२४ एप्रिल २०२४
काल ठरवल्याप्रमाणे सकाळी ७ - ७। ला निघालो. लवकरच लक्षात आलं की कालच्यासारखी धाप आज लागत नाहीये. Acclimatization झालं बहुतेक. देवाची कृपा!
मनांग गावातच एक पोलीस चेकपोस्ट होतं. हवालदारानी थांबवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, नाही तर मी आपल्याच तंद्रीत जात होतो. नेहेमीप्रमाणे परमिट दाखवलं. नोंद झाली. त्याच्याकडून कळलं की आता पुढचं चेकपोस्ट एकदम मुक्तिनाथ नंतर. असो.
हळू हळू गावाबाहेर पडलो. लगेच रस्त्याला फाटा होता. डावीकडचा रास्ता खांगसार, श्री खरका मार्गे तिलीचो सरोवराकडे जातो. मी उजवी बाजू घेतली. तीव्र चढ सुरु झाला पण सिमेंटचा गाडी रस्ता होता. मी तर वाचलं होतं की मनांगच्या पुढे गाडी रस्ता नाही. पण आहे. साधारण अर्धा किमी अंतरावर एक छोटं गाव (टांकी मनांग) आहे तिथपर्यंत. त्यानंतर मात्र केवळ पायवाट. वाहनं अजिबात नाही. मस्त मजेत जात होतो.
उंचावरून खाली मर्स्याङ्दी नदी तर दिसत होतीच, पण उत्तरेकडून एक दुसरी नदी येऊन तिला मिळत होती तीपण दिसायला लागली. संगम पण. आजची यापुढची पूर्ण वाट याच नदीच्या बाजूनी होती. ही मर्स्याङ्दीची उपनदी आहे, पण Google Maps मध्ये हिचं पण नाव मर्स्याङ्दी असंच लिहिलं आहे. सोयीसाठी आपण तिला उपनदी म्हणू.
वाट उपनदीच्या काठानी होती असं मात्र नाही. कारण उपनदी राहिली खाली दरीत. आणि वाट १०० ते २०० मी उंचावरून. पण अतिशय सुंदर वाट. वाटेल तेव्हा थांबावं. दरीत वाहणाऱ्या नदीकडे बघत बसून रहावं. वाहत्या पाण्याचा बारीक आवाज. बाकी काही नाही! संपूर्ण ट्रेकमधला हा टप्पा सर्वात सुंदर आणि आनंददायी होता म्हणलं तरी चालेल.
उपनदीला उजवीकडून एक उपउपनदी येऊन मिळत होती. तिच्यावर तारांचा पूल. तो ओलांडल्यावर दरीची खोली थोडी कमी झाली. एका वळणानंतर आजचं मुक्कामाचं ठिकाण दिसायला लागलं. थोड्याच वेळात पोचलो तेव्हा फक्त ११ वाजले होते. हॉटेल याक खरका. https://maps.app.goo.gl/yrU4BkPjV2Zf9Et27
हे खरं तर एका कुटुंबाचं घरच. पण ट्रेकर्ससाठी आणखी खोल्या बांधल्या होत्या. मी त्यांच्याकडे पोचणारा आजचा पहिलाच पाहुणा होतो. मालकीणबाई मोबाइल फोनवर काही तरी बघत बसल्या होत्या. आणि त्यांचा मुलगा मोबाइल “मला पाहिजे” म्हणून रडत होता. या ट्रेक मार्गावरचं हे एक वैशीष्ट्य. लहान-मोठे समस्त गावकरी जरा मोकळा वेळ मिळाला की लगेच मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसतात.
मनांग सोडल्यानंतर मुक्तिनाथ पर्यंत कुठेही फोन चालत नाही. पण वायफाय इंटरनेट मात्र सगळीकडे उपलब्ध. या लोकांनी बहुतेक केबल टाकून ठेवली असेल. ट्रेकर्ससाठी खास सुविधा म्हणून हे केलं गेलं असणार. पण लाभ (?) गावकऱ्यांनाही झालाच की.
