8am Metro - गुलजार यांच्या कविता व दोघांची गोष्ट

Submitted by अस्मिता. on 19 November, 2024 - 18:58

मी जर सोनमासळीचे शरीर घेवून या तलावाच्या तळाशी लपून राहीले असते
तेव्हा तू चंद्रबिंबासारखा या पाण्यावर तरंगत आला असतास
आणि माझ्या काळोख्या घरात चांदणे पसरवले असतेस
तरंगत म्हणालाही असतास या एकाकी तळ्यात , 'तुझ्यावरही कुणी प्रेम केले असते'. मग मी किनाऱ्यावर येऊन तुझ्याशी मैत्री केली असती, तुझ्या सोनमासळीने तुझा एकाकीपणा दूर केला असता. या कल्पनेने तुला 'सुकून' मिळाला असता, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती

'एट एम मेट्रो' सिनेमातली ही गुलजार यांची कविता. "एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं बन सकते" या हिंदी चित्रपटातील सर्व व्याख्यांना छेद देत कुठेतरी दूर नेऊन ठेवणारी थोडी परकी पण बरीचशी आपली वाटणारी दोन माणसांची कथा. ती कधीही स्त्रीपुरुषांची होत नाही, ना कधी 'जेन्डरलेस' स्नेहाचा बटबटीत दिखावा करते. ती शेवटपर्यंत दोन माणसांचीच राहते. तुम्हाला जे हवे ते तुम्ही घ्या, नको असेल तर नका घेऊ. इतकी कंफर्टेबल अभिव्यक्ती..! 

साधीसरळ आत्मविश्वास कमी असणारी संवेदनशील गृहिणी इरा व टागोर, चेकॉव्ह, हरिवंशराय बच्चन अशा लेखकांच्या पुस्तकांत रमणारा इंट्रोव्हर्ट वाटावा असा प्रीतम अनपेक्षितपणे सकाळी आठ आणि संध्याकाळी सहा वाजताच्या हैदराबाद शहरातील मेट्रोत भेटतात, बोलतात, खुलतात, एकमेकांना शोधत- प्रेरित करत आपापला मार्ग शोधत 'यथा काष्ठं च काष्ठं च' म्हणत परतही जातात. आपण एकमेकांच्या रितेपणाला भरत आहोत ही जाणीव नेणीवेत जाते आणि दोन आठवड्यांचे निर्व्याज नाते खूप काही देऊन जाते. 

इराला लहानपणी ट्रेनमधे काही काळ चुकामूक झाल्याने एकटे रहावे लागते व त्याचा तिला प्रचंड धक्का बसलेला असतो. त्यात तिला बहिणीच्या गुंतागुंतीच्या प्रेग्नंसीसाठी नांदेडहून हैद्राबादला मदतीसाठी यावे लागते. रोज बहिणीच्या घरून हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन येण्यासाठी ट्रेन घेताना पॅनिक अटॅक्स यायला लागतात. तेव्हा प्रीतम तेथेच असतो व गप्पा मारत तिचे लक्ष विचलीत करतो. सहज सुरू झालेल्या गप्पा तिच्या कविता व त्याच्या वाङमयीन रुची वर व्हायला लागतात. या गप्पा प्रोफाऊंड असूनही सहजपणे होतात, कधीकधी अगदी साध्याही असतात. त्यामुळे त्या मोजूनमापून केलेल्या न वाटतात आपोआपच झालेल्या वाटतात. इरा तिचे भय शब्दातही मांडते. हजारो गोष्टी सांगायच्या असतात पण भोवतालची ही पराकोटीची अनास्था बघून व्यक्त व्हावेसे वाटत नाही. तेव्हा संवेदनशील मनांनी काय करावे ते इरा मांडायचा प्रयत्न करते. फक्त स्वान्तःसुखाय. प्रथमच तिला तिची अभिव्यक्ती समजून घेणारे असे कोणी भेटते, तोवर तिला ही जाणीवही नसते की ती खरोखरच उत्तम काव्य करते. पण या स्वतःच्या चाचपडीत ती त्या सोनमासळी सारखी प्रीतमलाही 'सुकून' देत असते. 

ते रोज गप्पा मारायला लागतात. फिल्टर कॉफी वरून जोरात प्रेस केली की डिकॉक्शन पातळ पडते आणि नाही जोर दिला तर ती कडवट होते. पण ती व्यवस्थित करणे ही प्रक्रिया मेडिटेशन सारखी असते. अशा शिळोप्याच्या ते-
आफ्रिकेतील आदिवासी लोक तिथले स्त्री-पुरूष एकमेकांशी कसे निर्विष, नॉन -जजमेंटल बोलतात व इतरांचा कानही होतात. ते आपल्या सोसायटीत या फेक संस्कारांच्या नियमांमुळे शक्य होत नाही म्हणजे एकप्रकारे मानवी नीतिमूल्ये आपण गमावून बसलो आहोत. सगळीकडे माणसांचा महापूर आलेला असूनही ऐकणारा समजू शकणारा कान सापडत नाही- अशा सखोल. चर्चा नव्हे गप्पा.

