मुलांमधील कलागुणांना योग्य न्याय मिळावा यासाठी जागरुक पालक

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 October, 2024 - 09:33

फार पूर्वी कधीतरी लहान मुलांचा रियालिटी शो बघत होतो. निकालाचा दिवस होता. तीन-चार मुलांपैकी ज्याला कमी मते मिळणार तो मुलगा बाहेर पडणार होता. निकाल जाहीर झाला. एक मुलगा बाहेर पडला. सोबत त्याला किती मते मिळाली ते सुद्धा सांगितले गेले. त्यावर त्याचे आई-वडील तावातावाने भांडायला आले. आमच्या मुलाला इतकी कमी मते मिळणे शक्यच नाही. तुम्ही फसवणूक करत आहात.

परीक्षकांनी त्यांना प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते आपल्या मतावर ठाम होते. म्हणाले, अमुक तमुक हजार मते आम्ही स्वतःच आमच्या मुलाला दिली आहेत. आम्ही सायबर कॅफेमध्ये कॉम्प्युटरवर माणसे बसवली होती जे आमच्या मुलाला मत देत होते. मोबाईलवरून मेसेज वर मेसेज करायला लोकांना पैसे पुरवले होते. लाखात मते जर आम्हीच दिली असतील तर आमच्या मुलाला हजारात कशी मिळाली?

हे ऐकून परीक्षकांना धक्का बसला. अश्या पालकांना काय बोलावे हेच त्यांना सुचले नाही. आधी तर त्यांनी नियम क्लीअर केला. एका फोननंबर वरून किंवा एका कॉम्प्युटर आयपीवरून एकच मत नोंदवले जाऊ शकते. तर तुमची मेहनत ( किंवा लबाडी) वाया आणि पैसे पाण्यात गेले आहेत.

हे ऐकून चोराच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या. असा नियम असतो तर तुम्ही आम्हाला हे आधी का नाही सांगितले म्हणून परीक्षकांशीच भांडू लागले. त्यांचे भांडून झाल्यावर मग परीक्षकांनी त्यांना बरीच खरीखोटी सुनावली. आणि रिॲलिटी शो मधील टीआरपी ड्रामा व्हायचा असतो तो झाला.

तेव्हा मी बॅचलर असल्याने मला यातली पालकांची भूमिका रीलेट होण्यास काही वाव नव्हता. पण त्यांनी केलेला प्रकार निषेधार्ह होता इतके समजले.

आज मी पालकाच्या भूमिकेत आहे आणि आजूबाजूला असे बरेच अनुभव घेत आहे ज्यात आपल्या मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून पालक हातपाय झाडत असतात. आपल्या मुलाला डावलले जाऊ नये, त्याच्यासोबत पक्षपतीपणा होऊ नये म्हणून दक्ष असतात. वेळप्रसंगी कोणासोबतही पंगा घेण्याची त्यांची तयारी असते. जर ते नियम आणि नैतिकतेचे निकष सांभाळत असतील तर यात काही गैर नाही. आपले मुल आपली जबाबदारी. त्याच्या भविष्याची काळजी आपणच करायची आहे. पण त्या अनुषंगाने कशाला किती महत्त्व द्यायचे हे देखील आपल्यालाच ठरवायचे आहे. जिथे गरज आहे तिथे भांडता आले पाहिजे, मुलांच्या पाठीशी उभे राहता आले पाहिजे आणि जिथे गरज नाही तिथे सोडून देता आले पाहिजे.

आता इतरांना जज न करता थोडे स्वानुभवाकडे वळतो.

आमच्याकडे लेकीला लहानपणापासूनच नाच गाणे ड्रामा याची आवड होती आणि ते गुण अंगात दिसत होते. त्यामुळे तिला साधारण चारपाच वर्षांची असतानाच कौतुकाने एका ऍक्टिव्हिटी क्लासला घातले होते. कारण त्या संस्थेचे दरवर्षी बालनाट्य बसवले जायचे. त्याचे स्टेजवर प्रयोग व्हायचे. त्यात कलाकार म्हणून या अ‍ॅक्टीव्हिटी क्लासमधील मुले निवडली जायची. तो क्लास दर आठवड्याला रविवारी असल्याने लेकीला सोडायला आणायला मीच आवडीने जायचो. दिड तास तिथेच बाहेर थांबावे लागायचे. अपवाद वगळता तिथे साऱ्या आयाच असायच्या. सुरुवातीला मी तासभर फिरून यायचो. पण नंतर सारखे सारखे काय फिरायचे म्हणून तिथेच थांबू लागलो. तेव्हा शेजारीच घोळका करून बसलेल्या बायकांच्या गप्पा कानावर पडायच्या. त्या सर्व जणींचा एक कॉमन ग्रुप होता इतके त्यातून समजले.

