भारतीय संगीतशास्त्राचे जीर्णोद्धारक - पं विष्णु नारायण भातखंडे
प्रत्येक पिढीचे काही 'हीरो' असतात. मग ते कुठल्याही क्षेत्रातील का असेनात. भारतीय शास्त्रीय संगीतात आज ज्याप्रमाणे झाकीर हुसेन, कौशिकी चक्रवर्ती, शाहिद परवेझ इत्यादी नावे आदराने घेतली जातात, तशी भीमसेन जोशी, विलायत खान, कुमार गंधर्व, हिराबाई बडोदेकर, अब्दुल करीम खाँ ही त्या-त्या पिढीतील लोकांनी डोक्यावर घेतलेली नावे. त्या-त्या काळातील लोकांना ‘यासम हाच किंवा हीच’ असे वाटायला लावणारी ही नावे. पण काही नावे मात्र अशी असतात की ज्यांचे कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरते. अशा व्यक्तींच्या बाबतीत ते स्वतः किती उत्तम कलाकार होते यापलीकडेही ते त्या कलाक्षेत्रात काय आमूलाग्र क्रांती घडवून गेले हे जास्त महत्त्वाचे ठरते. अशा व्यक्तींमध्ये भारतीय संगीतशास्त्राच्या बाबतीत आधुनिक शास्त्रकार किंवा म्यूझिकोलॉजिस्ट म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल ते म्हणजे पंडित विष्णु नारायण भातखंडे.
आज कित्येकांना कदाचित हे नाव माहीतही नसेल. असलेच तर शास्त्रीय संगीत शिकणार्या/शिकलेल्या काहींना 'भातखंडे स्वरलिपी (नोटेशन) पद्धती’मुळे तर काहींना त्यापुढे जाऊन रागांच्या 'थाट' पद्धतीच्या वर्गीकरणाच्या संदर्भाने ते माहीत असेल. पण त्यांच्या कार्याचा एकूण आवाका पाहता संगीत क्षेत्रात असूनही एका अर्थी 'अनसंग’ राहिलेले ‘हीरो' म्हणजे पंडित विष्णु नारायण उर्फ अण्णासाहेब भातखंडे असे म्हणावे लागेल.
भारतीय शास्त्रीय संगीताचे सध्या ढोबळमानाने दोन प्रवाह मानले जातात. पहिला हिंदुस्तानी किंवा उत्तर भारतीय संगीत आणि दुसरा कर्नाटकी किंवा दाक्षिणात्य संगीत. या दोहोंमध्ये रागांची नावे, स्वरस्थाने, प्रामुख्याने आढळणारे गीतालंकार आणि सादरीकरणाची पद्धत हे सर्वच खूप भिन्न भासतात. मग या सर्वांची सुरुवात कशी झाली, एका पद्धतीचा दुसरीवर काही प्रभाव आहे का, असल्यास तो कसा आणि कधी पडला, पूर्वी लोक गायन कसे सादर करत असावेत, तेव्हाही आताप्रमाणेच शास्त्रीय गीतप्रकार - खयाल, बंदिश, कीर्तनम् - हे गायले जात होते का, या आणि अशा प्रश्नांची उत्तरे मिळवायची म्हणजे आपल्याला भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास धुंडाळावा लागतो. ते करताना इतिहासातल्या इतर गोष्टींप्रमाणे या (संगीत) बाबतीतही असे लक्षात येते की आपण भारतीय लोक दस्तावेजीकरणाच्या बाबतीत कच्चे होतो. भारतीयांना दस्तावेजीकरणाची शिस्त लावण्याचे श्रेय अनेकदा ब्रिटिशांना दिले जाते. भारतीय पुरातत्त्व विभाग, भारताचे पहिले भौगोलिक सर्वेक्षण, इत्यादी अनेक गोष्टी ब्रिटिशांनीच सुरु केल्यामुळे ते श्रेय काही अंशी रास्तही आहे म्हणा. पण आपल्या भारतीयांच्या सुदैवाने भारतीय शास्त्रीय संगीतातील हजारो चिजा, राग, त्यांची विविध चलने, आणि वेगवेगळ्या गानपद्धतींच्या दस्तावेजीकरणाचे अभिमानास्पद काम करणारे संगीताचार्य पंडित विष्णु नारायण भातखंडे हे मागच्या शतकात भारतात होऊन गेले.
