पराभवाच्या निमित्ताने ! ( भाग १)

Submitted by दुर्गविहारी on 24 November, 2024 - 12:43

नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुका पार पडल्या ! महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जांगाचा २३ नोव्हेंबरला निकाल आला, तो असा,
महायुती :
१) भाजप - १३२
२) शिवसेना ( शिंदे गट ) -५७
३) राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) -४१
४) जन सुराज्य शक्ती - २
५) राष्ट्रीय स्वाभिमान पक्ष - १
६) राजर्षी शाहु विकास आघाडी - १

महाविकास आघाडी -
१) शिवसेना ( उद्दव ठाकरे ) - २०
२) काँग्रेस - १६
३ ) राष्ट्रवादी काँग्रेस - १०
४ ) समाजवादी पार्टी - २
५) Peasants And - १

इतर - ४

महायुती लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण साधारण ४३.५ % होते तर विधानसभेत ते ५१.३ % झाले. याउलट महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत ४३.९% तर विधानसभेला ३५.४ % इतके झाले. म्हणजे लोकसभेला जो मतदान टक्केवारीचा दोन्ही आघाडीतील मतदानाच्या टक्केवारीतील फरक फक्त ०.४ % होता जो विधानसभेला हा फरक तब्बल १५.९ % इतका झाला. याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीचा दारुण आणि अनपेक्षित असा पराभव झाला.
सहाजिकचा या पराभवाने दोन्ही बाजुच्या समर्थकांना धक्का बसावा असा हा निकाल होता. आता या धाग्यात आपल्याला या महाविकास आघाडीच्या पराभवाची आणि महायुतीच्या अनपेक्षित विजयाची कारणे समजून घ्यायची आणि त्याचे विश्लेषण करायचे आहे. गेले दोन दिवस संपुर्ण सोशल मेडीयावर बरीच चर्चा सुरु आहे. मी त्या चर्चा वाचून आणि काही माझ्या निरीक्षणातून जी माझी मत मांडली आहेत. अर्थात माझी सर्व मते खरी असतील असे नाही, वाचकांनी काही चुकीचे असल्यास दुरुस्ती करावी किंवा दुसरा काही दृष्टीकोण असेल तर जरुर सांगावे.
सर्वप्रथम जो जिता वही सिंकदर ! या न्यायाने महायुतीच्या विजयाची कारणे बघुया.
१) लाडकी बहीण योजना :-
लोकसभा पराभवाने भाजपाची चिंतन बैठक झाली त्यातून मी वर लिहीलेल्या प्रमाणे मतदानाच्या टक्केवारीतील फरक फक्त अर्धा टक्का असल्यामुळे हा टक्का कसा वाढवता येईल याचा विचार झाला. त्यातून मध्य प्रदेश आणि कर्नाटकात यशस्वी झालेल्या महिलांना मासिक काही रक्कम द्यायची योजना महाराष्ट्रात लागू करायचे ठरले. २६ जुनला मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस आणि अजित पवार यांना वर्षा निवासस्थानी बोलावून हि योजना लागु करण्यास केंद्राने आदेश दिल्याचे सांगितले. त्यानंतर महाराष्ट्रात हि योजना ऑगस्टमध्ये लागू झाली. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे ७५००/- लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट जमा झाले. महायुतीच्या विजयाचे हेच मुख्य कारण आहे. याचे कारण सुरवातीला विशिष्ट आर्थिक स्तरावरावरील महिलांना हि योजना लागू केली तरी नंतर सरसकट सगळ्यांनाच या योजनेचा लाभ दिला गेला. अगदी माझ्या माहितीत आर्थिक सुस्थितीतील महिलांनी याचा लाभ घेतला. सुरवातीला अर्थमंत्री अजित पवार यांनी याला विरोध केला कारण अर्थसंकल्पात या योजनेची तरतुद नव्हती. सहाजिकच निवडणुका जिंकण्यासाठी इतर खात्यातील निधी या योजनेसाठी वळवण्यात आला
https://www.etvbharat.com/mr/!state/funds-of-other-schemes-were-diverted...
'लाडक्या बहिणीं'साठी इतर योजनांचा निधी वळवला! योजनांवर नेमका किती खर्च? - ladki bahin yojana

