प्रयोजन भाग ३

Submitted by पर्णीका on 11 November, 2024 - 20:17

।।३।।

“प्रणाम वासुदेव”

“प्रणाम द्रुपद नंदन. आपण मला कसे ओळखलेत? आज आपण पहिल्यांदा भेटतो आहोत.”

“आपल्याबद्दल, माहिती नाही असा ह्या आर्यावर्तात कोण असेल वासुदेव? त्यातुनही काही शंका उरली असती तर आपल्या मुकुटातल्या मोरपिसाने ती आपोआप दूर झाली असती.”

“पांचाल नरेशांची तीन्ही मुले कुशाग्र बुद्धीची आणि संभाषण चतुर आहेत.

काय झाले आपण हसलात?”

“आपण माझी गणना पांचालनरेशांच्या मुलांमध्ये केली, पण त्यांना स्वतःला ते मान्य नाही ह्या विरोधाभासाचे हसु आले वासुदेव.”

“क्षमा करा, तुम्हाला ह्या दु:खद वस्तुस्थितीची जाणीव करुन देणे हा माझा उद्देश नव्हता कुमार.”

“वासुदेव तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, कृपा करून माझ्यासाठी राजपुत्र किंवा द्रुपद नंदन हे संबोधन वापरु नका. पांचाल नरेश मला त्यांचा मुलगा मानत नाहीत त्यामुळे ही दोन्ही संबोधने धारण करण्याचा अधिकार मला नाही. असो, एक प्रश्न विचारू? ह्या उपवनात आपली अचानक गाठ पडली ती निव्वळ योगायोगाने की…?”

“तुम्ही खरोखरच फार चतुर आहात. तुम्ही आत्ता ह्या उपवनात भेटाल हे मला महाराणींनी सांगितले.”

“मातेला माझी फार काळजी वाटते आणि मी ह्यातुन बरा होईन ही भाबडी आशा सुद्धा. तिला वाटते की मी माझ्या कडून अपेक्षित असलेली कर्तव्ये पार पाडायचा प्रयत्न केला तर हळुहळू ह्यातुन बाहेर पडीन. कधीतरी पुर्ण बरा होईन आणि पांचाल नरेश मला त्यांचा पुत्र म्हणून स्वीकारतील. माझं दुर्दैव हे आहे की तिची सपशेल निराशा होणार आहे ही जाणीव सतत माझी सोबत करते. तुम्ही ह्या गुंत्यात उगाच अडकलात वासुदेव. आपल्याला झालेल्या अकारण कष्टांबद्दल मला क्षमा करा.”

“ह्या विश्वात अकारण काहीच घडत नाही आर्य. अगदी वृक्षाचे एखादे पान देखील जेव्हा हलते तेव्हा त्यापाठी जग्गनियंत्याची काहीतरी योजना असते. तुम्ही विचारांच्या भोवऱ्यात अडकल्या सारखे दिसताय. मी इथे महाराणींच्या इच्छेला मान देऊन आलो आहे हे खरंय. पण त्यांच्या मनातल्या हेतुची पुर्तता करण्यासाठी आलेलो नाही.”

“मग आपल्या भेटीचे प्रयोजन काय आहे वासुदेव? कृपा करून मला सांगा. तुमच्या मुखावर विलसत असलेले हे मंदस्मित मी ऐकले होते त्यापेक्षा कितीतरी अधिक संमोहक आहे. पण माझ्या मनातील कुतुहल त्या संमोहनाचा प्रभाव देखील निष्प्रभ करतेय.”

“तुम्ही संमोहनाची उपमा वापरलीत हा एक विलक्षण असा योगायोग आहे आर्य. मी पांचालला यायला द्वारकेतुन निघालो, आणि वाटेत मला माझे योगशास्त्राचे गुरुदेव, घोर अंगिरस भेटले. आचार्यांनी मला आद्य अंगिरस ऋषींनी अथर्ववेदात रचलेल्या श्लोकांबद्दल सांगितले.”

“अंगिरस ऋषींनी शत्रुचा पराभव करण्यासाठी काही मंत्र ह्या श्लोकांच्या स्वरुपात रचले, बरोबर ना वासुदेव?.”