अण्णासाहेबांचे ख्यातकीर्त शिष्य आणि संगीतशास्तकार डॉ. श्री. ना. रातंजनकर यांनी अण्णासाहेबांचं संपूर्ण चरित्र लिहिलं आहे. इथे अण्णासाहेबांचा संपूर्ण जीवनपट सांगायचा माझा उद्देश नाही, तर त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देण्यापुरता हा लेखनप्रपंच आहे. १८६० साली मुंबईतील वाळकेश्वर येथे जन्मलेल्या विष्णु नारायण यांच्या आजूबाजूची संगीतविषयक सामाजिक परिस्थिती आजच्या मानाने फारच वेगळी होती. शिकलेसवरलेले लोक गाणीबिणी करत नाहीत अशी एक समजूत होती. खुद्द अण्णासाहेब बी.ए. करत असताना सतार शिकायच्या ओढीने जेव्हा गुरू वल्लभदास यांच्याकडे गेले, तेव्हा 'अरे, तू तो पढा-लिखा भले घरका लडका है। इस झंझट में कहाँ आ पडा?' असा प्रश्न गुरुजींनी त्यांना केला होता.
अशा वातावरणातही अभ्यासू वृत्तीच्या अण्णासाहेबांनी त्यांच्या शालेय वयापासून आपली संगीताची आवड जोपासली व सर्व व्याप सांभाळत ते शास्त्रशुद्धपणे संगीत शिकत राहिले. बी.ए.च्या पाठोपाठ ते एल.एल.बी.ही झाले व वकिली व्यवसाय करू लागले. पण त्यांच्या मुख्य आवडीचा विषय होता संगीत व पिंड होता संशोधकाचा. या दोन्ही गुणांची सांगड होऊन पुढे या क्षेत्रात महत्कार्य त्यांच्या हातून होणार होते.
व्यवसायाच्या बरोबरीने ते मुंबईतल्या उत्तमोत्तम गवय्ये आणि उस्तादांकडे जाऊन संगीत शिकू लागले. या काळात शिकलेल्या संगीतावर मेहनत करणे आणि त्यांची टिपणे काढणे हे त्यांनी नियमितपणे कटाक्षाने केले. त्यांनी शेकडो ध्रुपदे आणि ख्याल गोळा केले होते. संगीताचा मुळापासून अभ्यास करण्यासाठी त्यांनी संगीतविषयक प्राचीन संस्कृत ग्रंथ - भरताचे नाट्यशास्त्र, संगीत रत्नाकर, संगीतदर्पण, नारदी शिक्षा इत्यादी अभ्यासले. अनेक वर्षांच्या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की भारतीय संगीतशास्त्रावर हे ठराविक ५-६ संस्कृत ग्रंथ इतकेच काय ते वाङ्मय उपलब्ध आहे. इतकेच नाही, तर हिंदुस्थानी आणि कर्नाटकी - दोन्ही संगीतपरंपरा त्यांचे प्रमाणग्रंथ म्हणून याच ५-६ ग्रंथांकडे बोट दाखवतात. म्हणजे मुळात या दोन्ही संगीतपद्धतींचा पाया एकच असला पाहिजे आणि सतत परिवर्तनशील असलेल्या कलेत कुठेतरी फाटे फुटून या दोन वेगळ्या शाखा निर्माण झाल्या असल्या पाहिजेत. अकराव्या-बाराव्या शतकातील परकीय आक्रमणांनंतर, विशेषतः पुढे मुघलकाळात, संगीत कलावंत हे प्रामुख्याने मुसलमान असल्याचे आढळते. परंतु त्या संगीताचे शास्त्र मात्र संस्कृत भाषेत लिहिलेले होते. काळानुसार बदलत जाणार्या लोकाभिरुचीमुळे कलेच्या सादरीकरणात बदल होत गेले. मात्र शास्त्र जाणणारे फार लोक राहिले नाहीत. शास्त्र आणि कला ह्यांत फारकत होत गेली. हे सर्व आज वाचायला सोपे वाटत असले तरी ह्या निष्कर्षाला यायला अण्णासाहेबांना प्रचंड अभ्यास करावा लागला. ते कधीच प्रगतीच्या विरुद्ध नव्हते; उलट कलेत जसे काळानुरूप बदल होत गेले, त्याप्रमाणे शास्त्रही काळानुरूप आणि लोकाभिमुख उत्क्रांत व्हावे असे त्यांचे मत होते, आणि त्याच दृष्टीने त्यांचे जीवनकार्य महत्त्वाचे ठरते.