पण यामुळे अर्थ खात्याने इतर योजना जवळपास बंद केल्या. पण या योजनेमुळे किमान बर्याच महिलांची मते महायुतीला मिळाली हे नक्की. अनेकांनी आपल्या परिसरातील आर्थिक स्तरावरील कमजोर वर्गातील महिलांचे अनुभव लिहीले आहेत, त्यात कामवाली बाई किंवा सफाई कर्मचारी महिलांना हे हक्काचे पैसे वाटले. एकतर हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा झाले होते, त्यामुळे या महिलांच्या परवानगी किंवा सही शिवाय हे पैसे अगदी त्यांचा नवरा किंवा मुलगाही काढू शकणार नव्हता. शिवाय त्यामुळे अनेक जणींना सण थाटामाटात साजरे करता आले. अगदी दिवाळी आनंदात साजरी करता आली. सहाजिकच महायुतीने पैसे दिलेत तर त्यांना मत दिलेच पाहीजे असे या महिला वर्गाने नक्की केले. अगदी नवर्यांनी या महिलांना अमुक उमेदवाराला मत द्यायचे आहे असे सांगितले तरी त्यांनी एकलेले नाही असे दिसते. अगदी धनुष्य बाण दिसला नाही तर कमळ समोरच बटण दाबून मतदान केले गेले कारण शिंदे कमळ सोबत आहेत हे मतदाराला माहीत होतं. सहाजिकच माझ्या मते महायुतीच्या विजयाचे हेच प्रमुख कारण.
अगदी जाहिरातीतून त्यांनी हेच दाखवले आणि सरकार बदलले तर हि योजना बंद होईल अशी भिती घातली. याचाही नक्कीच फरक पडला. शिवाय महिलांसाठी एस.टी.बसचा प्रवास निम्म्या दरात आणि ७५ वर्षावरील जेष्टांना मोफत तर त्याच्या आतील सर्व जेष्ठ नागरीकांना निम्म्या दरात बस प्रवास, शिवाय एन निवडणुकीच्या तोंडावर तीर्थाटन योजना या नक्कीच प्रभावी ठरलेल्या आहेत.
२) हिंदुत्ववाद :-
निवड्णुका आली कि भाजप धार्मिक ध्रुवीकरण करते, हे नेहमीचच आहे. यावेळी हा मुद्दा प्रभावी ठरण्यासाठी महाविकास आघाडीच्या काही चुका कारणीभुत झाल्या. एकतर जेव्हा धार्मिक मुद्दे येतात तेव्हा सर्वसामान्य उमेदवार बाकी सर्व तर्कबुध्दी बाजुला ठेवून मत देतात. तेव्हा समोरचा सांगतो आहे ते खरे कि खोटे ? याची खात्री करावी याची त्याला गरज पडत नाही. त्यासाठी पंतप्रधान आणि योगी यांनी दिलेले 'एक है तो सेफ है' आणि 'बटेंगे तो कटेंगे' हे दोन्ही नारे किमान काही घटकांना तरी नक्कीच पटले. शिवाय हिंदु खतरे मे हा नेहमीचा नारा होताच. वास्तविक गेली दहा वर्ष तिसरा टर्म तथाकथित हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असताना आणि हेच लोक 'देश सुरक्षित हातो मे' म्हणत असताना हिंदु धोक्यात कसा ? आणि भाजपच सत्तेत असताना सत्ताधार्यांनी कारवाई करायचे सोडून जनतेला हे का सांगितले जाते ? याचाही विचार जनतेने केलेला दिसत नाही.
वास्तविक हिंदु खतरे मे हा पुर्ण अपप्रचार आहे. भारतावर अगदी १३ व्या शतकापासून किंवा त्याहूनही आधीपासून मुस्लीम शासक राज्य करुन गेले तरी हिंदू धर्म तग धरून राहिला. नंतर ख्रिश्चन असलेल्या इंग्रज जवळपास २५० वर्षे राज्य करुन गेले तरी हिंदू धर्म टिकला. नंतर भारत स्वतंत्र झाला, लोकशाही आली आणि स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होऊन गेली. आणि मग स्वातंत्र्यामध्ये मागच्या १० वर्षांमध्ये हिंदू धर्म अचानक संकटात कसा काय आला ?
