बरं वाटलं. जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे आता रस्ता विचारावा लागतो की काय असं वाटलं की समोर पाटी हजर! शिवाय एकेच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून लोकं साधारण कुठल्या मार्गांवरून चालत जातील ह्याचा विचार करून बर्याच ठिकाणी हनी बकेट टॉयलेट्स, पाणी/कोल्ड्रींक/सोविनियर विकणारे स्टॉल ठेवले होते. एकंदरीत व्यवस्था चोख होती. मेट्रोकडे जाणारा आणि अॅक्वेटीक सेंटरकडे जाणारा रस्ता वेगळा होतो त्याच कोपर्यावर एक छान इटालियन रेस्टॉरंट दिसलं. ऑलिंपिकमुळे फुटपाथवरही टेबलं टाकायला परवानगी होती. आम्ही लगेच पोटपूजा करून घेतली आणि तिथे काम करणार्या तोडकं मोडकं इंग्लिश येणार्या माणसाला सांगून मोबाईल चार्ज करून घेतला.
तिथून पुढे अॅक्वेटीक सेंटरला पोहोचायला साधारण किलोमिटरभर चालायचं होतं आणि कुठेही अजिबात सावली नव्हती, खूप उन आणि रखरखीत होतं. त्यामुळे चांगलच गरम झालं. अॅक्वेटीक सेंटर जवळ आलं तसे हातात झेंडे, चेहेर्यावर रंगकाम केलेले चीनी लोकांचे मोठे मोठे जथ्थे दिसायला लागले. तेव्हाच अंदाज आला की इथे चिन्यांनाच सर्वाधिक पदकं मिळणार! उन्हात मजल दरमजल करत एकदाचे पोचलो. आम्ही ज्या बाजूने आलो, तिकडून सेंटरच्या आकाराचा अंदाज आला नाही. शिवाय दरवाज्यांना बाहेरच्या बाजुने आरसे होते. त्यामुळे नजरेला अजूनच गोंधळ होत होता. पण दार उघडून आत आल्यावर देखणा निळाशार स्विमिंग पूल दिसल्यावर अक्षरशः डोळे निवले.
*
बाहेर इतकं गरम होतं की स्वतःच त्या पूलमध्ये उडी मारावीशी वाटली. इथे आम्हांला मिळालेल्या सिट तितक्या चांगल्या नव्हत्या. आम्ही बसलो होतो त्याबाजूला जलतरणाच्या शर्यती झाल्या तो तरण तलाव होता, त्यानंतर एक चौथरा आणि मग पलिकडे डाईव्हिंगचा प्लॅटफॉर्म होता. आमच्या पासून अंतर खूप होतं आणि शिवाय मधल्या चौथर्यावरचा मिडीयाचा फलक जरा विचित्र ठिकाणी होता. आम्ही जाऊन जरा स्थिरस्थावर होतो आहोत तोपर्यंत खेळाडूंचं स्वागत सुरू झालं. आम्ही महिलांची १० मिटर प्लॅटफॉर्म ह्या प्रकारातली अंतिम फेरी बघत होतो. एकूण २९ खेळांडूपैकी पहिल्या दोन फेर्यांमधून १२ जणींंची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. आधीच्या दोन्ही फेर्यांंमध्ये चिनी खेळाडू पहिल्या दोन क्रमांकावर होत्या आणि त्याच पदकांच्या दावेदार होत्या. तिसर्या क्रमांकासाठी कॅनडा, कोरीया, इंग्लंड ह्याच्यात चुरस होती. अंतिम फेरीत प्रत्येक खेळाडूला वेगवेगळ्या प्रकारच्या पाच उड्या मारायच्या होत्या आणि जास्तीत जास्त गुण मिळवायचे होते. सुरूवातीपासूनच चिनी खेळाडूंनी आघाडी घेतली आणि बाकीच्याना त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. त्या दोघींनीच सुवर्ण आणि रजत पदक जिंकलं. कॅनडा आणि कोरियामध्ये तिसर्या क्रमांकासाठी जोरदार चुरस झाली पण अखेर कोरियाने कांस्यपदक मिळवलं. आमच्या शेजारी एक चिनी आज्जी बसली होती. ती एक विचित्र आवाज काढणारं यंत्र घेऊन आली होती आणि खेळाडूंना जोरदार चिअर करत होती. मात्र खेळाडू डाईव्ह मारण्यासाठी एकदा का प्लॅटफॉर्मवर आला की कोणी काहीही बोलायचं नाही असा तिचा कडक नियम होता. आणि कोणी कुठला आवाक केला की तिला फार राग यायचा आणि ती बोलणार्यांना चिनी कलकलाटात रागवायची. हे सगळं बघायला फार मजा वाटत