एकेदिवशी ते हैद्राबाद शहराची सहलही करतात. अतिशय साधी असलेली इरा खुलायला लागते व वडिलांनी अखेरच्या दिवसातल्या त्यांनी व स्वतः केलेल्या कविता म्हणून दाखवते. त्यांच्या शुश्रुषेतले एकाकी दिवस व आयुष्याचा व समाधानाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा कसा असू असतो असेही सांगते. तिची ट्रेनबद्दलची भीती कमी व्हायला लागते. मोकळा श्वास घ्यायला लागते. बहिणीचे आलेले प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करते.‌

प्रीतमही खुलून घरच्या -कुटुंबाची हसरी चित्रं रंगवतो. मृदुला व मुलांबद्दल गोड हितगूज करत असतो. मृदुलाही बंगाली कविता करत असते, ते कसे प्रेमात पडले, मुलांसोबत ते प्रत्येक क्षण कसा एन्जॉय करतात. तो कसा गोड बाबा व प्रेमळ नवरा आहे हे इरासोबत आपल्यालाही जाणवते. त्यांचे "खौफ" - भय कमी व्हायला लागतात. 

वो कोई खौफ़ था या नाग था काला
मुझे टखनोंसे आ पकडा था जिसने
मै जब पहिली दफा तुमसे मिली थी
कदम घडने लगे थे मेरे जमींनमें
तुम्हीने हात पकडा और मुझे बाहर निकाला
मुझे कंधा दिया सर टेकनेको
दिलासा पाके तुमसे सांस मेरी लौट आयी
वो मेरे खौफ सारे जिनके लंबे नाखून गलेंमें चुभने लगे थे
तुमहीनें कांट फेके सारे फन उनके
मै खुलके सांस लेने लग गयीथी
ना माझी देखा, ना मुस्तक्बिलकी सोची
वो दो हफ्ते तुम्हारे साथ जीकर अलग एक जिंदगी जी ली
फकत मैं थी, फकत तुम थे
कुछ ऐसे रिश्तेभी होते है जिनकी उम्र होती है, ना कोई नाम होता है
वो जिने के लिये कुछ लम्हें होते है.

पण प्रीतममधले वैफल्य सुरवातीपासून जाणवत असते. बऱ्याचदा भरपूर वाचन असणारे, वरवर वाक्चतुर वाटणारे लोक खऱ्याखुऱ्या भावना शिताफीने लपवू शकतात, अजिबात खोटे न बोलताही. अशा लोकांचे नैराश्य/एकटेपणा कधीही कळत नाही. तेवढा पेशन्स असणारेही कोणी भेटत नाही. कुणाच्या कलाकलाने घ्यायला आपल्याला वेळ कुठे आहे एकमेकांसाठी. त्यांना समजून घ्यायला तितकेच 'रूतलेले' कोणीतरी लागते. इराही त्याच तलावात दडी मारून बसलेली, प्रीतमसारख्या चंद्रबिंबाप्रमाणे वरवर तरंगत राहणाऱ्या इंट्रोव्हर्ट आणि वैफल्यग्रस्त व्यक्तीची दोन आठवड्यांपुरती 'सोनमासळी' होते. त्या चंद्रबिंबामुळे तिलाही तिच्या अभिव्यक्तीने- तिच्या कवितांनी कुणा एका जीवाला 'सुकून' मिळतोय ही जाणीव होते. अजून लिहायला हवे, हे छापून यायला हवे अशी इच्छा प्रथमच वाटते. "तू जसा कुठेतरी एकटा नसूनही एकाकी आहेस तशी मीही भरलेल्या संसारात महत्त्वाकांक्षी नसलेली तरीही संसारापेक्षा जास्त काही तरी शोधणारी वरवर सुखी वाटणारी साधीसरळ गृहिणी आहे. या भयांच्या गर्तेतून मी कधीही बाहेर निघणार नाही असे वाटताना अनाहूतपणे तू भेटलास. आणि निनावी नाते खूप काही देऊन गेले."

