अज्ञातवासी - S02E12- सीजन फिनाले - नवीन!

Submitted by अज्ञातवासी on 7 November, 2024 - 09:50

याआधीच्या सगळ्या भागांची लिंक इथे मिळेल.

https://www.maayboli.com/node/85959

एका हॉटेलात दोन लोक बसलेले होते.
संपूर्ण हॉटेल रिकामी होती.
"मोक्ष, अजून किती दिवस दिल्लीत?"
"एका प्रोजेक्टवर काम चालू आहे. ते करून जाईन."
दादासाहेब हसले.
"नाशिकला कधी येशील?"
मोक्ष कसानुसा हसला.
"कधीही नाही. मला माहितीये."
"बाबा, तुम्हीच चला माझ्यासोबत."
"नाही मोक्षा, मला नाही सोडता येणार नाशिक."
"सगळं सोडता येतं बाबा."
"काही गोष्टी नाही सोडता येत बाळा.
शेलार असण्याचं, खुर्चीवर बसण्याचं प्रायश्चित्त फार मोठं असतं."
"बाबा प्रायश्चित्त?" मोक्ष आश्चर्यचकित झाला.
"हो बाळा. अश्वत्थामा बनून आयुष्यभराची वेदना उराशी बाळगावी लागते. म्हणून सांगतो, कधीही नाशिकला परत येऊ नकोस. मी जिवंत असेल तोपर्यंत तरी..."
"बाबा..." तो उठला, आणि त्याने दादासाहेबांना घट्ट मिठी मारली.
"माझ्या बाळा, जीव आहेस रे तू माझा. मी जगतोय फक्त तुझ्यासाठी."
दादासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी मिठी अजूनच घट्ट केली.
******
सकाळीच वाड्यात अप्पा आणि संग्राम उभे होते...
"अप्पा, काल सगळी वायनरी उडाली. काय स्फोट झाला बघितलं का?"
"संग्राम बघितलं सगळं."
"काय वाटतं, कुणी केलं असेल."
"मी केलं," मोक्ष त्यांच्या जवळ येत म्हणाला.
दोघेजण वेड्यासारखे त्याच्याकडे बघत राहिले...
"काल वायनरी एक टन आरडीएक्सच्या स्फोटात उडाली. त्यात डिसुझा गेला. म्हणजे गेलाच असेल, कारण तिथे राख उरलीय फक्त."
"तुला कळतंय का, तू काय बोलतोय?" संग्राम म्हणाला.
"शांत हो. अरे जोशी आले."
तिकडून एक बटू, जाड चष्मा घातलेली प्रौढ व्यक्ती येत होती.
"श्रेयालाही बोलावलंय. येईल इतक्यात. आणि पाटणकरसुद्धा येणार आहेत. आपण छोट्या हॉलमध्येच बसू. काय? चला जोशी."
मोक्ष छोट्या हॉलकडे निघाला.
त्याच्या मागोमाग अप्पा निघाले. संग्राम त्याच्याकडे रागाने बघतच होता.
"राजे, चला..." अप्पा रागाने त्याच्याकडे बघत म्हणाले.
संग्राम दातओठ खात निघाला.
"तर जोशी, श्रेयाने मला आधीच सगळं समजावलं आहे. तुम्ही फक्त आता मी सांगतो त्याच्यावर काम करा."
जोशींनी मान हलवली.
"एक. दादासाहेबांनी कुणाच्या नावावर किती स्थावर मालमत्ता केलेली आहे, आणि त्यांच्यापैकी कोण कोण एका हाकेवर ती माझ्या नावावर करेल..."
...अप्पा बघतच राहिले...
"मग ज्यांनी नाही केली, त्यांना तू उडवणार?"
"पर्याय नाही अप्पा. त्यांना कळायला हवं शेलार देऊ शकतात, तर परत घेऊही शकतात. शिस्त नावाची गोष्ट उरलेली नाहीये या वाड्यात."
जोशींनी मान हलवली.
"दुसरी गोष्ट, रोकड कुठे, कुणाकडे किती आहे याची यादी.
तिसरी गोष्ट, सोनं कुणाकडे किती आहे, याची यादी. चांदीचा हिशेब आजपासून बंद. ज्याच्याकडे आहे, त्याचीच."
जोशी आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिले.
"चौथी गोष्ट, जरा सिरीयस आहे. त्या गोष्टीचं नाव आहे, संग्रमचा मासिक खर्च. टाळ्या..."
