वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)

Submitted by संजय भावे on 5 December, 2024 - 08:56

एखाद्या देशात आजही काही लाख लोकसंख्या असलेले कुठल्याशा धार्मिक पंथाचे लोक फक्त आठवी पर्यंत शालेय शिक्षण घेतात, उपजीविकेसाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि हस्तकौशल्यावर आधारित उद्योग करून आपली उपजीविका चालवतात, आपल्या दैनंदिन जीवनात वीज वापरत नाहीत, टि.व्ही. पाहात नाहीत, रेडिओ ऐकत नाहीत, स्वयंचलित यंत्रे, वाहने, फोन/मोबाईल फोन वापरत नाहीत, इंटरनेटचा वापर करत नसल्याने आपल्या व्यवसाय/आस्थापनांमध्ये डेबिट/क्रेडिट कार्ड्स, डिजिटल पेमेंट न स्वीकारता सर्व व्यवहार रोखीत किंवा चेक द्वारे पूर्ण करतात, गर्भपात आणि गर्भनिरोधक साधने निषिद्ध मानत असून भरपूर संख्येने अपत्ये जन्मास घालतात, थोडक्यात सांगायचे तर मध्ययुगीन जीवनशैलीशी साधर्म्य असणारी जीवनपद्धती हे लोक एकविसाव्या शतकात जगतात असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमच्या मनात सर्वात पहिले कुठल्या धर्माचा आणि कुठल्या देश किंवा एखाद्या प्रदेशाचा विचार येईल? मुस्लिम धर्मातल्या एखाद्या पंथाचा आणि आफ्रिकेतल्या किंवा मध्यपूर्वेतल्या कुठल्या तरी मागासलेल्या देशाचा अथवा त्यातल्या एखाद्या प्रदेशाचा... बरोबर ना?

परंतु आजघडीला उपरोल्लिखित जीवनपद्धतीचा अवलंब करणारे ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे लोकं आफ्रिका किंवा मध्यपूर्वेत नसून लाखांच्या संख्येत अमेरिकेत, हजारांच्या संख्येत कॅनडा आणि शेकड्यापेक्षा थोड्या कमी संख्येने बोलिव्हियामध्ये अस्तित्वात आहेत असे कोणी सांगितले तर त्यावर पटकन विश्वास बसेल? नाही ना? आधी माझाही नव्हता बसला! पण थोडा धांडोळा घेतल्यावर मात्र त्यात तथ्य असल्याचे लक्षात आले आणि त्यानिमित्ताने बरीच रोचक माहिती मिळाली.

पाच-सहा महिन्यांपूर्वी मला तरी ह्या 'अमीश' लोकांविषयी आणि त्यांच्या जीवनपद्धतीबद्दल काहीही माहिती नव्हती, पण झाले असे कि, तंत्रज्ञानाधारित आधुनिक शेती, कृषी पर्यटन, पशुपालन आणि पशुसंवर्धन ह्या विषयांत रस असल्याने फेसबुकवर त्याच्याशी संबंधित असलेल्या काही ग्रुप्स, पेजेसवर अधूनमधून फेरफटका मारत असतो. त्या अनुषंगाने फेसबुकने लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया स्थित 'Goat Yoga at the Amish Farm and House' नामक एक पेज सुचवले होते. तोपर्यंत 'हठ योग', 'अष्टांग योग', 'पॉवर योगा' वगैरे योगाचे प्रकार ऐकून/वाचून माहिती होते पण 'गोट योगा' विषयी पहिल्यांदाच समजल्याने हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी केवळ कुतूहलापोटी त्या फेसबुक पेजला आणि त्यावर लिंक दिलेल्या त्यांच्या वेबपेजला भेट दिली होती.

खाली नमुन्यादाखल दिलेले काही फोटोज पाहिल्यावर 'गोट योगा' हा काय प्रकार आहे ह्याची थोडीफार कल्पना येईल...