अशाच गप्पांमधे इरा प्रीतमच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त करते. प्रीतमही सरळपणे तयार होतो. ती भेट अर्थात होतच नाही व धक्कादायक प्रकारे तिला त्याच्या एकाकीपणाचे कारण कळते. तिच्या बहिणीला बाळ होते व तिच्या परत जाण्याची वेळ होते. ते वेगळे होतात, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. एकमेकांना चांदणे दाखवून, आपापल्या मार्गाने जातात. उरलेला प्रवास एकाकी असला तरी तो 'सुकून' घेऊन पुढे जाण्याने कमी बोचरा होतो. या सिनेमात फक्त इरा आणि प्रीतमचा संवाद आहे, बाकी काहीही महत्त्वाचे नाही. जे आहे ते संवादांची शृंखला एकमेकांना जोडणारे आहे, तेवढ्याचसाठी आहे. इराच्या सगळ्या कविता गुलजार यांच्या आहेत. त्या काव्याशिवाय ही कथा नाही, कथेला अधिक आर्तपणे त्या प्रेक्षकांपर्यंत पोचवतात. कथेशिवाय काव्यालाही अर्थ व सखोलता प्राप्त होत नाही. त्यामुळे ते दोन्ही इरा आणि प्रीतमप्रमाणे एकमेकांना परिपूर्ण करतात, नव्या उंचीवर नेतात. सुरवातीपासूनच हा बंध 'प्लेटॉनिक व तात्कालिक' आहे असे स्पष्ट दिसत असूनही हा संवाद ती उंची निश्चितच गाठतो. नात्यांमधली आणि अभिव्यक्तीमधलीही. हे पंधरा दिवस व ट्रेनमधल्या गप्पा दोघांचेही आंतरिक आयुष्य बदलवून टाकतात. पुढचा प्रवास कमी एकाकी करतात. प्रीतमही थेरपीच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकतो. आत्महत्येचा विचार रद्द करतो. त्याच ट्रेन ट्रॅकवर तो जीव द्यायला निघालेला असतो, जिथे इराला पॅनिक अटॅक्स आलेला बघताना पहिल्यांदा तिला सावरायला जातो. 

इराच्या गप्पांनी/ तिच्या कवितांनी एका जीवाला शांतता मिळते. "अशांसाठी तू लिहायला हवेस इरा, सभोवताली असलेल्या अनास्थेची - 'बेरूखी'ची पर्वा न करता तू लिहायला हवेस इरा. एखाद्या जीवापर्यंत त्या पोचतील आणि त्याला कुठेतरी तृप्त करतील. तुझ्या रक्तात वाहणारी ती वेदना बोटांतून बाहेर पडू दे. चांदणे पसरू दे, खोल तलावातून बाहेर पड. चंद्रबिंबाप्रमाणे कुणीतरी तरंगत येईल". 

येथे एडी मर्फीच्या 'Holy man' चित्रपटातला संवाद आठवला. समुद्रकिनारी चालत असताना लाटेसोबत वाहत येत वाळूत अडकून पडलेल्या हजारो स्टारफिशचा खच पडलेला असतो. शक्य तितके स्टारफिश परत प्रवाहात नेऊन सोडण्याची एका छोट्या मुलीची तडफड...! असे किती स्टारफिश आपण वाचवू शकणार आहोत, येथे तर खच पडलाय. आपल्या या तडफडीने असा कितीसा फरक पडणार. त्या छोट्यामुलीला जे समुद्रात जाऊन पुनर्जीवीत होतील, त्यांना तर खूप मोठा फरक पडेल असेच वाटलेले असते.

तसेच इराचे काव्य प्रीतमसाठी फरक पाडते, गारवा देते. तिलाही निश्चित दिशा मिळते. तिलाही ते सगळे मिळते, जे एका सोनमासळीला हवे असते. बरीच भयं दूर होतात, दिलासा मिळतो. मोकळा श्वास घ्यायला लागते. सुखी संसारात 'स्वत्व' सापडते. काही क्षणांमधे घडणारे आयुष्य अनोळखी व्यक्तीमुळे जगता येते.  

इरा तिच्या कवितांचे पुस्तक छापते. त्याच हैदराबाद मधल्या पुस्तकांच्या नॉस्टॅल्जिक वाटणाऱ्या दुकानात तिथे ते त्याला मिळते. निरोप म्हणून 'काफ्का आणि बाहुलीची गोष्ट' तिने त्यात लिहिलेली त्याला सापडते.‌ बर्लिनच्या एका पार्कमधे फिरताना काफ्काला एक छोटीशी मुलगी रडताना दिसते. बाहुली हरवल्याने ती रडत असते. दोघे मिळून बाहुली शोधतात पण ती काही सापडत नाही. दुसऱ्या दिवशी काफ्का त्या चिमुकलीसाठी बाहुलीकडून आलेले पत्र वाचून दाखवतो. बाहुली जगप्रवासाला निघालेली असते, त्यात तिने ह्या प्रवासातील साहसांबद्दल पत्रांत लिहिण्याचे वचन दिलेले असते. मुलीला गंमत वाटते. अशी बाहुलीची पत्रे वर्षभर येतात, काफ्का ते वाचून दाखवतो. एका वर्षांनी पूर्णपणे वेगळी वाटणारी बाहुली आणि शेवटचे पत्र येते. चिमुकली म्हणते, ही तर माझ्या भावली सारखी दिसत नाही, वेगळीच दिसतेय. भावली म्हणते, "मी जग बघितलेय आता आणि बदलून गेले आहे. पण मी तुझीच आहे." गोष्टीचे आणि सिनेमाचे तात्पर्य, प्रीतमसाठी इरा व इरासाठी प्रीतम त्या काफ्काच्या बाहुलीसारखे ठरतात. 