धर्म हि अफुची गोळी आहे , ती अशी. याशिवाय अनेक किर्तनकारांनाही भाजपने प्रचारात उतरवले होते. हे लोक थेट गावपातळीला जाउन प्रचार करत असल्यामु़ळे जिथे मतदानाचा टक्का वाढल्यामुळे सहाजिकच त्याचा फायदा झाला.
या मुद्द्यामुळे बेरोजगारी, पिकांना न मिळालेला भाव, मराठा आरक्षण हे मुद्दे ही मागे पडले.
३) योग्य जागावाटप :-
लोकसभेतील दणदणीत पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा यश मिळवायचेच या भावनेने चोख नियोजन केले, असे सांगतात कि महाराष्ट्राच्या विधानसभा मतदार संघाचा नकाशा घेउन प्रत्येक मतदार संघाचे बलाबल बघीतले आणि कमजोत उमेदवार शोधले. काही ठिकाणी शिंदे गट किंवा अजित पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसेल तर प्रसंगी भाजपचा उमेदवार त्यांच्या पक्षात प्रवेश करवून त्यांना त्यांच्या तिकीटावर उभे करुन जास्तीत जास्त जागा येतील असे बघीतले.याचा परिणाम म्हणून शिंदे गटाकडे ४० उमेदवार असताना त्यांचे ५७ तर अजित पावर गटाचे तब्बल ४१ उमेदवार निवडून आले. शिवाय बुथ मॅनेजमेंट, मायक्रो प्लॅनिंग करुन प्रत्येक घरात जाउन मतदार याद्या क्रॉसचेक करुन किती उमेदवार आहेत, कोण मतदान करु शकेल, मतदान करण्यत काही अडचण असेल तर त्याला आवश्यक ती साधने उदा. मतदान केंद्राप्र्यंत जाण्यासाठी गाडी उपलब्ध करुन देणे अशा अनेज गोष्टी केल्या. शिवाय बर्याच उमेदवारांनी प्रचार सभा घेण्याएवजी कोपरासभा, घरोघर प्रत्यक्ष भेटी यावर भर दिला. प्रत्यक्ष उमेदवार घरी आला तर मतदारावर प्रभाव पडतो. शिवाय डिजीटल प्रचारात मोठी आघाडी घेतली. याचा नक्कीच फायदा झाला असावा, मुख्य म्हणजे गरजेप्रमाणे प्रचारात योग्य तो बदल केला. उदा. मल्लिकार्जुन खरगे यांनी शेतकर्यांना सोयाबीन विकू नका असे आव्हान केल्यावर मोदींनी पुढच्या सभेत सोयाबीनचा दर जाहीर केला.
४) संघाची मदत :-
लागोपाठ मिळाळेल्या विजयामुळे भ्रमात असलेल्या भाजपच्या अध्यक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी , आता आम्हाला संघाची गरज नाही, असे विधान केले. सहाजिकच लोकसभा निवडणुकीत संघ तटस्थ राहीला. मात्र जिथे संघाचे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्रात निवडुक असल्यामुळे फडणवीसांनी संघाला निवडणुकीचे महत्व पटवून देउन त्यांची मदत घेतली. वास्तविक भाजपची मुळ ओळख 'शेटजी भटजीचा पक्ष' अशी होती, जी पुढे माधव ( माळी- धनगर- वंजारी ) फॉर्म्युला वापरुन मतदानाचा पाया वाढवला. यातूनच प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंढे अशी नेतृत्व पुढे आणली, मात्र सामाजिक संघटना असून ही आजही संघाची ओळख ब्राम्हणांची संघटना अशीच आहे. ( कदाचित अनेकांना हे पटणार नाही ) पण मग झारखंडमध्ये ते संघटन का चालले नाही? वास्तविक स्वंयसेवक संघ हि जवळपास शंभर वर्ष जुनी संघटना असताना याआधी त्यांचा प्रभाव का नव्हता ? आधी तर भाजपच्या महाराष्ट्रात जेमतेम २०-२५ जागा येत होत्या. मग आजच अचानकच संघ कसा काय इतक्या जागा निवडून आणु शकला ? त्यामूळे अनेक जण जे कारण सांगत असले तरी किमान काही वस्तींमध्ये नक्कीच फरक पड्ला असावा. दुसरे म्हणजे लोकसभेला मोदींचा झालेला पराभव संघ स्वयंसेवकांच्या जिव्हारी लागला, त्यामुळे पुन्हा हिंदुत्ववादी सरकार आणायचे अशी प्रेरणा घेउन त्यांनी काम केले.
५) नरेटीव्ह सेट करणे :-
वास्तविक महायुतीच्या कारभारात तीव्र संताप यावा असे अनेक मुद्दे होते. पण योग्य वेळी पद्दतशीर खोट्या पोस्ट पसरवून आणि फेक मोहीम राबवून राबवून या मुद्द्यांना बगल देण्यात यश मिळवले. उदा. राहुल गांधी यांनी अमेरीकेत दिलेल्या मुलाखतीत राखीव जागाविषयी काहीही आक्षेपार्ह विधान केलेले नसताना, ती मुलाखत इंग्लिशमध्ये असल्याचा फायदा घेउन राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचा खोटा जोरदार प्रचार केला, ज्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. लाल कव्हरचे संविधानासारखा पोकळ मुद्दा असाच, अर्थात कारण नसताना संविधानाचे कोरे पुस्तक वाटून कॉंग्रेसने त्यांना स्वतः होउन मदत केली. याशिवाय अर्धवट कापलेले आणि सोयीस्कर मुद्दा असणारे व्हिडिओ पसरवणे. उदा. औरंगजेब या नावाच्या सैनिकाने काश्मीरमध्ये देशासाठी प्राण दिले असताना, उद्दव ठाकरे मोघल राजा औरंगजेबाविषयी बोलत आहेत असे भासवले. शिवाय मुस्लिम समाजाच्या धार्मिक रॅलीचे व्हिडिओ महाविकास आघाडीच्या निवडणुक प्रचाराचे आहेत असे भासवले गेले. सर्वसामान्य माणुस ज्या मोबाईलवर फेसबुक, व्हॉटस अ‍ॅप आणि इतर सोशल मेडीया वापरतो, त्याच मोबाईलवर गुगल असून ही आलेल्या पोस्टची थोडी खात्री करुन घेण्याचे कष्ट घेत नाही. याच फिअर माँगरींगचा गैरफायदा घेतला गेला. खरे घराबाहेर पडून सांगेपर्यंत खोटे गावभर फिरुन आलेले असते हेच यावरुन सिध्द होते. याशिवाय सज्जाद नोमांनीनी जाहीर केलेला फतवा आणि त्यांनी पुढे केलेल्या मागणीविषयी असेच फेक नरेटीव्ह सेट केले गेले. त्याला व्हॉट जिहाद म्हणले गेले.
https://www.loksatta.com/elections/nana-patole-replied-to-devendra-fadna...
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
वास्तविक कोणी कोणाला मत द्यायचे हे आवाहन करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना आणि असेच आवाहन स्वंयसेवक संघ देखील करत असताना, भाजपने केलेला कांगावा यशस्वी ठरला.