आता इथे एक गोष्ट विशेषत्वाने सांगायला हवी, ती म्हणजे ह्यामधल्या काळात हजारो नवनवीन चिजांची निर्मिती झाली असली, तरी त्या सर्वांना उपलब्ध नसत. बर्याचश्या चिजा या मौखिक परंपरेनेच पिढ्यान्पिढ्या संक्रमित होत, बदल होत चालत आलेल्या होत्या. आज वाचून नवल वाटेल, पण अनेक घराणी वा गुरुपरंपरा त्यांच्या चिजांना खाजगी मालमत्ता समजून त्या इतरांना देत नसत. अगदी आजही ह्यातल्या काही प्रथा काही पंडित आणि उस्तादांकडे पाळल्या जातात. त्यातल्या काही चिजा वा तबल्यावरच्या गत चक्क 'दहेज चीज' किंवा 'दहेज गत' प्रकारात गणल्या गेल्या आहेत. म्हणजे काय, तर दोन संगीत घराण्यांमध्ये झालेल्या 'आंतरघराणीय' लग्नात एका घराण्याकडून दुसर्या घराण्याकडे या गुप्त चिजा आणि गत हुंडा म्हणून दिल्या गेल्या आहेत. ते असो. सुदैवाने या प्रकारांना अनेक सन्माननीय अपवादही होते, व त्यांनी अण्णासाहेबांच्या कार्याला खूप मोठा हातभार लावला.
अण्णासाहेबांच्या रातंजनकर-लिखित चरित्राच्या प्रस्तावनेत संगीतज्ञ कै. वामनराव देशपांडे यांनी अण्णासाहेबांच्या कार्याचे तीन प्रमुख भाग सांगितले आहेत. पहिल्या भागात त्यांचा सखोल अभ्यास आणि निरीक्षण येते. संगीताचे शास्त्र आणि सादर होणारी कला ह्यात काही ताळमेळ आहे का ह्याचा शोध घेत ते भारतभर हिंडले. त्यासाठी त्यांनी चार यात्रा केल्या. पहिली यात्रा सुरत, बडोदा, अहमदाबाद, बिकानेर, जुनागढ, द्वारका, कच्छ इत्यादी प्रदेशांत केली. दुसरी विशेष यात्रा ही त्यांनी दक्षिण भारतात त्यावेळच्या मद्रास, तंजाऊर, मदुरै, रामेश्वरम, तिरुअनंतपुरम, तिरुचिरापल्ली, बंगळूर, म्हैसूर इत्यादी प्रांतात केली. इथे त्यांना उत्तर आणि दक्षिण प्रांतातल्या संगीतातील एकात्मतेचा सुगावा लागला. कर्नाटक संगीतातल्या रागवर्गीकरणाच्या 'मेल' पद्धतीशी त्यांची ओळख झाली. तिथल्या काही ग्रंथांचेही त्यांनी वाचन केले. पंडित सुब्बराम दीक्षितर यांच्यासारख्या मान्यवर लोकांशी प्राचीन संगीतावर चर्चा झाल्या. जयपूरच्या उस्ताद आशिक अली आणि अहमद अली यांच्याकडून त्यांनी साधारण तीनशे चिजा मिळवून त्या स्वरलिपीत लिहून जतन करून ठेवल्या. इतकेच नाही, तर या अली बंधूंचे गुरू असणारे त्यांचे वडील उस्ताद मुहम्मद अली खाँ कोठीवाल यांना भेटून त्या सर्व चिजांची शुद्धता प्रमाणित करून घेतली. हीच पद्धत त्यांनी इतरही अनेकांकडून संगीत शिकताना वा सांगीतिक देवाणघेवाण करताना पाळली. यातून त्यांच्या संशोधनातील काटेकोरपणा दिसून येतो. त्यांच्या तिसर्या यात्रेत त्यांनी नागपूरपासून पुढे पूर्व भारतात कलकत्ता, जगन्नाथ पुरी, हैदराबाद इत्यादी प्रांतात प्रख्यात कलाकारांना भेटून त्यांच्याशी सखोल चर्चा केल्या. चौथी यात्रा उतर भारतात करून त्यांनी दिल्ली, आग्रा, मथुरा, वाराणसी, अलाहाबाद इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. या सर्व यात्रांचा परिपाक हा त्यांच्या कार्याच्या दुसर्या भागात दिसतो.
