२२ एप्रिल २०२४
नेहेमीप्रमाणे पाच वाजता जाग आली तरी साडेपाचपर्यंत पडून राहिलो. मग उठून बाहेर आलो. बघतो तर अन्नपूर्णा २ शिखर सोनेरी रंगात चमकत होतं. शिखरावर दिवसाचे पहिले सूर्यकिरण आत्ताच पोचले होते. बर्फाच्छादित शिखरावर सूर्योदय होत असल्याचे फोटो बघितले होते. पण प्रत्यक्षात मात्र आज पहिल्यांदाच. फोटोपेक्षा किती तरी जास्त सुंदर!
म्हणजे अप्पर पिसांगला आलो त्याचा फायदा झालाच शेवटी! १० मिनिटं नुसतं बघतच उभा राहिलो. हॉटेल मालक उठून स्वयंपाकघरात खुडबुड करत होता. त्याला या दृश्याचं कौतुक नाही हे मी समजू शकतो, कारण त्याला हे रोज दिसतं. पण हे सौन्दर्य बघायला मी सोडल्यास एकपण ट्रेकर जागा नव्हता. निदान बाहेर गच्चीत आलेला नव्हता. १० मिनिटांनंतर मीपण गारठलो म्हणून शेवटी रेस्टॉरंटच्या आत गेलो आणि काचेतून बघत बसलो. तेवढ्यात हॉटेल मालकानं चहा आणून दिला. सुरेख केला होता. दिवसाची सुरुवात काय भारी झाली!
मग आवरून कालसारखाच सव्वासात वाजता नाश्ता करून निघालो. वरचे ट्रेकर्स वरच्या रस्त्यानी जातात नी खालचे खालच्या. मी मात्र वरून खाली आणि मग खालच्या रस्त्यानी जाणार होतो. अप्पर पिसांग ते लोअर पिसांग रस्ता म्हणजे थोडी पायवाट आणि थोड्या पायऱ्या. नाही म्हणलं तरी शंभरेक मीटर उतरायचं होतं. जाताना वाटेत एक कुत्रं गुरगुरलं पण अंगावर नाही आलं. इथून कुणी ट्रेकर्स सहसा जात नाहीत म्हणून त्याला अनोळखी लोकं बघायची सवय नव्हती बहुधा. असो.
शंभर मीटर उतरून नदीपाशी आलो. पुन्हा एक झुलता पूल ओलांडून लोअर पिसांग. आता मी पुन्हा नदीच्या दक्षिण किनाऱ्याला आलो.
नेपाळ जरी हिंदू बहुसंख्य देश असला तरी इथे या भागात बौद्ध लोक जास्त. तिबेट शेजारीच असल्यानी तिथल्या संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामुळे इथे बहुतेक गावांमध्ये बौद्ध मंदिर / मठ असतोच. गावाच्या वेशीजवळ मणीचक्र असलेली एक भिंत असते. जणू काही रस्ता दुभाजक असल्यासारखी. आपण जाताना नेहेमी त्याच्या डाव्या बाजूनेच जायचं. आणि शक्य असल्यास उजव्या हातानी मणीचक्र फिरवत फिरवत जायचं. असं केल्यानी प्रार्थना म्हणल्याचं पुण्य लागतं म्हणे. ही प्रथा मी प्रत्येक गावात इमाने इतबारे पाळली. तसाही रोज निघताना गणपती बाप्पा मोरया म्हणूनच निघतो. मग आणखी बौद्ध प्रार्थना म्हणल्याचं पुण्य अनायसे मिळतंय ते का सोडा? तर तसंच मणीचक्र फिरवत लोअर पिसांगमधून बाहेर पडलो.
