काळ

Submitted by संप्रति१ on 11 October, 2024 - 11:49

एके दिवशी आलोकला एक जाहिरातवजा लिंक दिसते.‌ ती एका पुस्तक दुकानाची वेबसाईट असते. त्यावर गेल्यावर कळतं की एकेकाळी भरजरी पुस्तकांसाठी परिचित असलेलं दालन आता कायमचं बंद होणार आहे.

हे एक असं होतंच म्हणजे. समाजानं आधीच उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर उड्डाण केलेलं असतं. भविष्यात आणखीही उंच उंच भराऱ्या घेण्यासाठी समाज व्याकुळ झालेला असतो. त्यासाठी गगनचुंबी स्कीम्स बांधणं आवश्यक ठरतं. त्या हवेत तर बांधू शकत नाही. अद्याप तसले तंत्रज्ञान विकसित झालेले नाही. त्यासाठी शहरातल्या मोक्याच्या जागा बहुउपयुक्त ठरतात. तर अशा सोन्यासारख्या जागा पुस्तकांच्या अडगळींनी अडवून ठेवणं, हा मोठा समाजद्रोह होय.

तर मग त्यांनी सगळी पुस्तकं विकायला काढलेली असतात. आलोक वरपासून खालपर्यंत स्क्रोल करून काही पुस्तकं निवडतो आणि ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करतो. त्यानंतर काही दिवसांनंतरच्या एके दुपारी तो काहीतरी वाचत लोळत पडलेला असतो. देवीपूर नावाच्या गावातल्या एका बोर्डींग स्कूल च्या आठवणी असतात. लेखक कुणीतरी अज्ञात असतो. ते वाचत असतानाच त्याच्या हातात अचानक एक पार्सल येतं.

पार्सल खोक्याच्या स्वरूपातलं नसतं, किंवा ॲमेझॉनवाल्या करड्या प्लॅस्टिकचं पण नसतं. एका कुठल्याशा वेगळ्याच मटेरियलची सील केलेली पिशवी असते. आलोक त्यावर स्वत:चं नाव आहे का बघतो. दिसत नाही.‌ पाठवणाऱ्याचं नाव पण दिसत नाही. तो पार्सल उघडून बघतो. पुस्तकं, संपादनं, लेखांचं एकत्रिकरण केलेली जाड हार्डबाऊंड पुस्तकं, हिरव्या बाईंडींगचे दुर्मिळ ग्रंथराज, साप्ताहिक सकाळचे जुने दिवाळी अंक असं काही काही निघत राहतं त्यातून. पिशवी खूप खोल असते. एखाद्या छोट्या विवरासारखी. तिला अंत नसतो. त्यातून पुस्तकांच्या चळती निघतच राहतात. एवढं तर आपण मागवलं नाहीये. आणि एवढ्या कमी पैशात इतकी सगळी पुस्तकं त्या जहिरात देणाऱ्यांनी कशी काय पाठवलीयेत? आलोकला आश्चर्य वाटतं.!

एकेक पुस्तक उलट सुलट करून बघून शेजारी ठेवत असताना त्याला मिथ्स ऑफ देवीपूर नावाचं एक फोटोपुस्तक दिसतं. श्रीमंत गुळगुळीत कागदावर छापलेला ऐवज. तो ते उघडतो. पहिल्या पानावर एक प्राचीन दगडी देऊळ लक्ष वेधून घेतं. फोटो अगदी जिवंत असतो. तो असा विचार करतोय तोवर ते सगळं देऊळ त्याच्या समोर प्रकट होतं. तो तिथं प्रत्यक्ष दाखल झालेला असतो.

हे देऊळ विरक्त वाटतं. झगमगाट नसणारं. रांगा नसणारं. धक्काबुक्की नसणारं. ऑनलाईन बुकींग, सुरक्षा तपासणीची भानगड नसणारं. पायऱ्यांवर कुणालाही कधीही कितीही वेळ बसू देणारं.