असेच दहा बारा रविवार गेले आणि बालनाट्य बसवायची वेळ आली. स्क्रिप्टमध्ये मुलीच्या वाट्याला फक्त एक आणि एकाच वाक्याचा संवाद आला. तिची आई नाराज झाली. मी म्हटले ठीक आहे, पाच वर्षांच्या मुलीला काय भाषण द्यावे अशी अपेक्षा होती का तुझी.. कारण बरेचदा काय होते, आपल्या मुलांचे जे गुण आपल्याला माहीत असतात ते समोरच्याला माहीत नसतात. त्यामुळे आपल्या अपेक्षेनुसार त्यांना संधी मिळत नाहीत.

पण इतर मुलांच्या वाट्याला बरेपैकी संवाद होते. याचे एक कारण मागाहून समजले. त्या नाटक बसवणाऱ्या बाई आणि इतर मुलांच्या आई यांचा एक ग्रूप होता. ज्याला आपण कंपू म्हणतो. मला ते सारे स्वाभाविक वाटले. तसेच आपण त्या ग्रूपचा हिस्सा नसल्याने आपल्याला डावलले गेले असे बायकोला वाटणे देखील तितकेच स्वाभाविक वाटले.

पण हे असेच असते त्यामुळे फारसे मनावर घेतले नाही. यासाठी कुठे न्याय मागायला जायची गरज वाटली नाही, किंवा तेवढ्यासाठी म्हणून त्या बायकांचा ग्रूप जॉईन करून त्यांच्यातले व्हायचीही गरज वाटली नाही. फारतर मूड ऑफ झालाय असे वाटत असल्यास आणि आपल्या मुलीची सुद्धा त्या नाटकात काम करायची फार इच्छा नसल्यास, आपण त्यातून आपले नाव मागे घेऊ शकतो असा विचार केला. पण पुढे काही कारणांनी ते नाटक झालेच नाही आणि तो विषय संपला.

त्यानंतर काही महिन्यांनी लेक सिनिअर केजीला असताना थोडा वेगळा आणि उलटा म्हणावा असा अनुभव आला. शाळेत ती बाईंची लाडकी होती. त्यामुळे म्हणा किंवा तिच्यातील गुणांमुळे म्हणा ॲन्युअल फंक्शनमध्ये तिला अँकरिंग करायची संधी मिळाली. त्यातही भावखाऊ संवाद मिळाले. कार्यक्रमानंतर तितकेच कौतुक देखील पदरी पडले.

पण मागाहून आम्हाला समजले की काही जवळचे, ओळखीचे, आणि तिच्या मैत्रिणींचे पालकच नाराज झाले होते. कारण या कार्यक्रमात एक सीन झाला होता. अँकरिंग करणाऱ्या एका मुलाने ऐनवेळी माघार घेतल्याने त्याच्या वाटणीची कविता ईतक्या कमी वेळेत कोण पाठ करणार म्हणत ती संधीही माझ्याच लेकीला मिळाली होती. कारण ती आधीच अँकरिंग ग्रुपचा हिस्सा होती आणि तिचे पाठांतर चांगले होते. हे एक्स्ट्राचे फुटेज तश्याच उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिला मिळाले होते. ते काहीना रुचले नव्हते. अशी एखादी संधी आपल्या मुलांच्या वाट्याला यावे अशी त्यांची अपेक्षा होती. आणि त्यांनी तसे शिक्षकांना सांगत आपली नाराजी व्यक्त केली होती.