पुढे विशेष काही न घडता मी तासाभरात एका छोट्या खिंडीत पोचलो.
https://maps.app.goo.gl/xX8wVGPLPo7mjDua9
छोटासा स्तूपही होता तिथे. थोडा वेळ बसलो. वरच्या रस्त्यापेक्षा सोपा असला तरी हा पण रस्ता दमवणाराच होता. लोअर पिसांगपासून इथपर्यंत २००-२५० मीटर उंच आलो होतो. त्यातही सुरुवातीला बराचसा रस्ता सपाट होता पण शेवटच्या १५ मिनिटांनी दमवलं. चहा मिळाला असता तर आवडलं असतं. पण तशी काही सोय नव्हती. नुसताच बसलो थोडा वेळ. इथेच आणखी एक एकांडा शिलेदार भेटला. म्हणजे नुसता दिसला आणि हसला. तोही तिथेच विश्रांती घ्यायला थांबला. युरोपिअन वाटत होता पण आपल्यासारखाच छान मांडी घालून जमिनीवर बसला. हाच पुढे रोज भेटत राहिला पण कधीच बोलला नाही. माझ्याशी नाही आणि इतर पण कुणाशी नाही. मुका होता की काय कोण जाणे. पण प्रत्येक वेळी भेटला की गोड हसायचा. हसो. असो.
जरा गार झाल्यावर मग निघालो. त्यापुढे उतार होता. एका वळणापाशी दिसलं की गाडीरस्ता सोडून एक पायवाट डावीकडे जातेय. शॉर्टकट असेल असे गृहीत धरून मी वळलो. कालच्यासारखं पाईन वृक्षांचं जंगल होतं पण जरा विरळ होतं. समुद्रसपाटीपासून जसं जसं उंच जाऊ तशी झाडी विरळ होते असं सिक्कीममध्ये पण बघितलं होतं. पण तरी कंटाळवाण्या गाडीरस्त्यापेक्षा ही वाट छान होती. १० मिनिटात उतार उतरून पुन्हा गाडीरस्त्याला लागलो. थोड्याच वेळात लांबवर घरं दिसू लागली. गाव. म्हणजे चहा मिळणार! त्या विचारानं पावलं झपझप पडू लागली आणि बघता बघता मी हुमदे गावात प्रवेश केला. लगेचच उजवीकडे एअरपोर्ट हॉटेल दिसलं: https://maps.app.goo.gl/bpPVxrzKVdYZ7rKo7
खरं तर घरच होतं. पण चहा उत्तम मिळाला!
मनांगला एअरपोर्ट आहे असं ऐकून माहिती होतं. पण तो एअरपोर्ट खरं तर इथे हुमदे गावात आहे. म्हणून हॉटेलचं नाव एअरपोर्ट हॉटेल. इथून मनांग अजून निदान ८ किमी दूर असेल. तरी याला मनांग एअरपोर्ट का म्हणतात कोण जाणे.
चहा आणि वॉशरूम ब्रेक झाल्यावर एकदम ताजातवाना झालो. आजची अर्धी चाल झाली होती. घाई करायचं काहीच कारण नव्हतं. निवांत चालत हुमदे गावातून बाहेर पडलो. तंद्रीत चालत असताना अचानक हॅलो असं कानावर पडलं. उजवीकडे पोलीस चेकपोस्ट होती. तिथला अधिकारी बोलवत होता. ट्रेकर्सना जो परवाना घ्यावा लागतो (Annapurna Conservation Area Permit अर्थात ACAP) तो असा अधे मध्ये तपासतात. आणि अमुक ट्रेकरनी तमुक गाव किती तारखेला किती वाजता पार केलं अशी नोंद पण ठेवतात. कुणी बेपत्ता झाला तर तपास करायला बरं.