Everything you love will probably be lost, but in the end, love will return in another way.

मला खटकलेली एकच गोष्ट म्हणजे सैयामीने वाचलेल्या कवितांमधे अजून एक्सप्रेशन हवे होते. चित्रपट समांतर सिनेमा वाटावा इतका संथ आहे. ज्यांना कविता व साहित्यात रूची नाही, त्यांच्यासाठी नक्कीच नाही. अभिनय उत्तम आहे. छोटेसेच पण ताकदीचे कथाबीज आहे. गुंतवून ठेवतो , काही ठिकाणी डोळ्यांत पाणीही येते. तुम्ही प्रेक्षक म्हणून त्या भावना जगलेल्याच नसतील तर यात काय अर्थ आहे असेही वाटू शकते. शेवटी पात्रांमधे कुठेतरी आपण स्वतःलाच शोधत असतो. कधीकधी आपलेच हरवलेले तुकडे शोधण्यासाठीच आपण चित्रपट बघतो, पुस्तक वाचतो, येथे येतो- चर्चा करतो. तुकडा गवसलाय वाटेपर्यंत आतले ब्रह्मांड अजून बदलून गेलेले असते. कुणाला गवसेलही काही कदाचित... यातून..!

संदर्भ-
Holy man- https://www.imdb.com/title/tt0120701/characters/nm0000552
Kafka and the lost doll- https://epicureanglobalexchange.com/kafka-lost-doll-little-girl/
Wikipedia
https://en.m.wikipedia.org/wiki/8_A.M._Metro
चित्र साभार विकी
इरा- सैयामी खेर
प्रीतम- गुलशन देवैय्या
इराचा नवरा- उमेश कामत
सगळ्या कविता गुलजार यांच्या आहेत.
©अस्मिता.

Update - फिल्म कंपॅनियनची लिंक ज्यात या परीक्षणापेक्षा वेगळा दृष्टिकोन ठेवून वेगळी बाजू मांडली आहे.
https://www.filmcompanion.in/reviews/bollywood-review/8-am-metro-movie-r...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही प्रेक्षक म्हणून त्या भावना जगलेल्याच नसतील तर यात काय अर्थ आहे असेही वाटू शकते. शेवटी पात्रांमधे कुठेतरी आपण स्वतःलाच शोधत असतो. कधीकधी आपलेच हरवलेले तुकडे शोधण्यासाठीच आपण चित्रपट बघतो, पुस्तक वाचतो, येथे येतो- चर्चा करतो >> =१

छान लिहिलंयस.
अश्या गोष्टींनी मी अस्वस्थ होते. पण गुलजारच्या कवितांचा मोह पडतोय म्हणून बघेन पिक्चर कदाचित.

बऱ्याचदा भरपूर वाचन असणारे, वरवर वाक्चतुर वाटणारे लोक खऱ्याखुऱ्या भावना शिताफीने लपवू शकतात, अजिबात खोटे न बोलताही. अशा लोकांचे नैराश्य/एकटेपणा कधीही कळत नाही. तेवढा पेशन्स असणारेही कोणी भेटत नाही. कुणाच्या कलाकलाने घ्यायला आपल्याला वेळ कुठे आहे एकमेकांसाठी. त्यांना समजून घ्यायला तितकेच 'रूतलेले' कोणीतरी लागते >>> हा सगळा भाग, यातले सखोल निरीक्षण खूप आवडले.

लेखही आवडला. छान लिहीले आहेस. स्टारफिश व काफ्का ची उदाहरणेही चपखल आहेत.

काफ्काचे चित्रपटातच शेवटी दाखवले आहे, स्टारफिशचे मला आठवले होते.

येथे सर्व कविता ऐकू शकता, त्यापैकी 'सोनमछरी' मला सर्वात जास्त आवडली.

लेख चांगला आहे.
पण पिक्चर माझ्या टाईपचा नाही म्हणून आपला पास.

