याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83961
"शी इज हियर मनीष..."
मागे प्राजक्ता उभी होती.
तिने राघवला कडेवर घेतले.
थोडावेळ कुणीही काहीही बोललं नाही.
"तुला सगळ्यात मोठा इश्यू सांगू मनीष..." तिने बोलायला सुरुवात केली.
त्याने मान हलवली.
"एक फॅमिली पूर्ण होते, आई, बाबा आणि बाळाबरोबर. त्यात आईचा प्रियकर आला, तर ती फॅमिली उद्ध्वस्त होते.
तू एक चांगला व्यक्ती आहेस. सो एकच सांगते. माझी फॅमिली उद्ध्वस्त होईल असं वागू नकोस. कारण माझा नवरा, आणि माझं हे बाळ माझं सर्वस्व आहे. त्यांच्याशिवाय मी नाही जगू शकत. डोन्ट इव्हन ट्राय."
ती आली तशी निघूनही गेली.
मनीष फक्त तिच्याकडे बघत राहिला.
तो थोड्यावेळाने भानावर आला.
त्याने साक्षीला फोन केला.
साक्षी घाईतच त्याच्याकडे आली.
"साक्षी. दोन गोष्टी. आणि मला कुठलीही कारणे नकोत."
"येस सर."
"स्नेहल आणि प्राजक्ताला इथून घेऊन जा. आणि थोडे दिवस मला एकही फोन नकोय. कळलं?"
"सर?"
"प्लीज." त्याने तिला जायची खूण केली.
साक्षी काहीही न बोलता तिथून निघून गेली.
******
"तमा..." गौडा त्याला आवाज देत होता.
त्याने होकारा दिला नाही.
"तमा..." तो मोठ्याने ओरडला.
"ऐकू येतंय, बहिरा नाहीये मी." तोही ओरडला.
"निघ इथून आताच्या आता. नाहीतर मरून जाशील. तीन दिवसांपासून इथे कोंडून घेतलंय तू स्वतःला."
"माल कमी पडतोय मला. अजून ड्रम लागेल."
"तमा. तुझा वेग वाढलाय. अशाने स्वतःलाच संपवशील."
"संपवू दे मग. पण आता ही नशा उतरायला नको."
गेले तीन दिवस, तीन रात्री तो फक्त आणि फक्त मेथ बनवत होता.
...अतिशय शुद्ध.
त्याला झोप नव्हती, त्याला भूक नव्हती. त्याला तहान लागत नव्हती...
वेगळ्याच नशेत तो वावरत होता.
"तमा..." गौडा पुन्हा म्हणाला.
काय झालं? तो चिडला.
"इकडे ये. माझ्या जवळ ये."
तो नाखुशीने त्याच्या जवळ केला.
त्याने त्याला मिठी मारली, आणि मानेत एक इंजेक्शन खुपसलं.
"अण्णा..." तो काही बोलण्याआधीच भोवळ येऊन खाली पडला..
*****
त्याच्याच घरी त्याला शुद्ध आली.
शरीरात त्राण नव्हतं. हालचाल करण्याची ताकद नव्हती.
समोर गौडा बसलेला होता.
तो काहीतरी बोलणार, मात्र त्याची जीभ जड झालेली होती.
"अँटीडोट देईन तुला मी, पण माझं नीट ऐकून घे." अण्णा म्हणाला.
"तो चिडून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
आयुष्यात सगळ्यात वाईट गोष्ट सांगू? ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम केलं, ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात नसणं.
पण मनीष. तुझं प्रेम कधी सुरू झालंच नव्हतं. होतं ते एकतर्फी... आणि त्याचाच इतका त्रास?
ती तिच्या जागी अगदी बरोबर आहे. तिचं विश्व अगदी सुंदर आहे. त्यात तुला ना कुठे जागा आहे, ना थारा...
हे त्या मुलीने तुझ्यावर प्रेम केलं असतं, तर तुमच्या प्रेमासाठी हा अण्णा सगळ्या जगाशी लढला असता. पण नाही तमा, जे तू केलं, तो फक्त आणि फक्त मूर्खपणा आहे. तिचं आयुष्य बरबाद करून तुझ्या स्वप्नांचे इमले बंधू शकशील?
तमा. प्राजक्ता तुझं आयुष्य नाही. तुझं आयुष्य घडवणारी यायचीय अजून... बस एवढंच...हो. वेळ लागेल. लागायला हवा, प्रेम खरं होतं तुझं. पण त्याहीपेक्षा मनीषची स्टोरी फार मोठी आहे. अजून तर सुरुवातही नाही."
