‘Hey.. लेडी..’
न्यूयॉर्क च्या टाइम्स स्क्वेअर पासून नेवार्क विमानतळावर आम्ही दुपारी तसे वेळेच्या बऱ्याच आधी पोहोचलो होतो. मुलं (मुलं म्हणजे, मुलगा अजू आणि सून कमू) बरोबर असतांना, (खरं सांगायचं तर, आम्हीच त्यांच्या बरोबर होतो), असं विमानतळावर... (किंवा कुठल्याही ठिकाणी) वेळेच्या आत पोहोचणं हा योग तसा दुर्लभच! ट्रेन किती वाजता येणार किंवा बोर्डिंग केव्हा चालू होणार हे माहिती करून घेण्यापेक्षा, ट्रेन केव्हा सुटणार आणि लास्ट मीनीट बोर्डिंग कसं गाठायचं हेच ही मुलं बघतात.
पण आज दुपारी निवांत बाहेर भटकण्याचा बेत रद्द करावा लागला होता. तशी गेले दोन-तीन दिवस न्यूयॉर्क मध्ये आमची भरपूर भटकंती सुरूच होती. असंच कालच्या भटकंतीत माझं लक्ष ‘हॅरी पॉटर म्यूझीयम’ कडे गेलं, आणि मी ते मला बघायचंच आहे असं जाहीर करून टाकलं. अजूने ‘त्यात अजिबात इंट्रेस्ट नाही.’ असं सांगितलं. खरं तर, पूर्वी.. म्हणजे त्याच्या लहानपणी त्याच्यामुळेच मी हॅरी पॉटरची सगळी पुस्तकं वाचून संपवली होती. त्याच्या बरोबर सगळे हॅरी पॉटर चित्रपटही बघून झाले होते माझे.
पण आता तो सरळ त्यात ‘इंट्रेस्ट नाही’ म्हणाला. तो नाही म्हणाला, म्हणून मग त्याचा बाबा पण नाही म्हणाला (त्याला तर तसाही तो प्रकार पोरकट वाटतो!). मग कमूने लगेच ‘तो.. तुम लोग मत आओ, हम दोनो जाएंगे!’ असं त्यांना म्हणत (‘गेले उडत.. ’ असं म्हणण्या इतपत मराठी येत नाही तिला) लगेच आम्हा दोघींचीच पुढच्या दिवशीची सकाळची तिकीटं फोनवरून बुक करून टाकली.
मग आम्ही दोघींनी सकाळी ते म्यूझीयम बघायचं, तोवर बाकी दोघांनी हॉटेल मधे चेक आउट करून सगळं सामान तिथल्या लॉकर रूम मध्ये ठेवणं वैगेरे आटपायचं असं ठरलं. ते झालं की मग सेंट्रल पार्कला सर्वांनी एकत्र जायचं असंही ठरलं. कारण गेल्या दोन तीन दिवसात सेंट्रल पार्कला जाणं राहूनच गेलं होतं.
ठरल्याप्रमाणे सकाळी आम्ही दोघींनी आपापल्या नवऱ्यांना रूम वर तसंच सोडून, हॉटेल ते म्यूझीयम हे पंचविसेक मिनिटांच अंतर नेहमीप्रमाणे धावत पळत पार केलं, कारण तिथली आधीच रिझर्व केलेली वेळ गाठायची होती. तिथे धापा टाकत पोहोचलो, आणि समोर बघतो तर काय..! आमच्या समोरच तिकीटांच्या रांगेत अजू आणि त्याचा बाबा उभे!!! (म्हणजे नेहमीप्रमाणेच मला विरोध करणं ह्या एकमेव गोष्टीत त्याला इंट्रेस्ट होता तर!).
आता चौघही एकत्र असल्यामुळे, म्यूझियम बघण्याची घाई करण्याची गरज नव्हती. त्यामुळे अगदी निवांतपणे आम्ही तिथलं प्रत्येक दालन अगदी मनापासून.. वेळ घेत बघत होतो. ते बघतांना पुस्तकातली प्रत्येक व्यक्तिरेखा, कित्येक प्रसंग डोळ्यासमोर अक्षरश: जिवंत होत होते. सगळं म्यूझियम बघता बघता वेळ कसा गेला ते कळलंच नाही.
बाहेर आलो तेव्हा सगळ्यांनाच कडाडून भुका लागल्या होत्या. मुलांबरोबर फिरणं म्हणजे, खाद्ययात्रेत फिरणं!! त्यांचं ‘कुठे काय खायचं’ हे ठरलेलं असतं. मग त्या करता कितीही लांब जायला लागलं तरी चालेल. आता त्यांचं, त्यांना ते हवं तेच रेस्टोरंट शोधण्याचा.. मग त्या प्रचंड मोठ्या डिशेस खाण्याचा.. सोहोळा पार पाडून बाहेर पडलो, तर बाहेर भुरभुर पावसाला सुरवात झाली होती.
‘ह्या....ह्या एवढ्याश्या पावसाने काय होतंय..?’ असं म्हणत मुलांनी भराभर पुढे चालायला सुरवात केली आणि त्यांना नजरेच्या टप्प्यात ठेवून आम्ही त्यांच्या मागे पळायला लागलो. दोन चार मिनिटातच त्या भुरभुरीचं रूपांतर सरसरीत झालं. मग मात्र मी मुलांना नं जुमानता (त्यांना तर त्या पावसातही मस्त चालत भिजायचं होतं) तिथेच वळचळणीला थांबायचं ठरवलं (अगदी हट्टी अडलेल्या म्हशीसारखं!).
पाऊस अगदी मुंबईसारखा कोसळायला लागला, तसा मुंबई सारखाच अगदी गरजेला उगवणारा छत्रीविक्याही तिथे अवतरला. मग छत्र्या घेऊन.. आता कुठेतरी जाऊन बसायला हवं.. असं म्हणत एका कॉफीशॉप मध्ये पोहोचेपर्यंत सगळेच अर्धओले झालो. तिथे कॉफी पीत पावसाकडे बघत बसावे लागल्यामुळे, एवढ्या ओलेत्यात सेंट्रल पार्कला जाणे आपोआपच रद्द करावे लागले.
मग ‘हाताशी वेळ तर आहे.... पण आणखी कुठे लांब जावे इतका पण नाही..’ अशा अवस्थेत तसेच हॉटेलवर परत आलो आणि मग जमेल तितके स्वत:ला कोरडे करत.. थोडा वेळ तिथेच लॉबीत काढून, आता इथे नुसतेच बसण्यापेक्षा निघूया.. म्हणत नवीन कोरड्या मोज्यांवर ओलेच शूज घालून, एयरपोर्टकडे निघालो.
म्हणूनच मग नेवार्क विमानतळावर आम्ही वेळेच्या बऱ्याच आधी पोहोचलो होतो. ओळखपत्र चेकिंगची रांग चांगलीच मोठी दिसत होती. ‘बरं झालं आपण आधीच आलो ते...भरपूर वेळ आहे आपल्याकडे!’ आम्ही एकमेकांना सांगीतलं.
रांग मंद गतीने पुढे सरकत होती. मुले एकमेकांशी गप्पा मारण्यात दंगली होती आणि मी आपली इकडची तिकडची गंमत बघत होते. एव्हाना माझ्या मागची रांग पण लांब झाली होती.
‘Hey..! फ्रॉम हियर.. गो दॅट काऊंटर..’ पलीकडून एका एयरपोर्ट युनिफॉर्मने लांबच्या एका काऊंटर कडे बोट करत माझ्या पासूनच्या मागच्या लोकांना सांगीतलं. मुलांचं लक्ष एकमेकांकडे असल्यामुळे माझ्याकडे नव्हतं, आणि नवऱ्याचं कधीच नसतं म्हणून नव्हतं.
समोरून अॅक्सेंट मध्ये इंग्लीश बोलणाऱ्या (युनिफॉर्मड्) व्यक्तीला मी नकार देणं.. किंवा काही एक्सप्लेन करणं, ह्या पेक्षा त्याचं ऐकणंच पसंत करते. त्यामुळे ‘वुई.. फॅमिली..’ वगैरे काही नं म्हणता, मी निमुटपणे त्या दुसऱ्या काऊंटर कडे वळले. माझ्या मागची लोकं माझ्यापेक्षा चपळ होती (माझे ओले बूट!) त्यामुळे दूसऱ्या काऊंटर वर मी ऑलरेडी बरीच मागे गेले होते. . ‘तरी ही रांग त्या रांगेपेक्षा लहान आहे. पटकन होईल माझं.’ मी स्वत:ला सांगितलं.
माझीही रांग हळू हळूच पुढे सरकत होती. (आता शेजारच्या रांगेची गती मात्र वाढली होती.) माझ्या पुढे ‘ना खुशी, ना गम’ असे भाव असलेला (खरं तर कुठलेही भाव नसलेला जणू रोबोच ) एक अवाढव्य उंचीचा ब्लॅक माणूस उभा होता.
अमेरिकेत दिसणारी देशोदेशींच्या माणसांची इतकी विविधता, भारतात बघायला मिळत नाही. त्यामुळे इथे कुठल्याही व्यक्तीकडे नजर जाते, तेव्हा ती काळी..,गोरी..,चायनीज..,इंडियन.. अश्या लेबल सकटच लक्षात येते. मी नवीन असल्यामुळे असेल कदाचित, कायमच अमेरिकेत राहणाऱ्या लोकांचं असं होत नसावं.
बाकी ‘ब्लॅक’ हा शब्द इथे बोलतांना वापरण्याची कमूने मला बंदी केलीय. खरंतर मी तिच्याशी बोलत होते, तेव्हा तो शब्द मी लोकांबद्दल वापरत नसून कपड्यांबद्दल वापरत होते. की, ‘तू ऑब्सर्व केलं का, इथे कित्ती लोकं ब्लॅक कलरचे कपडे वापरतात? दहा पैकी सात ब्लॅक मध्ये असतात.. दोन व्हाइट मध्ये.. आणी एखादा ..’
कमूशी बोलतांना मी शक्य तितके इंग्लीश शब्द पेरून मराठी बोलते. तेही ती निवांत असते तेव्हाच. तेवढाच तिचा मराठीशी संबंध! ती घाईत असते तेव्हा हिंदीच बरं पडतं तिला ऐकायला.
‘आई आप ‘वो’ वर्ड मत यूज करो. कोई सुनेगा तो ऊनको बाकी कुछ नही, बस यही एक वर्ड समझ मे आयेगा..!’ ती कायम हिंदीतच! तेव्हा पासून मी काले कपडे वैगेरे म्हणायला लागले.
तर माझ्या पुढच्या त्या माणसाचा नंबर आला. (त्याचा चेहरा एवढा भावहीन होता.. आणि डोळ्यांची पापणीही हलत नव्हती.) त्याने मख्ख चेहऱ्याने त्याचा पासपोर्ट पुढे केला. काहीतरी गोंधळ असावा. काऊंटर वरची बाई एकदा त्याच्या कडे एकदा स्क्रीनकडे आळीपाळीने बघत होती. (म्हणजे फक्त चेहराच नाही तर पासपोर्टही काही बोलत नव्हता!)
‘एनी अदर आयडेंटिफिकेशन?’ तिने विचारले.
तो मख्खच! ‘येस.. नो..’ पण सांगायला तयार नाही.
ती परत परत विचारत राहिली. रांग ठप्प! तिचा सहकारी तिच्या मदतीला आला. त्याने परत पासपोर्ट स्कॅनिंग केलं.. परत तेच प्रश्न.. परत तोच मख्ख चेहरा. (तो खरंच रोबो होता का..?)
शेजारच्या रांगेतली माझी ‘वुई.. फॅमिली..’ केव्हाच पुढे निघून गेली होती. माझ्या पुढच्याच्या पुढची लोकं पण केव्हाच आणखी पुढे गायब झाली होती. ‘लेट मी कॉल समवन..’ असं म्हणत आमच्या काऊंटर वरची बाई अंतर्धान पावली! तिचा सहकारी तिथे नुसताच उभा! आता मी टेंशन मधे आले. कारण मगाशी खूsssप वाटणारा वेळ आता धावायला लागला होता.
जरा वेळाने त्या काऊंटरबाई बरोबर आणखींन काही यूनिफॉर्म्स आले.. ‘ना खुशी ना गम ’ ला बाजूला घेतलं. अन् अखेर माझा नंबर आला. त्यानंतर मात्र अर्ध्या मिनिटात माझी सुटका झाल्याने हुश्श करत मी सिक्युरिटी चेक कडे वळले.
“Hey.. लेडी... व्हेअर आर यू गोइंग..?” समोरून एका यूनिफॉर्म कडून आवाज आला.
मला जरा बरं वाटलं. माझा टेन्स चेहरा पाहून तो यूनिफॉर्म ‘फ्रेंडली स्मॉल टॉक’ करत असेल असं वाटून मी शक्य तितका हसरा चेहरा करत सांगितलं, ‘डेट्रॉईट..’
“लाइक धिस..?” त्याने माझ्याकडे आपादमस्तक नजर टाकली.
मीही माझ्या ओल्या शूज पासून माझ्या (बघता येईल तितक्या) ‘ड्रेसअप’ कडे बघितलं. पायात ओलसर शूज, त्यात वर कोरडे असणारे पण आता किंचित दमटलेले सॉक्स, प्रवासात सोईची अशी ट्रॅव्हल पॅन्ट आणि पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट! आता ह्या दिवसांतल्या वातावरणात आजूबाजूच्या ‘लेडी....ज’ मधे मी थोडी(जास्तच) ओवरड्रेस होते हे खरंय.. पण..
“या..” हा एकच शब्द मला कॉन्फिडेंटली बोलता येतो.
“सी.., शी इज गोइंग लाइक धिस..” त्याने आपल्या सहकारणीला सांगितलं.
“Hey.. यू.. व्हेअर..?” आता लेडी यूनिफॉर्म
माझी ‘वुई.. फॅमिली..’ पलीकडून पा..र.. लांबून माझ्याकडे बघत होती.
“टू माय सन.. देअर..” आता हिला जरा वेळ असता तर तिथूनच मी तिला सन आणि सून दोन्ही दाखवणार होते.
“यू आर गोइंग लाइक धिस.. ?” लेडी यूनिफॉर्म चा माझ्याकडे बोट करत परत तोच प्रश्न.
‘ह्यांना एवढा प्रश्न का पडतोय....?’ मी तिच्याकडे नीट बघितलं. काळ्या तजेलदार चेहऱ्यावर (‘मॉईसचर / फाऊंडेशन चांगल्या क्वालिटीचं वाटतंय!’) छान चमकदार गुलाबी लिप्स्टिक! ह्या काळ्या कांतीचा एक फायदा असतो, तो म्हणजे त्यांच्या कुणाच्याच चेहऱ्यावर डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ दिसत नाहीत!
‘पण हे असं सारखं विचारणं काय? आता ठीक आहे, मी जरा जास्तच कपडे घातलेय.. अजिबात मेकअप केला नाहीय.. पण म्हणून काय अगदी प्रत्येकाने...’.
‘गोइंग लाइक धिस.. विथ द बॅग..?’ लेडी यूनिफॉर्म.
आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
एयरपोर्ट वर एकदा रांगेत लागलं, की मुंग्यासारखं पुढच्याच्या मागे मागे जायची सवय असते (म्हणजे मला आहे!). इथे माझ्या पुढचे केव्हाच अंतर्धान पावले होते. आणि आमची ‘ही’ रांग सिक्युरिटी बेल्ट पासून बरीच लांब होती. त्यामुळे माझ्या लक्षातच आले नव्हतं. पाठीवरची बॅग, चेकिंग करता बेल्ट वर नं ठेवताच, बॅगेसकट मी चेकिंगला निघाले होते!
‘अरे.. मग जरा नीट सांगा नं! आमच्या देशात आम्ही कसे.. समोरच्याची भाषा नाही कळली तरी, डमशेराज खेळत त्याला मदत करतो.. मागे एकदा नाही का, एका कॅनडीयन बाईने (चुकून मी तिच्या ताब्यात सापडले होते) मला ज्ञानेश्वरां बद्दल काहीतरी विचारलं तर मी ‘त्यांनी रेडयाच्या तोंडून वेद वदवले’ हे वाक्य, ह्यातील एकही शब्दाला (‘त्यांनी’ सोडून! ‘त्यांनी’ ला ‘दे’ वापरला होता. ) पर्यायी इंग्लीश शब्द महित नसतांना समजावून दिले होते (हुश्श!!!!). इथे तर मला फक्त माझी बॅग बेल्ट वर ठेवायला सांगायचे होते.’ माझ्या मनात आलेच.
