"माझे स्थित्यंतर- अतरंगी"

Submitted by अतरंगी on 10 September, 2024 - 17:48

स्थित्यंतर !

मोठा शब्द आहे. स्थित्यंतर, परिवर्तन सगळेच मोठे जडजड शब्द. कधी कुठला वापरायचा, त्याचे नेमके अर्थ काय, त्या शब्दांच्या छटा कोणत्या? नेमका तो शब्द कोणत्या अर्थाने कुठे वापरायचा? देव जाणे.

असो.

तर गेल्या काही वर्षात स्थित्यंतर म्हणता येईल की नाही माहीत नाही, पण माझ्यात अनेक बदल मात्र नक्की झाले. काही वरवर दिसणारे काही फक्त माझे मलाच जाणवणारे.

एक कुठे तरी वाचलेले वाक्य आठवते , बुद्ध कधीही म्हणायचा नाही, की हे झाड आहे, त्याचे वाक्य कायम ते पहा ते झाड होत आहे, असे असायचे. (आता बुद्ध खरेच असे म्हणायचा का ते त्याचे त्यालाच ठाउक!). तसेच मला आपल्या स्वतःबद्दल वाटते. आपण XYZ आहोत म्हणण्यापेक्षा आपण XYZ होत आहोत असे म्हणणे मला जास्त संयुक्तिक वाटते. आता अनेकदा मी एखादे मत मांडले की माझे जुने मित्र मला " तुला आठवते का तूच अमुकतमुक दिवशी, अशा अशा ठिकाणी, हे बोलला होतास"? त्यावर माझे ठरलेले उत्तर आहे " हो. माझी अनेक मते/विचार मागच्या काही वर्षात पूर्णपणे बदलली आहेत. वर्षानुवर्षे एकच मत असणारे पूर्ण ज्ञानी तरी असतात किंवा हेकेखोर तरी. मी दोन्ही नाही. शिवाय मी जे आज बोलत आहे, कदाचित काही वर्षांनी त्याच्याही विरुद्ध बोलेन!"

टिनेज मधे कसं होतं ना की, मला सगळ्यातलं सगळं कळतं, असं माझं मत होतं. देव, धर्म, जात-पात, राजकारण, पुरुषप्रधान व्यवस्था सगळ्यावर मतं. आणि प्रत्येक बाबतीत अगदी ठाम मत. त्यात शंका कुशंका नाहीच. मी वाचलेलं आहे, मला माहित आहे, तुम्हाला काही कळत नाही! बास संपला विषय. बरं नुस्ता मतं असली तर असोत बापडी, पण ते मांडायची खुमखुमी पण फार. बिनकामाचे काहीतरी बोलायचे म्हणून मी किती वाद घातले काय सांगावे. मी जिथे रहायचो आणि माझा जो मित्र परिवार होता त्यात माझं वाचन बरंच होतं, पण काहीही वाचले की किंवा वाचता वाचताच ही माहिती मी कुठे वापरुन मी कस्सा हुश्शार हे दाखवता येईल, हाच पहिला विचार! त्यामुळे माझ्याकडे बोलायला (अर्थात बरोबरच असलेले) मुद्दे भरपुर असायचे. आता मागे वळून पाहताना मित्रांसमोर, घरच्यांसमोर मांडलेली मतं आठवली की स्वतःच्या मुर्खपणाची किव येते.

पण असेही नाही की त्या वेळेसची सगळीच मते चूक होती, काही मला आजही बरोबर वाटतात. अधिक वाचन करुन, विचार करुनही ती मते बदलली नाहीत, पण सगळ्यात लक्षणीय बदल मी माझ्यात करत येत आहे, की ती मते कुठे मांडायची व कशी मांडायची ते तारतम्य! जे आधी शून्य होतं. शिवाय आजकाल माझे मत मांडताना मी ठामपणे मांडणे टाळतो. ते प्रश्नस्वरुपात मांडायचा प्रयत्न करतो. जेणेकरुन समोरच्याची बाजू ऐकता यावी. हा दुसरा बदल. आणि तिसरा आणि महत्वाचा बदल म्हणजे मी माझेच बरोबर आहे, समोरचा कधी बोलायचा थांबतोय आणि मी त्याचे मत खोडायला सुरुवात करतोय, ही स्वय तोडतोय. आता मी खरेच समोरच्याचे ऐकतो व त्यावर नंतर विचार करतो.

मत मांडताना जे कसे मांडावे हे जसे महत्वाचे आहे, तसे ते मांडावे की नाही, हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. एकतर आजकाल मी मोस्टली वैयक्तिक आयुष्यात विचारल्याशिवाय मत मांडतच नाही ( सोमि वर थोडाफार अपवाद) आणि कोणी विचारले तरी, जर आपले मत मांडून काही उपयोग होणार नसेल, तर स्वतःचा वेळ आणि एनर्जी मी आजिबात वाया घालवत नाही. याबाबतीत मला माझ्या जुन्या सवयींचा फायदाच झाला, असे म्हणणे योग्य होईल. मी मत मांडायच्या आधी समोरच्या माणसाचे निरीक्षण करतो. आपण मत मांडल्यावर तो विचार करणार आहे की नाही, आहे त्या परिस्थितीत मत मांडणे गरजेचे आहे का? मी ते मत मांडल्याने आहे त्या परिस्थितीत काही पॉझिटिव्ह बदल होणार असेल तरच मत मांडतो, अन्यथा फक्त स्मितहास्य करुन 'ओके" म्हणतो.