त्यांच्या कार्याचा दुसरा भाग म्हणजे या निरीक्षणे आणि टिपणांचे सखोल मनन करून प्राचीन शास्त्राच्या आधारावर कालसुसंगत अशा नवीन शास्त्राची मांडणी. त्यांच्या आयुष्याची साधारण पंचवीस वर्षे त्यांनी यात घातली.
सर्वप्रथम त्यांनी 'चतुर पंडित' या टोपणनावाने प्रचलित संगीताची सुसंबद्ध व्याख्या करणारा एक संस्कृत ग्रंथ 'श्रीमल्लक्ष्यसंगीतम्' लिहिला. त्यात त्यांनी त्यांच्या नव्या शास्त्राची मांडणी केली आहे. संगीतदर्पण ग्रंथातील व्याख्या घेऊन त्याच अर्थाची 'गीतं वाद्यं तथा नृत्यं त्रयं संगीतमुच्यते' (गायन, वादन, आणि नृत्य या तिघांना संगीत म्हटले जाते) ही संगीताची सरळ सोपी व्याख्या याच लक्ष्यसंगीत ग्रंथात त्यांनी दिली. हा ग्रंथ हा जणूकाही त्यांचा प्रबंध म्हणावा असा आहे. ग्रंथाची रचना ही व्याख्या, जुन्या शास्त्राचे विवेचन, त्यासाठी ग्रंथांचे थेट दाखले, भिन्न ग्रंथांतील शास्त्राचे अन्वेषण, त्यात प्रचलित संगीताशी फारकत असलेले मुद्दे आणि नवीन शास्त्राची मांडणी अशी आहे.
कर्नाटकी ‘मेलकर्ता’ पद्धतीपासून प्रेरणा घेऊन, आपल्या संगीतातील एकूण १२ स्वरांपैकी (७ शुद्ध, ४ कोमल आणि १ तीव्र) कोणत्या रागात कोणते कोमल किंवा तीव्र स्वर येतात यावर आधारित त्यांनी त्यांचे १० प्रकारांत (थाट) वर्गीकरण केले. मेल पद्धतीत ७२ प्रकार असले तरी हिंदुस्तानी संगीतातले बहुतांश प्रचलित राग या १० प्रकारांत विभागता येतात, तसेच 'भाव' हा रागाचा मूल गुणधर्म मानून स्वरसमूहानुसार वर्गीकरणात निराळे दिसणारे राग भावानुसार एकसारख्या थाटांत गणले जाऊ शकतात हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले.