नऊशे वर्षांपूर्वीचं मंदिर आहे हे, कुणीतरी त्याच्या कानात कुजबुजतं. बघ, काय देखणं आहे. आख्खं मंदिर मांडी घालून ध्यानस्थ बसलंय स्तब्ध.! आलोक थक्क होऊन बघत उभा राहतो क्षणभर. समग्र मंदिरावरून खालून वर सरसर नजर टाकत जातो, तर कळसाच्या सुळक्यावरून त्याचं मन उंच आकाशात निसटून जातं.

'कुठं गेलं?' एक पारवा जागच्या जागी पंख फडफडवत विचारतो. पारव्याच्या हस्तक्षेपामुळं स्तब्धतेचा पडदा क्षणभर सळसळतो. आणि पुन्हा शून्य होतो. आलोक भानावर येतो.

ही काय बाधा आहे, त्याला कळत नाही. 'ते फोटोपुस्तक जादूचं असावं. त्यातला जो कुठला फोटो बघतो, त्या दृश्यात आपण प्रत्यक्ष जाऊन पोचत आहोत की काय?', म्हणत तो मंदिराबाहेर रेंगाळत राहतो. मंदिराच्या दगडी भिंतीवर कोरलेली कलाकुसर बोटांनी स्पर्श करून बघतो. त्यावरून अलगद बोटं फिरवत चालताना बारीक नक्षीकाम गुदगुल्या करतं. कितीतरी वेळ तो तसाच चालत राहतो. हा मार्ग संपत कसा नाही.? आत कसं जायचं? थोडं पुढे त्याला प्रवेशद्वार दिसतं. तो प्रवेशद्वाराकडे चालू लागतो. पण थोड्या वेळाने लक्षात येतं की आपल्यातलं आणि प्रवेशद्वारातलं अंतर आधीएवढंच आहे. आपण जसजसे त्या दिशेने जातोय तसतसं ते दूर दूर सरकतंय. तो इरेला पेटून पळायला लागतो. तर प्रवेशद्वारही त्याच गतीनं दूर दूर जाताना दिसतं. तो थकून बसतो. त्याला कळून चुकतं की आपल्याला आत प्रवेश मिळणार नाही. हे पृथ्वीसारखं स्वतःच्या अक्षाभोवती फिरणारं मंदिर असावं.

पण मनात कसलीतरी पिंजण चाललेली आहे. तो काहीतरी शोधत आहे. कुठेतरी काहीतरी कमी आहे. त्याला एक गोष्ट बघायची आहे. एका गोष्टीची खात्री करायची आहे. तो पायऱ्या उतरून खाली येतो, तर समोरच एक कातळात बांधलेली उंच उंच दीपमाळ उभी. त्याची खात्री पटते.

बहुदा त्याचवेळी दीपमाळेच्या सापटीत बसलेला एक पारवा जागच्या जागी गिरकी घेतो. ''हा अजून एक मानवी वेडेपणा.! काय फरक पडतो की मंदिर शाकंभरीचं आहे ? की अंबाबाईचं आहे? की भवानीचं आहे? की कामाक्षीचं आहे? की मरीआईचं आहे? यानं खरंच काही पडतो का? आदिशक्तीचं आहे, एवढं पुरेसं नाही का? इथून तिथं सगळं व्यापून उरलेली तीच आहे, एवढं पुरेसं नाही का?" पारवा पंख फडफडवत प्रश्नांची फैर झाडतो. आणि आलोकला निःशब्दतेत सोडून उडून जातो.! इथले पारवेपण 'पोचलेले' आहेत की काय.!

आलोकभोवती आता एक दाट दाट सावली उतरली आहे. घनगर्द झाडांची सावली. भरपूर भरपूर प्राचीन वृक्ष मनमोकळे वाढल्यावर जशी सावली देतील, तशी घनगंभीर सावली. ज्ञानेश्वरांच्या समाधिशेजारी जो भलाथोरला अजानवृक्ष आहे, तशा अनेकानेक अजानवृक्षांची डेरेदार गुंतवळ माथ्यावर छत धरून उभी असेल तर कशी सावली देईल, तशी सावली.!