कोणातरी अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तीच्या/व्यक्ती समुहाच्या कल्पनेतून जन्मास आलेला 'गोट योगा' हा अद्भुत प्रकार पाहून अर्ल नाइटिंगेल ह्यांच्या “Everything begins with an idea.” आणि त्या कल्पनेला भरभरून प्रतिसाद देणारे आधुनिक 'योगी' आणि 'योगिनी' पाहून अल्बर्ट आईन्स्टाईन ह्यांच्या "Two things are infinite: the universe and human stupidity; and I'm not sure about the universe" ह्या दोन्ही विधानांची सत्यता एकाचवेळी पटली होती!

असो... त्यानिमित्ताने आयोजकांची वेबसाईट चाळण्यातून 'अमीश' लोकं आणि त्यांच्या अनोख्या जीवनपद्धतीचा अगदी अल्पसा परिचय झाला असला तरी एकूणच 'गोट योगा' हा निव्वळ भंपक प्रकार वाटला असल्याने तो विषय डोक्यातून निघून गेला होता. पण काही गोष्टी आपला पिच्छा सोडत नाहीत म्हणतात तसे झाले. मागे कधीतरी पर्यटनविषयक सेवा/सुविधा पुरवणाऱ्या एका एजन्सीकडून काही पर्यटनस्थळांच्या डे-टूर्स संदर्भात माहिती घेतली होती त्यांच्याकडून गेल्या आठवड्यात "Amish Christmas Cookie Tour" नामक डे-टूर विषयी माहिती देणारी एक ईमेल प्राप्त झाली.

"Amish Christmas Cookie Tour" ह्या नावावरून आणि ईमेल मधली सुरुवातीची चित्रे पाहिल्यावर ही टूर आपल्यासाठी निरुपयोगी असणार ह्याचा अंदाज आला होता, परंतु सामान्य ज्ञानात भर पडावी म्हणून पुढे त्यात दिलेले सदर सहलींचे वेळापत्रक, ठळक वैशिष्ट्ये/आकर्षणे, त्यांच्या निवडीसाठीचे काही पर्याय आणि त्यानुसार बदलणारे सहल शुल्क वगैरे वाचून झाल्यावर अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यावर ज्या वेबसाईटवर पोचलो ती पाहिल्यावर उपरोल्लिखित 'गोट योगा' शिबिरे आणि ह्या सहलींचे आयोजक एकच असल्याचे लक्षात आले.

आधी आलेल्या अंदाजाप्रमाणे ती टूर निरुपयोगीच वाटली, पण ह्यावेळच्या भेटीत त्या वेबसाईटवरच्या अन्य विभागांत मुशाफिरी करताना काही रोचक माहिती वाचायला मिळाल्याने गेल्यावेळपेक्षा तिथे थोडा जास्त वेळ रमण्यातून ह्या 'अमीश' लोकांबद्दल अधिक जाणून घ्यावेसे वाटल्याने नव्याने समजलेल्या कुठल्याही गोष्टीची/विषयाची माहिती मिळवण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून आपण ज्याकडे पाहतो त्या विकिपीडियाला भेट देण्यातून त्याची सुरुवात केली. अर्थात अशा गोष्टी/विषयांची माहिती विकिपीडियावर हमखास मिळत असली तरी त्या प्राथमिक/जुजबी माहितीने आपले पूर्ण समाधान होत नाही हा भाग वेगळा, परंतु त्याविषयीची अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने पुढील शोधकार्यासाठी एक दिशा आणि उपयुक्त ठरतील असे मुद्दे मात्र आपल्याला त्यावर नक्कीच मिळतात!

असो... तर उत्सुकतेपोटी केलेल्या शोधकार्यातून एका अनोख्या जीवनपद्धती विषयी जी रंजक माहिती मिळाली ती समान आवड/छंद बाळगणाऱ्या मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा लेखन प्रपंच!