तत्पूर्वी राग - रागिण्या (जणू राजे आणि त्यांच्या राण्या), त्यांचे उपराग - अशी रागांची 'पारिवारिक' रचना मानली जात असे. परंतु आपल्याकडे दिवसातल्या वेळेनुसार त्या-त्या वेळी ठराविक राग गाण्याचा जो प्रघात आहे, त्यामागचा कार्यकारणभाव त्या रचनेतून लक्षात येत नसे. दहा थाट पद्धतीमुळे संधिप्रकाश राग (म्हणजे सूर्यास्त/सूर्योदयाच्या वेळचे) कुठले, दुपारचे कुठले, रात्रीचे कुठले - हे कळणे खूप सोपे झाले. ठराविक स्वरसंगती असलेले राग ठराविक वेळेच्या वर्गात मोडतात हे ह्या नव्या वर्गीकरणात ठळकपणे आढळून आले. याशिवाय कित्येक प्रचलित आणि अप्रचलित रागांची माहिती, त्यांतले उत्तर - दक्षिण भेद, उत्तम गायनाची लक्षणे, गायनातील दोष, आधुनिक संगीताची सद्यस्थिती अश्या अनेक मौलिक विषयांवर, तक्त्यांसकट लक्ष्यसंगीतम् ग्रंथात लेखन केलेले आहे. शिवाय त्यांनी ह्या ग्रंथातील सर्व लेखन अनुष्टुभ छंदात केले आहे, ज्यावरून त्यांच्या संस्कृत भाषापांडित्याची आणि काव्यकुशलतेचीही कल्पना यावी.
या ग्रंथानंतर लगेचच त्यांनी मराठीत विविध ग्रंथांचे लेखन सुरू केले. त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे पुढील २२ वर्षे त्यांनी 'हिंदुस्तानी संगीतपद्धती' या नावाने लक्ष्यसंगीतावर विस्तृत ५ खंडांमध्ये केलेले लिखाण. यात त्यांनी संकलित केलेले शास्त्र लोकांसमोर मराठीत आणि साध्या सरळ भाषेत आणले आहे. या पाचही खंडांमध्ये गुरु-शिष्य संवादाच्या रूपात विवेचन आहे. शिष्य प्रश्न विचारत जातात आणि गुरू त्यावर साधक-बाधक चर्चा घडवीत आणि जुन्या ग्रंथांचे (शिवाय लक्ष्यसंगीत ग्रंथाचेही) दाखले देत ते त्यांचे समग्र संगीतज्ञान खुले करून देतात. त्यात त्यांनी वाचलेला, ऐकलेला आणि पाहिलेला संगीताचा इतिहास, विविध घराणी, विविध प्रांतातील संगीत आणि तिथले ग्रंथ, त्यांच्या त्यांच्या शैली, त्यातली साम्ये आणि भेद, गायनाचे उपशास्त्रीय प्रकार (टप्पा, ठुमरी, इत्यादी), उत्तर-दक्षिण संगीत - असा अतिशय रोचक विषयविस्तार ते मांडतात. या सर्व पुस्तकांचा सर्वात मोठा भाग हा शेकडो रागांची माहिती, त्यांचे चलन, त्यांची ठळक सौंदर्यस्थळे, त्यांतील चिजा, त्यांची प्रचलित विविध नावे, गायन पद्धती आणि स्वतःचे त्यांवरील मत यांनी भरलेला आहे. संवादात्मक लेखनशैलीमुळे ते कुठेही नीरस होत नाहीत. हे कार्य इतके मोलाचे आहे की आज जगभरात जिथे जिथे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकवले जाते (त्यांच्या समकालीन विष्णु दिगंबर पलुस्करांनी सुरू केलेल्या आणि भारतभर कार्यविस्तार झालेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्य अभ्यासक्रमासकट) त्यातल्या बहुतांश शिक्षणाचा सैद्धांतिक पाया या पुस्तकांवर आधारलेला आहे - याची कल्पना अनेकांना नसते.