त्यात आलोक उभा आहे. अनवाणी पावलांखाली विस्तीर्ण दगडी चौथरा पसरलेला आहे. आणि वरून ऊन्हाचा एक कवडसाही खाली येत नाही. शांत शीतल सुखद भवताल.

त्या गूढ छायेला नजर सरावल्यानंतर आलोकच्या लक्षात येतं की
चौथऱ्याच्या पसारा आधी भासला त्याहून कितीतरी अधिक आहे. जणू इथं एक गाव रहिवसलं आहे. सभोवताली माणसं आहेत.‌ काहीजण एकेकटे आपापल्या नादात बसले आहेत. काहीजण वर्तुळाकार बसून बोलत आहेत. कसल्याशा गुजगोष्टी करत आहेत. पण आवाज, गोंधळ किंचितही जाणवत नाही. ही सगळी शहाणी माणसं असावीत. आपल्यामुळे इथल्या शांततेची घडी विस्कटू नये, याची त्यांना समज दिसते.

चौथऱ्यावरून फिरत असतानाच आलोकच्या हाती आणखी एक पार्सल येतं. हेही आधीसारखं येतं. म्हणजे कुणी माणूस आणून देतोय, असं नाही. आपोआपच हातात येतं. हे काय चाललंय तरी काय? म्हणून तो ते पार्सल घेऊन खाली बसतो. उघडून बघतो तर त्यात अजून पुस्तकं.! त्यातली काही पुस्तकं काढून शेजारी रचून ठेवतो. तर पिशवीत त्याजागी आणखी पुस्तकं प्रकट झालेली दिसायला लागतात.

हे जरा निगुतीनं करायचं काम आहे. थोडा वेळ फिरून परत येऊ, असा विचार करून तो पुस्तकांचा ढीग तिथंच ठेवतो. आणि चौथऱ्यावरून निरूद्देश हिंडत राहतो. एके ठिकाणी त्याला दगडी घुमटाकार छत्री बांधलेली दिसते. तिच्याखाली दगडी खांबाला टेकून बसतो. आणि पुन्हा ते फोटोपुस्तक उघडून बघतो. तर त्यात हुबेहूब असंच दृश्य असतं. घनगर्द सावली. उंच चौथरा. आणि अज्ञात माणसं.!

तो पुस्तक मिटून मांडीवर ठेवतो. आणि सभोवार कुतुहलानं बघू लागतो. काही अंतरावर त्याला एक वृद्ध मनुष्य दिसतो. त्याची दाढी छातीपर्यंत रूळत असते आणि डोळ्यांत विलक्षण डूब असते. आरामखुर्चीत सैलावलेलं ते वृद्ध व्यक्तिमत्त्व एकदम कंपोज्ड रिलॅक्स्ड आहे हे जाणवतं. तो त्याच्यापुढे अर्धवर्तुळाकार बसलेल्या माणसांशी बोलत राहतो. बराच वेळ खूप संथपणे बोलत राहतो. ते सगळे लोक खूप आदरानं त्याचं बोलणं ऐकत आहेत, असं वाटतं.

ह्या माणसाचा चेहरा कुठंतरी बघितल्यासारखा वाटतोय. टॉलस्टॉय आहे का हा? की रजनीश आहेत? थोडीथोडी टागोरांचीही झलक दिसतेय. तिघांचे चेहरे एकमेकांत मिक्स होऊन गेल्यासारखं वाटतं.

आलोकचं लक्ष पुन्हा हातातल्या पुस्तकाकडं जातं. आणि त्याला आठवतं की मघाशी आपण ठेवलेली पुस्तकं घेऊन यायला हवीत. हरवतील. जाताना सोबत न्यायला हवीत. म्हणून तो उठून पुस्तकं सोडून आलेली जागा शोधायला निघतो. बराच वेळ शोधल्यावर त्याला ती जागा सापडते, पण आता तिथलं दृश्य पार बदलून गेलेलं असतं. आता तिथं असंख्य पुस्तकांचे गठ्ठे अस्ताव्यस्त पसरून ठेवलेले दिसतात. एखाद्या जुन्या पुस्तकांच्या बाजारासारखं दृश्य दिसतं.

