मी रेल्वेत चढलो. पुण्यासारख्या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म कसा असेल? पण इथे तर एकच प्लॅटफॉर्म दिसतोय. असो. जनरलच्या डब्यात एक चांगलं असतं, कमी पैशात जाता येतं, बुकिंग वगैरेची झंझट नाही. जवळपासच्या गावात उतरणारेच जनरलच्या डब्यात चढतात. जनरलच्या डब्यात असते तशी भरपूर गर्दी ह्या डब्यातही होती. रेल्वे हडपसरला थांबली. हडपसरला रेल्वे स्टेशन आहे? हे माहित नव्हतं. बरेच लोक चढले, काही उतरले, डबा गच्च भरला होता. एक मुलगा दिसला, माझा भाचा शिवम सारखा, तेवढंच वय असावं १९-२०. त्याने लाल फुल टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. पायात पांढरे स्पोर्ट शूज होते. कोणत्या ब्रँडचे कळले नाही. बराच वेळ सिगारेट फुकत होता, त्याची सिगारेट संपत नव्हती, बहुतेक दुसरी पेटवली असावी. नंतर तिसरीही पेटवली. रेल्वे जात होती, थांबत होती, माणसं चढत-उतरत होती.
गर्दीत आवाज झाला, एका माणसाला लोक मारू लागले. हे जनरलच्या डब्यात नेहमीचं असतं, एखादा बेवड, भिकारी लोकाना आरास देत असतो. काही तृतीयपंथी अश्लीलताही करतात. लोक घाबरून पैसे देतात. मला फक्त एक जाडजूड बूट घातलेला माणूस एका फाटक्या माणसाला कंबरेत जोरात लाथ घालताना दिसला. फाटका माणूस जोरात आदळला. काय झालं? मी एकाला विचारलं. बीडीने चटके देत होता, कळलं. मी थोडं पुढे सरकून पाहिलं, एक फाटका माणूस होता, कपडे मळलेले फूल पॅंट कापून हाफ केलेली, ठेंगणा, चाळीशीतील असावा, बहुतेक मातीकाम करत असावा एखाद्या बिल्डरकडे. सोबत एक स्त्री होती, साडी घातलेली, मराठी वाटत नव्हती कारण मराठी स्त्रिया डाव्या खांद्यावरून साडी घेतात ना? आणि दोन वर्षांची मुलगी होती हिरवा फ्रॉक घातलेली. बीडी की सिगारेटने तो चटके देत होता, त्याच्या बायकोला की मुलीला ते कळले नाही. त्यामुळे पब्लिकने त्याला धुतले होते. बरं झालं, मारलं भो*डीच्याला.
त्याची बायको मतिमंद सारखी वाटत होती, नवऱ्याला धुताय ह्याचं तिला काहीही सोयरसुतक नव्हतं, खाली बसून ती एकटक शून्याकडे पाहत होती, हातावर जखमा होत्या. हाच त्याच्या बायकोला मारत असावा, त्याचा टॉर्चरने ती वेडी झाली असावी. बिचारी. त्या मुलीला आता त्या शिवम सारख्या दिसणाऱ्या मुलाने कडेवर घेतले होते. दरवाज्यात उभे राहून तो तिला खेळवत होता. एका हातात सिगारेट आणि एका हातात ती मुलगी. धूर सोडल्यावर ती धुराकडे पाहायची, हसायची, दरवाजातून येणाऱ्या हवेने तिचे केस भुरू भुरू उडत होते. त्या मुलाचे गाळ तिने दोन्ही हातात घेतले होते. चांगलीच रमली होती ती त्याच्याजवळ. रेल्वे थांबत होती, लोक चढत-उतरत होते. बराच वेळ झाला. फाटका माणूस मुलीला मागायला गेला, पण त्याने त्याच्यावर डोळे ताणले. तो गुपचूप येऊन खाली बसला. मुलगी त्याचीच असावी का? मला शंका आली. रेल्वे एका लयीत चालत होती त्या लयीवर उभे लोक डूलत होते, बसलेलेही डूलत होते.
पुढच्या स्टेशनवर तो मुलगा उतरला भरभर चालू लागला. फाटक्या माणसाने त्याच्या बायकोचा हात धरला नी उतरला. ती शून्यातच पाहत उतरली. तिची ममता काही जागत नव्हती. ती मनातून खूप आधीच मेली असावी. आता फक्त तिची बॉडी उरलेली होती. तो मुलगा झटपट चालू लागला, मुलगी त्याच्या कडेवरच होती. स्टेशन छोटे होते, लगेच बाहेर पडला. फाटक्या माणसाने बायकोला एका जागी बसवले, बाकडा असूनही त्याने तिला बाकड्याला टेकवून खाली बसवले. बाकड्यावरही बसवू शकत होता ना?? पण कुणीतरी येऊन शुक शुक करुन उठवेल मग उठून खाली बसण्यापेक्षा आधीच खाली बसलेलं काय वाईट? असा त्या दोघानी विचार केला असावा. त्या मुलाच्या मागे तो दोन्ही हात पुढे करून चालू लागला. बोलत काहीच नव्हता फक्त मुलगी मला दे अस सांगत असावा. तो लंगडत चालत होता, पब्लिकने चांगलेच धुतले होते. ज्या बाजूला तो आदळला तोच त्याचा उजवा भाग दुखत असावा.
