पिक्चर सुरू होताच खोकला झालेला कावळा ओरडावा तसला आवाज येतो. दोन गणवेषधारी आणि त्यांच्यासोबत डोक्याला बंडाना आणि डोळ्यांना गॉगल (रात्री!) असा एक माणूस (महेश आनंद) गेटवे ऑफ इंडियाच्या पुढ्यात उभे असतात. आता हे गणवेष नेमके बँडवाल्यांचे, मिलिटरीचे की अजून काही हे मला माहिती नाही. पण तशातच तसलाच गणवेष घालून समोरून रामी रेड्डी उर्फ चिकारा येतो. चिकाराचा चेहरा पाहून त्याला हमदर्द का सिंकारा द्यावं असा विचार डोक्यात येऊन गेला. कावळ्याचा खोकला वाढत जातो. यांच्यासोबत आता अजून एक माणूस वेटरचे कपडे घालून गळ्यात लाल स्कार्फ घालून येतो आणि म्हणतो 'वेल्कम टू लिस्या, कर्नल चिकारा का स्वागत है'. ( लिस्या?? रशियामधे पण गेटवे बांधला की काय? ) कर्नल म्हणतो इथल्या हवेत फार शांतता आहे तर आता मी त्यात विष कालवणार. लाल स्कार्फ ( राज मधल्या दिनो मोरयाच्या थाटात ) म्हणतो बाकी बर्याच देशांना केलंस तसं या देशाला पण बरबाद कर. सगळं तयार आहे - खुफिया पॅलेस ( आख्खा पॅलेस खुफिया??? ), लॅब, बारूद वगैरे. या तत्परतेचं बक्षीस म्हणून चिकारा लालस्कार्फला मारून टाकतो. वर म्हणे तू स्वतःच्या देशाचा नाही झालास तर माझा काय होणार! आणि एकदम कॅरिकॅचर्स असलेली टायटलं सुरू होतात. त्यात मधे मधे मासिकांमधून कापलेल्या रँडम बायकांचे फोटो वगैरे पण आहेत.
टायटलं संपवून पिक्चर गियर बदलून एकदम 'दिनानाथ सबकुछवाला' अशी पाटी दाखवतो. हा नाटकसिनेमावाल्यांना कपडे भाड्याने देत असतो आणि कुठल्याही वस्तू गिरवी ठेवून घेत असतो. अर्थातच इथे आपल्याला 'दिल' मधलाच अनुपम खेर थोड्या वेगळ्या फॉर्मॅट मधे दिसतो. हा भयंकर कंजूस असतो. इतका की त्या भाड्याने द्यायच्या कपड्यांमधलेच कपडे वापरत असतो. म्हणजे अगदी पार त्या कॉश्च्युमबरोबर असलेल्या टोप्/हॅट वगैरे सकट. कधी गब्बर, कधी शिंगांच्या टोपीसकटचा यमराज, कधी एअर इंडियाचा महाराजा तर कधी सुपरमॅन अश्या विविध कॉश्च्युममधे तो आपल्याला पिक्चरभर दिसतो. अक्षय कुमार उर्फ विकास याचा मुलगा असतो आणि पुरता उधळ्या आणि गुणउधळ्या असतो. गेली पाच वर्षं तो एकाच वर्गात असतो म्हणे. एकदम विकासची एंट्री! ती पण बॉक्सिंगच्या रिंगणात कोण्या सँबोला हरवत. आता गुण दाखवायचे म्हणजे इतकं हवंच. त्याच्यासोबत त्याची हिरोईन म्हणून आयेशा झुलका देखील आहे. थोडक्यात यांच्या लव्हस्टोरी मधे पिक्चरवाले वेळ घालवणार नाही आहेत. तर या विकासला पास व्हायचं नाहीये कारण त्यानंतर त्याचे बाबा त्याला त्यांच्या कबाडी बिझनेसमधे त्याला ओढतील अशी त्याला भीती आहे. पण पास नाही झालं तर बाबा हाणतील ही भीती पण आहे. म्हणून तो एका खोट्या पेपरात तो युनिव्हर्सिटी मधे पहिला आल्याची बातमी छापून घेतो आणि हा पेपर घरी टाकवून घेतो. पास झाल्याचं नाटक करून वडिलांकडून पार्टीसाठी १०,००० रूपये पण उकळतो. १०,०००? १९९३ मधला हा पिक्चर. ही मुलं नक्की कुठे कसली पार्टी करणार आहेत याची मला उत्सुकता लागली. पण ही पार्टी कधीही होत नाही. पता लगाओ दया उन १०,००० रूपयोंका क्या हुआ?
इकडे आयेशा आणि ममता (कुलकर्णी ) साळसूदपणे चुडीदार घालून 'मिडी.स्कर्ट पहनने दो' असले बोर्ड घेऊन तसल्याच घोषणा देत असतात. ममता तिची बहिण असते म्हणे. याआधीच्या सीन मधे आयेशाने स्कर्ट घातला आहे खरंतर. विसरली वाटतं ती. ही नारेबाजी त्या स्वतःच्या घरासमोर आईवडिलांविरूद्ध करत असतात. पात्रपरिचय असा आहे. यांचा बाबा टिकू तलसानिया आहे जो 'ते.रा. विद्रोही' नावाचा नेता असतो. याला सगळे जुहूचा नेता म्हणून ओळखत असतात. शुभा आणि विजू ही खोटे भावंडं इथेही भावंडं आहेत. अर्थात टिकूची बायको शुभा आहे. विजू पोलिस आहे. तर एकूण या सीनला काही अर्थ नाही. पालक नाईलाजाने त्यांच्या मागण्या माफ करतात आणि यानंतर पिक्चरभर या पोरी मिडीच्या नावाखाली मिन्या घालून बागडतात.
विकासने एकच पेपर चुकीचा छापून घेतला होता म्हणजे खरं तर एकाच पेपरात ही बातमी आलेली असायला हवी ना? पण समहाऊ अनुपम खेरकडे बरेच पेपर असतात आणि त्यांच्यात याचा फोटो आलेला असतो. यालाच फोटोसिंथेसिस म्हणतात का? पण कोणीतरी खरा पेपर आणून दाखवतं आणि त्यात फक्त मुजरिम चिकाराचा फोटो असतो ( मला वाटलं विसरले की काय पिक्चरवाले त्याला. पण नाही! ). विकास निवांत आयेशाबरोबर गाणी म्हणत उधळलेला असतो ( या गाण्याच्या शेवटी पण गाईगुरं आहेत. मला एकदम यारा दिलदारा आठवला. रम्य तो ९०ज चा काळ! ). गाणं संपवून तो घरी येतो, मग खेरबाबाचं रागावणं, विकासचं आत्महत्येचं नाटक वगैरे वगैरे. सारांश हा की विकास मार खाण्यापासून वाचतो. खेरबाबाचा मुन्शी ( याला हा कंजूस खेरबाबा पगार तरी देत असतो का? ) त्याला म्हणतो की माझ्या हरियाणातून आलेल्या भाच्याला कॉलेजमधे अॅडमिशन हवी आहे तर प्लीज त्याच्यासाठी शब्द टाकता का?