तुमचा संपूर्ण लेख पोचला, असं माझ्याबाबत होत नाही. हा मात्र पोचला; कळला आहे असं वाटतं.

रघू आचार्य, फारेण्ड यांनी quote केलेली वाक्ये आणि बाहुलीच्या कथेचं तात्पर्य - मी जग बघितलेय आता आणि बदलून गेले आहे. पण मी तुझीच आहे." गोष्टीचे आणि सिनेमाचे तात्पर्य, प्रीतमसाठी इरा व इरासाठी प्रीतम त्या काफ्काच्या बाहुलीसारखे ठरतात. - भिडले.
ती शेवटपर्यंत दोन माणसांचीच राहते. तुम्हाला जे हवे ते तुम्ही घ्या, नको असेल तर नका घेऊ. इतके कंफर्टेबल व्यक्त..! - हेही फार आवडले.

इरा/ सैयामी ने त्या कविता गप्पांच्या ओघात म्हटल्यात की वाचल्यात? त्याने फरक पडू शकतो का?

पोस्टर दिसल्यावर बातों बातों में आणि कथानक वाचताना लंचबॉक्स आठवले.

दिग्दर्शकाचं नाव शोधलं "

Raj Rachakonda.

मुझे कंधा दिया सर टेकनेको - शेवटचा शब्द बरोबर आहे का?
रुचीचं ऋची झालंय.

मी लेख वाचला आहे. पण सिनेमा पाहिल्याशिवाय व्यक्त होता येणार नाही ही अडचण असल्याने लेखातली आवडलेली वाक्ये कोट केली.

थोडाफार लंचबॉक्स किंवा आणखी एक सिनेमा होता ज्यात अय्यर नावाची बाई आणि बसमधला तरूण यांची एका प्रवासाची कहाणी होती त्या अंगाने जाणारा असेल असे वाटले.
( प्रतिसाद पोस्ट होईपर्यंत हायलाईट कट ही समस्या चालूच असल्याने अर्थ बदलले जातात )

लिखाण आवडले. सगळी सुक्ष्म निरिक्षणे नोंदली गेलीत.

गुलजार आवडतातच!
गुलशन देवैय्या गुणी अभिनेता आहे.
सैयमीचे काम बघीतलेले नाही तिचा चेहेरा मला तिच्या आजीच्या आत्याच्या जवळपासही न जाणारा कृत्रीम सुंदर वाटतो आणि वर तू तिच्या कविता वाचनात भाव हवा होता म्हणत्येस.....
पण जाऊ दे नुकतेच तिने तिच्या खर्‍या आयुष्यात हाफ आयर्न ट्रायथ्लॉन केलंय त्यामुळे माफ करेन एखादवेळी. (कुकातकुका)
बघेन म्हणतो हा चित्रपट

रच्याकने - उच्च अभिरुची असलेल्यांची आवड नुसती रुची न होता ऋची होते का Wink

उच्च अभिरुची असलेल्यांची आवड नुसती रुची न होता ऋची होते का
>>> Lol
पण जाऊ दे नुकतेच तिने तिच्या खर्‍या आयुष्यात हाफ आयर्न ट्रायथ्लॉन केलंय त्यामुळे माफ करेन एखादवेळी.
>>> अरे व्वा..! तशी ॲथलिट वाटते ती.

टायपो दुरुस्त केला आहे. धन्यवाद सर्वांना. Happy

मुझे कंधा दिया सर टेकनेको - शेवटचा शब्द बरोबर आहे का?
>>>
मी पन्नास वेळा तरी त्या कविता ऐकल्या. लिरिक्स सापडल्या नाहीत आणि उर्दूत असतो तो नुक्ताही देता आला नाही. असेच ऐकू आले. तुम्ही कोणी वरच्या लिंक ऐकून बदल सुचवा प्लीज. Happy

इरा/ सैयामी ने त्या कविता गप्पांच्या ओघात म्हटल्यात की वाचल्यात? त्याने फरक पडू शकतो का?
>>>> काही वाचून दाखवल्यात, काही त्या-त्या पार्श्वभूमीवर नॅरेशन सारख्या येतात. कदाचित फरक पडू शकेल. छानच आहेत याही, पण थोडी उणीव जाणवली.

मला सुद्धा लंचबॉक्स चित्रपट आठवला होता, पण हा बघताना मी तो विसरून गेले.

