अन्नपूर्णा सर्किट ट्रेक (भाग १)

Submitted by प्र on 8 November, 2024 - 22:38

१९ एप्रिल २०२४

प्रवास:

एक वाजता एकदाची मायक्रोबस हलली तेव्हा जरा खिडकीतून वारं यायला लागलं. वाटलं काठमांडूतच इतकं उकडतंय तर खाली काय होईल? अर्थात बेसीसहरला एक रात्रच तर काढायची होती म्हणा. उद्या सकाळी वर जायला सुरुवात झाली की गार होईलच असं मी स्वतःला समजावलं.

नेपाळमधल्या रस्त्यांपेक्षा भारतातले खूप चांगले. त्यामुळे प्रवास रमणीय होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे अपेक्षाभंग नाही झाला. घाटात रस्तादुरुस्ती सुरु असल्यामुळे मध्ये दीड तास गाडी एकाच जागी थांबलेली होती. रस्ते खड्डेयुक्त असल्याने आणि मी शेवटच्या सीटवर असल्याने पाठीला दणके बसत होते. सामान ठेवायला पुरेशी जागा नसल्याने सॅक मांडीवरच ठेवावी लागली. त्यात खुपसलेल्या हायकिंग पोल्स मध्ये मध्ये हनुवटीचा वेध घेत होत्या. बसमध्ये बसण्यापूर्वी जेवायला वेळ मिळाला नव्हता. वाटेत एकदा ३ वाजता आणि एकदा ५ वाजता मायक्रो बस थांबली, पण “ही जेवणाची वेळ नाही” असं पुणेरी उत्तर नेपाळी भाषेत मिळाल्याने दिवसभर उपास झाला. हां, पण या किरकोळ गोष्टी सोडल्यास इतका काही वाईट पण नाही झाला प्रवास. रात्री ९ वाजता का होईना, बेसीसहर मुक्कामी पोचलो हेही नसे थोडके.

ठरवून इतका पॉझिटिव्ह विचार केल्यानी मला खूपच बौद्धिक थकवा आला त्यामुळे मी रात्री पण न जेवता झोपून गेलो. तसाही काल रात्रभर दिल्ली विमानतळावर जागाच होतो, त्यामुळे झोप आवश्यकच होती. झोप झाल्यावर सकाळी मात्र मला विनाकष्ट पॉझिटिव्ह वाटायला लागलं. त्यात हॉटेल मालक चक्क मराठी समजणारा होता. कारण तो पूर्वी भारतीय सैन्यात होता आणि पुण्यात बराच काळ होता. त्याच्याशी गप्पा मारता मारता ब्रेकफास्ट केला. नंतर जीप ड्रायव्हरला फोन केला तर तो म्हणतो मी तुमच्या हॉटेल समोरच पार्क केली आहे जीप. आनंदी आनंद! आठ वाजता मी चेकआऊट करून जीपमध्ये जाऊन बसलो पण. पण… आणखी प्रवासी येणार होते. आम्ही वाट बघत बसलो. दरम्यान मी एटीममधून आणखी थोडे पैसे काढून घेतले, कारण आता पुन्हा मुक्तिनाथपर्यंत एटीम नाही. शेवटी साडेनऊ-दहा वाजता उर्वरित प्रवाशांसकट आम्ही निघालो.

काठमांडू आहे १४०० मीटर उंचीवर आणि बेसिसहार ८५०, पण तरी इथे अजिबात उकडत नव्हतं. काठमांडू हे खूप मोठं शहर आणि कॉंक्रिटचं जंगल आहे म्हणून गरम असेल कदाचित.

आता इथपासून ते २६५० मीटर उंचीवरच्या चामे पर्यंत जीप प्रवास. पण जीप आधी खाली खाली जात होती. कारण नदीकिनारा गाठायचा आहे आणि मग नदीकाठानीच वर वर जाणारा रस्ता. बेसीसहर ते चामे हे फक्त ६६ किमी अंतर. पण रस्ता खराब असल्याने ४ तास लागतील असं ड्रायव्हर म्हणाला होता. पण प्रत्यक्षात रस्ता तर खूपच छान दिसत होता. नवीनच केलेला वाटत होता. जीप पण सुसाट पळत होती. पण हा प्रकार १५ मिनिटंच चालला. त्यानंतर कच्चा रस्ता सुरु झाला. वेग कमी झाला. पण तरी प्रवास होता भलताच प्रेक्षणीय. डावीकडे उंच डोंगर आणि उजवीकडे नदी. खळाळत वाहणारी. कधी अगदी जवळ तर कधी खूप खोल दरीत. पाण्याचा रंग मात्र थोडासा राखाडी होता. अधून मधून छोटे धबधबे दिसत होते. मध्ये मध्ये एखादं खेडेगाव. आता गाडीचा वेग १५-२० किमीच्या पुढे जाईना. पण त्याबद्दल माझी काही तक्रार नव्हती.