एंटर आपला दुसरा हिरो सुनील उर्फ सुनील शेट्टी! हा स्वप्नात पण मारामारी करत असतो. या गरम डोक्यापायी त्याची हरियाणातल्या सगळ्या कॉलेजेसमधून हकालपट्टी झालेली असते. सुनीलचा ताऊ त्याला शपथ घालतो की इथे मुंबईत ( लिस्या मधे मुंबई पण आहे?? ) मारामारी करायची नाही. शिवाय सुनील बावळट दिसावा ( अजून? ) म्हणून त्याचे केस तेल लावून चप्प बसवून, त्याला तीट लावून, चष्मा लावून, सायकलवर बसवून ताऊ कॉलेजला पाठवतो. सुनील फक्त एक फाईल घेऊन कॉलेजला जातो. असं फाईल घेऊन कॉलेजात कोण जातं? जाताजाता सुनीलला दिसते ममता आणि तिची बंद पडलेली गाडी. मग जॅक नसणे, सुनीलने हातानेच गाडी उचलून धरणे आणि तिने टायर बदलणे वगैरे यथासांग पार पडतं. अर्थात सुनील विकासच्याच कॉलेजला जातो. मग रॅगिंग. बाकी फुटकळ पारंपारिक रॅगिंग करून झाल्यावर नेहमीचा फायनल राऊंड म्हणून ते त्याला ममताची फिगर विचारायला पाठवतात. हेतू हा की ती याला कुटेल. ती यांच्या ग्रूपमधे असल्याचा अजून तरी काही पुरावा मिळाला नाहीये. पण आपण ते गृहीत धरायचं. पण पोरगी असते या मानवी जॅकवर इंप्रेस्ड! त्यामुळे ती त्याच्या हातावर फिगर लिहीते ( पण मी इथे ते आकडे लिहीत नाही. उगाच गोष्टी भलत्याच वळणाला जायच्या! ). नंतरही कँटीनमधे विकास आणि गँगचे रॅगिंगचे प्रयत्न ममता हाणून पाडते. मग गाणं हवंच. पुन्हा एकदा 'बिन तेरे सनम' ची आठवण अपरिहार्य होती. गाण्यात गवत, तंबू, कॅम्पफायर असे सगळे आयटम आहेत. वर पुन्हा स्वप्नरंजन - त्यात मजनूच्या रोल मधे असल्याने मळके, फाटके कपडे घातलेला सुनील. मागे चक्क वाळवंटाचं चित्र आहे. स्वप्नं पण गॅदरिंगटाइप पाहतात हे!
रॅगिंग चालूच राहतं. पण ताऊच्या शपथेमुळे सुनील मारामारी करत नसतो. ममता वैतागते आणि सुनीलला बांगड्या देते. सुनीलच्या हातात बांगड्या चांगल्या दिसणार नाहीत म्हणून तो ताऊकडून एका फाईट पुरती परवानगी घेतो - ते ही समोरच्याने आधी उचकवलं तरच. सुनील एकदम टकाटक गॉगल बिगल घालून ( फाईल न घेताच ) कॉलेजला जातो. विकासला उचकवतो. पण विकास काही केल्या त्याचं रॅगिंग करत नाही. असं दोन-चारदा होतं. फायनली स्टोरी पुढे जात नाहीये असं बघून विकास सुनीलची सायकल मोडतो आणि दोघंही अत्यानंदाने आरोळी मारून मारामारीला सुरूवात करतात. विकासच्या आयुष्यात टोपीचं काहीतरी अनन्यसाधारण महत्त्व असावं. तो स्वतः टोपी घालून मारामारी करतोच, पण फेअर फाईट असावी म्हणून बहुधा सुनीलला पण एक टोपी देतो. खूप ठिकाणी जाऊन मारामारी केल्यावर एका पॉईंटला अर्धवट बांधलेल्या बिल्डींगवर मारामारी करतात, विकास पडतो, सुनील त्याला वाचवतो. लगेच दोस्ती! आता डबल्स वालं गाणं पण हवंच! त्यात मग प्रत्येक कडव्यात पोरींचे एकमेकींना आणि पोरांचे एकमेकांना मॅचिंग कपडे असायलाच हवेत. एकदम टिपिकल ९०ज च्या फॅशन्स. क्रेपच्या झिरमिळ्यांची उधळण. मागे उगाच नाचणार्या पोरापोरींचा जथ्था ( त्यातल्या एका मुलीचा ड्रेस आधीच्या गाण्यातल्या ममताच्या ड्रेसमधल्या उरलेल्या कापडाचा बनवला आहे असा मला संशय आहे ). अरे त्या चिकाराला विसरले की काय सगळे खरंच? हा नाच चालू असताना मुलींचा बाप बघतो. आता तो गाडीतून उतरून पोरींना दोन-दोन रट्टे मारून गाडीत घालून घरी घेऊन जाईल असं माझ्या ममव मनाला वाटलं. पण तसं होत नाही. तो एकटाच घरी जातो.
मनकवडे असल्यागत पिक्चरवाले आता चिकाराचा अड्डा दाखवतात. चिकाराची माणसं एका माणसाच्या तोंडाला काळं कापड बांधून आणतात. कापडाखालून सँबो निघतो. त्याचे बाबा म्हणे कुठल्याश्या रिसर्च सेंटर मधे कामाला असतात आणि त्याला रिसर्च सेंटरचा चप्पा चप्पा माहिती असतो. का? लहानपणापासून खेळायला जात होता का तिथे? खोकला झालेला कावळा रिटर्न्स. चिकारावर फोकस. चिक्या त्याला सांगतो की मी साम्राज्य नसलेला सम्राट आहे. पण नेताजी रामगोपाल वर्मा मेल्यावर मी या देशावर राज्य करेन! का का का? देश या एकट्या नेत्याच्या जीवावर चालतोय असं सांगितलंय का त्याला कोणी? बहुतेक चिकाराला नुसताच रामगोपाल वर्मा अपेक्षित असावा. पुढे जाऊन त्याने 'रामगोपाल वर्मा की आग' काढू नये म्हणून सारा खटाटोप! पण हे साम्राज्य मिळवायला त्याला क्रिप्टन बाँब पहिजे. आणि हे क्रिप्टन आणि बाँब बनवण्याचा फॉर्म्युला दोन्ही त्या रिसर्च सेंटर मधे असतं म्हणे. रिसर्च सेंटर आहे की डिपार्टमेंटल स्टोर? सँबो म्हणतो मी नकाशा देतो पण तिथे खूप कडक सिक्युरिटी असते. चिकारा रात्री रिसर्च सेंटरला खरेदीला जाणं नक्की करतो.