'अमीश' जीवनपद्धती:

जवळपास चार लाखांच्या संख्येने अमेरिकेत, सहा हजारांपेक्षा थोड्या अधिक संख्येने कॅनडा आणि शेकड्यापेक्षा थोड्या कमी संख्येने बोलिव्हियामध्ये वास्तव्य करणाऱ्या आणि मध्ययुगीन जीवनशैलीशी साधर्म्य असणाऱ्या आपल्या जीवनपद्धतीचे जतन/आचरण एकविसाव्या शतकात करणाऱ्या ख्रिश्चन धर्मातील प्रोटेस्टंट पंथाचा उप-पंथ असलेल्या ह्या 'आमिश' पंथीय लोकांचा फार तपशिलात नाही, पण थोडक्यात तरी पूर्वेतिहास जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.

सोळाव्या शतकात युरोपमध्ये पोप आणि अन्य ख्रिस्ती धर्ममार्तंडांच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या 'प्रोटेस्टंट रिफॉर्म्स' नामक धार्मिक, राजकीय आणि बौद्धिक सुधारणावादी चळवळीने जोर पकडला होता. 'कॅथलिक' चर्चपासून फारकत घेणाऱ्या ह्या चळवळीत सहभागी झालेले तिचे समर्थक 'प्रोटेस्टंट' म्हणून ओळखले जातात. ह्या चळवळीत सहभागी होऊन स्वतःसहित आपल्या मुलाबाळांना पुन्हा बाप्तिस्मा देणाऱ्या धार्मिक सुधारणावादी लोकांचा जो गट होता त्याचे त्यांच्या तत्कालीन कट्टरपंथी कॅथलिक विरोधकांनी (ज्याचा अर्थ 'पुन्हा बाप्तिस्मा घेणे' असा होतो त्या मूळच्या 'ॲनाबॅप्टिस्टा - anabaptista' ह्या ग्रीक शब्दावरून) 'ॲनाबॅप्टिस्ट' असे नामकरण केले होते.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ह्या धार्मिक सुधारणावादी 'ॲनाबॅप्टिस्ट' लोकांच्या संख्येमुळे राज्यव्यवस्था आणि नागरी शासनव्यवस्थेत हस्तक्षेप करणाऱ्या धर्ममार्तंडांच्या अधिकारांना धोका उत्पन्न झाल्याने चर्चच्या माध्यमातून त्यांच्या विरोधासाठी दिल्या गेलेल्या चिथावण्यांमुळे सुमारे २५०० ॲनाबॅप्टिस्ट लोकांना जिवंत जाळून, तलवारीने शिरच्छेद करून, नदीत बुडवून किंवा बंदी बनवून तुरुंगात अन्नपाण्यापासून वंचित ठेऊन ठार मारले गेले त्याच्या परिणामी अनेक ॲनाबॅप्टिस्ट लोकं आपला जीव वाचवण्यासाठी भूमिगत झाले किंवा मुख्य वस्तीपासून दूर असलेल्या दुर्गम भागात स्थलांतरित झाले.

सोळाव्या शतकात सुरुवात झालेल्या ह्या ॲनाबॅप्टिस्ट चळवळीला सुमारे १६० वर्षे उलटल्यानंतर 'जेकब अम्मन' नावाच्या व्यक्तीने १६९३ मध्ये स्विस ॲनाबॅप्टिस्ट चर्चच्या माध्यमातून त्या चळवळीचे नेतृत्व स्वीकारत तिच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरु केले. आपल्या अनुयायांना 'नवा करार' मधली शिकवण आणि 'डच ॲनाबॅप्टिस्ट' प्रथांचे पालन करण्याची सक्ती, सैद्धांतिक शुद्धता आणि आध्यात्मिक शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरुषांना दाढी राखण्याची सक्ती आणि स्त्री व पुरुषांना फॅशनेबल पोशाख घालण्यास मनाई अशी अनेक तालिबान छाप बंधने घातली आणि एवढ्यावरच न थांबता स्विस आणि फ्रेंच लोकांच्या पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक रूढी-परंपरांना छेद देतील अशा नव्या परंपरा सुरु करून त्यांचे पालन न करणाऱ्यांना बहिष्कृत करण्यास आपल्या अनुयायांना प्रेरित केले.