सगळी पुस्तकं एकमेकांत मिसळून गेलेली. आता यातून आपली पुस्तकं कशी ओळखायची? कुणी दुकानदार पण दिसत नाहीये. पार्सलची पिशवी पण कुठं दिसत नाहीये. फक्त एक दोन स्त्रिया पाठमोऱ्या चाललेल्या दिसतात दूरवर. तो त्या दिशेने जाऊ पाहतो तोवर त्या एका अरूंद गल्लीत अदृश्य होऊन गेलेल्या असतात.
स्वतःभोवती गोल फिरून पाहतो तर जिकडे तिकडे नजर जाईल तिथपर्यंत पुस्तकांच्या रांगा पसरलेल्या दिसतात. या रांगा संपतच नाहीत. सगळ्या घरांच्या भिंती पुस्तकांनी बांधलेल्या.
छतं पुस्तकांनी तोललेली. बाल्कन्यांच्या कॅंटीलिव्हर्समधून पुस्तकं डोकावतात. रेलिंग्जला पाठ टेकून पुस्तकं हातपाय पसरून बसलेली. स्ट्रीट लाईट्सच्या जागी पुस्तकं उपडी ठेवलेली. त्यातून मऊसूत आभा रस्ताभर पाझरतेय. वरती बघितलं तर ढगांच्या आकारांची पुस्तकं आभाळभर.!

साला ही दुनिया काय आहे? हे कसलं संमोहन आहे ? कसली रचना आहे ही? हे पुस्तकांचं महाकाय वारूळ उभं राहिलंय की काय आपल्याभोवती? आता यातून बाहेर कसं पडायचं? मुळात बाहेर पडायचं की नाही? हे स्वप्न तर चाललं नाहीये ना?? अरे देवा!! आत्ता जाग यायला नको..! प्लीज !! आत्ता नको.! याक्षणी नको.! हे सगळं इथंच सोडून निघून यावं लागेल.!!

आणि आलोकला जाग येते. जाग येते तेव्हा त्याचा उजवा हात हवेत उंचावलेला असतो. पुस्तकं पकडण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न..! डोळे उघडतात तर वरती फिरणारा फॅन दिसतो. उशीशेजारी ठेवलेल्या मोबाईलमध्ये बघतो, तर चार वाजलेले असतात. म्हणजे आपण अडीच तास झोपलो होतो.
कसलं जिवंत स्वप्न होतं यार ! तुटलं.!

तो हतबुद्ध होऊन तो उठून बसतो. उठून बेसिनमध्ये चेहरा धुतो. आरशात बघतो, तर डोळ्यांच्या बाहुल्या निश्चल, समाधिस्त ! मेंदूवरचं संमोहन अजूनही हटायला तयार नसतं. स्वप्नाचं धुकं अजूनही मेंदूत तरंगत असतं. ते सोबत घेऊन हळूहळू घराबाहेर पडतो. नेहमीचा रस्ता अजूनही ओळखीचा वाटत नाही. कर्कश रहदारी अंगावर येते. त्यातून वाट काढत चालत राहतो. नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसतो. चहाचा एक घोट घेतो. कप खाली ठेवतो. ही दुनिया खरी आहे की नुकतीच बघितलेली दुनिया खरी आहे, काही कळत नाहीये. खोल स्वप्नातून वर्तमानात परत आल्यानंतर सध्याच्या काळाशी त्याचा सांधा जुळत नाहीये. या काळात त्याला थांबावंसं वाटत नाही. थांबण्यासारखं फार काही त्याला दिसत नाही. म्हणून मग तो स्वप्नाच्या काळात मागं मागं सरकत जातो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users