या पुस्तकांची मागणी त्याकाळी संगीतवर्तुळात इतकी वाढली होती की त्याची हिंदी भाषांतरेही प्रताधिकारभंग करून केली गेली. याशिवाय गुजराथी आणि अन्य भाषांतही त्याची भाषांतरे झाली. यातल्या रागांची थिअरी आणि चिजा यांची माहिती अण्णासाहेबांनी पुढे जणू पाठ्यपुस्तके वाटावीत अश्या स्वरूपात 'क्रमिक पुस्तक मलिका' या नावाने ६ भागांत प्रसिद्ध केली. रागांचे गुणधर्म रंजक पद्धतीने सांगणारी गीते (ज्यांना 'लक्षणगीत' असे त्यांनी म्हटले) लिहून ३ भागांमध्ये लक्षणगीतसंग्रह प्रकाशित केला. याशिवाय 'अभिनव रागमंजिरी' आणि 'अभिनव तालमंजिरी' हे संस्कृत ग्रंथ, २०-२२ जुन्या संस्कृत संगीतग्रंथांची संपादने, 'स्वरमालिका', 'गीतमालिका', संगीतयात्रेची वर्णने करणारी मराठी पुस्तके इत्यादी प्रचंड लेखन त्यांनी या काळात केले. याशिवाय 'A short historical survey of the music of Upper India' या आणि तत्सम विषयांवर इंग्रजीत व्याख्याने दिली आणि लेखही लिहिले.
ते केवळ या नवीन शास्त्राची उभारणी करून थांबले नाहीत तर त्यांच्या कार्याच्या तिसर्या टप्प्यात त्यांनी त्याचा प्रचार आणि प्रसार केला. त्यासाठी त्यांनी संगीतशास्त्र आणि कला या दोन्हींचे शिक्षण देणारी विद्यालये आणि महाविद्यालये काढली, त्यांमधल्या जुन्या पठडीत घडलेल्या शिक्षकवर्गाला आधी हे नवीन शास्त्र शिकवले. त्यात बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी चालवायला दिलेले सरकारी महाविद्यालय, ग्वाल्हेरचे त्यांच्या प्रेरणेतून आणि देखरेखीखाली उभारलेले माधव संगीत विद्यालय, आणि लखनौला त्यांनी सुरू केलेले मॉरिस कॉलेज ऑफ म्युझिक - ही प्रमुख उल्लेखनीय. मॉरिस कॉलेज, लखनौ हे आता 'भातखंडे संस्कृती विश्वविद्यालय' नावाने ओळखले जाणारे विद्यापीठ झाले आहे. अण्णासाहेबांनी श्रीकृष्ण रातंजनकरांसारखे पुढल्या पिढीतले संगीतशास्त्रकार आणि कलाकार घडवले आणि नव्या पिढीच्या संगीत कलाकारांमध्ये चिकित्सक वृत्ती वाढवली. त्यांच्या कार्याची व्याप्ती त्यांच्या शिष्यपरंपरेमार्फत आणि त्यांच्यापासून प्रेरित कित्येक अन्य संगीतकारांमार्फत आजही वर्धिष्णूच आहे. १९६१ साली भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिटही काढले होते. एकंदरीत त्यांच्या कार्याकडे पाहिले तर जुन्या संस्कृतमध्ये लिहिल्या गेलेल्या आणि कालपरत्वे प्रत्यक्ष कलेपासून दूर झालेल्या भारतीय संगीतशास्त्राचा जीर्णोद्धार त्यांनी सर्वांगाने केला याची खात्री पटते.
