परतीचा पाऊस - ए शॉर्ट ऍण्ड स्वीट लव्ह स्टोरी :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2024 - 15:35

त्या दिवशी परतीचा पाऊस होता. संध्याकाळी ऑफिस मधून परतायची वेळ झाली होती. पण अंधारून इतके आले होते की नाईट शिफ्ट करून बाहेर पडलो की काय असे क्षणभर वाटून गेले. रात्री अंधाराची भीती वाटत नाही. कारण मुळात तो नसतोच. रस्त्यावरचे दिवे परिसर उजळवत असतात. पण अकाली अंधारून आले की त्या दिव्यांची सुद्धा सोबत नसते. पक्षी सुद्धा बावरून जातात आणि वेगळाच किलकिलाट करू लागतात. काळजात थोडेसे धस्स व्हावे असे वातावरण. बस याच वातावरणात मी ऑफिसमधून बाहेर पडलो.

आपण उंबरठा ओलांडावा आणि दरवाज्यामागे दबा धरून लपलेल्या कोणीतरी आपल्याला भ्वाँsव करून दचकावावे.. अगदी असाच पाऊस सुरू झाला. छत्री उघडतानाही तारांबळ उडाली. त्याही परिस्थितीत देवाचे आभार मानले, जे आज छत्री आणायची सुबुद्धी दिली होती. अन्यथा हा परतीचा पाऊस नेहमी खिंडीत गाठतो.

कोणत्याही वस्तूची किंमत त्या त्या वेळेला असते. भले सकाळच्या घाईघाईत जी हाताला लागली ती उचललेली लेडीज का असेना, पण छत्रीने सुखरूप स्टेशनला पोहचवले. तिथून फक्त दोन स्टेशन. त्यामुळे गर्दीचे काही वाटत नाही. ट्रेनच्या या दरवाजातून शिरायचं आणि त्या दरवाज्यातून बाहेर पडायचं. गर्दीतून हे आठ पावलांचे अंतर कापेपर्यंत दुसरे स्टेशन येतेही.

ते आले. मी उतरलो. आणि जिना ओलांडून बाहेर पडलो. बघतो तर काय. समोर ही गर्दी. जणू मागच्या दहा ट्रेन भरून आल्या आणि सारा लोंढा एकाच जागी टाकून गेल्या. कोणी स्टेशनच्या बाहेर पडायला तयारच नाही. कारण अर्ध्याअधिक जनतेकडे छत्री नव्हती. आणि पाऊसाचा जोर एवढा की छत्री असलेल्यांकडेही त्या पावसात उतरायची हिम्मत नव्हती.

माझ्याकडेही नव्हती. मी सुद्धा छत्री बॅगेत ठेवून पाऊस कमी व्हायची वाट बघत शांतपणे उभा राहिलो.

छत्री बॅगेत ठेवण्यामागे दोन कारणे. एक म्हणजे छत्री असूनही जात नाही, काय बावळट्ट आहे हा, असे कोणाला वाटू नये.
दुसरे म्हणजे जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा कोणी आपल्या छत्रीत लिफ्ट मागू नये.

तसे कोणाला छत्रीत लिफ्ट द्यायला माझी काही हरकत नसते. पण देत नाही याची पुन्हा दोन कारणे. एक म्हणजे मी कितीही भिजलो तरी चालते, पण मला माझे बूट भिजलेले आवडत नाहीत.
दुसरे म्हणजे छत्रीत लिफ्ट मागणारे सगळे मेले पुरुषच निघतात.

पावसाचा जोर कमी होताच मी निघालो. चालत गेलो तर अगदी तीन-चार मिनिटांवर घर आहे. पण अश्यावेळी तेच नकोसे वाटते. कारण पावसात चालणे नकोसे वाटते आणि जवळच्या भाड्याला कोणी रिक्षावाला तयार होत नाही. सगळ्यांना लांबचे गिऱ्हाईक हवे असते. असे वाटते खोटेच दूरचे ठिकाण सांगावे, पटकन रिक्षात बसावे, आणि आपले घर येताच टुणकन उडी मारून उतरावे. त्यानंतर रिक्षावाल्याने दिलेल्या आठ शिव्या, चार खाऊन आणि चार पार्सल घेऊन घरी जावे.