आचार्य, तुम्ही नक्कीच बघा. तुम्ही छान लिहाल यावर. Happy
हर्पेन, नक्की बघा. Happy

सिनेमा आज पाहिला. आवडला, भावला.‌ कदाचित miss झाला असता, म्हणून सुचवल्याबद्दल आभार.‌
तुम्ही लिहिलंच आहे सगळं, आणि चांगलं. त्यात आणखी काही पूरक नोंदी/ टेक अवे नोट्स :

१. मनाची दुखती रग असते, तिच्या किंचित आसपास कुणी हळुवार बोट फिरवत रहावं, तेव्हा सुख होतं. असं सुख एखाद्या कवितेतून, कादंबरीतून किंवा अशा एखाद्या सिनेमातूनही भेटीला येऊ शकतं.

२. हे पॅकेजसारखं आयुष्य. यात आपापले खाजगी न्यूनगंड भयगंड दुःखं एकटेपणा अपराधभाव जसे मिळतात, तसेच या सगळ्याला पुरून उरेल अशी जीवनोन्मुख ऊर्मीदेखील मिळते. शोधावी लागते. शोधली पाहिजे.

३. सिनेमा घोळक्यासाठी नाही, एकेकट्यासाठी किंवा एकेकटीसाठी आहे.‌ हा आयुष्याच्या हरवलेल्या, विस्कटलेल्या लयीचा शोध आहे. त्या व्याकुळ शोधाचं गाणं आहे. आणि हे गाणं गुणगुणनं मध्येमध्ये समेवर येतं, जेव्हा गुलजारांची एखादी कविता आपल्यावर उतरते. ही कविता ओतप्रोत असते, मायाळू असते. कवितांचा एवढा संज्ञाप्रवाही, समसमा संयोग क्वचितच पहायला मिळतो.

४. मेट्रो प्लॅटफॉर्मवरचा तो प्रसंग. देवैय्या त्या इरावतीच्या जवळ जातो. थोडा घुटमळतो. चाचपडत विचारतो, 'लगता है आप इस शहर में नये है?'
काही रिस्पॉन्स येत नाही, ती स्वतःला आकसून घेते. तो पटकन दूर जाऊन उभा राहतो, आपलं काय चुकलं की काय विचार करत.! यात सोशली अलूफ असणाऱ्यांची मानसिक कंडिशन, देहबोली चपखल पकडलीय. अशा व्यक्तींच्या मनांचे बारकावे उमजल्याशिवाय इतका सहज नैसर्गिक अभिनय वठवता येऊ शकत नाही.

५. जगात माठ स्त्रियांच्या पुरुषांची कमतरता नाही. पण बुद्धिमान, मनस्वी स्त्रियांचे पुरुषही असतातच म्हणजे. देवैय्या दुसऱ्या कॅटेगरीतला. स्त्रीचं पुरूषाशी आणि पुरूषाचं स्त्रीशी कसलंही नाव/ओझं नसलेलं निरपेक्ष मोकळं नातं असायला हवं.‌ असं किमान एकतरी नातं असायला हवं. थोडा काळतरी असू द्यायला हवं. काही अंतरंग संवाद/संबंध शक्य होण्यासाठी ते आवश्यक आहे.

६. यात काही पुस्तकांचे, लेखकांचे माग सापडतात. तर पुस्तकांवर, वाचन-प्रक्रियेवर प्रेम असणाऱ्यांनी बघावा. पुस्तकांनी आयुष्यात ज्यांना खूप काही दिलंय, भरल्या ओंजळींनी दिलंय, त्यांनी जरूर बघावा.

७. आणखी एक प्रसंग. एक कवी पिता अखेरच्या क्षणी आपल्या कवयित्री मुलीला निरोपादाखल एक कविता-पत्र सोडून जातो.‌ असे कवी अजून आहेत, पुढेही असणार आहेत, ही कल्पनाच किती उदात्त आहे.! ते जे कुठलं तत्व असेल, त्याला अजूनही आशा आहे, त्यानं अजूनही आपल्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं नाही, याचंच हे द्योतक आहे म्हणजे.

उदाहरणार्थ हे..

मेरा एक ख्वाब था,
नज्में मेरी ये उजाले देखे सुबह के,
मगर ये जिंदगी की शाम में,
जो नज्में मेरी रग-ओ-जॉं में बहती थी,
तुम्हारी ऊंगलियों पर अब उतरने लग गई है
तसल्ली हो गई है I

मैं जाते जाते क्या देता तुम्हें सिवा अल्फाज के,
मगर इतनी सी ख्वाईश है की मेरे बाद भी,
पिरोते रहना तुम अल्फाज की लडियॉं
तुम्हारी अपनी नज्मों में I

संप्रति, किती सुरेख नोंदी आहेत. आणि किती छान व्यक्त झाला आहात. मनापासून आभार. Happy नंबर ५ ची नोंद फारच चपखल वाटली. त्यांनी ज्या हिंदी लेखकांचा उल्लेख केला आहे, तो तुमच्या लेखात वाचला होता. सगळ्याच नोंदींना आनंदाने अनुमोदन देत आहे.