इकडे टिकू दोन्ही मुलींना उजवायच्या विचाराने पहिल्यांदा खेरबाबाला भेटायला जातो. आयेशाचं लग्न विकासशी लावून देण्यासाठी प्रपोजल मांडतो. खेरबाबा त्याच्या हातात एक फाईल देतो ( या पिक्चरमधे कोणालातरी फाईल्स खूप आवडत असल्या पाहिजेत ) त्यात त्याने आत्तापर्यंत विकासवर जो खर्च केला आहे त्याची बैजवार यादी असते. तेवढा द्या आणि विकास तुमचा असं त्याचं मत. झालं! रिश्ता पक्का होतो. आता टिकू ममताला सुनीलचा पत्ता विचारतो. ती म्हणते तुम्ही कष्ट घेउ नका, मी त्याला इकडेच बोलावलं आहे. सुनील त्याची वर्ल्डफेमस फाईल घेऊन येतो. आधी टिकूला वाटतं त्याने पण यादी आणली आहे. पण तसं नसतं ( अर्थात! फाईल रिकामीच असणार!! ). पण मग त्याला कळतं की तो मुन्शीचा भाचा आहे वगैरे. मग त्याला आठवतं की आपला खडूस बापाचा रोल वठवायचं राहिलं आहे. तो सुनीलला अट घालतो की सहा महिन्यांच्या आत स्वतःच्या कमाईतून एक घर घेऊन दाखव, मग देईन लग्नाला परवानगी. हे असं बरोबर नाही, एकाला एक नियम दुसर्याला वेगळा! सुनील म्हणतो 'चॅलेंज अॅक्सेप्टेड!'
---------------------------------------------------------------------
रात्री चिकारा चिक्कार माणसं ट्रकमधे भरून रिसर्च सेंटरला जातो. सेंटरला जबरदस्त सिक्युरिटी म्हणून ४ मिलिटरी सदृश दिसणारी माणसं बंद गेटबाहेर गस्त घालत असतात. खोकरा कावळा पुन्हा एकदा ओरडायला लागतो. चिकारा काय त्याला टोपीखाली बाळगत असतो की काय? चिकारा लांबूनच चौघांना आरामात गोळ्या घालतो. आत्तापर्यंत बंद वाटणारं गेट उघडंच असतं असं आपल्या लक्षात येतं. चिकारा आणि कं. गोळ्यांचा वर्षाव करत निवांत आत घुसते. आत ४-५ शास्त्रज्ञ लगबगीने जमा होतात. चिकारा त्यांना आपली मागणी सांगतो. अर्थात ते नकार देतात. मग चिकारा टपाटप एकेका शास्त्रद्याला गोळी मारतो आणि गोळी लागायच्या आधीच वेडीवाकडी तोंडं करत ते टपकतात. राहिलेला शास्त्रज्ञ क्रिप्टन आणि फॉर्म्युला द्यायला तयार होतो. मग तो एका दाराशी जातो. दाराबाहेर चक्क एक कॅल्क्युलेटर लावलेला असतो (फंडिंग कमी पडलं असावं). आपल्याला पॅनलवर रूट, एम+ वगैरे सारख्या गोष्टी नीट दिसतात. शास्त्रज्ञ त्यात आपलं कार्ड घालतो, नंबर टाकतो आणि दार उघडतं. मग खोलीतला मेटलचा गोळा आपोआप उघडतो आणि आतून बाहेर येते क्रिप्टनची फ्लोरोसंट बाटली! अरे तो क्रिप्टन इनर्ट गॅस आहे! तो वॉटरबॅगमधे भरून त्यापासून बाँब कसा बनवणार असतात? त्यापासून फारतर काही ट्यूब्ज वगैरे बनू शकतील. पण चिकारा या सगळ्याच्या पलिकडे आहे. हा सो कॉल्ड रेडिओअॅक्टिव क्रिप्टन एका बॅगपॅक मधे ठेवला जातो ( मग इतका वेळ या लोकांनी त्याला त्या मेटलच्या गोळ्यात कशाला ठेवला होता? ) शास्त्रज्ञ त्याला फॉर्म्युला लिहीलेला बटर पेपर पण देतो. त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाल्याने चिकारा त्यालाही मारून टाकतो आणि सगळ्यांना वेगवेगळे निघून हेडक्वार्टरला भेटायला सांगतो.
सगळीकडे पोलिसांचे चेकनाके लागतात. ज्या क्रिप्टनसाठी इतकी यातायात केली तो चिकाराने कॅज्युअली सँबो आणि अजून एका आपल्या माणसाकडे दिलेला असतो. आता या माणसाचा युनिफॉर्म पाहून वास्तविक पोलिसांना एरवीच संशय येईल. पण त्याचं चिकाराला काय? सँबोच्या गाडीच्या पुढेच विकास आणि सुनील ओपन जीपमधून चाललेत. विकास त्याला सांगत असतो की तू मला किडनॅप करून माझ्या बापाकडून पैसे घे म्हणजे तुझा प्रॉब्लेम सुटेल. यांच्या या गप्पा सँबोला अगदी नीट ऐकू येत असतात. चेकपोस्टला असतो नेमका विजू खोटे. तो विकास-सुनीलला ओळखतो हे पाहून सँबो क्रिप्टनची बॅग ( ही खरंच लहान मुलांची TMNT ची बॅग आहे! ) यांच्या जीपमधे टाकतो. ही विकासला सापडली तर वगैरे असले विचार कोणाच्याही डोक्यात येत नाहीत. विकास घरी पोचल्यावर त्याचा नोकर जीपमधल्या सग्गळ्या गोष्टी घरात नेताना धडपडतो आणि क्रिप्टन अलगद बॅगमधून बाहेर येऊन बहुधा खुर्चीखाली वगैरे जातो. अरे तुटक्या चेनची बॅग होती का काय? कोणाला जबाबदारीची कसली जाणीव म्हणून नाहीच! सँबोबरोबर जो माणूस असतो तो म्हणे कमांडो असतो. या रँक कशा ठरवल्यात ते पहायला हवं. तो क्रिप्टन विकासच्या घरी गेल्याची खुशखबर चिकाराला देतो. चिडलेल्या चिक्याला सँबो सांगतो की मालक, तो आपल्या वळखीचा मानूस हाय. वेळवखत पाहून आन्तो की क्रिप्टन त्याच्या जीपमधून. जसा काही लपवलाच होता याने क्रिप्टन जीपमधे!
