एक गाणं - मराठी भाषेसाठी

Submitted by अनंत ढवळे on 4 December, 2024 - 14:28

मराठी भाषा प्रेम गीत

--

खुलणाऱ्या हास्याचे रंग मराठी
शब्दांच्या किमयेचे अंग मराठी

आंब्याच्या झाडाचा चीक मराठी
मिरचीच्या ठेच्यावर मीठ मराठी

आईच्या पदराची ऊब मराठी
बापाच्या मायेचे रूप मराठी

शाळेच्या घंटेचा नाद मराठी
मित्रांशी होणारे वाद मराठी

प्रेमाच्या चिट्ठीचा रंग मराठी
स्वप्नाळू डोळ्यांचा ढंग मराठी

रुणझुणत्या चालीचा डौल मराठी
लवलवत्या डोळ्यांचा कौल मराठी

जगण्याची चौतर्फा जाण मराठी
झटणाऱ्या हातांची खाण मराठी

दमलेल्या श्रमिकाचा घाम मराठी
उरलेल्या सगळ्यांचा राम मराठी

रक्तातून भिनलेली धून मराठी
रणरणते वैशाखी ऊन मराठी

दगडांची धोंड्यांची वाट मराठी
झुळझुळत्या पाण्याचे पाट मराठी

ओव्यांचे कवितांचे गाव मराठी
प्रेमाच्या बोलीचा ठाव मराठी

पाटीवर लिहिलेला वेद मराठी
भाषेच्या ऱ्हासाचा खेद मराठी

सळसळत्या रक्ताची धार मराठी
ज्ञानाच्या गंगेचा पार मराठी

शिवबांच्या दृष्टीचे सार मराठी
नशिबावर धैर्याचे वार मराठी

विश्वाच्या आर्ताचे भान मराठी
आलेल्या सगळ्यांचे स्थान मराठी

भाषेचे थोडेसे भान उरू दे
शब्दांचे झिळमिळते कोष खुलू दे
माझ्याशी थोडेसे बोल मराठी
राहो हा ठेवा अनमोल मराठी

राहो हा ठेवा अनमोल मराठी

--

अनंत ढवळे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults