मला दिवाळी अंक वाचायला आवडतात. कित्येक लेखांनी माझे विचार आणि आयुष्याची दिशा बदलली. ( उदा. स्लो लिव्हिंग लेख, लोकमत दीपोत्सव दिवाळी अंक, 2020)
साधारण 2020 नंतर फेसबुक वर काही लोक आवर्जून वाचावे असे दिवाळी अंक, लेख याबद्दल लिहीत. लोकसत्ता वृत्तपत्र सुद्धा साधारण दिवाळी जवळ आली की, बाजारातील निवडक अंकांचे ट्रेलर स्वरूपात छोटे लेख अंकाच्या फोटो सह दुसऱ्या तिसऱ्या पानावर छापते.
मला माहिती आहे त्यानुसार दिवाळी अंकाची परंपरा 100 वर्षांहून जुनी आहे. 1950 पासून पुढे 30 - 40 वर्षे किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, माणूस आणि अशा अनेक दिवाळी अंकांची परंपरा म्हणून खूप चांगले लेखक मराठी साहित्यात तयार झाले. बऱ्याच कादंबऱ्या, कथा पुढे इथून पुस्तकात रूपांतरित झाल्या. पुनश्च. कॉम (punashcha.com) या वेबसाईटवर याबद्दल बरेच वाचले.
साधारण 2000 नंतर लेखन सुविधा आणि इंटरनेट यामुळे हौशी लोकही उत्तम कथा, साहित्य लिहू लागले. दिवाळी अंकात ते वाचताना मला आनंद होतो.
मी साधारण 2007 पासून दिवाळी अंक वाचतो. सुरुवात गावात येणाऱ्या एकमेव सकाळ वृत्तपत्राच्या दिवाळी अंकाने झाली. पुन्हा अनेक वर्षे शिक्षण, कॉलेज, जॉब निमित्ताने गावे, राज्ये बदलली. त्यामुळे नियमित अंक वाचन झाले नाही.
त्यामुळे मला वेळ मिळेल तसे जुने दिवाळी अंक वाचण्याची इच्छा आहे.
दिवाळी अंक प्रामुख्याने तीन प्रकरचे माझ्या माहितीत आहेत. ( जाणकारांनी भर घालावी.) महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांचे दिवाळी अंक, फक्त दिवाळी काळासाठी वाहिलेले विशेष दिवाळी अंक, काही विशिष्ट थीम घेऊन काढलेले दिवाळी अंक.
सकाळ, लोकसत्ता, लोकमतचा दीपोत्सव, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत ही काही प्रमुख मराठी वृत्तपत्रे दिवाळी अंक नियमित काढतात. 2017 मधील ' 49 दिवसात कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास ' करून लोकमतच्या दिवाळी टीमने मारलेल्या गप्पांचा दिवाळी अंक मला भयंकर आवडला. त्यानंतर मी नेहमीच त्यांच्या टीमच्या हटके विषयांच्या प्रेमात असतो.
सकाळ 2007 मधील दिवाळी अंकामध्ये 'अपहरण आणि गुंड व अपहरण झालेला व्यक्ती यांचे त्या अपहरण काळातील प्रवासात तयार झालेले विचित्र नाते' यावर आलेली एक दीर्घकथा मी वाचलेली अजून लक्षात आहे.
काही शोध पत्रकारिता विभागात, ललित, कादंबरी, कथा आणि मनोव्यापराचे विश्लेषण करणारे लेख मला नेहमीच आकर्षित करतात. आता 2015 नंतर वाढत्या तंत्रज्ञान विषयावर चांगले लेख येतात. ( जाणकारांनी भर घालावी.)
दुर्ग, पर्यावरण,पक्षी, भूगोल, इतिहास अशा विशिष्ट विषयावरही अंक मराठीत येतात. (उदा. भवताल ( पर्यावरण) दुर्ग, गरुडझेप (दुर्ग)) ( जाणकारांनी भर घालावी.)
दुसरा प्रकार म्हणजे विशेष दिवाळी अंकातील लेख. यामध्ये 1950 पासून माणूस, मनोहर, स्त्री, धनंजय असे दिवाळी अंक व प्रकाशने यांनी पुढच्या 40 वर्षात नवनवे लेखक मराठीत निर्माण केले. मला हा काळ आवडतो व ते लेखकही. यातले काही जुन्या दिवाळी अंकात लेख सध्या पुनश्च. कॉम वरून मी वाचले.
बंगळुरू मध्ये मराठी दिवाळी अंक कोठे मिळतात?
माहिती असल्यास नक्की कळवा.
बंगळूर महाराष्ट्र मंडळाच्या
बंगळूर महाराष्ट्र मंडळाच्या वाचनालयात दरवर्षी काही दिवाळी अंक मागवले जातात. ते अंक ज्यांना वाचायचे असतील त्यांना वाचनालयाच्या नियमित शुल्काव्यतिरिक्त शंभर की दोनशे रुपये भरून ते वाचता येतात. आधीच्या वर्षांचे दिवाळी अंकही उपलब्ध असलेले मी बघितले आहेत. महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांपैकी कुणी तुमच्या ओळखीचं असेल तर चौकशी करून बघा.