इतका सिरीअस प्लॉट आपल्याला झेपणार नाही या विचाराने बहुधा पिक्चरवाल्यांनी मधेच विकासचे मित्र खेरबाबाला फसवून १०,००० रूपये कसे उकळतात असा एक सिक्वेन्स घातला आहे. अरे यार, १०,००० च्या खाली कोणी बोलतच नाही या पिक्चरमधे! मग पार्टी म्हणून कुठल्याश्या वस्तीत ढोल ताशे वाजवत, कसलीशी पांढरी भुकटी उधळत आणि कसलासा पांढरा द्रवपदार्थ गटकत गाणं सुरू होतं. बरं, तो पांढरा द्रव घशात कमी आणि बाहेरच जास्त सांडतो. मला संशय आहे की भांग म्हणून यांना ती पांढरी भुकटीच अश्वत्थामा स्टाईल पाण्यात मिसळून दिली असणार. ही मधेच रंगपंचमी आली की शिवरात्र हे काही मला समजलं नाही.
गाणं झाल्यावर हिरो, हिरवीणी आणि फ्रेंड्स विकासच्या किडनॅपिंगचा प्लॅन पक्का करत असतात. दुसर्या दिवशी आयेशाच्या वाढदिवसाची पार्टी असते तर त्या पार्टीतूनच त्यांच्या मित्रांनी विकासला पळवावं असं ठरतं. इथे पुन्हा रेस्टॉरंटबाहेर गाडी उभी करून सँबो यांचं सगळं सगळं बोलणं ऐकत असतो. सँबो आहे की डेडली आत्या ?
आयेशाच्या पार्टीसाठी सगळे गेलेत हा चान्स साधून सँबो विकासच्या घरात क्रिप्टन शोधायला घुसतो ( हा जीपमधे शोधणार होता ना? ). अर्थातच त्याला रिकामी बॅग मिळते. इकडे विकासचं किडनॅपिंग होतं. आपल्यासोबत विकास आयेशाला पण घेऊन जातो. नेहमीप्रमाणेच यांना मित्रांनी नव्हे तर सँबो आणि कमांडोने किडनॅप केलेलं असतं.
सगळी पालक मंडळी काळजीत असताना इकडे हा ९०ज चा पिक्चर आहे याचं भान ठेवून सॅंबो उघड्या विकासचे हात बांधून त्याला लटकवतो आणि फटकवतो आणि विचारतो की क्रिप्टन कुठाय? अर्थात त्याला माहिती नसतं त्यामुळे आता विकासला अजून मारावं की आयेशाला या संभ्रमात सँबो पडतो. मग तिथे एका हाताला सोनेरी मोजा घातलेला एक गणवेषधारी येतो आणि म्हणतो की या दोघांना कर्नलसाबकी दरबार में पेश करायचंय. सँबो त्याला म्हणतो थांब, मी सुनीलला पण घेऊन येतो. कशाला? पार्टी करायची आहे का? विकास-आयेशाला चिक्याच्या खुफिया पॅलेसमधे नेतात. इतका मार खाऊनही विकास टवटवीत दिसत असतो. या असल्या माणसाच्या जीपमधे क्रिप्टन टाकल्याबद्दल चिकारा त्या कमांडो नामक माणसाला देहदंड सुनावतो. तो सोनेरी मोजेवाला पुढे येतो आणि मोज्याच्या हाताने कमांडोचं डोकं दाबतो. आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तो मेटलचा हात आहे असं दाखवायचं आहे यांना! अरे त्या मोज्याला सुरकुत्या पडताहेत त्यांचं तरी भान ठेवायचं!! सोनेरी मोज्याच्या मसाजमुळे कमांडो मरून जातो.
जीवावर उदार सँबो सुनीलला घेऊन यायला जातो. जाऊन त्याला विचारतो की क्रिप्टन कुठाय? वर पुन्हा त्याला हेही सांगतो की विकास-आयेशा उनके कब्जेमें आहेत. मग दोघं फायटिंग फायटिंग खेळतात. खेळून झाल्यावर सुनील सँबोला म्हणतो मी क्रिप्टन शोधून आणतो, पण या दोघांना काही नाही झालं पाहिजे. सँबो त्याला दुसर्या दिवशी ५ वाजता पुणे हायवेवर क्रिप्टनसह भेटायला सांगतो. सुनील विकासच्या घरी जाऊन शोधाशोध करतो. खेरबाबाकडच्या कबाडमुळे त्यांना आधी काही सापडत नाही. मग सुनीलच्या डोक्यातला क्रिप्टन पेटतो आणि तो सांगतो लाईट बंद करा म्हणजे क्रिप्टन सापडेल. पहा! वाटलं होतं का सुनील इतका हुशार असतो असं? अंधार झाल्यावर क्रिप्टन दिसतो. सगळ्यांच्या चेहर्यावरचं कौतुकही क्रमाक्रमाने दिसतं. आता पोलिसांपासून वाचवून क्रिप्टन न्यायचा कसा?
खेरबाबा कुत्रे पकडणारी गाडी (कुत्र्यांसकट) घेऊन सुनील-ममता सह क्रिप्टन पोचवायला निघतो. बरं हे दोघे निदान दिसतात तरी कुत्रे पकडणारे, ममताचं काय? पण पोलिस त्यांच्याहून येडे असल्याने त्यांनी वेडपटासारखी दिलेली उत्तरं ऐकून माना डोलावतात आणि गाडी सोडतात. आता एक चेकपोस्ट झाली म्हणजे पोलिसांचा धोका टळला, हो किनई? तेवढ्यात सुनीलला कोणाची तरी मोटरसायकल दिसते. तो खेरबाबाला म्हणतो आम्ही ही मोसा घेऊन जातो, तू टिकूला घेऊन तिकडेच ये! तिकडे म्हणजे कुठे? चिक्याच्या अड्ड्याचा पत्ता यांनाही माहिती नाही! आणि अशी कोणाचीही मोसा चोरून का न्यायची? पण हे प्रश्न खेरला पण पडत नाहीत. मग हे दोघे मुंबईहून व्हाया उटी पुणे हायवेला जातात. जाताना स्वप्नात गाणं म्हणत जातात आणि गाणं संपल्यावर सँबोला भेटतात.