मी उतरलो, फाटक्या माणसासोबत चालू लागलो, तो मुलगा झपाझप चालत होता. स्टेशनच्या बाहेर पडला नी निघाला. गाव छोटं होतं, तो रस्त्याला लागून सरळ निघून गेला. लंगडत चालणाऱ्यामुळे माझाही स्पीड कमी झाला होता, शेवटी ह्या माणसाला असाच सोडून मी झपाझप निघालो. अंतर बरंच पडलं होतं दोघात. बराच वेळ चालल्यावर दोन रस्ते होते. डावी कडे एक मोठा फाटा फुटला होता. तो मुलगा सरळ गेला की डावीकडे गेला? विचारायला तिथे कुणी नव्हते, कोपऱ्यावर एका बिल्डिंगचे बांधकाम चालू होते. तिथेही कुणी नव्हते, तिथे एक बोर्ड होता त्यावर “एरंडवने” असे लिहिले होते. एरंडवने तर पुण्यात आहे ना? मग इथे कसेकाय लिहिलेले? बहुतेक ह्या गावचे नाव एरंडवने असावे किंवा बिल्डर एरंडवनेचा असावा. आपल्याला काय? मी सरळ निघालो, बराच चाललो पण कुणी दिसलं नाही. परत मागे वळलो, त्याच फाट्यावर आलो, तो पर्यंत फाटका माणूसही मागे चालत आला होता. माझ्याकडे आशेने पाहत होता. आम्ही दोघे डावीकडच्या फाट्यावर वळलो. बरच चाललो. बाजूच्या झाडीझुडूपातून कुत्र्याचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. आम्ही आत घुसलो. तिथे कडा होता, बाजूला शंभर-दीडशे फूट खाली तळे होते. कड्याच्या कोपऱ्यावरच तो लाल शर्टवाला शिवम सारखा दिसणारा मुलगा खाली झोपलेल्या कुत्र्याचा गळा प्राणतिडकीने दाबत होता, कुत्रं सुटायचा प्रयत्न करत होतं. मी एक मोठा एका हातात मावेल असा दगड उचलला, मला पाहून फाटक्या माणसानेही दगड उचलला. मी त्या मुलाला कुत्र्याला सोड म्हणून सांगितले तो सोडत नव्हता. मी पुन्हा विचारले, “मुलगी कुठेय?” त्याने माझ्याकडे पाहिले, डोळे लालबुंद होते. मला बोलला, “मै इस भेंचो* को बोला था, मै आऊ तब तक बच्ची का ध्यान रख. पर इसने बच्ची को नीचे फेक दिया.” मला संताप आला, मी सर्व ताकदीने माझ्या उजव्या हातातला दगड त्याला मारून फेकला, “टक्क” असा आवाज आला, दगड त्याच्या डोक्यात लागला होता. तोल जाऊन तो खाली तळ्यात पडला. हे पाहून तो फाटका माणूस कड्याच्या कोपऱ्यावर आला आणी त्याने खाली उडी मारली. मुलगी त्याचीच असावी.
मी घाबरलो. बाजूला एक म्हातारी मला पाहत होती, बोलली, “मला पैसे दे.” मी पळत सुटलो. ती म्हातारी जोरजोरात ओरडू लागली, मी प्राणपणाने धावू लागलो, तीन लोक मेले होते, रेल्वेच्या सीसीटीव्हीत मी फाटक्या माणसासोबत आलो असेन, म्हातारीने मला पाहिलंय. पोलीस मला जास्तीत जास्त ४ दिवसात हुडकतील, ह्या चार दिवसात मला देश सोडून पळावे लागेल, कुठे जाणार आहे मी? अमेरिका की इंग्लंड?? बहुतेक इंग्लंडच, पासपोर्ट वर की डुप्लिकेट पासपोर्टवर की घुसखोर म्हणून? तिथे जाऊन मी पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं काम करणार….टक्कल करणार आणि मिशी वाढवणार…. पळताना माझ्या मनात फक्त हेच विचार होते.
क्रमशः आहे का?
क्रमशः आहे का?
नाही.
नाही.