तर मी तिथे गेल्यामुळे त्या पोराला मोबाइल मिळाला. कारण बाई मला माझी खोली दाखवण्यासाठी उठल्या. छोटीशी खोली. थंडगार. बाई लगेच जेवणाचं काय विचारत होत्या. माझं तर उत्तर तयारच होतं: दाल भात. पण मी जेवायला १२ वाजता येईन असंपण सांगून टाकलं. तासभर आराम केला. खरं तर आज विशेष थकवा आलेला नव्हता. पण पाठ टेकल्यावर छानच वाटलं. पण गारेगार. ब्लॅंकेट ओढण्याशिवाय पर्याय नव्हता.
तासाभराने डायनिंग हॉलमध्ये परत गेलो. वायफाय फक्त इथेच चालत होतं, खोलीत नाही. व्हॉट्सअँपवर संदेशांची देवाण घेवाण होईपर्यंत जेवण आलं. गरमागरम. काचेच्या खिडकीतून समोर डोंगर आणि दरीत सुंदर नदी दिसते आहे. अजून काय हवं माणसाला? व्वा. मजा आली.
जेवण होईपर्यंत आणखी पाहुणे हळू हळू आले. अदोनीस आणि सोफिया हे एक जोडपं. अदोनीस ग्रीक तर सोफिया डच होती. एक लाटवियन कुटुंब. दोन मलेशियन महिला आणि त्यांचा गाईड आणि पोर्टर. या दोघी मलेशियन होत्या, पण मुस्लिम नव्हे. चिनी वंशाच्या बौद्ध होत्या. आणि केवळ ट्रेक नव्हे तर मुक्तिनाथ दर्शन हापण त्यांचा उद्देश होता. मग पूर्ण दिवस आम्ही सगळे तिथेच गप्पा मारत बसून होतो. थोड्या वेळाने तर मालक, मालकीणबाई आणि त्यांचा छोटा पण तिथेच येऊन बसले. त्याचं साधं कारण हे की फक्त डायनिंग हॉलच उबदार होता, बाकी इतरत्र अती थंडी.
दोन्ही मलेशियन महिलांना विरळ हवेचा त्रास होत होता. म्हणजे तीव्र डोकेदुखी. खरं तर त्या दोघी diamox घेत होत्या. अल्टीट्यूड सिकनेस टाळण्यासाठी या औषधाचा उपयोग होऊ शकतो. पण तरी त्या त्रस्त होत्या. सोफिया पण diamox घेत होती. तिला अजून तरी काही त्रास नव्हता. मला आणि इतरांना सुदैवानी काही त्रास होत नव्हता (थंडी सोडल्यास). मलेशियन महिलांच्या नेपाळी गाईडकडे pulse oximeter होता. त्याने त्या दोघींची ऑक्सिजन पातळी मोजली. ८०. म्हणूनच तुमचं डोकं दुखतं आहे, उद्या बरं वाटलं तरंच आपण पुढे जायचं असं त्याने दोघीना बजावलं.
मग त्या गाईडनी सगळ्यांचीच ऑक्सिजन पातळी मोजायची टूम काढली. सगळ्यांची ८५ ते ८७ होती. माझी ८५. ते पाहून मी खरं तर हादरलो होतो. ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली जाणे म्हणजे गंभीर गडबड असा माझा समज होता. पण गाईडनी सगळ्यांची ऑक्सिजन पातळी उत्तम आहे असं जाहीर केलं तेव्हा जरा हायसं वाटलं. त्याच्या मते आमचं acclimatization उत्तम रीतीने होत होतं आणि आम्ही सगळे थोरोंग ला सहज पार करू अशी त्यानी खात्री व्यक्त केली. म्हणलं तुझ्या तोंडात साखर पडो.
लाटवियन कुटुंब उद्या इथून निघून थेट हाय कॅम्पला मुक्काम करणार होतं. अदोनीसला हाय कॅम्प की थोरोंग फेडी हा प्रश्न पडला होता. शेवटी त्याला माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी पण उद्या थोरोंग फेडीलाच मुक्काम करायचं ठरवलं.
सगळ्यांचा उद्याचा कार्यक्रम ठरला. जेवणं झाली. आणि मग सगळे एकमेकांना good night म्हणून आपापल्या खोलीत गेलो. आणि गार पडलो.
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग १
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग २
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ३
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ४
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ५
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ६
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ७
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ८
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ९ (माहिती)
जरा गंमतीदार आहे पण काही काही
जरा गंमतीदार आहे पण काही काही वेळा ऑक्सिजन पातळी कमी दाखवत असले तर हातावर हात चोळून परत एकदा तपासायचे; पातळी वाढलेली दिसते.