लहान मुलांना नकाशा काढून त्यात रंग भरायला दिल्यावर जे तयार होईल तसा नकाशा समोर ठेवून चिक्या ऑफिसात टिव्ही पहात बसलेला असतो. कावळा पुन्हा खोकायला लागतो. बाकी कोणालाही मारण्याआधी या कावळ्याला पकडून हाणावं असे हिंस्त्र विचार माझ्या डोक्यात यायला लागतात. टिव्हीवर दाखवतात की नेता रामगोपाल वर्मा आलोका भवनची सभा कॅन्सल करायला तयार नाही. ही देशाचे प्रॉब्लेम्स सोडवायला घेतली जाणारी सभा असते म्हणे. ते न आवडल्याने चिकारा त्याला आलोका भवनमधेच मारायचं ठरवतो. तेवढ्यात सुनील - ममता ला घेऊन सँबो येतो. सुनील चिक्याच्या हातात क्रिप्टनवाली बॅग देतो. अख्ख्या पिक्चरमधे पहिल्यांदा चिकाराच्या चेहर्यावरचा मख्खपणा जाऊन साधारणपणे ज्याला हसू म्हणता येईल असं काहीतरी दिसतं. चिकारा बाँबमधे फिट करण्याकरता क्रिप्टन त्याच्याकडच्या प्रोफेसर(!) कडे देतो. बाँबमधे सुद्धा एक कॅल्क्युलेटर फिट केलेला असतो. त्या ओरिजिनल रिसर्च लॅबची ही काहीतरी ठरलेली प्रोसेस असावी. तसंच क्रिप्टनच्या बाटलीच्या आकाराची रिंग आणि सॉकेट आधीच तयार असतं. हा क्रिप्टन काहीतरी स्टँडर्ड साईजमधे मिळत असणार. क्रिप्टन त्यात फिट केल्यावर त्यावेळच्या मोडेम मधून यायचे तसले आवाज यायला लागतात, बाँबवर लावलेले दिवे ब्लिंक व्हायला लागतात ( बाँबवरचे दिवे लुकलुकणं हे ८०ज/९०ज मधल्या पिक्चर्सचं व्यवच्छेदक लक्षण आहे ). थोडक्यात बाँब तयार होतो.
चिक्याच्या तुरूंगात आता दोनाचे चार होतात. म्हणजे विकास - आयेशा बरोबरच आता सुनील - ममता पण त्या तुरूंगात जातात. आता त्यांना जाणीव होते की चिकारा देशविघातक कृत्य करणार आहे. इथे सुनील म्हणतो , मी माझ्या डोळ्यांनी त्याला दोन बाँब बनवताना पाहिलं. हे माझ्या डोळ्यांना का दिसलं नाही याचा मी अजूनही विचार करतेय. शिवाय एका क्रिप्टनच्या बाटलीत किती बाँब बनणार?
इकडे चिक्याचे विदेशी मेहमान इंडियात येणार असतात ( अरे हे लिस्या मधे होते ना? हे ही विसरले?? ). पण त्यांना म्हणे रिसीव्ह करायला पोलिस रेकॉर्ड नसलेली माणसं हवी असतात जेणेकरून त्यांच्यावर रागोवला मारण्याचा संशय येणार नाही. आलोका भवनमधे ऑलरेडी बाँब फिट केलेला असतो. रिसीव्हर म्हणून सुनील-विकासला पाठवायचं ठरतं. पोरी यांच्या ताब्यात असल्यावर काय बिशाद ते काम करणार नाहीत? पण हे दोघे फॉरेनर्सना पोलिसांच्या ताब्यात देऊन नकली फॉरेनर्स चिक्याच्या गळ्यात मारायचं ठरवतात. एंटर मायकेल जॅक्सनसारख्या केसातला अनुपम खेर (त्याचे कपडे मात्र बँडवाल्याचे आहेत) विथ स्कर्ट्ब्लाऊज घातलेली बायको अरूणा इराणी आणि हॅट घातलेला, मस लावलेला टिकू. हे फॉरेनर्स आहेत यावर काळ्या कुत्र्याचा तरी विश्वास बसेल का? पण चिकारा आणि त्याच्या माणसांचा बसतो. खेर असंबद्ध बोलत असतो आणि वाक्यावाक्याला 'बीट इट' म्हणतो. याचं भाषांतर टिकू करत असतो. भाषांतराचा गोषवारा असा की ती पाठवलेली मुलं गद्दार होती आणि या फॉरेनर्सनी त्यांना मारून टाकलं आहे.
यानंतर 'नृत्यगायनादि कलांचा भोक्ता' परंपरा चालू रहावी म्हणून चिकाराकडे डान्स आयटम आयोजित केलेला असतो. ज्यात महेश आनंद सुद्धा नाचतो ( याकरता घेतलंय तर याला पिक्चरमधे! ) . आयटम गर्ल्स अर्थात आयेशा आणि ममता. इन्स्पिरेशन 'गजर ने किया है इशारा' चं. यांच्या परफेक्ट मापाचे कपडे कोण कधी कसे शिवून आणतं हा प्रश्न पाडून घ्यायचं मी आता सोडून दिलं आहे. गाणं चालू असताना सुनील - विकास पोलिसांचा ताफा घेऊन चिक्याच्या पॅलेसला वेढा घालतात. मग टिकूला आठवतं की आज आलोका भवनमधे सगळ्या नेत्यांची सभा आहे म्हणून तो कोणालाही न दिसता निसटतो. मधेच खेरबाबाला नाचायची हुक्की येते. नाचता नाचता त्याचा विग निघून येतो. पण तोवर सुनील - विकास आत येऊन मारामारी करायला लागलेले असतात. मौकेका फायदा घेऊन चिकारा आणि महेश आनंद पण निसटतात. आता यांनी बाँब लावलाय ना तिकडे? मग स्वतः जायची काही गरज? मारामारीत पॅलेसमधे असलेली चिक्याची माणसं गारद होतात. सोनेरी मोजावाल्याचा हात मेटलचाच आहे हे आपल्याला पटवण्यासाठी सुनील त्याचा हात चालू दिवा फोडून त्याच्या सॉकेट्मधे घालतो. सोनेरी मोज्याभोवती विजेची निळी रेघ दिसते आणि तो खाली पडतो.