नझ्में कविता सुरेखच आहे. पण येथे विस्तारभयास्तव देण्याची टाळली होती.

पिरोते रहना तुम अल्फाज की लडियॉं
तुम्हारी अपनी नज्मों में I

>>>> त्यासाठीच तर हा लेखनप्रपंच आहे सगळाच, तुमचा....माझा. Happy

अस्मिता फार सुरेख लिहीलेले आहेस.
>>>>>>>Everything you love will probably be lost, but in the end, love will return in another way.
अहाहा!! काय सुंदर कल्पना आहे. सत्य आहे सत्य आहे.

संप्रति यांच्या नोंदीही मस्त.

छान लिहिलंयस, आवडलं.

मला हा सिनेमा आवडता आवडता राहिला तो सैयामी खेरमुळे. अगदीच ठोकळा आहे ती. एरवी जिथे घटनाक्रमावर भर असतो अशा एखाद्या सिनेमात खपून गेलीही असती, पण इथे अभिनय / संवादफेक आणि काव्यवाचन यावरच सगळा डोलारा उभा करायचा असताना तिला का घेतलं असेल कळलं नाही. गुलशन देवैयाने नेहमीप्रमाणेच सुंदर काम केलं आहे.

** अवांतर **
दोन ठिकाणी तू 'expression'साठी 'व्यक्त' शब्द वापरला आहेस
>>> इतके कंफर्टेबल व्यक्त..!
>>> प्रथमच तिला तिचे व्यक्त समजून घेणारे असे कोणी भेटते
तिथे 'अभिव्यक्ती' शब्द हवा, किंवा मग 'व्यक्त होणं' असं तरी म्हणायला हवं. 'व्यक्त' हे नाम नाही. Happy

तसंच नुक्ता K वापरून देता येईल. Happy

छान होता हा मुव्ही! मला पण फार आवडलेला. बहुतेक मी चिकवा वर लिहिलेलं असेनही.
सयामी गृहिणी कॅरेक्टर वाटत नाही आणि भावनिक एक्स्प्रेशन्स , ती असोशी जी गुलशन देवियाच्या चेहेर्‍यावर दिसते ती हिच्याकडे मिसिंग वाटली. तरीही सिनेमा आवडलाच. असे बंध ज्यांच्या आयुष्यात असतील ते लकी!

Happy स्वाती- मला माझेच बरोबर वाटते आहे, तरीही फक्त विश्वासापोटी बदल करते आहे. मराठी किबोर्ड वापरते, त्यामुळे नुक्ता शक्य दिसत नाही.
धन्यवाद सुचवल्याबद्दल. Happy

मला सैयामी एवढीही वाईट काम करतेय असे वाटले नाही. थोडी उणीव मात्र भासली. दैवय्याचे काम मात्र फार ताकदीचे आणि सहज वाटले हेही खरेच.

>>> आणखी एक सिनेमा होता ज्यात अय्यर नावाची बाई आणि बसमधला तरूण यांची एका प्रवासाची कहाणी होती
मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस अय्यर.

अशा कथा आपण पाहिल्या आहेत यापूर्वी, पण या सिनेमाचा वेगळेपणा त्याच्या 'ट्रीटमेन्ट'मध्ये आहे असं मला वाटलं. ज्यांनी 'बिफोर सनराइज/सनसेट/मिडनाइट' ट्रिलॉजी पाहिली असेल त्यांना ओळखीची वाटेल.
सहसा 'show, don't tell' हा पटकथालेखनाचा 'गोल्डन रूल' समजतात, पण हे सिनेमे संवादांतूनच 'घडतात' आणि भिडतातही.

>>> मला माझेच बरोबर वाटते आहे, तरीही फक्त विश्वासापोटी
नाही नाही, तसं नको. पटलं असेल तरच बदल. Happy
आफ्टर ऑल, ही तुझी अभिव्यक्ती हे तुझं व्यक्त आहे. Proud Happy

Lol तुम्हाला चिडवायला वाव मिळू नये म्हणून तरी बदल करावाच लागेल. मी हे दोन्ही शब्द भरपूर वापरले आहेत पण आज माझे डोळे उघडले आहेत... बहुतेक. Happy

तुझ्या दोन्ही पोस्टी आवडल्या, चपखल वाटल्या.