एका ठिकाणी धरण आणि जलविद्युत प्रकल्प दिसला. “प्रवेश बंद” सारख्या पाट्या आणि कंपनीचे नाव इंग्लिश आणि चिनी भाषेत होत्या. काल काठमांडू ते बेसिसहार प्रवासात पण अशाच इंग्लिश आणि चिनी पाट्या बघितल्याचं आठवलं. नेपाळमधल्या कम्युनिस्ट सरकारनी चीनशी मैत्रीचं धोरण ठेवल्याची खात्री पटली.

जीपमध्ये माझ्याखेरीज दोन नेपाळी प्रवासी, एक बंगाली जोडपं (राज आणि संगीता) आणि त्यांचा गाईड कम पोर्टर (धीरज) होता. ते तर पूर्ण वेळ विडिओ शूटिंग करण्यात मग्न होते. आणि सतत बडबड. परिसर खूप सुंदर होता पण त्यांच्या बडबडीने वीट आला. फोटोसाठी गाडी थांबव असं ते अनेक वेळा म्हणाले, पण ड्रायव्हरने त्यांना भीक घातली नाही. साधारण साडेअकरा वाजता ड्रायव्हरनी स्वतःहून गाडी थांबवली आणि lunch break झाल्याचं जाहीर केलं. नेपाळमध्ये जेवणाची हीच वेळ आहे. आणि मलाही भूक लागली होती. पण जीपमधून उतरेपर्यंत लक्षात आलं की तिथे एक जोरदार धबधबा पण आहे! नदीच्या पश्चिम किनाऱ्याला आमचं भोजनालय आणि पूर्व किनाऱ्याला हा सुंदर धबधबा.
रेस्टॉरंट: https://maps.app.goo.gl/FVT68nDZFMpA6e4m6
धबधबा: https://maps.app.goo.gl/m4Zt4GmXX1dx1Etx9

chamche_waterfall.jpeg

हे चामचे गाव असल्याने चामचे धबधबा असंच त्याचं नाव.
छान खिडकीजवळ बसून धबधबा बघत जेवलो. जेवण म्हणजे दाल भात. नेपाळी भाषेतही भाताला भातच म्हणतात. बटाट्याची भाजी. एक पालेभाजी. डाळ आणि भात. इथे पाश्चात्य प्रवासी / ट्रेकर भरपूर येतात, म्हणून जेवण मात्र पूर्ण अळणी असते. म्हणजे तिखट शून्य. नेपाळी प्रवाशाना मात्र त्यांनी मिरची आणून दिली. ते पाहून मीपण मागून घेतली. मग छानच जेवण झालं. ड्रायव्हरची विडी काडी झाली. मग निघालो.

रस्ता खराब तर आहेच पण अति तीव्र चढणही आहे. जीप महिंद्राची होती पण काही बदल करून फोर व्हील ड्राईव्ह केली होती. (की महिंद्राचे हे स्टँडर्ड मॉडेल आहे कोण जाणे?) म्हणजे नेहेमी टू व्हील ड्राईव्हच असते, पण तीव्र चढ असेल तेव्हा ड्रायव्हर खाली वाकून एक दांडी ओढून फोर व्हील ड्राईव्ह मोड सुरु करायचा. रस्ता अरुंद. समोरून दुसरी गाडी आली की आपली अगदी दरीच्या काठाला टेकते. त्यामुळे जीव मुठीत धरला - सोडला असं ख वेळा केलं गेलं. दुपारी अडीच वाजता चामेला पोचलो.
चामेमधील हॉटेल: https://maps.app.goo.gl/rTLXGrSs1jsohYvq8

अन्नपूर्णा सर्किट ट्रेक मार्गावरील हॉटेल्स मध्ये पद्धत अशी आहे की आपल्याला बेड फुकट मिळतो. (मनांगमधील तिलीचो हॉटेल मात्र अपवाद आहे: ते बेडचं भाडं आकारतात) अट एकच: सर्व खाणं पिणं आपण तिथेच घ्यायचं. ते मात्र थोडं महाग असतं, त्यामुळेच त्यांना बेड फुकट देणं परवडतं. एका खोलीत सहसा २ किंवा ३ बेड असतात. म्हणजेच एक किंवा दोन प्रवासी तुमच्या साथीला असणार. क्वचित एकादी खोली एकच बेड असलेली असू शकते. किंवा फार गर्दी नसेल तर २ बेडच्या खोलीत तुम्ही एकटेच असं पण होऊ शकतं.

कालचा उकाडा विसरलो कारण इथे चांगलीच थंडी होती. सर्व हॉटेल्समध्ये पिण्यासाठी गरम पाणी विकत मिळतं. मी तेच घेतलं आणि नंतरही प्रत्येक ठिकाणी तेच घेत गेलो. चहा घेऊन मग चामे गावात एक चक्कर मारून आलो.

बेसीसहरपासून इथपर्यंत ज्या नदीच्या काठानी आलो तिचं नाव मर्स्याङ्दी (Marsyangdi). चामे गावात याच नदीच्या काठाला एक गरम पाण्याचा झरापण आहे. गरम पाण्याच्या झऱ्याचा माझा सिक्किममधला अनुभव फारसा चांगला नव्हता म्हणून मी त्या वाटेला गेलो नाही.