"मोक्ष..." संग्राम ओरडला.
"आवाज हळू. जोशी, सांगा."
"मी काय सांगणार?" जोशी भेदरले.
"मग मी सांगतो. मासिक पाच कोटी रुपये फक्त...फक्त... फक्त..."
"काय?" अप्पानी आ वासला.
"ये, माझ्या बापाचा पैसा आहे, मी कसाही उडवेन." संग्राम भडकला.
"पैसा माझ्या बापाचा आहे कळलं? फक्त आणि फक्त माझ्या बापाचा. बस खाली. शांतपणे बोलतोय तर शांत उत्तर दे. पूर्ण हिशेब दिलास, तर पाच कोटींचे सहा कोटी करेन, नाहीतर एक रुपया मिळणार नाही."
"...मोक्षा, दोनशे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत त्याच्याकडे. त्यांना त्यालाच पोसावं लागतं." अप्पा आर्जवीने म्हणाले.
"जोशी, सायखेडकरांशी बोला आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना एखाद्या कंपनीच्या रोलवर दाखवायला लावा. तीस हजार रुपये महिना इन हॅण्ड आणि त्यावर पीएफ, बोनस सगळं चालू करा. चाळीस हजार होतील जास्तीत जास्त. ऐशी लाख झाले. पुढे?"गोष्टीचा संशय आहे."
"काय?" तिने विचारले.
"दादासाहेबांनी एक ग्रॅम ड्रग नाशिकमध्ये येऊ दिलं नाही. तरीही नाशिकमधून सगळीकडे अमली पदार्थांचा पुरवठा होत होता."
"तुला म्हणायचं तरी काय आहे?"
"वायनरीच्या खालीच डिसुझाने एक गुप्त फॅक्टरी बनवली होती. तिथे अतिशय घातक असे अमली पदार्थ बनवले जात होते."
"काय?" श्रेया चक्रावली.
"आणि यात डिसूजा बरोबर अजून कोणीतरी काम करत होता. त्याचा पत्ता अजून लागायचा आहे श्रेया."
"अरे पण हे सगळं तुला कसं कळलं?"
"खानसाहेबांची काही माणसे वायनरीमध्ये कामाला होती. त्यांच्यापैकी काही माणसांकडून बॉम्ब प्लांट करताना मला या गोष्टीचा मला सुगावा लागलाय. ती फॅक्टरी उध्वस्त झालीय, पण तो डीसुझाचा पार्टनर अजूनही काम करत असेल श्रेया."
"मोक्ष हे प्रचंड विचित्र आहे."
"म्हणून आता वायनरीमध्ये मला कुठलाही गोंधळ नकोय, आणि अजून एक..."
"आता काय?"
"वायनरीची संपूर्ण मालकी तुझीच राहील श्रेया. संपूर्ण स्वतंत्र. शेलारांचा तिच्यावर काहीही हक्क राहणार नाही."
श्रेया हसली.
"मग तू दुसरी व्यक्ती शोध." ती म्हणाली.
"काय झालं आता." मोक्ष वैतागला.
"कारण वायनरीवर जरी शेलारांचा हक्क नसला, तरीही मोक्ष शेलार, तुझ्यावर काय माझा हक्क राहील कळलं? शेलार साम्राज्याची अशी शकले होऊ देणार नाही मी."
मोक्षने थोडावेळ विचार केला.
"डील. थॅन्क्स मॅडम, सो काईंड ऑफ यू."
"आय एम." ती हसली.
*****
'समशेर, पांडे, सायखेडकर. तिघांनी उद्या मला रात्री बंगल्यावर भेटा. उद्याच.' शेखावतने मेसेज केला.
त्याने डोक्याला हात लावला. कधीच त्याची झोप उडाली होती.
त्याच्या डोळ्यासमोर आता फक्त युद्ध दिसत होतं!
भयंकर युद्ध!
जे संपूर्ण नाशिक हादरवून टाकणार होतं.
दुबई विरुद्ध नाशिक...
शेलार विरुद्ध....
त्याच्या अंगावर सरसरून काटा आला.
'नाही, आताच...' तो आत पळाला.
त्याने प्रत्येकाला फोन लावायला सुरुवात केली.
दोन तासात तिघेही शेखावतकडे हजर होते.
"शेखावत. तुझं डोकं कुठे चालतय माहिती नाही, पण आपण खूप मोठी चूक केली हे कळतय का तुला?"
"चूक केली नाही, करवली गेली पांडे."