त्यांना ही गोष्ट खटकणे मला स्वाभाविक वाटले. असे झाल्यावर कोण कसे रिऍक्ट करतो हा ज्याचा त्याचा स्वभाव. पण शिक्षकांनी सर्व मुलांना समान संधी द्यायला हवी. एखाद्या मुलाला नाचता येत नसेल पण नाचायची आवड आणि इच्छा असेल तर त्यालाही स्टेजवर चमकायची संधी मिळायला हवी. कारण शाळा ही शेवटी शिकण्यासाठीच असते, मग ते अभ्यास असो किंवा इतर कलागुण, हे पालक आणि शिक्षक दोघानी लक्षात ठेवायला हवे. निव्वळ कलागुणांनाच नाही तर आवडीलाही प्रोत्साहन मिळायला हवे. त्यात स्पर्धा नसावी. ती आजूबाजूला आधीच खूप आहे. आणि ती देखील फसवी आणि कमालीची जीवघेणी आहे. हे मुलांच्या मनावर आपल्या वागण्यातून बिंबवता यायला हवे.

शाळांनंतर सोसायटीमधील कार्यक्रम हा आपल्यातील कलागुण सादर करायचा एक जवळचा आणि हक्काचा प्लॅटफॉर्म असतो.
चार वर्षांपूर्वी नवीनच असलेल्या आमच्या सोसायटीमधील पहिलाच गणपती उत्सव जोरदार झाला. सलग पाच दिवस कार्यक्रम होते आणि लहान मुलांच्या खूप साऱ्या स्पर्धा झाल्या. सर्वांनी खूप एन्जॉय केल्या.

पुढच्या वर्षी मात्र स्पर्धेचे स्वरूप तेच असूनही त्यात पक्षपातीपणा होतो, ठराविक मुलेच जिंकतात, आमच्या मुलांना मुद्दाम जिंकू दिले जात नाही असा ओरडा सुरू झाला. या प्रकाराने व्यथित होऊन फेस्टीव्हल कमिटी मधील बायकांनी रीजाईन केले.

तिसऱ्या वर्षी पुढच्या पिढीतील मुलामुलींनी ती जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांनी काही स्पर्धांसाठी बाहेरचे परीक्षक नेमले. पण परीक्षक बदलले तरी स्पर्धक तेच होते, त्यांचे कौशल्य आणि कलागुण तेच राहणार होते. त्यानुसार ज्याना जिंकायचे होते तेच जिंकले आणि नाराज लोकांची नाराजी कायम राहिली.

यंदाच्या वर्षी हे सर्व टाळायला स्पर्धा न होता केवळ नाचगाण्याचे उपक्रम आणि काही fun games झाले. मजा तर त्यातही यायला हरकत नव्हती. पण हा बदल नाईलाजाने करावा लागल्याने आणि याला वादाची पार्श्वभूमी असल्याने भाग घेणाऱ्यांमध्ये नेहमीचा उत्साह नव्हता.

नुकतेच गणपतीनंतर झालेल्या सोसायटी मीटिंगमध्ये हा मुद्दा उपस्थित केला गेला. कधी नव्हे ते मी तोंड उघडून काही प्रस्ताव मांडले. जसे भाग घेणाऱ्या मुलांना चॉ़कलेट देणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यासोबत बक्षिसे जास्तीत जास्त मुलांना मिळतील हे बघू शकतो. जसे की पहिले तीन क्रमांक न काढता पाच काढू शकतो. त्याऊपर उत्तेजनार्थ बक्षीस देऊ शकतो. ज्या वयोगटात जास्त मुले असतील त्यांना अजून विभागू शकतो. ग्रूप पाडून खेळ खेळू शकतो. जिंकलेल्या ग्रूप मधील सर्वाँना बक्षीस देऊ शकतो. काही खेळ निव्वळ नशिबाचे ठेवू शकतो ज्यात कुठलेही स्किल सेट नसलेला मुलगाही जिंकू शकतो. आपण सर्वच खेळात हरतो हा न्यूनगंड एखाद्याच्या मनात असल्यास तो काढू शकतो. सर्व क्रमांकांच्या बक्षीसांमध्ये फारसा फरक न ठेवता, जवळपास सारखीच ठेवू शकतो. स्पर्धेत जिंकण्याच्या आनंदापेक्षा प्रत्यक्ष खेळण्याचा आनंद मुलांना जास्त घेता येईल असे वातावरण तयार करणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि जर मुलेच नाराज दिसली नाहीत तर त्यांचे पालक तलवार उपसून यायची शक्यता देखील कमीच राहील.