अम्मनच्या अशा धार्मिक फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यातून केवळ स्विस कॅथलिक ख्रिश्चनांशीच नाही तर स्वित्झर्लंड आणि शेजारच्या फ्रान्स मधल्या अल्सेस इथल्या ॲनाबॅप्टिस्ट असा शिक्का बसलेल्या अन्य प्रोटेस्टंट गटांत आणि जेकब अम्मनच्या अनुयायांमध्ये वैमनस्य निर्माण झाले आणि त्यातून उद्बवलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या सामाजिक अस्थिरतेतून अम्मनचे अनुयायी असलेल्या ॲनाबॅप्टिस्ट लोकांवर वारंवार इतरत्र स्थलांतरित होण्याचे प्रसंग ओढवत राहिले आणि सतराव्या आणि अठराव्या शतकात युरोपमध्ये त्यांना होणारा विरोध इतका वाढला कि त्यांना युरोप सोडून उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत स्थलांतरित होण्यावाचून गत्यंतर उरले नाही.

सतराव्या आणि अठराव्या शतकात युरोपातून उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत स्थलांतरित झालेले जेकब अम्मनचे अनुयायी त्याच्याच नावातील 'अम्मन' वरून दिल्या गेलेल्या 'अमिश' ह्या नावाने ओळखले जातात. खालच्या तक्त्यावर नजर टाकल्यावर अमेरिकेच्या बत्तीस राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हे 'अमिश' लोकं विखुरले असले तरी पेनसिल्व्हेनिया, ओहायो आणि इंडियाना येथे त्यांची संख्या सर्वात जास्त असल्याचे लक्षात येते.

ह्या लेखाची लांबी आटोक्यात ठेवण्यासाठी तूर्तास इथेच थांबतो आणि 'अमिश' लोकांच्या अनोख्या जीवनपद्धती विषयीची रोचक माहिती 'उत्तरार्धात' म्हणजेच पुढच्या भागात लिहितो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

Group content visibility: 
Use group defaults

छान विषय आणि माहिती
इथेच माबोवर अमिश मुलीची कथा वाचल्यासारखं वाटतंय

हॅरिसन फोर्डचा एक जुना पिक्चर आहे - विटनेस. त्यात अमिश लोकांची जीवनपद्धती दाखवली आहे. अर्थात तो शेवटी एक पिक्चर आहे!

दोनेक वर्षापूर्वी रविवारच्या महाराष्ट्र टाइम्स च्या पुरवणीत अमिश लोकांबद्दल वाचलेले आठवते आहे . अमेरिकेच्या एका भागात राहतात आणि कोणतेही तंत्रज्ञान वापरत नाहीत असा उल्लेख होता

“ आपल्या अमीशा पटेलचे काही अमिश कनेक्शन असावे काय ?” - हो. कुठलीही कृत्रिम गोष्ट वापरायची नाही, म्हणून अभिनय सुद्धा करत नाही. Wink Happy

छान सुरुवात.
या लोकांविषयी वाचले होते फार आधी.
तुमची लेखन शैली आवडते. अभ्यासपूर्ण

नवीन असताना मित्राबरोबर एका कौंटी ला जाताना "सावधान - हळू जाणारी वाहने" अशा पाट्या दिसायला लागल्या तेव्हा त्याच्या कडे पृच्छा केली असता त्याने पुढे अमीश लोकांची वस्ती आहे असे सांगितले आणि खरंच नंतर काही बग्गी सदृश टांगे दिसले. हिटर असलेल्या कार्सच्या जमान्यात हाडे गोठवणाऱ्या थंडीत उघड्या टांग्यात कसे बसतात हे ट्रिनीटीच (Father, Son, and Holy Spirit) जाणे !

त्या नंतर उत्सुकतेने अमीश लोकांबद्दल बरेच वाचन केले आणि काही डॉक्युमेंटीज् बघितल्या.
कित्येकदा ह्या विचित्र जीवनशैलीला कंटाळून तरुण मुले आणि मुली कम्युनिटीमधून पळून जातात त्यामुळे अमीश लोकांसमोर त्यांचा समाज एकसंघ ठेवण्याचे आणि पुढे घेऊन जाण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

आंजावर मिळालेली काही प्रकाश चित्रे.
Slow moving -2.jpgSlow moving -1_0.jpg

BTW (किंवा ऋन्मेषदाच्या भाषेत "बाई-दवे") : मी पूर्वी "योगाचे सांस्कृतिक अपहरण" ह्या लेखात गोट योगा, बिअर योगा, रेव्ह योगा इत्यादी पाश्चात्य जगातील आचरटपणाबद्दल लिहिले होते, ते आठवले.