होती. अर्थात बरेचसे लोकं खेळाडूंना त्रास होईल असं कुठलंही वर्तन टाळतच होते. आम्ही कॅनडीयन खेळाडूचा व्हिडीयो काढण्यासाठी जरा पुढे घुसलो आणि व्हिडीयो काढलाही पण अखेरीस तिथल्या तपासनीस मुलीने आम्हांला चांगल्या शब्दात, हसून-बिसून हाकललं! मग आम्ही पुन्हा जागेवर येऊन बसलो. चिनी मुलींच्या उड्या खरोखरच एकदम बिनचुक होत्या पण मला त्या फार मेकॅनिकल वाटल्या. अगदी इस्त्री केल्यासारखे चेहेरे आणि हालचाली. कदाचित नावडतीचं मिठ आळणी असावं. चिन जरी गेल्या काही ऑलिंपिक स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवत असलं तर मला त्यांची ह्याही क्षेत्रात सरकारी दमनशाही करण्याची पद्धत अजिबात पटत नाही. अमेरिका किंवा इतर प्रगत देशांमधली सरकारं विजेते खेळाडू निपजण्यासाठी लागणारी क्रीडासंस्कृती रुजण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न करतात पण त्यापुढचं सगळं हे लोकांवर सोडलं जातं पण चिन त्याही बाबतीत साम, दाम, दंड, भेद सगळं काही वापरतो. माध्यमांमध्ये वाचलेल्या आणि लोकांकडून ऐकलेल्या गोष्टींमध्ये अतिशयोक्ती असेलही पण थोडंफार तथ्य असावं असं वाटतं. त्यामुळे काही तुरळक चिनी खेळाडू सोडता बाकीच्यांचं मला फार काही कौतूक वाटत नाही. आपल्याकडे एकंदरीत क्रिडासंस्कृती रुजवण्याच्या बाबतीत भरपूर सुधारणा होण्याची गरज असली तरी आपण सरकारी दंडेलशाही मार्गाने न जाता इतर देशांच्या मार्गाने जातो आहेत ते बरं आहे.
ही अंतिम फेरी असल्याने पदकदान समारंभ बघायला आला. चिनी चाहते एकदम उत्साहात होते. सगळ्यांनी मोठे मोठे झेंडे आणून सगळं स्टेडीयम लाल करून टाकलं होतं. आपल्याकडे राष्ट्रपती वगैरे येताना जसा इतमाम असतो, तश्या इतमामात खेळाडूंना मंचापर्यंत आणण्यात आलं. त्यानंतर विजेत्या खेळाडूंचे राष्ट्रीय ध्वज मानाने नेऊन ध्वजस्तंभावर बांधण्यात आले. संपूर्ण वेळ युरोपियन पद्धतीचं एकदम रॉयल आणि अतिशय सुंदर असं पार्श्वसंगीत सुरू होतं. मग दोन ऑलिंपिक कमिटी सदस्यांच्या हस्ते विजेत्यांना पदकं आणि खास बक्षिस देण्यात आलं. दरवेळी प्रत्येक यजमान शहर आपल्या शहराची किंवा स्पर्धांची आठवण म्हणून पदकाबरोबर काहीतरी विशेष बक्षिस देतं. मागे सिडनीमध्ये कांगारूचं सॉफ्ट टॉय, अॅथेन्सला पारंपारिक पद्धतीचा पानांचा मुकूट, लंडनला लाल गुलाबांचा गुच्छ, रियोला मेडल ठेवायचा स्टँड असं काहीबही दिलं होतं. ह्यावेळी एका स्थानिक चित्रकाराने हाताने काढलेला पॅरिस शहराचा मॅप बक्षिस म्हणून दिला गेला. नंतर सुवर्णपदक विजेत्या खेळाडूच्या देशाचं म्हणजे चिनचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. त्याचवेळी मघाशी ध्वजस्तंभावर बांधलेले झेंडे फडकवण्यात आले. सगळीकडे कॅमेर्यांचा लखलखाट सुरू होता. एकंदरी खूप भारावून जाणारं वातावरण होतं ते. मला फक्त खुर्चीत बसूनही जग जिंकल्यासारख वाटत होतं. तर चार वर्ष अथक परिश्रम करून पदक मिळवल्यावर ह्या सगळ्याचा वातावरणाचा परिणाम होऊन त्या खेळाडूंना आनंदाश्रू नाही आले तरच नवल! अखेरीस आम्ही सुव्हिनिअर खरेदी करून अॅक्वेटीक सेंटरचा निरोप घेतला. एकूण अनुभव म्हणून खूप छान असला तरी डाईव्हिंग प्रत्यक्ष बघायला तितकी मजा नाही आली. ते टिव्हीवरच जास्त छान दिसतं. नाहीतर मग तुमच्याकडे अगदी पुढच्या व्यवस्थित सिट असायला हव्या.