"म्हणजे?" पांडे आश्चर्यचकित होत म्हणाला.
"तुला नाही कळणार पांडे. हा खेळ तू, मी याच्यापेक्षा खूप मोठा आहे. तुला काय वाटतं? दादासाहेब गेले? राजशेखर शेलार गेला? नाही पांडे, तो आता खराखुरा वेताळ बनलाय, आणि त्याने एका राक्षसाला झपाटलंय. मृत्यूच्या पलीकडे जाऊन तो आता राज्य चालवतोय. कसलीही भीडभाड न बाळगता."
पांडे न कळून शेखावतकडे बघतच राहिला.
"चिंता करू नकोस पांडे. फक्त मला आता तुम्हा तिघांची परवानगी हवी आहे. शेवटच्या वारासाठी!!!"
"म्हणजे?"
"शेवटचा वार, मोक्ष शेलारवर..."
"तू युद्ध पुकरणार आहेस?"
"नाही, फक्त लढाई. हरलो तर मात्र युद्ध होईल."
"आपण हरलो तर मेलो असं समज शेखावत." सायखेडकर म्हणाला.
"आता मृत्यूची भीती नको सायखेडकर..."
"मला आहे शेखावत. म्हणून तुझे प्लॅन आता तुलाच लखलाभ. मी निघालो. आता दादासाहेबांच्याच जागी मला मोक्ष शेलार. मरेपर्यंत त्याची साथ देऊ." सायखेडकर जायला निघाला.
शेखावत उठला आणि त्याने सायखेडकरला मिठी मारली.
"दोस्त था तू मारा!" तो म्हणाला.
आणि पुढच्याच क्षणी त्याने सायखेडकरचा डोक्यात गोळी झाडली.
"शेखावत!" सिंग ओरडला.
"सिंग गप्प बस. या मुर्खांना कळत नाहीये, आपण काय करतोय. अरे तो मोक्ष शेलार, हळू-हळू सगळ्यांचा जीव घेईल. आता माघार नाही सिंग. लढाई सुरू होईल."
त्याने एक फोन लावला...
...तिकडून फोन उचलला गेला.
...कमांडर... शेखावतचा आवाज घोगरा झाला.
येस? तिकडून एक भरदार आवाज आला.
उद्या काँकरर भेटू शकतील?
नो. तिकडून फोन कट झाला.
*****
"खानसाहेब. बिर्याणी जबरदस्त झाली होती."
"ताट तरी मागायच होतं. "
"सोडा. भूकच तेवढी लागली होती. एक चांगली बातमी आहे."
"काय?"
"श्रेया पूर्ण वायनरीचं काम बघणार आहे."
"माशाल्ला!" खानसाहेब म्हणाले.
मोक्ष हसला. पण तो पुन्हा गंभीर झाला.
"काय झालं दादा."
"खानसाहेब, ती लॅब, तो सेटप. राहून राहून मला वाटतंय, खेळ फार मोठा होता."
"काहीतरी धागेदोरे सापडायला हवेत दादा."
"आपली माणसे कामाला लावा. मला असं वाटतंय, अजून खूप काहीतरी आपल्याला सापडायचंय."
"म्हणजे?"
"अजून खूप काहीतरी बाकी आहे खानसाहेब... बस एवढंच. चला मी निघतो. आज पिंकीला पिकप करायचंय."
"दुसरं कुणाला पाठवा दादा. तुम्ही स्वतः जायची काय गरज?"
"तिला मैत्रिणीसमोर भाव खायचाय, मोक्ष शेलार माझा भाऊ आहे असं. ठीक आहे."
त्याने पिंकीला फोन लावला.
"हॅलो, किती वेळ अजून?"
"दादा, अरे लाईफ केयर हॉस्पिटलला ये."
"का? काय झालं."
"अरे एक अंकल अचानक रस्त्यात पडले. मग आम्ही मैत्रिणींनी मिळून त्यांना इकडे आणलं. आता त्यांचे घरातले आले आहेत, म्हणून आम्ही निघतो."
"ठीक आहे. येतो." त्याने फोन ठेवला.
"चला खानसाहेब, येतो." मोक्ष निघाला.
त्याने गाडी मुंबई हायवेला घेतली, आणि लेखानगरला वळला.
गाडी पार्किंगमध्ये लावून तो आत गेला.
समोरच पिंकी उभी होती.
"ताई, काय छान काम केलं तुम्ही. खरच." तो तिच्याकडे बघत म्हणाला.