दुरुस्त केले आहे. Happy

तरी दोनापैकी एकच दुरुस्त केलं! किती आडमुठेपणा! Lol
मला आता लाल पेन घेऊन निबंध तपासायला बसल्यासारखं वाटतंय, त्यामुळे थांबते. लेख मस्त आहे, त्याकडे परत वळू. Happy

नाही, केले होते दोन्ही. चुकून झाले. Lol अशीच थांब मराठीच्या बाईंसारखी. करतेय हं.
आता मात्र खरेच केले , मला माझेच सापडत नव्हते. Happy

मस्त लिहिलं आहे. चित्रपट बघितलेला नाही.
स्त्री-पुरुषांमधली मैत्री ही आपण जेव्हा लिंगनिरपेक्ष आहे असं म्हणतो तेव्हा बहुतेक वेळा आपल्याला त्यांच्यात लैंगिक आकर्षण नाही, असं म्हणायचं असतं. पण मला वाटतं की जेंडर हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य घटक असल्यामुळे स्त्री-पुरुषांमधल्या कुठल्याही नात्यात (मित्र, सहकारी, सहप्रवासी अशा कुठल्याही) जेंडरला विसरता येत नाही. शारीरिक आकर्षण नसलं तरी भिन्नलिंगी व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण हा भाग असतो. मला नीट मांडता येत नाहीये बहुतेक. असो.
मिलिंद बोकिलांची 'सरोवर' नावाची एक लघुकादंबरी आहे स्त्री-पुरुष मैत्री या विषयावर. मी दिवाळी अंकात वाचली होती, नंतर पुस्तकही आलंय. सुंदर आहे. 'लंचबॉक्स'ची आठवण तर झालीच.

वावे>>+१
जमले तर दोस्तोव्हस्कीची "White Nights"अवश्य वाचा. त्यावरही असंख्य पिक्चर झाले आहेत. मी 8 a m बघितलेला नाही. पण स्टोरी लाइनची कल्पना आहे. माझ्या मते दोघांच्या background कथा टाकल्याने मुख्य थीम वरून लक्ष विचलित होते. बहिणीच्या परीस्थिनीकडे दुर्लक्षून इरा स्वतःच्या भावनेत मश्गुल झाली आहे हे अजिबात पटले नाही. अस्मितानेच आधी लिहिलेल्या मिअक्राची आठवण झाली.
दोघांनाही थेरपीची नितांत गरज आहे.
काही चुकले असेल तर अवश्य करेक्ट करा.

वावे, पोस्ट कळाली. पण हे 'ह्यूमन टू ह्यूमन' नाते असून, यात योगायोगाने ते स्त्री-पुरुष आहेत असे वाटले. एक दृश्य आहे ज्यात तिचा तोल जाऊन ती त्याच्या कवेत पडते जो मला पूर्णपणे अनावश्यक वाटला होता. मैत्री म्हटले तरी ही कथा फक्त पंधरा दिवसांत घडते व संपते. आकर्षण असेलच असे म्हटले तरी असे नाते याआधी हिंदी चित्रपटात बघितल्याचे आठवत नाही.

मिलाक्राची आठवण झाली. Happy
इराची थेरपी यातच होते, प्रीतम थेरपीच्या दिशेने पावलं उचलतो असं स्पष्ट दाखवलेलं आहे. व्हाईट नाईटस् आणि सरोवर दोन्हीही कादंबऱ्यांची नोंद घेतली आहे. मी काहीही वाचत नाही हल्ली, ते सोडा. प्रयत्न करेन.

बहिणीच्या परीस्थिनीकडे दुर्लक्षून इरा स्वतःच्या भावनेत मश्गुल झाली आहे हे अजिबात पटले नाही.
>>>
यावरून एकदा तिच्यात व बहिणीत वाद झालेला दाखवला आहे. पण इरालाही मोह होणे साहजिकच आहे असे वाटले.

स्पॉयलर अलर्ट - प्रीतमचे सगळे कुटुंब अपघातात निवर्तले आहे. त्याचे डिप्रेशन क्लिनिकल पेक्षा सिच्युएशनल आहे. तो यानंतर किमान थेरपीसाठी तयार होतो ही खूप मोठी गोष्ट या सहवासाने घडते.
धन्यवाद. Happy

मिलिंद बोकिलांची 'सरोवर' नावाची एक लघुकादंबरी आहे स्त्री-पुरुष मैत्री या विषयावर. मी दिवाळी अंकात वाचली होती, नंतर पुस्तकही आलंय. सुंदर आहे. >>>> वावे , दे टाळी. मी आत्ताच वाचली , जुन्या दिवाळी अंकातील ही गोष्ट. पुण्याला गेले होते तेव्हा. २०१६ ( बहुतेक) च्या मौज मध्ये. मला हे परिक्षण वाचताना सारखी त्या गोष्टी ची आठवण येत होती. पण गोष्टी चं नाव आठवेना.
अस्मिता मी बघेन हा पिक्चर, आणि आवडेल ही. तुझं परिक्षण आवडलं.

Pages