माझे स्थित्यंतर - {व्यसन} - {उपाशी बोका}

Submitted by उपाशी बोका on 11 September, 2024 - 23:15

खरं तर लिहिणे हा माझा प्रांत नाही. पण हा विषयच इतका मोहक वाटला की म्हटलं, आता लिहूनच टाकूया. तसं म्हटलं तर हे लेखन १००% नवीन नाही, पण विषयाला अनुरूप आहे म्हणून परत या लेखात लिहितोच. कुणी सांगावे, जर कुणाला याचा उपयोग झाला तर आनंदच होईल.

माझे वडील गेले अनेक वर्षे तंबाखू खात असत, पण मला ते कधीच आवडले नाही. त्यामुळे तंबाखू चघळायचे प्रकार मी कधीच केले नाहीत म्हणजे पान, तंबाखू-चुना, गुटखा, पानमसाला वगैरे.

माझा असा स्वभाव आहे, की एखादी गोष्ट करावी वाटली की मी ती करतो. मरताना असं वाटायला नको की अरे, आपण हे करायला हवं होतं आणि ते केलं नाही. निव्वळ त्या कल्पनेतून मी पहिली सिगरेट प्यायलो, अजून आठवतंय मित्राबरोबर VJTI च्या वार्षिक संमेलनात गेलो होतो, तेव्हा मित्राबरोबर. मला कधीही, कुणीही सिगरेट पी म्हणून सांगितले नाही, मित्र पित होते तरी त्यांनीपण कधी ऑफर केली नाही, तरीही. पहिली वेळ होती म्हणून मेंथॉलची सिगरेट प्यायलो, घाबरत घाबरत झुरका घेतला, खोकला वगैरे काही आला नाही, अर्ध्या मिनिटात डोके मंद गरगरले (मित्र म्हणाला तुला “किक” बसली). आणि ती आयुष्यातली पहिली चूक झाली. दुसऱ्या दिवशी पानवाल्याकडे जाऊन “पूर्ण” सिगरेट स्वतः प्यायलो आणि मित्रासमोर फुशारकीने सांगितले. ती आयुष्यातली दुसरी चूक झाली. हळूहळू दिवसाला १-२-५ असे प्रमाण वाढत होते. पण तरी वाटायच की हॅ, आपल्याला काही व्यसन नाही, मी कधीही सोडू शकतो. ती आयुष्यातली तिसरी चूक झाली. हळूहळू ते प्रकार वाढत गेले, नोकरीला लागल्यावर स्वतःचा पैसा आला आणि मग all hell broke loose. मी जवळपास १० वर्षे सिगरेट पीत असे, कामानिमित्त बाहेरगावी गेलो की रोज जवळपास २ पाकिटे आणि एरवी १ पाकीट तर हमखास असे भीतीदायक प्रमाण होते.

व्यसन सोडण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. मी कामानिमित्त वरचेवर दौऱ्यावर जायचो. तिथे घरचे कुणी नसायचे, त्यामुळे कुणाला कळेल, कपड्याना वास येईल ही भिती नसायची. त्यामुळे सिगरेट पिणे खूप वाढले. तेव्हा ऑफिसमध्ये पण सेंट्रलाएज्ड एसी होते, हुद्दा मोठा होता त्यामुळे कुणाला भीक न घालता सिगरेट प्यायचो. दौऱ्यावर असताना एक दिवस मला उठल्या-उठल्या दात घासायच्या आधीच सिगरेट प्यावीशी वाटली आणि तेव्हा पहिल्यांदा साक्षात्कार झाला की आपल्याला व्यसन लागले आहे. ही फार मोठ्ठी गोष्ट आहे की आपल्याला स्वतःला हे कळले पाहिजे.

मग मी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सगळे म्हणतात तसे कोल्ड टर्कीने सुरुवात केली. १ दिवस बरा गेला मग परत येरे माझ्या मागल्या. मग पाकिट बाळगणे बंद केले. म्हणजे सिगरेट प्यायची तर झक्कत बाहेर जावे लागायचे. त्रास व्हायचा. कमी जायचो, पण तरीपण जायचो. मग खिशात पैसे ठेवणेच बंद केले. पण मग त्यामुळे ऑफिसात इतरांकडे सिगरेट मागायला लागलो. एक दिवस कानावर पडले की “साला, इतना बडा समझता है, लेकिन भिकारी की तरह सिगरेट मांगता है”. ते खूपच मनाला लागले आणि मग सिगरेट मागणे पण बंद केले. रादर बंद झाले, पण पूर्ण नाही झाले. बाहेर कधीतरी प्यायचोच, पण २ सिगरेटच्या दरम्यानचे अंतर वाढले. नंतर मला स्वतःच जाणवले की मी कधीच चालता-चालता सिगरेट पीत नाही. एकाजागी शांत बसून झुरके घ्यायलाच मला आवडते. त्यामुळे सिगरेटची तलफ आली की मी उठून चालू पडायचो, पण पानटपरीपासून दूर. तेव्हा मला अतिशय महत्वाचा शोध लागला. सिगरेट प्याविशी वाटली की तोंड कोरडे पडते. मग मी पाणी प्यायला सुरुवात केली. त्याने खूप फायदा झाला. इतके झाले तरी अजून १००% यश न्हवते. त्याच्यासाठी कोल्ड टर्की लागते. आमच्या ओळखीचे १ गृहस्थ होते (माझी आई त्यांच्या ऑफिसात काम करत असे, मी त्यांना आजोबा म्हणायचो). ते अतिशय श्रीमंत आणि यशस्वी होते. माझी आई सांगायची की ते २२ वर्षे रोज “५५५” चा ५० सिगरेटचा एक डबा (बहुदा त्याकाळी डबे होते, मला माहित नाही) आणि कधीकधी वर अजून १० प्यायचे. त्यांची बोटेपण निकोटिनने पिवळी पडली होती. ते एकदा पावसात घरी चालले होते आणि नेमकी काड्यापेटी संपली. तेव्हा मित्र त्यांना हिणवून काहीतरी बोलला तर त्यांनी तिथल्या तिथे “५५५” चा डबा फेकला आणि म्हणाले की मी आजपासून सिगरेट सोडली. ते आयुष्यात कधीच सिगरेट प्यायले नाहीत. मी तर त्यांना कधीच सिगरेट पिताना बघितले न्हवते, ते एकेकाळी सिगरेट प्यायचे याच्यावर पण माझा विश्वास न्हवता. पण एक हुरूप आला की हा माणूस २२ वर्षांनी जर सिगरेट सोडू शकतो, तर मी पण करू शकतो. नंतर मी जे.आर.डी. टाटा यांच्या एका पुस्तकात वाचले की त्यांनी पण एका दिवशी अशीच सिगरेट थांबवली. शेवटी मी पण एक दिवस कोल्ड टर्कीने सिगरेट थांबवली. कुठलाही विशेष दिवस निवडला नाही, कारण जर रिलॅप्स झाला तर मग पुढचा “विशेष दिवस” दिसला असता आणि मला ते नको होते. तुम्हाला हे सगळे पटकन झाले असे वाटेल, पण ही फार मोठी प्रोसेस होती.

तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला होणारे फायदे बरेच आहेत. पैशाची नासाडी होत नाही, आयुष्याचे मातेरे होत नाही, तब्बेत चांगली राहाते, लपूनछपून सिगरेट प्यावी लागत नाही, कपड्यांना वास येत नाही, दात पिवळे होत नाहीत. (मी सिगरेट सोडून जवळपास ३० वर्ष झाली पण अजूनही माझे दात पिवळे पडले आहेत. लंग्ज तर मला बघता येत नाहीत तिथे किती वाटोळं झालं आहे ते. एकदा नुकसान झाले की ते कधीच भरून येत नाही.)

समजा हे सिगारेटचे व्यसन सुटले, पण तरीही मनात भीती असते, की मला परत व्यसन लागले तर काय? कदाचित ते दुप्पट वेगाने येईल. पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल? असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येत असेल. तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरुवातच करू नका. पण जर व्यसन लागले, तर पाण्याच्या सहवासात रहा. जमले तर रोज पोहायला जा. ते नाही जमले तर दिवसातून दोनदा गार पाण्याने आंघोळ करा. तेपण नाही जमले तर तलफ येईल तेव्हा घोटभर पाणी प्या. जास्त नाही, फक्त १ घोट, केवळ तोंड ओलसर करायला. कारण क्रेविंग आले की तोंडाला कोरड पडते, सिगरेट प्यावीशी वाटते. ते क्रेविंग आपल्याला मारायचे आहे. त्यासाठी तोंड ओले पाहिजे.

एकदा रुमाल सिगरेट फिल्टरवर ठेवून त्यातून कश घेतला की रुमालावर निकोटिनचे पिवळे डाग पडतात. रुमाल कितीही धुतला तरी ते डाग जात नाहीत. मी तो रुमाल मुद्दाम वापरायचो, तेव्हा प्रत्येक वेळी माझ्या फुफुसावरचे ते निकोटिनचे डाग दिसायचे.

सिगारेट पिणे थांबवले की सुरुवातीचे दिवस कठीण जातात. अश्या वेळी सिगरेट पिणाऱ्या मित्रांपासून दूर राहणेच योग्य. तसेच दारूपार्टी पण टाळणे जरुरीचे आहे, कारण दारू पिताना हमखास सिगरेट प्यायली जाते किंवा आजूबाजूला सिगरेट पिणारा एखादातरी असतोच, त्यामुळे मोह होऊ शकतो.

दुसरी भीती अशी असते की एक व्यसन सुटले की दुसरे व्यसन लागायची शक्यता असते. माझा एक जवळचा मित्र गुटखा खायला लागला. तेसुद्धा भयानक व्यसनच आहे.

जेव्हा तुम्ही १ आठवडा यशस्वी व्हाल, तेव्हा वाचलेल्या पैशातून स्वतःला गिफ्ट द्या (सिनेमा बघा, पुस्तक घ्या, पर्फ्युम घ्या, बायको/प्रेयसी/मुलांसाठी गिफ्ट घ्या वगैरे). मी वाचलेल्या पैशातून एका अनाथ मुलीच्या शिक्षणाचा खर्च करायचो. त्यातून तुमचा हुरूप अजून वाढेल. तुम्ही प्रयत्न करत रहा. तुमचे व्यसन नक्की सुटेल. जर मला जमले तर तुम्हाला पण नक्की जमेल. धीर सोडू नका. Keep trying and marching towards your goal. तुम्हाला शुभेच्छा.

मी एकेकाळी इतका कट्टर व्यसनाधीन होतो, हे माझ्या जवळच्या बऱ्याच लोकांना माहीतही नाही आणि माहीत झाले तरी त्यांचा विश्वास बसणार नाही, अशी परिस्थिती आहे. आता जवळपास ३० वर्ष झाली. आज लिहिताना पण अंगावर काटा आला आहे, इतका तो प्रवास खडतर होता. पण आज मिळणारे समाधान नक्कीच अनमोल आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट! जोरदार टाळ्या...
व्यसनाधीन आहेत त्यांच्यासाठी प्रेरणादायी लेख.. आणि बऱ्याच उपयुक्त गोष्टी, उपाय यात आले आहेत.

ग्रेट!
ऋन्मेष +१
अच्युत गोडबोल्यांची आठवण झाली. नोकरी जाण्याच्या बेतात होती, छंदांवर आणि व्यसनांवर वारेमाप खर्च केल्यामुळे शिल्लक फारशी नव्हती आणि तेवढ्यात मुलाला ऑटिझम असल्याचं निदान झालं, हा त्यांच्यासाठी डोळे उघडणारा प्रसंग घडला आणि त्यांनी सगळी व्यसनं सोडली. नंतर त्यांनी करिअरमध्ये घवघवीत यश मिळवलं.

उपाशी बोका, हे सगळं प्रांजळपणे लिहायला बरीच हिंमत करावी लागली असेल. व्यसनमुक्त आयुष्याबद्दल अभिनंदन.

उपाशी बोका, हे सगळं प्रांजळपणे लिहायला बरीच हिंमत करावी लागली असेल. व्यसनमुक्त आयुष्याबद्दल अभिनंदन.>>+१

निकोटिनमुक्त होणे खरेच सोपे नाही, अभिनंदन तुमचे.

तब्येतीचे एकदा झालेले नुकसान भरून येत नाही हे खरे आहे.

अतिशय प्रांजळपणे लिहिलय. व्यसन सोडल्याबद्दल अभिनंदन.
व्यसनामुळे तोंडाला कोरड पडते ही नवी माहिती. (खाण्याच्या पदार्थाची आठवण आली की तोंडाला पाणी सुटतं!)

उपाशी बोका
छान लिहिलेत.
सिगारेट, तंबाखू, गुटखा ही व्यसनं जास्त घातक असे मला वाटते. कारण सहज मिळते, कुठेही कोपऱ्यात उभे राहून कार्यभाग साधता येतो. दारू साठी स्पेशल सेटअप लागतो तसे नाही. त्यामुळे हे व्यसन सुटणेही तितकेच कठीण.
तुम्ही यशस्वी झालात अभिनंदन.
व्यसनमुक्ती ही गाडी दुसर्याने धक्का देउन नाही चालत, self ignition हवे त्यासाठी. लख्ख जाणीव झाली आणि पुढे प्रोसेस करणे हे महत्वाचे.
लेखात तुम्ही केलेले उपाय देखील लिहिले आहेत, आलेल्या अडचणी देखील.
ज्याला व्यसन सोडायचं आहे अशा वाचकाला फायदा होईल. मनोनिग्रह चांगला आहे.

छान अनुभव. माझे 1992 ला लग्न झाले, त्यावर्षीच मला अपघात झाला व त्याच वर्षी मला हार्ट अटॅक आला. त्यानंतर सिगरेट सुटलीच.

इथे अगदी उपायांसकट सविस्तर लिहिण्याचे धाडस केलेत यासाठी खरेच अभिनंदन! सिगारेट सुटली यासाठी तर जास्तच कौतुक!

उपाशी बोका, खूप कौतुक.कायम अशीच सुटलेली राहूदे, कायम तब्येत नीट राहूदे.

(सहज आठवलं म्हणून)
बाबांना होतं सिगारेट चं व्यसन.किती प्यायचे आठवत नाही.मग सिगरेट सोडताना जर्दा तंबाखू ची सवय लागली.बरोबर चालणं योगा सर्व होतं,आहारसवयी चांगल्या होत्या. 70 वर्षं जगले.अवस्था डायबिटीस आणि पार्किन्सन्स सदृश ट्रेमर्स ने बरीच खराब झाल्यावर तंबाखू सुटली.(ट्रेमर्स इतके खराब होते की रोजचा 1 कप चहा 6 इंच व्यासाच्या प्लास्टिक बाऊलमध्ये द्यावा लागायचा सांडून वाया जाऊ नये म्हणून.)

खूपच प्रेरणादायी लेख. निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा !

खरंच इतकं प्रांजळपणे सगळं लिहायला हिंमत लागते ती दाखवलीत याबद्दलही कौतुक

उपाशी बोका, हे सगळं प्रांजळपणे लिहायला बरीच हिंमत करावी लागली असेल. व्यसनमुक्त आयुष्याबद्दल अभिनंदन...... +१.

तुम्ही वेगळेच रसायन आहात उबो. कथन फार आवडले. मुख्य त्यातून झळाळणारी तुमची कॅरॅक्टर स्ट्रेन्थ, अ‍ॅडमायरेबल आहे.

अभिनंदन उ बो .
प्रांजळ आणि प्रामाणिक लेखन आवडले .

तुम्ही वेगळेच रसायन आहात उबो + १