माझी अमेरिका डायरी - १२ - रहदारी, वाहतूक नियमन, आणि ड्रायव्हिंग !

Submitted by छन्दिफन्दि on 13 September, 2024 - 14:06

पहिल्याच दिवशी बघितल रस्त्याला केव्हढ्या गाड्या होत्या,पण सगळ्या ठराविक गतीने, एकच लेन मधून चाललेल्या, व्यवस्थित सिग्नलला थांबत होत्या, कोणीही हॉर्न वाजवत नव्हतं, एव्हढ्या गाड्या असून डोळ्यांना अजिबात धूर दिसत नव्हता. इतकं आश्चर्य वाटलं.
दुसऱ्या दिवशी चालतच बाहेर पडले, मला आधीच सांगून ठेवलेलं की पादचाऱ्यांसाठी वेगळा सिग्नल असतो, ते बटण दाबून उभ राहायचं आणि आपल्यासाठी वॉकिंग सिग्नल आला की मगच रस्ता क्रॉस करायचा. अगदी पोरटोरांपासून वृद्धांपर्यंत सगळे असेच रस्ता क्रॉस करताना दिसले. आता ह्या लोकांच्या वाहन शिस्तीचे कौतुक वाढतच चालले.
एका आतल्या रस्त्यावर क्रॉस करायला घेतला पण तेव्हढ्यात एक गाडी येताना दिसली, म्हणून थांबले, तर तोही थांबला. त्याने मला क्रॉस करायची खुण केली. मी घाई घाईने रस्ता क्रॉस केला, पण तो शांतपणे मी रस्ता क्रॉस करेपर्यंत थांबून होता. मला त्या गाडी चालकाचा संयम, आदर बघून अगदी भरुनच आल.
हे असं पण असतं? म्हणजे कचा कचा भांडण नाही, कर्कश्श हॉर्न नाहीत, गाड्यांचे ब्रम ब्रम आवाज नाहीत की त्याबरोबर उठणारे धुरांचे लोळ नाहीत, साईड साईड ने काढून ओव्हरटेक करण नाही, पादचारी आणि सायकलवाल्यांसाठी थांबणं, सिग्नल नीट पाळण, कितीही रहदारी असली तरीही.. स्वप्नात नाही तर प्रत्यक्षात! लई भारी!!
Emergency vehicle, म्हणजे रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची गाडी, शेरीफची ( पोलिसांची) गाडी हॉर्न देत आणि दिवे वाजवत आली की सगळ्या गाड्या एका साइडला होतात आणि थांबून त्यांना पहिले जाऊन देतात, त्या निघुन गेल्यावरच मग बाकीचा traffic चालू होतो. ते बघून तर क्षणभर डोळ्यात पाणीच तरळल. काही वर्षांपूर्वीची गोष्ट, बाबांचा अपघात झालेला, त्यांचा स्कॅन काढायचा होता पण त्या हॉस्पिटलमध्ये ते मशीन बंद पडलेलं. मग त्यांनी ambulance मधून आम्हाला स्कॅन करायला कुठेतरी धाडल. दुपारच्या उन्हात तापलेली, प्रचंड ट्रॅफिक मध्ये अडकलेली ती रुग्णवाहिका, अगदी १५-२० मिनिटांवर असलेलं ते सेंटर, एक तास होऊन गेला तरीही येत नव्हतं, बाबांचा त्रास बघवत नव्हता, अगदी सहनशक्तीचा अंत बघत होते. ह्या पार्शवभूमीवर, आयुष्य इतकं सरळ साधं आणि सोपं पण असू शकतं हे पचनी पडायलाही जरा वेळ गेला.
पण इतकं शिस्तबद्ध ड्रायव्हिंग सगळेच कस बर करतात? ह्या प्रश्नाचं उत्तर लवकरच DMV (California Department of motor vehicle ) शी संपर्क झाल्यावर कळले.
त्यांची पहिली बहुपर्यायवाली परीक्षा असते. त्यासाठी DMV ची एक छोटी पुस्तिका असते. ज्यात सगळे वाहतुकीचे सगळे नियम, दंड , शिक्षा इ. इ. दिलेले असतात. नियम जेव्हढे कडक तेव्हढ्याच शिक्षा आणि दंडही. अगदी चालत्या गाडीतून कचरा फेकण्यापासून ते दारू पिऊन गाडी चालविण्या पर्यंत कुठल्याही चुकीच्या गोष्टीला माफी नाही’. आणि एका पेक्षा जास्त नियमांचं उल्लंघन केलत तर शिक्षा अजून अजून कडक होते, प्रसंगी तुरुंगातही जावे लागू शकते. तर असो! ह्या परिक्षते साधारण ८०% ना पासिंग असते. एका अँप्लिकेशन मध्ये जास्तीत जास्त तीनदा प्रयत्न करू शकतो. जनरली पहिल्या किंवा फारतर दुसऱ्या प्रयत्नात परीक्षा पास करता येते, अर्थात काही महाभाग यातही वाऱ्या करणारे भेटले.
ही लेखी परीक्षा झाली कि मग प्रत्यक्ष ऑन रोड टेस्ट द्यायची. त्यांचे ४-५ रूट्स असतात तुमच्या शेजारी परीक्षक बसतो आणि तो सांगेल त्या रस्त्याने गाडी चालवायची. मग त्यात लेन बदलताना सिग्नल दिला का ?, खांद्यावरून मागे वळून बघितलं का? पादचाऱ्यांसाठी थांबलात का ? सिग्नल व्यवस्थित बघून पाळता का ? गाडी रिव्हर्स घेता येते का ? स्पीड लिमिट सांभाळता का ? वगैरे वगैरे बरेच बारकावे बघतात.
तिकडे भारतात पण मी ड्रायव्हिंग license घेतलेले, अगदी ह्यातली कोणतीही झिगझिग न करता. पण खाली उतरल्यावर लगेच रिक्षा मिळत असलयाने कधी त्या license चा सदुपयोग विशेष केल्याचे आठवत नव्हते. त्यामुळे अजिबात रोड कॉन्फिडन्स नव्हता. बाजूनी स्पीड ने गाड्या जायला लागल्या कि तंतरायची, लेन चेंज करताना तर घाम फुटायचा, डाव्या वळणावर सिग्नलचे टेन्शन यायचे, अशा अनेकानेक भितींवर मात केल्यावर,
दोन-तीन वाऱ्या करत शेवटी एकदाची माझी तीही परीक्षा पार पडली आणि मी DL पटकावले.

इकडे (तुम्ही SF / NYC किंवा तत्सम मोठ्या शहरात राहत नसाल तर ) ड्रायविंग येणे ही गरज आहे. माझ्या लायसेन्समुळे नवऱ्याचे हेलपाटे कमी झाले, पण माझ्या गळ्यातली कामे ( आठवडी बाजार, ड्रॉप ऑफ - पीक अप वगैरे ) वाढली. त्यातला गमतीचा भाग बाजूला ठेवला तर ड्रायव्हिन्गमुळे खरंच वेळ, शक्ती, खर्च सगळ्याच बाबतीत खूप बचत होते हे जाणवले.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे बायकांच्या ड्रायव्हिंगवर बरेच जोक्स (अगदी सुनीताताईंच्या काळापासून ते आता पर्यंत) येत असतात, पण इकडे बायकांना सर्रास छोट्या गाड्यांपासून ते अगदी बसेस, vans, ट्रक्स लीलया चालवताना बघून सगळे streotypes गळून पडतात.
कार ड्रायविंग, रस्ते, वाहतुकीची सुरक्षा आणि नियम इतकी विकसित यंत्रणा असली तरी सार्वजनिक वाहतूक तेवढी उत्तम नाही. म्हणजे ट्रेन, बसेस, बार्ट (इकडची स्थानिक मेट्रो सारखी सेवा ) सगळे पर्याय आहेत. पण सार्वजिनक वाहतूक ही खर्चिक, तुलनेने गैरसोयीची आणि तुटपुंजी आहे. मुंबईत अगदी सकाळी सहा ते रात्री बारा कुठल्याही वेळी सार्वजनिक वाहनांनी फिरलेल्या मला तर हे अगदीच खटकले. तसच खड्ड्याखड्ड्यातून का होईना पण गाव तिथे ST, म्हणत अगदी गरिबातल्या गरीबालाही सामावून घेणारा आपला लाल पिवळा डबा खासच वाटून गेला.
तिचं गोष्ट ट्रेनची, एक मोठ्या शहरातून दुसऱ्या लांबच्या शहरात जायचं तर ट्रेन अतिमहाग आणि अतिशय वेळखाऊ, त्यामुळे बऱ्याचदा गाडी किंवा विमान हेच पर्याय नाईलाजाने घ्यावे लागतात. मग अशा वेळी अगदी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मुंबई ते कोलकोता लाखो प्रवाशांना अगदी वाजवी दरात दररोज घेऊन जाणारी भारतीय रेल नक्कीच आठवते.