या काळात छोटे मोठे बरेच किस्से झाले जिथे त्या पालकांना जाऊन समजवावेसे वाटले की तुमची मुले म्हणजे जत्रेतील दंगलीत झुंजणाऱ्या कोंबड्या नाहीयेत. ते हरल्यावर तुम्ही आपल्या चेहऱ्यावर नाराजी दाखवू नका. तसेच जिंकल्यावर देखील त्यांना डोक्यावर घेऊन नाचू नका. ही गोष्ट त्यांच्यावर पुढच्यावेळी देखील चांगलेच परफॉर्म करायचे प्रेशर टाकू शकते.

काही चांगले अनुभव सुद्धा आले, ज्यात पालकांनी इतरांच्या मुलांना प्रोत्साहन दिले. कोणी आपल्या मुलाचे बक्षीस दुसऱ्या मुलाला दिले किंवा इतरांच्या मुलांना संधी द्यायला आपल्या हमखास जिंकणार्‍या मुलाला स्पर्धेत उतरवलेच नाही. त्यांच्या मुलांनी देखील ते समजून घेतले हे विशेष वाटले. अशी मुले आयुष्याच्या स्पर्धेत नक्कीच जिंकतील असा विश्वास वाटला.

जो मुलगा पुढे जाऊन जगभरात चमकतो आणि ज्याचे पाय पाळण्यात दिसतात असा हजारात एखादाच असतो. बाकी सर्व पालक आपल्या मुलाने शाळेत, सोसायटीत, ओळखीच्या पाळखीच्या नातेवाईकांमध्ये चमकावे ईतकी माफक अपेक्षा बाळगून असतात. ज्यात काही गैर नाही. फक्त वर म्हटल्याप्रमाणे कुठे मुलांच्या पाठीशी उभे राहायचे, कुठे हातपाय झाडायचे आणि कश्याला फारसे महत्व न देता सोडून द्यायचे हे ज्याचे त्याला योग्यप्रकारे ठरवता यायला हवे.

- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख . विचार पटले . स्पर्धा हि जीवघेणी नसावी तर निकोप असावी. त्यातून सर्वांना आनंद मिळावा, निराशा नको. भाग घेणाऱ्या सर्व मुलांना भाग घेतल्याबद्दल बक्षिसे मिळायला हवीत. (हा मुद्दा काहींना पटत नाही याची जाणीव आहे.)
तसेच या स्पर्धांमधून यश आणि अपयश हे कसे पचवावे हे मुलांना शिकता येईल, खिलाडूवृत्ती शिकता येईल.

चांगला लेख.
स्पर्धेत जिंकण्याच्या आनंदापेक्षा प्रत्यक्ष खेळण्याचा आनंद मुलांना जास्त घेता येईल असे वातावरण तयार करणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.>> खरे आहे. मुलं नसतात पण त्यांचे पालकच प्रचंड competitive असतात. आणि मग हरण्यांजिंकण्याचे तेच बीज मुलांमध्ये रुजवले जाते.

लेख आवडला.

माबो वाचक +१

तुम्ही उल्लेख केलेला सारेगम लिटिल चॅम्प मध्ये झालेला तो ड्रामा पण आठवला मला यानिमित्ताने.

भाग घेणाऱ्या सर्व मुलांना भाग घेतल्याबद्दल बक्षिसे मिळायला हवीत.>> गेली पंचवीस वर्षे आमच्या कॉलीनीत हे पाळल्या जातेय.

मुलांना आपण हरल्याचं थोडंबहुत दुःख असेल पण पालकांना दुसरं कोणी जिंकल्याचं जास्त वाईट वाटत असतं.
आमच्या शाळेत प्रत्येक क्लासचा एक डान्स असतो. त्यातही जी नॅचरली ग्रेसफुल आणि करेक्ट मुव्हज् करतात ती मुलं पहिल्या रांगेत असतात. अशी मुलं मोजकीच असतात आणि कितीही शफलिंग करून वर्ग बनवले तरी अशी मुलंच चमकणार. तरीही पालक कटकट करतात.

विषय हार्ड आहे. बहुतेक पालक स्वत:ला न जमलेल्या, न करता आलेल्या झाडून सर्व गोष्टी पाल्यांकडून करून घेऊ(च) अशा मोड मधे जास्त दिसतात.

स्वत:चा वर्गात २५ च्या पुढे नंबर येत असेल पण मुलगा टॉपरच असावा, डांस यावा, स्पोर्ट्स मधे पुढे असावा … अपेक्षा फार.