अण्णासाहेबांनी आपल्याला सर्व संगीत कळले आहे असा दावा कधीच केला नाही. उलट आपल्या शिष्यांना केलेल्या उपदेशात त्यांनी त्यांच्या लिखाणातील त्रुटी सुधारण्याचा आणि आणखी भर घालत जाण्याचा सल्ला दिला आहे. 'मी स्वतः कधी हिंदुस्थानाबाहेर गेलो नाही, पण तुम्हांस कधी इराण, चीन, जपान इत्यादी देशांत जाण्याचा योग आला, तर त्यांचे संगीत कसे आहे, त्यांच्या आणि आपल्या संगीतात काही साधर्म्य आहे का अशा गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या' असे ते सांगत. रागांचे बदलते स्वरूप, तसेच रंगभूमी आणि शास्त्रीय संगीत यांच्या देवाणघेवाणीतून होत जाणारा संकर यांचीही नोंद घेऊन सुयोग्य परिवर्तनांचे त्यांनी स्वागतच केले. अमुक एक राग अमुक काळात कसा गायला जात होता हे कळण्यासाठी नोटेशनशिवाय पर्याय नाही हे लोकांना पटवून देत आपली स्वरलिपी त्यांनी अनेकांना शिकवली व ती आज संगीतकार मोठ्या प्रमाणावर वापरतात. त्यांचे अपूर्ण ग्रंथ त्यांनी शिष्यांच्या स्वाधीन केले, जे त्यांच्या मृत्युपश्चात प्रसिद्ध झाले. आपल्या शेवटच्या काही वर्षांत व्याधींनी ग्रासलेल्या या महान संगीतशास्त्रकाराचा मृत्यू १९ सप्टेंबर १९३६ला, गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला. त्यांच्या स्मृतीला शतशः नमन करून हा लेख मी त्यांना समर्पित करतो.
तळटीपा:
१. संदर्भ - संगीताचार्य पं. विष्णु नारायण भातखंडे यांचे चरित्र (लेखक - डॉ. श्री. ना. रातंजनकर)
२. संदर्भ - The Directory of Pandit V N Bhatkhande’s literature, Ocean of Ragas: - येथे त्यांची बहुतांश पुस्तके उतरवून घेण्याकरिता उपलब्ध आहेत
३. लेखाच्या मुद्रितशोधनास मदत केल्याबद्दल भरत. आणि स्वाती_आंबोळे यांचे आभार
४. लेखातील चित्र विकीपिडियावरून साभार
----------------------------------------------
हरचंद पालव
नेटका परिचय आणि कार्यआढावा.
नेटका परिचय आणि कार्यआढावा.
रच्याकने संगीताचार्य भातखंडेंच्या नावाने संगीत विद्यालय पाकिस्तानात होते/आहे. त्याला भेट देणे हे माझ्या बकेट लिस्टमधे आहे.
अतिशय सुरेल परिचय !
अतिशय सुरेल परिचय !
खूपच छान आणि विस्तृत परिचय!
खूपच छान आणि विस्तृत परिचय!
आवडला
लेख फार सुंदर झाला आहे.
लेख फार सुंदर झाला आहे.
आपण जी स्वरलिपी वापरतो ती भाताखड्यांनी शोधली, त्यांनी १० थाट आणि त्यातील राग वर्गीकरण केलं हे माहीत होते. पण त्या मागे इतका अफाट प्रवास आणि मुख्यतः ही मूलभूत स्वरूपाची फेरबांधणी करणे किती ग्राउंडब्रेकिंग आहे आणि ती प्रचलित करणे किती कठीण असेल याची कल्पना ही करवत नाही.
लक्षणगीते भातखंड्याननी रचली माहीत नव्हतं. राग शिकत असताना आमच्या गुरुजींनी भूप, दुर्गा, काफी, बागेश्री इ. ची लक्षणगीते शिकवलेली ती त्या निमित्ताने आठवली. राग बोध हे गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी चे पुस्तक असूनही त्यात देवधारांनी भातखंडे पद्धत वापरलेली का/ ना? त्या निमित्ताने पलुस्कर पद्धत वेगळी होती इतकं लक्षात होतं पण म्हणजे नक्की कशी ती पण उजळणी झाली.
रातंजनकर यांचं नाव मोठ्या माणसांकडून अनेकदा ऐकलेले आहे, त्यांनी लिहिलेलं चरित्र आता घरी आहे का काय.. किंवा वाचलं होतं का काय असं आता वाटतंय.
फार मोठ्या माणसाची छान ओळख करून दिलीस. त्यांचे फार मोठे ऋण आहेत. त्याच्या स्मृतीस वंदन.
सुंदर लेख!
सुंदर लेख!
लेख आवडला. त्यांच्या उत्तुंग
लेख आवडला. त्यांच्या उत्तुंग कार्याचा उत्तम परिचय करून दिला आहेस.
हरचंद पालव म्हणजेच नारायण
हरचंद पालव म्हणजेच नारायण भातखंडे आहेत हे माहित न्हवतं.
सर्वांचे मन:पूर्वक आभार.
सर्वांचे मन:पूर्वक आभार.
अनिंद्य, हे माहीत नव्हतं. नक्की भेट द्या. खरे रसिक आहात!
अमित, पलुस्कर आणि भातखंडे हे दोन्ही विष्णु एकाच काळात होऊन गेले, तरी त्यांचं कार्य एकमेकांना समांतर झालं. पण तरीही ते एकमेकांच्या कार्याचे प्रशंसक होते. त्यामुळे पुढे इतरांनाही त्यांच्या त्यांच्या कामातला योग्य तो भाग उचलून वापरण्यात काही वावगं वाटलं नसणार.
बोकलत
सुंदर लेख…
सुंदर लेख…
वाशीच्या गांधर्व महाविद्यालयात गायन शिकत तिन चार वर्षे घालवली असल्याने भातखंड्यांचे नाव ऐकुन आहे. राग लक्षणे इतकी सुंदर लिहिली आहेत की जराही ओढुन ताणुन बसवलीत असे वाटत नाही.
इतिहास रचणार्या अशा लोकांनी अनेक त्रास काढुन मोलाचे कार्य करुन ठेवले आहे जे पुढच्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरले आहे.
लेख आवडला. उत्तम परिचय दिला
लेख आवडला. उत्तम परिचय दिला आहे.
हरपा, लेख आवडला.
हरपा, लेख आवडला.
पं. विष्णु नारायण भातखंडे यांची व त्यांच्या उत्तुंग कार्याची ओळख करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. याबद्दल काहीच माहीत नव्हते.
लेखाची मांडणी व मुद्देसूद वर्णन आवडले.
संदर्भात दिलेल्या लिंकसाठी धन्यवाद.
साधना, आचार्य आणि ऋतुराज,
साधना, आचार्य आणि ऋतुराज,
अनेक आभार!
भातखंडे आणि विष्णू दिगंबर या
भातखंडे आणि विष्णू दिगंबर या दोन्ही नावांभोवती मोठे वलय संगीत प्रेमींच्या मनात पहिल्यापासून आहे. पैकी विष्णू दिगंबर यांची ओळख सर्वसामान्यांपर्यंत वेळोवेळी पोहोचत गेली, पण भातखंडें बद्दल मात्र सामान्य माणसांना फारशी माहिती नसते . तुम्ही हा लेख लिहून खूप महत्त्वाचं आणि चांगले काम केले आहेत! धन्यवाद.
चांगले लिहिले आहे. एका
चांगले लिहिले आहे. एका माणसाने एका आयुष्यात एवढं सगळं काम केलं, हे विलक्षण आहे.
छान लेख.. छान परिचय..
छान लेख.. छान परिचय.. शास्त्रीय संगीताची आवड नसल्याने यांच्याबद्दल माहीत नव्हते.
मृत्यू गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला..हे वाचून अर्रर झाले. पण अशी माणसे त्यांची कामे मागे ठेवून गेल्याने किर्तीरुपी कायम उरतात.
धन्यवाद, पशुपत, भरत., आणि
धन्यवाद, पशुपत, भरत., आणि ऋन्मेऽऽष. पशुपत, तुमचा प्रतिसाद वाचून छान वाटले. ऋन्मेऽऽष, तुझं शेवटचं वाक्य अगदी खरं आहे!
लेख शांतपणे वाचायचा ठरवलं
लेख शांतपणे वाचायचा ठरवलं होतं. तो आत्ता वाचला.
खुप छान झाला आहे लेख.
धन्यवाद ममो. प्रतिसाद द्यायचा
धन्यवाद ममो. प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता.
ममो +१
ममो +१
मी पण हा लेख सवडीने वाचू म्हणून ठेवला होता.
खूप छान झालाय हा लेख
धन्यवाद हर्पेन
धन्यवाद हर्पेन