पण असे वागायची हिंमत सर्वामध्ये नसते. माझ्यातही नाहीये. मी तिथेच बावळटासारखा उभा राहिलो.

रिक्षा स्टॅन्डला कुठलेही छप्पर नव्हते. वरतून आभाळ कोसळत होते. अंधुकसा प्रकाश होता. हातात छत्री होती. बुटांवर एव्हाना पाण्याचे हजार शिंतोडे उडाले होते. पण अश्यावेळीच आपले खरे कॅरेक्टर टेस्ट होते म्हणत मी शक्य तितके चिडचिड न करता उभा होतो.

पावसाचा जोर पुन्हा थोडा वाढला होता. रिक्षा मिळायची आशा सोडली होती. रस्त्याने पाण्याचे पाट वाहत होते. ते आधीच भिजलेल्या बुटांनी तुडवत घरी जावे की पुन्हा एखादा आडोसा शोधावा या संभ्रमात मी जागीच छत्री घेऊन थिजलो होतो.

आणि अचानक तो चमत्कार घडला, ज्यासाठी लेखात इतकी भलीमोठी वातावरणनिर्मिती केली आहे. अन्यथा शतशब्दकथा लिहावी इतका छोटा प्रसंग होता.

"छत्रीत येऊ का?"

एक मंजूळ आवाज कानावर पडला...

आणि तो आवाज कुठून आला याचा शोध घेईपर्यंत तो माझ्या छत्रीत येऊन विसावला सुद्धा.

इतकी औपचारिक परवानगी??
जणू नाकारण्यात येणार नाही याची शंभर टक्के खात्री होती.
आणि का नाही? एखादा मूर्खच अशी परवानगी नाकारू शकतो. आणि ते कुठेही माझ्या कपाळावर लिहिलेले नव्हते.

आरस्पानी सौंदर्य! जे माझे भर पावसात पाणी पाणी करून गेले. अचानक वातावरण बदलले. अगदी आता लिहितानाही शब्द सुचत नाहीयेत. पण त्याक्षणी जगातल्या सर्व रोमँटिक भावना एकाचवेळी मनात उचंबळून आल्या. टिप टिप बरसा पाणी, पाणी ने आग लगाई असे का म्हणतात याचा साक्षात्कार झाला. पिक्चरमध्ये अशा सिच्युएशनला गाणी का टाकतात हे प्रत्यक्ष अनुभवत होतो. बॅकग्राऊंडला एक गाणे माझ्याही डोक्यात वाजत होते. प्यार हुआs इकरार हुआs प्यार से फिर क्यू डरता है दिल.. हाऊ रोमँटीक.

इतक्यात तिचा मोबाईल खणखणला. रिंगटोनचाही तितकाच मंजूळ आवाज. तिच्या आईचा फोन होता. भर पावसात मुलगी कुठे अडकली. आईलाच चिंता. ती हसूनच म्हणाली, मी सुखरूप आहे आई. छत्री नेली नाही, पण एका छत्रीत लिफ्ट मिळाली आहे. आणि तिरप्या नजरेनेच माझ्याकडे बघत पुन्हा हसली. कोई लडकी हैs जब वो हसती हैs बारीश होती है.. क्रम काहीतरी चुकत होता.

अचानक वारा बेभान झाला. सपासप आडवा तिडवा मारा करू लागला. आणि ती अजून जवळ सरकली. आता तर बाह्यांचा बाह्यांना स्पर्श होऊ लागला. या बायांना काहीच कसे कळत नाही. ईथे माझी छाती धडधडू लागली. आपण घराच्या जवळ आहोत, विवाहीत आहोत, कोणी पाहिले तर त्याला काय वाटेल, हा विचार क्षणभरच मनात आला आणि दुसऱ्याच क्षणाला झटकला गेला.

चॅनल बदलले गेले. उचंबळून आलेल्या हृदयाने नवीन फ्रिक्वेन्सी पकडली. आणि बॅकग्राऊंडला डोक्यात नवीन गाणे वाजू लागले. आज रपट जाये तो हमे ना उठय्यो.. असे म्हणत तिथेच फिसल जावेसे वाटू लागले.