“आय अॅम सॉरी.. व्हेरी सॉरी..” मोठ्याने त्यांची माफी मागत.. ओशाळी होत मी बेल्ट कडे वळले.
*****
मस्तच लिहितेस ग.. मजा आली
मस्तच लिहितेस ग.. मजा आली वाचताना... खरं तर प्रसंग साधाच पण खिळवून ठेवतेस वाचताना.
छान लिहिला आहे किस्सा..!
छान लिहिला आहे किस्सा..!
हा पण किस्सा मस्त. पण शेवट
हा पण किस्सा मस्त. पण शेवट abrupt वाटला.
ममोताई +७८६
ममोताई +७८६
शर्मिला, लिहीत राहा तुमच्या नजरेतून दिसणाऱ्या अमेरिकेबद्दल.. त्या नजरेशी त्याच्याशी रीलेट करता येते. म्हणजे आपण त्या जागी असतो तर असाच विचार केला असता असे वाटते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शर्मिला छान लिहिले आहेस.
शर्मिला छान लिहिले आहेस. सध्या तु अमेरिकेत आली आहेस का? आणि तु वरच्या लिखाणात डेट्रॉईट लिहिले आहे, तर नक्की कोठे आहेस? अजुन काही दिवस असशील तर भेटायचे का?
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
धन्यवाद ममो, रूपाली, भक्ती,
धन्यवाद ममो, रूपाली, भक्ती, ऋन्मेष, रिमझिम, जाई.
@ममो,
पहिली प्रतिक्रिया तुमची अन् तीही एवढी उत्साहवर्धक. मस्त वाटलं.
@भक्ती,
शेवट abrupt वाटला >> तेथून (security) सुटका झाल्यानंतर अजूची ‘अ.. र्र .. र्र.. सोडलं का तुला त्यांनी..? आम्ही तुला इथेच सोडून जाणार होतो..’ ही (त्याच्या लहानपणाचा बदला) , आणि ‘नेक्स्ट टाइम मै आपके पिछे रहुंगी..’ ही कमुची शहाणी प्रतिक्रिया सोडल्या तर मी सुखरूप विमानात बसले म्हणून अनुभवाचा शेवट तिथेच झाला.
@ऋन्मेष,
लिहीत राहा तुमच्या नजरेतून दिसणाऱ्या अमेरिकेबद्दल.. >> नक्की लिहिण्याचा प्रयत्न करते.
@रिमझिम
लिखाणात डेट्रॉईट लिहिले आहे, तर नक्की कोठे आहेस? अजुन काही दिवस असशील तर भेटायचे का? >> माझा मुलगा डेट्रॉईटला असतो. मी भारतात परत आलेय. पुढच्या वेळी मी तिथे आले की नक्की संपर्क करीन.
Racist writing. African
Racist writing. African american mhana
https://www.google.com/amp/s
https://www.google.com/amp/s/www.cbsnews.com/amp/news/not-all-black-peop...
अश्विनीमामी, वरच्या लिंकप्रमाणे ब्लॅक हा शब्द चुकीचा नाही. 'एन्' शब्द संपूर्णपणे चूक. अर्थात ही माझी समजूत/ माहिती आहे. स्पष्ट माहिती मिळाली, तर नक्की आवडेल.
हाही भाग आवडला. काही ठिकाणी
हाही भाग आवडला. काही ठिकाणी रिलेटही करता आलं.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अजूने शेवटी जी प्रतिक्रिया दिली, त्यावरून तर माझा चीन प्रवास डोळ्यांसमोर तरळून गेला.
तुमच्या लिखाणामध्ये प्रांजळपणा आहे ज्यामुळे ते भावतं.
धन्यवाद अमा, अनया, प्राचीन.
धन्यवाद अमा, अनया, प्राचीन.
@अमा,
भावना पोचल्या.