या लोकांचे समज, धारणा आणि त्यातून उद्भवणारे विचित्र निर्णय यावर आधारित एकदोन मेडिकल ड्रामामधे पाहिलेले एपिसोड्स आठवले.

खरंच किती कठीण आहे असे जगणे! विशेषतः सुसंपन्न अमेरिकेत सगळ्या भौतिक सुखसोयी नाकारुन, जुन्याची कास धरत आहे तीच जीवन पद्धती अंगीकारणे.
साधारण पणे, कोणत्याची मनुष्याची आस ही अधिक सुख समाधान , आनंद मिळविण्याकडेच असते ना?
तंत्रज्ञान एकवेळ राहू देऊ, पण शिक्षण, कला, आरोग्य या तर बेसिक गरजा आहेत. यासाठीच तर पूर्वीपासून शास्त्रज्ञ, समाज प्रबोधनकार झटत आले आहेत.
तर या आमिश लोकां मधे नसेल का असे रेनेसां होत?
काय कारण आहे त्यांचे असा वेगळा समूह करुन राहायचे?

काय कारण आहे त्यांचे असा वेगळा समूह करुन राहायचे? >> धर्माचा पगडा आणि सारासार विचार करण्यासाठी स्वतःचे डोके न वापरणे.

किल्ली, माबो वाचक, SharmilaR, ऑर्किड, Abuva, जाई, अनिंद्य, मानव पृथ्वीकर, फेरफटका, ऋतुराज, चामुंडराय, सहेली, छल्ला, उपाशी बोका...
प्रतिसादांसाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार _/\_

ह्या अमिश लोकांची जीवनपद्धती म्हंटली तर खूप कालबाह्य, गमतीशीर, विचित्र वाटत असली तरी रोचक आहे. पुढच्या भागात त्याबद्दलची सचित्र माहिती येईलच...

वेगळीच रोचक माहीती, अशी जीवनशैली जगता येणार नाही, आवडणारही नाही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

नेहमीच्याच शैलीतील उत्तम सजावटपूर्ण लेख !
सुमारे 25 वर्षांपूर्वी दैनिक सकाळमध्ये यावरील प्रथम लेख वाचला होता.

खूप छान माहीती आहे. लँकॅस्टरमधून जाताना, रात्री कार फार जपून चालवावी लागते. अमिश लोकांच्या घोडागाड्यांना (बग्गी) रिफ्लेक्टर्स असतात पण ते काळे घोडे, बग्ग्या अंधारात अजिबात दिसत नाहीत.

Happy छान लिहीले आहे. तुमचे लेख छान असतात.

गोट योगा टिव्हीवरच बघितले होते. 'कल्ट' वाटतो मला हा, दुराग्रही व काळाच्या मागे राहणारा, जीव गेला तरी आधुनिक औषधंही घेत नाहीत. खूप वर्षांपूर्वी यांच्या ग्रूपबद्दल ऐकले होते , तेव्हा विचित्र वाटले होते.

'गोट योगा' मध्ये ते गोटस ना पाठीवर अन खांद्यावर उभं वगैरे करतात ती मला अ‍ॅनिमल क्रुएल्टी वाटते. स्वतःच्या मनोरंजनाकरता, मुक्या प्राण्यांना वेठीस धरणे. बंदी यायला पाहीजे.

गोट योगा' मध्ये ते गोटस ना पाठीवर अन खांद्यावर उभं वगैरे करतात ती मला अ‍ॅनिमल क्रुएल्टी वाटते. स्वतःच्या मनोरंजनाकरता, मुक्या प्राण्यांना वेठीस धरणे. बंदी यायला पाहीजे.

Submitted by सामो on 12 December, 2024 - 18:36<<<<<<+1111