एक छोटंसं उदाहरण, एखाद्या ट्रीपला बसने तीन माणसांचा खर्च ११ डॉलर येत असेल तर गाडीने एखाद डॉलर येईल. शिवाय बसेसची frequency ही तशी कमी, जसे अर्ध्या तासाने बस, रूट ही खूपच ठरविक. आमच्या आधीच्या घराजवळून एक रूट होता म्हणून जरा तरी बस प्रवासाचा अनुभव घेता आला.
बसमध्ये ८-१० माणसं, अगदी क्वचितच भरलेली असायची. बंदिस्त AC बसचे दरवाजे फक्त ड्रायव्हरलाच त्याच्या कडच्या कंट्रोलनी उघडता येतात. बसस्टॉपला आली की उतरणारे किंवा चढणारे प्रवासी असतील तर ड्रायव्हर बस स्थानकावर थांबवतो. दार उघडले जाते. उतरणारे उतरतात आणि चढणारे चढतात. चढल्यावर लगेच मशीन असते त्यात पास असेल तर पंच करायचा, किंवा नेमके सुटते पैसे त्यात सरकवायचे. मग चालक बस सुरु करतो. एक अजून आवडलेली गोष्ट म्हणजे बस ला रॅम्प असतो, एखादा व्हीलचेअर वरचा प्रवासी असेल तर त्याच्यासाठी हा रॅम्प उघडला जातो, आणि व्हीलचेअरसकट तो प्रवासी बसमध्ये चढतो. मग ड्रायव्हर ती व्हीलचेअर पट्ट्याने तिच्या ठराविक जागी सिक्युअर करतो. तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी असे रॅम्प असतातच आणि त्याला जोडून अपंगांसाठी राखीव पार्किंग असते. त्यांना स्वयंसिद्धपणे जगात यावे हा जो विचार आहे त्याच मनापासून कौतुक वाटलं.

एकदा नाताळ दरम्यान आम्ही एक दीड तास उभे होतो तरी बसचा पत्ता नाही मग कळले की हॉलिडे सीझन असल्यामुळे बरेच चालक सुट्टीवर होते त्यामुळे बस चालत नव्हत्या. मग हळू हळू गरजेप्रमाणे uber / लीफ्ट हा पर्यायही वापरू लागले होते.
पण ड्रायव्हिंग करायला लागल्यावर खरं स्वतंत्र असल्यासारखे वाटले. .

निवेदन - प्रत्येक राज्याचे वाहतुकीचे नियम, परीक्षा निकष वेगळे असू शकतात.

#americadiary #traffic
#americadiary

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

US मधील स्वच्छ गुळगुळीत रस्ते, रस्त्यावर मेंटेन केलेली झाडे आणी अतिशय शिस्तबद्ध वाहतूकीचा सुुखद अनुभव घेतल्यावर आपण कोणत्या बेसिक गोष्टींना मुकतो हे जाणवते. छानच लिहिलय तुम्ही.

Thank you ssj Happy

तौलनिक (खाजगी व सरकारी वाहतूक व्यवस्था ) वैशिष्ट्यं व्यवस्थित लिहिली आहेत ते आवडलं. ट्रेन व लाल डबा यांकडे आता जरा प्रेमानं बघावं वाटेल.
प्रामाणिक आणि तपशीलवार वर्णन करता. त्यामुळे अधिक वाचनीय वाटतं.