पेरेंट टीचर मीटिंगमधे पहिली-दुसरीच्या तिमाही क्राफ्टच्या ग्रेडस् साठी कचाकचा भांडतांना पालक बघितलेत. तरी बरं ५वी पर्यंत शाळा लेखी परिक्षा घेत नव्हती. Happy parents need to take chill pill. तुम्ही मूल जन्माला घालून काही लोकोत्तर काम केलेले नाहीय आणि प्रत्येक मूल आइन्स्टाइन किंवा शाहरुख़ होणार नाहीय. Child is not your slave, nor shd be slave of your ambitions.

सर्वात आवडले म्हणजे मुलीच्या शाळेत दर महिन्याला स्टेजवर कार्यक्रम असायचाच. “प्रत्येक” मुलाला त्यात काम, संवाद. It helped even the shy kids to overcome their stage fear.

थोडक्यात, मुलांचा कॉन्फ़िडेंस वाढेल असे सर्व करावे पण don’t go fight their battles, मुलांना त्यांच्या गतीने-कलाने करु द्यावे.

शिक्षकांनी सर्व मुलांना समान संधी द्यायला हवी>>>

मी काही वर्षे एका शाळेत काम करत होते. मस्त अनुभव यायचे तिथे पालकांचे आणि सर्वांना सामावून घेण्यासाठी शाळेचे.

एकदा 'अलीबाबा आणि चाळीस चोर ' बसवले होते.
चाळीस चोर रिकाम्या गोण्या घेऊन गुहेत (विंगेत ) जातांना दाखवले आणि चाळीस भरलेल्या गोण्या घेऊन गुहेतून बाहेर येतांना दाखवले.
हे दोन्ही चाळीस वेगवेगळे होते. (सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळा रंग फासून )

एकदा 'अलीबाबा आणि चाळीस चोर ' बसवले होते. >> कुठे / कशात / कशावर ?>> शाळेच्या gathering ला. (ज्याला हल्ली parents day म्हणतात.)
स्टेज वर.
नाटक चांगले झाले. सगळ्या मुलांना स्टेज वर यायला मिळालं.
पालकांना त्यांची मुलं किती दिसली त्या गर्दीत माहित नाही पण त्यांच्याकडून काही तक्रार आली नाही.
नाटक चांगले उभे राहिले पण त्यानंतर मला आणि माझ्या एका मैत्रिणीला उभं राहता येत नव्हतं. कारण स्टेज वर आम्ही दोघी थर्माकोल चे उंट धरून त्यामागे अवघडून बसलो होतो तासभर.

ओह. अलिबाबा चाळीस चोर या नाटकाबद्दल सांगताय होय.
एका हिंदी चित्रपटात चोरांचा सरादार चाळीस चोरांना पिंपात बसवतो हे पाहिले होते.

शर्मिला, तुमचे अनुभव इतरांपेक्षा वेगळे म्हणजे शिक्षकाच्या दृष्टिकोनातून असतील. चाळीस गुणिले दोन ऐंशी मुलांना स्टेजवर चमकायची संधी देणे छान आयडिया. बाकी पालकांना काय रुचेल याची खात्री देता येत नाही. कारण हल्ली लोकांना आपल्या मुलांचा फोटो व्हिडिओ काढायचा असतो त्यामुळे त्यांना आपले मूल घोळक्यात मिसळलेले सुद्धा नको असते.

हे स्वानुभवाने सांगू शकतो. कारण मला फार आवड आहे मुलांचे फोटो व्हिडिओ काढायची. त्यासाठी मी मुलांच्या दर फंक्शनला तास दोन तास आधी जाऊन गेट उघडताच पहिल्या दुसऱ्या रांगेतील जागा कशी पटकावता येईल हे बघतो.

