प्रयोजन भाग ८

Submitted by पर्णीका on 2 December, 2024 - 01:34

।।८।।

“ह्या जगात कुठलीही घटना चुकुन किंवा अपघाताने घडत नाही, यामिनी. माझे हे असे अस्तित्व जे तुला अपुर्ण वाटतेय ते मला अपघाताने मिळालेले नसुन त्याचे एक प्रयोजन आहे.”

“मला अपुर्ण वाटतेय म्हणजे तुम्हाला नाही वाटत तसं? मी जे शब्द वापरतेय ते योग्य नसतील कदाचित पण अशा शरीर विरहीत बुद्धीने काय साध्य करता येईल?”

“असा विचार कर की माझ्या अस्तित्वाचे प्रयोजन पुर्ण करण्यासाठी खरंतर मला त्याचीच आवश्यकता होती. नव्याने जन्म घेताना गतजन्मीच्या स्मृती बाळगता येत नाहीत. मी माझ्या साधनेद्वारे एकदा ते साध्य करु शकले. पण पुन्हा पुन्हा ते करणे शक्य नव्हते.

माझी कहाणी तर तुला सांगितलीच आहे. माझ्या आयुष्यात एक दुर्दैवी क्षण आला. ज्याने माझे तोपर्यंत आनंदी, आशावादी असलेले व्यक्तिमत्त्व अगदी मुळापासून बदलून टाकले. त्या क्षणापासून त्या दुर्दैवावरच मी माझे चित्त केंद्रित केले आणि त्यापायी माझ्या जीवनातील मुळ उद्देशाकडे दुर्लक्ष केले.”

“पण तुम्हाला तुमचे उद्दिष्ट माहिती होते ना? भीष्म पितामह यांना शासन करणे”

ते उद्दिष्ट नव्हते, ती माझी कामना होती. तिची पुर्ती करण्यासाठी माझ्या साधने द्वारे मी अंबेचे अस्तित्व बरोबर घेऊन पुन्हा जन्म घेतला. पण मिळालेले संपुर्ण आयुष्य फक्त ह्याच कामनेवर केंद्रित केले. मी माझ्या मनाचे अंतर्मनात प्रवेश देणारे आणि बुद्धीचे बाह्य अनुभवांचे विश्लेषण करणारे अशी दोन्ही द्वारे सदैव बंद ठेवली. इतर काही आत्मसात करण्याची संधीच मी माझ्या मनाला आणि बुद्धीला दिली नाही.

त्यामुळे तेव्हा जे आकलन पुर्ण होऊ शकले नाही ते पुर्ण होण्यासाठी माझ्या ह्या मन आणि बुद्धीचे अस्तित्व आहे. कुठल्याही विद्यार्थ्याला आधीचा पाठ पुर्णतः आत्मसात केल्याशिवाय नवीन पाठ शिकायला सुरुवात करता येत नाही. मी ही माझा अपुर्ण धडा पुर्ण करतेय.”

“पण मग हे अस्तित्व आत्ताच का? तुमच्या त्या जन्मात आणि वर्तमान काळात हजारो वर्षाचे अंतर आहे.”

“हा हजारो वर्षे काळ पृथ्वीसापेक्ष नाही का? माझ्या पृथ्वी वरील अस्तित्वामुळे माझे काळाचे आकलन आहे. जेव्हा माझे अस्तित्व पृथ्वी वर नव्हते तेव्हा माझ्यासाठी काळ ही अस्तित्वात नव्हता. त्यामुळे माझ्या दृष्टीने मी मागील पानावरून पुढे सुरुवात केली आहे. मध्ये खंड पडलाच नाही माझ्यासाठी.“

“तुम्ही ह्या प्रकारे कुणाही बरोबर ह्या पृथ्वीवर येऊ शकला असतात. मग तुम्ही माझीच निवड का केली?”

“ह्या जन्म-पुनर्जन्माच्या खेळात निवड करण्याचा अधिकार जर प्राप्त होत असेल तर तिथपर्यंत मी अजून पोहोचले नाहीये यामिनी. त्यामुळे आपले सहअस्तित्व हे तुझ्या प्रमाणे माझ्यासाठी पण एक कोडेच आहे.”

“मग आता पुढे काय? आपण दोघिंनी असेच एकमेकींसोबत रहायचे? मरेपर्यंत?”

“नाही यामिनी. आता इथून पुढे आपल्या वाटा वेगळ्या होणार आहेत. मी तुझा निरोप घेण्यासाठीच तुला साद घातली होती. मला जे आकलन होणे अपेक्षित होते ते झाले आहे. आपल्या ह्या सह-अस्तित्वात तुझ्या अनुभवातुन शिकण्याची, मला आलेले अनुभव त्या अनुषंगाने एका नव्या दृष्टिकोनातून बघण्याची संधी मला मिळाली.

त्यामुळे जाण्यापूर्वी मला माझे अनुभव तुला कथन करावेसे वाटले. कदाचित माझ्या अनुभवातुन तुलाही एक नवीन दृष्टीकोन मिळेल.

मला अमृताला पण धन्यवाद द्यायचे आहेत. तिची मदत अमूल्य आहे माझ्यासाठी. मी तुझ्याच मनाच्या एका कोपऱ्यात असल्याने माझ्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर तू इतकी घाबरशिल ह्याची कल्पनाच आली नाही मला. त्यामुळे तुला कसे शांत करावे हे मला कळत नव्हते. त्या दिवशीच्या तुझ्या आणि अमृताच्या चर्चेनंतर माझे काम सोपे झाले. आपल्या दोघिंमधिल हा संवाद होऊ शकला. माझा निरोप तिला देशील.

तू समंजस आणि विचारी आहेस त्यामुळे माझ्या ह्या अनुभवांचा उपयोग करायचा की नाही, केल्यास कसा करायचा हे मी तुझ्यावर सोडते. पण माझे संचित मात्र सांभाळ. ही माझी विनंती समज. तुम्हा दोघींना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”

Group content visibility: 
Use group defaults

ही कलाटणी भावली!
हा भाग समजावून घेताना मागच्या भागांची उजळणी करावी लागली. विज्ञान आणि अध्यात्म, पुराणकथा आणि वर्तमान, पुनर्जन्म आणि दुभंग व्यक्तिमत्व (multiple personality)(किंवा तत्सम) यांची सांगड घालण्याचा उत्तम प्रयत्न!
भीष्म ही महाभारतातील व्यक्तिरेखा माझ्या विशेष आवडीची. त्यामुळे या कथावस्तूचं अप्रूप होतं. प्रत्येक भागाची आतुरतेने वाट बघायचो.
माझ्यातल्या विज्ञाननिष्ठ मला उत्तर मिळालं नसलं तरी कल्पनेच्या भराऱ्या घेणाऱ्या मला कथा आवडली! Lol
पुढील लेखनास शुभेच्छा!

जाता जाता: जर ही कलाटणी डीएनए संबंधित असती तर, मन आणि बुद्धी, brain and consciousness, या सगळ्यात the role of DNA and its mutations या आणि संलग्न विषयांवर उत्तम खल झाला असता. या पूर्वीच्या भागांमध्ये तशी शक्यता जाणवली होती.

धन्यवाद साधना, किल्ली आणि बुवा.

बुवा हा शेवटचा भाग नाही, अजुन दोन भाग आहेत त्यात तुम्ही म्हणताय तो डीएनए-अध्यात्म हा लुप क्लोज करण्याचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हाला कितपत संयुक्तिक वाटला हे नक्की सांगा.