सगळे नेते सभेसाठी जमतात. टिकूही येतो. मला वाटलं तो रागोवला किंवा इतर नेत्यांना किंवा निदान पोलिसांना तरी बाँबबद्दल सांगेल. पण तो रागोवचं स्वागत करून त्याला आत न्यायला लागतो. मगाशी त्याला चिक्याच्या पॅलेसमधे कशाला नेलं होतं त्याला माहिती तरी होतं का? का विसरलाच? तेवढ्यात तिथे सुनील - विकास पोचतात आणि रागोवला बाँबबद्दल सांगतात. ते ऐकून टिकू सरप्राईज वगैरे होतो! रागोव सभा कॅन्सल करून निघतो आणि तेवढ्यात मागे बाँबस्फोट होतो. एवढा क्रिप्टॉन बाँब होता बरं का, पण कोणाला साधं खरचटत सुद्धा नाही. और तो और, सुनील आणि विकास छान मागे वळून डोळे भरून तो स्फोट पाहून घेतात. ही अशी माणसं असतील तर ती काय मिरवणुकीतल्या लेसरला घाबरणार?
पोरं रागोवला घेऊन पोलिस हेडक्वॉर्टरला जातात. तर ते आधीच चिक्याने कॅप्चर केलेलं असतं. च्यामारी, पॅलेसमधे इतकी माणसं मारली याची तरी ही अजून कुठून आली? या घमासान मारामारीत इतके स्फोट आणि इतक्या गाड्या उडवल्यात की क्षणभर मला हा रोहित शेट्टीचा पिक्चर असावा असं वाटलं. सुनील - विकास रागोवला वाचवतात आणि एका बंद पडलेल्या मिलमधे लपवतात. पण चिक्या त्यांना बरोब्बर शोधून काढतो. लब्बाड! मग पुन्हा मारामारी, गोळ्यांच्या फैरी, धोतर सावरत लपत पळणारा रागोव वगैरे. फायनली चिक्याची राहिलेली माणसं पण मरतात. सुनील - विकास चिकाराला भरपूर धोपटून अर्धमेला करतात. तेवढ्यात पिक्चरमधली उरलेली समस्त पात्रं येतात. खेरने दिवार मधला अमिताभचा कॉश्च्युम त्याच्या बिल्ल्यासकट घातलेला असतो. तो पाहून मला पुढे काय घडणार याचा साधारण अंदाज आला आणि तस्संच घडलं. चिक्या पडल्या पडल्या रागोववर गोळी झाडतो आणि खेर मधे येतो. हे पाहून विकास तलवारीने चिक्याचं डोकं उडवतो ( होपफुली याबरोबरच त्या खोकला झालेल्या कावळ्याचा पण निकाल लागला असेल ) आणि चिक्याचा सरकटा बनतो. पण बिल्ल्यामुळे खेर वाचलेला असतो. आनंदीआनंद होतो. मग वक्त तुम्हारा है का हमारा है यावर एक चर्चा होते आणि असं ठरतं की नेताजी जिवंत राहिल्याने हा देश वाचलाय ( कसा काय? मला प्लीज सांगा कोणीतरी. ) त्यामुळे वक्त हमाराच है!
मस्त
मस्त
नोस्टेलजिक करणारा मूवी आहे हा. तेव्हा फार आवडलेला. स्पेशली अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची दुश्मनी ते दोस्तीवाला सिक्वेनस.
तो खोकणारा कावळा म्युजिक शोधून पुन्हा ऐकायला हवी.
खुफिया पॅलेस ( आख्खा पॅलेस
खुफिया पॅलेस ( आख्खा पॅलेस खुफिया??? ), >>>
असं फाईल घेऊन कॉलेजात कोण जातं? >>>
मानवी जॅक >>>
स्वप्नं पण गॅदरिंगटाइप पाहतात हे >>>
लहानपणापासून खेळायला जात होता का तिथे >>>
रिसर्च सेंटर आहे की डिपार्टमेंटल स्टोर? >>>
मस्त लिहीले आहे. "फोटोसिंथेसिस " हे सर्वात भारी आहे
खोकला झालेला कावळा
खोकला झालेला कावळा
फोटोसिंथेसिस
पुढे जाऊन त्याने 'रामगोपाल वर्मा की आग' काढू नये म्हणून सारा खटाटोप
खतरनाकै
>>>>
कर्नल म्हणतो इथल्या हवेत फार शांतता आहे तर आता मी त्यात विष कालवणार>>>
हे एक त्या काळी बरं होतं. सगळं कसं क्रिस्टल क्लिअर असायचं. रामी रेड्डी, दीपक शिर्के, सयाजी शिंदे व्हिलन हे निश्चित असायचं. ते आयपीसीतले सगळे गुन्हे करायचे. ट्रीझन फारच एलिट गुन्हा असावा म्हणून त्यावर विशेष भर असायचा.
नाहीतर अलिकडे ऋषीने स्कल कॅप घातलीय म्हणजे फडकती कव्वाली होणार म्हणून सरसावून बसलेल्या लोकांना रौफ लाला दाखवतात.
किती सांस्कृतिक धक्का बसतो हो…
कबाडी बिझनेसमध्ये जायला पण कॉलेजची डिग्री लागते माहित नव्हतं. बघा किती भर आहे शिक्षणावर भारतात.
गाण्यात गवत, तंबू, कॅम्पफायर असे सगळे आयटम आहेत.
>>> काय गवताबद्दल फॅसिनेशन होतं कुणास ठाऊक? कुठं पेंढ्याच उधळतील, कुठं गडाबडा लोळतील, कुठं काडीच चघळतील (पूर्वजन्मी म्हशी होत्या काय?), कुठं रात्रीचा टेम्प बेड म्हणून वापरतील. अंगाला खाज सुचून शिंका कशा नाही येत या लोकांना?
क्रिप्टन बाँब >>> कुणाचं तरी सायन्सचं पुस्तक सापडलं किंवा पिरीऑडीक टेबलचा तक्ता. नाहीतर क्रिप्टन वगैरे यांना कुठलं सुचायला?
जोरदार चालू आहे!! Rmd सिक्सर
जोरदार चालू आहे!! Rmd सिक्सर पे सिक्सर आणि माझेमन त्यावर सिक्सर.