पोरगी नर्सरीत असतानाचा किस्सा आहे.
तिच्या तेव्हाच्या शाळेत प्रत्येकाला स्टेजवर चमकायची संधी दिली जायची. एक नाटक होते ज्यात नर्सरीची मुले म्हणून संवाद नव्हते. फक्त अभिनय करायचा होता. लाकूडतोड्या, गावकरी, पोलिस अशी पात्रे होती तर उर्वरीत सगळ्यांना झाड बनवून उभे केले होते. त्यात लेकीला लाकूडतोड्या बनवले होते. मलाही वाटले की चला हे छान आहे, झाड बनून नुसते उभे राहण्यापेक्षा काहीतरी करेल मुलगी. पण मुले आपल्यापेक्षा वेगळा आणि निरागस विचार करतात. तिला ऐनवेळी रंगीत तालमीला झाडाचा पोशाख आवडला त्यामुळे बाईंना पटवून ती झाड बनली. मी मनातल्या मनात म्हटले छान वेगळा रोल मिळाला होता तर गधडी झाड बनली. पण नंतर नाटकात पाहिले की जरी ती झाड झाली असली तरी नव्याने झालेला लाकूडतोड्या, पोलिस याना त्यांच्या प्रॉम्प्ट करत होती. ते अधेमध्ये विसरत होते आणि ही आपल्या झाडाच्या भूमिकेतून बाहेर पडून त्यांना मदत करत होती. ते बघून लोकही हसत होते आणि मलाही छान वाटले.

त्यातून दोन गोष्टी समजल्या.
एक म्हणजे आपल्या मुलांमध्ये जे काही टॅलेंट असते ते काही लपून राहत नाही.
दुसरे म्हणजे जेव्हा ते स्वत:हून काही ठरवून करतात आणि त्यांना त्यातून आनंद मिळत असतो तेव्हा उगाच त्यात लुडबूड करायला जाऊ नये Happy

भाग घेणाऱ्या मुलांना चॉकलेट ऐवजी छोटीशी वस्तूरुपी बक्षिसे हे चांगले आहे. चॉकलेट त्यांना बक्षीसासारखे वाटत नाही. एखादी वस्तू मिळाली की मुले खुश होतील.

मुलांपेक्षा पालकांनाच आवरावे कसे हा प्रश्न असतो खरा. आपण आयोजक म्हणून असतो तेव्हा आपल्याला पालकांची कटकट वाटते, जेव्हा आपण पालकांच्या भूमिकेत असतो तेव्हा आपल्याला आयोजक फेअर वागत नाही असे वाटू शकते. दोघानी एकमेकांच्या दृष्टीकोनातून विचार करून बघायला हवा.

सर्व मुद्दे पटले ऋन्मेष.
सर्वाना पार्टीसिपेशन वस्तू देणे आणि बक्षीस वाल्यांना भारी वस्तू देणे हा चांगला पर्याय वाटतो.

थोडक्यात, मुलांचा कॉन्फ़िडेंस वाढेल असे सर्व करावे पण don’t go fight their battles, मुलांना त्यांच्या गतीने-कलाने करु द्यावे

जेव्हा ते स्वत:हून काही ठरवून करतात आणि त्यांना त्यातून आनंद मिळत असतो तेव्हा उगाच त्यात लुडबूड करायला जाऊ नये

>>>> ४००००++_

छान लेख आहे. तू आता लेखक आणि व्यक्ती म्हणून मॅचुअर होत चाललास ऋन्मेष. अभिनंदन.

मुलां मधला ताण तणाव, स्पर्धा ही बहुतांशी पालकांनी लादलेली किंवा पियर प्रेशर ने आलेली असते. त्यांना त्यांचं उडू द्यावं की जरा..

पर्सनली ह्या सर्वांतून गेले आहे. ईथे पालकांची १-१ मार्कांवरून जी काय हमरी तुमरी चालायची, त्यानंतर आता हिंदी पेपर तपासणी साठी फक्त पाल्य असतो, पालक नाही. (वार्षिक) पेपर घरी मिळत नाही.
पालकसभा प्रत्येक पाल्य वेळ १५ मिन असला तरी अर्धा तास पालक आपलं घोडं दामटताना पाहिलेत. आमच्यात जे काय ४ प्रश्न विचारायचेत ते मी मनाशी तयारी करूनच जाते, बरोब्बर १५ मिनीटात बाहेर. Happy
हिंदी शिक्षक म्हणतात.. तुम्ही इतर विषयांसाठी असे त्या त्या ( चायनिज) शिक्षकांशी भांडता का? मग देशी म्हणुन आमच्याशीच हमरी तुमरी का? वगैरे.

अगदी अगदी
मुलाच्या अक्ख्या शैक्षणिक आयुष्याची स्ट्रॅटेजी याच पहिली, दुसरी किंवा ज्यूनिअरमध्ये केजीच्या मीटिंगमध्ये सेट झाली नाही तर जगबुडी होईल अश्या अविर्भावात पालक वागत असतात
पण हेच पालक बिहेविअर/न्यूरो प्रॉब्लेम असेल तर मात्र शिक्षकांच्या अगदी व्हॅलिड पॉइंट्सना पण उडवून लावतात.