https://www.reddit.com/r/librandu/comments/1flzktj/2_gas_cylinders_for_f...
2 Gas cylinders for free on EID and Muharram - Amit shah
वास्तविक अमित शहा यांनी इद आणि मोहरमला दोन गॅस सिलेंडर मोफत अशी घोषणा केली होती.

https://marathi.abplive.com/news/india/haj-policy-hajj-policy-2023-annou...

Haj 2023: हज यात्रेकरुंना मिळणार 50 हजारांची सूट, VIP कोटा रद्द, अर्जही विनामूल्य; केंद्र सरकारचे नवे धोरण

तसेच हाज यात्रेसाठी भाजपच्या तथाकथित हिंदुत्ववादी सरकारने अनुदान दिले असताना किंवा हिंदुचे शिरकाण करणार्या अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याला पंतप्रधान दरवर्षी चादर पाठवत असताना किंवा अटलबिहारी वाजपेयी इफ्तार पार्टीला हजर असतानाचे किंवा मशीदीत मोदी पोळी लाटतानाचे किंवा फडणवीस, अशीष शेलार, राणे सुपुत्र, चंद्रशेखर बावनखुळे यांचे गोल टोपी घालून फोटो गुगलवर उपलब्ध असताना आणि उद्दव ठाकरे यांचा एकही असा फोटो नसताना ( किमान मला सापडला नाही ) देखील भाजप नेते हिंदुत्ववादी असतात आणि उद्दव ठाकरे मुस्लिम तुष्टीकरण करणारे ठरतात.
६) मतांचे ध्रुवीकरण :-
जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या चळवळीमुळे मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरला आहे. मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा लोकसभा निवडणुकीत फटका बसला. अगदी रावसाहेब दानवे, पंकजा मुंढे असे मोठे नेते पराभुत झाले. मात्र हा फॅक्टर विधानसभा निवडणुकीत प्रभावी ठरला नाही. या आंदोलनामुळे मराठा समाजाचे ध्रुवीकरण होउन त्याचा फटका बसेल असे लक्षात आल्यावर भाजपने ओ.बी.सी. मताचे एकत्रिकरण केले, त्याचा नक्कीच फायदा झालेला दिसतो आहे. एकप्रकारे हरियाणात जसे जाट मताचे ध्रुवीकरण होउन ही काँग्रेसला फायदा झाला नाही तसाच फटका महाराष्ट्रातही कॉंग्रेसका बसला. आणखी एक मुद्दा म्हणजे शहरा मध्ये वाढलेले परप्रांतिय मत आता निर्णायक ठरू लागलीत २०१४ आधीं हे काँग्रेस चे पारंपरिक मतदार होते आता भाजपचे झालेत जिथ कमळ नाही तिथ हे धनुष्य बाणलाच मत देतात त्यांना लोकशाही संविधान महाराष्ट्राचे इतर प्रश्नासाठी देणं घेणं नाही, कित्तेक गुजराती परिचयाचे लोक आहेत कमळ नसेल तर धनुष्य बाणाला मतदान करु हेच डोक्यात, खोलात जाऊन विचार केला तर भाषिक आक्रमणं होत त्यावेळी तिथलं राजकारण समाजकारण, संस्कृति अस्मिताला वाट लावण्याचे काम होते,
मुख्य म्हणजे भाजप एखाद्या इलेक्शन मशीनसारखे काम करते.जिंकून आल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडे संभाव्य मतांची गोळाबेरीज करायची सुरुवात होते. २४ तास ३६५ दिवस ही गणितं भाजपच्या तंबूत शिजत असतात. सतत अभ्यास केला जातो.
७) पैशाचा गैरवापर :-
हा थोडासा वादग्रस्त मुद्दा ! पण थेट पुरावा असणे अशक्य, म्हणूनच हा शेवटी घेतला. अर्थात सत्य सर्वांनाच माहिती आहे. निवडणुक सुरु असताना आतोनात पैसे जप्त झाले.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-elections-to...
Maharashtra: Elections today, BJP gen secy Tawde booked after cash found in hotel room

https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-assembly-vidhan-sabha-ele...
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक ...

https://www.esakal.com/pune/138-kg-gold-seized-in-pune-by-police-maharas...
पुण्यात सापडले घबाड! ...

काही बातम्या दिल्या आहेत. त्याशिवाय सिंधुदुर्ग रत्नागिरीत ५००० ते ७००० रेट होता एका कुटुंबाचा आणि जर तुम्ही जास्त असला कुटुंबात तर तुम्ही वाटाघाट पण करू शकत होता. बऱ्याच जणांनी १०००० पर्यंत पदरात पाडून घेतलेत . महाराष्ट्रात अन्यत्र ही असेच रेट असल्याचे समजते.
त्याशिवाय क्रिकेट मंडळ गणपती मंडळ गावातील मंदिर यांना देणग्या वेगळ्या....असो एकंदरीत पैशाचा खेळ आहे. याशिवाय सोसायटीची भिंत बांधून घेणे, क्रिडासंघासाठी देणगी मिळवणे आणि अन्य प्रकारे उमेदवाराकडून पैसा उकळला. वास्तविक हा प्रकार सर्वपक्षीय झाला आहे. मात्र गेली दहा वर्ष विकासाचा दावा करणार्या आणि पार्टी विथ डिफरन्सच्या गप्पा मारणार्या पक्षाला त्याच गैरमार्गाची मदत घ्यायची वेळ आली. तेव्हा येणकेणमार्गे सत्ता हेच ध्येय धरुन साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गाचा वापर महायुतीने केलेला दिसतो,

या झाल्या महयुतीची बाजु. आता आपण बघुया विरोधी पक्षाची बाजु, अर्थात महाविकास आघाडीची. दुसर्या भागात
( क्रमश: )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लिहा हो दुर्गविहारी. तुम्ही अन्यत्र असलेल्या पोस्ट्स इथे कॉपी पेस्ट करताना दिसता. पण तुम्ही स्वतःच चांगले लिहिताय की.