माझ्या वागण्यातले हे बदल हळूहळू होत आहेत. १००% झालेत असे नाही. पण होत आहेत. अजूनही काही ठिकाणी मी गरज व फायदा नसताना पटकन मत व्यक्त करुन रिकामा होतो. नंतर लक्षात येते की ते करायची गरज नव्हतीच. मग पुढच्या वेळेस तशी सिच्युएशन आली की शांत रहायला जमतं.

एवढ्या वर्षात घडलेला हा एक मोठा बदल, स्थित्यंतर काय असेल ते!

दुसरा परिणाम काही झाला असेल तर स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्यांचा लॉजिकली निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम न होऊ देणे.

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥

हे लहानपणापासून ऐकलं आहे. मनाचे विकार, षड्रिपू याविषयी पण शालेय, महाविद्यालयीन वयापासून माहिती आहे. पण अस्मिताने मागे चिकवाच्या धाग्यावर लिहिलेलं "एपिफनीवर माझा विश्वास नाही. बघताना त्या एका क्षणात वठवलेला साक्षात्कार हा जन्मभराच्या चिंतनमननातून आलेला असू शकतो. एखाद्या माणसाला माहिती असते पण अनुभव आल्याखेरीज ती माहिती ज्ञान होत नाही. आत्मज्ञान तर मुळीच नाही. माहितगार भरपूर सापडतात, त्याने प्रभावित होऊ नये... ज्ञानी विरळा असतो. Information and knowledge यांत फरक आहे." हे वाक्य ईथे पर्फेक्ट लागू होतं. (मी स्वतःला ज्ञानी म्हणत/मानत नाही)

मनाचे विकार वगैरे सगळं महिती असणं वेगळं आणि ते एखाद्या क्षणी उमजणं, आपलं वागणं त्याच्याशी रिलेट होणं वेगळं. हे ज्या क्षणी घडलं तो क्षण आजही मनावर कोरला गेला आहे. याचा मला किती फायदा होत आहे ते शब्दात सांगणे निव्वळ अशक्य आहे.

Know thyself!

हे सध्या माझ्या आयुष्याचे सगळ्यात महत्वाचे वाक्य आहे. मी जे जे काही करतो, बोलतो, वागतो, त्यामागच्या माझ्या भावना व त्यामुळे निर्माण होणार्‍या भावना यांचा विचार करुन मला आजपर्यंत आयुष्यात कधीच जी क्लॅरिटी नव्हती, ती आज आली आहे. माझा आयुष्यातल्या ९९% गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.

Priorities are clear, decision making process is way simpler!

माझ्यातल्या या बदलावर जास्त काही लिहावेसे वाटत नाही, कारण ही गोष्ट नीट सांगता येणार नाही, सांगून कळणार नाही. ती प्रत्येकाला जेव्हा उमजेल तेव्हा उमजेल.
ही अनुभवायची गोष्ट आहे. ती जेव्हा आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा आपल्याला परिसस्पर्श होतो.

लेख लिहिता लिहिता भरकटलो की काय जाणे, याविषयावर लिहावेसे वाटत होते, झोप येत नव्हती म्हणून मनाला येईल तसे खरडत गेलो.

बदल म्हणा , स्थित्यंतर म्हणा, परिवर्तन म्हणा, मला जे मागे वळून पाहताना ठळकपणे जाणवलेले एवढेच.

असो या विषयावर लिहावेसे वाटले ते एवढेच.

लिहतानाच विचार करत होतो की हा लेख प्रकाशित करावा की नाही, काय सांगावे पाच दहा वर्षांनी जिवंत असलो आणि हा लेख परत वाचला तर परत वाटेल काय मुर्ख होतो आपण, उगीच काहीही लिहायचो. काही गरज नव्हती हे लिहायची......

ता.क.:- लेखाचे नाव फारच फनी वाटत आहे.... माझे स्थित्यंतरः- अतरंगी Happy . या संयोजकांना काही कळत नाही, उपक्रमांना काहीही नावे देतात!)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडलं, रिलेट झालं. मला ह्या वयात कुठे अक्कल येतेय पण तुम्हाला वयाच्या ह्या टप्प्यावर हे कळलंय खूप कौतुक, शाबासकी!

अतिशय मुद्देसूद आणि छान मांडलाय विचारांच्या प्रक्रियेतील बदल.

वर्षानुवर्षे एकच मत असणारे पूर्ण ज्ञानी तरी असतात किंवा हेकेखोर तरी.>>>+१००

वर्षानुवर्षे एकच मत असणारे पूर्ण ज्ञानी तरी असतात किंवा हेकेखोर तरी.>>>अगदी पटलं .. पैकी ९९.९९ % दुसऱ्या विभागात येतात.

छान लिहिले आहे अतरंगी आणि रीलेट सुद्धा झाले. प्रत्यक्ष आयुष्य असो किंवा सोशल मीडिया आपला आजचा वावर आणि दहा वर्षांपूर्वीच वावर आठवला की हे जाणवतेच..

What clarity ! आवडले मनोगत.

.. विचारल्याशिवाय मत मांडतच नाही … हे बेस्टाय.

छान लिहिलं आहेस.
इथे 'स्मित करुन ओके' म्हणण्याशिवाय पर्यायच ठेवलेला नाहीयेस. बाकी संयोजनात आता जुने मेसेज ओक्के इज नॉट ओक्के करुन परत वाचणे आले!
बाकी बदलणार्‍या मतांवर 'तू या बोटावरची थुंकी' वगैरे टोमणे आले की 'मी विचार करतो आणि इव्हॉल्व होतो' असं एक आता ठेवणीतले उत्तर (रीड शालजोडीतले) तयार ठेवले आहे.
सध्या फार व्यक्त न होणे (माबो सोडून) हे मी पण पाळायचा प्रयत्न करतो आहे.