“हो शत्रु चा पराभव व्हावा हा उद्देश आहे त्यांच्या रचनांचा. पण मानवाचा सगळ्यात मोठा शत्रु कोण हे माहिती आहे तुम्हाला आर्य?

मानवाच्या मनात त्याचे सगळ्यात मोठे शत्रु वास करतात. त्यांच्यावर विजय मिळवणे हाच मनुष्याचा सगळ्यात मोठा विजय आहे. सगळे द्रष्टे ह्याच विजयाचा मार्ग शोधताहेत. आद्य अंगिरस ऋषींचा उद्देश देखील हाच होता.“

“आपल्या वाक्यातील गहन आशयाचे आकलन मला पुर्णपणे झाले आहे असे मला वाटत नाही, वासुदेव.”

“चिरंतन सत्याचे आकलन ह्या उद्दिष्टापर्यंत पोहचण्यासाठी कोऽहम चा शोध हे मानवी जीवनाचे प्रयोजन आहे आर्य. अहंकार, क्रोध, भय, चिंता, अपराधगंड अश्या नकारात्मक भावना त्या प्रवासातील अडथळे आहेत. ह्या अडथळ्यांना पार केल्याखेरीज कुणीही हे ईप्सित ध्येय गाठू शकणार नाही. त्यामुळे ह्या भावनांनी मनुष्याच्या मनावर ताबा मिळवणे हाच मनुष्याचा सगळ्यात मोठा पराभव आहे.”

“काही व्यक्ती इतक्या पराकोटीच्या दुर्दैवी असतात की आद्य अंगिरस ऋषींसारख्या महात्म्याच्या रचना देखील त्यांना मदत करु शकतील असे मला वाटत नाही वासुदेव.”

“तुमच्या विवाहाच्या अनुषंगाने घडत गेलेल्या घटनांमुळे तुमच्या मनात उत्पन्न झालेली लज्जा, महाराज दृपदांच्या मनात निर्माण झालेला क्रोध आणि महाराणींच्या मनात कायमस्वरूपी वास्तव्यास आलेली चिंता ह्या सगळ्यांचे कारण तुम्ही स्वतःला मानता. म्हणून जवळजवळ स्वतः ला एकांतवासाची शिक्षा दिली आहे तुम्ही. खरे ना आर्य?”

“खरे आहे वासुदेव. आपण अंतर्यामी आहात हे मी ऐकले होते. आज त्याचा प्रत्यय घेतला.”

“मी अंतर्यामी नाही आर्य, मी सजग आहे. त्यामुळे इतरांच्या मनातील भावनांच्या‌ कल्लोळांचे मला आकलन होते. पण कुणाच्याही मनातले विचार मी जाणू शकत नाही. मी इथे आल्यानंतर लगेचच महाराणींनी माझी भेट घेतली. त्यांच्या कडुन मला बऱ्याच गोष्टी समजल्या. काही आपल्याशी बोलताना जाणवल्या एवढेच.”

“हे सगळे समजुन घेऊ शकणारे माझ्या मातेव्यतिरिक्त तुम्हीच आहात, वासुदेव! स्वतःशीच चालेल्या ह्या युद्धात मी रोज घायाळ होतो. त्या घावांमुळे होणाऱ्या वेदना मला आता सहन होत नाहीत. पण ह्या युद्धात विजय मिळवणे माझ्या प्राक्तनात नाही. किमान माझ्या या पराभुत अस्तित्वाचा काही काळासाठी का होईना माझ्या पित्याला विसर पडावा म्हणून मी त्यांच्या समोर येण्याचे टाळतो. त्यांच्यासाठी मी एवढेच करु शकतो.”

तुम्हाला ह्या धुमश्चक्रीतुन बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा ही त्या जगन्नियंत्याची इच्छा आहे, आर्य. मी महाराज दृपदांचे आमंत्रण स्वीकारुन इथे आलो, वाटेत माझी आचार्य घोर अंगिरसांशी भेट झाली. हे सगळे त्याच्याच योजनेनुसार घडले आहे. मी केवळ एक सेतु आहे, आर्य. आपल्या भेटीचे प्रयोजन तुम्हाला गुरुदेवांच्या कृपाछत्राखाली आणणे हे आहे.

Group content visibility: 
Use group defaults