*
https://youtu.be/uU__Keisoeo
*
आता पुढचा थांबा होता तो म्हणजे भारत विरुद्ध जर्मनी उपांत्यफेरीच्या सामन्यासाठी हॉकी स्टेडीयम! ह्या सामन्यातल्या विजेत्या संघाचं एक पदक निश्चित होणार होतं. पराभूत संघाला मेडल मिळवण्याची अजून एक संधी कांस्य पदकाच्या सामन्यात मिळणार होती. अगदी ऐनवेळी तिकीटं मिळालेली असल्याने आम्ही एकदम उत्साहात होतो आणि सामन्याची आतुरतेने वाट बघत होतो!
(क्रमशः)
तुझ्या शैलित लिहिलेल
तुझ्या शैलित लिहिलेल ऑलिम्पिकचे वर्णन वाचताना मजा येते आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
एकदम रनिंग कॉमेंट्री
एकदम रनिंग कॉमेंट्री
चित्रदर्शी वर्णन
मजा येतेय
पराग, मस्तच रे! मला तुझा हेवा
पराग, मस्तच रे! मला तुझा हेवा वाटतोय! एकदम अॅटलांटा ऑलिम्पिक्सची आठवण आली.
लॉस एन्जेलीस ऑलिम्पिक्सला जायची तयारी करतोय. जायचे का एकत्र?
धन्यवाद
धन्यवाद
एकदम अॅटलांटा ऑलिम्पिक्सची आठवण आली. >>> हो, तुझा लेख वाचला होता अॅटलांटा ऑलिम्पिक्सबद्दलचा.
लॉस एन्जेलीस ऑलिम्पिक्सला जायची तयारी करतोय. जायचे का एकत्र? >>>> हो !! तिकडे वॉलेंटीयरींग पण करूया. अॅडमिनांनाही विचारू
भारी... फोटो लेख अनुभव..
भारी... फोटो लेख अनुभव.. सगळेच माहोल
पराग, दुसर्या भागाची वाट
पराग, दुसर्या भागाची वाट बघतोय!
अरे मी LA28 वेबसाइटवर माझे नाव ६ महिन्यापुर्वीच रजिस्टर केले आहे.कालच त्यांचे इ मेल आले आहे की 1306 days to LA 28!
मीही तिथे व्हॉलन्टिअरींग करायला एका पायावर तयार आहे! मनावर घ्यायचे का सिरिअसली? फक्त त्या वेळेला एल ए मधे राहण्याची जागा/ होटेल मिळणे महा मुष्किल असेल रे!
पराग, माझ्या आवडत्या स्विमिंग
पराग, माझ्या आवडत्या स्विमिंग स्पर्धा गॉर्जिअस सोफाय स्टेडिअममधे होणार आहेत! मी तिथेच स्वयंसेवकगीरी करणार!
सहीच. मस्त वाटतंय वाचायला.
सहीच. मस्त वाटतंय वाचायला.
मस्त सुरुवात ! पुभाप्र
मस्त सुरुवात !
पुभाप्र
खुपच मस्त. पुढिल भागाच्या
खुपच मस्त. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत !!
फारच छान !
फारच छान !
( माझ्या आवाक्यात होतं म्हणून दिल्लीचं एशियाड नियोजन करून पूर्ण पाहिलं होतं. म्हणूनच, ऑलिंपिक प्रत्यक्ष पाहणं कितीतरी पटींनी अधिक रोमहर्षक व अविस्मरणीय असेल याची कल्पना करू शकतो ! लकी यू !! )