हा पिक्चर इलू इलू तेलु तेलु साठी आठवतोय, ती रॅगिंग वाली मुलं म्हणायची.
धन्यवाद!
धन्यवाद!
रौफ लाला
अंगाला खाज सुचून शिंका
>>> माझेमन, भारी पोस्ट!
इलू इलू तेलु तेलु >>> परफेक्ट आठवलंय, अनु!
ऍकीची सगळी इम्प्रोव गाणी कहर आहेत या पिक्चर मध्ये. 
मोस्टली उद्याच पुढचा आणि शेवटचा भाग टाकतेय. पुढचा भाग अजून कायच्याकाय आहे. सो स्टे ट्यून्ड.
खोकला झालेला कावळा
खोकला झालेला कावळा
बाकीचं वाचते
भारी लिहिलंय.
भारी लिहिलंय.
एकसे एक पंचेस
सिनेमा बघितला नाही पण वाचायला मजा आली
खोकला झालेला कावळा
खोकला झालेला कावळा
मस्त लिहलं आहेस. दिवाळी फराळा सारखं!
सुनील बावळट दिसावा ( अजून? )
टायटल वरून मला हा तो सैफ, आमिर चा आधी रात में पल्कों की छांव में..वाला पिक्चर वाटला होता. त्यात ही २ जोड्या आहेत.
भारी लिहिलंय
भारी लिहिलंय
मी हा चित्रपट नाही पाहिला ( वाचलो , देव आहे जगात )
बाकी अक्षय कुमार सुनील शेट्टी फाईट सिन मोहरा मध्ये।पाहिलेला आणि आवडलेला असे आठवतंय.
आधी रात को पल्कों की छांव में
आधी रात को पल्कों की छांव में >>> नाही. तो परंपरा. त्यात बऱ्याच जनरेशनल जोड्या आहेत.
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
ममता कुलकर्णी ( अवांतर : एकतरी कुलकर्णी फिल्म स्टार झाली याचे मला अप्रूप होते) ची गाडी बंद पडते तिथे एका पुठ्ठ्यावर RK college असे लिहून बाण दाखवला आहे, ती कॉलेज कुमारी आहे असे एस्टॅब्लिश करायला. छोट्या छोट्या प्रसंगातून दिग्दर्शक दिसतो तो असा.
काही दिवसांपूर्वी मटा मध्ये
.
धन्यवाद
धन्यवाद
मी हा चित्रपट नाही पाहिला ( वाचलो , देव आहे जगात ) >>>
झकासराव, उलट मी तर म्हणेन टोटली डोकं बाजूला ठेवून नक्की बघा. अत्यंत झकास बिनडोक टाइमपास होतो. टिपिकल ९०ज मधला पिक्चर आहे हा.
विकु : मस्त निरीक्षण. बहुतेक माझ्याकडून ते लिहायचं राहिलं. पण असे रिव्ह्यूज एका माणसाकडून पूर्ण होत नाहीतच कधी. सगळ्यांचा हातभार असावा लागतोच
बाकी या चित्रपटात इतकी रत्नं आहेत की काय काय लिहावं असं झालं मला
तरी अजून फन पार्ट बाकी आहे. काही तासांत टाकते.
मस्त. जुन्या आठवणी जाग्या
मस्त. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी अजूनपण कधीतरी बघतो हा पिक्चर. वर ऋनम्या म्हटल्याप्रमाणे सुनील शेट्टी आणि अक्षयकुमार फाईट आणि नंतर मैत्री हा आवडता प्रसंग आहे. लहान होतो तेव्हा रात्री पाहत असताना तेच कावळा ओरडायच्या म्युझिकमुळे आईने ओरडून बंद करायला लावला होता. नंतर कधीतरी क्रिकेट खेळताना हा पिक्चर लागल्याचे समजताच खेळ सोडून पिक्चर बघायला पळालो होतो. फाईट सीनमध्ये अक्षय कुमारपेक्षा सुनील शेट्टी नेहमी सरस वाटत आलाय मला.
धमाल लिहिले आहे
धमाल लिहिले आहे
सरप्रायंझिंगली हा सिनेमा मी पाहिलेला आहे . ममता कुलकर्णी स्वतःच्या फिगरचे आकडे लिहून देते तो प्रसंग , सुनील शेट्टी सायकल वरून कॉलेजला जातो तो प्रसंग यावर फिदीफिदी हसले देखील आहे
छोट्या छोट्या प्रसंगातून
छोट्या छोट्या प्रसंगातून दिग्दर्शक दिसतो तो असा.
<<<<< छोट्या छोट्या प्रसंगांतून दिसणारा दिग्दर्शक एकच.... सुभाष घई!
खोकला झालेला कावळा is totally epic!
बाकी वाचते आहे हळूहळू!
सुनील म्हणतो 'चॅलेंज अ
सुनील म्हणतो 'चॅलेंज अॅक्सेप्टेड!'
<<<<< हा सिनेमा म्हणजे 'धडकन'चा पूर्वसूरी असणार. कारण त्यात त्याने चालता चालता पाचशे कोटी कमावले, असा उल्लेख येतो. त्याची रंगीत तालीम यात केली असेल.
धन्यवाद!
धन्यवाद!
सुनील शेट्टी आणि अक्षयकुमार फाईट आणि नंतर मैत्री >>> हे फार भारी घेतलंय.
फाईट सीनमध्ये अक्षय कुमारपेक्षा सुनील शेट्टी नेहमी सरस वाटत आलाय मला >>> या पिक्चरमधे तर नक्कीच. टोटली कन्विन्सिंग वाटतो सुनील शेट्टी.
सुनील शेट्टी सायकल वरून कॉलेजला जातो तो प्रसंग >>> :हाहा त्याचं तीट लावलेलं रूपडं अगदीच 'देखणं' आहे
छोट्या छोट्या प्रसंगांतून दिसणारा दिग्दर्शक एकच.... सुभाष घई! >>>
सही जवाब!
'धडकन'चा पूर्वसूरी
इथे त्याला चालण्याची आयडिया सुचलेली दिसत नाही.
रंगीत तालीम
>>> अगदी अगदी!
ते चालता चालता ५०० कोटी एकदा
ते चालता चालता ५०० कोटी एकदा बघायलाच हवेत. हा पिक्चर रिलीज झाला तेव्हा त्यातली गाणी दर शनिवारी आळवून इथल्या नमस्ते अमेरिका टाइप कार्यक्रमांनी फार पकवले होते.