गौडाने एक इंजेक्शन काढलं. त्याच्या डाव्या हातावर टोचलं.
"तुझं आयुष्य कसं जगायचं ते तू ठरव. आता यापुढे मी तुझ्या आयुष्यात काहीही दखल देणार नाही."
गौडा आला तसा निघूनही गेला.
*****
तीन चार दिवस तो अशक्त होता. पूर्णपणे शारीरिक आणि मानसिक थकलेला.
पाचव्या दिवशी तो ऑफिसला गेला.
बिल्डिंगवरची प्राजक्ता नावाची अक्षरे दिमाखात चमकत होती.
विषण्ण हसून तो आत गेला.
"साक्षी." केबिनमध्ये पोहोचून त्याने आवाज दिला.
साक्षी त्याच्याकडे आली.
माझ्यासाठी काही आहे?
"नाही. तसं विशेष नाही." ती उत्तरली.
"ओके. जर काही सिग्नेचर हव्या असतील तर घेऊन टाक. मी उद्या मुंबईला निघतोय."
"का?"
"यूएस व्हिजासाठी अप्लाय करण्यासाठी."
"अचानक?"
"नाही. आपल्या बिजनेस एक्सपांशनसाठी काही बायर डोक्यात आहेत. त्यांना भेटण्यासाठी चाललोय."
"सिरीयसली?" तिच्या डोक्यात अजूनही प्रश्नचिन्ह होतं.
"हो साक्षी. सिरीयसली."
चार दिवसांपूर्वीचा तो, आणि आजचा तो...
जमीन अस्मानचा फरक होता...
*****
' कधीतरी त्याची अचानक आठवण येते.
अचानक...
...काय होता तो...
मेबी... कुणीही नाही.
त्याला मीच आयुष्यातून हाकलून लावलं ना?
शेवटी तो गेला.
पण का त्याची कायम उणीव भासतेय.
का राघवला चुकून मी मनू म्हणतेय.'
प्राजक्ताचं द्वंद्व थांबत नव्हतं.
'त्याला जायलं लावलं. तो गेला.
त्याला थांबायला लावलं असतं तर?
का आगीशी खेळतेय मी?
का...
का... मनू पुन्हा धडका देतोय...
का?
माझ्यासाठी अजूनही वेडा असेल?
येईल माझ्या एका हकेसरशी परत? '
...आजकाल मनू तिच्या जास्तच आठवणीत राहायला लागला होता.
महिना झाला होता त्याला जाऊन.
ना कॉलेज, ना कुठे तिला तो दिसला होता.
त्याचा नंबर ब्लॉक होता, डिलिट झालेला होता.
एक मेल होता.
तिची अजूनही इच्छा नव्हती.
पुन्हा तो खेळ तिला नको होता.
तिच्यात होणारा बदल घरचे बघत होते.
बरं नाही का तुला प्राजक्ता? म्हणून विचारत होते.
पण तिचं दुःख ती कुणाला सांगू शकत नव्हती...
मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात तिला मनू हवा होता.
*****
तो खिडकीतून बाहेर बघत होता.
"सर. मी निघते." साक्षी म्हणाली.
"साक्षी तुला कितीदा सांगितलंय, मला जाताना सांगायची गरज नाही म्हणून."
"असंच सांगितलं सर."
"ठीक आहे." तो हसला, आणि पुन्हा विचारात गढला.
"सर."
"हं." तो भानावर आला.
"आज एक्झॅक्ट महिना झाला ना."
"कशाला."
"सॉरी." ती गडबडली.
"डोन्ट. काही जखमा आयुष्यभर ओल्या राहतात. किंवा असं म्हण, ताज्या टवटवीत असतात."
"अजूनही?"
"आयुष्यभर साक्षी... आयुष्यभर... पण आनंद एकच आहे."
"काय?"
"थोडक्यात झुळूक आली, आणि निघून गेली. जर वादळ आलं असतं, तर मी आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त झालो असतो."
"ती काय समजायचं ते समजली, आणि तिथून निघून गेली."
तेवढ्यात त्याचा फोन वाजला.
' हाय '
दोनच अक्षरे स्क्रीनवर उमटली...
..पण त्याला जग जिंकल्यासारखं झालं.
क्रमशः