पिंकीचा उर अभिमानाने भरून आला. उगाच चार मैत्रिणीसमोर तिला मोठं झाल्याची जाणीव झाली.
"हँडसम आहे." एक मैत्रीण खुसफुसली.
"गप्प," पिंकीने डोळे वटारले.
"कसे आहेत ते काका आता."
"अरे अजून काहीच कळलेलं नाही. बघू काय होतं ते. त्याची मुलगी बघ, बिचारी किती उदास होऊन बसलीय."
मोक्षची तिकडे नजर गेली.
उंच, मध्यम अंगकाठी, मोठे डोळे, गव्हाळ रंगाची पोपटासारखं बाकदार नाक, डोळ्यावर एक ओव्हल शेपचा चष्मा...
'शरा....' मोक्षला सगळं जग त्याच्याभोवती फिरत असल्याचा भास झाला...
ती चमकून उठली.
त्याची पावले केव्हा त्याला तिच्याकडे खेचून घेऊ लागली, हे त्यालाही कळलं नाही.
कधीकधी, आयुष्यात जी व्यक्ती कधीही भेटणार नसते, तीच नियती समोर घेऊन येते.
'मोक्ष शेलार, विहिरीत जीव देईन, पण तुझ्याशी लग्न करणार नाही.'
' तू जरा मोठा असायला हवा होतास.'
' हे ओबसेशन बाजूला ठेव. नेहमी वाईटच विचार करत नको जाऊस.'
सगळ्या आठवणी अक्षरशः उसळी मारून वर येत होता.
शेवटी दोघेही समोरासमोर आले...
...नियती अजून एक खेळ रचत होती...
******
व्हाईट सिल्कचा शर्ट.
ब्लॅक ट्राऊसर. हातात रेड जी शॉक...गळ्यात मार्शलचे हेडफोन.
रेड शूज.
खांद्यावर बोटाने ब्लेझर पकडलेलं...
शाळेच्या व्हरांड्यात तो मस्त फिरत होता.
त्याचे कुरळे केस विस्कटले होते. लांब नाक, लंबगोल चेहरा, क्लीन शेव्ह...
...अतिशय प्रमाणबद्ध शरीर. गोरा रंग.
"अंकल." एका छोट्या मुलीने हाक मारली.
येस डियर.
"तुम्ही हिरो आहात ना. ते मूवी मध्ये असेच फिरतात."
तो हसला. त्याच्या गालावर खळी पडली.
"वेल. मी या स्कूलच्या हिरोचा बाबा आहे."
"कोण स्कूलचा हिरो?"
"राजा विक्रमादित्य."
"तो माझ्याच क्लास मध्ये आहे."
"वॉव. हाऊ इज ही?"
"बोरिंग. बोलत नाही तो माझ्याशी."
"असं. मी त्याला सांगेल तुझ्याशी बोलायला. ओके?"
"ओके अंकल. थॅन्क्स."
*****
तो एका हॉलमध्ये शिरला. आधीच बराच हॉल भरलेला होता.
हा बसायला जागा शोधत होता. जागा मिळत नव्हती.
"जर मीटिंगमध्येच लोक उशिरा येत असतील, तर त्यांची मुले स्कूलमध्ये लवकर येत असतील असं मला वाटत नाही."
"उम्म सॉरी टू डीसपॉइंट, पण आजपर्यंत माझ्या मुलाला लेट मार्क मिळाला नाही."
"अच्छा."
"हो. विक्रम... विक्रमादित्य एमआरव्ही..."
"आर यू एमआरव्ही?" तिने आ वासला.
"येस. सॉरी फॉर बिंग लेट."
"नो नो... प्लीज सिट."
तो शांतपणे जागा शोधून बसला.
*****
' प्राजक्ता इंटरप्रायजेस...'
नाशिकमधील भलीमोठी बिल्डिंग.
एक सेंच्युरी आली, पार्क झाली.
त्यातून एक युवती खाली उतरली.
रेड ब्लेझर, ब्लू जीन्स. रेड शूज...
ती उतरताच सगळ्या नजरा तिच्याकडे वळल्या.
ती सगळ्यात वरच्या फ्लोअरवर गेली, आणि केबिनमध्ये बसली.
' गायत्री एमआरव्ही...'
एमडी... प्राजक्ता एंटरप्रायजेस...
तिने कॉफीचा मग हातात घेतला, आणि खिडकीतून बाहेर नजर टाकली...
...संपूर्ण नाशिक ती आता गरुडाच्या नजरेने बघत होती.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users