RK college असे लिहून बाण दाखवला आहे, ती कॉलेज कुमारी आहे असे एस्टॅब्लिश करायला. छोट्या छोट्या प्रसंगातून दिग्दर्शक दिसतो तो असा. >>>
ममता कुलकर्णीच्या फिगरच्या आकड्यांबद्दल. ह्याने काहीही "जवळपास" लिहून दिले असत तरी ते लोक चेक कसे करणार होते? (इथे त्याला स्त्री मधला राजकुमार राव उपयोगी पडला असता)
दर शनिवारी आळवून इथल्या
दर शनिवारी आळवून इथल्या नमस्ते अमेरिका टाइप कार्यक्रमांनी >>> भारतात टिव्हीवाल्यांनी पकवलं होतं तसं त्यावेळी
इथे त्याला स्त्री मधला राजकुमार राव उपयोगी पडला असता >>> टोटली!
सेफ साईड म्हणून त्यांनी समाजप्रचलित आकडेच घेतले आहेत इथे
पण तेव्हाच्या ममताकडे बघून ते पटतात बर्यापैकी 
काय योगायोग, नेमका मीही
काय योगायोग, नेमका मीही त्यावेळी भारत भेटीत होतो व 'दिल ने ये कहा है दिल से' ने विमानातून उतरल्यापासून पकवले होते.
मस्त लिहिलं आहे.
मस्त लिहिलं आहे.

खोकला झालेला कावळा, फोटोसिंथेसिस, मानवी जॅक वगैरे मसाला एकदम धमाल!
कर्नल चिकारा खरंतर शोलेप्रेमींचा त्राताच व्हायचा पण नेताजी रामगोपाल वर्माला अक्षय-सुनीलने वाचवून शोलेला आग लावण्यात हातभार लावला.
क्रिप्टॉन >> मला वाटतं हे सुपरमॅन कॉमिकमधून उचललं असणार कारण त्यात क्रिप्टॉन ग्रहाचा स्फोट होतो. अॅक्चुअल क्रिप्टॉन तर निष्क्रिय वायु आहे. त्याचा आणि बॉम्ब? डोंबल!
आणखी एक गंमत ही पण आहे की हा सिनेमा दिव्या भारतीच्या स्मृतिप्रित्यर्थ तिच्या नवर्याने (साजिद नडियादवाला) प्रोड्युस केला आहे. साजिदकाका नीता देवकरांच्या (आईच्या एकसष्टीनिमित्त हिरवं कुंकू बनवणार्या फेम) शाळेत शिकले असावेत.
मी पहिला पॅरा वाचूनच तुफान
मी पहिला पॅरा वाचूनच तुफान हसलो आहे. खोकला झालेला कावळा हे अफाट आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
कर्नल चिकारा खरंतर शोलेप्रेमींचा त्राताच व्हायचा पण नेताजी रामगोपाल वर्माला अक्षय-सुनीलने वाचवून शोलेला आग लावण्यात हातभार लावला >>> अगदी अगदी
मला वाटतं हे सुपरमॅन कॉमिकमधून उचललं असणार >>> टोटली. पण त्यात बहुधा त्याचा रंग हिरवा होता? यात क्रिप्टॉन पिवळाधम्मक आहे
हिरवं कुंकू >>>
हा रेफ कहर आहे. क्रिप्टॉन खरंच हिरवा असता तर 'हिरवा क्रिप्टॉन' नाव ठेवायला हरकत नव्हती. सुरूवातीला दिव्या भारती काहीतरी पडल्या पडल्या लिहीत आहे टाइपचा जो स्मृतीवंदन सीन आहे त्याने क्षणभर फसले होते मी बायदवे 
धागा अपडेटेड. रिव्ह्यू
धागा अपडेटेड. रिव्ह्यू संपूर्ण.
फार फार भारी रिव्ह्यू
फार फार भारी रिव्ह्यू
दाराबाहेर चक्क एक
दाराबाहेर चक्क एक कॅल्क्युलेटर लावलेला असतो

अरे तो क्रिप्टन इनर्ट गॅस आहे! तो वॉटरबॅगमधे भरून त्यापासून बाँब कसा बनवणार असतात?
शास्त्रज्ञ त्याला फॉर्म्युला लिहीलेला बटर पेपर पण देतो
मी सुनीलला पण घेऊन येतो. कशाला? पार्टी करायची आहे का?
ही अशी माणसं असतील तर ती काय मिरवणुकीतल्या लेसरला घाबरणार?
बरं हे दोघे निदान दिसतात तरी कुत्रे पकडणारे, ममताचं काय?
क्रिप्टनचे पूर्ण वर्णनच >>>
चिकारा त्यालाही मारून टाकतो - यूएटी व्हायच्या आधी डेव्हलपरला मारून टाकतो? चिकाराने कधीही टीम लीड केली नसावी बहुतेक. बग आला तर कोण रिझॉल्व करणार? कागदावर लिहिलेल्या गोष्टी जश्याच्या तश्या, विदाऊट फेल साकार होतात असा विश्वास प्रिसेल्स किंवा बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजरला पण नसतो. अणुबॉम्ब बनवताना ओपनहायमरला पण नसेल.
ही देशाचे प्रॉब्लेम्स सोडवायला घेतली जाणारी सभा असते म्हणे >> आता मला समजलं की दिल्लीचे प्रॉब्लेम कुठल्याश्या स्टेडिअमवर सभा घेऊन का सोडवतात. विधानसभा, संसद वगैरे सगळं झूठ आहे.
चिकाराला बघूनच थानोसची कल्पना
चिकाराला बघूनच थानोसची कल्पना सुचली असणार.
अफाट!!! मजा आ गया!!
अफाट!!! मजा आ गया!!
सँबो आहे की डेडली आत्या
सँबो आहे की डेडली आत्या
शास्त्रज्ञ त्याला फॉर्म्युला लिहीलेला बटर पेपर पण देतो
इतका मार खाऊनही विकास टवटवीत दिसत असतो
तो मेटलचा हात आहे असं दाखवायचं आहे यांना! अरे त्या मोज्याला सुरकुत्या पडताहेत त्यांचं तरी भान ठेवायचं
इथे सुनील म्हणतो , मी माझ्या डोळ्यांनी त्याला दोन बाँब बनवताना पाहिलं. हे माझ्या डोळ्यांना का दिसलं नाही याचा मी अजूनही विचार करतेय.
देवा काय काय कोट करू?
खूप खूप हसवलेस रमड. जियो..
Pages