ट्रेकचं प्लॅनिन्ग करताना इंटरनेटवर माहिती वाचली होती. काही जणांनी लिहिलं होतं की या ट्रेकसाठी गाईड घेणं कायद्याने बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात बहुतेक वेळा पोलीस बिना गाईड ट्रेकर्सना सुखेनैव जाऊ देतात अशी पुस्ती पण त्यांनीच जोडली होती. एकटाच ट्रेकर असेल तर मात्र ते अडवू शकतात म्हणे. पण मी जेव्हा ACAP साठी अर्ज भरला त्यात तर मी स्वच्छ लिहिलं होतं की मी एकटाच आहे. गाईड नाही. पोर्टर पण नाही. तरी मला परवाना मिळाला त्याअर्थी मला कुणी अडवणार नाही असा माझा समज होता. अपेक्षेप्रमाणे त्या अधिकाऱ्यांनी विचारलंच की मी एकटा कसा. पण सुदैवानी मी एकटा असण्याला त्यांची हरकत काहीच नव्हती.
त्यांना धन्यवाद देऊन चालू लागलो. पुढे आणखी एक छोटी खिंड ओलांडल्यावर मात्र झाडी खूपच कमी झाली. नाही म्हणायला काही ठिकाणी सफरचंदाच्या बागा मात्र होत्या. एव्हाना सूर्य वर आल्यामुळे गरम वाटायला लागलं होतं.
इथे बघावं तिकडे मातीचा रंग. पुढचा एक तास मला एकपण मनुष्यप्राणी दिसला नाही. थोड्या वेळानी दूरवर गाव दिसायला लागलं. तेच मनांग असावं असं वाटलं. पण तिथे पोचल्यावर कळलं की ते मुंगजी गाव आहे. आणखी पुढे अजून एक गाव दिसत होतं, पण तेसुद्धा मनांग नव्हतं - ते होतं भ्राका. भ्राकाच्याही पुढे अजून एक गाव दिसत होतं ते मनांग होतं म्हणे. म्हणून मग इथे मुंगजी गावात लंच ब्रेक घेणं आवश्यक आहे असं मी ठरवलं. झंबाला हॉटेल: https://maps.app.goo.gl/mBsnxuyepHiuytBt9
हॉटेल म्हणजे घरगुती अगदी. मी गेल्यावर मावशींनी भात शिजवला. त्यामुळे माझी थोडी विश्रांती झाली.
आता पुढचं गाव भ्राका. आणि त्यानंतर मनांग. काही हरकत नाही. आत्ताशी जेमतेम १२ तर वाजलेत. जेवल्यावर आणखी दहा मिनिटं निवांत बसलो आणि मग निघालो. आता पुन्हा नदी माझ्या डावीकडे होती. थोड्या वेळानी नदी ओलांडायला पूल होता. पण ती वाट मिलारेपा गुहेकडे जाणारी होती. माझी वाट सरळ होती.
या भागातील डोंगर मुंग्यांच्या वारुळासारखे दिसत होते.
लवकरच भ्राका आलं. या गावात २-३ टी हाऊसेस / हॉटेल्स दिसली. उजवीकडे थोड्या उंचावर एक बौद्ध मठ दिसत होता. इथूनच उजवीकडे आईस लेक कडे वाट जाते अशी पाटी होती. पण माझी वाट सरळच होती. आता मनांग गाव स्पष्ट दिसू लागलं. रस्त्याला पुन्हा एक फाटा होता: डावा रस्ता खान्गसारला जातो, उजवा मनांगला. डावा रस्ता नदीच्या जवळून जातो. मनांग गाव मात्र नदीपासून थोडं उंचावर आहे. गावात प्रवेश करताना छोटीशी कमान. इथपर्यंत जीप येऊ शकतात. पण जीप किंवा कोणत्याच चार चाकी वाहनांना गावात मात्र प्रवेश नाही. गावकरी मोटरसायकल वापरतात, त्या मात्र गावात नेता येतात.
आज बहुतेक कालच्या पेक्षा जास्त पायपीट झाली. पाय दुखायला लागले. शेवटी २ च्या सुमारास मी माझ्या आजच्या मुक्कामी पोचतो: तिलीचो हॉटेल: https://maps.app.goo.gl/EQJiwXunZ8nfKnFj7 (उंची ३५४० मी.)