मर्स्याङ्दी नदीचं खोरं चामे गावात अगदी अरुंद आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूला अगदी जवळ खूप उंच पर्वत दिसतात. त्यांच्या डोक्यावर बर्फ. बर्फाचं पहिलं दर्शन इथे झालं.

तासाभरात गाव फिरून मी परत आलो. माझ्याकडे कानटोपी नव्हती ती इथे एका दुकानातून घेतली. गाव अगदी लहान असलं तरी ट्रेकर्सना लागणारं सारं काही इथे दुकानांमध्ये होतं.

परत येऊन खोलीत थोडा आराम केला. पाच मिनिटात गार वाटायला लागलं. पुन्हा चहा घ्यावा म्हणून खाली रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे एव्हाना त्यांनी बंब पेटवला होता त्यामुळे छान उबदार होतं. म्हणूनच अनेक ट्रेकर्स तिथेच गप्पा मारत बसले होते. नंतर लक्षात आलं की प्रत्येक हॉटेलमध्ये असंच दृश्य असतं. खोलीत हीटिंग नसतं. रेस्टॉरंटमध्ये असतं. म्हणून बहुतेक जण दिवसभर रेस्टॉरंटमधेच पडीक असतात. रात्री झोपण्यापुरतं खोलीत.

आतापर्यंत मला राज-संगीता सोडल्यास दुसरे कुणी ट्रेकर्स भेटलेच नव्हते (राज-संगीता चामेमधल्याच दुसऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते). आता इथे रेस्टॉरंटमध्ये नाना देशातील ट्रेकर्स भेटले. बहुतेक जण ग्रुपबरोबर होते. उदाहरणार्थ दोन जर्मन मुली. तीन फ्रेंच तरुण + एक अमेरिकन मुलगी. एक ऑस्ट्रेलियन कुटुंब. एक माझ्यासारखा एकटा डच तरुण. पण या संपूर्ण ट्रेक मध्ये राज-संगीता सोडल्यास भारतीय आणखी कुणीच नाही भेटलं. हा ट्रेक भारतीयांमध्ये फारसा लोकप्रिय नाही. एक तर लांबचा प्रवास आणि खर्च पण पुष्कळ आहे. गम्मत म्हणजे हाच ट्रेक पाश्चात्यांमधल्या (त्यातल्या त्यात) गरीब लोकांमध्ये लोकप्रिय आहे, कारण तो त्यांना स्वस्त वाटतो. अर्थातच स्वित्झरलँडमधल्या ट्रेकपेक्षा हा खूपच स्वस्त आहे.

असो.

संध्याकाळी साडेसात वाजता जेवलो. घरी फोन केला. इथे बहुतेक सगळ्या हॉटेल्स मध्ये WiFi फ्री मिळतं. त्यामुळे रोज घरी (किंवा आणखी कुणालाही!) फोन करणं शक्य होतं. झालंच तर youtube वगैरे करमणुकीची पण सोय होते. टाईमपास करून शेवटी कंटाळून साडेनऊला झोपलो.

उद्यापासून ट्रेक सुरु होणार होता! त्याचा वृत्तांत पुढच्या भागांमध्ये देईनच. आधी प्लॅन काय होता ते सांगतो.
अन्नपूर्णा सर्किट ट्रेकबद्दल इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. हा ट्रेक ३ दिवस ते ३ आठवडे असा वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. मी माझा प्लॅन असा केला होता:

ट्रेकची सुरुवात चामे गावातून (समुद्रसपाटीपासून उंची २६५० मी).
१ ला दिवस: चामे ते अप्पर / लोअर पिसांग (उंची अनुक्रमे ३३०० / ३२०० मी)
२ रा दिवस: अप्पर / लोअर पिसांग ते मनांग (उंची ३५४० मी)
३ रा दिवस: मनांगला एक दिवस जादा मुक्काम - acclimatization साठी.
४ था दिवस: मनांग ते याक खरका (४००० मी) किंवा लेदार (४१०० मी)
५ वा दिवस: याक खरका / लेदार ते हाय कॅम्प (४९०० मी)
६ वा दिवस: हाय कॅम्पहुन निघून थोरोंग ला (५४०० मी) खिंड गाठायची आणि मग पलीकडे उतरून मुक्तिनाथ (३८०० मी)

ठरल्याप्रमाणे काय काय झालं आणि काय बदल करावे लागले ते पुढच्या भागांमध्ये.

अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग २

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Hats of to u ... ओघवते लिखाण. सगळे भाग वाचून काढले.पण खरंच फोटो अजुन हवे होते.

हा ट्रेक बकेट लिस्ट्मध्ये असल्याने सर्व ९ भाग एका दमात वाचले. सुंदर वर्णन! अजून फोटो असते तर जास्त मजा आली असती विशेषतः अन्नपूर्णाचे आणि इतर बर्फाच्छादित शिखरांचे.