एखाद्या अनोळखी पुरुषाच्या छत्रीत बिनधास्त लिफ्ट घेणाऱ्या त्या मुलीच्या हिमतीचे कौतुक करावे. की अंधुकश्या प्रकाशात आपले सौंदर्य तिने बरोबर जोखले या गैरसमजात हुरळून जावे या संभ्रमात पडलो. पण कसेबसे भावनांवर नियंत्रण मिळवले. आणि मनातले भाव ओठांवर येणार नाही याची पुरेपूर काळजी घेत तिला विचारले, "तुम्हाला कुठे जायचे आहे??"

अंधारात वीज चमकावी तसे तिने माझ्याकडे पाहिले. आणि त्याच विजेचा झटका बसावे तसे निमिषार्धात माझ्यापासून कोसो दूर सरकली. तिच्या डोळ्यात लख्ख अविश्वास दिसत होता. क्षणभरच बघितले आणि माझ्याकडे पाठ करून चालू लागली. ते पुन्हा फिरून न बघण्यासाठीच. मनातल्या मनात दोन चार वेळा पलट बोलून पाहिले पण त्याचा काही फायदा झाला नाही. छण्ण से जो टूटा कोई सपना म्हणत डोक्यातली सगळी गाणी एका फटक्यात शांत झाली.

आपले काय चुकले? काही चुकीचा प्रश्न विचारला का? तिला आपला आवाज नाही आवडला का? याच विचारात घरी पोहोचलो.

बायकोने मला विचारले, अरे आज लवकर परत आलास..

हो, तुझ्याकडेच परत आलो..
असे म्हणून मी तिच्या अंगावर ऑफिसची बॅग भिरकावली आणि तिने माझ्या अंगावर टॉवेल भिरकावला.

आधी तुझे ते जंगल पुसून घे नाहीतर घरभर पाणी करशील.
असे तिने दटावताच मी केस पुसायला सुरुवात केली आणि अचानक डोक्यातील बत्ती पेटली.. आई ग्ग!

आदल्या दिवशीचाच तर किस्सा. ऑफिसमधील एकजण परदेशवारी करून आले होते. आणि आपण फिरून आलो हे जगाला ओरडून सांगायचे एक शास्त्र असते म्हणून चॉकलेट वाटप करत होते. ते वाटपाचे काम नवीनच रुजू झालेल्या एका ऑफिस बॉयवर सोपवले होते. आपण नेमके तेव्हा एका कॉलवर बिजी होतो. तेव्हा नाही का तो आपल्या मागाहून आला आणि म्हणाला...
मॅडम चॉकलेट!

- Runmesh

Screenshot_2024-09-25-21-40-37-06_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास Lol

सही!!!!

पण रोजचा ऑफिस बॉय कसा फसला बुवा? की त्याचा पहिलाच दिवस होता?

Lol
लेडीज छत्रीची कमाल

शर्मिला ऑफिस बॉय नवीन होता. लिहिले आहे तसे लेखात. आणि तसेच प्रत्यक्षात होतेही. किंबहुना लेखातला शब्द न शब्द सत्यघटना आहेत. घरी बायका पोरांना छत्री आणि ऑफिस बॉय दोन्ही किस्से सांगताना लक्षात आले की हे तर आपले ऋन्मेष स्पेशल धागा मटेरिअल आहे Happy

शर्मिला ऑफिस बॉय नवीन होता. लिहिले आहे तसे लेखात. >>ओह! तुमचं लिखाण वाचायची एवढी घाई केली नं, की 'नवीनच रुजू झालेल्या ' शब्द वाचायचे राहिले घाईत.

मृणाली, वंदना. झकासराव. आर्च.. धन्यवाद

झकासराव पोपट दोन्ही पार्टीचा होतो.. पण प्रत्येक केसमध्ये एक पार्टी म्हणजे मी कॉमन असतो Happy

वाह!!!
>>>> या बायांना काहीच कसे कळत नाही. ईथे माझी छाती धडधडू लागली.
Lol Lol

मस्त , आवडली ! आधी दोन मिनिटे शेवट कळला नव्हता पण मग फोटो पाहिल्यावर लक्षात आला Lol

Lol मस्त रे.
हिमतीचे कौतुक करावे. की अंधुकश्या प्रकाशात आपले सौंदर्य तिने बरोबर जोखले या गैरसमजात हुरळून जावे या संभ्रमात पडलो.>>> ह्या वाक्याला खूप हसले Lol
टिप टिप बरसा पाणी>>> हिंदीत पानी लिहतात Happy

Pages