तू आता लेखक आणि व्यक्ती म्हणून मॅचुअर होत चाललास ऋन्मेष. अभिनंदन

>> तो मुळीच मॅच्युअर झालेला नाहीये. फक्त parenting या एकाच बाबतीत तो आधीपासून खूप सॉर्टेड आहे.

ऋन्मेश तुझ्यातल्या बाबाला सलाम __/\__

थोडक्यात, मुलांचा कॉन्फ़िडेंस वाढेल असे सर्व करावे पण don’t go fight their battles, मुलांना त्यांच्या गतीने-कलाने करु द्यावे>>=+१
१०० अनुमोदन

छान लिहिलयं!

>>थोडक्यात, मुलांचा कॉन्फ़िडेंस वाढेल असे सर्व करावे पण don’t go fight their battles, मुलांना त्यांच्या गतीने-कलाने करु द्यावे
जेव्हा ते स्वत:हून काही ठरवून करतात आणि त्यांना त्यातून आनंद मिळत असतो तेव्हा उगाच त्यात लुडबूड करायला जाऊ नये >>> +१

अजून एक, बरेचदा मूल इंट्रोवर्ट असल्यास त्याचे वर्तन बघून लाजरे आहे, कॉन्फिडन्स नाही असे वाटून उगाच पालक पुश करतात. मुलासाठी मात्र ते सगळे क्लेशकारक होते. प्रत्येक मुलाचे स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते , एक गाभा असतो, तो समजून न घेता मुलाला सर्व गुण संपन्न करायला पालकांचे धडपडणे हे त्या मुलाला एक प्रकारे इजाच पोहोचवते.

लेख छान आहे

थोडक्यात, मुलांचा कॉन्फ़िडेंस वाढेल असे सर्व करावे पण don’t go fight their battles, मुलांना त्यांच्या गतीने-कलाने करु द्यावे>>+१

लेख आणि प्रतिसाद, दोन्ही आवडले.
काही वर्षांपूर्वी आमच्या सोसायटीत १५ ऑगस्टनिमित्ताने होणाऱ्या स्पर्धांमधे स्लो सायकलिंगची स्पर्धा होती. माझ्या मुलाने त्यात भाग घेतला होता. तो तेव्हा पहिलीत वगैरे असेल. इतक्या लहान मुलांची स्पर्धा, तीही सोसायटीच्या पातळीवर म्हणजे खरंतर नुसती मजा मजा असायला हरकत नव्हती. कोण जिंकलं, कोण हरलं याने फरक नाही पडला पाहिजे. पण एका आईने मुलाला स्पर्धा सुरू होऊनही थोडं उशिरा सायकलिंग सुरू करायला लावलं (मागे राहील तो जिंकेल म्हणून). हे कुणाच्या तरी लक्षात आलं आणि मग त्या मुलाला बाद केलं. पालक म्हणून आपल्याला हे शोभतं तरी का? अशा प्रकारे जिंकण्यात कसला आनंद? बरं, स्पर्धा सोसायटीच्या पातळीवरची.

वावे हो, असे बरेच अनुभव आहेत जे लेख लांबू नये म्हणून टाळले होते.
आमच्याकडे एका वर्षी जो पक्षपातीपणाचा आरडाओरडा झाला त्यात तथ्य देखील होते.
ज्या बायका स्पर्धा घेत होत्या त्यांनी प्रश्न मंजुषा स्पर्धेत पाच-पाच जणांचे चार ग्रूप केले होते. आपल्या चौघींच्या मुलामुलींना एका ग्रूपमध्ये घेतले होते. त्यांना काही प्रश्नांची उत्तरे आधीच सांगितली गेली होती. (मुलांचा उतावीळपणा पाहून ते लक्षात आले) त्यातूनही जेव्हा एका ग्रूप सोबत त्यांचे टाय झाले तेव्हा जे एक्स्ट्रा तीन-तीन प्रश्न विचारले गेले ते कमालीचे हास्यास्पद होते. म्हणजे एकाला अमेरिकेचे चलन विचारायचे तर एकाला भलत्याच देशाचे. एकाला वाघाच्या की गाईच्या पोरांना काय म्हणतात हे विचारायचे तर दुसऱ्यांना भलत्याच प्राण्याचे..
त्या दुसऱ्या ग्रूप मध्ये माझी मुलगी होती. मला वाईट नाही वाटले तर त्यांची किव आली.
पण एका गोष्टीचे चांगले वाटले की त्यांच्या ग्रुप मधला पाचवा मेंबर माझी पोरगी नव्हती. अन्यथा अशाप्रकारे जिंकने हरण्यापेक्षा जास्त त्रासदायक असते.