मी लिहिल्याप्रमाणे -
"अमेरिकेत दिसणारी देशोदेशींच्या माणसांची इतकी विविधता, भारतात बघायला मिळत नाही. त्यामुळे इथे कुठल्याही व्यक्तीकडे नजर जाते, तेव्हा ती काळी..,गोरी..,चायनीज..,इंडियन.. अश्या लेबल सकटच लक्षात येते."
मला त्या क्षणी डोक्यात आलेला शब्द लिहिला आहे. रेसिझम डोक्यात नव्हता.
मला वाटतं black/ काळा / कृष्णवर्णीय हे शब्द without रेसिझम चालायला हरकत नाही.
कुणाची नॅशनलिटी माहित नसतांना 'अमेरिकन' शब्द वापरणं योग्य होईल का? (जसं मी तिथे असतांना 'एशीयन अमेरिकन ' नाही ठरणार )
@अनया
Link बद्दल धन्यवाद.
@प्राचीन,
अजूने शेवटी जी प्रतिक्रिया दिली, त्यावरून तर माझा चीन प्रवास डोळ्यांसमोर तरळून गेला. >> आवडेल वाचायला.
खोदा पहाड निकला चूहा.
खोदा पहाड निकला चूहा.
खोदा पहाड निकला चूहा.>> क्या
खोदा पहाड निकला चूहा.>> क्या करे... पहाड जितनी जिंदगी मे अनुभव चुहे जितने ही पाये हैं |
छान लाईन आहे. आयुष्य एका
छान लाईन आहे. आयुष्य एका पहाडासारखे आहे ज्याला अनुभवरुपी उंदरांनी पोखरून काढले आहे. आज हा पहाड उतरताना कुठल्या बिळातून कुठली आठवण निघेल सांगता येत नाही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Hi black is ok. Sorry for
Hi black is ok. Sorry for the kalesh Anaya and sharmila. Pl carry on. My bad
Nothing to sorry about Ama.
Nothing to sorry about Ama. You told what you thought right. We should be careful while using words.
<> +१
Nothing to sorry about Ama. You told what you thought right. We should be careful while using words.
+१
खोदा पहाड निकला चूहा. >> चुहा
खोदा पहाड निकला चूहा. >> चुहा सुद्धा मन रमवतो आपलं. मिकी माऊस बघा... शेवटी चूहा असेल तरी तुम्ही तो कसा present करता हेच महत्वाचं आहे. प्रत्येक अनुभव पहाड असणं अशक्य आहे, माणूस किती ही मोठा असला तरी. .
अमेरिकेत दिसणारी देशोदेशींच्या माणसांची इतकी विविधता, भारतात बघायला मिळत नाही. त्यामुळे इथे कुठल्याही व्यक्तीकडे नजर जाते, तेव्हा ती काळी..,गोरी..,चायनीज..,इंडियन.. अश्या लेबल सकटच लक्षात येते. >> लंडन हून मी घरी येते तेव्हा मला हे खुप जाणवत. त्या विशिष्ट ब्रिटिश airways च्या हिथ्रो टर्मिनस च्या वेटींग area मध्ये गर्दी खुप असते पण भारतीय माणसं अगदी क्वचित दिसतात. खाणं ही आपलं मिळत नाही. शॉपिंग साठी दुकानं ही सगळी परदेशी च.
मग आपलं गेट announce होत आणि तिकडे जाताना लिफ्ट मध्ये किंवा ट्यूब मध्ये एखाद हिंदी वाक्य " कमाल है, इधर भी ट्यूब की है इन लोगोने " असं एखाद हिंदी वाक्य कानावर पडत किंवा साडी नेसलेली एखादी साऊथ इंडीयन आजी दिसते.
चालत चालत आपण आपल्या गेट वर जाऊन पोचतो तर तिथे मात्र आजूबाजूला सगळे इंडीयन दिसतात. बाकावर बसल्यावर क्वचित् बाजूच्या पाशिंजरांच्या गोखले रोडच्या किंवा बोरिवली डोंबिवलीच्या गप्पा रंगलेल्या कानावर येतात.
अश्या तऱ्हेने जगापासून सुरू झालेलं हे वर्तुळ शेवट संकुचित होतं होतं आपल्या गल्ली पर्यंत पोचत.
ममो, किती छान शब्दरूप दिलंत
ममो, किती छान शब्दरूप दिलंत या अनुभवाला.