पुढची स्पर्धा स्मरणशक्तीची होती. वस्तू झाकून ठेवणे आणि ओळखणे. त्यात मात्र माझी मुलगी पहिली आहे. मी तेव्हा त्याच बायकांना ऑब्जर्व्ह करत होतो. तेव्हा त्यांचे चेहरे उतरलेले होते. कोण जिंकले हे घोषित करताना सुद्धा अगदी मरगळल्यासारखे केले. चारही तश्या नसतील. एका दोघींचे डोके तसे चालले असेल. बाकी बहकल्या असतील.
(अरे हो, यातील एका बाईने आधीच्या वर्षी आपल्या मुलीचे बक्षीस दुसऱ्या एका रडणाऱ्या मुलीला दिले होते, कुठलाही दिखावा न करता)

घरी येऊन बायकोला म्हणालो देखील, की फार पथेटीक आहेत या बायका.. पण इग्नोर करूया. याला इतके महत्त्व द्यायची गरज नाही.

माझी मुलगी सुद्धा कॉम्पिटिटिव्ह नेचरची आहे. तिला जिंकायला आवडते आणि हरायला आवडत नाही. वाहवत गेले तर हा दुर्गुण आहे आणि कंट्रोल केले तर गुण आहे. एक पालक म्हणून कदाचित तिच्या या मूळ स्वभावावर मी फार कंट्रोल ठेवू शकत नाही. पण जिंकताना गैरमार्गाचा वापर करू नये हे संस्कार देणे हे तरी माझ्या हातात आहे.

बरेचदा मूल इंट्रोवर्ट असल्यास त्याचे वर्तन बघून लाजरे आहे, कॉन्फिडन्स नाही असे वाटून उगाच पालक पुश करतात
>>>>

स्वाती +७८६

घरचा अनुभव आहे. घरात दंगा पण बाहेर लाजरा, मुलगा अगदी असाच आहे. मुलीच्या उलट आहे. पण सुदैवाने तो माझीच कॉपी असल्याने मी जगात कोणापेक्षाही चांगले समजू शकतो की तुम्ही म्हणता तसे त्याला उगाचच मनाविरुद्ध पुश करू नये.
या स्वभावाच्या मुलांवर आणि त्यांच्याशी कसे वागावे आणि कसे वागू नये यावर मी स्वतंत्र लेख लिहू शकतो. जर पालक मुलाचा हा स्वभाव समजू शकले नाहीत तर त्यासाठी खरेच फार इरीटेटींग होऊ शकते.

माझी मुलगी सुद्धा कॉम्पिटिटिव्ह नेचरची आहे. तिला जिंकायला आवडते आणि हरायला आवडत नाही>>> सेम हियर. माझ्या परीने हरणे नॉरमल असते हे सांगायचा प्रयत्न असतो.
ऋन्मेष, हे असे गेम्स अरेंज करून आपल्याच मुलांना त्यात जिंकवायला बघणे, स्वतः परिक्षक असणे, खूप इम्म्यचुअर आहे असं माझं मत. जे प्रश्न सेट करत आहेत त्यांची मुलं गेम मधे नको, असा रुल असायला हवा आयडीयली. पण हे सर्व इग्नोर करायला हवं..मुलांना आयुष्याच्या परीक्षेकरता तयार करायला हवे.

स्वाती-२ नेहमीप्रमाणे उत्तम लिहिलेस.
बरेचदा मूल इंट्रोवर्ट असल्यास त्याचे वर्तन बघून लाजरे आहे, कॉन्फिडन्स नाही असे वाटून उगाच पालक पुश करतात. मुलासाठी मात्र ते सगळे क्लेशकारक होते. प्रत्येक मुलाचे स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते , एक गाभा असतो, तो समजून न घेता मुलाला सर्व गुण संपन्न करायला पालकांचे धडपडणे हे त्या मुलाला एक प्रकारे इजाच पोहोचवते.>> +११११